Saturday, September 7, 2013

गणेश यज्ञधर्मींचा... मूर्तिपूजकांचा!

MAHARASHTRA TIMES

गणेश यज्ञधर्मींचा... मूर्तिपूजकांचा!

Sep 8, 2013, 12.45AM IST  

0
kdas
संजय सोनवणी


गणपतीपूजनाचे भौतिक पुरावे आपल्याला सिंधू संस्कृतीकाळापासून मिळतात. हडप्पा येथे गणपती शीर्षाचे शिल्प मिळाले आहे. म्हणजेच भारतात गणपतीपूजन हे किमान पाच हजार वर्षं जुने आहे. अर्थात अवैदिकांचा गणपती वैदिकजनांनीही आपले धर्मसंस्कार करत स्वीकारला आणि तो जगभर पसरला. गणपती या दैवताचा विकास कालौघात कसा झाला याचा दैवतेतिहासाच्या संदर्भात घेतलेला रोचक धांडोळा...

गणपती ही मूळची वैदिकेतर देवता आहे याबाबत पाश्चात्य व भारतीय विद्वानांत जवळपास एकमत आहे व ते सिंधू संस्कृतीत गणेशाचे भौतिक अस्तित्व सापडले असल्याने यथायोग्यही आहे. काही वैदिकेतर गण (मानवसमूह) हत्ती हे आपले देवक मानत असत. टोळी नृत्य व धार्मिक कार्यक्रमांच्या प्रसंगी गजमुख असलेले मुखवटे घालण्याची चाल त्यांच्यात होती. गजमुखाची शिल्पेही देवकप्रथेतून निर्माण झाली. या गजमुखाला पुरातन काळी नरबळी दिला जात असे. पुढे ती प्रथा पशुबळीत बदलली आणि मनुष्य जसा सुसंस्कृत झाला तसे बळीप्रकरण थांबले व रक्तवर्णी शेंदुराने गणेशमुर्ती माखली जावू लागली. पूजा हा मूळचा द्राविड शब्द आहे. मूर्ती अथवा प्रतिमापूजाकांड नंतर भारतात आलेल्या वैदिक धर्मात नव्हते. 'पूजा' या शब्दाचा अर्थ आहे 'माखणे/शिंपणे.. म्हणजे मूर्तीला रक्त/तेल माखून अथवा जल शिंपूनजी केली जात होती ती 'पूजा'. हरप्पा येथील सापडलेल्या गणेशमुखाकडे बारकाईने पाहिले तर शिरोभूषणावरील शेंदुराचे अस्पष्ट अवशेष पाहता येतात. सिंधुकाळी गणेशाचे शिरोभूषण तत्कालीन प्रचलित शिरोभूषणाप्रमाणेच होते. तशी शिरोभूषणे अनेक प्रतिमांवर आढळून येतात.

गज, नाग, मूषकादि देवके असणारे भिन्न गण जसजसे सम्मिलीत होऊ लागले तसतशी ती देवकेही एकाच गणेशात सामावली गेली. म्हणजे नागबंधाच्या रूपात नाग गण, मूषकवाहनाच्या रूपात मूषक गण असे ते सम्मिलन कालौघात झाले, असे इतिहासावरून दिसते.




गणेश आणि शिव मूळचे एकच असाही विद्वानांत एक मतप्रवाह आहे. शिव जसा त्रिनेत्र व भालचंद्र आहे तसाच गणेशही आहे. शिवही गणांचा अधिपती आहे तसाच गणपतीही आहे. गणेशाला गजमुख आहे तर शिव गजचर्म नेसतो. शिवाच्या तशा असंख्य प्रतिमा कुशाणकालीन नाण्यांवर मिळतात. पुढे कालौघात गणपती ही स्वतंत्र पण शिवपुत्र असलेली देवता म्हणून जनमानसात स्थिर झाली. गणेशाच्या उत्पत्तीच्या पौराणिक भाकडकथा वगळल्या तरी त्याला अयोनिज का मानले जाते, हे यावरून लक्षात यावे.

पुरातन काळापासून वैदिक यज्ञधर्मी व अवैदिक मूर्तीपूजकांत, ज्यांना वैदिकजन 'व्रात्य' म्हणत, धार्मिक संघर्ष होता याचे अनेक पुरावे आपल्याला धर्मेतिहासातच पहायला मिळतात. गणेशाचे एक नांव 'व्रातपती' असे आहे, हे गणपत्यथर्वशीर्षातून दिसते. व्रत करत ते व्रात्य. अवैदिक लोक यज्ञविरोधक होते. ते यज्ञात व्यत्यय आणत असत. त्यामुळेच की काय, यज्ञ सुरू करण्याआधी विघ्नकर्त्या विनायकाची शांती करणारे मंत्र म्हटले जात व त्याला 'विघ्न न आणता दूर मुंजवत पर्वतावर निघून जा' अशी आवाहने केलेली आढळतात. म्हणजेच वैदिकजनांसाठी गणेश हा प्रारंभी 'विघ्नकर्ता' होता तर अवैदिकांसाठी तो 'विघ्नहर्ता' होता असे आपल्याला दिसते. वैदिक साहित्यामध्ये कार्यारंभी अथवा ग्रंथांच्या आरंभी गणेशवंदना दिसत नाही ती यामुळेच. महाभारताची सुरुवातही नारायण-सरस्वती या दैवतांना वंदन करून होते, गणेशाला नाही, हेही येथे लक्षणीय आहे. किंबहुना चारही वेदात ओंकारही येत नाही.

