Wednesday, November 28, 2018

वैदिक आर्यांचा धर्म भारतात कसा आला?


Image result for aryan migration


आर्यांच्या आक्रमणामुळे येथे वैदिक धर्म व त्यांच्या भाषा पसरल्या असे आतापर्यंत मानले जात होते. जातीव्यवस्थाही आक्रमक आर्यांनी एतद्देशियांवर लादली हे मत तर लोकप्रिय होते. परंतू प्रत्यक्षात वैदिक आर्य येथे आक्रमक म्हणून नव्हे तर शरणर्थी म्हणून आले, त्यांनी येथीलच भाषा स्विकाराव्या लागल्या व येथल्या समृद्ध संस्कृतीतील देव-देव्ताहे स्विकारावुया लागल्या हे इतिहासाच्या अभ्यासावरुन स्पष्ट होते. 

अफगाणिस्तानात एकाच असूर संस्कृतीतून झरथुस्ट्री आणि वैदिक धर्म निर्माण झाले आणि पुढे त्यांच्यात वैरही निर्माण झाले हे आपल्याला अवेस्ता व ऋग्वेदाच्या तुलनात्मक अभ्यासावरुन समजते. झरथुस्ट्री धर्म प्रेषित स्थापित असल्याने त्याला एक शिस्त होती. विश्तास्पासारखा राजा आश्रयदाता म्हणून मिळाल्याने झरथुस्ट्री धर्माची वाढ होत गेली. अर्थात तुराण्यांसारखे या धर्माचे शत्रुही होते. तुराणी वैदिकांचे कधी मित्र तर कधी शत्रू म्हणून ऋग्वेदात अवतरतात. खरे म्हणजे प्राचीन इराणच्या विस्तिर्ण भुभागात असंख्य टोळ्या होत्या आणि त्यांचे एकमेकांवर वर्चस्व मिळवण्यासाठी संघर्ष होते. या संघर्षाला राजकीय परिमाण जसे होते तसेच धार्मिकही होते. वैदिक धर्म जोवर असूरकेंद्रित होता तोवर झरथुस्ट्री धर्माशी त्यांचे वैर निर्माण होण्याचे कारण नव्हते. पण पुढे मात्र दोन धर्मश्रद्धांत संघर्ष निर्माण झाल्याने असुरकेंद्रीत वैदिक धर्माने देवकेंद्रीत व्हायला सुरुवात केली. वैदिक धर्माचे आश्रयदातेही बदलत राहिले त्यामुळे ऋग्वेदात धर्मश्रद्धांतील बदल दिसुन येतात. ऋग्वेदातील प्रसिद्ध दाशराज्ञ युद्धाच्या वेळेस तुत्सु जमातीचा नायक सुदास हा या धर्माचा आश्रयदाता होता असे आपल्याला दिसते. या युद्धात वैदिक धर्म विरोधी दहा टोळ्यांनी सुदासाविरुद्ध आघाडी उघडली होती. हे युद्ध ऋग्वेदात अनेक वेळा उल्लेखले गेले असून ते युद्ध झरथुस्ट्राच्या मृत्युनंतर व ऋग्वेद रचनेच्या मध्यकाळी झाले असावे असे अनुमान अंतर्गत पुराव्यांवरुन करता येते. 

या युद्धात अनु, पख्त, भलानस, द्रह्यु, पुरु, शिव, विषाणिन, पर्शु इत्यादि टोळ्या सुदासाविरुद्ध एकवटल्या होत्या. पुरुंनाही येथे यज्ञ न करणारे, इंद्राला न मानणारे म्हटलेले आहे. याचाच अर्थ असा की पुरु सुद्धा वैदिकांपासुन दूर गेले होते. या युद्धाची जागा परुष्णी नदी दिली असून ही नदी म्हणजे भारतातील रावी असावी असे आजवर मानले जात होते. पण अन्य जमातींचा भुगोल निश्चित असल्याने अनु (पार्थिया) व पर्शु (पर्शिया) हे अतीदुर पश्चिमेतील जमाती एका युद्धासाठी सिंधू नदी ओलांडुन जवळपास आठशे मैल प्रवास करतील अशी शक्यता नसल्याने ही नदी दक्षीण अफगाणिस्तानात्वीलच कोणतीतरी नदी असावी असे आता मानले जाते. शिवाय सुदास हा परुष्णी, रावीच्या काठावर राहणारा असता तर त्याचे इतक्या दुरच्या जमातींशी वैरही निर्माण होण्याचे संयुक्तिक कारण नव्हते. शिवाय या युद्धानंतर सुदास लगोलग शत्रुचा पाठलाग करीत अनु टोळीच्या वस्त्यांवर चालून गेला आणि त्यांच्या सात तटबंद्या इंद्राच्या मदतीने फोडल्या आणि खंडनी वसून केली असाही उल्लेख येतो. रावी नदीपासुन पार्थियापर्यंत सुदासाने एवढा प्रदीर्घ पाठलाग करणेही अशक्य आहे. या युद्धात सहभागी झालेल्या टोळ्या अफगाणिस्तान व निकटच्या सीमावर्ती प्रदेशातील राजांमध्ये झाले हे त्यातील सहभागी टोळ्यांवरुनच स्पष्ट होते. दुसरे असे की रावी हा परुष्णी नदीचा अपभ्रंशही नाही हेही उघड आहे. आर्य भारतातीलच होते हे सिद्ध करण्याच्या नादात भारतीय विद्वानांनी गफलती केल्या आहेत हे उघड आहे. 

येथे महत्वाची बाब ही की पुर्वी वैदिक धर्माला सहाय्य करणारे आणि वैदिक धर्म स्विकारलेलेही या युद्ध काळात वैदिक धर्माला सोडुन गेले होते. या युद्धात या दहा टोळ्यांचा पराभव झाला असला तरी त्यांचा नायनाट झाला नाही किंवा त्यांचे जबरदस्तीने धर्मांतरही करण्यात आले नाही. म्हणजेच वैदिक धर्माची व्याप्ती या युद्ध काळात मर्यादित झालेली दिसते. द्रुह्यु, पर्शु आणि पुरु टोळ्या एके काळी वैदिक धर्माचे सहायक होते. या नंतर त्यांनी वैदिक धर्माचा त्याग केला. नंतर ते पुन्हा वैदिक धर्मात आलेले दिसत नाही कारण नंतरच्या ऋग्वेद आणि वैदिक साहित्यातून यातील टोळ्यांचे उल्लेख गायब झाल्याचे तर दिसतातच पण खुद्द पुरुंबाबतही अनादरच व्यक्त करण्यात आला आहे. 

याचा अर्थ असा होतो की दाशराज्ञ युद्धानंतर विजय मिळुनही वैदिक धर्माचा विस्तार झालेला नाही. शत्रुत्व उत्पन्न झालेल्या टोळ्या पराजयानंतर गप्प बसल्या असतील असेही नाही. नंतरच्या काळात सुदासानंतर वैदिक धर्माचे केंद्र पुन्हा बदललेले दिसते. ऋग्वेदाचा उत्तरार्ध भाग रचला जात असतांना सहदेव व सोमक हे पिता-पुत्र राजे होते असे दिसते. तेही भरतवंशाचे होते असे मानले जात असले तरी यातील काहींचाच संबंध एका कुळाशी जोडता येतो. नंतरच्या काळात वैदिक ऋषींना ज्या पणींचा द्वेष केला त्यांच्याकडुनच दाने स्विकारायची वेळ आलेली दानस्तुतींवरुन दिसते. 

