Saturday, March 26, 2022
काश्मिरी तात्विक प्रज्ञेची ओळख!
Wednesday, March 23, 2022
इतिहासाचे तत्वज्ञान!
आम्ही जेंव्हा इतिहासाचा प्रवाह सैद्धांतिक चौकटीत अथवा आमच्या तर्कनिष्ठ चाकोरीत बसवू पाहतो तेंव्हा इतिहास आम्हाला हसू लागतो. आमचे इतिहासाचे सामान्यीकरण विनाशक ठरू लागते. इतिहास आमच्या नियमांनी कधीच चालत नाही.
“रान सोबती”
मी महारुद्र मंगनाळे यांचा मनस्वी चाहता आहे. आसुसून जीवन जगणारा, भावूक आणि तरीही तटस्थ अशा त्यांच्या रानमौजी असोशीने जगण्याचा मी नुसता चाहता नाही तर अशी विलक्षण व्यक्ती आपल्या काळात असू शकते यावरच विश्वास बसत नाही. मी त्यांना भेटलो आहे पण ती घटनाही स्वप्नवत वाटते. अत्यंत साधे भाबडे आणि संवेदनशिल मन असलेला हा निखळ माणूस फेसबुकवर कित्तेक वर्ष लिहितो आहे. फेसबुकवरील अजरामर साहित्य लिहिणारा हा यच्चयावत जगातील एकमेव माणूस असावा. आणि असे असूनही त्याचा बडेजाव नाही. किंबहुना ते स्वत:ला साहित्यिकच मानत नाहीत. आणि त्यांचे असे वाटणे स्वत:ला थोर समजणा-या साहित्यिकांच्या मुखात वाजवलेली सणसणीत चपराक आहे. हा साहित्य जगणारा साहित्यिक आहे. जीवनाचा हात धरून लिहिलेले साहित्यच अजरामर होत असते.
Tuesday, March 22, 2022
आम्हाला लेखकाचा शोध आहे!
आम्हाला लेखकाचा शोध आहे!
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा असा आग्रह एकीकडे धरला जातोय तर नोबेलच्या
दर्जाचे मराठी साहित्य का निर्माण होत नाही असे प्रश्न अनेक विद्वान विचारात
असल्याचे चित्र आपल्याला दिसते. मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळण्याचे निकष
वेगळे आहेत तर नोबेल पारितोषिक मिळण्याचे निकष वेगळे आहेत. इंग्रजी भाषेला आजही
अभिजात भाषेचा दर्जा नाही आणि तो मिळण्याची शक्यताही नाही तरीही त्याच भाषेत
आधुनिक जगातील श्रेष्ठ ज्ञान, विज्ञान आणि साहित्य का असावे हा प्रश्नही आम्हाला
पडत नसेल तर आम्ही कोठेतरी गंभीर चूक करत आहोत. आमच्या विचारांच्या दिशाच कुंठीत
झालेल्या असून अशा कुंठेतून नोबेलच्या दर्जाचे सोडा पण जागतिक स्तरावर कीर्ती
मिळेल असे साहित्य आमच्या भाषेतून कसे निर्माण होणार हा प्रश्न आम्हाला आधी पडायला
हवा.
खरे म्हणजे ज्याला अस्सल आणि या मातीचे म्हणता
येईल असे उच्च दर्जाचे मराठी साहित्य अजून यायचेच आहे. आजवरचे मराठी साहित्य
म्हणजे "जेमतेम साहित्य" आहे असे म्हणण्यास हरकत नसावी. साहित्य म्हणजे
समाजमनाचा,
त्याच्या वर्तमानाचा, भुतकालीन
सावटाचा आणि त्यातून निर्माण होणा-या भविष्यातील आशा-आकांक्षांचा आरसा असेल तर म्हणायचा
म्हणून अपवादात्मक भाग सोडला तर मराठीत सार्वकालिक व सर्वस्पर्शी म्हणता येईल असे
साहित्य नाही. समाजमन आहे त्यापेक्षा अधिक चांगले घडेल किंवा वर्तमानातील अंधारावर
मात करून प्रकाशाकडे समाजाला नेता येईल ही साहित्याची शक्ती असते असे म्हटले तर
असे साहित्य मराठीत नेमके कोणते हा प्रश्न उद्भवेल आणि हातात नकारात्मकताच येईल. असे
का घडले किंवा घडते आहे याचा शोध घेणे गरजेचे ठरते ते यामुळेच.
"मराठी
साहित्यिक हा जीवनाला भिडण्यात कमी पडतो, आपले अनुभवविश्व व विचारविश्व विस्तारण्यात
कमी पडतो हे मुख्य कारण तर आहेच. यामुळे तो जीवनातील अनेक साम्भावानांना वंचित
राहतो आणि ही वंचितता त्याच्या लेखनात सरळ सरळ प्रतिबिंबीत होते. लेखकाचे खुजेपण
त्यातून व्यक्त होते. कल्पनेची झेपही सीमित होत त्याचे अंगण विश्वव्यापी होण्याऐवजी
आसपासच मर्यादित होते. आणि असे असले तरी सामान्य बाबीही वैश्विक करता येण्याएवढी
प्रतिभाही त्याने कमावली नसल्याने मर्यादित अंगण हीच त्याच्या प्रतीभेचीही मर्यादा
ठरते. त्यामुळे आपले लेखक अनुभवांच्या स्वनिर्मित मर्यादांच्या चौकटीत अडकवून घेत, ना
स्वत:साठी ना वाचकांसाठी लिहित अशी गत करून घेत केवळ प्रसिद्धी आणि पारितोषिके ह्याच
त्याच्या साहित्यप्रेरणा बनवतो. प्रसिद्धी मिळवायचे तंत्र माहित असले तर कोणीही
प्रसिद्ध होऊ शकतो हे आपल्याला माहीतच आहे आणि राहिले पारितोषिकांचे...त्यासाठी हे
थोर थोर साहित्यिक काय काय गणिते जुळवत, वेळ वाया घालवत शेवटी ती पदरात पाडून
घेण्यात कशी यशस्वी होतात यातही काही गुपित राहिलेले नाही. आणि हेच लोक वर मराठी
साहित्य हे खपत नाही,
वाचले जात नाही अशा निरर्थक तक्रारी करत सुटतात
आणि आपलेच ‘साहित्यिक’ अपयश लपवतात.