गुप्तकाळात मात्र सांस्कृतिक संमिश्रणाची सुरुवात झालेली दिसते. वैदिकजनांनीही गणपतीला त्याची लोकप्रियता पाहून विघ्नकर्ता नव्हे तर विघ्नहर्ता या रूपात नंतर स्वीकारले, असे महामहोपाध्याय पां. वा. काणे यांनी प्रतिपादित केले आहे. वैदिक ब्रह्मणस्पति आणि गणपती यांचे तादात्म्य साधण्याचे प्रयत्न झाले असले तरी गणेशाची मूळ अवैदिक रूपे मात्र पुसणे जमले नाही. गणपती अथर्वशीर्ष जरी अथर्ववेदाचा भाग मानण्याची प्रथा असली तरी ते वास्तव नाही. अथर्ववेदात गणपती आढळत नाही. अथर्वशीर्षातील 'गणानां त्वा गणपतिं हवामहे' हे मूळचे ऋग्वेदातील (ऋ. २.२३.१) आवाहन असून ते ब्रह्मणस्पतीला उद्देशून आहे, आपण पुजतो त्या गणपतीला नाही. परंतु शब्दसाधर्म्याचा उपयोग येथे करून वैदिक अपहरणाचा घाट घातलेला दिसतो.

तंत्रकाळात शिव-शक्तीप्रमाणेच गणेशही एक महत्त्वाची तांत्रिक देवता बनला. किंबहुना गणपतीला मिळालेली अनेक नावे ही तंत्रसंप्रदायाने दिलेली आहेत. 'शारदातिलक' ग्रंथात गणपतीच्या ४४० ध्यानमूर्ती वर्णिल्या असून त्यांची वेगवेगळी नावे आहेत. दुसरे महत्त्वाचे म्हणजे सर्वच्या सर्व अष्टविनायकाची स्थाने महाराष्ट्रात आहेत. येथूनच ही देवता संपूर्ण देशात व देशाबाहेर पसरली असावी, असा तर्क करायला वाव आहे. भारतात गणपतीची स्वयंभू तशीच लोकप्रसिद्ध स्थाने हजारोंनी आहेत. गणपती म्यानमार, सयाम, कंबोडिया, बाली, तुर्कस्थान, चीनमध्ये तर आढळतोच परंतु मेक्सिकोतही त्याचे अस्तित्व आढळते. महायान बौद्ध व हिंदू तंत्रमार्गीयांमुळे तंत्रगणपती जगभर पसरला. परंतु पुढे गणेशाची वाममार्गी पूजा बंद झाली. चीनमध्ये तर सम्राट चेन्त्सुंगने आज्ञापत्र काढून गणपतीची तांत्रिक पूजापद्धत बंद पाडली.

नवव्या शतकात (किंवा सहाव्या) आदि शंकराचार्यांनी पंचायतन पुजेत गणपतीला स्थान दिले. तेराव्या शतकात ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीची सुरुवात गणेशाला वंदन करून झाली. म्हणजे, तेथवर गणपती देशातील सर्वच मानवी समुदायांचा अधिपती बनल्याचे दिसते. अथर्वशीर्षाची रचना याच दरम्यान कधीतरी केली गेली. गणपती बसवण्याची प्रथा मात्र पेशवाईच्या आगेमागे चालू झाली असावी. महाराष्ट्रात ही प्रथा कोकणातून आली, असे विद्वत्मत आहे. तोवर गणपतीचे स्थान ग्रामदेवता ते गृहदेवता असे स्थायी स्वरूपाचे होते. यामागे गणपतीच्या मूळच्या 'विघ्नकर्ता' या आता धूसर झालेल्या वैदिक दृष्टीकोनात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अन्यथा स्थापना आणि विसर्जनाचा कार्यकारणभाव लागत नाही. म्हणजे विघ्नकर्ता म्हनूनच गणपती बसवून, त्याची पुजा करून त्याने विघ्न आणू नये म्हणून यथासांग पुजा करुन नंतर विसर्जित करण्याची प्रथा विनायकाला आवाहन करुन, विघ्ने आणू नयेत म्हणून हवि देत मुंजवत पर्वतावर निघून जा या विनवण्या आणि गणपतीचे विसर्जन यात मुळचा अस्पष्ट धागा असावा असे मानायला पुष्कळ वाव आहे.अन्य समाज गणपती बसवत नसत.

पेशव्यांच्या काळात भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून दशमीपर्यंत गणेशोत्सव साजरा केला जात असे. त्याचे स्वरूप धार्मिक असून, त्यात मुख्यत: कथा-कीर्तनादी कार्यक्रम केले जात. सवाई माधवरावांच्या वेळी हा उत्सव शनिवारवाड्यातील गणेशमहालात खूपच भव्य स्वरूपात होऊ लागला. त्याकाळी दशमीला फुलांनी सजविलेल्या पालखीतून गणेशमूर्तीची वाजत-गाजत मिरवणूक काढून तिचे नदीत विसर्जन केले जाई. पेशव्यांप्रमाणेच पटवर्धन, दीक्षित, मुजुमदार, इत्यादी सरदार घराण्यांमध्येही गणेशोत्सव साजरा केला जात असे. त्यात कीर्तन, प्रवचन, मंत्रजागर, गायन वगैरे कार्यक्रम होत. सवाई माधवरावांच्या वेळी हा उत्सव शनिवारवाड्यातील गणेशमहालात खूपच भव्य स्वरूपात होऊ लागला. त्याकाळी दशमीला फुलांनी सजविलेल्या पालखीतून गणेशमूर्तीची वाजत-गाजत मिरवणूक काढून तिचे नदीत विसर्जन केले जाई.

