Friday, June 24, 2022
आपण त्यांचेही ऐकायला हवे!
व्यापारी थांबा शाहीदुल्लाची कहानी!
Thursday, June 23, 2022
आम्हाला इतिहास आहे?
खोटा गौरव निर्माण करणारा इतिहास लिहित बसण्यापेक्षा आहे तोच इतिहास नि:पक्षपणे लिहिला असता तर जास्त गौरवशाली गोष्टी सहज सापडल्या असत्या. सोमनाथाचा प्रथम जीर्णोद्धार करणारा व नंतर जैन झालेला कुमारपाल जसा सर्वांना माहित झाला असता तसा काश्मीरचा सम्राट ललितादित्यही. इतिहासातील अनेक व्यक्ती आजही प्रकाशात यायची वाट पाहत तिष्ठत राहिल्या नसत्या. सामाजिक इतिहासही शुद्ध स्वरूपात लिहिला गेला असता. अहिल्याबाई होळकर केवळ एका धार्मिक महिलेच्या रुपात पुढे केली गेली नसती. सातवाहन ते राष्ट्रकुट काळातही समाज वैदिक धर्मशास्त्रांनुसारच चालत होता अशी ते सामाजिक वास्तव नसतानाही बेताल संदर्भहीन विधाने केली गेली नसती. राजांसाठी भाटांनी लिहून ठेवलेली काव्ये आणि स्वत:चा गौरव करून घेणा-या प्रशस्तीन्ना इतिहासाचे महत्वाचे साधन मानले गेले नसते. केवळ संस्कृत साधनांनाच तेवढे महत्व देत प्राकृत-द्रविड साधनांना दुय्यम व दुर्लक्षनीय मानले नसते. जैन-आजीवक व बौद्धान्चाही वास्तव इतिहास कारण नसतांना वैदिक भ्रामक इतिहासाशी जोडला गेला नसता. भारतीय मानस आपल्याच गतकाळाबाबत गोंधळयुक्त आहे कारण जो पुनरुज्जीवनवादी इतिहास लिहिण्याचा अपार खटाटोप गेली दोनेकशे वर्ष सुरु आहे त्याचा हा परिपाक आहे. आता तर त्याने कळस गाठायचा चंग बांधलेला आहे. कारण या इतिहासाचा पायाच ऐतिहासिक आहे तेही तथ्य विकृत करत जाणे हा आहे.
Saturday, June 18, 2022
विद्रोहाची संकल्पना का फसली?
विद्रोहाची संकल्पना फसली कारण विद्रोह नेमका कोणाविरुद्ध, एखाद्या जातीविरुद्ध कि व्यवस्थेतील अन्याय्य विषमतामुलक तत्वज्ञानाविरुद्ध याचे भानच उरले नाही. जातींविरुद्धचा संघर्ष एका जातीविरुद्ध एकवटण्याचा द्वेषमुलक प्रयत्न सुरु झाला येथेच विद्रोहाच्या नाशाची बीजे होती. ब्राह्मण आणि हिंदू देवतांना शिव्या देणे म्हणजे पुरोगामीपणा अशी काहीतरी विचित्र पुरोगामीपणाची संकल्पना हिरीरीने स्वीकारली गेली. असे करत असतांना आपण आपल्याही जातीच्या बेड्या घट्ट करत चाललो आहोत याचेही भान राहिले नाही.
Friday, June 10, 2022
दौलत बेग ओल्डी हे नाव कसे पडले?
काराकोरम खिंडीच्या जरा आधीच लेह-यारकंद मार्गावरील हिवाळी आणि उन्हाळी व्यापारी मार्ग एकत्र येत. ही जागा खिंडीतून वर येणा-या अथवा खाली जाणा-या व्यापा-यांच्या थांब्याचे ठिकाण होते. त्याचे नाव दौलत बेग ओल्डी कसे पडले याचा इतिहास पाहणे रंजक ठरेल.
