Monday, June 12, 2023

नव्या जगाची आव्हाने कशी पेलणार?

 



आजचा काळ जागतिकीकरणाचा आहे असे आपण मानतो. पण जेंव्हा आपण आपली समाजरचना आणि जागतिकीकरणाचा विचार करतो तेंव्हा अनेक प्रश्न उपस्थित होतात. महत्वाचे प्रश्न म्हणजे जागतिकीकरणाला अनुकुल अशी आमची मानसिकता आहे काय? जागतिकीकरणातुन जी नवी जागतिक संस्कृती बनत आहे तिचा स्वीकार करत स्वत:त अनुकुल बदल घडवण्याचे मानसिक सामर्थ्य आमच्यात आहे काय? जागतिकीकरणामुळे जागतिक पातळीवर जी नवी संस्कृती बनू पहात आहे तिच्यात आमचा काही प्रभावी वाटा असणार आहे काय कि आम्ही केवळ नाईलाजाने या सांस्कृतिक लोंढ्याचा अपररिहार्य भाग बनणार आहोत? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एकीकडे जागतीक संस्कृती स्वीकारली जात असताना पुन्हा स्वसंस्कृतीचे मग काय या प्रश्नानेही हवालदिल होणे योग्य कि अयोग्य? थोडक्यात आम्ही नव्या जगाची आव्हाने पेलण्यास मानसिक दृष्ट्या समर्थ आहोत काय?
या निमित्ताने अजुनही अनेक प्रश्न उपस्थित करता येतील, पण येथे आपल्याला या प्रमुख प्रश्नांवर चर्चा करायची आहे. पहिल्या प्रश्नाला अनुसरुन एक उपप्रश्न असा आहे कि मुळात जागतिकीकरण ईष्ट आहे कि अनिष्ट. याचे उत्तर सोपे आहे खरे तर. जागतिकीकरण ही मुळात नवीन संकल्पना नाही. पुरातन काळापासुन ही प्रक्रिया सुरु झालेली आहे. जागतिकीकरणाचा अर्थ म्हणजे अशी अर्थव्यवस्था जी प्रांत-राष्ट्रांच्या सीमा ओलांडत पसरत जाते व त्याबरोबरच सांस्कृतिक देवानघेवाण होत जात प्रगल्भ व सर्वसमावेशक मानसिकता बनते.
पुरातन काळी जेंव्हा आंतरराष्ट्रीय व्यापार सागरी व खुष्कीच्या मार्गाने सुरु झाले तीच जागतिकीकरणाची प्राथमिक सुरुवात होती. भारतातुन सुती वस्त्रांपासुन ते मसाल्यांपर्यंतचे पदार्थ अरबस्थान, ग्रीस, इजिप्त, मध्य आशिया, चीन अशा वेगवेगळ्या राज्यांत जात व तिकडुन सोने ते पार मद्यही आयात केले जात असे. व्यापाराबरोबरच संस्कृतीचेही आदान-प्रदान होत असे. बौद्ध धर्म आशियाभर पसरला तो या व्यापारी मार्गांवरूनच. सूर्य पुजा ही भारतियांनी मध्य आशियातुन आलेल्या मगी लोकांकडुन घेतली. परस्पर भाषांतही एकमेकांचे शब्द मिसळत गेले. जगभर अनेक संस्कृतिनी कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या संस्कृतीवर राज्य तरी केले वा गुलाम तरी बनवले. रोमने प्रदिर्घ काळ युरोप व उत्तर आफ्रिका ते आशिया खंडाच्या काही प्रदेशावर साम्राज्य गाजवले. त्यातुनही त्या भागांत रोमनांश संस्कृती निर्माण झाली. तसेच त्यापुर्वी ग्रीकांश संस्कृत्या बनल्याच होत्या. भारतात ग्रीक, शक, हुण, कुशाण यांनी प्रदिर्घ काळ राज्ये गाजवली...अर्थात त्यांनी येथील संस्कृतीचा काही भाग उचलला तर त्यांच्या संस्कृतीचा काही भाग एतद्देशीयांनी स्वीकारला. हे एकार्थाने जागतिकीकरणच होते.