भाऊसाहेब रंगारी, गणपतराव घोटवडेकर व नानासाहेब खाजगीवाले यांनी पुण्यात प्रथम सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. त्याला १८९३ सालच्या हिंदू-मुस्लिम दंगलीची पार्श्वभूमी होती. अनंतचतुर्दशीच्या दिवशी सार्वजनिक मिरवणुकीतून विसर्जन करण्याची प्रथाही त्याच वर्षी सुरु झाली. लो. टिळकांना ही कल्पना आवडली व त्यांनी 'केसरी'त अग्रलेख लिहून या उपक्रमाचे कौतुक केले. त्यामुळे १८९४ मध्ये अनेक ठिकाणी सार्वजनिक गणपतीची स्थापना होवू लागली. स्वत: टिळकांनीही विंचुरकर वाड्यात सार्वजनिक गणपती बसवला. अशा रितीने सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली.

सिंधु काळात विनायक गणांचा अधिपती म्हणून पूजला जाणारा गणपती कालौघात विविध रुपे धारण करत गेला. अवैदिकांचा गणपती वैदिकजनांनीही आपले धर्मसंस्कार करत स्वीकारला. तंत्र गणेशामुळे तर तो जगभर पसरला.  सार्वजनिक उत्सवाच्या रूपाने राष्ट्रकार्यालाही प्रेरणा देणारा ठरला. आज मात्र गणेशोत्सवाने जे रूप धारण केले आहे ते मात्र वेदनाकारक आहे. आजही गणेशोत्सव समाज-संस्कृती-विचारक्रांतीचे साधन बनू शकतो...तसे अल्प-स्वल्प प्रयत्नही होत असतात...पण ते पुरेशे आहेत असे कोण म्हणेल? 

16 comments:

  1. संजय सर ,

    बाप्पा मोरया रे !

    प्रसंग सणासुदीचा असला तरी आपले एका बाबतीत कौतुक केले पाहिजे

    वैदिक अवैदिक मुद्दा मांडून आपण गुप्त काळात आणि त्या नंतर श्री गणेशा चे एक नवीन

    रूप हिंदू -सॉरी (जीभ चावतो ) भारतीय बहुजन समाजात प्रकट झाले असे म्हटले आहे


    त्यातच असा भास निर्माण केला आहे की हि अवैदिक देवता वैदिकांनी पळवून जणू तिचे पूर्ण वैदिकी करण केले !

    बुद्ध काळात पण तांत्रिक श्रद्धेच्या अंगाने असलेल्या चालीरिती हळूहळू सर्व समाजाला रुचतील अशा प्रकारे संस्कारित करण्यात आल्या -

    एकुणातच सार्वजनिक गणेशपूजना पर्यंत गाडी आली आहे - आता समजा ,



    सगळी घाई वैदिकांना बाहेर काढण्याची ! काय हे ? कसे होणार हो तुमचे ?

    एकाच तिकिटात जय संतोषी माता , अमर अकबर अन्थानी आणि माहेरची साडी असा प्रकार असतो तुमचा - थोडेसे ब्रिगेडला खुश करायचे - थोडेसे धनगराना - आणि थोडेसे शहरी तथाकथित आरक्षित विद्वानांना - आणि वर ताण म्हणजे , परत पुणेरी विद्वानांचे

    लागुलचालन चालूच !


    आपला गणपती नमाज पढताना दाखवला तर ?

    काय हरकत आहे ?

    जर वैदिक आणि अवैदिक असे एकमेकाच्या जीवावर उठलेले लोक एका देवतेचे बेमालूम मिश्रण करतात ,तांत्रिक श्रद्धा तरलतेने ब्भाक्तृपात भाजता येतात तर असे घडवायला आपण थोडेसे गणपतीला नमाज पाधायाला लावले तर काय बिघडले ?

    माझ्यामते राष्ट्रसेवा दलाला ही कल्पना फार आवडेल !

    मुगुट धारी गणेश , फेटा धारी गणपती , तसेच समजा गोल टोपी गणेश झाला तर काय बिघडले ?

    कशी कल्पना आहे ? - फार तर लगेच नवसाला पावतो असा समाज करवून देता आला तर ?

    मग काय बहारच - सर्व धर्म समभाव झालाच !

    आता उरला प्रश्न फक्त वैदिकांचा - त्याना अलगद कसे मूळ प्रवाहाच्या बाहेर काढायचे त्यात तर आपण माहीर आहातच !

    येत्या दहा दिवसात दहा लेख लिहून ते काम आपण करू शकाल -

    पुढचे ज्ञानपीठ आपलेच - किती सोपे आहे - कमालच आहे - अगदीच सोपे अध्यक्षपदा पेक्षाही सोपे - चला कामाला लागुया !

    मोरया - मोरया ! सुरवात शिवापूरच्या दर्ग्या पासून - शिवापूर - शिव शक्ती आणि गणेश !

    आपण हे लिहिलेले पोचवणार सर्व लोकांपर्यंत ???


    एक बहजन

    ReplyDelete
  2. तसे पाहिले तर , जर वैदिक लोक सुरापान आणि मांस भक्षण - अगदी गोमांस भक्षण करत असतील तर अवैदिक आणि बहुजन समाजाचे खाणे काय होते -दूध भात ?-ते मोहाची दारू पीत होते का नव्हते ?