सुलतान सैद खान हा यारकंद-खोतान येथील सन
१५१४ ते १५३३ या काळात मोगल खानातीचा राजा होता तर दुघ्लक जमातीचा अमीर मिर्झा
मोहम्मद हैदर हा त्याचा मुख्य सेनानी होता मिर्झा भारतात मुघल राजवट आणणा-या
बाबरचा मामेभाऊ होता व तो इतिहासकार म्हणूनही प्रसिद्ध आहे. त्याने लिहून ठेवल्यानुसार
सुलतान सैद खानाचा काळ सुबत्ता आणि शांततेचा होता. सन १५३२मध्ये सुलतान सैद खानने
काश्मीर आणि तिबेटला लुटण्यासाठी एक मोहीम काढली. मिर्झा हैदरला सोबत घेऊन तो
ससैन्य निघाला. पण काराकोरम खिंड पार करताच तेथील उंचीमुळे विरळ असलेल्या
प्राणवायुमुळे व कडाक्याच्या थंडीमुळे तो श्वसनाच्या आजाराने त्रस्त झाला. बरे होण्यासाठी त्याला तेथेच काही काळ मुक्काम ठोकावा लागला. बारा
झाल्यावर तो पुढे निघाला आणि नुब्रा खोरे त्याने उध्वस्त केले. पुढे सुलतान
कारगीलवरून बाल्टीस्तानकडे जायला निघाला तर झोजीला खिंड जिंकून मिर्झा काश्मीरकडे
निघाला. बाल्टीस्थानमध्ये वेळीस इस्लामचाच प्रभाव होता. तेथील लोकांनी सुलतानाचे
स्वागत केले पण ते होते शिया पंथीय. सुलतान तर कडवा सुन्नी. त्यामुळे त्याने तेथील
जनतेवर अनन्वित अत्याचार केले. अनेकांना ठार मारले तर हजारो नागरीकांना गुलाम
केले.
दरम्यान मिर्झा हैदर द्रास जिंकून झोजीला
खिंड उतरून काश्मीरमध्ये प्रवेशला. तेथील राजाने त्याचे चांगले स्वागत केले.
तात्पुरते मांडलिकत्व मान्य करत राजाने सुलतान सैद खानाच्या नावाने नाणीही पाडली.
नंतर दोघे परत फिरले व लडाखमध्ये त्यांची भेट झाली. सुलतानाने मिर्झा हैदरला
तिबेटवर आक्रमण करण्याची सुचना दिली आणि तो यारकंदला परत जायला निघाला. परत जात
असता त्याला पुन्हा श्वसनाच्या आजाराने त्रस्त केले. काराकोरम खिंडीजवळच्या
मुक्कामाच्या ठिकाणी पोचल्यानंतर त्याचा तेथे मृत्यू झाला. त्याला तेथेच पुरण्यात
आले. ते स्थान म्हणजेच दौलत बेग ओल्डी. दौलत हा शब्द “दुघ्लक” या जमातनावाचा तर
ओल्डी हा ‘उल्डी’ या उघूर शब्दाचा अपभ्रंश असून मिर्झा हैदरनेच या ठिकाणाचे नाव
दुघ्लक बेग उल्डी असे केले होते. “जेथे श्रेष्ठ व धनाढ्य लोक मरतात अशी जागा”
असाही या शब्दाचा उघूर भाषेत अर्थ होतो. पुढे ते दौलत बेग ओल्डी असे कायम झाले.
सुलतान सैद खानाचा मृत्यू झाल्यावर यारकंद
मध्ये सत्तासंघर्ष उफाळून आला. अब्दुर रशीद खान हा सुलतान सैद खानाचा मुलगा
स्पर्धकांची हत्या करून नवा सुलतान बनला. त्याने मिर्झा हैदरला तिबेटहून परत यायचा
आदेश पाठवला. तिबेटमध्ये हैदरची सेना विशेष पराक्रम गाजवू शकली नाही. निरोप
आल्यावर तो परत फिरला खरे पण यारकंदला येईपर्यंत त्याच्याजवळ फक्त पंधरा-वीस सैनिक
उरले होते. या अपयशामुळे त्याला अज्ञातवासात जावे लागले. त्याला बदक्षण
(पूर्वोत्तर अफगाणिस्तान) येथील त्याच्या मामीने आश्रय दिला. येथे मात्र त्याला
मोगल साम्राज्याने सामील करून घेतले आणि त्याचे उन्नती झाली. सन १५४० मध्ये
बाबरपुत्र हुमायुनच्या आदेशाने त्याने पुन्हा काश्मीरवर स्वारी केली. तेथील
सत्तेचा पराजय करून त्याने नाजूकशाह याला सुलतानपदी आरूढ केले. पुढे हुमायूनने
काबुल जिंकल्यानंतर मिर्झा हैदरने नाजूकशाहला हटवले आणि मुघल सम्राटाच्या नावे
नाणी पाडायला सुरुवात केली. येथेच त्याने ‘तारीख-इ-रशिदी’ हा आठवणी व इतिहास
सांगणारा ग्रंथ लिहिला. पुढे काश्मिरी लोकांनी केलेल्या विद्रोहात झालेल्या
युद्धात त्याचा १५५० मध्ये मृत्यू झाला. त्याचे दफन श्रीनगर येथेच केले गेले.
