Friday, October 28, 2022

संकटात सापडत चाललेला मासेमारी उद्योग!


 




 

देशातील पारंपारिक व्यवसायांना सक्षम बनवल्याखेरीज देशाची एकंदरीत अर्थव्यवस्था सबळ होऊ शकणार नाही हे एक सत्य आहे. मच्छीमारी व्यवसाय पुरातन आहे. त्याचे पुरावे सिंधू कालापासून उपलब्ध आहेत. मनुष्य शिकारी मानव जसा होता तसाच तो मच्छीमारी करुनही उपजीविका करायचा. आज या व्यवसायाचे महत्व तर अतोनात वाढलेले आहे. मोठमोठे भांडवलदार या उद्योगात उतरले असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विपुल प्रमाणात मासेमारी करत आहेत. इतकी कि अधून मधून माशांचा दुष्काळाच पडावा अशी स्थिती उद्भवते. पारंपारिक मच्छीमार मात्र या संकटाने ग्रासले गेलेले असून त्यांच्या समोर भविष्याचा गहन प्रश्न उभा राहू लागलेला आहे.

 

महाराष्ट्र शासनाने या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी अनेक समित्या नेमल्या. यांत्रिक मच्छीमारीमध्ये एक ते तीन किलोमीटर लांबीची जाळी वापरली जातात. ही जाळी मासे गोळा करताना लहान-मोठे आणि खाद्य-अखाद्य असला कसलाही भेदभाव करत नाहेत. त्यामुळे माशांचे पुनर्जनन होण्याचे प्रक्रिया मंदावते. या जाळीचे नेमके परिमाण काय असावे याबाबत शासनाने नियम तर आखून दिलेच पण खोल समुद्रात मासेमारी करन्यासाठी द्यायच्या परवान्यांमध्येही घट करण्याच्या शिफारशी केल्या. बेकायदेशीरपाने आपल्या हद्दीत येऊन मासेमारी करणा-या विदेशी जहाजांची संख्याही कमी नाही. त्यामुळे ही समस्या उग्र झालेली आहे.


बेसुमार मच्छीमारीमुळे व वातावरणातील बदलांमुळे मत्स्य-दु:ष्काळ अवतरला आहे असे तज्ञ म्हणत असतात. परंतू त्याहीपेक्षा मानवनिर्मित कारणे जी गेल्या शे-दिडशे वर्षांपासून क्रमश: गंभीर होत गेलीत तिकडे मात्र पुरते दुर्लक्ष झाले आहे. सर्वात महत्वाचे पहिले कारण म्हणजे खारफुटीची जंगले बेसुमार नष्ट केली गेलीत. मुंबई-ठाणे ते जवळपास सर्वच किनारपट्टीवरील ७०% जंगले आजतागायत नष्ट झाली आहेत. खाजणे-खाड्या ही अतिप्रदुषित गटारे बनली आहेत. खारफुटीच्या जंगलांतील जैववैविध्य तर नष्ट झालेच पण माशांची मुळात पैदास जेथे होते ती हीच स्थाने असल्याने एक प्रकारे मासळीची गर्भाशयेच नष्ट करत गेल्याने मत्स्य दु:ष्काळ पडणार नाही तर काय?

 


शहरांची झालेली बेसुमार वाढ ही आपत्ती बनली आहे. समुद्रात भराव घालून खाड्या-खाजणे पुरती बुजवली गेली आहेत. औद्योगिक वसाहती व निवासी इमारती तसेच झोपडपट्ट्यांमुळे खारफुटीची जंगले नष्ट केली गेली तसेच खाड्या बुजवल्याने मासळीची उत्पादक स्थानेच संपवली गेली आहेत. अजुनही जरी वनविभागाने खारफुटीच्या जंगलांना संरक्षण देण्यासाठी कायदे केले गेले असले तरी ते धाब्यावर बसवत खारफुटी नष्ट करण्याचे प्रयत्न आपल्या ७२० किलोमीटर समुद्रकिना-यावर मोठ्या जोशात चालू आहेत. यामुळे पर्यावरणाला जसा धोका बसला आहे तसाच मासळीच्या अनेक प्रजाती समूळ नष्टही झाल्या आहेत. या समुद्रकिना-यांवर सात जिल्ह्यांत ४५६ गावे केवळ मासेमारीवर अवलंबून असलेल्या कोळ्यांच्या वस्तीने भरलेली आहेत. आता पारंपारिक व्यवसायावर येत असलेली संकटे आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या अभावात नव्या पिढीतील अनेक यातून बाहेर पडत आहेत हे चित्रही निराशाजनक आहे.


कोकणच्या किनारपट्टीवर तसेच मुंबई-पनवेल-रायगड-ठाण्यात रसायनी उद्योगांची संख्या मोठी आहे. ती भविष्यात वाढतच जाणार आहे. या कारखान्यांतील सांडपाणी पुरेशी प्रक्रिया न करताच सरळ समुद्रात सोडुन दिले जाते. हीच बाब नागरी जलनि:सारणाचीही आहे. त्यामुळे समुद्र किनारेही प्रदुषित बनले आहेत. परंपरागत मच्छीमार कोळी शक्यतो किनारपट्टीवरच मासेमारी करत असतो. या प्रदुषनामुळे माशांवर संक्रांत कोसळली नाही तरच नवल. खरे तर प्रदुषन नियंत्रण बोर्डाला याबाबत कठोर कारयायांचे...प्रसंगी कारखाने बंद करण्याचे अधिकार असुनही भ्रष्टाचारामुळे त्यांची अंमलबजावणी होत नाही. प्रदुषित माण्यातील मासळी खाना-या नागरिकांच्याही आरोग्यावर ज्या दु:ष्परिणामांची संभावना आहे तीही चिंताजनक आहे. याबाबत मच्छीमारांनी अनेकदा आवाज उठवूनही विशेष फरक पडलेला नाही.

 


मच्छीमारी उद्योगात मोठे भांडवलदारही घुसले आहेत. खोल समुद्रात (७० फ्यदमपर्यंत) मासेमारी करणारे यांत्रिक ट्रालर्स ही एक मोठी समस्या बनली अहे. खरे तर यांत्रिक जाळी वापरतांना प्रत्येक समुद्र प्रभागात कोणत्या प्रकारची जाळी वापरावी यावर Maharashtra Fisheries Regulation Act (MHFRA) नुसार १९८१ पासुनच निर्बंध आहेत. अखाद्य वा बाल-मासळी जाळ्यात येवू नये यासाठी ही बंधने आहेत. परंतू या नियमांचे सर्रास उल्लंघन केले जाते. यातून एक सागरी जैवविश्वात असमतोल निर्माण होतो आहे. पारंपारिक मच्च्छीमार फारतर दोन ते दहा दिवसांची एक सफर करतो पण मोठे यांत्रिक ट्रालर्स समुद्रात बराच काळ मासेमारी करत राहतात. हे यांत्रिक ट्रालर्स पारंपारिक मच्च्छीमाराला घेता येणे अशक्यच आहे.


२००७ साली गोखले इंस्टिट्युटच्या श्री. दीपक शहा यांनी या प्रश्नांचा व्यापक अभ्यास करून एक अहवाल बनवला होता. त्यांच्या निरिक्षणानुसार महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत विदेशी नौका बेकायदेशीरपणे मासेमारी करत असतात. तसेच अन्य राज्यांतील नौकाही येथील समुद्रात घुसखोरी करत असतात. त्यांनी केलेल्या बेसुमार अनियंत्रित मासेमारीमुळे महाराष्ट्राच्या सागरी संपत्तीवर प्रचंड ताण आलेला आहे. याबाबत शहा यांनी सुचवले होते कि बाहेरच्या मासेमारी जहाज/ट्रालर्सच्या प्रवेशावर संपुर्ण बंदी घालण्यात यावी. तसेच खोल समुद्रातील मासेमारीसाठी परंपरागत मच्छीमारांना सक्षम करण्यात यावे. अर्थात याबाबत काहीही झालेले नाही हे सांगायला नकोच!