    भ्रष्ट प्रथांचे निर्मातेच जर वैदिक असतील तर अवैदिक लोक वैदिकांच्या मुळे भ्रष्ट झाले असे आपल्याला सांगायचे आहे का ?संस्कृत हि याच वैदिकांची - भ्रष्ट लोकांची भाषा होती का ?ती व्याकरणात इतकी परफेक्ट कशी ?बहुजन जर सात्विक सज्जन होते तर त्यांना वैदिकांची वाईट संगत लागली का ?वैदिक हे अवैदिक पेक्षा सरस ठरले का - ते जेते होते का आणि का जेते होते ?त्यांच्या प्रगत शस्त्रांमुळे का शेतीच्या प्रगत तंत्रामुळे कारण त्यांचा धर्म व संस्कृती एक नव्हते ना -मग वैदिक शिरजोर कधी झाले - जर शैव तत्व आधी प्रबळ होते तर ते कमकुवत कशामुळे झाले ?याचा काहीच खुलासा आपण देत नाही आणि एकदम सर्व खापर आत्ताच्या ब्राह्मण वर्गावर फोडता !आजघडीला प्रत्येक मंडळात मूर्ती बसवताना त्यांना ब्राह्मण का लागतो ?

    बाहेर हि टोळकी मायकेल जाक्सन च्या थिरकत्या आवाजाचे भोंगे लावून बेभान नाचत असतात आणि इकडे मात्र शेंडीवाला भटजी का पाहिजे ?

    आपला मुद्दाच समजत नाही - दर वेळेस फिरून फिरून तेच विचार -

    बहुजनांचे वाग्मय काय होते ?का सगळे संस्कृत ग्रंथ हे आधी पाली आणि अर्ध मागधीत होते आणि नंतर ते संस्कृतात आले?प्रत्येक क्षेत्रात अवैदिक जर श्रेष्ठ असतील तर त्यांनी स्वतःच्या पायावर हा वैदिकांना श्रेष्ठत्व देण्याचा धोंडा का पाडून घेतला असेल ?

    हे एक न सुटणारे कोडे आहे

    आपण खुलासा कराल अशी आशा आहे

    ReplyDelete
    Replies
    1. वरील प्रश्नाची सोनवणी यांच्याकडे पण उत्तरे असतील असे वाटत नाही,
      इतिहासात अशी कोणती क्रांती झाली कि ज्यामुळे वैदिकांनी अवैदिकांवर वर्चस्व प्रस्थापित केले?

      Delete
  3. छान संजयजी आपल्या सारखे विद्वान ,निडर आणि अभ्यासू लोकच बहुजन चळवळ वैचारीक पातळीवर पोचवतात, बाकी बिग्रेडी श्वानांकडे आपण दुर्लक्ष केलेय ते चांगलेच झाले.

    ReplyDelete
  4. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या प्रारंभी गणेशवंदन केलेले आहे, हे आपल्याबरोबरच बहुतेक सर्व अभ्यासकांचे आणि सर्वसामान्य वाचकांचेही मत दिसते. मी मात्र जेंव्हा जेंव्हा ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय वाचतो किंवा कोणत्याही लेखकाचे या बद्दल मत वाचतो, तेंव्हा तेंव्हा मला याविषयी प्रश्न पडतो.
    आता मी या विषयावरील माझे मत आपल्यासमोर विचारार्थ ठेवतो.
    भगवद्गीतेमध्ये अनन्यभक्तीचा आग्रह धरलेला आहे. ‘अनन्य भक्ती’ याचा अर्थ एका ईश्वराशिवाय किंवा श्रीकृष्णाशिवाय इतर कोणत्याही देवदेवतांची भक्ती करायची नाही. ज्ञानेश्वरांनाही याची कल्पना असणे स्वाभाविक आहे.
    असे असताना ज्ञानेश्वर गणेशवंदन कसे करतील, हा माझ्यापुढील प्रश्न आहे.
    आपण प्रथम ज्ञानेश्वरीच्या पहिल्या काही ओव्या उद्धृत करूयात.-
    ‘ओम नमोजी आद्या, वेदप्रतिपाद्या
    जय जय स्वसंवेद्या, आत्मरुपा’
    या मध्ये स्पष्ट दिसते की, ज्ञानेश्वरांनी प्रथम ओंकारस्वरूप व स्वसंवेद्य असणाऱ्या आद्य पुरुषाला वंदन केलेले आहे. गणेशाला नव्हे.
    तथापि पुढे त्यांनी---
    ‘देवा तूची गणेशु, सकलार्थमतिप्रकाशु’
    असेही म्हटलेले आहे. यात गणेशाचा स्पष्ट उल्लेख आलेला आहे. असे असले तरीही ज्ञानेश्वरांनी गणेशाला प्रथमत: वंदन केलेले आहे, हे मात्र दिसत नाही. प्रथम त्यांनी त्या एकमेवाद्वितीय परमेश्वरालाच वंदन करून पुढे त्या परमेश्वरालाच म्हटले आहे की, हे देवा परमेश्वरा, तुझ्याच ठायी सर्व एकवटले आहे. लोक ज्याला गणेश म्हणतात, तोही तूच आहेस. थोडक्यात, सामान्यांच्या गणेशालाही त्यांनी त्या एकमेव ईश्वरातच पाहिले आहे. त्यांना वेगळा गणेश मानण्याची आवश्यकता पडलेली नाही.
    ज्ञानेश्वरांनी स्पष्टपणे गणेशवंदन केले नसावे याला पुरावा खुद ज्ञानेश्वरीचाच देता येईल.
    ज्ञानेश्वरीचा अध्याय १३, ओवी क्र. ८१५ ते ८२३ पहा. विविध देवदेवता यांचे पूजन करणाऱ्यांना त्यांनी ‘जाण अज्ञानाचा मूर्तु अवतार तो’ (अज्ञानाचा मूर्त अवतार) असेच म्हटले आहे. या ओव्यांमध्ये त्यांनी गणेशाचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे, तो पुढील प्रमाने.
    त्यांच्या अज्ञानाच्या अवताराला उद्देशून त्यांनी म्हटले आहे—“ चौथ मोटकी पाहे, आणि गणेशाचाची होये.”
    असे आहे तर, ज्ञानेश्वरांनी दुरान्वयाने तरी गणेशाचा प्रथम उल्लेख का केलेला आहे, हा प्रश्न आहेच. गणेशाला वंदनच कारायाचे नाही, तर त्याचा उल्लेखच का केला?
    याचेही उत्तर पुढीप्रमाणे देता येईल.—
    ज्ञानेश्वरांच्याकाळी प्रथम गणेशवंदन करणे पूर्णपणे रूढ झालेले होते. त्या काळच्या बहुतेक सर्व ग्रंथकारांनी आपल्या ग्रंथारंभी गणेशवंदन केलेले आहे.
    थोडक्यात, परंपरा व लोकमत तर गणेशवंदनाच्या बाजूने. ज्ञानेश्वर तर लिहितात भगवद्गीतेवरील भाष्य. भगवद्गीता तर अनन्य भक्तीचा आग्रह धरते.
    ज्ञानेश्वरांनी वरील परिस्थितीतून मार्ग काढला. प्रथम वंदन केले आद्यपुरुष परमेश्वराला आणि त्या परमेश्वराच्या ठायीच गणेशाला कल्पून गणेशवंदनाचाही आभास निर्माण केला.
    अशाप्रकारे ज्ञानेश्वरांनी लोकभावना व परंपरा या विषयी आदर दाखवून भगवद्गीतेच्या तत्त्वांशीही सुसंगती प्रस्थापित केली.
    ज्ञानेश्वर मुळात बंडखोर नव्हतेच. ते एक समन्वयवादी संत होते. त्यांना परंपरा सांभाळत, सांभाळत समाजाचेही प्रबोधन करायचे होते. त्यांच्या ज्ञानेश्वरीत याचा सातत्याने प्रत्यय येतो.
    “ज्ञानेश्वरीतील गणेशवंदन” हा देखील ज्ञानेश्वरांच्या समन्वयवादाचा पुरावाच मानता येईल.