याच वेळीस झरथुस्ट्री धर्माचे काय चालले होते हेही पाहुयात. झरथुस्ट्राने बल्ख (अवेस्तन ’बक्सोई’) प्रांताचा राजा विश्तास्पाच्या आश्रयाखाली आपल्या धर्माचा विकास केला होता. तुरिया (वैदिक तुर्वश, म्हणजेच तुरानी) लोकांतील हेयोना टोळीने त्यामुळे विश्तास्पाशी वैर घेतले. त्याचीच परिणती झरथुस्ट्राच्या अग्नीमंदिरात जाळून हत्या होण्यात झाली. ऋग्वेदानेही ही नोंद करुन ठेवली आहे. या काळात वैदिकांचे मित्र असलेले तुराणी नंतर मात्र वैदिकांचे हाडवैरी झालेले दिसतात हे दाशराज्ञ युद्ध प्रकरनात त्यांनी सुदासाविरुद्ध उभे ठाकले यावरुन दिसून येते. 

अवेस्त्याचा भुगोल नंतर बराच बदललेला दिसतो. झरथुस्ट्रानंतर जे अवेस्तन साहित्य आहे ते विपूल असले तरी इतिहाससुचक वर्णने त्यात नाहेत. परंतू त्यातील बदललेल्या भुगोलावरुन झरथुस्ट्री धर्माचा विस्तार समजून येतो. झामयाद यस्टमध्ये जो भुगोल विस्ताराने आला आहे तो सिस्टन प्रांताचा आहे. याच प्रांतातुन हेल्मंड (सरस्वती) नदी वाहते. तिच्या जलक्षेत्राची सखोल माहिती यात येते. ही नदी हमाऊन (ऋ. समुद्र) या तळ्यात विसर्जित होते. याशिवाय या नदीच्या परिसरात असलेले पर्वत व अन्य प्रदेशांचीही माहिती यात येते. हिंदुकुश पर्वत मध्याला, बाजुलाच एरिया, मार्जियाना, ड्रांगियाना आणि भारत-इराण सीमेवरील गांधारपर्यंत हा भुगोल यात आलेला आहे. याचाच अर्थ असा की झामयाद यस्टच्या काळात झरथुस्ट्री धर्माने दक्षीण अफगाणिस्तानवरही, म्हणजेच वैदिकांच्या मुळ आश्रयस्थानावरही वर्चस्व मिळवले होते त्याशिवाय अन्य अवेस्त्यात न येनारी एवढी सखोल माहिती आली नसती. पुढे झरथुस्ट्री धर्माची व्याप्ती पर्शियापर्यंत झालेली दिसते. 

वैदिक धर्माचा उगम सिस्टन प्रांतातच व सरस्वती (हरहवती/हेल्मंड) नदीच्या परिसरातच झाला. सरस्वतीचे अतोनात गुणगाण गायले जायचे कारणही तेच आहे. याच प्रांतात नंतर झरथुस्ट्री धर्माचा जोर वाढल्याचे, किंबहुना बल्ख प्रांत ओलांडत तो धर्त्म दक्षीणेतही प्रबळ झामयाद यस्टवरुन सूचित होते. मग यावेळेस वैदिकांची अवस्था नेमकी काय होती? वैदिकांनी असूर (अहूर माझ्दा) धर्माला कसे तोंड दिले?

वैदिक धर्माला या काळात उतरती कळा लागली हे आपल्याला ऋग्वेदावरुन कळते. इतके की ज्या पणींचा द्वेष केला त्यांच्याकडुनही दाने स्विकारावी लागली. (ऋ. ६.४५.३१-३२) प्रबळ राजाश्रयाच्या अभावात कोणत्याही धर्माला उतरती कळा लागणे स्वाभाविक आहे. उत्तर अफगाणिस्तानापर्यंत मर्यादित असलेला झरथुस्ट्राच्या काळातील धर्म नंतर दक्षीणेकडेही स्थिर होत असल्याचे आपण झामयाद यस्टवरुन पाहिले. येथे नेमके काय झाले किंवा कोणत्या टोळ्यांनी झरथुस्ट्री धर्माचा अंगीकार केला हे स्पष्ट लिहिले नसले तरी नंतर पर्शु व तुर्वशांसहित अनेक टोळ्या या धर्मात गेल्या असा अंदाज बांधता येतो. अवेस्त्याची नंतरची रचना पर्शियन भाषेतीलच आहे. पर्शुंनीही राजाश्रय दिल्याखेरीज हे घडणे शक्य नाही.

ब्राह्मण ग्रंथांत देवासुर युद्धांच्या अनेक पुराकथा येतात. त्यातील मिथकीय अंश जरी दूर केला तरी देव (वैदिक) विरुद्ध असूर (झरथुस्ट्री) यांच्यामधील संघर्षाचे प्रतिबिंब त्यात पडलेले दिसते. शतपथ ब्राह्मणात एक कथा येते ती अशी- देवासूर युद्धात देवांचा पराभव झाला. घाबरलेले सारे देव पळून गेले. मग देवांना हाकलल्यावर रिक्त झालेली पृथ्वी वाटुन घ्यायला समस्त असूर बसले. या वाटपात देवांना जागाच मिळेना त्यामुळे असहाय झालेले देव पुन्हा असुरांकडे गेले आणि पृथ्वीचा किमान छोटा तरी हिस्सा आम्हास मिळावा अशी विनवणी केली. तेंव्हा असुरांनी एका बटु वामनाच्या तीन पावलांएवढी भुमी देवांना द्यायची तयारी दर्शवली. तो बटू वामन खरे तर विष्णु होता. मग वामनरुपधारी विष्णुने विशाल होत तीन पावलात त्रिभुवन व्यापले व असुरांनाच भुमीपासून वंचित केले. (शतपथ ब्राह्मण १.२.२.१-५). या कथेतील वैदिक शैलीतील मिथकीय अंश दूर काढला तर हे लक्षात येते की देवांना (म्हणजे वैदिकांना) पराभव स्विकारावा लागल्याने भुमीहीन व्हावे लागले होते, असुरांना नाही. या कथेतील उत्तरार्धातील भाग हा केवळ मलमपट्टी या स्वरुपाचा आहे. मुळात ही देवासूर युद्धे संपुर्ण काल्पनिक नसून देवकेंद्रीत धर्म आणि असूरकेंद्रीत धर्म यातील संघर्षाचे सूचन करतात हे उघड आहे. देवांनी, कपटाने का होईना, पण शेवटी विजयच मिळवला असे दर्शवले जात असले तरी वास्तव तसे सांगत नाही. कारण पुढचा इतिहास त्या जयाच्या कथेला पूरक ठरत नाही, एवतेव त्या काल्पनिक ठरतात.