समाज हा आपला चेहरा किंवा भविष्य ज्यात दिसेल,
हृद्य वाटेल असेच साहित्य वाचत असतो. ज्यात माणूसच नाही ते साहित्य माणसे कसे
वाचतील हा प्रश्न आपल्या साहित्यिकांना पडू नये हे मोठे आश्चर्य आहे. तकलादू-कचकड्याचे
जीवन जगणारी माणसे आणि तोकड्या कल्पनाशक्तीने सजलेले कथानक ज्यात असेल अशा
साहित्याच्या वाट्याला कोण कशाला जाईल?
खरे म्हणजे कोणाचेही आणि कोठल्याही प्रांतातील
माणसांचे जीवन हे लेखकाला आव्हानदायकच असते. मग ते मागील असो, वर्तमानातील असो
अथवा भविष्यातील असो. प्रत्येकाचे आयुष्य हा साहित्यिकांच्या दृष्टीने विराट
समाजपट असतो. साहित्यात कथाच असली पाहिजे असे नाही, पण असते ती कथाच. समाजमनाचे
विराट चित्रण ही कथा नाही असे कोण म्हणेल? खरे तर महाराष्ट्र हा प्राचीन काळापासून
ते आजतागायत विविधांगी धार्मिक, वैचारिक, सामाजीक
चळवळींनी गजबजलेला आहे. त्याचे प्रतिबिंब/विश्लेषन अथवा त्या त्या चळवळी व त्या
त्या काळचे सामाजिक मानसशास्त्र कोणत्याही मराठी कादंबरीत आले आहे असे ठामपणे
म्हणता येत नाही. जे चित्रण आहे ते वरकरणी व वाचकशरण असेच आहे. परंपरावाद्यांनी
पुराणकथांतील व इतिहासातील पात्रांचे पुनरुज्जीवनवादी भांडवल केले तर
विद्रोहवाद्यांनी त्या पात्रांचे निखळ द्वेषपूर्ण चित्रण केले. यात साहित्यनिष्ठा
होती असे म्हणता येत नाही. साहित्याचे राजकारण मात्र अनेक साहित्यिकांनी केले.
त्या त्या जातीय/धार्मिक अथवा वैचारिक गटाचे त्यांना समर्थनही मिळाले. पण त्यात
साहित्य होते काय या प्रश्नाचे उत्तर “नाही” असेच आहे. कारण या सा-यात जगला तो समाज
कोठे होता?
काही अभिनिवेशी पात्रे म्हणजे समाज होत नाही. समाज असा नसतो. आणि
समाजात न राहणारे लेखक आपल्या साहित्यात समाज कोठून आणणार? आणणार पण ती एखादी जात
किंवा धर्म! अशाने ज्याला आपण "निखळ साहित्य" म्हणू
ते कोठे राहते?
आणि यातून समाजजीवनाला सुदृढ विचारी बनवायची
परंपरा निर्माण होते काय?
किंवा गेला बाजार “आपण असे आहोत” याचे तरी खरे प्रत्ययकारी दर्शन
मिळते काय? याचे उत्तर आहे आम्ही साहित्यातून भरीव असे काहीही
देवू शकलो नाही. त्यामुळे अलीकडच्या सर्वच सामाजिक चळवळीही साहित्यबंधापासून
पुरत्या अलिप्त आहेत. त्यांना तत्वज्ञान देतील असे बळ साहित्यिकांत नाही. ते नाही
तर नाही,
त्यांचे यथास्थित चित्रणही साहित्यात होत नाही.
"जातीअंत”
हे आदर्श मानले तर खुद्द चळवळीच जातींत विखुरल्या आहेत. छोटे-मोठे नेते जातींतच
आपले अस्तित्व शोधत आहेत. पण किमान जातीचे वास्तव तरी शोधण्याची हिम्मत या
लोकांकडे आहे काय? तर तेहे नाही. आपल्या वैगुण्यांचे आणि वंचिततेचे खापर कोणा एका
बलिष्ठ वा वरिष्ठ गटावर फोडले कि हे कृतकृत्य होतात. आपापल्या गटाचे नायक बनतात
खरे पण सर्व समाज यांना कधीही “आपला लेखक” मानु शकत नाही. मग आपल्याच जातीच्या चौकटीत
साहित्यिक म्हनून मिरवण्यात जर साहित्यिक धन्यता मानत असतील व इतरांकडे उपहासाने
पाहत असतील तर साहित्य आणि साहित्यिकाला अर्थ काय राहिला?
"दलित"
हा शब्द व्यापक आहे. बाबासाहेबांच्या "Broken Man" सिद्धांताशी
जवळ जात दलित या संज्ञेत सर्व पुर्वास्पृष्य, आदिवासी, भटके-विमूक्त
व श्रमिक-मजूरही आहेत अशी ती संज्ञा आहे. परंतू ती बरोबर एकाच जातीच्या मर्यादेत
साहित्य व तत्वज्ञान म्हणूनही विसावली आहे. त्यामुळे दलित चळवळही भरकटली आहे.