    ReplyDelete
    Replies
    1. ज्ञानदेव नाथसंप्रदायातील आहेत त्यांनी नाथसंप्रदायाचे मूळ तत्वज्ञानाला धक्का न पोहोचवता चिद्विलासवाद मांडला आहे चांगदेव पासष्ठी आणि अमृतानुभव यामध्ये त्याची प्रचिती येते व हा अद्वैतापेक्षा वेगळा अद्वय आहे ज्याप्रमाणे मूळ सोनेपणा मध्ये बाधा न येऊ देता अलंकार आहे तसेच मूळ परमतत्वात ही देवतेची रुपे आहेत मात्र दृष्टी सत्तेकडे आहे जी स्वसंवेद्य आहे तोच विश्वात्मक देव आहे

      Delete
  5. ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या ।
    जय जय स्वसंवेद्या । आत्मरुपा ॥१॥

    देवा तूंचि गणेशु | सकलमति प्रकाशु |
    म्हणे निवृत्ति दासु | अवधारिजो जी ||२||

    हें शब्दब्रह्म अशेष | तेचि मूर्ति सुवेष |
    तेथ वर्णवपु निर्दोष | मिरवत असे ||३||

    स्मृति तेचि अवयव | देखा अंगिकभाव |
    तेथ लावण्याची ठेव | अर्थशोभा ||४||

    अष्टादश पुराणे | तीचि मणिभूषणे |
    पदपद्धती खेवणे | प्रमेयरत्नांची ||५||

    पदबंध नागर | तेचि रंगाथिले अंबर |
    जेथ साहित्यवाणे | सपूर उजाळाचे ||६||

    देखा काव्यनाटका | जे निर्धारिता सकौतुका |
    त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका | अर्थध्वनी || ७||

    नाना प्रमेयांचि परी | निपुणपणे पाहता कुसरी |
    दिसती उचित पदे माझारी | रत्नें भली || ८||

    तेथ व्यासादिकांच्या मति | तेचि मेखळा मिरवती |
    चोखाळपणे झळकती | पल्लवसडका || ९||

    देखा षड्दर्शने म्हणिपती | तेचि भुजांची आकृती ||
    म्हणऊनि विसंवादे धरिती | आयुधे हाती || १०||

    तरी तर्क तोचि परशु | नीतिभेदु अंकुशु |
    वेदांतु तो महारसु | मोदकाचा || ११ ||

    एके हाति दंतु | जो स्वभावता खंडितु |
    तो बौद्धमत संकेतु | वार्तिकांचा || १२ ||

    मग सहजे सत्कारवादु | तो पद्मकरु वरदु |
    धर्मप्रतिष्ठा तो सिद्धु | अभयहस्तु || १३ ||

    देखा विवेकमंतु सुविमळु | तोचि शुंडादंडु सरळु |
    जेथ परमानंदु केवळु | महासुखाचा || १४ ||