काही वैदिकांना सरस्वती नदीचा प्रदेश सोडून हिंदुकुश ओलांडत भारतात कसे यावे लागले याचीही स्मृती एका पुराकथेच्या रुपाने शतपथ ब्राह्मणाने जपून ठेवली आहे. किंबहुना वैदिकांच्या स्थलांतराची ही एकमेव कथा वैदिक साहित्यात येते व ही बाब लक्षणीय आहे. शतपथ ब्राह्मणात (श. ब्रा. १.४.१, १४-१७) येणारी ही कथा अशी-

"सरस्वती नदीच्या तीरावर राहणा-या विदेघ माथवाच्या मुखातून अग्नी पडल्यावर तो अग्नी पृथ्वीला (अरण्यांना) व नद्यांना जाळीत (कोरड्या करत) पुर्वेकडे निघाला. विदेघ माथव व त्याचा पुरोहित गौतम राहुगन त्या अग्नीच्या पाठोपाठ निघाले. तो अग्नी शेवटी उत्तरगिरीतुन वाहणा-या सदानीरा नदीजवळ आला. अग्नी या नदीला सुकवू शकला नाही. ब्राह्मणांनी ही नदी कधीही पुर्वी ओलांडलेली नव्हती. विदेघाने अग्नीस विचारले की मी कोठे राहु? तर अग्नीने उत्तर दिले की या नदीच्या पुर्वेकडे रहा. तेंव्हा सदानीरेच्या पुर्वेची जमीन दलदलीची व लागवडीखाली नव्हती." ही कथा सांगून याच्या शेवटी विदेहाचा राजा माधवाशी विदेघ माथवाचा संबंध जोडण्यात आला आहे. असे असेल तर मुळातच विदेह माधव असे नांव न घेता विदेघ माथव असे घ्यायचे कारण काय हा प्रश्न निर्माण होतो. उत्तरकाळात विदेह प्रांताशी विदेघमाथवाचा ओढून ताणून संबंध जुळवण्यासाठी पुराकथेचा उपयोग केला गेला आहे हे निश्चित  आहे. यात विदेघ हे प्रांताचे नांव नसून खुद्द माथवाचे पहिले नांव आहे. त्या वेळीस माथव हीच एखादी टोळी असू शकते. माथव हा शब्द मधुवरुन आलेला नाही यामुळे माधव व माथव याचा काहीएक संबंध नाही. 

या कथेतील वैदिक पुराकथनात्मक शैली लक्षात घेता समोर येणारी बाब ही की सरस्वती (हरहवती) नदीच्या काठावर कोणी विदेघ माथव नांवाचा राजा अथवा टोळीप्रमुख रहात होता व गौतम राहुगन हा त्याचा पुरोहित होता. त्यांनी सपरिवार एके दिवशी (अथवा रात्री) सरस्वती नदीचा किनारा सोडला व हिंदुकुश पर्वत (उत्तरगिरी म्हणजे हिमालय नव्हे. गिरी हा शब्द कमी उंचीच्या पर्वतांसाठी वापरला जातो. हिमालयाचा उल्लेख प्राचीन साहित्यात हिमवत अथवा हिमवन असाच येतो.) ओलांडत सिंधू नदीच्या पार हे लोक एका नदीजवळ आले. हा प्रदेश उजाड व दलदलीचा होता. या नदीच्या पुर्वेला त्यांनी वस्ती केली. येथवर कधीही यज्ञ (वैदिक धर्मीय) आलेला नव्हता हे कथेतच स्पष्ट आहे. 

आर्य आक्रमणवादी विद्वानांनी या कथेतून वैदिक आर्यांचा पंजाबातून पुर्वेकडे (विदेहाकडे) विस्तार झाल्याचा अर्थ काढला आहे. सदानीरा नदी म्हनजेच गंडकी असाही अनेक विद्वानांचा तर्क आहे. त्यांचा एकंदरीत मतितार्थ असत्यो की पंजाबमध्ये वेदरचना पुर्ण झाल्यानंतर वैदिक आर्यांनी पुर्वेकडे विस्तार सुरु केला. पंण असे असते तर मग गांधार वगळता खुद्द पंजाबमधीलच तत्कालीन राज्ये तसेच केकय, कुरु, पांचाल, मगध, कोसलादि राज्यांचा उल्लेख ऋग्वेदात एकदाही येत नाही. येतात ते उत्तरकालीन साहित्यात. ऋग्वेदात येणा-या सर्वच जमाती पश्चिमोत्तर भारत व प्राचीन इराणमधील आहेत. म्हणजे ऋग्वेदाचा भुगोल वेगळा होता व अन्य वेद ते ब्राह्मण ग्रंथांचा भुगोल वेगळा होता. वैदिक धर्म नंतर बिहार (मगधात) व अन्य प्रदेशांतही नंतर गेला हे खरेच आहे. पण नोंदले गेलेले पहिले स्थलांतर शतपथ ब्राह्मणात आहे व तेही पुरातन स्मृतीस्वरुपात आलेले आहे. त्यामुळे विद्वानांच्या तर्क-वितर्कांना कसलाही ठोस आधार नाही.  

जो घोळ त्यांनी कारण नसता सरस्वती नदीच्या मुळ स्थानाबद्दल घातला आहे तसाच गोंधळ गंडकीबाबत केल्याचे आपल्याला दिसून येते.  मुळात बिहारमधून वाहणारी गंडकी म्हणजे सदानीरा नव्हे. अमरकोशाचा अमरसिंह म्हणतो की सदानीरा हे बहुदा बंगालमधील कर्तोया नदीचे नांव असावे. म्हणजे तोही ठाम नाही. महाभारतातील हकीकत पाहिली तर जे वर्णन मिळते त्यावरुन शरयु व गंडकीमधूनच्या परिसरातुन वाहणारी ही कोणतीतरी नदी असावी असे दिसते. हे तर्क सोडले तर या नांवाची एकही नदी उत्तर भारतात नाही. वैदिकांना पूज्य असलेल्या सरस्वती नदीचे नांव घग्गर कसे होऊ शकेल हा जसा प्रश्न आहे तसाच गंडकीचे नांव सदानीरा कसे बनले हाही प्रश्न आहे कारण याला कालौघात झालेला अपभ्रंशही म्हणता येत नाही. एवतेव विदेहाचा आणि विदेघ माथवाचाही संबंध नाही. सदानीरा म्हनजे सतत पाणी असलेली नदी. हे वर्णन कोणत्याही नदीला लागु पडते. निर्मनुष्य भागातील दलदलीच्या भागात वस्ती करणा-या विदेघ माथवाने त्या नदीचे तात्पुरते नामकरण केले आणि नंतर ते विस्मरणातही गेले एवढेच फारफारतर या संदर्भात म्हणता येईल. त्यामुळे हा पंजाबमधुन बिहारकडे (मगध/विदेहाकडे) झालेला विस्तार नसून सरस्वती (द. अफगाणिस्तान) ते सिंधू नदीचे खोरे असा हा प्रवास आहे. हा प्रवास त्यांना शहरी वस्त्या टाळत अरण्यातून अनेक नद्या ओलांडत एका निर्मनुष्य भागात वस्ती केली. हा भाग दलदलीचा असला तरी सुरक्षित असल्याने त्यांना तात्पुरते का होईना तेथे राहण्यावाचून इलाज नव्हता.