हजारो वर्षांपासून मच्छीमार कोळी समाज समुद्रावर उपजिविकेसाठी अवलंबून आहे. समुद्राच्या साधनसंपत्तीवर पहिला अधिकार नैसर्गिक न्यायाने या समाजाचा आहे. समुद्राला देव मानणारा, त्याचे हरसाल अतीव श्रद्धेने पुजा करणारा हा समाज आहे. सागरी मत्स्यसंपत्तीची त्यांनी प्रेमाने जपणुक केली. परंतू आता राक्षसी आकांक्षा असनारे, भविष्याचा कसलाही विचार नसणारे भांडवलदार या उद्योगात घुसले आहेत. खरे तर मच्छीमार सहकारी संस्था स्थापन करण्याचा परंपरागत अधिकार फक्त मच्छीमारांना आहे. पण कायद्यातील पळवाटा काढुन ज्यांचा तसा मच्छीमारीशी कसलाही संबंध नाही असेही सोसायट्या काढतात व जी अनुदाने मच्छीमारांसाठीच आहेत ती लुबाडतात. पारंपारिक मासेमारी करणा-यांनाच भांडवलदार बनवण्यासाठी सहाय्य केले असते तर कदाचित सागरी संपत्तीवर एवढे डाके पडले नसते. पर्यावरणाचे चक्र त्यांनी अधिक कुशलतेने जपले असते.


मुंबई-ठाणे ही पुरातन काळापासूनची कोळ्यांची वसतीस्थाने आहेत. एकामागून एक कोळीवाडे अस्तंगत होत चालले आहेत. अनेक मच्छीमार कोळी या व्यवसायातून विस्थापित होत चालले आहेत. शेतक-यांचे विस्थापन आणि कोळ्यांचे विस्थापन हे समान मुद्दे असले तरी शेतक-यांकडे पाहण्याचा शासनाचा व समाजाचाही जो उदार दृष्टीकोन आहे तो कोळ्यांबाबत मात्र आजीबात नाही. याचे कारण म्हणजे त्यांना प्रतिनिधित्वच नाही! या मत्स्य दुष्काळामुळे त्यांच्यावर जे आर्थिक गंडांतर कोसळले आहे त्याला सर्वस्वी  जबाबदार शासन आहे. याचे कारण म्हणजे शासकीय धोरणाचा अभाव.

खारफुटीची नष्ट होत आलेली जंगले पुन्हा जोपासावीत, वाढवावीत, नैसर्गिक चक्राला कसलीही बाधा पोहोचू नये कि ज्यायोगे सागरी संपत्ती नष्ट होणार नाही यासाठी काळजी घेता येणे शक्य आहे काय? तशी इच्छाशक्ती शासन दाखवू शकेल काय? या प्रश्नांचे उत्तरे नकारार्थी आहेत. सागरे संपत्तीवर होणारे अतिक्रमण पारंपारिक व्यवसाय करणा-या मच्छीमारांवर येणे मग स्वाभाविकच म्हणावे लागेल. नफेखोरीच्या हव्यासात भांडवलदर मात्र कायद्यांचे उल्लंघन करत समुद्रातील जीवनचक्र उध्वस्त करत चालले आहेत. अनेक मत्स्य प्रजाती नष्ट झाल्या आहेत किंवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. यातून निर्माण होणारे निसर्गाचे नुकसान भरून न निघणारे आहे. त्यात मत्स्य दु:ष्काळाचीही भयावहता वाढत जाणार आहे याचे भान शासनाला व सर्वच समाजाला यायला हवे.

 

 

-संजय सोनवणी

रेशीम मार्ग: रोगांच्या साथी आणि विज्ञानाचाही प्रसार



प्राचीन व्यापारी मार्गांनी दूरच्या संस्कृतींना नुसते जोडले नाही तर परस्परावलंबी बनवण्याताही मोठा हातभार लावला. एका ठिकाणच्या माहित नसलेल्या वस्तू, शोध, संकल्पना दुस-या ठिकाणी पसरू लागल्या. सांस्कृतिक व सामाजिक जीवनमान त्यामुळे प्रभावित होणे स्वाभाविक होते. ही नुसती व्यापार व त्यामुळे आर्थिक समृद्धीत होणारी भरभराट नव्हती तर प्रादेशिक जाणीवा अधिक व्यापक होण्यात हातभार लावणारी घटना होती. ज्ञान, विज्ञान, पुराकथा, नवे शोध यांचा प्रसार व्यापारी संपर्कामुळे सहज शक्य झाला. राजा-महाराजा अथवा धर्म-संस्थापकांनी संस्कृती पसरवण्यात जेवढा हातभार लावला नसेल तेवढा हातभार व्यापा-यांनी लावला असे म्हणावे लागते ते केवळ त्यामुळेच! आर्थिक प्रेरणा या नेहमीच जगण्याच्या अन्य प्रेरणांवर मात करत असतात आणि जगभर ते घडल्याने आजचे आधुनिक जग अस्तित्वात आले आहे.

व्यापारी मार्गांमुळे एरवी अपरिचित वृक्ष, फुलझाडे, खाद्य वनस्पती व पिकांचाही मोठ्या प्रमाणावर प्रसार होऊ लागला. उदाहणार्थ भाताची उत्पत्ती प्रथम दक्षिण भारतात होऊन, खाद्यान्न म्हणून वापरात येऊन ते पुढे उत्तर भारतमार्गे आधी पश्चिमेकडे इराण व पूर्वेकडे चीनमध्ये पसरले ते केवळ व्यापारी संपर्कामुळे. आज भात हे जगातील निम्म्यापेक्षा अधिक लोकांचे प्रमुख अन्न आहे. मुळचा अमेरिकेतील पेरू देशातील बटाटा भारतात आला तो पोर्तुगीज व्यापा-यांच्या माध्यमातून. अशी फार मोठी खाद्यान्नांचीही देवघेव झालेली आहे. रेशीम भारतातून चीनमध्ये गेले कि चीनमधून भारतात आले हा वाद असला तरी मुळात रेशमाने चीनला आर्थिक दृष्ट्या समृद्ध बनवण्यात मोठा वाटा उचलला. युरोप-इजिप्तपर्यंत रेशमी वस्त्रे वापरणे ही फ्याशन बनली. तसेच अलंकारांचेही झाले. वनस्पतीविस्तार  कधी जाणीवपूर्वक घडला तर कधी माल वाहतुकीसाठी जे पशु वापरले जात त्यांच्या माध्यामातुनही असे प्रसार घडले. सुदूर पश्चिम ते पूर्वेकडील चीनपर्यंतचे जग कवेत घेणा-या रेशीम मार्ग म्हणून ख्याती मिळवलेले सारेच व्यापारी मार्ग हे जगाची जीवनवाहिनी बनले.

 पण रेशीम मार्ग हे फक्त समृद्धीचे मार्ग नव्हते. या मार्गांवरून अवांछित किटाणू, सुक्ष्मजीवही प्रसार पावत राहिले. त्यातून अनेक पशु व मानवांना  होणारे आजारही पसरले.  हे आजार जेथे पसरले तेथे ते नवीनच असल्याने त्यावरचे उपायही लोकांना माहित नसत त्यामुळे मृत्यूदरातही वाढ होत असे. शेवटी औषधेही आयात करूनच अशा आजारांवर नियंत्रण आणायचे प्रयत्न होत. या सर्वात भयंकर होती ती आशियाभर पसरलेली प्लेगची साथ.  मानवी इतिहासात आजवर तीन मोठ्या प्लेगच्या साथी पसरल्याचे नोंद आहे. संपूर्ण युरेशियात सन १३४३ ते १३५१ या काळातील साथ एवढी महाभयंकर होती कि त्यात जवळपास दीड कोटी नागरिक मरण पावले. “काळा मृत्यू” या नावाने कुप्रसिद्ध ठरलेली ही साथ सर्वत्र पसरायला कारण झाले ते व्यापारी मार्ग व त्यावरूनच झालेला रोगवहन करणा-या उंदरांचा झालेला प्रसार.  