नव्या काळाला सुसंगत असे तत्वज्ञान व तसे साहित्य निर्माण करण्यात घोर अपयश आले
आहे. खरे तर वैश्विक परिप्रेक्षात “दलितता” सर्वत्र पसरलेली आहे, रुजली आहे अथवा
रुजवण्याचा प्रयत्न होतो आहे. पण ही दलितता मराठी दलित साहित्याला स्पर्शुही शकली
नसेल तर हे अपयश कोणाचे आहे?
तसे पाहिले तर सध्या दिखावू चळवळ्यांपेक्षा
समाजाच्या मनातच जी सूप्त चळवळ सतत चालू असते ती कधी लिहिली जात नाही, रस्त्यावर
सहसा येत नाही,
पण तीच खरे बदल घडवते. ही चळवळ व्यक्तीगत स्तरावर
प्रत्येकाचे मन व्यापून असते. प्रश्न विचारात असते व उत्तरे शोधायचीही प्रयत्न करत
असते. आणि समस्त समाज हा बाह्य चळवळ्या प्रान्तीदूत म्हणवणा-यांवर अवलंबून नसते तर
ज्याची त्याची मानसिकता कशी घडली आहे त्यावर अवलंबून असते. समाज असाच घडत असतो. पण
या व्यक्तिगत मानसिकतेची स्पंदने टिपत त्याला तत्वाद्न्यानात्मक अधिष्ठान देणारे
साहित्य शोधूनही मिळत नाही. मराठी साहित्यात कथा परत्वे जे अर्धवट भावनिक
उद्रेकाने भरलेले वैचारिक तुकडे मिळतात ते कोणाचे समाधान करू शकतील?
खरे
तर गेली तीन दशके जागतिकीकरणामुळे नातेसंबंधांची फेरआखणी होत आहे. नवे ताणतणाव
निर्माण होत आहेत. जातीय विखार कमी होण्याऐवजी टोकाला जातच आहेत. निराधार व
वृद्धांसाठी आश्रम वाढत आहेत. पती-पत्नी, भाऊ-बहीण, पिता-माता-पूत्र
या नात्यांचे संदर्भ बदलत चालले आहेत. आर्थिक, सामाजिक
आणि राजकीय संदर्भही झपाट्याने बदलत गेले आहेत. तंत्रज्ञानाने माणूस व्यापलाय कि
माणसाने तंत्रज्ञान हा प्रश्न पडणे ही तर दूरची बाब झाली पण या वातावरणात आमची
मनोभूमिका बनवणारे तरी साहित्य आले काय याचे उत्तर “नाही” असेच आहे. त्यामुळे
जागतिकीकरण पेलण्याची हिम्मत आमच्यात आलेलीच नाही. त्यामुळे आजचा तरुण “विस्कळीत”
मनोवृत्तीचा झाला असेल तर याला जबाबदार कोण? विज्ञानयुगात येऊन तंत्रज्ञानाची फळे
चाखत सुखासीन जीवन जगत असताना अवैद्न्यानिक धर्मांध होण्याचा हव्यास याच पिढीला
नेमकं का आहे? याचे कारण आमचा लेखक
कोठेतरी हरवला आहे...किंवा तो कधी नव्हताच! आमची मदार शेवटी इंग्रजी साहित्यावरच
जाते जे येथल्या मातीला अनुकूल नाही पण जे येथे मिळतच नाही ते वाचक कोठून तरी
मिळवणारच की!
आम्हाला
आमच्या लेखकाचा शोध आहे.
-संजय
सोनवणी
Monday, March 21, 2022
"धर्म: क्षमा , सहनशीलता व सहिष्णुता"
"धर्म: क्षमा , सहनशीलता व सहिष्णुता" या परिसंवादात आज (२२ मार्च २०१६) मी मांडलेले मुद्दे-
१)
धर्म न समजणारेच धर्मांध होतात.
या धर्मांधांनी जगतल्या सर्व धर्मांचे मुलभूत सौंदर्य विकृत करुन टाकले आहे.
२)
सर्व धर्मातील धर्म समजलेल्या
विचारी लोकांनी एकत्र येवून या धर्मांधांविरुद्ध आघाडी उघडण्याची गरज आहे.
३)
समाजाची धारणा ज्या उदात्त
नीतिमुल्यांवर होते व जी काळानुसार बदलती असतात त्यालाच धर्म म्हणतात. कोणत्याही
धर्मात पंथ-उपपंथ निघतात म्हणजेच ती परिवर्तनशीलता असतेच. पण ती व्यापक व्हायला
हवी.
४)
जीवनातील अनिश्चितता, असुरक्षितता
यातुन माणसाला देवा धर्माचे गरज भासली. ही अनिश्चितता जोवर आम्हीच दूर करत नाही
तोवर तिची गरज तीव्रच राहणार. मनुष्यप्राणी व अन्य जीवसृष्टी असलेला हा आपला एकच
ग्रह. आम्हाला त्याचे मोल नसेल किंवा महावीर, बुद्ध प्रभू येशु, पैगंबरांची दया, करुणा, क्षमा
अद्यापही समजली नसेल तर त्या धर्माचे असणे म्हनावाने निरर्थक आहे. जीवनाची उदात्त
मुल्ये जपल्यखेरीज आम्ही कोणत्याही धर्माचे होऊ शकत नाही.