मगधादि पुर्वेचे प्रदेश सनपूर्व तीन हजारपासून वस्त्यांनी गजबजलेले होते. याचे पुरावे पुरातत्वीय उत्खननांतून मिळालेले आहेत. गंगा-यमुना संगमाजवळील झुसी येथे इसपू सहा हजार वर्षापासुन वस्ती असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. शिवाय सिंधू संस्कृती व गंगेच्या खो-यातील लोकांचचा संपर्क असून परस्पर देवाणघेवानही होत होती असे फुल्लेर यांनी दाखवून दिलेले आहे.  याचाच अर्थ असा की पंजाबच्या पुर्वेला वैदिकांनी पहिल्या वसाहती बनवल्या या मताला काहीही अर्थ नाही. आणि दुसरे म्हणजे विस्तार करीत असतांना कोनाशी त्यांचे युद्ध झाल्याचेही सूचन नाही. याचा अर्थ एवढाच की लोकवस्त्या टाळत वैदिकांनी प्रवास केला खरा पण तो पंजाबमधून पुर्वेकडे नव्हे तर अफगाणिस्तानातील सरस्वतीच्या पुर्वेकडे भारतीय उपखंडात, सिंधु नदीच्याही पुर्वेकडे. उत्तर भारतातील मर्यादित प्रदेश त्यांना नंतर क्रमाक्रमाने माहित होत गेले आणि त्याचेही सूचन आपल्याला शतपथ ब्राह्मणात मिळते. खरे तर मगधात खूप उशीरापर्यंत वैदिकांना प्रवेशच मिळालेला नव्हता असे शतपथ ब्राह्मणानेच नोंदवलेले असल्याने विदेघ माथवाच्या कथेतून काढलेले आर्य आक्रमणवादी सिद्धांताचा पायाच निघून जातो हेही येथे लक्षात घेतले पाहिजे.

येथे हा प्रश्न निर्माण होतो की मुळात विदेघ माथव, त्याचा पुरोहित गौतम राहुगन आणि त्यांचा परिवार किंवा समस्त टोळी असे अचानक सरस्वती नदीच्या काठावरुन का निघाले असतील? या प्रश्नाचे उत्तर आपण अहुर माझ्द्याचा, म्हणजेच झरथुस्ट्र धर्माच्या विस्तारात पाहिले आहे. बव्हंशी वैदिक टोळ्यांनी स्वेच्छेने अथवा जबरदस्तीने झरथुस्ट्री धर्मात प्रवेश केला खरा पण जे कट्टर वैदिक होते त्यांनी मात्र धर्म जतनासाठी स्थलांतर करणे पसंत केले. अग्नी विदेघ माथवाच्या तोंडात होता (म्हणजे उघड नव्हता) हे शतपथ ब्राह्मणातील कथा हेच आपल्याला सांकेतीकपणे सांगते. म्हणजेच ही मंडळी झरथुस्ट्री लोकांपासुन लपून छ्पून अफगाणिस्तानातुन निघून गांधार (हिंदुकुश) ओलांडत भारतात आली हे यावरून सूचित होते. अशी कोणत्याही धर्माच्या आक्रमणानंतर अथवा छळानंतर धार्मिकांनी केलेली अनेक स्थलांतरे इतिहासाने नोंदवून ठेवलेली आहेत. त्यामुळे याच स्थलांतराचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. देव-असूर युद्धात पराजय झाला असला तरी आत्मगौरव/अस्मिता जपण्यासाठी विजयच कसा झाला हे सांगितले गेलेले असले तरी ते ऐतिहासिक वास्तव दिसत नाही.

शुद्रांच्या राज्यात

आता, जेथे त्यांनी वास्तव्य केले तो प्रदेश कोणाचा होता हेही आपण उपलब्ध पुराव्यानुसार पाहुयात. वैदिकांचा हा पहिला थांबा शुद्रांच्या राज्यात असल्याचे पुरावे आपल्याला सुदैवाने उपलब्ध आहेत. सिंधू नदीच्या पुर्व भागात शुद्र टोळीचे राज्य होते. हे राज्य केवळ पुराणकथीय नसून ते वास्तवात अस्तित्वात होते. शूद्र नांवाची एक टोळी पश्चिमोत्तर भारतात, उत्तर सिंध प्रांतात रहात होती याबाबतचे अनेक पुरावे सुदैवाने उपलब्ध आहेत. अलेक्झांडरचा इतिहासकार डायोडोरस हा अलेक्झांडरच्या भारतावरील स्वारीच्या काळात त्याच्या सोबत होता. त्याने सिंध प्रांतातील सोद्राइंशी झालेल्या युद्धाचे व अलेक्झांडरने त्या प्रांतात एका नदीच्या काठी वसवलेल्या अलेक्झांड्रिया नगरीचे वर्णन करून ठेवले आहे. ५ सोद्राई हे नांव सुद्द ( नंतरचे संस्कृतीकरण शूद्र) शब्दाचा ग्रीक अपभ्रंश आहे हे सर्व विद्वान मानतात. अलेक्झांडरचे आक्रमण इसपू चवथ्या शतकात झाले हे सर्वविदित आहे त्यामुळे तोपर्यंत तरी ही जमात त्या भुभागात अस्तित्वात होती. इतिहासकार राम सरण शर्माही या विधानाला दुजोरा देतात व म्हणतात, "शुद्र एक टोळी (जमात) म्हणून इसपू चवथ्या शतकापर्यंत अस्तित्वात होती याबाबत शंका नाही." 

महाभारतात शूद्र टोळीचे नांव अभिरांसोबत तर वारंवार घेतले आहे. युधिष्ठिराच्या राज्यारोहण समारंभापुर्वी उत्तरेकडे दिग्विजयासाठी गेलेल्या नकुलाला शूद्र टोळीप्रमुखाने नजराने दिले. भारत युद्धात शूद्र जमात अभिरांसह दुर्योधनाच्या बाजुने लढली. इतिहासकार ग्यानचंद चौहान म्हणतात कि अभिरांसोबतच शूद्र टोळीचे इतके उल्लेख मिळतात कि महाभारत काळापर्यंत सिंध प्रांतात ही टोळी अत्यंत भरभराटीला आलेली होती असे स्पष्ट दिसते.  शूद्र टोळीचे उल्लेख स्वतंत्रपणे मार्कंडेय व ब्रह्म पुराणातही आलेले आहेत. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते व ती म्हणजे शुद्र हे सिंध प्रांतातील एका जमातीचे नांव होते. त्या प्रांतातच अनेक अन्यत्र अनेक स्वतंत्र नांव असलेल्या अभिर, शिबीसारख्या अनेक जमाती होत्या. प्रत्येक जमात अथवा गण स्वतंत्र नांवाने आपापल्या भुभागात भारतभर सुखनैव जगत होता. 

निर्मनुष्य भागात वस्ती केली असली तरी तो भाग कोणाच्या तरी राज्यात होता. शुद्र टोळीने त्यांना हाकलून लावायचा प्रयत्न केलेला दिसत नाही. शिवाय या राज्यात ते बराच काळ राहिले असावेत. ऋग्वेदाचा बराच भाग येथे आल्यावर रचला गेला. विदेघ माथवाने अज्ञातवासातील अनेक वैदिकांनाही तेथे बोलावले. यजुर्वेदासहित ऋग्वेदाची पुनर्रचना बव्हंशी येथेच झालेली दिसते. आसपास शुद्रच लोक असल्याने आणि त्यांच्याच मेहरबानीने जगावे लागत असल्याने शुद्र समाजाला आदरार्थी महत्व दिले जाणे स्वाभाविक होते. शूद्रांचा धर्म वेगळा आहे याचीही त्यांना जाणीव होती. असे असले तरी त्यांना खूष करायला त्यांच्यासाठीही यज्ञ केले गेल्याचे आपल्याला मनुस्मृतीवरुनच लक्षात येते. "ब्राह्मण देवांपासून उत्पन्न झाले तर शूद्र असुरांपासून निर्माण झाले" असे तैत्तिरिय ब्राह्मणाने (तै,. ब्रा. १-२.६.७) नोंदवून ठेवले. भारतातही असूर संस्कृती होतीच पण ती मुर्तीपुजकांची होती. 

यजुर्वदेही अशीच नोंद करतो. “शूद्रार्यावसृज्येताम”  (यजुर्वेद १४/३०) हे विधान बळ देते. "शूद्र व आर्य यांना निर्माण करण्यात आले." असे यात स्पष्ट म्हटलेले आहे. आर्य व शुद्र हे दोन वेगळे समाज आहेत व त्यांचे निर्मिती स्वतंत्रपणे खालेली आहे याचे स्पष्ट भान वैदिकांना आहे. एवढेच नव्हे तर यजुर्वेदात शुद्रांच्या कल्यानासाठीही प्रार्थना करण्यात आलेल्या आहेत. (यजुर्वेद १८.४८, २०.१७, २६.२) याचा अर्थच असा होतो कि आर्य (म्हणजे वैदिक धर्मीय) व शूद्र यांची निर्मिती स्वतंत्रपणे झाली, हे दोन्ही वेगळे आहेत. येथेही अन्य जमातींची नांवे येत नाहीत कारण या ऋचांची रचना शुद्रांच्याच राज्यात झालेली होती. त्यांच्याच मेहरबानीवर अवलंबून असल्याने ते वेगळे आहेत हे माहित असतांनाही त्यांच्याही कल्याणासाठी प्रार्थना करणे स्वाभाविक होते. अद्याप अन्य जमातींशी वैदिकांचा परिचय झाला नव्हता. किंबहुना सिंधु नदीच्या पलिकडे सारे हिंदू राहतात असा समज जसा प्रचलित होता तसाच समज वैदिकांचाही शुद्रांबाबत झाला असल्यास नवल नाही. त्यामुळे पुढे वैदिकांनी अवैदिक भारतीयांसाठी शूद्र हे नांव सरसकटपणे वापरल्याचे आपल्याला दिसते आणि त्यातुनच मोठा सांस्कृतीक गोंधळ झाला हे एक कटू वास्तव आहे. 

अर्थात येथवर शुद्र आणि वैदिक आर्य यांचे संबंध चांगलेच होते. वैदिकांनी या काळात वेदाचे संकलन, पुनर्रचना व अधिकची भर घालत यज्ञसंस्था बळकट तर केलीच पण त्यांचे स्वसामाजिक पुनर्गथणही केले. अफगाणिस्तानात असतांना आवश्यक न भासलेली वर्णव्यवस्था त्यांना येथे निर्माण करावी लागली. पुरुषसुक्ताची रचनाही येथेच झाली. समस्त समाज पुरुषाचे कल्पना करतांना शुद्रांना वगळणे त्यांना शक्य नव्हते. त्यासाठी पुरुषसूक्त हाच महत्वाचा पुरावा आहे. 

ब्राह्मणोऽस्य मुखमासीद् बाहू राजन्यः कृतः
ऊरू तदस्य यद्वैश्यः पद्भ्यां शूद्रो अजायत 

विराट पुरुषाचे मुख हे ब्राह्मण झाले, बाहु हे क्षत्रीय झाले, मांड्या या वैश्य झाल्या तर शूद्र हे पायापासून जन्माला आले. येथे पाय हे शूद्र झालेले नाहीत. कारण ते त्या विराट पुरुषाच्या शरीराचे हिस्सेच नाहीत ही जाणीव त्यांना होती. त्यांची नोंद शेवटी केली गेली याचेही हेच कारण आहे. ज्या यज्ञात विराट पुरुषाचा बळी दिला तो उभा नव्हे तर आडवा. त्यामुळे शुद्रांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन परके, वैधर्मी, पण महत्वाचे असा दिसतो. ते वैदिक समाजव्यवस्थेचे भाग नाहीत ही जाणीव असल्याने  पाय हे शूद्र बनले नाहीत. त्यांची उत्पत्ती स्वतंत्र आहे हे त्यांना माहित आहे. अन्य जमाती भारतात असुनही त्यांचे नांव येत नाही कारण त्या त्यांना माहितच नव्हत्या. मनुस्मृतीच्या काळापर्यंत त्यांना विंध्याच्या पलीकडे दक्षीनेत कोण रहाते हेही माहित नव्हते. किंबहुना अन्यत्र सर्व शुद्रच राहतात व शुद्रच राजे आहेत हा समज त्यांचा अगदी मनुस्मृतीच्या आरंभकाळापर्यंत होता हे मनुस्मृतीवरुनच स्पष्ट दिसते. 

म्हणजेच शूद्रांच्याच राज्यात त्यांच्याच आश्रयाखाली रहात असतांना आणि ते आपल्या धर्माचे/संस्कृतीचे नाहीत पण प्रभावी समाजघटक आहेत असे पुरुषसुक्तच सांगत असतांना याकडे मात्र वर्चस्वतावादी आणि हीनगंडवाद्यांनी दुर्लक्ष केले. यजुर्वेद व तैत्तिरिय ब्राह्मणामधील नोंदीही तपासायचे कष्ट त्यांनी घेतले नाहीत. शिवाय ऋग्वेदात दास, दस्यू, पर्शु, पख्त, पार्थियन अशा जवळपास ४८ टोळ्यांची नांवे येत असतांना या सुक्तात त्यांचे समाजघटक म्हणून नांव न येता, तोही केवळ एकदाच, “शूद्र” हा शब्दच एक वर्ग म्हणून केवळ पुरुषसुक्तातच का अवतरतो याकडेही विद्वानांनी लक्ष दिले नाही. त्या ४८ टोळ्या पार मागे सुटुन गेल्या होत्या आणि आता ते शुद्रांच्या सन्निध्यात आले होते म्हणून त्यांचे नांव आले हे येथे लक्षात घ्यायला हवे.  

शुद्र जमातीच्या राज्यात वसाहती करून रहात असतांना त्यांना शेती, पशुपालनादि व्यवसाय चरितार्थासाठी करणे भाग होते. हे व्यवसाय करतांना मदतनीस म्हणून कर्मचा-यांची गरज भासने   स्वाभाविकच होते. आता कोण त्यांच्याकडे सेवक म्हणून राबनार? गरजू लोकांची समाजात कमतरता नसते. किंवा अधिक वेतनावर काम मिळनार असेल तर लोक सध्याचे उपजिविकेचे  साधन सोडून देतात. तसेच त्यांना जे सेववर्गातील लोक मिळाले ते स्वाभाविकच शूद्र जमातीतीलच गरजू लोक असनार. असा सेवकवर्ग वैदिक वसाहतींच्या जवळच स्वतंत्र वसाहतीत राहणार हे ओघाने आले. या काळात सेवकवर्गात नसलेल्या शुद्र राजासाठी अथवा शूद्र धनिकांसाठीही यज्ञ केले जात हेही महाभारत व मनुस्मृती नोंदवते. हे यज्ञ कृतज्ञतेपोटी अथवा दानदक्षीणेच्या प्राप्तीसाठी होत असत. नंतर शुद्रांसाठी यज्ञ करणा-या पुरोहितांना हीण लेखले जाऊ लागले. येथे त्या तपशिलात न जाता एवढेच सांगतो की ऋग्वेदाची उर्वरीत रचना व पुनर्मांडणी शुद्रांच्याच राज्यात झाली. यजुर्वेद व ब्राह्मण ग्रंथांची रचनेस येथेच सुरुवात झाली. नंतर मात्र वैदिक येथुनही पुढे सरकलेले दिसतात व तो प्रवास आपल्याला पुढीलप्रमाणे पहाता येतो. 