भारतावर फक्त खैबर खिंडीतून आक्रमणे झाली असे
मानले जाते पण ते खरे नाही. हिमालयीन भागातून येणा-या दुष्कर मार्गांवरूनही
आक्रमणे झालेली आहेत. इतिहासात नोंदले गेलेले हे एक आक्रमण. हिमालयीन प्रदेशांतील
घडामोडी मुख्य भूमीवरच्या लोकांना अज्ञातच राहत असल्याने असंख्य आक्रमणे व स्वा-या
इतिहासाला अद्न्यातच आहेत असे म्हणावे लागते.
या स्थळावर अजून एक विलक्षण घटना नोंदली
गेलेली आहे. एकोणीसाव्या शतकात ब्रिटीश व्यापारी व हेर एन्ड्रू दाल्ग्लीश हा या
मार्गावरून व्यापार करत असे. त्याने दाद मोहम्मद या क्वेट्टा येथील पठाण
व्यापा-याला काही कर्ज दिलेले होते. पण दाद मोहम्मदचे दिवाळे निघाले. यारकंदहून
लेहला जात असतांना दाल्ग्लीश आणि मोहम्मदची दौलत बेग ओल्डी येथे भेट झाली. तेथे
दोघांत भांडण झाले आणि या भांडणाची परिणती दाल्ग्लीशच्या खुनात झाली. पुढे
ह्यमिल्टन बोवर या ब्रिटीश लष्करी अधिका-याने दाल्ग्लीशच्या खुन्याचा शोध घेत घेत
त्याला शेवटी समरकंद येथे अटक केली पण १८९० साली दादने कोठडीतच आत्महत्या
केली. दौलत बेग ओल्डी येथे या एन्ड्रू
दाल्ग्लीशची संगमरवरी स्मृतीशिला लावलेली आहे. असे कैक संघर्ष, खून, लुटपाट या
मार्गांनी पाहिले असतील.
येथून प्राचीन व्यापारी मार्ग जायचे एवढेच या
जागेचे महत्व नाही तर दौलत बेग ओल्डी ही भारताच्या दृष्टीने सामरिक दृष्ट्या
अत्यंत महत्वाची जागा आहे. येथून आता अक्साई चीन (पांढरे वाळवंट) हा चीनच्या
ताब्यात असलेला भाग अवघ्या नउ किलोमीटर अंतरावर आहे. हिवाळ्यात येथे तापमान उणे ५५
डिग्री इतके खाली जाते. बर्फाळ वादळे ही नित्याची बाब आहे. येथे ना कसले वन्य जीव
आहेत ना वनस्पती.
चीनने झिंझियांग-ल्हासा हा मार्ग अक्साई
चीनमधून बांधायला सुरुवात केल्याने भारत-चीन सीमावाद सुरु झाला. युद्धही झाले.
१९६० साली दौलत बेग ओल्डी येथे भारतीतीय सैन्याने चौकी बनवली. १९६२ साली याचे
लष्करी तळात रुपांतर करण्यात आले. या स्थानाचे चीनला शह देण्यातले महत्व ओळखून
भारत सरकारने या स्थानाचा लष्करी विकास सुरु केला. जगातील सर्वात अधिक उंचीवरची
धावपट्टीही येथे तेंव्हाच बनवली गेली. भुकंपामुळे
येथील धावपट्टी निरुपयोगी झाली होती पण ४३ वर्षांच्या अंतराळानंतर 2008 सालापासून
येथे पुन्हा विमाने उतरायला लागली.
लष्करी हालचालीसाठी जुनेच दुष्कर मार्ग
वापरावे लागत. यात जीवित’हानीचा धोका जसा असे तसाच तेथवर जाण्यातला विलंब आणि
सामुग्री नेण्यात अडथळेही येत. त्यामुळे २००१ साली भारत सरकारने लेह ते दौलत बेग
ओल्डी आधुनिक रस्त्याचे काम जुन्या हिवाळी मार्गावरून सुरु केले आणि ते २०१९ साली
पूर्ण झाले. तेरा ते सोळा हजार फुट उंचीवरून हा मार्ग जातो. पण या मार्गामुळे
लष्करी दळणवळण सुलभ झाले आहे.