    तरी संवादु तोचि दशनु | जो समताशुभ्रवर्णु |
    देवो उन्मेषसुक्ष्मेक्षणु | विघ्नराजु || १५ ||

    मज अवगमलिया दोनी | मीमांसा श्रवणस्थानी |
    बोधमदामृत मुनी | अलि सेविती || १६ ||

    प्रमेयप्रवाल सुप्रभ | द्वैताद्वैत तेचि निकुंभ |
    सरिसे एकवटत | इभ मस्तकावरी || १७ ||

    उपरि दशोपनिषदे | जिये उदारे ज्ञानमकरंदे |
    तिये कुसुमे मुगुटी सुगंधे | शोभती भली || १८ ||

    अकार चरणयुगुल | उकार उदर विशाल |
    मकार महामंडल | मस्तकाकारे || १९ ||

    हे तिन्ही एकवटले | तेथ शब्दब्रह्म कवळले |
    ते मियां गुरूकृपा नमिले | आदिबीज || २० ||

    ReplyDelete
  6. पहिल्या २० ओव्या गणेश पूजनाच्या आहेत आणि नंतर शारदा पूजन आहे


    आता अभिनव वाग्विलासिनी

    जे चातुर्यार्थ कलाकामिनी

    ते शारदा विश्वमोहिनी

    नमिली मियां - २१


    या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी

    जेथ भवानी प्रश्नु करी

    चमत्कारोनी - ७०


    अशाप्रकारे जरी अगदी प्रथम चरणात स्पष्ट उल्लेख नसला तरी माउलीनी गणेश वंदनानेच प्रथेप्रमाणे ग्रंथाची सुरवात केली आहे असे सांगावेसे वाटते

    कारण पहिल्या ८४ ओव्या या मुल मांडणीची बैठक म्हणून आहेत असे म्हणता येईल

    त्यानंतर

    तरी पुत्रस्नेहे मोहितु - धृतराष्ट्र असे पुसतु

    म्हणे संजया सांगे मातु - कुरुक्षेत्रेची -

    अशी बांधणी करत विषय सुरु केला आहे


    ज्ञानेश्वरी ही संत ज्ञानेश्वरांची अंगावर रोमांच उभी करणारी रचना आहे -

    म्हणूनच आपण सार्थपणे त्यांना माउली म्हणतो - नाही का ?

    ReplyDelete
    Replies
    1. Sarode Madam,
      भगवद्गीतेतील अनन्य भक्ती आणि ज्ञानेश्वरीच्या अध्याय १३ मधील देवदेवतांच्या पुजनासंबंधी असलेल्या उल्लेखांसंबंधी आपले मार्गदर्शन मिळू शकेल काय?
      भगवद्गीतेतील ‘अनन्यभक्ती’ चा सिद्धांत वैशिष्टयपूर्ण आहे. सदर सिद्धांत प्रस्थापितांच्या हिताचा आहे, असे वाटत नाही. सदर सिद्धांताच्या प्रकाशात अनेक देवताभक्ती आणि तद्जनित व्रतवैकल्ये हे निरर्थक ठरतात.
      त्यामुळेच अनन्यभक्तीचा सिद्धांत काही अपवाद वगळता कोणीही Highlight केलेला नाही किंवा त्याचा कटाक्षाने आग्रह धरलेला नाही.

      Delete
  7. या गीतार्थाची थोरी

    स्वये शंभू विवरी

    जेथ भवानी प्रश्नु करी

    चमत्कारोनी

    असा जो उल्लेख आहे तो पण थोडासा गूढ वाटतो

    कारण

    श्रीकृष्ण हा विष्णूचा अवतार मानला गेला आहे आणि त्यातच भगवान श्रीशंकर गीतार्थाची थोरवी स्वतः वर्णन करत आहेत असा श्री ज्ञानेश्वरांचा दावा आहे आणि त्यात परत भवानी मातेचा उल्लेख काय दर्शवतो हे पण विचार करण्या सारखे आहे

    ज्ञानेश्वर हे नाथ संप्रदायातील शेवटचे नाथ मानले जातात आणि त्यांनी हरी हर यांची सांगड घालायचा हा प्रयत्न केला असावा का ?

    संजय सर यांचा या विषयावरचा अभ्यास दांडगा आहे पण ते सध्या निवडणुकीच्या गडबडीत आहेत हे पण ओळखून आपण त्यांच्या बहुमुल्य मार्ग दर्शनाची - मत प्रदर्शनाची वाट बघुया !



    अनुजा देवभक्त

    ReplyDelete
  8. आपण मांडलेला शैव आणि वैष्णव यांच्या एकीकरण प्रक्रियेचा मुद्दा पटतो

    संत ज्ञानेश्वर आणि त्यापूर्वी २५० वर्षे आद्य शंकराचार्य आणि माउलींचे समकालीन श्री चांगदेव आणि नामदेव अशी दोन टोके -नंतरचे सुफी विचारांचे अतिक्रमण -नाथ संप्रदाय -


    श्री ज्ञानेश्वर आणि श्री चांगदेव यांच्या भेटीतील अनावश्यक गूढता आणि अनावश्यक जळमटे दूर करून आपण इतिहासात डोकावले पाहिजे

