Saturday, March 26, 2022

काश्मिरी तात्विक प्रज्ञेची ओळख!




भारतात शैव तंत्रमार्गाचे थोर तत्वज्ञ आणि स्तोत्रकारांचे मुकुटमणी व महान अद्वैती आदी शंकराचार्यांनंतर अवघ्या दोनेकशे वर्षांनी दहाव्या शतकात झालेले काश्मीरमधील अभिनवगुप्त हे शैव तत्वज्ञानाचे थोर अध्वर्यू तत्वचिंतक व चतुरस्त्र प्रतिभेचे धनी होत. काश्मिरी शैव तत्वज्ञानाला त्यांनी अतुलनीय उंची प्रदान केली. आदी शंकराचार्यांचे व्यक्तीगत जीवन जसे अनेक दंतकथा, आख्यायिका व चमत्कारांनी भरले आहे तसेच अभिनवगुप्तांचे जीवनचरित्रही त्यांच्या जीवनाबद्दल क्वचित आलेले त्रोटक उल्लेख व चमत्कृतीजन्य आख्यायिकांनी भरलेले आहे. त्यामुळे दोघांची ख-या अर्थाने ऐतिहासिक म्हणता येतील अशी चरित्रे उपलब्ध नाहीत. अभिनवगुप्तांचे नक्की जन्मवर्षही माहित नाही. किंबहुना प्राचीन काळच्या राजा-महाराजांबद्दल जेथे ही इतिहासाची उपेक्षा तेथे तत्वद्न्यांबद्दल काय स्थिती असणार? पण या त्रुटींवरही मात करत प्रशांत तळणीकर यांनी ज्या तटस्थ संशोधकीय पद्धतीने “आचार्य अभिनवगुप्त” हे अभिनवगुप्तांचे चरित्र साकार केले आहे ते निश्चितच प्रशंसेला पात्र आहे.
काश्मीर हे जवळपास बाराव्या शतकापर्यंत भारताचेच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडाचे एक ज्ञानकेंद्र होते. काश्मीरची शैव परंपरा ही बुर्झाहोम येथे सापडलेल्या अवशेषांनुसार पाच हजार वर्ष मागे जाते. आधी प्रतीकात्मक लिंगरुपात पुजल्या जाणा-या शिव-शक्तीभोवती जशी तांत्रिक कर्मकांडे रचली गेली तशाच तत्वज्ञानात्मक इमारतीही उभ्या केल्या जाऊ लागल्या. शिव-शक्ती स्वरूपातच द्वैत आणि अद्वैत हा तात्विक आविष्कार घडवण्यात आला. देशभरातही शैव व शाक्त तत्वज्ञानाचे व कर्मकांडांचे असंख्य तत्वधारा असलेले पंथ बनू लागले.
काश्मीरमधील क्रम, कौल, शिवसिद्धांत या परंपरांमध्ये वसुगुप्ताने आठव्या शतकात “त्रिक” परंपरेची भर घातली आणि तिच्यावर स्वयंप्रज्ञेने अभिनवगुप्तांनी कळस चढवला. या तत्वज्ञानानुसार सृष्टी ही तीन तत्वांनी बनलेली असून शिव हे तत्व सर्वव्यापी आणि अपरिवर्तनीय आहे. या तत्वज्ञानाचा विस्मयकारी विस्तार त्यांनी केला. त्यांची हीच एक कामगिरी नव्हे तर त्यांनी भरताच्या नाट्यशास्त्रावर बहुमोल आणि आजवरची एकमेव टीकाही लिहिली. एकूण ४४ ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. त्यात तंत्रालोक, ध्वन्यालोक लोचन, परमार्थसार यासारखे महत्वाचे ग्रंथ आहेत. शैव तत्वज्ञानाबरोबरच त्यांनी सौंदर्यशास्त्र, नाट्यशास्त्र, योगशास्त्र, समीक्षाशास्त्रांचेही सखोल अध्ययन करून त्यावरही चिंतनात्मक लेखन केले. ते विश्वकोशीय प्रज्ञेचे धनी होते हेच यावरून सिद्ध होते.
अभिनवगुप्ताचे पूर्वज अत्रिगुप्त यांना आठव्या शतकात सम्राट ललितादित्याने सन्मानपूर्वक कनौज येथून काश्मीरला नेले होते. त्याच घराण्यात अभिनवगुप्तांचा जन्म नरसिंहगुप्त आणि विमलकला या दांपत्याच्या उदरी सन ९४० ते ९५० च्या दरम्यान झाला.. बालपणीच अभिनवगुप्तांचे माता-पित्याचे छत्र हरपले. त्या काळात काश्मीरमध्ये राजकीय सुंदोपसुंदी सुरु होती. दिद्दाराणीचा नृशंस शासनकाळ याच शतकातला. कल्हणाच्या राजतरंगीणीत हा राजकीय दुर्दशेचा काळ चित्रित झाला आहे. कल्हण हा प्रामुख्याने राजकीय इतिहास लिहित असल्याने तो तत्कालीन महा-बुद्धिशाली अभिनवगुप्ताचा उल्लेख करत नाही. पण याच अस्थैर्याच्या काळात काश्मीरमध्ये सोमानंद, क्षेमेंद्र, उत्पलाचार्यांसारखे थोर विद्वान निर्माण झाले हाही एक चमत्कारच होय. अभिनवगुप्त हे दहाव्या शतकातील केवळ काश्मीरमधीलच नव्हे तर देशभरच्या शैव तत्वज्ञानाचा मुकुटमणी ठरले. त्यांचा प्रभाव अजूनही ओसरलेला नाही.
तरीही अभिनवगुप्ताच्या अतुलनीय कामगिरीचा इतिहासाच्या अंगाने सखोल शोध झाला नव्हता. “आचार्य अभिनवगुप्त” या चिनार प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या ग्रंथाच्या निमित्ताने त्यांच्या जीवनप्रवासावर साक्षेपी प्रकाश तर पडतोच पण त्यांचे तत्वज्ञान, चिंतन आणि त्यांचे गुरु तसेच शिष्यांचाही परामर्श घेतला जातो. त्यासाठी लेखकाने खुद्द अभिनवगुप्तांनी आपल्या ग्रंथसंपदेत जेही स्वत:बाबत त्रोटक का होईना उल्लेख केले आहेत आणि त्यांच्या शिष्यांनीही जेही लिहून ठेवले आहे त्याचा चिकित्सात्मक आधार घेतला आहे. श्रीराम पवार यांनी अत्यंत अभ्यासू आणि साक्षेपी प्रस्तावनाही लिहिली आहे. या ग्रंथातून काश्मिरी तात्विक प्रज्ञेचा वाचकांना परिचय होईल आणि ते काश्मीरच्या इतिहासाकडे आणि तत्वज्ञानाकडे वळतील अशी आशा आहे.
-संजय सोनवणी
आचार्य अभिनवगुप्त
लेखक- प्रशांत तळणीकर
चिनार पब्लिशर्स, सरहद, पुणे.
पृष्ठसंख्या- ११६
किंमत- रु. १५०/- मात्र.

(आज दै. सकाळ, सप्तरंग मध्ये प्रसिद्ध!)

No comments:

Post a Comment

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...