५)
वर्चस्वतावादासाठी धर्म हत्यार
म्हणून वापरला जातो. आज जे सरकार स्वत:ला धार्मिक समजते त्याएवढे अधर्मी सरकार
कोणतेही झाले नसेल. आमच्या राष्ट्रवादाचा पाया घटनात्मक आहे. कोणत्याही एका धर्माच्या
प्रभावाखालील राष्ट्रवाद आम्ही सर्वांनी नाकारला पाहिजे. धार्मिक राष्ट्रवाद
राष्ट्राला विनाशाकडे घेऊन जातो.
६) शोषित-वंचितांचे कल्याण हाच आमचा धर्म आहे.
तुकोबा म्हणाले तसे,
जे का रंजले गांजले...त्याशी म्हणे जो आपुले...या
स्नेहभावी करुणेतच धर्म आहे. येशुने वधस्तंभावर जातांनाही क्षमेचा आणि करुणेचा
आदर्श घालुन दिला. बुद्ध-महावीरांनीही हीच उदात्त मुल्ये उद्घोषित केली.
७) ज्ञानेश्वरांनी पसायदानात "दुरितांचे
तिमिर जाओ" अशी आर्त प्रार्थना केली. ‘आता विश्वात्मके देवे’ म्हणत आम्हाला
वैश्विक नागरिक बनत संपुर्ण मानवजात, धर्म
वेगळे असले तरी,
एकाच समान धाग्यात बांधली जावू शकते व ती मुल्ये
म्हणजे- क्षमा,
सहनशीलता व सहीष्णुता. ही मुल्ये सर्वच धर्मात
वेगवेगळ्या प्रकारांनी,
वेगवेगळ्या परिप्रेक्षात सांगितली आहेत. ती
समजावून घेत समान मानवी अनुबंध शोधत त्याला व्यापक केले पाहिजे.
Friday, March 18, 2022
उत्तरेकडील अतिदुर्गम मार्ग आणि मध्य आशिया!
काही अब्ज वर्षापूर्वी भारतीय प्रस्तर हा
पुरातन काळातील गोंडवना या महाकाय खंडाचा एक भाग होता. मुळ खंडापासून तुटून सावकाश
सरकत हा प्रस्तर साडेपाच कोटी वर्षांपूर्वी आस्ट्रेलियन प्रस्तराशी (प्लेट) जाऊन
टेकला आणि हिंद-आस्ट्रेलिया हा एक प्रस्तर बनला. यातील भारतीय प्रस्तर पुन्हा विलग
होऊन उत्तरेकडे सरकत गेला आणि सरासरी पाच कोटी वर्षांपूर्वी हा प्रस्तर युरेशियन
प्रस्तराला वर्षाला १५ सेंटीमीटर या गतीने धडकला. या धडकेमुळे समुद्रभाग उंच उचलला
जाऊन हिमालयाची निर्मिती झाली असे आजचे विज्ञान सांगते. भारतीय उपखंड आशियाशी
जोडला गेला खरा पण हिमालयामुळे भौगोलिक दृष्ट्या उर्वरीत आशियासाठी तो दुर्गमच
राहिला. पण ही दुर्गमता असली तरी साहसी मानवाने त्यातूनही मार्ग शोधलेच. त्यासाठी
मदतीला आले नद्यांचे प्रवाह आणि त्यामुळे बनलेल्या खिंडी.
पूर्वोत्तर भारतातील ब्रह्मपुत्रा असो,
उत्तरेतील नुब्रा, झांस्कर, श्योक, सिंधू असो कि पश्चिमोत्तर भागातील सिंधू नदीला
मिळणा-या पण अफगाणिस्तानातून वाहत येणा-या काबुल, खैबर, कुर्रम, टोची, बोलन, गुमलसारख्या
सिंधू नदीला जाऊन मिळणा-या नद्या असोत, त्यांनी तयार केलेल्या खिंडींतून भारतीय
द्वीपकल्पात उतरणे अवघड असले तरी अशक्य नव्हते. शिवाय महत्वाच्या वस्त्या व
राजधान्याही याच नद्यांच्या काठांवर वसलेल्या होत्या. भारताचा पश्चीमोतर भारताशी
संपर्क होऊ लागला तो प्रामुख्याने खैबर आणि बोलन खिंडीतून. शेतीच्या शोधानंतर इसपू
दहा हजार वर्षापूर्वीच या खिंडी अधिक वापरात यायला लागल्या. आपला पश्चिम आशियाशी
व्यापार स्थिर झाला तो याच मार्गांनी.
पण आपला हिमालयाच्या उत्तरेला
असलेल्या मध्य आशियाशी पहिला संपर्क कसा आणि कोणत्या खिंडीतून झाला हा प्रश्न येथे
महत्वाचा आहे. मुळात उत्तरेतील हिमालयीन पर्वतरांगा अत्यंत उंच आणि दुर्गम आहेत. शिवाय
तिबेटचे थंड आणि प्राणवायुच्या कमतरतेने दुर्गम असलेले पठारही तेथे आहे. अक्साई
चीनसारख्या प्रदेशात तर प्यायला पाणीही नाही कि प्राण्यांना गवतही नाही अशी विपरीत
स्थिती आहे. हिमालयापार पुन्हा किन-लुन पर्वतरांगा तर आहेतच पण तारीम नदीच्या खो-यातले जगातले सर्वात मोठे तक्लमाकनसारखे
तीन लाख वीस हजार चौरस किमी क्षेत्राचे अवाढव्य थंड वाळवंट आहे. प्राचीन काळी या
प्रदेशात मानवी वस्ती अत्यंत कमी व रानटी टोळ्यांनी व्यापलेली होती. आता हा प्रदेश
चीनच्या झुन्झुआंग-तिबेट स्वायत्त प्रांतात तसेच कझाकिस्तान,
किर्गीझस्थान,उझबेकस्थान या प्रांतांत/देशांत वाटला गेला आहे. आज येथील यारकंद, होतान,
अक्सू आणि केरीया नद्या वाहत्या असल्या तरी अनेक नद्या वाळवंटात कधीच अदृश्य
झाल्या आहेत. उर्वरीत तारीम नदीच्या खो-यात जलाशयांजवळ तेवढ्या वस्त्या होत्या.