चवदाव्या शतकातील आजपेक्षा लोकसंख्या खूप कमी व विखुरलेली होती. लोक शक्यतो आरोग्यदायी जीवन जगात असत. स्थानिक साथी आटोक्यात ठेवण्याच्या उपचारपद्धती त्यांनी अनुभवातून विकसित केलेल्या होत्या. पण या प्लेगच्या अकस्मात व अपरिचित साथीने एवढ्या झपाट्याने फैलाव केला कि प्लेग म्हणजे मृत्यू हे समीकरण फिट झाले. या रोगाचे कारणच माहित नसल्याने उपचारांचा प्रश्नच उपस्थित होत नव्हता. जे थातूर-मातुर उपचार केले जात त्याचा उपयोगही होत नसे. ही साथ कधी एकदाची जाईल याची वाट पाहणे एवढेच सर्व युरोप व आशीया खंडात राहणा-या लोकांच्या हाती राहिले. पण या साथीने एक क्रांती केली व ती म्हणजे सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न सर्व सत्तांसाठी ऐरणीवर आला. तरीही साथी येतच राहिल्या. मग जहाजातून अथवा व्यापारी मार्गांवरून येणा-या परकी तांड्यांमधील लोकांना किमान ४० दिवस विलगीकरण सक्तीचे करण्यात आले. त्याशिवाय कोणालाही नगरात प्रवेश दिला जात नसे. या साथीने व्यापारावरही विपरीत परिणाम झाला. पण या मार्गांचा उपयोग वैद्यकीय शास्त्र सर्वत्र पसरन्यातही झाला. मध्य आशियातील बौद्ध मठांनी भारतीय वैद्यक शास्त्र मोठ्या जोमाने या काळात पसरवले. यामुळे प्लेगवर उपाय सापडले नसले तरी नव्या संशोधनाच्या दिशा ठरू लागल्या.

प्लेगच्या साथीनंतर व्यापारी मार्गांमुळे संपूर्ण युरेशियात पसरलेली दुसरी साथ म्हणजे देवीची साथ. देवीचा विषाणूजण्य रोग आधी कोठे जन्माला आला याचे निश्चित पुरावे उपलब्ध नसले तरी इसपूच्या तिस-या शतकात हा रोग अस्तित्वात होता याचे मात्र पुरावे मिळालेले आहेत. व्यापारामुळे या रोगाचा प्रसार व्हायला मोठा हातभार लागला. सहाव्या शतकानंतर जसा रेशीम मार्गांवर व्यापार वाढू लागला तसा हा रोग पसरण्याचे प्रमाण वाढले. आठव्या शतकापर्यंत हा रोग पार जपानमध्येही पसरला. सातव्या शतकापर्यंतच या रोगाला कोविडप्रमाणेच जागतिक साथीचे रूप लाभले. व्यापारी मार्गांनी असे काही रोग पसरवण्याचे दुष्परिणाम घडवले तसेच वैद्यकीय विज्ञान प्रगत करण्याचेही मार्ग उघडले. ही साथ ऐन भरात असताना आजच्या लशीची पूर्वज म्हणता येईल अशी प्राथमिक लस निघाली जिला “टिका” म्हणत.  ही लस भारतीयांनी विकसित केली व रेशीम मार्गावरून प्रवास करणा-या व्यापा-यानी ती जगभर नेली. मुस्लीम संशोधक व व्यापा-यांनीही अशाच पद्धतीच्या काही लसी शोधल्या पण त्या एवढ्या प्रभावी नव्हत्या. अठराव्या शतकात एडवर्ड जेन्नर यांनी पहिली शास्त्रशुद्ध लस बनवली त्याला अर्थात विज्ञानाचे ही परंपरा कारण ठरली. आज जगात देवीचा रुग्ण मिळणे दुरापास्त आहे.

व्यापारी मार्गांमुळे साथी पसरल्या तशी वैद्यकीय ज्ञानाची दालनेही उघडली. पारंपारिक वनौषधीचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्याची सुरुवात अरबांनी मध्ययुगातच सुरुवात केली. संपूर्ण युरेशियातून प्रादेशिक ज्ञान जमा करत प्रयोग करण्याचे श्रेय त्यांना जाते. किमयागार (पा-यापासून सोने बनवणे) नावाची एक अत्यंत शोधक पण लालची असणारी मानवी प्रजातीही त्या काळात फोफावत होती. बगदाद व कैरो अशा प्रयोगांचे केंद्रस्थान बनले. हे लोण रेशीममार्गानेच सर्वत्र पसरले. किमयागार प्रत्यक्ष सोने कधीही बनवू शकले नाहीत पण औषधी व रसायनशास्त्रातले अनेक शोध त्यातूनच लागत गेले. अरबांनी ग्रीको-रोमन ते चीनी व भारतीय वनस्पती विज्ञानाला एकत्र करत औषधी शास्त्रात प्रगती केली. वनस्पती व तीचे औषधी उपयोग यावरील संशोधन वाढले. विविध औषधी वनस्पतींचा रेशीम मार्गांवरून होणारा प्रसारही त्यामुळे वाढला. रेशीम मार्गावरील बुखारा, मर्व, गुंदीशापूर, गझनी यासारखी शहरे ज्ञानाची केंद्रे बनत गेली. तत्कालीन वैद्य राझी, बहु-शाखीय विद्वान इब्न बतुता, वनौषधीतद्न्य इब्न अल-बैतर यासारख्या विद्वानानी ग्रंथ लेखनही केले. राझीचे ”औषधांवरील ग्रंथ” (किताब अल-हावी) हा तर कोशात्मक आहे. चीनी औषधीज्ञानही याच काळात युरोपपर्यंत पसरले. भारतीय वैद्यक ज्ञानही या काळात परम्परावादीच राहिले असले तरी त्याचाही उपयोग झाला. रेशीम मार्गावरील सत्ताधारी विद्वानांचा आदर करीत. त्यासाठी अशा विद्वानांना आर्थिक सहाय्यही देत. यामुळे वनस्पतीमधील औषधे घटक अलग करत त्यांना मानावे आरोग्यासाठी वापरण्याची एक रीत प्रस्थापित व्हायला मदत झाली. सर्वच विद्वानांनी आजची मानवी संस्कृती घडवन्याला व प्रगल्भ करण्याला मोठा हातभार लावला. आजचे औषधी विज्ञान हे या आशिया-युरोपभरच्या शास्त्रज्ञानी अविरत केलेल्या ज्ञानकेंद्री प्रयत्नांच्या पायावर उभे आहे. आजचे रसायन शास्त्र हे किमयागारांनी केलेल्या अगणित प्रयोगांचे व निष्कर्षांचे आधार घेताच विकसित झालेले आहे. व्यापारी मार्ग आपत्तीचे कारण जसे बनले तसेच ज्ञान-विज्ञानाच्या प्रगतीचेही ते असे.

 

-संजय सोनवणी

Saturday, October 22, 2022

ज्ञानवादी समाजाच्या दिशेने आपण जाणार?


 


आजचे जग संगणकाचे आहे. मानवी बुद्धीशी स्पर्धा करणारे आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान मानवी विश्व कवेत घेत मानवालाच बेरोजगार करत चालले आहे. मनुष्याचा मेंदू व संगणक यांच्यात संकर करून अतिबुद्धिमान मानव निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. त्याही पुढचे भविष्य हे सुक्ष्मयामिकी संगणकांचे असणार आहे. संशोधन वेगाने त्या दिशेने पुढे चालले आहे. त्यावेळेस जगाचा चेहरा किती झपाट्याने बदलेल याचा अंदाजही आपण बांधू शकत नाही. एकंदरीत आधुनिक तंत्रज्ञान आपले पारंपारिक जग बदलवत आहे आणि तो वेग कोणालाही भोवळ वाटेल असा आहे. मानवी बुद्धीमत्ता परिसीमा गाठण्याच्या अनिवार बेतात आहे. कदाचित ती आज अज्ञात असलेलीही क्षितिजे शोधून त्याही दिशेने वाटचाल करेल ही संभाव्य शक्यता आहेच. माणसाला हे सतत धावण्याचे वेड निसर्गानेच बहाल केलेले आहे आणि त्याबद्दल त्याचे कौतुक वाटणे स्वाभाविक आहे.