महत्वाची बाब म्हणजे शूद्र या शब्दाची व्युत्पत्ती संस्कृत भाषेत लागत नाही. किंबहुना शूद्र या शब्दाचा कोणताही अर्थ सापडत नाही. प्राकृत "सुद्द" या शब्दाचा हा वैदिक अपभ्रंश आहे हे उघड आहे. वैदिकांनी अनेक शब्दांचे असे अपभ्रंश केले आहेत. उदा. म्लेंछ हा शब्द "मेलुहा" या शब्दाचा अपभ्रंश असल्याचे दानी आणि थापरांनी दाखवुन दिलेले आहे. ‘मेलुहा हे राष्ट्र म्हणून वैदिकांना परकीयच होते. पुढे हा शब्द भारताबाहेरच्या परकीयांसाठी कायम राहिला असे आपल्याला दिसते. शिवाय ऋग्वेदाच्या भाषेवर नंतरही वारंवार संस्कार करण्यात आले. मुळची अवेस्त्याच्या निकट जाणारी भाषा बदलण्याच्या प्रयत्नांत मुळ पर्शियन नांवांचेही अपभ्रंश झाले. उदाहणार्थ अरजास्पचे वैदिक नामांतर ध्वनीबदल करत ऋजाश्व असे करण्यात आले. अशी असंख्य उदाहरणे आहेत. त्यामुळे वैदिक भाषा ही शुद्ध आहे वगैरे समज बाळगण्याचे काही कारण नाही. 
 
विदेघ माथवाच्या पुरोहिताने स्मरणात आहे तेवढा वेद सोबत आणला खरा पण सर्व त्यालाही माहित नव्हता कारण अनेक ऋषीकुलांत वेद विभाजला गेलेला होता. सर्वच ऋषीकुळात मैत्रीचे संबंध नव्हते. उदाहणार्थ विश्वामित्र व वसिष्ठाच्या घराण्यात वितुष्ट होते. या दोन ऋषी कुटुंबाच्या नांवाने दोन महत्वाची मंडले आहेत. ते एकमेकांची मंडले पाठ ठेवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण संकलन आवश्यक असल्याने विदेघ माथव अथवा त्याच्या वंशजांनी प्रयत्नपूर्वक मिळेल तसा वेद गोळा केला. त्याची मंडले/सुक्ते यात विभागणी केली व जेथेही रिक्त जागा होत्या तेथे स्मरणातून भर घातली. दहावे मंडल हे सर्वात अर्वाचीन समजले जाते. ऋग्वेदातील नदीसूक्त व पुरुषसूक्त हे अर्वाचीन समजले जाते. असे असले तरी नदीसुक्ताआधी पुरुषसुक्ताची निर्मिती झाली हे उघड आहे. याचे कारण म्हणजे या सुक्तात शुद्रांचा जसा उल्लेख येतो तसेच दुसरा वर्ण म्हणजे राजन्याचा उल्लेख येतो. पुढे मात्र राजन्य हा वर्ण पुर्ण गळालेला दिसतो व क्षत्रीय हा दुसरा वर्ण समजण्याची प्रथा निर्माण झालेली दिसते. नदीसुक्तात भारतातील गंगा-यमुनेसारख्या पुर्वेकडील नद्यांची नांवे येतात म्हणजेच तोवर त्यांना ऐकून का होईना त्या नद्या माहित झालेल्या होत्या. ऋग्वेदात अन्यत्र कोठेही या नद्यांचा उल्लेख येत नाही कारण तेंव्हा ते भारतात प्रवेशलेलेच नव्हते. केवळ या सुक्तावरुन वैदिक आर्य हे मुळचे भारतातीलच होते हे मत टिकत नाही, कारण अन्यत्रच्या त्यांच्या अनुल्लेखाचे दुसरे कोनतेही स्पष्टीकरण विद्वानांकडे नाही. 

शिवाय येथे ऋग्वेदाची मुळची अवेस्ता सदृष्य भाषाही प्राकृत वळणे घेतांना दिसते. या भाषेवर शुद्रांच्या राज्यात बोलल्या जाणा-या प्राकृतचा प्रभाव आहे असे म्हटले तरी वावगे व अनैतिहासिक होणार नाही. ऋग्वेदातील मुळच्या रचनेत ध्वनीबदल केला गेल्याने वैदिक छंदही बदलले. उदाहरणार्थ म्यक्समुल्लर म्हणतो, "या सुक्तात प्रथमच ग्रीष्म, वसंत, व अन्य ऋतू अवतरतात जे इराणमद्ध्ये नाहीत व ऋग्वेदातही अन्यत्र उल्लेखले गेलेले नाहीत. या सुक्ताची भाषाही अर्वाचीन आहे."  थोडक्यात ऋग्वेदाचे संपादन व दहाव्या मंडलाचे बरेचसे लेखन हे भारतात आल्यावर झाले आहे.तत्कालीन शुद्रांमध्ये प्रचलित असलेल्या तंत्रांचाही प्रभाव पडल्यामुळे विवाह, अंत्यसंस्कार, मरणोत्तर गती अशा संकल्पनाही ऋग्वेदात घुसल्या ज्या तत्पुर्वीच्या सुक्तांत पुर्णतया अदृष्य आहेत. ऋग्वेदाची पायाभूत भाषा प्राकृत असल्याची तर अनेक उदाहरणे आहेत. अवेस्ता-सदृष्य भाषेपासून वैदिकांना फारकत घेणे आवश्यक होते कारण त्यांना येथील भाषा-पर्यावरणात धर्म पसरवायचा होता. त्यामुळे वैदिक आधी व प्राकृत नंतर या भ्रमातून आजच्याही विद्वानांनी येणे आवश्यक आहे. 

लोहित. लभ, काल, लक्ष्मी, आज्य, विजय, एवम हे नवे शब्द दहाव्या मंडलात येतात. देवास:, सत्यास: अशा संस्कृत बहुवचनांऐवजी देवा:, सत्या: असे बहुवचनी प्रयोग अधिक वेळा यात आले आहेत. अनेक नवीन देवता या मंडलात अवतरतात त्या, उदा. मन्यू, श्रद्धा, लक्ष्मी, तार्क्ष्य ई., ऋग्वेदात या मंडलात अवतरतात. १० या देवता शुद्रांकडून वैदिकांनी उधार घेतल्या असल्याची शक्यताच अधिक आहे. भाषाप्रयोगासाहितचे हे त्या शूद्र टोळीचे वैदिकांवरील ऋण आहे. उलट वैदिकांचे घोर अज्ञान हे की तेंव्हा तोवर तरी उत्तर भारतात अजून कोणत्या टोळ्या रहात होत्या याचे भान अथवा ज्ञान नव्हते. ब्राह्मण ग्रंथांत मात्र क्रमश: त्यांचे भारताचे भौगोलिक ज्ञान काही प्रमाणात वाढलेले दिसते आणि इतर जमातींचीही नांवे येवू लागतात. 

शूद्र हे नांव त्यांनी भारतातीलच सर्व जमातींना सरसकट वापरल्याने व धर्मांतरितांनाच वैदिक वर्ण दिल्याने मोठा गोंधळ झाला असला तरी यासाठी आपण अन्य विद्वानांनी शूद्र कोण याबद्दल काय मत दिले आहे हे पाहुयात.

