Thursday, May 7, 2015

इतिहासातील कुणबीणी म्हणजे कोण?

सद्द्या कुणबीण या शब्दावरुन/संज्ञेवरुन वाद सुरु आहे. महाराष्ट्राला वादांचे प्रचंड अकर्षण आहे. मराठी
लोक आठव्या शतकातील उद्योतन सुरीच्या गाथेतुनही भांदकुदळ आहेत असेच म्हटले आहे.  हरकत नाही. कुणबीन म्हणजे कुणब्याची बायको असा अर्थ नसुन क्रीत स्त्री, शय्यासोबतीसाठी खरेदी केलेली स्त्री, दासी/बटीक/जित स्त्री आहे असे मी म्हटले होते. ते पटत नसल्याने आपण कुणबीण ही संज्ञा  इतिहासात कोणत्या अर्थाने वापरली जात होती
याचाही शोध घेऊ.

१) भारतीय संस्कृतीकोश खंड दुसरा पान ३९९ वर पुर्वी राजे, सरदार, जमीनदार ई. स्रीमान लोक तरुण स्त्रीयांन आपल्या पदरी दासी ठेवत त्यांना कुणबीण म्हणत असे दिले आहे. येथे हा शब्द जातीयवाचक नाही.

२) कुटुंबातील दासी व्यभिचारिणी झाली की तीला बटिक अथवा कुणबीण म्हनत. पेशवाईच्या काळात राजे-रजवाडे, सरदार, श्रीमंत पुरुष आपल्या पदरी कुणबीणी अथवा बटकी बाळगत. पुर्वी दुष्काळ पडला म्हणजे माणसे हलाखीने आपली मुलेबाळे विकत. प्रत्येक सुखवस्तु माणसाकडे कुणबीण ही असायचीच, अशी प्रथा होती. परदेशी लोक भारतात आल्यावर त्यांनीही बटीक बाळगल्या आहेत. म्यलेटने ६५ रुपयांना एक कुणबीण खरेदी केली होती असा उल्लेख आहे. बटकी किंवा कुणबिणी राजेरजवाड्यांना व सरदारांना नजराना म्हणुनही दिल्या जात. हेडे-चारण ई. लोकांचा बटकी विकायचा व्यवसाय असे. (संदर्भ: भारतीय संस्कृती कोश, खंड दुसरा, पान ४५) येथेही कुणबिण कोणत्या एखाद्या विशिष्ट जातीची असे असा उल्लेख नाही.

३) "शेतकऱ्यांच्या बायका पुरूषांच्या बरोबरीने कामे करीत. मध्यम वर्गातील काही जातीच्या किंवा घराण्यातील स्त्रियांना अर्थार्जनासाठी बाहेर पडता येत नसे. देवांगना, गणिक  वगैरे वर्ग समाजात होते. तमाशातही भाग घेत. वाघ्या-मुरळी सर्व महाराष्ट्रात आढळत. कुणबिणी बाळगण्याची चाल महाराष्ट्रात होती."
संदर्भ : मराठी विश्वकोश, http://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand12/index.php/23-2015-01-14-06-25-27/10393-2012-07-19-09-14-43?showall=1&limitstart=


४) "राज्यांतील अठरा मोठीं खातीं. यांच्या वर्गीकरणाचे तीन प्रकार आहेत, ते असे ( मोलस्वर्थ व  क्यांडी यांच्या कोशाप्रमाणें. ) : ( १ ) उष्टर; खबुतर; जनान; जवाहीर; जामदार; जिकीर; तालीम; तोफ; थट्टी; दप्तर; दारू; दिवान; नगार; पील; फरास; वंदी; मोदी; शिकार-असे अठरा खाने. ( २ ) तोप-पील; उष्टर; फरास; शिकार; रथ; जामदार; जवाहीर; जिराईत; नगार; दारू; वैद्य; लकड; इमारती; मुदबख; कुणबिणी; खाजगत; थट्टी येणेंप्रमाणे- ( ३ ) खजिना दफ्तर; जामदार; पील; जिराईत; अंबर; फरास; मुदबख; नगार; सरबत; आवदार; शिकार; तालीम; दारू, उष्टर; बकरे; तोप; तराफ.
(संदर्भ: केतकर ज्ञानकोश. http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-09-43-34/1520-2012-10-22-07-21-32