एकीकडे मानवी बुद्धीमत्तेचा नित्यनवा आविष्कार होत असताना, जगणे अधिक सोपे करण्याचा प्रयत्न होत असताना दुसरीकडे मानवी जगाच्या सामुहिक बुद्धिमत्तेत –हास होत चालले असल्याचेही विदारक दर्शन घडते आहे. ज्ञान आणि माहितीच्या वारेमाप संसाधनांची आणि माहिती-विश्लेषणाची कृत्रिम हत्यारे हातात असतानाही जागतिक मानवी समुदायाचे सामुहिक शहाणपण मात्र -हास पावत असल्याची चिंता व्यक्त होते आहे. तसे चित्रही दिसते आहे. माहितीच्या वर्षावात आणि संपर्क-साधनांच्या विस्फोटाच्या काळात माणूस मात्र एकाकी होत चालला आहे. असंख्य मानसिक विकारांच्या समस्यांनी युवा पिढी ग्रासलेली दिसू लागली आहे. मनुष्य व्यक्तीकेंद्री असावा कि समाज केंद्री या प्रश्नाच्या आज चर्चाही होत नाहीत कारण व्यक्तीस्वातंत्र्याच्या अतिरेकी कल्पना आणि मनुष्य सामाजिक व्हावा यासाठी परंपरेने आखून दिलेल्या संस्कारात्मक चौकटी आज निरुपयोगी ठरत असल्याने समाजच गोंधळला असल्याचे विदारक चित्र दिसू लागले आहे. आधुनिकतेच्या जगात राहत असताना जुनाट कालबाह्य झालेले सांस्कृतिक ओझे वाहत त्यानुसार राजकीय व सामाजिक भूमिका घेत आभासी जगातून त्याचा प्रचार-प्रसार करणारे आज कमी नाहीत. नव्याचा वापर करून जुनाटपंथाकडे जायचा हा अट्टाहास आज जगभरच्या प्रगत राष्ट्रांतही दिसून येतो. भारत त्याला अपवाद नाही. आज जगभर उजव्या विचारसरनीचा उद्रेक होण्यामागे आधुनिक तंत्रज्ञानावर स्वार झालेले हेच युवक आहेत. तंत्रज्ञान विकसित झाले म्हणजे सामाजिक बुद्धीचा आणि शहाणपणाचा स्तर उंचावतोच असे नाही हे आपल्या सहज लक्षात येईल. भावना एवढ्या नाजूक होत आहेत कि आशावादात थोडे जरी अडसर आले तरी त्याचे परिणती आपण फसवलो गेलो आहोत या भावनेतून संताप आणि द्वेषात होते. संयम, तर्क आणि विवेकबुद्धीला दिला गेलेला हा घटस्फोटच आहे. यातून व्यक्तीच्या कौटुंबिक जीवनापासून दुष्परिणाम दिसू लागतात. खरे तर “कुटुंब” हा शब्दच येत्या काही काळात नामशेष होण्याची शक्यता दिसते आहे.

कुटुंबव्यवस्था काही कायम टिकावी म्हणून जन्माला आलेली नाही. एक व्यवस्था जावून दुसरी व्यवस्था येणे स्वाभाविक आहे. पण हा बदल होत असताना बदलात सामील झालेले घटक किती जाणतेपणे हा बदल स्वीकारतात आणि किती परिस्थितीशरण पद्धतीने स्वीकारतात हे पाहणेही महत्वाचे आहे. सोयीस्कर प्रेम-सहानुभूती, सोयीस्कर व्यक्तीद्वेष, एखाद्या समाजाचा द्वेष, लिंगभावातील अचानक होत असणारे तीव्र संघर्षमय बदल, अशा अनेक परस्परविरोधी संघर्षांतून आजचा समाज घडतो आहे. आणि त्याला कोणताही वर्ग अपवाद आहे असे म्हणता येणार नाही.

याचा अर्थ समाज प्रगल्भ होण्याऐवजी उथळ होत चालला आहे कि काय? समाजमाध्यमांतील चर्चा पाहिल्या तर हे विधान सत्य असल्याची जाणीव होईल. पण प्रत्यक्ष जीवनात तरी वेगळे काय घडते आहे? ज्ञानाची साधने एका टीचकीवर आलेली असताना शिकलेले लोकही एवढी खोटी अज्ञानमूलक विधाने एवढ्या जोमात करून मोकळे होतात कि “ज्ञान” या संकल्पनेबद्दलच शंका निर्माण व्हावी. अगदी आयआयटीमधील तद्न्य म्हणवून घेणारेही रामसेतू किंवा वैदिक विमाने याबद्दल जेंव्हा अक्कल पाजळतात तेंव्हा अशी शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे.

याला व्यक्तिगत व्यक्तित्व आणि अशा व्यक्तीत्वान्चा समूह असलेला समाज कारणीभूत आहे काय? अठराव्या शतकापूर्वी असे मानले जात होते कि व्यक्तित्व हे लिंग, ज्या घरात जन्म घेतला त्याचे सामाजिक व आर्थिक स्थान, धर्म, भूगोल इ. बाबींच्या सामुहिक हातभारातून आकाराला येते. १८५० नंतर मात्र हे बाह्य घटक नाकारत व्यक्तीवादाने जन्म घेतला. त्यानुसार कोणीही आपले व्यक्तिमत्व स्वत:ला रुचेल अशा शैलीत विकसित करू शकते. हा बाह्य प्रभावांपासून मुक्त असा स्वतन्त्रतावाद होता. याचा पगडा जगभरच्या आधुनिक पिढ्यांवर आहे. पण आपल्याला जे “वाटते” ते वाटणेही सर्वस्वी “स्वतंत्र” नसते तर बाह्य घटकांच्या प्रभावातून हे “वाटणे” आलेले असते याचे भान मात्र सुटले. व्यक्तित्व हे केवळ बाह्य घटक ठरवू शकत नाहीत तर व्यक्तीच्या उपजत प्रेरणाही घडवत असतात. या दोन्हीचा तात्विक समन्वय घडवणारे पर्यायी तत्वज्ञांनाच प्रभावी नसल्याने व्यक्ती आणि समाज यातील संघर्ष वेगळ्या अर्थाने टोकदार होत कायमच राहिला. या संघर्षाला विचारी विवेकाचा पाया नसल्याने हा संघर्ष उथळच होणार होता आणि तसे झालेही. आणि याचे एकुणातील सामाजिक परिणाम गंभीर तर आहेतच पण या सा-यात व्यक्तींचे “व्यक्तित्वच” हरवत चालले आहे. आज आपल्या सर्वांची अवस्था अतिप्रगत पण व्यक्तित्व नसलेला समाज अशी झाली असेल तर आपण वेळीच सावध व्हायला हवे.

उथळपणाचा उद्रेक जर होत असेल, समाज अधिकाधिक असहिष्णू बनत असेल, आपल्या जाणीवा व्यापक, वैश्विक न बनवता अधिकाधिक संकुचित करत नेत असेल तर विज्ञानाच्या अचाट प्रगतीचा आपल्याला अभिमान वाटायचे काहीएक कारण नाही. उलट या विज्ञानाच्या प्रगतीतून अजून वेगळे आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक प्रश्न कसे उभे राहणार आहेत व त्याला तोंड देण्यासाठी आम्ही कोणती नीती आखणार आहोत याची जाणीवपूर्वक रचना करावी लागणार आहे. अन्यथा आम्ही भविष्यात तर पुरते भरकटून जावू. कारण संभाव्य बदलांना पचवण्याची, तोंड देत स्वीकारण्याची मनोवस्था प्राप्त करण्यासाठी जी तत्वप्रणाली विकसित करायला हवी तिचाच अभाव असेल. उदा. जागतिकीकरण पचवन्यासाठी भारतीय मानसिकता बनलेलीच नसतांना जागतिकीकरण आले. फोफावले. त्याचे भले-बुरे लाभही झाले. पण ज्ञानात्मक फोफाव मात्र झाला नाही. नवे तत्वज्ञान व समाजशास्त्र आकाराला आले नाही. आमचे प्रश्नही जुने आणि उत्तरेही जुनीच पण जगणे मात्र आधुनिकतेत तिचा फायदा उचलण्याच्या प्रयत्नात राहिले. गतकाळातील तथाकथित वैभवाचा आणि संस्कृती श्रेष्ठत्वाचा पगडा कमी होण्याऐवजी वाढतच गेला. आम्हे धड व्यक्तिवादी राहिलो नाही कि समाजकेंद्री. एकाकी मात्र नक्कीच झालो. आमच्या सामाजिक मानसिक कुन्ठेचे हे एक मोठे कारण आहे.