प्राचीन व्यापारी मार्ग याच वस्त्यांवरून जात असल्याने खोतान, यारकंद, समरकंद,
काश्गर इत्यादी शहरे भरभराटीला आली. पण हिमालयाच्या शेकडो मैल पार असलेल्या भारतीय
उपखंडाची ओळख तरी त्या जमातींना होती काय हा प्रश्न आहे. पण त्याचे उत्तर आपल्याला
अलीकडेच मिळाले आहे.
मध्य आशिया आणि काश्मीर,
गीलगीट-बाल्टीस्तान तसेच लदाखशीही मध्य आशियाचे मानवी संपर्क प्रस्थापीत झाले होते व तेही अति-प्राचीन काळी याचा पुरावा
लडाखमध्ये झालेल्या उत्खननात आता मिळाला आहे. नुब्रा नदीच्या खो-यातील सासेर-ला
खिंडीजवळ इसपू ८५०० वर्षांपूर्वीचे स्थलांतरे करणा-या लोकांचे तात्पुरते वसतीस्थान
(थांबा) सापडले आहे. ही अत्युंच खिंड खारदुंग-ला आणि काराकोरम खिंडीच्या मध्ये आहे.
हे स्थान प्राचीन व्यापारी/प्रवासी मार्गावर वसलेले असल्याने प्राचीन काळापासूनच मानवी
वाहतूक याच मार्गाने होत असल्याचे सबळ संकेत मिळतात. म्हणजेच मार्ग कितीही दुर्गम
असला तरी काश्मीर-लदाखचा मध्य आशियाशी संपर्क होता. उदा. सासेर-ला खिंड ही जगातील
सर्वाधिक दुर्गम खिंड मानली जाते व ती समुद्रसपाटीपासून १७७५३ फुट उंच आहे.
सियाचीन हिमनदी या खिंडीपासून फक्त ३७ किमी दूर आहे यावरून या खिंडीच्या
दुर्गमतेची आणि तेथील बिकट अवस्थेची कल्पना करता येईल. हिमालयातून जाणारे असे
किमान सहा मार्ग आपल्याला आज माहित झालेले आहेत.
भारतीय लिखित साहित्यात नीलमत
पुराणामध्ये सांगितले आहे कि काश्मीर खो-यामध्ये प्राचीन काळी नाग लोक राहत होते.
तेथे हवामान अनुकूल झाले कि हिमालयापारच्या वाळवंटी भागातून ‘पिशाच्च’ म्हणून
ओळखली जाणारी जमात इकडे स्थलांतरे करत असे. हे लोक म्हणजे मध्य आशीयातील पामीरमधील
किरगीझ किंवा कझाक जमात असू शकेल अशी मते व्यक्त होतात. इकडे थंडी पडायला सुरुवात
झाली कि ते लोक परत जात. पुढे नाग आणि पिशाच्च या लोकांत अधिक निकटचा संपर्क आला
असेही नीलमतपुराण सांगते.
काश्मीरमधील बुर्झाहोम या साडेपाच
हजार वर्षांपूर्वीच्या पुरातत्वीय स्थळावर मध्य आशियातील बनावटीच्या अनेक वस्तू
मिळाल्या आहेत. हा सांस्कृतिक प्रभाव पडण्यामागे या दुर्गम भागातील मार्गांवरून
होणारी प्रवासी वाहतूक कारण ठरली असावी. लद्दाखमध्ये झालेल्या उत्खननांनीही या मताला
दुजोरा दिला आहे. नंतरचा राजकीय इतिहासही मध्य आशियाच्या इतिहासाशी समान धागे
ठेवतो. ऐतिहासिक पुराव्यांनुसार कुशाण (युएझी) जमात भारतावर आक्रमण करती झाली जी
मध्य आशीयातूनच आली होती. हे लोक जसे अफगानिस्तानातून खैबर खिंडीमार्गे भारतात आले
तसेच गिलगीट-बाल्टीस्तानमधून येणा-या पण तुलनेने अत्यंत दुर्गम मार्गांद्वारेही
आले.
पण त्याही खूप पूर्वी कुरु
(किरगीझ) जमात नुसती भारतात आली नाही तर येथे सत्ताही स्थापन करून बसली असे
आपल्याला दिसते. भारतीय साहित्यात, विशेषता: महाभारतात कुरु आणि उत्तर-कुरु हे नाव
सातत्याने येते. उत्तर-कुरु हे हिमालयाच्या पलीकडे आहे अशी माहिती शतपथ ब्राह्मण
ते महाभारतात जतन करून ठेवलेली आहे. रामायणातील उत्तर-कुरुची माहिती तेथे आजही
उपलब्ध असलेल्या साधनांवरून जुळते. ती कसे हे आपण पुढे पाहूच. पण हे कुरु म्हणजे
किरगीझ लोक असावेत असा अंदाज केला जातो हे मी येथे नोंदवून ठेवतो. भारतात परके लोक
केवळ खैबर खिंडीतूनच आले नाहीत तर हिमालयीन खिंडीच्या मार्गानेही आले होते हे
लक्षात घेणे येथे महत्वाचे आहे.
