Friday, October 17, 2014

यक्षरात्रीच्या सर्वांना मन:पुर्वक शुभेच्छा!

Image result for deepavali yaksha celebration

दीपावली हा सण मुळचा कृषिवल/पशुपालक संस्कृतीचा "यक्षरात्री" उत्सव आहे. कुबेर हा शिवाचा खजीनदार मानला जातो. बुद्धपुर्व काळापासून भारतात देशभर "यक्ष" संस्कृतीचा मोठा प्रभाव होता हे आपल्याला सर्व धर्मीय म्हणजे जैन, बौद्ध, हिंदू लेणी-मंदिरांतील यक्ष प्रतिमांवरुन व यक्षाच्या नांवाने असलेली गांवे/जमीनी/तलाव यावरून लक्षात येते. दीपावलीचे मुळचे नांवही यक्षरात्रीच होते हे हेमचंद्राने तर नोंदवलेच आहे, वात्स्यायनाच्या कामसूत्रातही नोंदलेले आहे.

यक्ष या शब्दाचा अर्थ प्रकाशमान असाही आहे. महाभारतात यक्ष हे ज्वाला अथवा सुर्यासारखे तेजस्वी असतात असे म्हटले आहे. या श्रद्धेतुनच दिपोत्सव यक्षांसाठी सुरु झाला व त्यांनाच यक्षरात्री असे म्हटले जावू लागले असे जी. बी कानुगा म्हणतात. (Immortal love of Rama, तळटीप. पृष्ठ-२७-२८) धनसंपत्ती देणारे, रक्षक असलेल्या यक्षांना दिपोत्सव करुन कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा उत्सव. 

असूर संस्कृती भारतात मुख्य असली तरी प्रत्येक संस्कृतीच्या प्रभावक्षेत्रात उपसंस्कृत्याही सहास्तित्वात असतात. यक्ष संस्कृतीचा उदय हा गंगेच्या घन अरण्याच्या क्षेत्रात झाल्याचे मानले जाते. गुढत्व, भय, अद्भुतता या मिश्र भावनांतून यक्षकल्पना अरण्यमय प्रदेशांत जन्माला आली असावी. आज यक्ष हा जल, अन्न-धान्य-पशु व संपत्तीचा संरक्षक मानला गेला आहे. अगदी पुरातन काळी यक्ष हे वृक्ष व अरण्याचे रक्षक मानले जात. पुढे कृषी संस्कृतीच्या उदयानंतर ते ग्रामरक्षक या स्वरुपातही विराजमान झाले.  यक्ष पुजा ही इतकी पुरातन आहे कि यक्ष म्हणजेच पुजा असे दक्षीणेत आजही मानले जाते. यक्षपुजा ही आजही शैवजन करत असतात...पण सांस्कृतिक लाटांत विस्मरणामुळे ते यक्ष आहेत हेच माहीत नसते. उदाहरणार्थ वीर मारुती, वीरभद्र, खंडोबा, भैरवनाथ इ. दैवता या यक्षश्रेणीतीलच आहेत. ते संरक्षक आहेत ही जनमानसाची श्रद्धा आहे...आणि म्हणुनच त्यांचे स्थान हे शक्यतो शिवेबाहेर असते...कारण ते ग्रामरक्षक असतात ही श्रद्धा. त्यांना शिवाचेच अवतार अथवा अंश मानले जाते.

उपनिषदांची रचना करणारे हे यक्ष संस्कृतीचेच प्रतिनिधी होते असे ठामपणे म्हणायला पुष्कळ वाव आहे. यक्ष हा शब्द अद्भूत, विश्वनिर्मितीचे गुढ कारण या अर्थाने उपनिषदांत वापरला जात होता. ब्रम्ह हाही एक यक्षच. (ऋग्वेदात ब्रम्ह ही देवता नसून त्याती ब्रम्हचा अर्थ मंत्र असा आहे.) पण मुळची उपनिषदे ही वैदिक नसून आगमिक असूर/यक्ष संस्कृतीच्या लोकांनी परिणत तत्वज्ञानाच्या आधारे वैदिक संस्कृतीला केलेला प्रतिवाद आहे हे लक्षात घ्यायला हवे.