जग नेहमीच बदलत आलेले आहे. ज्ञान-विज्ञान आपला मार्ग क्रमित राहिलेले आहे. आम्ही बदल स्वीकारले नाही तर आम्ही इतिहासजमा होऊ. बदलांवर स्वार व्हायचे असेल तर तशी व्यक्तिगत व सामाजिक तत्वप्रणालीत सुसंगत व सुसह्य असे बदल करावे लागतील. आम्ही आजच यात खूप मागे पडलो आहोत. भरकटलो आहोत. एखादा केंद्रीय मंत्री उथळ व हास्यास्पद विधान करतो म्हणून त्याला ट्रोल करण्यापेक्षा ही सामाजिक उथळता कशातून जन्माला आलेली आहे व तिला डोक्यावर घेणारे कोण आहेत याचे चिंतन जास्त गरजेचे आहे. प्रतिक्रियावादी होण्यापेक्षा ज्ञानवादी  होणे कधीही श्रेयस्कर हे लक्षात घ्यावे लागणार आहे.

-संजय सोनवणी

 

Friday, October 14, 2022

आरक्षणाचा पुनर्विचार आवश्यक?



भारतात आरक्षण हा नेहमीच कळीचा मुद्दा राहिलेला आहे. खरे तर हा समाजकारणाचासमतेच्या तत्वावर सामाजिक व्यवस्थेमुळे वंचित-शोषित राहिलेल्या वर्गांच्या सामाजिक उत्थानाचामुख्य प्रवाहात येत आत्मसन्मान मिळण्याचा विषय. आरक्षण ही संकल्पनाच मुळात व्यवस्थेत मागे पडलेल्यांना विशेष संधी देत सर्वांच्या बरोबरीने पुढे घेण्यासाठी वापरलेली क्लुप्ती म्हणून जन्माला आली. त्यासाठी अशा वंचित घटकांना मागासपनातून बाहेर पडण्याची संधी मिळावी यासाठी सरकार त्यांच्यासाठी विशेष प्रावधाने करते. किंबहुना ती कल्याणकारी सरकारची जबाबदारी आहे असेही मानले जाते. प्रगत देशांतही Positive discrimination” हे तत्व वापरले जाते. तत्वता: आरक्षनाचा हेतूच मुळात असलेले मागासलेलेपण दूर करण्यासाठी आहे, समाज मागासच रहावा यासाठी नाही हे पण आधी लक्षात घेतले पाहिजे.

म्हणजेच हा सामाजिक विषय आहे. पण भारतात हा मुख्य विषय बाजूला पडून हा विषय राजकारणाचा विषय कधी बनला हे जनतेच्या लक्षातच आले नाही. आरक्षणाचे मुलतत्व जाणून बुजून विसरले जावून संधीसाधू राजकारणाच्या नादात ‘आरक्षण’ हा राजकारणप्रणीत सामाजिक लढ्यांचा आणि म्हणूनच सामाजिक विद्वेष वाढवण्याच्या खेळीचे एक साधन बनून गेला. जवळपास सर्वच भारतीय समाज स्वत:ला सामाजिक मागास म्हणवून घेत, तशी सर्वेक्षने करवून घेण्याचा आग्रह धरत आरक्षणाच्या कक्षेत येनकेनप्रकारेन येण्यासाठी संघर्ष करू लागले. जातीय नेते आणि जातीचे विचारवंत आपली जात कशी मागास आहे आणि आरक्षण हा आमचा कसा हक्क आहे यासाठी रस्त्यावर  उतरू लागले. न्यायालयाचे दरवाजे ठोठावू लागले किंवा राजकीय शक्ती वापरत आरक्षणाचे लाभ मिळवण्यासाठी विधीमंडळांना वापरू लागले. ज्यांना जातीच्या आधारावर मागास ठरवून घेता येणे अशक्य होते असे समाज आरक्षणाचा आधार आर्थिक असला पाहिजे असा आग्रह धरू लागले आणि तसे आरक्षण मिळवण्यात तात्पुरते का होईना यशस्वीही झाले. यातून आरक्षणाच्या रांगेत उभे असलेल्या समाजांना (किंबहुना नेत्यांना) राजकीय लाभालाभ मिळाले असले तरी सामाजिक प्रश्न सुटन्याऐवजी सामाजिक वीण विस्कटन्यास मात्र हातभार लागला हे मात्र स्पष्ट आहे. यातून आरक्षणाचे घटनात्मक मुलतत्व यात बाजूलाच राहिले असल्याचे चित्र आपल्याला दिसेल.

भारतात संधी मिळणे किंवा नाकारली जाणे हेच मुळात जातीय आधारावर झालेले असल्याने आरक्षणासाठी जात हाच मुख्य आधार असणार हे उघड होते. दुसरी बाब मग यामुळे जातीनिर्मुलन कसे होईल हा. पण जेंव्हा भारतात आरक्षणच नव्हते तेंव्हा कोठे जाती निर्मुलन झालेतेंव्हा का जाती अधिकच बंदिस्त आणि घट्ट झालेल्या होत्यात्यामुळे आरक्षणामुळे जाती अजूनच बंदिस्त होतील या तर्कात तसा अर्थ नाही. आजही जातीभेदाचे चटके भोगावे लागणारे असंख्य समाजघटक आहेत. आरक्षण त्यांना किमान जगण्याचा मानसिक आधार देत व्यवस्था त्यांच्या हितसंबंधाची काळजी घेत असल्याचा (अनेकदा भ्रमात्मक असला तरी) भास देते. जाती निर्मुलन कसे होणार ही चिंता सोडवण्याचे मार्ग आरक्षण रद्द करण्यात नाहीत. ते मार्ग वैचारिक व मानसिकता बदलात असून जातीसंबंधीचे पूर्वग्रह बदलण्यात आहे, कारण आरक्षणविरोधाचा पायाच मुळात जातीद्वेष व संधी नाकारण्याच्या प्रवृत्ती आहेत हे आपल्या लक्षात येईल.

जातींची निर्मिती ही मुळात व्यवसायाधारीत आहे व त्या त्या व्यवसायांच्या उत्थान-पतनातून निर्माण झालेली विपरीत स्थिती जातीव्यवस्था बनवत ती घट्ट करत नेण्यात झाली आहे. आपापल्या व्यवसायात नवा स्पर्धकच नको या प्राथमिक भावनेतून जातीत (व्यवसायात) अन्य नवख्यांना प्रवेश देणे जसे बंद झाले जातीव्यवस्था (व्यवसायव्यवस्था) बंदिस्त झाली. ढासळत गेलेली अर्थव्यवस्था या स्थितीला प्राधान्याने जबाबदार होती. गेल्या हजार वर्षात या अर्थ स्थितीत फरकच न पडल्याने तात्पुरते व्यवस्था म्हणून बंदिस्त झालेली जातीव्यवस्था कठोर व अन्यायी होत गेली. सर्व समाजांना याची लागण झाल्याने  आणि औद्योगीकरणाच्या काळात बदलत्या जगाशी स्पर्धा करण्यात सपशेल अपयशी ठरलेले हे व्यावसायिक संघ देशोधडीला लागणार ह उघड होते. यातून बाहेर पडण्यासाठी जे आर्थिक धोरण यायला हवे होते ते सत्ताधा-यांनी आणायचा अभावानेच प्रयत्न केला. जात हे जरी आर्थिक नसले तरी सामाजिक सुरक्षेचे साधन आहे या जाणीवेतून जातभावना उद्रेकत गेल्याचे चित्र आपण आजही पाहतो. ज्यांना जातीमुळे आणि वर्णामुळे सामाजिक आणि आर्थिक वर्चस्व टिकवता येणे सहज शक्य होते ते तर मुळीच जात अथवा जातभावना सोडणे शक्य नव्हते. अशा जातींच्या आपापल्या सुरक्षा अथवा वर्चस्वाच्या संकल्पनांतून भारतीय समाज आकाराला आलेला असल्याने आरक्षणाचा मूलाधार जात हाच असणार हे उघड होते. जातीनिर्मुलन हा आरक्षणाचा हेतू असूच शकत नव्हता. ते शक्यही नाही.