म्हणजेच जगाला जागतिकीकरण नवे नाही. फार तर एवढेच म्हणता येते कि औद्योगिक क्रांतीपूर्वी त्याचा वेग अत्यंत मंद होता तर औद्योगिक क्रांतीनंतर तो झपाट्याने वाढत गेला. आज माहिती-तंत्रज्ञानाच्या विस्फोटाने तर तो वेग भोवळ येईल एवढा वाढला आहे. असे असले तरी जागतिकीकरणाच्या मुख्य उद्दिष्टापासून आजचे समाज ढळले आहेत असेही आपल्याला म्हणता येईल. आज भारतीय मानसिकता जागतिकीकरणाचे फायदे घेत असल्याने ती जागतिकीकरणाला अनुकुल आहे असेच म्हणावे लागेल. परंतु ही अनुकुलता गोंधळयुक्त आहे.
जागतिकीकरण हवे आहे पण संस्कृतीवर आक्रमण नको अशी काहीशी विचित्र मानसिकता आहे. पण आक्रमण रोखणे सोडा....त्या आक्रमनाच्या लाटेवर आपण स्वार झालेलोच असतो याचे भान मात्र नसते. लाटेवर स्वार म्हणजे प्रवाह नेईल त्या दिशेने जात राहणे. पण या प्रवाहाला दिशा देईल असे काही भरीव योगदान भारतीय देत आहेत असे मात्र सहसा दिसणार नाही. त्यामुळे जागतिकीकरणातील प्रवाहपतित घटक एवढेच आपले स्थान राहील कि काय अशी भीती वाटणे स्वाभाविक आहे. हे एकतर्फी जागतिकीकरण झाले. बहुसंख्य सेवा आणि उत्पादने ही आयात केलेली असतात. निर्यातीच्या स्तरावर आपण अजूनही मागेच रेंगाळत आहोत आणि हळूहळू त्यातील वाटाही कमी होत जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान विकसित करून ते जागतिक पटलावर नेण्यात आपल्याला आजही अपयश येते आहे.
पुरातन जागतिकीकरण हे उभयपक्षी स्वातंत्र्य मानत घडत होते. प्रत्येक संस्कृतीने उत्पादन-सेवांत आपापली वैशिष्ट्ये टिकवलेली होती. पण आता तशी स्थिती राहिली नाही. असे असले तरी जागतिकीकरण अनिष्ट आहे असे आज म्हनता येत नाही. पण आपला जागतिकीकरणाकडे पहायचा दृष्टीकोन बदलावा लागणार आहे.
जागतिकीकरणात आज आपले स्थान पाहिले तर बौद्धीक कामगार स्वस्तात पुरवणारा देश म्हणुन आपली ख्याती आहे. साखर ते वस्त्रे आज निर्यात होतात पण ती सरकारी अनुदानांशिवाय जागतीक बाजारात विकलीच जावु शकत नाही एवढी किंमतीत तफावत आहे. भारताचा आयात-निर्यात व्यापार हा आतबट्ट्याचा आहे. काही अवाढव्य भारतीय कंपन्या सोडल्या तर भारतीय कंपन्या देशांतर्गतच उच्च विकासदर गाठु शकलेल्या नाहीत. परदेशात विस्तार करणे तर दुरच राहिले. याचा अर्थ असा होतो कि ग्राहक म्हणुन व बौद्धीक/शरीरश्रमी कामगार म्हणुन आम्ही जागतिकीकरणात आहोत हे खरे आहे पण जागतिक बाजारपेठेत मुल्यवर्धीत सेवा व उत्पादने विकण्यात आम्ही अत्यंत मागे पडलेलो आहोत. याचाच अर्थ असा होतो कि जागतिकीकरनाला अनुकुल अशी आमची एकतर्फी भुमिका आहे...पण दुस-या बाजुसाठी आवश्यक अशी नव-सृजनात्मक मानसिकता घडवण्यात आम्ही अपयशी ठरलेलो आहोत. आमची समाजव्यवस्था, शिक्षणव्यवस्था, मुल्य व्यवस्था आणि राजकीय व्यवस्था आमची मानसिकता बदलण्यातील सर्वात मोठे अडथळे आहेत. ते दुर कसे करायचे हाच आमच्या समोरचा आजचा गंभीर प्रश्न आहे.