पुढे काश्मीर आणि खोतान यांचे
इसपूच्या पहिल्या शतकात बराच काळ संयुक्त राज्य होते अशीही माहिती आपल्याला मिळते.
हे राज्य-संस्थापक उघूर (तुर्क) किंवा शक असू शकतील असाही अंदाज व्यक्त केला जातो.
पुढे चिन्यांनी खोतान तर कनिष्काने काश्मीर आपल्या साम्राज्याला जोडून घेतले व ही
संयुक्त सत्ता संपुष्टात आली. असे असले तरी मध्य आशियाशी भारताचे राजकीय संबंध
संपले तर नाहीतच पण सांस्कृतिक संबंधही उत्तरोत्तर वाढतच गेले. मध्य आशियातील
बौद्ध धर्माचा विस्तार हा उत्तरेकडील मार्गांनीच झाला. दुर्गम पर्वतराजीतून जाणारे
व्यापारी मार्ग व त्यासोबत होणारे राजकीय/धार्मिक व सांस्कृतिक दळणवळण त्याला
कारणीभूत ठरले.
मध्य आशियाशी आज आपला खुश्कीच्या
मार्गाने संपर्क राहिलेला नाही कारण तो भाग चीनने व्यापलेला अथवा बळकावलेला आहे.
तिबेटला जाणारा व्यापारी मार्गही आता बंद केला गेलेला आहे. असे असले तरी भारत आणि
मध्य आशियाचा व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध हा अत्यंत रोचक आणि हजारो वर्ष जुना आहे.
हे संबंध पुन्हा कसे जीवित करता येतील हा भारत सरकारसमोरील एक यक्षप्रश्न आहे!
-संजय सोनवणी
Friday, March 11, 2022
संजय क्षीरसागर कोण आहे?
संजय क्षीरसागर कोण आहे? तो एक वेडा मुलगा आहे. अशी वेडी मुले जगात असावीत या तत्वावर माझी पक्की श्रद्धा बसावी एवढा ठार वेडा मीही आहे. हा आताच्या महाराष्ट्राच्या काळाच्या चौकटीत न बसणारा इतिहासकार आहे. कारण त्याला मोडी येत नाही नि मोडी आल्याखेरीज इतिहासकार बनता येत नाही असा दिव्य श्रद्ध्येय विचार सध्या प्रचलित करणारे अनेक आहेत. आता हे सिद्धांत मांडणा-यांना पोर्तुगीझ येत नाही, फ्रेंच येत नाही नि सोळाव्या शतकातील इंग्रजीही समजत नाही. शिवाय त्यांन क्युनेफार्म, अरेबिक लिपी वाचता येत नाही आणि सेमेटिक भाषाही येत नाही हे अलाहिदा. पण ते इतिहासकार जर होऊ शकतात तर संजय क्षीरसागर का नाहीत? अर्थात ते झालेच असल्याने हा प्रश्न तसा निरर्थकच आहे.पण कोणाच्याही लायकीवर अलायक प्रश्न निर्माण करणे हेच ज्यांना महत्वाचे वाटते त्यांच्याच लायकीवर तेवढाच अलायक प्रश्न मी केला आहे.
Friday, March 4, 2022
अफगाणिस्तान: व्यापारी मार्गांचे जंक्शन!
अफगाणिस्तान: व्यापारी मार्गांचे
जंक्शन!
भारतीय ऊपखंडाचा बाह्य जगाशी ज्या व्यापारी
मार्गांनी संपर्क येत होता त्या प्रदेशांतील एकूण परिस्थिती पहावी लागते. आपला
पश्चीमोत्तर भारताचा शेजारी म्हणजे अफगाणिस्तान. मोहंमदशहा अब्दालीने १७४७ मध्ये हा विस्तृत
प्रदेश एकाच राजकीय सत्तेच्या अधीन आणून त्याचे स्थापना केली. तत्पूर्वी हा देश
इतिहासकाळापासून बल्ख, अरिया,
अराकोशिया इत्यादी प्रांतांत वाटला गेला होता आणि इराणी, पर्शियन शक, हूण आणि मंगोलांच्या अधीन राहिला. अफगाणिस्तान प्रागैतिहासिक काळापासून संस्कृती संगमांची भूमी राहिली आहे
हे सिद्ध झाले जेंव्हा ऑक्सस नदीच्या खो-यात १९७० नंतर उत्खनने सुरु झाली.
ऑक्सस नदीच्या खो-यात प्रथम सापडल्याने या संस्कृतीला ऑक्सस संस्कृती असे नाव दिले
गेले असले तरी पुढे तिची व्याप्ती प्रचंड असल्याचे लक्षात आले तेंव्हा त्या
संस्कृतीचे नव्याने Bactria-Margiana Archaeological
Complex असे केले गेले. सनपूर्व २२५० ते सनपूर्व १२०० हा या संस्कृतीचा काळ मानला जातो. ही
संस्कृती उदयाला आली कारण याच काळात या संस्कृतीचे सांस्कृतिक व व्यापारी संबंध
सिंधू संस्कृती, मध्य
आशिया ते पश्चिम आशीयाशीही स्थापीत झाल्याचे आढळून आले. किंबहुना सिंधू संस्कृतीच्या लोकांना पूर्व आणि पश्चिम आशिया ते सुदूर
इजिप्तपर्यंत व्यापार नियंत्रित करण्यासाठी या वसाहतीन्चा खूप उपयोग झाला.