१) "शूद्र हे मुळात एखाद्या अवैदिक (अनार्य) टोळीचे नांव असावे." -राज पृथी. ११
२) "तीन वर्णांच्या बाहेर जो समाज होता त्याला शूद्र हे नांव वापरले गेले." वि. का. राजवाडॆ. १२  
३) "शूद्र हे आधी एखाद्या टोळीचे नांव असावे. नंतर हे नांव जोही कोणी अनार्य आहे, अवैदिक आहे वतीन वर्णांच्या बाहेर आहे अशा सर्वांनाच, परकीयांनाही उद्देशून वापरले गेले. सुत्रांच्या दृष्टीने जेही कोणी तीन वर्णांचे नाहीत ते शूद्र."- देवदत्त भांडारकर. १३ 

अंगविज्जा या पहिल्या शतकातील माहाराष्ट्री प्राकृतातील ग्रंथातही त्रैवर्णिकांनाच आर्य धर्माचे म्हटले असून शुद्र, यवन, शक, कुशाण वगरे गट हे म्लेंच्छ होत असे म्हटलेले आहे.  मनुस्मृती व पातंजली महाभाष्यही (२.४.१०) अशीच मांडणी करते. याचा अर्थ स्पष्ट आहे की ती शुद्र टोळी व नंतर ज्यांनाही वैदिकांनी सरसकटपणे शूद्र म्हटले त्यांचा धर्म आर्य अथवा वैदिक अथवा सनातन धर्म नव्हता तर तंत्राधारित शिव-शक्तीप्रधान मुर्तीपूजकांचा धर्म होता. 

वैदिक विस्ताराची सुरुवात

वैदिकांचा भारतातील पहिला थांबा कुरु प्रदेश असावा व त्यांचा राजाश्रय त्यांना मिळाला असावा असे ग्रिफिथ सुचवतो. उपलब्ध पुरावे पाहता असलाच तर तो दुसरा थांबा होता. दोन -तीन पिढ्यानंतर शुद्रांच्या राज्यातून वैदिक धर्मीय पुर्वेकडे सरकू लागले. या दरम्यानच्या काळातच त्यांचा व्रात्यांशीही संपर्क आला असावा. याच काळात अनेक शूद्र ते व्रात्यही वैदिक धर्मात प्रवेशलेले दिसतात. त्यामुळेच काही नव्या देवतांचा समावेश ऋग्वेदाच्या अंतिम भागात झालेला दिसतो. कुरुंचा राजाश्रय मिळाल्याने त्यांना आपले ग्रांथिक कार्य पुर्ण करीत धर्माला शिस्तबद्ध स्वरुप देण्यास मदत झाली. येथे त्यांनी धर्मप्रसाराची मोहिम हाती घेण्यासाठी प्रसारकांना प्रशिक्षित करण्यास सुरुवात केली. भागवत व ब्रह्मांड पुराणात येणा-या कथांवरुन ही प्रक्रिया समजून घेता येते. या प्रक्रियेलाच वैदिक शाखा निर्मिती असे म्हणतात. सर्वात आधी पैल, मग इंद्रप्रमती व बाष्कल, सत्याश्रव, सत्यहित वगैरे २७ मुख्य प्रचारक (शाखा) निर्माण झाले व त्यांनी उत्तरेतील विविध भागांत धर्मांतराची मोहिम सुरु केली. दक्षीणेत जाणारा अगस्ती हा त्यांचा शेवटचा मुख्य प्रचारक. ऋग्वेदातील ऋचाकर्ता अगस्ती व हा अगस्ती एकच नव्हे हेही येथे लक्षात घ्यायला हवे. असे असले तरी अगस्तीवर तंत्रांचाही प्रभाव असावा असे दाक्षिणात्य परंपरेवरुन दिसते. तमिळ पुराकथांनी त्याला शिवाशी आणि श्रीविद्या तंत्रपरंपरेशी जोडले आहे.  

‘दाक्षिणात्यांनी वैदिक अगस्त्याचे हिंदुकरण कसे केले हे याचे एक वेगळेच उदाहरण आहे. असे असले तरी अगस्त्याने दक्षीणेत वैदिक धर्म व वर्णसंस्था पोहोचवण्यात यश मिळवले. दक्षीणेतील अगस्त्याचे आगमन हे इसपूच्या पहिल्या ते इसवी सनाच्या पहिल्या शतकाच्या दरम्यानचे आहे हे आपल्याला संगम साहित्यात तोवर कोठेही वैदिक तत्वही आढळत नसल्याने निश्चयाने म्हणता येते. 
वैदिक धर्म हिंसेने नव्हे तर काही घटकांतच अणि तोही प्रचार व धर्मांतराने पसरला. उपनयन विधी हा मुलचा धर्मांतराचा विधी होता असे स्पश्झ्ट आहे कारण हा विधी ऋग्वेदात कोठेही येत नाही. हा काळ सरासरी इसपू हजारच्या आसपासचा असावा असा अंदाज विद्वानांनी व्यक्त केला आहे. येथे हेही लक्षात घ्यायला हवे की कुरु-पांचालादि राज्यांमधे तेंव्हा महाभारतात येणा-या राजांचे दुरचे वंशज राज्य करीत होते. भारत कथा (म्हणजे युद्धादि प्रकरण) येथवर लोककाव्यांतच जीवंत होते. कुरु वंशाची वंशावळ धुसर झाल्याने फार पुढे वैदिकांनी महाभारताचे वैदिकीकरण करतांना अनेक वैदिक व्यक्तींची नांवे विस्मृत झालेल्या राजांच्या जागी टाकुन दिली त्यामुळे महाभारतात येणारी वंशावळ ही बरीच बनावट असल्याचेही आपल्याला दिसून येते. 

वैदिक धर्माचा प्राणगाभा म्हणजे यज्ञ होय. ब्राह्मण ग्रंथांनी आपल्या धर्माचे आकर्षण वाढवण्यासाठी यज्ञपद्धती अत्यंत काटेकोर व सामुहिक पद्धतीने चालणारी बनवली. यात काही यज्ञ तर बारा वर्षही चालत.  भारतातील भक्ती संकल्पनेशी परिचय झाल्याने मुर्तीपूजा जरी वैदिकांना त्याज्ज्य असली तरी त्यंनी अग्निचयन विधीच्या रुपाने अग्नीलाच काल्पनिक पुरुषरुपात पहायला व श्येन पक्ष्याच्या आकारात बनवायला सुरुवात केली. स्थानिकांच्या श्रद्धांचे असे वैदिकीकरण केल्याखेरीज धर्म प्रचार अशक्यच होता हे उघड आहे. तोवर विदेहापर्यंत पोहोचलेल्या वैदिक प्रचारकांना सामना करावा लागला तो प्रगल्भ व परिणत स्थितीत पोहोचलेल्या सांख्य विचारांचा. भारतीय सहिष्णुच असल्याने नव्या कल्पना न धिक्कारता त्यांच्याशी चर्चा करण्याचा, समजावून घेण्याचा प्रयत्न असे. विदेहात यज्ञ की ब्रह्म (वैदिक अर्थ मंत्र तर विश्वनिर्मितीचे गुढ तत्व हा औपनिषदिक अर्थ, यक्ष शब्दाचा पर्यायी शब्द.) या चर्चांतून अनेक उपनिषदे निर्माण झाली. ही वैदिकांनी नव्हे तर हिंदुंनी निर्माण केली. त्यात दोन तत्वांचा समेट करण्याचाही प्रयत्न दिसून येतो. वैदिकांनीही वेदमाहात्म्य सांगणारी उपनिषदे लिहिणे स्वाभाविक होते. आपल्याकडे ख्रिस्त्यांनी "ख्रिस्तपुराण" लिहिले तसेच हे होते. यात वैदिक धर्माचा विजय झाल्याचे दिसत नाही. उलट त्यांना अनेक अवैदिक तत्वधारांना स्विकारावे लागले. येथेच मुळचा वैदिक धर्म आणि नंतरचा वैदिक धर्म यात फरक पडायला सुरुवात झाली. 