मुळच्या व्यापारी मार्गावरील एक थांब्याचे
स्थान म्हणून या जागेचे महत्व मात्र संपले आहे. मध्य आशियातील बहुतेक भाग आता
चीनच्या ताब्यात गेल्याने १९२० नंतर या लेह-यारकंद मार्गावरील व्यापार पूर्ण
थांबला आहे. पण १९१३-१४ मध्ये या मार्गावरून गेलेला अन्वेक्षक फिलीप्पो फिलिपी म्हणतो
कि, “या मार्गावरील माल वाहतूक करणारे व्यापारी तांडे संख्येने फार मोठे आहेत.
प्रवासाला कठीण असलेल्या देस्पांग पठारावरून हे तांडे एकतीस मैलांचे (५० किमी) अंतर दुष्कर ह्वामानात व
बिकट भौगोलिक स्थितीतही एका दिवसात पार करतात हे फारच विशेष आहे.”
-संजय सोनवणी
जर पुरोगामित्व बदनाम केले जात असेल तर जबाबदार कोण?
पुरोगामी हा शब्द फुर्रोगामी असा वापरत त्या
शब्दाला जाणीवपूर्वक बदनाम केले जाते आहे. सेक्युलर हा शब्द फेक्युलर असा उच्चारून
सेक्युलरीझमला हेतुपुरस्सर बदनाम केले जाते आहे. एकंदरीत या प्रतिगामी झुंडी
आपल्या ट्रोलशक्तीच्या आधाराने पुरोगाम्यांना नामोहरम करायचा प्रयत्न करत आहेत असा
आरोप केला जातो. या संदर्भात अनेक वादळी चर्चाही केल्या जातात. या प्रतीगाम्यांना
प्रत्युत्तर देण्याच्या प्रयत्नात पुरोगामीही तेवढ्याच जोमाने प्रतिगामी गटांवर फॅसिस्ट अथवा
भक्त हा शिक्का मारत त्यांना बदनाम करत बसतात, एकुणातच पुरोगामीही झुंडी बनवत
पुरोगामित्वाचे मुख्य लक्षणच हरपून बसतांना दिसतात.
येथे मुद्दा हा आहे कि पुरोगामीपणा म्हणजे नेमके
काय? सेक्युलरिझम म्हणजे नेमके काय? या प्रश्नांची उत्तरे विचारायला गेले तर कथित
पुरोगामी आणि प्रतीगामीही उघडे पडतात कारण त्यांना या संज्ञाचा अर्थ नीटपणे माहित
असतोच असे नाही. पुरोगामी सर्व मानव समान आहेत, माणसात
परिवर्तन होत असते हे जाणून त्या मानवतावादी परिवर्तनासाठी प्रबोधनात्मक कार्य
लेखन, वक्तृत्व व आपल्या वर्तनातून करत असतात. पुरोगामीपणा
जीवनाची सारी अंगे स्पर्शतो. मग ती भौतिक असोत, ज्ञानात्मक
असोत वा निखळ वैचारिक असोत. जोही कोणी काल होता त्या स्थितीपेक्षा आज
वैचारिक/ज्ञानिक/आर्थिक उत्थान करीत उद्या याहीपेक्षा मोठा पल्ला गाठायचा प्रयत्न
करत असतो आणि अधिकाधिक मानवतावादी जो होत जातो त्याला पुरोगामी म्हणता येते. तो सार्वजनिक जीवनात कोणत्याही धर्माचे अवडंबर माजवत नसल्याने
वा कोणत्याही धर्मावर द्वेशापायी तुटून पडत नसल्याने तो इहवादी, म्हणजेच सेक्युलर
आहे असे मानले जाते.
पुरोगामी हा
परिवर्तनवादी असतो हे ओघानेच आले. स्वत:सोबतच समाज आणि एकुणातील शोषणकारी व्यवस्था यात बदल घडवण्याचा तो प्रयत्न
करीत असतो. सर्व समाजच एका व्यापक ध्येयाकडे वाटचाल करेल अशी आशा तो बाळगून असतो.