इजिप्तच्या फराओन्च्या दफनात सिंधू संस्कृतीतील नील-मण्यांचे व चीनच्या रेशिम
वस्त्राचे पुरावे मिळालेले आहेत. इराण व मध्य आशियातून या भागात प्रक्रिया केलेले
तांबे आयात केले जाई. हे स्थान मध्य आशियातून, दक्षिण
आशियातून आणि पश्चिम तसेच उत्तर आशियातून येणा-या व्यापारी मार्गांचे हे मिलनस्थळ
बनल्याने शक्य झाले. त्यामुळे व्यापार व संस्कृतीचा उत्कर्ष झाला.
या संस्कृतीचे लोक सिंधू संस्कृतीप्रमाणेच तटबंद्या असलेल्या
शहरांत राहत. आताच्या ताजिकीस्तान, तुर्कस्थानपर्यंत या संस्कृतीचा फैलाव होता. या
प्रदेशात दोनचाकी बैलगाड्यांचा प्रवेश इसपू ३००० मध्ये सिंधू संस्कृतीच्या
व्यापा-यांमुळेच झाला असावा असा तर्क करता येतो कारण सिंधू संस्कृतीतील बैलगाडीचा
सगळ्यात जुना पुरावा इसपू ३२०० मधील आहे. तांत्रिक प्रसार व्हायलाही व्यापारी
संपर्क कारण झाला.
विविध संस्कृतीशी संपर्क येत असल्याने येथे सापडलेल्या कलात्मक
वस्तूंवरून या संस्कृतीचे लोक कलासक्त तर होतेच पण धातूकाम आणि वास्तुरचना
शास्त्रातही त्यांनी चांगली प्रगती साधल्याचे आढळून येते. प्रतिकूल हवामानातील
असूनही या संस्कृतीची तुलना ताम्रयुगीन जागतिक नागरी संस्कृतींशी केली जाते.
दक्षिण अफगाणिस्तानमध्येही शहर-इ- सोख्ता येथे १५० एकरमध्ये
पसरलेली एवढीच प्राचीन वसाहतही मिळाली. हिंदूकुश पर्वतरांगेतील खडतर व्यापारी
मार्गांनी हे दोन्ही प्रदेश जोडले गेले होते. इसपु २२०० पासून शहर-इ-सोख्ता व
मुन्दिगाक ही शहरे –हास
पावू लागली. याच काळात सिंधू तसेच इतर अन्य जागतिक संस्कृतींना पर्यावरण बदलाचे जसे फटके बसले व व्यापार थांबला तसेच येथेही बसल्यामुळे
नागरी संस्कृती लयाला गेली असावी असे अनुमान आहे. बदलत्या हवामानाचा फटका तत्कालीन
जागतिक संस्कृतींना कसा बसला याचा हा पुरावा आहे.
पण तत्पूर्वी व्यापारामुळे शहरांची भरभराट हो राहिली. शहर-इ-सोख्ता
(जळालेले शहर) तर जगातील प्राचीन काळातील महानगरांप्रमानेच आकाराने मोठे आहे.
येथील दफनभूमीत जवळपास चाळीस हजार दफने आढळून आलेली आहेत. हे शहर पुरातत्वीय
पुराव्यांनुसार अज्ञात कारणांनी तीन वेळा जाळले गेले. या नगरावर व्यापारी
समृद्धीमुळे आक्रमकांच्या धाडी पडत गेल्या आणि हे शहर अनेकदा भस्मसात झाले याचा
अंदाज आपण बांधू शकतो.
पण एकोणीसाव्या शतकात बळावलेला आर्य आक्रमण/स्थलांतर सिद्धांताने
संपूर्ण युरेशियात एक सांस्कृतिक उलथापालथ घडवून आणली. भारत, अफगाणिस्तान, इराणच्या इतिहासाची मांडणी हा सिद्धांत केंद्रस्थानी धरून केली जाऊ
लागल्याने या विशाल प्रदेशाला संस्कृती देणारे तेथिल मुळचे लोक नव्हे तर इसपू २०००
च्या आसपास पोंटीयाक स्टेपेमधून स्थलांतरीत झालेले आर्य होत व त्यांनीच
वेद-अवेस्ता या साहित्याची निर्मिती केली असे हा सिद्धांत सांगू लागला. हे येथेच
थांबले नाही तर याच लोकांनी भारत ते युरोपपर्यंत विस्थापित होत आपली भाषाही पसरवली
असेही हा सिद्धांत प्रतिपादित करू लागला. पण हे सर्वस्वी चूक आहे. भाषांचे संक्रमण
हे शेकडो वर्ष व्यापारी साहचर्याने झाले. या सोबतच मिथककथा, तांत्रिक
बाबी, वस्तू, खनिजे, व वैशिष्ट्यपूर्ण प्राणी हे आशियाभर पसरले असे मानण्यास वाव आहे. याचा
अर्थ स्थलांतरे झालीच नाहीत असाही नाही. पण मुळचे लोक संख्येने प्रबळच राहिले.
ऋग्वेदातील पख्त, भलानस, तुर्वसा,
पर्शू या जमाती त्याचा पुरावा आहेत. आर्यांच्या वास्तव्यामुळे
ऐर्यान (इराण) हे देशनाम तर परशु लोकांमुळे पर्शिया हेही देश/साम्राज्यनाम
पडल्याचे आपल्याला दिसून येते. हेच लोक काही मंगोल-किरगीझ-शक-हुणादी टोळ्यांचा
अपवाद वगळता कोठून बाहेरून आलेले नसून वेद-अवेस्तापूर्व काळापासून तेथे वास्तव्यास
होते आणि नंतरही तेथेच राहिले पण धर्मप्रसारासाठी काही लोक बाहेर पडले असे मानने
भाग आहे.