यावर जोवर आम्ही व्यापक विचारमंथन व कठोर आत्मपरिक्षण करत नाही तोवर आमची मानसिकता ख-या अर्थाने जागतिकीकरनाला लायक नसून अर्थ-गुलामीलाच लायक आहे हे समजुन चालावे लागणार आहे.
आमच्या संस्कृती रक्षकांना नेहमीच पुरातन संस्कृतीच्या भवितव्याची काळजी लागुन राहिलेली असते. कोनतीही संस्कृती यच्चयावत जगात जशी होती तशीच्या तशी चीरकाळ टिकत नसते याचे भान त्यांना नसते. भारतीय संस्कृतीचेच म्हणावे तर हिंदू, वैदिक, समन संस्कृती, ( बौद्ध-जैन) ते इस्लामी संस्कृती...यात कालौघात किती परिवर्तने झाली हे इतिहासाकडे निर्लेप मनाने एक दृष्टीक्षेप टाकला तरी थक्क व्हायला होते. आज जागतिकीकरणामुळे वेगाने संस्कृती बदलते आहे आणि हा बदल थांबवणे ही अशक्यप्राय बाब आहे. येथेही पुन्हा प्रश्न हाच कि आम्ही फक्त सांस्क्रुतीक "घेवाणी"च्या बाजुने असनार आहोत कि "देवाणी"च्याही बाजुने? आणि देवाण-घेवाण ही फक्त तुल्यबळांतच होत असते. आम्ही मानसिक व बौद्धिक दृष्ट्या सबल होण्यासाठी काय करत आहोत? मुळात सर्वांचे आर्थिक उत्थान व्हावे यासाठी आमच्याकडे काय कार्यक्रम आहे?
खरे तर स्वत:शी व समाजाशी बेईमानी वृत्ती ही प्रबळ होत जात सृजनक्षमतेचा आत्माच हिरावून घेत आहे. जीवनातील बहुतेक क्षेत्रात या बेईमानी वृत्तीचा पदोपदी अनुभव येत असतो. मग जर आमची संस्कृतीच अशी बेईमानीची असेल तर आमच्या संस्कृतीला कोण घेणार? आणि बेईमानीच्या पायावर सामाजिक व सर्वसमावेशक अर्थ-क्रांती घडु शकत नाही...जागतिकीकरणात फार तर ग्राहक बनता येईल पण विक्रेते बनता येणार नाही. म्हणजे जागतिकीकरण एकतर्फीच राहील जे तसेही आता झालेलेच आहे. आम्हीच आमची सृजनात्मकता मारुन टाकण्याचा चंग बांधला आहे. आमचे आईबाप आम्हाला धाडसी बनण्याचे स्वातंत्र्य नाकारतात...जेथे कल आहे तेच शिकण्याचा व तेच करीअर म्हणुन करु देण्याचा मुलभुत अधिकार नाकारतात. मग गुलाम कधी मानसिक तुरुंगाच्या भिंती तोडुन पळतोय होय? आणि गुलामांना कधी संस्कृती असते होय?
-संजय सोनवणी



No comments:

Post a Comment

ऐतिहासिक तथ्यांची तोडमोड

  ऐतिहासिक तथ्यांची तोडमोड करणे आणि लोकांची दिशाभूल करणे हा भाजपाचा पूर्वीपासून उद्योग राहिलेला आहे. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी नुकतेच नेह...