जातींच्या आधारावर आरक्षण नको तर ते आर्थिक आधारावर असावे कारण आता अनेक कथित वरिष्ठ जातीही दरिद्र झाल्या आहेत असा एक युक्तिवाद आहे. पण आर्थिक आधार म्हणजे काय? दारिद्र्याची नेमकी व्याख्या काय करणार? शिवाय आर्थिक निकष निश्चित करणेत्यानुसार आरक्षणाचे प्रमाण ठरवणे व ते वितरीत करणे ही एक अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. गरीबी ही सापेक्ष बाब असल्याने व ती तशी सर्वच समाजघटकांत कमी-अधिक प्रमाणात विखुरलेली असल्यानेआर्थिक आधारही सामाजिक संघर्षाचा नवा केंद्रबिंदु बनुन जावू शकतोहेही आपल्याला लक्षात घेणे आवश्यक आहे.

खरे तर आरक्षणाची सामाजिक चर्चा करायची तर आरक्षित घटकांना आरक्षणाचा कितपत लाभ झाला, त्यांचे सामाजिक उत्थान झाले कायझाले नसल्यास का झाले नाही आणि आरक्षणाचा हेतू सफल होत नसेल तर का होत नाही आणि आहे त्या व्यवस्थेत काही बदल करणे आवश्यक आहे काय यावर चर्चा व्हायला हवी होती. पण ती तशी झालेली नाही हे एक वास्तव आहे.

वास्तव हे आहे कि आरक्षित प्रवर्गातील सर्वच जातींना आरक्षणाचे समान लाभ मिळत नाहीतत्यातील बलिष्ठ जाती आरक्षणाचे अधिक लाभ घेत इतरांना वंचित ठेवतात या दबक्या स्वरात का होईना तक्रारी सुरु झाल्या आहेत. त्यामुळे विशिष्ट प्रवर्गासाठी असणा-या आरक्षणातून आपल्या जातीला तोडून आरक्षण द्या अशाही मागण्या त्यामुळे पुढे आहेत. समान संधी हे आरक्षणाचे मुलतत्व येथे आरक्षित प्रवर्गांतील काही जाती  (आणि त्या त्या जातीत असणारे उच्च वर्गीय) ठोकरून लावत आपल्याच ताटात अधिक कसे येईल याचे पद्धतशीर प्रयत्न करत आरक्षणाच्या तत्त्वालाच हरताळ फासत असल्याचे चित्र समोर येते आहे.

शिवाय एकदा आरक्षणाचा लाभ घेतलेले कुटुंब पिढ्यानुपिढ्या आरक्षणाचा लाभ घेत राहिल्याने त्याच जाती अथवा प्रवर्गातील अन्य गरजवंताची वर्णी आरक्षणात लागण्याची व प्रगती साधण्याची शक्यता मावळून जात्ते. यासाठी एका परिवारातील व्यक्तीना आरक्षणाचा लाभ हा अधिकाधिक दोन पिढ्यांपर्यंतच घेता यावा तरच आरक्षणाचा प्रवाह इतरांकडेही वळू शकेल अशी तरतूद करणे आता आवश्यक झाले आहे. शिवाय आरक्षणाची टक्केवारी ५०% हुन अधिक न वाढू देता उलट ती कशी कमी करत नेता येईल हे पाहिले पाहिजे. एके दिवशी मुळात आरक्षणाचीच गरज राहणार नाही हे पहावे लागेल.

खरे तर आरक्षित घटकांपैकी एकही समाजघटक आरक्षणामुळे जर सामाजिक मागासपणातून बाहेर पडला नसेल तर आरक्षणच निरर्थक होऊन जाते. आरक्षणामुळे सामाजिक मागासपण कमी होण्याऐवजी ते वाढतच राहणार असेल तर समूळ आरक्षणाच्याच धोरणाचा पुनर्विचार करणे अत्यावश्यक बनून जाते व त्यासंबंधाने अधिक चिंतन करण्याची गरज आहे.

-संजय सोनवणी

 

 

भारताचे पूर्वेचे द्वार: आसाम


 


आसाम हे भारताचे पूर्वेचे द्वार आहे अशी प्राचीन मान्यता आहे. एके काळी कामरूप व प्राग्ज्योतीष नावाने ओळखला जाणारा हा प्रदेश भारतातून पूर्वेकडे जाणा-या व्यापारी मार्गांच्या जाळ्याने भरलेला होता. चीन, म्त्यानामार ते पार थायलंडमधील संस्कृती आणि भारतीय संस्कृतीचा सुंदर मिलाफ येथे पहायला मिळतो ते या व्यापारी मार्गांवरून झालेल्या सांस्कृतिक देवान-घेवाणीमुळे तसेच मानवी स्थलांतरांमुळे. येथील स्थापात्यावाराही पौर्वात्य शैलीचा प्रभाव आहे. येथून नेपाळ, तिबेट, चीन व दक्षिण-पूर्व आशियातील अनेक देशांशी व्यापारी संपर्क होत होता. नैऋत्य चीनच्या भागातून अनेक रानाती टोळ्या येथे वसल्या असल्याचा उल्लेख मध्ययुगातील एका अरबी व्यापा-याने करून ठेवला आहे. आता स्मृतीन्तही धूसर झालेला दक्षिण रेशमी मार्गही शेवटी आसाममार्गेच एकीकडे पाटलीपुत्र तर दुसरीकडे ब्रह्मदेश येथे पोचत होता.  भारतातून महत्वाच्या व्यापारी शहरांशी हे मार्ग जोडलेले असल्याने हिमालयातील व पश्चिमोत्तर भारतातील मार्ग जसे आर्थिक समृद्धीचा ओघ भारतात आणत होते तसेच आसाममधून जाणारे मार्गही वैभवाचा मार्ग बनलेले होते. असे असले तरी आसाममधल्या प्राचीन मार्गांचे व्हावे तसे संशोधन अद्याप झालेले नाही हे एक कटू वास्तव आहे.

 

अर्थात प्राकृतिक उत्पातांमुळे या मार्गांवरही संकटे कोसळली होती याचे उल्लेख चीनी साधनांनी जपून ठेवलेले आहेत. मध्ययुगात या भागात वारंवार झालेल्या भूकंपांमुळे भूस्खलन होऊन अनेक रस्ते बंद पडले होते याच्या नोंदी उपलब्ध आहेत. भूकंपांमुळे पर्वतांच्या उंची कमी होणे, नद्यांचे प्रवाह बदलने अथवा पूर्णपणे अडवले जाणे यामुळे शक्यतो नद्यांच्या बाजूनेच जाणारे मार्गही नष्ट होणे शक्य आहे. तसाही हा प्रदेश भूकंपप्रवण आहे. भूकंपाची आपत्ती आसामवर पुन:पुन्हा ओढवते. गेल्या साडेतीनशे वर्षांत या प्रदेशात सात वेळा मोठाले भूकंप झाले१९५० चे हादरे जगात नोंद झालेल्या सर्वांत जोराच्या तीव्र भूकंपांपैकी होते आणि १८९७ चा भूकंप तर मानवेतिहासातील सर्वांत तीव्र भूकंपांपैकी एक होता. दक्षिण रेशीममार्ग का विस्मरणात गेला याची कारणे या प्राकृतिक उत्पातात आहेत. असे असले तरी व्यापार मात्र थांबला नाही. साहसी व्यापा-यांनी नव्या वाटा शोधल्या व जोखीम पत्करत आपले उद्योग सुरूच ठेवले. लोकांचेही येणे जाणे सुरूच राहिले. चीनचा युनान भाग लगतच असल्याने दुर्गम भागांतूनही नवे मार्ग काढले गेले असे दिसते.

 

आसामचा इतिहासही रंजक आहे. इथे पुराश्मकालापासून मानाच्वी वस्त्या असल्याचे पुरावे मिळाले आहेत. कालिकापुराण  योगिनीतंत्र  या ग्रंथांतून ज्या अनेक प्राचीन राजांची नावे येतातते दानव व असुर होते असे उल्लेख आहेतमार्हरांग वंशाच्या दानवांचा पराभव करून प्राग्‌ज्योतिषपुरचे राज्य स्थापणारा नरकनरकाचा मुलगा भगदत्त यांची वर्णने महाभारतभागवतात येतातशांखायन गुह्यसंग्रह  रामायण यांत कामरूपाचा उल्लेख आहेनरकभगदत्तमाधवजितारी आणि आशीर्मत्त या चार वंशांनी प्राचीन आसामात राज्य केलेअसे वंशावळींवरून दिसते.  परंतु चवथ्या शतकापर्यंतचा आसामचा इतिहास अस्पष्ट आहेया शतकाच्या मध्यास वर्मन वंशाचा मूळ पुरुष पुष्यवर्मन याने कामरूपात राज्य स्थापलेअसा अंदाज आहेया वंशातील महेंद्रवर्मन (४५०८०) याच्या काळापासून कामरूपाचे महत्त्व वाढू लागले. प्रसिद्ध चीन्वे प्रवासी ह्यु-एन-त्संग हाही सम्राट हर्षवर्धनाच्या काळात कामरूप येथे आला होता. त्याने आसामचे मनोद्न्य वर्णन आपल्या प्रवासवर्णनात केले आहे. येथे सर्वत्र प्रवेशलेली वैदिक संस्कृती मात्र शिरकाव करू शकली नाही याचे कारण येथील समाजावर असलेला तंत्रांचा आणि शाक्त पुजाविधीन्चा अमिट असा प्रभाव. पुढे येथे ब्रह्मदेशातून आलेल्या स्थलांतरितानी सत्ता स्थापन केली व “आहोम” घराणे सत्तेवर आले. तेराव्या शतकाच्या सुरुवातीस आहोम जमातीचा नायक सुकाफा पतकाई पर्वतरांगा ओलांडून सध्याच्या लखिमपूरसिबसागर जिल्ह्यांच्या दक्षिण भागात आलातेथील स्थानिक वन्य जमातींना जिंकून आहोमांनी राज्यविस्ताराला सुरुवात केली. नंतर त्यांचे राज्य जवळपास एकोणीसाव्या शतकापर्यंत कायम राहिले. आसाम हे नाव “आहोम” याचाच अपब्रांश आहे असे भाषाविद मानतात. आसाम हे बनाव प्रचलित झाल्यावर जुने कामरूप हे नाव पूर्ण मागे पडले. यांच्याही कारकिर्दीत पूर्व-पश्चिमेचा व्यापार अव्याहत सुरु होता. इतका कि आसाम हा आपल्या व्यापारे भागीदार बनावा यासाठी इस्ट इंडिया कंपनीने विशेष प्रयत्न केले आणि पुढे तर आहों राजांची सत्ताच बरखास्त करून टाकली.

 

आसाममधून एकट्या चीनला जाणारे किमान पाच मार्ग होते. शिवाय नागा डोंगररांगांतून अनेक मार्ग म्यानमारवरून चीनला जात असत. सिचुआनमार्गे भूतान आणि तिबेटला जाणारेही मार्ग होते. चीनमधून रेशीम वस्त्रे आयात करण्याऐवजी ती आपणच का निर्माण करू नये असा विचार आसामी लोकांच्या मनात आला आणि त्यांनीही रेशमी वस्त्रांचे उत्पादन सुरु केले. काही विद्वानांच्या मते रेशीम उत्पादन हे पूर्वीपासून आसामी लोकांना माहित होते व ते पट्ट या नावाने त्याचे उत्मादन घेत. आजही आसामी लोक रेशमी कपड्यांना पट्ट असेच संबोधित करतात. या वस्त्रांची स्पर्धा चिन्यांना सहन न झाल्याने चीनी सम्राट अस्वस्थ झाल्याचेही उल्लेख मिळतात. किंबहुना “चीनापट्ट” नावाचे कौटिल्याने आपल्या अर्थशास्त्रात उल्लेखलेले वस्त्र हे आसामध्ये बनवले जात असावे असा विद्वानांचा तर्क आहे. शिवाय उत्कृष्ठ रेशीम फक्त सुवर्णकुडम गावी मिळते असेही अर्थशास्त्रात नोंदवले आहे. हे सुवर्णकुडम म्हणजे आसाममधील सोनकुडीह हे गाव आहे असे विद्वान मानतात. म्हणजे रेशीम उत्पादानासाठे आसाम देशात प्रसिद्ध होते. बाणभट्टाच्या हर्षचरितमध्ये आसामचा राजा हर्शाला रेशमी वस्त्रे उपहार देतो असे उल्लेखलेले आहे. अर्थात रेशीम उत्पादनाची सुरुवात कोठेही झालेली असो, पण रेशमाने जगाच्या व्यापारावर अधिराज्य निर्माण केले होते यात कसलाही संशय नाही.

 

भारत हा चीनमधील चौकोनी बाम्बुन्चाही मोठा आयातदार होता. या बाम्बुन्ना चीनी क्वियांग म्हणत. या बाम्बुन्चा उल्लेख रामायणातही आलेला आहे. आसामही बाम्बुन्च्या उत्पादनात सुरुवातीपासून आघाडीवर राहिलेला आहे हेही येथे लक्षात घेतले पाहिजे. किंबहुना पोकळ बांबूमधून स्फोटक दारू (सोरा)  वापरून क्षेपणास्त्रे डागन्याचा शोध प्रथम आसाममध्ये लागला व तो व्यापा-यांकरावी चीनमध्ये पोचला असेहे मानणारा आज मोठा विद्वत्वर्ग आहे. जगभरात शोध पसरले त्यात व्यापारे मार्गांचा जसा वाटा आहे तसाच अनेक साथरोग पसरन्यातही या मार्गांचा हातभार लागलेला आहे असे आपल्याला इतिहासात डोकावले कि लक्षात येते.

इशान्य भारतातील सर्वच राज्यांचा सिचुआन, युनान, ते दक्षिणपूर्वेच्या भागांशी संबंध होता. त्यामुळे वांशिक मिश्रण होणेही स्वाभाविक होते. आसाममधील आहोंम हे ताई गटाशी संबंधित होते. आसाममधील भातशेतीतही त्यांनी अभिनव पद्धती आणल्या. ताई लोक थायलंड ते युनानपर्यंत पसरलेले आहेत. हे लोक ब्रिटीश काळापर्यंत तिबेटमधून भारतात येणारे मार्ग वापरत होते. नथू-ला खिंडीमार्गे जसा एक मार्ग होता तसेच भूतानमधून येणारेही दोन मार्ग होते. त्यामुळे या लोकांचे प्राबल्य इशान्य भारतात असणे स्वाभाविक आहे. अर्थात हा प्रवास एकेरी नसतो. भारतातुनाही पूर्वेकडे अनेक स्थलांतरे झालेली आहेत. म्यानमारचे राजे स्वत:ला बुद्धाच्या शाक्य वंशाचे समाजात असत. त्यांच्या मते त्यांचे पूर्वज भारतातून येऊन इरावती नदीच्या खो-यात वसले होते. दावत बॉन्ग राजांनी नागा राजकन्यांशी विवाह केले होते असेही इतिहासावरून दिसते. युनान (दक्षिण चीन) मध्येही उत्तरपूर्वेतील अनेक जमाती स्थलांतरीत झाल्या. एका अर्थाने आसाम व पूर्वोत्तर भागातील राज्ये ही संस्कृती संगमाचा एक महत्वाचा सेतू बनली यात शंका नाही.