अफगानिस्तानची ऐतिहासिक माहिती मिळायला सुरुवात होते ती अकेमेनिड
साम्राज्याच्या काळापासून, म्हणजे
इसपू ५५० पासून. प्राचीन इराणमधील हे पहिले ऐतिहासिक साम्राज्य मानले जाते. सायरस
द ग्रेट या साम्राज्याचा संस्थापक होय. या साम्राज्याचा विस्तार अफाट होता. या
साम्राज्याची व्याप्ती अफगानिस्तानाच्या कंदाहार प्रांतापासून ते इजिप्तपर्यंत
पसरली होती. त्याने या विस्तृत भागावर व्यापारावर नियंत्रण आणले. सायरसने जिंकलेल्या प्रांतांवर सुनियोजित शासन करण्यासाठी सत्रपी
(गव्हर्नर) नेमले. दारियस (पहिला) याने सर्वप्रथम बल्ख, अरिया,
अराकोशिया (आजच्या अफगाणिस्तानातील प्रांत) जिंकून आपल्या
साम्राज्याला जोडले आणि प्रत्येक प्रांतावर सत्रपाची नियुक्ती केली. बहुतेक सत्रप
राजघराण्याशी संबंधित असत. या काळात स्थिर राजसत्तेमुळे व्यापाराची वृद्धीही झाली.
पण हे साम्राज्य राजवंशातील सत्तासंघर्षाने दुबळे होत गेले आणि शेवटी इसपू ३३४
मध्ये अलेक्झांडर द ग्रेटने या साम्राज्याचा अस्त केला.
अलेक्झांडरचे अफगाणिस्तानात इसपू ३३० मध्ये आगमन झाले. दारियसच्या
बल्ख, अरिया,
अराकोशिया या आजच्या अफगाणिस्तानातील प्रांतांच्या सत्रपांच्या
नेतृत्वाखाली तेथील स्थानिक लढाऊ टोळ्यांनी दग्दभू धोरण वापरून त्याच्या सैन्याला
प्रचंड त्रस्त केले. त्याच्या सैन्यातही बंडाळीची समस्या उद्भवली. अलेक्झांडरच्या
हत्येचा प्रयत्नही येथेच झाला. स्थिती हाताबाहेर जायला येथेच सुरुवात झाली.
त्यामुळे अलेक्झांडर अफगाणिस्तानच्या बिकट प्रदेश आणि लढाऊ लोकांबाबत म्हनतो कि,
“ ...हा प्रदेश आत शिरायला सोपा पण त्यातून बाहेर पडणे अवघड...”
यानंतर येतो तो चंद्रगुप्त मौर्य. भारतातून जाणा-या मालावर कठोर कर
आकारात होते म्हणून ग्रीकांशी त्याचा पुन्हा संघर्ष झाला. यातूनच
सेल्युसीद-मौर्य युद्धाची सुरुवात झाली व मौर्य जिंकले. सेल्युकस निकेटर (पहिला)
हा सेल्युसीद साम्राज्याचा अधिपती होता. त्यावेळी झालेल्या तहात चंद्रगुप्ताने
सिंध प्रांत तर आपल्या हाती घेतलाच पण हिंदुकुश पर्वतासहित दक्षिण अफगनिस्तानचा
मोठा प्रदेश मिळवला. पुढे सम्राट अशोकाने साम्राज्याचा
विस्तार करत उत्तर अफगानिस्तानावाराही वर्चस्व मिळवत बल्ख प्रांतही आपल्या
साम्राज्यात आणला. दक्षिण व उत्तर भागातील व्यापार यामुळे ताब्यात आला. या
विस्ताराचा हेतू व्यापार हा होता. धर्म, भाषा आणि कला त्या
निमित्ताने पसरल्या.
पुढे तक्षशिलेसारखे व्यापारी केंद्र कब्जात असावे यासाठी मेनांदर
(पहिला ) याने सिंध आपल्या राज्याला जोडला आणि तो प्रांत अफगाणीस्तानचा भाग बनला.
पुढेही अफगाणिस्तानातून जाणा-या व्यापारी मार्गांवर स्वामित्वासाठी सत्ता बदलत
राहिल्या. बल्ख हे व्यापारी रस्त्यांचे मिलनस्थळ युद्धांचे सर्वाधिक शिकार झाले.
अफगाणिस्तान हा दुर्गम व अविकसित प्रदेश जागतिक सत्तांसाठी एवढा महत्वाचा ठरला
कारण आशियाई मार्ग येथूनच जात! भारतीय उपखंडाशी व्यापारी संबंध ठेवण्यासाठी याच
मार्गे येणे अत्यावश्यक होते. त्यासाठी सत्ता आवश्यक होती आणि त्यासाठीच
अफगाणिस्तान हा प्रदीर्घ काळ युद्धांनी ग्रस्त राहिला.
-संजय सोनवणी
शेरशहा सुरी: एक कुशल प्रशासक
शेरशहा सुरीने हुमायूनचा पराभव केला आणि त्याला भारताबाहेर हाकलले. दिल्लीत आता कोणी शासक उरला नसल्याने शेरशहाने स्वत:ला दिल्लीचा सम्राट घोषि...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
मानवी इतिहासाचा एक महत्वाचा टप्पा होता व तो म्हणजे पाषाणयुग. पण मानवी संस्कृतीने "काष्ठयुगात" प्रवेशुन एक मोठीच झेप घेतली. हे ला...