Tuesday, August 30, 2011

खायाला नाय दाना आन म्हनं लोकपाल आना....

दादा, आज तरी भाकरीचा काय प्रोब्लेमच नाय व्हं
माय मजुरीला जाती
बाप चतकोर शेत नांगरतो
सरपंच येतू सांगाया
ते ठिबक सिंचन कि काय त्ये
तं कदी
इहिर काडाया
तं कदी ह्याला तं कदी त्याला...
सरकार म्हनं पैका देतं
त्वा फकस्त अंगठा उठीव...
एक गांधीबाबा देत्यो...
आन हवं तं
एक गावठीचा खंबा...
मायला आंगठा वठवायला काय बाचं जातं म्हनं?
वठवतो कि म्हंन्साल तिथं....

पर मायला आन बाला
बोलायच नाय सरपंच...
निवडनुका यिवुन -हायल्यात म्हनं...
गेलं ना रिजर्वात घोंगडं?
बाईल उबी करताय आयकतोय...
जरा ज्यादाच गांधीबाबा लागत्याल...
आताच सांगुन ठिवतोय...
नाय तं म्हनल
ह्यो प्यायाआदीच काय बरळतोय?

आन सरपंच, त्ये दिल्लीत काय तरी चाल्लय म्हन्त्यात
लय भारी गर्दी...शेराशेरात लोक म्हनं रस्त्यावं यिवुन -हायलेत
भ्रष्टाचार मिटवाया कायदा मागुन -हायलेत
च्यामारी तेंच्या
ते कदी गावाखेड्यात -हाईलेत?
खायाला नाय दाना आन म्हनं लोकपाल आना....
आस्लं कदी व्हतया व्हय?
आवं, द्येवाला निवद नाय दिला...
म्या म्हन्तो निवद नाय दिला तर इथं द्येव कदी पावत नाय
तं मानुस गांधीबाबा असा तसा सोडनार काय?
कंदी तुमी द्येव...कंदी आमी द्येव...
कबी तुम देव कबी हम देव...
मायला "द्येव" सबुद लय भारी काडला का नाय?

सरपंच ठिवा त्यो गावठीचा खंबा
पुडच्या येलला मातुर विदेशी आना
कह्याला पायजे वं त्यो अन्न्ना?
आन हा गांधीबाबा बोगस तं नवं ना?
लय बनावट आल्यात म्हनं बाजारात...
इच्यारायला तं पायजेल ना?

जावा निघोर आता
अंगठा तं मारला
यिल कामावं जवा
उठल तुम्चा बंगला...

1 comment: