Saturday, August 6, 2011

आधी कोण? निर्माणकर्ते कि पुरोहित?

हिंदू धर्मासमोरील समस्या - ६


पुरुषसुक्त हे ऋग्वेदात प्रक्षिप्त असून ते नंतर, म्हणजे जन्माधारित वर्णव्यवस्था आकाराला आल्यानंतर ब्राह्मण वर्गाला धर्माधिकार प्रदत्त करण्यासाठी घुसवले गेले हे आपण मागील लेखात पाहिले. प्रत्यक्षात उर्वरीत ऋग्वेद कोठेही वर्णव्यवस्था असल्याचे वा ते समाजाचे अभिन्न अंग आहे असे दर्शवत नाही. परंतू पुढे वर्णव्यवस्था निर्माण करणा-यांना वर्णव्यवस्थेस वेदमान्यता आहे हे दाखवणे भाग असल्याने कोणीतरी पुरुषसुक्तात घाल-घुसड केली आहे हे स्पष्ट आहे. आणि या कथित वेदमान्यतेमुळेच या कथित हिंदू धर्मात वर्णव्यवस्था व नंतर जातीव्यवस्था जन्माधारित करणे सहज शक्य झाले, त्यात मुळ वेदकर्त्या ऋषिंचा दोष नाही.

पुरुषसुक्तानुसार ब्राह्मण सर्वात आधी निर्माण झाला व क्रमाने ईतर वर्ण निर्माण झाले असे पुरुषसुक्तातील ११ व १२ क्रमांकाच्या ऋचा सुचवतात. परंतू समाजेतिहास अगदि त्या सिद्धांताच्या विपरीत आहे. विरुद्ध आहे. अन्नसंकलक मानव जसा शिकारी मानव बनला त्या प्रदिर्घ स्थित्यंतराच्या काळात धर्म तरी होता काय? आणि असला तर तो कसा होता हे आपण आधी तपासून पाहिले पाहिजे.

यच्चयावत विश्वातील एकही धर्म एकाएकी आकाशातून पडलेला नाही. मानवी समाजाने धार्मिक संकल्पना क्रमश: विकसीत केलेल्या आहेत. जन्म आणि म्रुत्युच्या गुढाने त्याला सर्वाधिक भेडसावले असल्याने, भयभीत केले असल्याने, तेच त्याच्या प्राथमिक चिंतनाचे विषय बनणे स्वाभाविक होते. आजही त्या आदिम संवेदनांत फरक पडलेला नाही हे आपण अगदी आधुनिक तत्ववेत्त्यांच्या चिंतनातुन पाहु शकतो. आदि मानवाने प्रतिकुल निसर्गाशी संघर्ष करत असतांनाच या गुढांशी ज्या पद्धतीने वैचारीक सामना केला त्याला तोड नाही. त्याने तेंव्हाच निर्माण केलेली प्रतीके आजही अगदी नव्य धर्मही सोडु शकलेली नाहीत. कारण त्यामागे आदि-मानवाच्या पराकोटीच्या तीव्र जगण्याच्या आणि प्रतिकुलतेवर मात करण्याच्या आकांक्षा होत्या. त्याची खोली समजण्याची आज आपण क्षमता हरपून बसलो आहोत.

धर्म म्हनजे नेमके काय असते हे आपण समजावून घेउयात. धर्म म्हणजे आहे ते विश्व, परिसर, निसर्ग याच्याशी मानवी जीवनाचे तादात्म्य साधत, मानवी समाजातील परस्परसंबंध नियमीत करणारी एक सैल संस्था. धर्म म्हणजे विश्व, त्याचे निर्मितीकारण आणि आस्तित्वाचे कारण समजावून घेत मानवी जीवनाशी त्याचे साधर्म्य कल्पत जात मानवी जीवन त्या विश्वनियमांशी मेळ कसे घालेल हे पाहण्याचे, तसे प्रयत्न करण्याचे तत्वद्न्यान देणारे साधन. धर्म म्हणजे कोणत्याही मानवी घटकाला एकटे न पडू देता त्याच्या आस्तित्वाला अर्थ देणारी संस्था. ही संस्था नुसती सैल असते असे नाही तर मानवी अनुभवांत जसजशी भर पडत जाते जसजसे मानवी द्न्यान पुढे जाते, तसतसे त्यांत परिवर्तन होणे अभिप्रेत असते. ही संस्था द्रुष्य नव्हे तर भावनीक/वैचारीक पातळीवर वावरत असते. या संस्थेचा कोणी एक निर्माता नसतो तर ही संस्था सर्वच मानवी समुदायाचा एक आध्यात्मिक-सामाजिक उद्गार असतो. प्रतीके बदलली, कर्मकांड बदलले तरी सामाजिक नियम फारसे बदलत नाहेत कारण "धारणात धर्ममित्याहू..." (म्हनजे समाजाची धारणा ज्या नियमांनी होते त्याला धर्म म्हणावे.) ही युधिश्ठीरप्रणीत व्याख्याच काय ती शेवटी खरी असते. आणि शांततामय सहजीवन अपेक्षिणारे ते-ते विवक्षित समाज किमान आपापल्या समाजांपुरते तरी समाजधारणोपयोगी सिद्धांत आपसूक विकसीत करत जातात हे आपण जागतीक समाजेतिहास व धर्मेतिहासातुन पाहु शकतो. अर्थात या धारणा कालौघात बदलत असतात याचे भान ठेवावे लागते.

आदिमानवासमोरचे प्रश्न जगण्याचे होते तसेच मरण्याचेही होते. आणि त्याहीपेक्षा महत्वाचा प्रश्न होता तो वंशसातत्याचा. ही भावना मानवच नव्हे तर सर्वच प्राणिमात्रांत निसर्गत: तीव्र असते. स्त्री ही जन्मदात्री आहे हे निश्चयाने मानवाला माहित होते पण तेंव्हा "गोधर्म" (म्हणजे मुक्त लैंगिक संबंध) आस्तित्वात असल्याने पित्रुत्वात आपलाही वाटा आहे हे पुरुष समाजाला माहितच नव्हते. तो एक नैसर्गिक चमत्कार मानला जात होता. त्यामुळे मात्रुसत्ता ही पहिली समाजव्यवस्था बनली. स्त्रीत वंशसातत्त्याची एक अद्भुत शक्ती आहे ही जाणीव व अनुभवातून शक्तीपुजा सुरु झाली. आणि हे जगभर घडले. एकही मानवी समाज त्याला अपवाद नाही. योनीपुजेचे पुरातन अवशेष आजवरच्या असंख्य उत्खननांतुन सापडले आहेत. यालाच आपण शक्तिपुजा म्हनतो. शक्ति हे सर्जनाचे आणि स्त्रीत्वाचे प्रतीक होते. मानवी जनन स्त्रीच्या हाती आहे तसेच विश्वाचे जनन करणारीही कोणी महाशक्ती असनार या आदिम कल्पनेतून जगदंबेची, विश्वजननीची संकल्पना मानवी मनाने विकसीत केली. ही मानवी धर्माची पहिली पायरी होती.

आणि या स्त्रीधर्माचे पुरोहित कोण? तर त्या-त्या टोळीच्या नायिका असत. तेंव्हा स्त्रीसत्ताक पद्धतीचा कालखंड होता. सर्वात जास्त प्रसवशील स्त्रीया आपसूक नायिकेचे स्थान घेत. अर्थात हे पद वंशपरंपरागत असूच शकत नव्हते. अशी स्त्री प्रसवशील असेपर्यंत नायिका असे. तीच आदिमाया मानली जात असे. ऋग्वैदिक अदिती अशीच बहुप्रसवा होती हेही येथे लक्षात घेणे आवश्यक आहे.

पण मनुष्य जसा स्थीर झाला. शेती करू लागला. वस्त्या-वस्त्यांत विखुरला गेला तसे त्याला नवे द्न्यान झाले ते हे कि वंशसातत्यात पुरुषाचाही वाटा आहे....तसा शिव संकल्पनेचाही उद्भव झाला. तरीही स्त्रीसत्ताक आणि पुरुषसत्ताक हा सांस्क्रुतीक संघर्ष होताच. त्यामुळे दोन्ही प्रतीकांची पुजा स्वतंत्रपणेच होत होती. पुढे मात्र शिव-शक्ति हे विभक्त नसुन परस्परावलंबी आहेत या तत्वद्न्यानाप्रत मनुष्य येऊन पोहोचला आणि शिवलिंग या एकमेव प्रतीकाची निर्मिती झाली. हा आदिम धर्माचा पुढचा टप्पा होता. त्यात तत्वद्न्यानाची, पुजात्मक/यात्वात्मक कर्मकांडांची भर पडत राहीली. नाग हे पुरातन कालापासुन पुरुषलिंगाचे प्रतीक मानले गेले आहे तर वारुळ हे योनीचे. आजही नागपुजा/वारुळपुजा आस्तित्वात आहे. भुमी ही स्त्री तर पर्जन्य हे पुरुषवीर्य हे संकल्पनाही अशीच निसर्गाशी मानवी जीवनाचे तादात्म्य साधनारी होती. नांगर हा शब्दही (नांगर भूमीत घुसुन उकरुन सुफलतायुक्त बनवत असल्याने) नाग या शब्दाशी जुळलेला आहे. हे नाग प्रतीक एवढे पुरातन आहे कि आपण नगर, नागर, नागरिक हे नागदर्शक शब्द आपल्या जीवनाचे अविभाज्य भाग करुन बसलेलो आहोत याची सहसा आपल्याला जाणीवही होत नाही. कारण आपण आपल्या या धर्मनिर्मात्या आदिम पुर्वजांच्या गारुडातून आजही बाहेर आलेलो नाही.

थोडक्यात हा शिव-शक्ति प्रधान धर्म हा जगातील पुरातन धर्म होय. हा जगभरच कोठे अनुकरणातुन तर कोठे स्वतंत्रपणे विकसीत झाला. टिकुन राहीला तो फक्त भारतात. असो. याबद्दल विस्ताराने पुढे चर्चा करूयात.

वैदिक धर्माची स्थापना ईसपु २५०० च्या आसपास सरस्वती नदीच्या काठी राजा सुदासाच्या आमदनीत वशिष्ठ ऋषिच्या मार्गदर्शनाखाली अन्य ९ ऋषिकुळांनी केली. पुढे याच १० ऋषिकुळातील जवळपास ३५० ऋषिंनी ऋग्वेद रचला. हा ऋग्वेदरचनेचा कालखंड इसपु १७५० पर्यंत येतो. म्हणजे जवळपास ७००-७५० वर्षे ही रचना सुरु होती.

या धर्माची निर्मिती ज्या काळात झाली त्या कालात वैदिकजन हे स्थिर झालेले होते. ते शेती करत असले तरी पशुपालन हा त्यांचा प्रमुख व्यवसाय होता. सुतार, सुवर्णकार, कुंभार, गवंडी ई व्यवसाय करनारे लोक आस्तित्वात होतेच. युद्धकर्मात सारेच सहभाग घेत.

म्हनजेच ब्राह्मण आधी जन्माला आला आणि नंतर अन्य वर्णीय/जातीय आले असा पुरुषसुक्ताचा दावा खोटा ठरतो. खरा क्रम अगदी त्या उलट आहे हे स्पष्ट आहे. म्हणजे आधी पशुपालक मग शेतकरी, मग सुतार, मग पाथरवट, मग लोहार/ताम्रकार, मग कधी समांतर तर कधी जसे नवे मानवोपयोगी शोध लागत गेले तसे नवे व्यवसाय जन्माला आले. या काळात जोही कोणी मंत्र रचत असे त्याला ब्राह्मण म्हटले जात असे...कारण "मंत्र" या शब्दाचा ऋग्वैदिक अर्थ आहे तो म्हनजे "ब्रह्म". त्याचा वर्णाशी वा जातीशी कसलाही संबंध नव्हता. परंतु जसजसा वैदिक समाज संखेने वाढत गेला तसतसा पौरोहित्याचा व्यवसाय बनणे अपरिहार्य झाले वर त्यातुन सर्वात शेवटी ब्राह्मण या वर्णाची निर्मिती झाली. तरीही हा वर्ण जन्माधिष्ठित नव्हता हेही येथे लक्षात ठेवने आवष्यक आहे.

कोणताही मानवी समाज स्थिर तेंव्हाच होतो जेंव्हा त्याची अन्नासाठीची भतकंती थांबलेली असते. आणि हे तेंव्हाच शक्य होते जेंव्हा तो जीवनयापनासाठी स्वतंत्र शोध लावतो. पशुपालन हा त्याचा आद्य शोध असला तरी त्याने भटकंती फारशी थांबलेली नव्हती. शेतीचा शोध हा त्याला स्थिर करनारा सर्वात मोठा शोध होय. लाकडांचा उपयोग क्रुत्रीम निवारे बांधण्यासाठी होवू शकतो हा शोध ग्रामे-वस्त्या वसवण्यासाठी उपयुक्त ठरला. ते सुताराचे कार्य ठरले. आस्चर्य वाटेल पण ऋग्वेदात अन्य कोणाहीपेक्षा (ब्राह्मणापेक्षाही) सुताराला व लोहाराला अनन्यसाधारण महत्ता आहे. नौका ते रथ सुतार बनवत तर लोहार धातुकर्म ते शस्त्रे-लोहवस्तुंचे उत्पादन करत. तीच बाब कुंभार, सुवर्नकार, वीणकर व पशुपालकांना लागु होत होती. पुढे जसजसे नवे शोध लागत गेले तसतसे उद्योग व्यवसायही वाढत गेले, पण तेंव्हा मुलात एवढेच व्यवसाय विकसीत झालेले होते. ब्राह्मण श्रेष्ठ आहे असा भाव ऋग्वेदात आढळत नाही...कारण मुलात तो वर्णही नव्हता कि जातही.

पुरोहितावर्गाचा उदय हा नेहमी स्थिर समाजाच्या धार्मिक गरजांपोटी होत असतो. संस्क्रुतीचे निर्माण करणारे आपापल्या नित्य उद्योगांत जेंव्हा मग्न असतात तेंव्हा त्यांना आपल्यातुनच धार्मिक आवड/अभ्यास वा विशिष्ट धार्मिक गुण असना-यांना निवडतात व पौरोहित्याकर्माचे वातप करत असतात. कोणताही वर्ण वा जात आभाळातून एकाएकी पडलेले नसतात. आहे त्या समाजातुनच आहे त्या समाजाच्या ऐहिक/धार्मिक गरजा भागवण्यासाठी कार्य विभाजन केले गेलेले असते. ऐहिक गरजा पुर्ण करण्याचे कार्य हे निर्माणकर्तेच करत असतात. त्यांनीच जी धर्मधारा कालौघात विकसीत केलेली असते ती स्थिरत्वाच्या कालखंडात पुरोहिताहाती सोपवलेली असते.

याचाच सरळ अर्थ असा कि अन्य मुलभुत जीवनोपयोगी व्यवसाय करनारे/सेवा देणारे समाजघतक एकाच समाजातुन आधी आस्तित्वात येतात त्यानंतर पारलौकिक गरजांसाठी आवष्यक असनारा पुरोहित वर्गही त्याच समाजातुन निवडला जातो. थोडक्यात तो शेवटी येतो...आरंभी नव्हे...आणि ही दैवी निवड नसून मानवी निवड असते हे येथे लक्षात ठेवले पाहिजे.

म्हनजेच पुरुषसूक्त सांगते म्हणुन ब्राह्मण मुखापासुन आणि शुद्र पायापासून शेवटी जन्माला आला हे मान्य करण्याचे काहीएक कारण नाही. ते धादांत असत्य आहे आणि अवैद्न्यानिक आहे. आधी निर्माणकर्ते येतात मग पुरोहित हेच समाजशास्त्रीय वास्तव आहे.

4 comments:

  1. ऋग्वेद आपण म्हणता तसा इ.स.पूर्व १५०० मध्ये अस्तित्वात आला असे मला वाटत नाही. कारण ऋग्वेदातील काही वर्णने (वसंत संपात कृत्तिका नक्षत्रात) अधिक जुना काळ सुचवितात. मौखिक परंपरेने मतन केलेल्या ऋग्वेदाचे या काळात संहितीकरण झालत असावे

    ReplyDelete
  2. mruttu hech antim satya tya bhovti tayar hotat sarwa dharmanchya vyakhya ......kattali, shoshan, gulami, bhavtik sukhasathi chorya , saghatith jatiyawad ......

    ReplyDelete
  3. It's laughable that just because in india on some occasion snakes and varulul (snake dens) worshipped by little majority you are calming shaiv dharma were still continue.... It's a joke. You said nag aka snake is penis and snake den is Vegina but those who worshipped it never even think about this and you are establishing existence of shaiv dharma by this....
    Also early rigged were not written but they memorize it so it's hard to conclude 700/900 years it was continue to grow...

    To me Dharm's are tow types roughly, one which deals into a understand unanswered questions like from were this all existence come from, what happen after death ect. Another teach search how to deal with other humans or living beings so one can live peaceful life...

    ReplyDelete
  4. if we look at the customs of Hindiusm today, we all want only to fight within on what is written in our entient vedic culture. today in Kaliyuga under the pretext of 'swatantrya' we are free to do just anything.
    if so then why do we spend valuable time in discussing about what is written in vedas and puranas, just dont follow and enjoy your life, others also have also right to follow what they wish n enjoy.

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...