गौतम बुद्धाच्या शाक्यकुलाचा कुलदेव शाक्यवर्धन नांवाचा यक्षच होताच तर खुद्द बुद्धालाही यक्ष म्हटले गेलेले आहे. जैन धर्मातही यक्ष-यक्षिणी तीर्थकरांचे सेवक मानले गेले आहेत. मातृपुजा अथवा सुफलनविधी यक्षिणींनाही केंद्रस्थानी ठेवून होत असावेत कारण त्या शिल्पांत नेहमीच नग्न दाखवलेल्या असून त्यांचे नितंब व स्तन प्रमाणापेक्षा मोठे दाखवले जातात. सर्वात जुनी यक्षमुर्ती ही सनपूर्व चवथ्या शतकातील असून ती परखम येथे मिळाली. आता ती मथुरा संग्रहालयात ठेवलेली आहे. पुढे महायान संप्रदायातही यक्षपुजा सुरु राहिली. यक्ष मुर्ती देशात सर्वत्र आढळल्या असून यक्षगानाच्या स्वरुपात दक्षीणेत कलादृष्ट्याही यक्षमाहात्म्य जपले गेलेले आहे.

एवढी व्यापक देशव्यापी असलेली यक्षपुजा पुराणांनी केलेल्या वैदिक कलमांत हळू हळू विस्मरणात गेली. कुबेर व रावणाचे बाप बदलले गेले. पुराणांनी यक्षांना अतिमानवी, माणसांना मारून खाणारे, जलाशयांजवळ निवास करणारे कुरूप-भिषण, लोकांना झपाटणारे वगैरे असे चित्रित केले. तरीही यक्ष ही संरक्षक देवता आहे व तिचा निवास जल-वृक्ष यात असते ही लोकस्मृती लोप पावली नाही. महाकवी कालिदासाने मेघदुतात यक्षालाच आपले दूत बनवले. यक्षपुजा आजही आपण करीत असतो पण त्यातील अनेक देवता मुळस्वरुपातील यक्षच आहेत याचे भान मात्र हरपलेले आहे. दिपावलीही खरे तर यक्षरात्रीच असली तरी तेही आपले भान सुटले आहे.

कुबेर हा शिवाचाच प्रतिनीधी...यक्षांचा अधिपती...धनसंपत्तीचा रखवाला...खजीनदार. एक कृषि-हंगाम जावुन दुसरा येण्याच्या मद्धे जो अवकाश मिळतो...त्या काळात या कुबेराचे अभिवादन करत समस्त कृषिवल असूर संस्कृतीचा जो महानायक बळी त्याच्या स्मरणाने नवीन वर्ष सुरु करण्याची ही पद्धत. त्यालाच आपण बळी प्रतिपदा म्हणतो...नववर्षाची सुरुवातच सर्वश्रेष्ठ, शैव संस्कृतीचा आजही जनमानसावर राज्य करीत असलेल्या महात्मा बळीच्या नांवाने सुरु होणे स्वाभाविकच आहे.

या दिवशी विष्णुचा अवतार वामनाने बळीस पाताळात गाडले अशी एक भाकड पुराणकथा आपल्या मनावर आजकाल बिंबलेली आहे. खरे तर ही दंतकथा कशी जन्माला आली हे आपण पाहुयात. मुळात ही कथा ऋग्वेदात अत्यंत वेगळ्या प्रतीकरुपात येते. विष्णु तीन पावलात विश्व व्यापतो अशी ही मुळची कथा. तिचा बळीशी काही संबंध नाही. परंतू गुप्तकाळात दिपावलीचेही सांस्कृतीक अपहरण करण्याच्या प्रयत्नांत वामन अवतार घुसवत त्याने बळीला पाताळात गाडल्याची कथा बनवली गेली. मुळात ते सत्य नाही. बळी वेदपुर्व काळातला. अवतर संकल्पना आली तीच मुळात गुप्तकाळात. त्यामुळे ही एक "वैदिक" भाकडकथा आहे हे सहज लक्षात येईल असे तिचे एकुणातील स्वरुप आहे. अर्थात ही कथा निर्माण केली म्हणून बळीराजाचे महत्व कमी झालेले नाही. झाले असते तर ती "वामनप्रतिपदा" झाली असती...बळीप्रतिपदा नव्हे. पण तसे झाले नाही...थोडक्यात हिंदुंनी आपल्या सांस्कृतीक श्रद्धा जपल्या, पण वैदिक धर्मियांनी बनवलेल्या कथाही सातत्यपुर्ण प्रचारामुळे कालौघात डोक्यात घुसवुन घेतल्या. बळीला पाताळात गाडुन वैदिक टेंभा मिरवणा-या वामनसमर्थकांच्या हे लक्षात येत नाही कि नववर्षारंभ बळीच्या नावाने का? कारण ते बळीमाहात्म्य संपवुच शकत नव्हते...एवढेच...म्हणुन भारतात या वामन-अवताराची पुजा कोणी करत नाही...त्याचे भारतात बहुदा एकच मंदिर आहे. पण बळीचे तसे नाही...तो आजही कृषिवल संस्क्रुतीचा श्वास आणि ध्यास आहे. बळीप्रतिपदेला आपण बळीचीच पूजा करतो...वामनाची नाही.

अश्वीन अमावस्येला आपण आज जे लक्ष्मीपुजन करतो त्याचाही असाच सांस्कृतीक अनर्थ झालेला आहे. मुळात ही यक्षरात्री असल्याने या रात्री लक्ष्मीपुजन नव्हे तर कुबेरपूजन करण्याची पुरातन रीत. कुबेर हा शिवाचा खजीनदार. धनसंपत्तीचा स्वामी. दीपप्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करुन पुजणे हा मुळचा सांस्कृतीक कार्यक्रम. परंतू गुप्तकाळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाल्याने आधी कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही पुजा होऊ लागली. नंतर कालौघात मात्र कुबेराला गायबच करण्यात आले.

खरे तर विष्णू आणि लक्ष्मी हा संबंध जोडण्यात आला तोही उत्तरकाळात. गुप्तकाळात. ऋग्वेदात विष्णुला मुळात पत्नीच नाही. श्रीसूक्त हे प्रक्षिप्त असून ते उत्तरकाळात जोडले गेले आहे (गणपती अथर्वशिर्षाप्रमाणे) पण यातही विष्णु व लक्ष्मी यांचा पती-पत्नी संबंध, विष्णुचे शेषशायी समुद्रतळीचे ध्यान वगैरे वर्णित नाही. तो उपेंद्र आहे यापलीकडे त्याला महत्व नाही. त्याचे महत्व वाढवले गेले ते गुप्तकाळात. गुप्तांनी वैदिक धर्माला राजाश्रय दिला त्यामुळे गुप्तकाळ सुवर्णकाळ मानायची प्रथा पडली. पण सांस्कृतिक गोंधळाचा काळ म्हणजे गुप्तकाळ हे लक्षात घ्यायला हवे.

हा उत्सव मुळचा अवैदिक (आगमिक व म्हणजेच हिंदुंचा, वैदिकांचा नव्हे) असल्याचे अनेक पुरावे जनस्मृतींनी आजही संस्कृतीत जपलेले आहे. मुळच्या यक्षरात्रीचे अनेक अवशेष आजही जनस्मृतीतून गेले नाहीत असे जी. एन. कानुगा (तत्रैव) म्हणतात. बंगालमद्ध्ये लक्ष्मीऐवजी कालीची पुजा करंण्यात येते. अनेक समाज यक्षरात्रीला गोवर्धन पर्वताची कृष्णासहित पूजा करतात. कृष्ण हा मुळचा इंद्रविरोधी (म्हणजेच वैदिक विरोधी) ही जनस्मृती आजही कायम आहे. काही लोक आजही लक्ष्मीबरोबरच कुबेराचीही पुजा करतात. म्हणजेच मुळचे अवशेष वैदिकांना समूळ पुसटता आलेले नाहीत.

वसुबारस, धनतेरस (धनतेरस हा शब्द "धान्यतेरस" असा वाचावा...कारण धन हा शब्द धान्य शब्दाचा पर्यायवाची आहे.) हे सण कृषिवल शैव संस्कृतीचीच निर्मिती आहे. कृषीसंस्कृतीत गाय-बैलाचे स्थान केंद्रवर्ती होते व आजही बव्हंशी आहे. वैदिकांनी त्यावर अतिक्रमण करुन त्यांना वैदिक रुप बहाल करण्याचा प्रयत्न केला आहे एवढेच. कारण या सणाचा राम वनवासातून परत आला या भाकडकथेशीही काहीएक संबंध नाही.

नरकासूराच्या दुष्टपणाच्या व सोळा हजार राजकन्यांना बंदिवासात ठेवण्याच्या कथेत तथ्यांश असता तर नरकासुराच्या नांवाने एक दिवस लोकांनी अर्पण केला नसता. मुळ रुपाला धक्का न लावता त्याचा बनावट कथा प्रसवत त्याचा अर्थच बदलून टाकायची वैदिकांची कला मात्र अचाट आहे. देव-असूर सांस्कृतीक (कथात्मक) संघर्षात असूर महामानवांना बदनाम करण्यासाठी अशा भाकडकथा रचण्यात आल्या हे उघड आहे. भारतात सोळा हजार राजकन्या कैदेत ठेवायच्या तर तेवढे उपवर मुली असणारे राजे तरी हवेत कि नकोत? या कथेने नरकासुराला तर बदनाम केलेच पण कृष्णालाही बदनाम केले गेले. कांचा इलय्या नामक बहुजन विचारवंत (?) कृष्णाला "रंडीबाज" म्हणतो ते या कथेच्या आधारावर. मुळात ही कथा का निर्माण झाली हे समजावून घ्यायला हवे. कृष्ण वैदिक नव्हता, असुही शकत नव्हता कारण त्याचा काळ वेदपुर्व असल्याचे संकेत खुद्द महाभारतात मिळतात. हे वास्तव समजावून घेतले कि अशा भाकडकथांचा उलगडा होतो. जनसामान्यांत नरकासूर अप्रिय नव्हता हे त्याच्या नांवाचाच सण आहे हे वास्तव लक्षात घेतले कि सांस्कृतीक पेच पडत नाहीत.

थोडक्यात मित्रांनो, हा यक्षरात्री उत्सव आहे...त्यांच्या स्वागतासाठीचा, वैभवप्राप्तीच्या प्रार्थनांचा दीपोत्सव आहे. मी तरी लक्ष्मीपूजन न करता कुबेरपुजनच करत असतो. कारण तोच खरा सांस्कृतीक मुलाधार आहे. असूर संस्कृती व त्याचीच उपसंस्कृती म्हणजे यक्ष संस्कृती हे लक्षात घेतले पाहिजे. वैदिक सांस्कृतीक आक्रमणाला थारा देण्यात अर्थ नाही. खरे तर बळीप्रतिपदेस महात्मा बळीची भव्य मिरवणुक काढावी... (आजकाल ती प्रथा अनेकांनी सुरू केली आहे, त्यांचे अभिनंदन!) तेच खरे आपल्या एका महान पुर्वजाला अभिवादन!

यक्षरात्रीच्या सर्वांना मन:पुर्वक शुभेच्छा!

5 comments:

 1. चांगली माहीती मिळाली. कुबेरासोबत लक्ष्मी आणि त्याची पत्नी हरिती यांना सुद्धा पुजत असल्याचे कुशाणकालीन पुरावे उत्खननात मिळाले असल्याचे वाचनात आहे. त्याबद्दलही माहीती द्यावी.

  ReplyDelete
 2. आप्पा - संजयाने विचार मांडले आहेत !
  बाप्पा - जरा गप्प बस रे - आधी सर्वाना दीपावलीच्या शुभेच्छा !
  आप्पा - ते हार्दिक राहिले बर का ! हार्दिक शुभेच्छा !
  बाप्पा - दिवाळी हि गम्मत जम्मत करायची म्हणून आपण साजरी करतो - म्हणुनतर लहान थोराना सर्वाना आवडते - कोणताही सोस नसतो की अवडंबर नसते ! पैसा तर सर्वांनाच प्यारा - त्याची पूजा म्हणजे मस्तच !धर्म जात कुठलीही असो ! कौटुंबिक एकत्र येउन कोणताही अवघड धार्मिक पूजाअर्चा असा कार्यक्रम नसलेला हा एकमेव सण आहे !

  आप्पा - आपल्या संजयला तो सांगतो तशी निरीश्वर वादाशी मिळती जुळती विचारांची मांडणी आवडते असे तो सांगत असतो - ते अंतिम सत्य आहे तरीही तो शैव वैष्णव वाद का घालतो ?त्या ऐवजी हळू हळू निरीश्वर वादाला अनुरूप विचार तो का मांडत नाही ?

  बाप्पा - दिवाळी म्हणजे कौटुंबिक आनंद - लहान सानुले पोट्टे आणि म्हातारे - सर्वच दिवाळीची वाट बघत असतात - व्यापारी वर्षभराचा आढावा घेतात - दिवाळसण असतो - भाऊबीज असते -पाडव्याला पतीदेवाकडून काय ? अशी सर्व नात्यांना ओढ लावणारी दिवाळी !
  आप्पा - आता इतिहासाला कशाला परत परत यात ओढायचे? कोण कधी आणि किती चुकले आहे हे कितीवेळा उगाळायचे ?
  बाप्पा - हा सामाजिक सण आहे ! इतकेच ! त्यात धार्मिकता अगदी नगण्य आहे - सुगीच्या दिवसांचे हे साजरे करणे आहे - इथे उगीचच वैदिक अवैदिक आणि शैव कशाला आणायचे ?
  कारण
  आप्पा - असे पहायला गेले तर - प्रत्येक पावलावर आपल्याला हा दोष (? ) दिसणारच !
  बाप्पा - असे म्हणावेसे वाटते की शैव जर इतके प्राचीन आहेत तर त्यांनी का आपले वेगळे अस्तित्व जपले नाही हा पण प्रश्न आहेच - पराभूत माणूस गप्प बसतो - सांस्कृतिक आक्रमण सहन करतो - असे तर नसेल ना ? आज आपण खरोखर लोकसभे सारखे मतदान घेतले तर ? कारण हा वाद खरोखर इतका गंभीर आहे का ? हे समाजालाच ठरवू द्या !आलेला क्षण सुंदरपणे जगायचा सोडून त्याचे असे मातेरे का करायचे - समजा मतदानात असा निकाल आला की शैव असो वा वैष्णव - वैदिक असो - हे दीपोत्सवाचे साजरे करणे आणि हा ऋतू आणि वातावरण फार फार सुंदर आहे -

  आप्पा - यक्ष असो वा शिव - ते खरे आहेत का ? विष्णू असो वा लक्ष्मी - ती खरी आहे का ?आपल्याला माहित आहे की या सर्व दोन्ही बाजूनी काल्पनिक कथा आहेत - आपला समाज २१ व्या शतकात आहे - आज जपान असो , युरोप असो किंवा चीन असो - श्रद्धा आणि भौतिक सत्य यातले खरे अंतर किती आहे ? परदेशात सुद्धा प्रतिकात्मक सर्व प्रकार साजरे होत असतात - परंपरा या डोळस असल्या की आपोआप हे ठरून जाते की हे सर्व गम्मत म्हणून करायचे आहे ! ३-४ हजार वर्षापूर्वीचे विषय काढून उगाचच चांगल्या मंगल क्षणांवर चिखल उडवायचा यात काय साधत आहात तुम्ही संजय सर ?उद्या असा शोध लागला की आपण मूलतः इजिप्त निवासी आहोत तर ?मग आपला आनंद कमी प्रतीचा ठरतो का ?
  बाप्पा - तसे पाहिले तर कशाचेच काही खरे नाही - असा खरोखरचा ड्रागन कुठेही नाही इतके चीनी लोकही ओळखून आहेत - तसेच नाताळचे - दिवाळी म्हणजे सुद्धा केवळ शोभायात्रा इतकेच भौतिक महत्व उरलेले हे सण आहेत त्यातून प्रचंड व्यापार उदीम होतो म्हणून याचा दिमाख !
  आप्पा - आपण एक कौल घेतला की दिवाळी हि वैदिकांची लबाडी आहे तर असे आपणास वाटते का की शैव लोक दिवाळी साजरे करणे बंद करतील ?आज ईद दिवाळी नाताळ हे सर्व धर्मीय सण होत आहेत !समाज एकत्र येत आहे - त्यात असा बिब्बा घालते म्हणजे पाप आहे - डॉ आंबेडकर हे थांबले असते तर त्याना धर्म बदलाचा निर्णय आज घेताना समजले असते की धर्मच एकत्रित साजरा करायची गोष्ट बनत आहे - आज जग जवळ येत आहे - आपण जुन्या विचारांना आणि पद्धतीना नवे रूप देत गेलो तर जीवन जास्त आनंदी होईल
  आप्पा - ही सर्व दीपावली आपणा सर्वांस आनंदाची आणि सुख समृद्धीची जावो हीच सदिच्छा !

  ReplyDelete
  Replies
  1. तुमचे म्हणणे तत्वत: मान्य. एकच समस्या आहे. काही अर्धवट बहुजनीय विद्वान कृष्णाला सोळा हजार रखेल्या ठेवलेला रंडीबाज म्हणत प्रचार करतात. ब्राह्मण वामनाने बळीचा "खून" केला म्हणत ब्राह्मण द्वेष करतात. हे योग्य नाही. सणांमागचा इतिहासही काही प्रमाणात तरी माहित हवा.

   Delete
 3. बाप्पा - संजय सर , आपण म्हणता ते अगदी बरोबर ! प्रश्न आहे तो आपल्याला नवा भारत उभा करताना त्याच्या डोक्यावर किती शतकांचे ओझे ठेवायचे आहे त्याचा !
  आप्पा - हजारो ऋषीमुनी झाले - आज खरच ते आपल्या इथे अवतरले तर ? तेच म्हणतील - जाऊ द्या हो - आम्ही आपलं आम्हाला जमल तसं , जेवढ झेपलं तितकं सांगितलं - पण हे काय हो - हे जे दिसतंय ते मात्र अफाट , आम्ही फारच विदुषक आहोत यापुढे !अबब केव्हडी ही प्रगती !
  अहो आम्हाला काय माहित नव्हत का की आम्ही बडबडतोय ती आमची पोटाची खळगी भरण्यासाठी ?
  बाप्पा - मला एकही ऋषी माहित नाही जो स्वतः खपला , ज्याने आपले प्राण गमावले आपल्या तत्वासाठी !- सगळे आपले एकमेकाना शाप देत बसायचे !
  (हीपण नुसती कथेची कलाकुसर )! आजच्या तंत्रयुगात सर्व कसे शास्त्रशुद्ध - देव माना - किंवा न माना - तुमचा धर्म कोणताही असो - श्रद्धा काहीही सांगोत -

  आप्पा - आज संजय सर गरज आहे ती या संस्कारांची - आमचा आत्मा तीळ तीळ तुटतो - संजय सर ,आपल्याकडे इतकी प्रचंड हातोटी आहे - आपले विचार मांडायची चिकाटी आहे - पण - आपणपण या विचारात अडकून फसगत झाल्याप्रमाणे आपली विनाकारण फरफट करून घेत आहात - याचेच वाईट वाटते - पुरे आता हे शैव आणि वैष्णव - सूर आणि असुर -
  बाप्पा - जरा विषयांतर करून सांगतो - पु ल देशपांडे यांनी विनोदी अंगाने कायम अमंगल विचारांवर घणाघात केला समाजातील व्यंग दाखवले - पण मानवतेला कधी ते विसरले नाहीत - ते खरे निरीश्वरवादी होते !
  आप्पा - आपले आयुष्य आणि आपल्या मर्यादा यातून वेळ वाया न घालवता आपण समाजातील उणीवा शांतपणे दाखवल्या पाहिजेत -
  बाप्पा - हे काळाचे चक्र कधीच उलटे फिरत नाही ! कोणी कितीही महारथी आला तरी !
  आप्पा - आजची सर्व निर्मिती मुख्यत्वे युरोपातून आली आहे - वीज फोन कार विमान उत्तम रस्ते ही सर्व तिकडची आयात आहे - आपल्या धर्माची परिणीती अजिबात नाही - त्यांच्याच शस्त्रांनी आपण लढाया करतो - मारतो हरतो जिंकतो -त्यांचीच औषधे वापरतो !
  बाप्पा - नवनवे रोग आणि उपाय सर्व तिकडून इकडे येतात - आणि आपण वृथा आपली थोरवी आळवत बसतो - त्यांनी धर्म बाजूला ठेवत प्रगती साधली - सामाजिक बंधने शिथिल ठेवत नवी समाज रचना शोधण्याचा प्रयत्न केला त्यात चुका झाल्या असतील - पण नावीन्य हा त्यांच्या जीवनाचा आत्मा आहे - चित्रकला संगीत लिखाण सर्वत्र ताजेपणा दिसतो -
  आप्पा - आपण जुन्याला कवटाळून बसतो - खरे काय त्याचाच चोथा होईपर्यंत चर्चा !
  बाप्पा - आणि खरेतर काहीच नसते - आपणच म्हणता ना सर - शाश्वत असे इथे काहीच नाही ? तिथे किती परिवर्तनाच्या लाटा आल्या - कुटुंबसंस्था आवश्यक आहे का ? त्यातून माणुसकी कशी वाचेल यावर असंख्य लिखाणे आहेत !
  बाप्पा - आपण देव आहे का नाही यातच अडकून बसलो आहोत आणि त्यातच जुन्या कल्पनांचे वाद अगदी ताजेपणाने लढतो आहोत - आप्पा - आपण सांगायला पाहिजे की देव हि एक सुंदर कल्पना आहेत - आपण मोठ्ठे होताना आई आपल्याला काही महिने बोटाला धरून चालवते तसे आहे हे नीती मर्यादांचे जाळे - काही दिवसांपुरते ,३०व्या वर्षी आपण रांगत बसलो तर लोक वेडा म्हणतील !
  आप्पा - तिकडे तथाकथित नीती मर्यादा फेकून दिल्या आहेत पण चांगल्या गोष्टी कितीतरी आहेत
  बाप्पा - संजय सर - आपण ब्राह्मणाहून ब्राह्मण होत जाउन जुने विचार सोडून द्यायला तयार नाही - आणि नव्या विचारांचे स्वागतही करत नाही - फक्त रेकोर्ड पुरते नाही - अगदी अस्सल !तुमची पार्श्वभूमी फार फार चांगली आहे सर - विचार उत्तम आहेत - कला आहे - फक्त धाडस नाही - आपण अगदी सार्थ पणे मान्य करता की जगात ईश्वर नाही - पण ते सांगायची आणि त्याचा पुरस्कार करायची आपली तयारी नाही - कारण -?

  आप्पा - आपल्याला भीती आहे - आणि त्यावर पांघरून म्हणून आपण जणू असे सोयीस्करपणे ठरवता की आपल्या समाजाची असले विचार पचवायची तयारी नाही !हि पण एक फसवणूक आहे !
  बाप्पा - म्हणजेच संघ आणि भाजप वेगळ्या प्रकारे समाजाची फसवणूक करतो आहे आणि आपण दुसऱ्या प्रकारे समाजाला नवीन ताज्या शुद्ध आचार विचारांपासून वंचित ठेवत आहात !
  आप्पा - संजय सर आम्ही आपल्या कडून नवीन वर्षात ताज्या निरोगी विचारांची अपेक्षा करू का ?
  बाप्पा - संजय सर आम्हाला तुमचे लिखाण हवे आहे - !ताज्या दमाचे !
  आप्पा - संजय सर प्रत्येक दशकात समाजाचा कणा मोडला जाण्याची भीती व्यक्त केली जाते - हिप्पी आले , समसंभोगी आले , अनेक व्यसने आली - चित्रकला शिल्पकला , आणि संगीतात तर अनेक स्थित्यंतरे झाली पण कला मेली नाही - माणुसकी मेली नाही - आणि मरणारही नाही - वेगळे रूप घेत हा प्रवाह असाच वहात राहील ! आजच्या दिवाळीच्या शुभदिवशी इतकी आशा करायला काहीच हरकत नाही -
  बाप्पा - हो ना संजय सर ?

  ReplyDelete
  Replies
  1. आप्पा-बाप्पा, पुन्हा अंशत: सहमत. भविषवादी असायलाच पाहिजे आणि वर्तमानात ठाम पाय रोवून उभे रहायला हवे. पण दुर्दैवाने आमचा भुतकाळ संभ्रमित अहे, खोटेपणाचा आहे, सांस्कृतिक गोंधळाचा आहे. मी समाजात वावरतो...खेडोपाडी जातो, सर्व प्रकारच्या मानवी समाजांमद्ध्ये मिसळतो. न्युनगंड आणि वर्चस्वगंड या दोन्ही समस्या एकाच वेळेस भेडसावत आहेत. गंडाने , मग तो कोणताही असो, ग्रस्त समाज वर्तमान आणि भविष्याबाबत फारसा विचार करू शकत नाही. मी स्वत: व्यक्तिश: कोणताही धर्म मानत नाही. मंदिर-०पुजा या बाबी माझ्यासाठी अनावश्यक आहेत. पण प्रचंड मोठा समाज त्यात अडकलेला आहे. त्याला पुराणकथाच सत्य वाटतात. पुराणकथा निरुपद्रवी वाटल्या तरी त्या तशा नसतात...त्य कोणाच्या तरी स्वत्वाचे अपहरण करण्याचा नकळत प्रयत्न करत असतात. ग्रीक पुराकथा तशा नाहित. आपल्याच अशा का आहेत? जाणीवपुर्वक त्यात खोट का निर्माण केली गेली आहे? समाजशस्त्राचा विद्यार्थी या नात्याने आणि न्युनगंडाने ग्रासलेल्या लोकांना आत्मभान देण्याच्या प्रयत्नांत तेही समजावून घेणे तेवढेच आवश्यक आहे. हा माझ्या दृष्टीने पोरखेळ नाही. आवडत नस्वले तरी ते काम करत रहावेद लागते. उद्या कोणे त्याचे धुरा घेतली तर अधिक उत्तम. माझ्यासमोर राहून गेलेली खरी कामे यामुळे करता येत नाहीत.

   Delete