त्यात द्वेष, विखार यांचा लवलेशही नसतो. समाज पुरोगामी, परिवर्तनवादी बनावा असा प्रयत्न करणे हे सुदृढ
समाज निर्मितीसाठी आवश्यक आहे असे विवेकी लोक मानतात. याउलट अतिरेकी
राष्ट्रवादाची/धर्मवादाची निर्मिती करत लोकांना एकव्युहात आक्रमकपणे सामावून
घेण्याचा प्रयत्न करत, अर्थवाद, वंशवाद अथवा
धर्मवादाला आधारास घेत जी सामाजिक व राजकीय व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न
केला जातो त्याला फॅसिझम म्हणतात व या तत्वज्ञानाच्या एकनिष्ठ पाईकास फॅसिस्ट असे
म्हणतात. यात मानवी स्वातंत्र्य, मानवता, विचारांचा खुलेपणा याला स्थान नसते. फॅसिझम
कोणत्यातरी तत्वाला, धर्माला वा अर्थरचनासिद्धांताला टार्गेट
करत त्याला शत्रू घोषित करत असतो. आपली सारी व्युहरचना त्या वास्तविक अथवा
काल्पनिक शत्रुच्या नायनाटासाठी वापरत समाजात संघर्ष निर्माण करत वर्चस्वतावादाला
जिंकण्यासाठी मदत करत असतो.
प्रत्यक्षात
आजकाल पुरोगामीपणाची व्याख्या बव्हंशी प्रतीगामीपणात विरघळून गेली आहे असे
आपल्याला वास्तव जीवनात डोकावून पाहिले तरी सहज लक्षात येईल. यातून पुरोगामीपणा
राहिलाच कोठे हा प्रश्न निर्माण झाल्यास आश्चर्य नाही.
धर्मांध जसे नेहमीच टोळीवादाचा आश्रय घेतात तसेच
जर पुरोगामी म्हणवनारे गटही टोळीवादालाच शरण जात आपापल्या अवांच्छणीय अज्ञानातून
जन्मलेल्या स्वार्थांना साध्य करण्यासाठी झटत असतील तर त्याला पुरोगामी कसे म्हणता
येईल?
अशाने प्रतिगामित्व अथवा फॅसिझम
संपणार नाही तर तो दुप्पट गतीने वाढत सर्वांनाच आपल्या विळख्यात घेत सर्वनाश करेल
यात शंका बाळगण्याचे काही कारण नाही. झुंडशाही
ही पुरोगामीपनात/परिवर्तनतावादात बसत नाही याचे भान आपल्याला यायला हवे. प्रतिगामी
जे करतात तेच पुरोगामी करत असतील तर दोघेही प्रतिगामीच राहतील आणि परिवर्तनाची
शक्यताच संपुन जाईल हे आपल्याला समजायला हवे. “अमुक जातीचे/धर्माचे लोक कधीच बदलू
शकत नाही” हा विश्वास जेंव्हा सामाजिक चळवळीतील विचारवंत व्यक्त करतात तेंव्हा
त्यांचा परिवर्तनाच्या सिद्धांतावरच विश्वास नाही हे स्पष्ट होते. उजवे आणि डावे
यातील भेद येथेच गळून पडतो आणि सारे वेगळ्या प्रकारे फॅसिस्टच आहेत
असे म्हणावे लागते. कारण परिवर्तनवाद यात
कोठेच रहाणार नाही आणि सारेच एका अपरिवर्तनीय आणि म्हणूनच अनैसर्गिक विचारकोठडीत
बंदिस्त होऊन जातील.
माणुस हाच कोणत्याही सर्जनशील विचारकाचा
केंद्रबिंदु असतो. फॅसिस्ट लोकही माणसे असतात. कोणी फॅसिस्ट म्हणून जन्माला येत
नाही. मनुष्य प्रवाहपतित होत जेंव्हा एखाद्या विचारधारेचा टोकाचा समर्थक बनतो
तेंव्हा तो आपसूक फॅसिस्ट बनलेला असतो. पुरोगामी म्हणवनारेही याच व्याख्येत येतात.