    त्या कालाचा सूक्ष्म विचार केला तर असे वाटते -

    एकीकडे नवनाथ संप्रदायाने निर्माण केलेली धार्मिक उत्तेजना ,

    आदी शंकराचार्यांनी निर्माण केलेली खंडन मंडन पद्धतीची परंपरा ,

    आणि नवीन सुफी भक्तीच्या मुसलमानी लाटेला आपल्या नामदेवांदी संतानी दिलेले भक्ती मार्गाचे रसाळ उत्तर ,

    आणि कर्मकांडाच्या विळख्यातून समाजाला सोडवून त्याना साध्या सोप्या व्याख्येचा धर्म सांगण्याची भक्तिमार्गाची मोहीम यामुळे एक क्रांतिपर्व सुरु झालेले दिसते

    नुकताच बौद्ध आणि जैन मतांचा झालेला पाडाव , आणि आदी शंकराचार्यांनी केलेली

    शांकर भाष्याची सडेतोड मांडणी - असा हा फार थोर वारसा लाभलेला अखंड कालखंड आहे सुमारे २-४ शतकांचा - त्याने आपल्या धर्मावर फार खोलवर परिणाम केलेला दिसतो - त्याचा सर्व समावेशक अभ्यास झाला पाहिजे - एकीकडे राजकीय आक्रमणे आणि दुसरीकडे सामाजिक चळवळीचे रूपक असलेली संतांची भक्तिमार्गाची चळवळ असा हा दैदिप्यमान कालखंड आहे

    संजय सर यावर लवकरच भाष्य करतील अशी आशा करुया !

    ReplyDelete
  9. Sanjay Sir,

    I have read many of yours articles. All are looking full of knowledge & deep study. I have some queries about your thoughts / study.
    1 Why you are targeting only Brahmin society & Vedic culture. Is there no role of these in our culture?
    2 What about ayurveda, Ashtang yog,vaidic ganit etc. many vedic literature proved that they are full of deep knowledge about spirituality as well as science. For ex. Marutsakha is one of the vedic literature from where advance aircraft technology has come up. It is proved. What about this?
    3 Also what happened that Avaidic accepted vedic culture by various means in hinduism ? how they mixed up later?
    4 What’s wrong is worshiping sun (sandhya & gayatri mantra),agni ,varun it’s a worship of five elements in short worship & respect towards nature, which is more practical & scientific. It is now proved that sacrificed fire is good for atmosphere & health (Agnihotra).
    5 You are only talking about Rigveda , what about yajurveda, samveda & atharvaveda ?

    I am fully agree with you about evidences of eternal shaiva culture, asur culture, but it looks like vedics were only bad peoples & all shaiva & others were good ones. This is non-justice.

    Please reply & guide us

    Thanks

    ReplyDelete
  10. मानवी अहंकाराच्या पलिकडे एकच समरस सत्ता आहे
    मात्र एकाचा अहंकार दुसऱ्याच्या अहंकाराला आव्हान देत असतो परमतत्त्वाच्या या समतेत ज्यावेळी एखादा स्वतःचे श्रेष्ठत्वाचा डंका वाजवतो त्यावेळी तीच सत्ता तो भ्रम तोडण्याकारिता तशाच विरोधी शक्तीची निर्मिती करते ,त्यामुळे हे सगळे नैसर्गिक आहे
    सत्यमेव जयते !

    ReplyDelete
  11. खूप छान ,सविस्तर अधिक मत मांडायचे आहेत फक्त अभिनिवेशि मंडळी आपली समन्वयी समावेशकता समजत नाहीत कारण मनुवादी वैदिकी नेनिव्

    ReplyDelete
  12. खूप छान ,सविस्तर अधिक मत मांडायचे आहेत फक्त अभिनिवेशि मंडळी आपली समन्वयी समावेशकता समजत नाहीत कारण मनुवादी वैदिकी नेनिव्

    ReplyDelete
  13. सार्वजनिक गणेशोत्सव आणि आरतीच्या मागील इतिहास
    सुखकर्ता दुःखहर्ता......ही गणपतीची आरती संपूर्ण महाराष्ट्रात म्हंटली जाते.हि आरती समर्थ रामदास स्वामी यांनी रचली आहे.गणपतीची संकष्टी चतुर्थी करणारा गणेशभक्त प्रत्येक घराघरांत असणारच. देवादिकांसह संतांनी देखील सर्व कार्यात गणपती प्रथम पूजला आहे.भाद्रपद शु. ४ ते भाद्रपद शु.१४ हा गणेशोत्सवाचा कालावधी आहे.प्रचलीत गणेशोत्सवाच्या पूर्वी श्री समर्थ रामदास स्वामींनी हा उत्सव सुरू केल्याची नोंद इतिहासात आहे.

    समर्थे सुंदरमठी गणपती केला !
    दोनी पुरुष सिंदूर वर्ण अर्चिला !!
    सकळ प्रांन्तासी मोहछाव दावीला !
    भाद्रपद माघ पर्यंत !!
    समर्थ रामदास स्वामी हे दासबोधाचे लिखाण करण्याकरिता शिवथरच्या घळीत आले.दहा वर्षाचे शिवथर घळीचे वास्तव्य पूर्ण झाले तेव्हा १६५८ साली समर्थ नाशिकला कुंभमेळ्याला जाण्याकरिता शिवथरच्या घळीतून बाहेर पडले. त्यावेळी आनंद संवत्सर सुरू होते. घळीत असताना त्या॑नी महाराष्ट्रावर  अफजलखान नावाचे एक विघ्न चालुन येत आहे हि बातमी ऐकली. महाराष्ट्रभर  संचार करणाऱ्या समर्थांच्या शिष्यांनी हि वार्ता त्यांच्या कानावर टाकली.त्यावेळी अष्टविनायकांतला पहिला गणपती ज्याचे नाव वक्रतुंड आहे. त्याची स्तुति करून हि प्रार्थना केली.तीच हि गणपतीची सुप्रसिद्ध असणारी आरती.
    या आरतीच्या पहिल्या चरणात अफजलखानाच्या स्वारीचा उल्लेख आपणांस स्पष्ट आढळतो.
    वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची !
    हा सुंदरमठ शिवकालीन शिवथर प्रांतात आहे.याचा उल्लेख छ्त्रपती शिवाजी महराजांच्या अस्सल मोडी पत्रात आढळतो.त्याच प्रमाणे श्री समर्थ सेवक कल्याण स्वामी यांच्या पत्रात तसेच श्री समर्थ रामदास स्वामी आणि शिवराय यांच्या मध्ये असणारा दुवा समर्थ शिष्य महाबळेश्वरकर भट यांच्या ही पत्रात आढळतो.तोच हा सुंदरमठ ज्याचे हल्लीचे प्रचलित नाव रामदास पठार असे आहे. शिवकालीन सुंदरमठाशी असणारी सर्व ऐतिहासिक कागद पत्रांचे पुरावे हया स्थानाशी तंतोतंत जुळून येतात. इथेच सन १६७५ साली छ. शिवाजी राजे आणि समर्थ रामदास स्वामी दोघांनी मिळून हा गणेशोत्सव भाद्रपद शु. !!४ ते माघ शु.!! ५ गणेश जयंती पर्यंत पाच महीने साजरा केला. हा गणपती कोणत्याही मंडळाचा राजा नाही तर हा हिंदवी स्वराज्य संस्थापक छ. शिवाजी राजांचा गणपती आहे.
    या गणेशोत्सवाचे पहिले वर्गणीदार राजे शिवछत्रपती आहेत. ज्यांनी त्या साली १२१ खंडी धान्य हया उत्सवाला देणगी दिली . त्याचा उल्लेख इतिहासात खाली दिलेल्या लेखात सापडतो .
    समर्थे शिवराजासी आकारामुष्ठी भिक्षा मागो धाडिली ! शिवराज म्हणे समर्थे माझी परीक्षा मांडली !!
    आकारा आकरी खंडी कोठी पाठविली !
    हनुमान स्वामी मुष्ठी लक्षुनिया!!
    ११ x ११ म्हणजे १२१ एवढे खंडी धान्य राजांनी या उत्सवाला दान दिले. या पाच महीने सुरू असणाऱ्या उत्सवाला भेट देऊन गणपतीचे दर्शन विजयादशमीच्या दिवशी घेतले असे आनंदवनभुवन या समर्थ रचित काव्यात उल्लेखले आहे. हा गणेशोत्सव श्री समर्थ रामदास स्वामींच्या साक्षात्काराचा अनुभव आहे. श्री गणपतीच्या आरतीच्या शेवटच्या चरणात रामदास स्वामींनी गणपतीला अफजलखानाच्या या स्वराज्यावर आलेल्या संकटांपासून शिवाजी राजांना सहीसलामत सोडवावे अशी प्रार्थना केलीली आहे.पहा.....
    दास रामाचा वाट पाहे सदना !
    संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सूरवरवंदना !!
    शिवाजी राजांनी या गणेशोत्सवाला सुंदरमठावर जेव्हा भेट दिली त्यावेळी रामदास स्वामी यांनी १८ वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र महराजांना प्रसाद भेट दिली आणि महाराजांनी एक पांढरा घोडा समर्थांना दिला.गणपतीची आरती १६५८ ला समर्थांनी प्रार्थनापूर्वक लिहिल्यानंतर समर्थ शिवाजी राजांना राज्याभिषेक होई पर्यंत सन १६७४ पर्यंत थांबले, नंतर १६७५ ला गणेशोत्सव केला आणि १६ सप्टेंबर १६७६ ला सज्जनगडावर वास्तव्यकरिता गेले. हाच महाराष्ट्रातील पहिला गणेशोत्सव जो स्वराज्य निर्माण झाल्यानंतर छ. शिवाजी राजे आणि समर्थ रामदास स्वामी यांनी सुरू केला.
    आज महाराष्ट्रात प्राचीन सार्वजनिक गणेशोत्सवाचे जे पुरावे सापडतात ते हया उत्सवानंतरचे आहेत. हा उत्सव सुंदरमठ रामदास पठारावर पुन्हा नव्याने पाच दिवसाचा सुरू झाला असून या उत्सवातून प्रेरणा घेऊन श्री क्षेत्र शेंदूरमळई हे गुरुकुल येथेही हा उत्सव सुरू झाला आहे. आपण आपल्या सार्वजनिक गणेशोत्सवात ही माहिती जरूर पुरवावी.वरील संशोधन सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी केले असून हया माहितीचे सर्व अधिकार राखीव आहेत. या माहितीचा संबंध कोणत्याही जात, धर्म ,पंथ ,सांप्रदाय ,पक्ष ,संघटना यांच्याशी नाही.
    रामदास पठार - सुंदरमठावर येण्याकरीता महाड-पुणे रस्त्यावर वरंधाघाटात माझेरी जवळ कमानी खालून डाव्या हाताने सरळ पुढे कि.मी. मठाच्या माळावर शेवट पर्यंत डांबरी रस्त्याने यावे.निवास, भोजन व्यवस्था पूर्व सूचना दिल्यास विनामूल्य होऊ शकते.

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...