मगध प्रांतात वैदिकांना दिर्घकाळ प्रवेश नव्हता हे आपण आधी पाहिलेलेच आहे. पण पुढे मात्र मगधातील प्रबळ राजांनी जरी वैदिकांना राजाश्रय दिला नसला तरी स्थानिक पुरोहित, धनाढ्य व्यक्ती व जमीनदारांत हा धर्म ब-यापैकी पसरल्याचे आपल्याला दिसते. सामुहिकपणे चालणारे व गुढतेचे वलय दिल्याने यज्ञ व वैदिकांची दैवी बनवली गेलेली वर्ण व्यवस्था याचा प्रभाव काही घटकांवर पडणे स्वाभाविक होते. राजा-रजवाड्यांनाही धर्म बदलला नसला तरी यज्ञही करवून घेण्यात व वैदिक पुरोहितांना दान-दक्षीणा देण्यात हात आखडता घेतला नाही. पण वैदिक देवतांची पुजाही स्विकारली नाही. भारतीय असुर राजांनी हिंदू देवी-देवतांचीच काय ती पूजा चालू ठेवली. पुजा व तंत्रेही व्यक्तीगत होती. सार्वजनिक मंदिरे बांधण्याची प्रथा आली नव्हती. घरातील देव्हारे एवढीच त्यांची पुजास्थळे होती. त्यामुळे हे यज्ञ एक प्रकारे आकर्षणाचा विषय बनल्यास नवल नाही. यज्ञांचे स्तोम मात्र फार वाढलेले दिसते. त्याचीच प्रतिक्रिया म्हणून जैन, बौद्ध व चार्वाक परंपरा वैदिक व्यवस्थेला ठामपणे विरोध करायला अवतरली. वैदिकांना विरोध मगधातुनच सुरु झाला कारण अन्यत्र या धर्माचे अस्तित्वच नव्हते. मागधी जनता प्रथमपासून धर्मांच्या बाबतीत सहिष्णू असल्याने या विरोधी परंपराही त्यांनी समजावून घेतल्या आणि वैदिक धर्माचा तेथुन जवळपास जो अस्त झाला तो पार शुंगांची अल्पकालीन का होईना सत्ता येईपर्यंत टिकून राहिला. नंतर काही प्रमानात काण्वांनी या धर्माला आश्रय दिला. दक्षीणेत सातवाहनांसाठी काही यज्ञ केले खरे पण सातवाहनांनी त्या धर्माला राजाश्रय दिला नाही. त्यांनी बौद्धांना जशी मदत केली तशीच वैदिकांनाही. त्यामुळे महाराष्ट्रातही वैदिक धर्माला हातपाय पसरायला बराच वेळ लागला. बलाढ्य गुप्तांनी चवथ्या शतकात मात्र संपुर्ण राजाश्रय दिल्याने या धर्माचा बोलबाला तर वाढलाच या धर्मात जाणा-या हिंदुंची संख्याही वाढली. 

 भारतातील वैदिक धर्मियांचा प्रवेश ते नंतर उत्तरेत झालेला विस्तार याचा हा थोडक्यात घेतलेला आढावा आहे. वैदिक येण्यापुर्वीच हिंदुंचे तत्वज्ञान व धर्म पुर्ण स्थिरस्थावर होते. रामायण-महाभारताच्या कथा वैदिक येथे प्रवेशण्यापुर्वीच घडून गेल्या होत्या. सांख्य-वैशेषिक तत्वज्ञान परिणत अवस्थेस पोहोचले होते. मुर्तीपुजा व तांत्रिक विधीविधान व साधनापद्धती सर्वत्र स्थिर होती. मगधात यक्षपुजकांची संस्कृती असल्याने जैन व बौद्ध धर्मातही ती अपरिहार्यपणे आली. वैदिकांनी मात्र यक्षपुजेचा, किंबहुना यक्षांचाच निषेध केला तो केवळ धार्मिक द्वेषातून हे उघड आहे.  अगदी पहिल्या शतकातील गाथा सप्तशती व अंगविज्जेवरुन शिव, उमा, कार्तिकेय, वासुदेव, संकर्षण या देवतांची तत्कालीन लोकप्रियता दिसून येते. कनिष्काच्या राबटक शिलालेखातही त्याने अफगाणी युद्धदेवता "नाना" मुळे आपल्याला साम्राज्य मिळाले आहे असे नमूद करत उमा, अहूर माझ्दा, माझ्ज्दुन, कुमार (कार्तिकेय), महासेन, विशाख आणि मिहिर यांचाही आदरपुर्वक उल्लेख केला आहे. १८ इसपुच्व्हे सहावे शतक ते इसवी सनाच्या जवळपास दुस-या शतकापर्यंत भारतभर जी नाणी मिळालेली आहेत त्यावर तांत्रिक प्रतीक चिन्हे, शिव, गणेश ाणि मैत्रेय बुद्धाच्या प्रतिमा आपल्याला दिसतात. एकही वैदिक देवता साधी उल्लेखलीही गेली नाही. अपवाद फक्त इसपू पहिल्या शतकातील नाणेघाट शिलालेख व अयोध्य येथील शुंगांचा शिलालेख आहे. नाणेघाट शिलालेखात सर्वात आधी पांचरात्र या तांत्रिक संप्रदायाच्या देवतांनाच प्रथम अभिवादन केलेले आहे. त्यामुळे सातवाहनांनी काही यज्ञ करवून घेतले (किंवा वैदिकांनी स्वत:हुन त्याच्यासाठी यज्ञ केले) असले तरी वासुदेव, संकर्षणास आणि कार्तिकेयास सर्वप्रथम अभिवादन केले असल्याने सातवाहनांनी वैदिक धर्म स्विकारलेला नव्हता हे स्वयंस्पष्ट आहे.

म्हणजेच आधी आश्रीत म्हणून आलेले वैदिक, शुद्रांच्या राज्यातच बरेचसे वेदसंकलन, लेखन करणारे वैदिक आणि म्हणूनच शुद्रांना ते वेगळे आहेत हे माहित असुनही त्यांना महत्वाचे स्थान देणारे वैदिक हा प्रवास होत असतांना भारतात सर्वत्र तंत्राधारित शैवप्रधान धर्माचे प्राबल्य होते. हे प्राबल्य आजेही टिकून राहिलेले आहे. फरक एवढाच पडलाय की वेद हेच हिंदु धर्माचे मुख्य स्रोत आहेत हे मानण्याचा चुकीचा प्रघात पडलेला आहे. वैदिक धर्म आणि हिंदू धर्म वेगळा असल्याचे भानही हरपले आहे. वैदिकांमुळेच नंतर हिंदूमध्ये कसे गैरसमज पसरत गेले हा आपल्या सांस्कृतीक इतिहासाचा काळाकुट्ट टप्पा आहे. वैदिक वर्चस्वातुन बाहेर पडायला हवे पण ते हा इतिहास समजून घेतल्याखेरीज शक्य नाही. वैदिक येथे आले ते जेते म्हणून नव्हे तर शरणार्थी म्हणून आणि धर्म पसरला तो धर्मप्रचार व धर्मांतराने हे वास्तव समजावून घ्यायला हवे.
-संजय सोनवणी

(Publishd in Prutha Dwali issue)

No comments:

Post a Comment

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...