 

-संजय सोनवणी

Tuesday, October 4, 2022

स्वातंत्र्य

 संस्कार माणसाचे स्वातंत्र्य संकुचितच नव्हे तर अनेकदा चिरडुनही टाकतात हे सत्यच आहे. माणसाचे स्वातंत्र्य तो बोलायलाही शिकला नसतो तेंव्हापासुनच हिरावले जाण्याची सुरुवात होते. मानसिक पारतंत्र्यात वाढायची सवय झालेले आपली मुले/नागरिक तसेच परतंत्र रहावेत आणि त्यांना त्यात पारतंत्र्याचाही आभास होऊ नये अशा दक्षता घेतात. पण हे जगभर होते. पारतंत्र्य ही आपली मानसिक गरज बनून जाते ती अशी.

संस्कृती हीच मुळात कृत्रीम बाब आहे. कारण ती नैसर्गिक गोष्टींना सोयीनुसार बदलवून बनवलेली असते. पुर्ण निसर्गवादी राहता आले तर कदाचित स्वतंत्र असण्याचा अनुभव तरी येईल, पण पुन्हा (संस्कारांनी विशिष्ट धारणांचे बनल्यामुळे) त्यांना पुन्हा नैसर्गिकपणा "शिकवावा" लागेल. मग तोही तेवढाच कृत्रीम होण्याचा धोका नाही काय? मला वाटते "उत्स्फुर्ततावाद" स्वत:हुन समजुन घेणे, तसे वागणे कदाचित मानवी प्रेरणांना बदलवू शकेल...पण दुस-यांना बदलवण्याचा प्रयत्न करणे चुकीचेच ठरेल. कारण त्यामुळे तेही पुन्हा बदलवण्यचे संस्कारच असतील.
मला येथे ग्रीकांचा नियतीवाद आठवतो. चुकीचा असेल, पण ज्याची त्याची एक नियती असते हे क्षणभर मान्य केले तर अमूक तशा अवस्थेत (वैचारिक/सामाजिक) का आहे हे प्रश्न छळत नाहीत. आपल्याला करावे वाटते ते करत रहावे, सांगत रहावे...पण त्यामुळे अमुक एक परिणाम होईल याची अपेक्षा करण्यात काय अर्थ? शेवटी ज्याची त्याची "मर्जी"... म्हणजेच स्वातंत्र्य....
बदल हा स्वेच्छेचा विषय असतो. कोणी जग बदलवू म्हणत असेल तर तो मुर्खांच्या नंदनवनात वावरत असतो. महान नेते, अवतार, धर्मसंस्थापकही त्यांच्या अनुयायांना पुर्णतया बदलू शकले नाहीत हा आम्हा मानवांचाच इतिहास आहे. बदलाचा प्रयत्न करावा वाटणे ही व्यक्तीची स्वेच्छा आहे. स्वीकारायचे अथवा नाही, नाकारायचे तर काय नाकारायचे ही व्यक्तींची स्वेच्छा आहे. या स्वेच्छेला नमस्कार करुन आपापले स्वेच्छेचे कार्य करत रहावे, बदलावे वाटले तर बदलावे....ज्याला बदलावे वाटेल तोच बदलणार आहे. कृत्रीमतेचा सोस सोडला तर हे संस्कार आणि संस्कृत्यांचे सोसही किमान कमी तरी होतील.
माणसाला संपुर्ण स्वातंत्र्य देता / घेता येत नसेल तर किमान बाह्य बंधनांची संख्या तरी कमी करता यायला हवी. व्यक्तीला त्याच्या उत्स्फुर्ततेने जगता यायला हवे.

वैदिक धर्म म्हणजेच हिंदू धर्म?


डा. सदानंद मोरे यांच्या "अज्ञात पैलू थोरांचे" या स्तंभातील "व्यासांचे वारसदार ज्ञानेश्वर!" या लेखात काही अनैतिहासिक विधाने आली आहेत. वैदिक धर्म पुरातन असून वैदिक धर्म म्हणजेच आजचा हिंदू धर्म अशा आशयाचे विधान त्यांनी केले आहे. वैदिक धर्म वेदांवर आधारित असून तो यज्ञयागाच्या कर्मकांडाभोवती फिरतो हे त्यांना मान्य आहे. त्यात मुर्तीपुजेला स्थान नाही. वैदिक धर्म भारतात इसपू १५०० च्या आसपास आला. तो आर्य आक्रमकांमुळे किंवा धर्मप्रचारकांच्या माध्यमातून आला असे प्राच्यविद्येचे बहुसंख्य विद्वान मानतात. पण त्याहीपुर्वी सिंधू काळापासून आजतागायत चालत आलेला जो लिंगपुजकांचा/प्रतिमापुजकांचा धर्म होता त्याबाबत मात्र डा. मोरे यांनी त्यांच्या लेखात अवाक्षरही काढलेले नाही. वैदिक धर्मात यज्ञद्वारे आहूति देणे हेच अमूर्त देवतांना संतुष्ट करण्याचे माध्यम असून प्रतिमापुजा या धर्माला मान्य नाही. हिंदू हे आजही प्रतिमा/मुर्तीपुजक आहेत व ते वैदिक धर्मतत्वांच्या विरोधात आहे. एवढेच नव्हे तर हिंदू ज्या देवता पुजतात त्यातील एकही देवता ऋग्वेदात उल्लेखली गेलेली नाही. तीन वर्णाच्याच लोकांना वेदाधिकार होता हे मान्य करत असतांना ज्यांना वेदाधिकारच नाही ते वैदिक धर्मीय कसे असू शकतील याकडेही डा. मोरे यांनी कसे दुर्लक्ष केले हाही प्रश्न आहे. वैदिक स्त्रीयांनाही पुर्वकाळात वेदाधिकार होते. ते नंतर काढून घेतले हेही डा. मोरेंनी नमूद केले असते तर जरा वास्तवपुर्ण झाले असते.
या पार्श्वभुमीवर वैदिक धर्माला प्राचीन काळी पर्यायच (म्हणजे प्रतिस्पर्धी धर्म) नसल्याने या धर्माला फक्त "धर्म" म्हटले जायचे हे डा. मोरे यांचे विधान विपर्यस्त आहे हे उघड आहे. डा. रा. ना. दांडेकर यांनी सिंधू संस्कृतीचा धर्म हा मुर्ती/लिंग/मातृपुजकांचा असून नंतर कधीतरी जन्माला आलेल्या वैदिक धर्मापेक्षा तो पुर्णतया वेगळा होता. या संस्कृतीच्या मुख्य देवाला "सिब" असे म्हटले जात असून सिंधू संस्कृतीचा धर्म आदिशिवाचा होता हे स्पष्ट होते, असे नमूद केले आहे. (संदर्भ- Hinduism- Dr. R. N. Dandekar) तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनीही आपल्या "वैदिक संस्कृतीचा विकास" या ग्रंथात तसेच पाश्चात्य विद्वानांनीही आपल्या विवेचनांत सिंधू संस्कृतीचा धर्म शिव-शक्तीप्रधान असल्याचे स्पष्ट नमूद केलेले आहे. वेदपुर्व काळातच व्यापक प्रमाणात शिवप्रधान धर्माचे उत्खनित पुरावेही मिळत असता "वैदिक धर्माला पर्यायच नव्हता." ही डा. मोरे यांची मांडणी अनैतिहासिक व विपर्यस्त आहे हे उघड आहे. वैदिक धर्म हा शिव-शक्तीप्रधान, पुजा हेच कर्मकांड असलेला धर्म नव्हे हे उघड आहे. मग वैदिक धर्म हा हिंदू धर्म कसा हा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होतो.
आजही सिंधूकाळातील मुर्ती-प्रतिमापुजकांचाच धर्म सर्वव्यापी असून वैदिक धर्माने त्याचे स्वतंत्र अस्तित्व राखलेले आहे. त्यामुळे वैदिक धर्म म्हणजेच हिंदू धर्म ही मांडणी सत्याला धरून नाही. वैदिक धर्मीयही बहुसंख्याकांच्या धर्म मुर्तीपुजकांचाच (म्हणजे शैव अथवा हिंदू) असल्याने कालौघात मुर्तीपुजक बनले असले तरी त्यांनी आपले वैदिकत्व त्यागलेले नाही या वास्तवाकडेही त्यांनी लक्ष द्यायला हवे होते असे मला वाटते.

(५ ऑक्टोबर २०१५)

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...