मुळात विषय परिवर्तनाचा असतो. मनुष्य एखाद्या विचारधारेच्या टोकाशी जात असेल तर
त्याची मानसिकता समजावून घेण्याची जबाबदारी व त्याला बदलवण्यासाठी प्रयत्न
करण्याची जबाबदारी ख-या परिवर्तनवाद्यावर येते. कोणालाही
मानवतावादी,
स्वतन्त्रतावादी अर्थाने बदलवण्याचा प्रयत्न न
करता त्याला सरळ वाळीत टाकने, त्यांना काहितरी लेबल चिकटवून अस्पृश्य मानणे
किंवा जी व्यक्ती ज्या आता पटत नसलेल्या गोटातून वा विचारव्युहातून बाहेर पडू
इच्छिते तिला झुंडशाही वापरत पुन्हा मुळच्याच गोटात वा विचारव्युहात अमानवीपणे
ढकलणे आणि गोटबंदिस्त व विचारबंदिस्त होऊन विरोधकांनाही तसेच करायला भाग पाडणे हा
एकविसाव्या शतकातील गंभीर वैचारिक व नैतिक गुन्हा आहे हे आपण समजावून घ्यायला हवे.
परिवर्तनाची शक्यताच यामुळे मावळून जाते हे येथे लक्षात घेणे आवश्यक आहे.
आपलाच गोट वा विचारव्यूह सर्व प्रश्नांची उत्तरे
घेऊन उभा आहे हा गर्व बाळगत आज कथित प्रतीगामी आणि पुरोगामी एकाच स्तरावर आले आहेत
कि काय हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.
खरे तर सर्वच वैचारिक झुंडी एका परीने फॅसिस्टच
झालेल्या आहेत असे म्हनायला प्रत्यवाय नाही. विचारांचा कडवेपणा हे फॅसिस्ट
असल्याचे लक्षण असेल तर पुरोगामी म्हनवनारे लोकही फॅसिस्टच होत आहेत असे म्हणता
येईल.
याचे कारण म्हणजे आजकाल सर्व विचारधारा, डाव्या
असोत कि उजव्या, त्यांच्यात शेवटी फॅसिस्ट गट बनतांना दिसतात. सारे आपापल्या गटाचे
अलिखित संकेत पाळतात व ते म्हणजे गट-विचाराशी "गद्दारी" करायची नाही.
अशा गद्दारांना सामाजिक माध्यमांतुन "नारळ देणे" ही नित्याची बाब असते.
एवढेच नाही तर कोणत्या ना कोणत्या झुंडीत नुसता प्रवेश मिळवायचा नाहीय तर त्या
गटाचे वैचारिक (?)
नेतृत्वही करायचे या आकांक्षेने पछाडलेले अनेक तथाकथित
विचारवंतही जीवाचा आटापिटा करतांना दिसतात. हा आटापिटा अनेकदा कीव येण्याच्या
पातळीवर जातो. ते आपण आपापल्या गटाशी निष्ठावंत राहण्याचा वा आपण आहोत असे
दाखवण्याचा प्रयत्न करतातच पण सर्वांपेक्षा जास्त उग्र भाषा वापरली तरच आपले
नेतृत्व उंचावेल असा त्यांचा भ्रम असतो. कोणतीही झुंड शेवटी उग्र होत जात शेवटी फॅसिस्ट बनते
ती अशी. यात पुरोगामीपण आणि सेक्युलरिझम कोठे राहतो? आणि सारेच जर कोणत्या ना
कोणत्या प्रकारचे प्रतीगामीच होत गेले तर आपले सामाजिक भविष्य काय?
यामुळेच जर पुरोगामीपणा आजकाल बदनाम केला जात असेल तर पुरोगामी
म्हणवणा-या प्रत्येकाने आपले कोठे चुकते आहे याचे आधी आत्मपरीक्षण केले पाहिजे.
आपल्या विचारांना तपासून घेत नवी मांडणी केली पाहिजे. गतकाळातील महनीयांच्याच
विचारांना अर्धवट पद्धतीने अंधपणाने शिरोधार्य मानत विचारांत नवी कोणतीही मौलिक भर
न घालता भविष्याकडे पाहणे हेही प्रतीगामीपणाचेच लक्षण आहे हे आपल्याला समजावून
घ्यावे लागेल.
-संजय सोनवणी
Published in Navshakti
Saturday, June 4, 2022
Allah is giver- Saint Tukaram
Allah is giver
जनानखान्यांचे अद्भुत विश्व!
जनानखाना, ज्याला अंत:पूर, राणीवसा किंवा हरम असेही म्हटले जाते त्याबाबत समाजामध्ये अनेक समजुती प्रचलित आहेत. शत्रूच्या जिंकलेल्या स्त्रीय...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
मानवी इतिहासाचा एक महत्वाचा टप्पा होता व तो म्हणजे पाषाणयुग. पण मानवी संस्कृतीने "काष्ठयुगात" प्रवेशुन एक मोठीच झेप घेतली. हे ला...