५.) अदिकल – अंबलवासी जातिसमूहापैकीं एक वर्ग-हे मूळचे ब्राह्मण आहेत असें म्हणतात; परंतु भद्रकालीच्या देवळामध्यें उपाध्यायाचें काम केल्याकारणानें व मांस आणि दारू यांचे नैवेद्य दाखविले म्हणून ते भ्रष्ट झाले. ते यज्ञोपवीत धारण करितात, क्षुद्र देवतांच्या देवळांमध्ये उपाध्यायाचें काम करतात, व दुसरीं देवळांतलीं कामें करतात. लग्न आणि वारसा या बाबतींत ते मक्कत्तयम नियमांप्रमाणें वागतात. ते वृद्धि व सुतक दहा दिवस पाळतात. दहा गायत्रीमंत्र जपतात; त्यांच्याच जातीचे लोक त्यांची भिक्षुकी करितात. त्यांच्या बायकांस आदियम्मा असें म्हणतात. नम्बुद्रि बायकांसारिखे दागिने या वापरतात पण बाहेर जातांना त्यांच्यासारखी ताडाची छत्री घेत नाहींत व त्यांचेप्रमाणें नायर कुणबीण बरोबर नेत नाहींत. [ Castes and Tribes of S. India. Census Report – Travancore (I9II) ]

http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-09-43-34/1592-2012-10-23-05-13-48

६)  "ह्याशिवाय गुलामांचाही एक वर्ग होता. अनैतिक गुन्हे केलेल्या किंवा बेवारशी स्त्रिया, मुले, पुरूष इत्यादींना गुलाम समजत. पैकी स्त्रीला कुणबीन म्हणत. ती चांगल्या आचरणाने गुलामीतून मुक्त होई. शिवशाहीत व पेशवाईत २ ते २५ रूपयापर्यत कुणबीण विकत मिळे. त्या वेळी हिंदुस्थानात गुलामांची चाल होती. संदर्भ : http://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand12/index.php/23-2015-01-14-06-25-27/10393-2012-07-19-09-14-43?showall=&start=18

७) संत कान्होपात्राला बेदरच्या बादशहाने आपली ’कुणबीन" बनवायचा प्रयत्न केला होता. तो फसला. कान्होपात्रा कुणबी जातीची नव्हती. संदर्भ: http://medievalsaint.blogspot.in/2014/03/saint-kanhopatra.html

८) शनिवारवाड्यात कुणबिणींच्या येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र दार ठेवलेले होते. शनिवारवाड्यासमोर कुणबिणींचे बाजार भरत हे सर्वांना माहितच आहे.

वरील बाब पाहता कुणबिणी/बटीक ही एक संस्था होती, त्यात विशिष्ट जातीच्याच स्त्रीया असत असे कोठेही दिसत नाही. वेश्या आणि कुणबिणीतील पहरक हा कि कुणबीण ही विकत घेतलेली स्त्री असायची. आपत्तीमुळे स्वत:हुन विकणे, विकले जाणे, पळवुन नेवुन विकणे असे प्रकार होत होते. कुणबिणी विकत घेणारे ऐपत असणारे सर्वच समाजघटक होते. एकाच विशिष्ठ जातीचे लोक कुणबिणी बाळगत  असेही दिसत नाही. किंबहुना कुणबिणी बाळगणे ही तत्कालीन प्रतिष्ठेची बाब होती. शिवकालातही कुणबिणींच्या विक्र्या होत असेही दिसते. किंबहुना ही संस्था जगभरची आहे.

आता प्रश्न हा पडतो कि कुणबीण हा शब्द आला कोठुण? "कुणबी" या कृषीवलघटकाशी हा स्त्रीवाचक शब्द आल्याने कुणब्याच्या बायका-पोरीच कुणबिणी बनत असत असा अवमानकारक अर्थ निघणे व संताप येणे स्वाभाविक आहे. पण खरेच तसे आहे काय हे कुणबिण या शब्दाबाबत दिल्या गेलेल्या माहितींत कुणबिणी या कुणब्याच्या बायका असत असा निर्देश कोठेही नाही. मग काय असावे?

भाषांत अनेक शब्द अपभ्रंश होऊन बाहेर जातात किंवा आपल्याकडे येतात. शब्दकोशात येणारे अर्थ असे:

१) कुणबीण (p. 172) [ kuṇabīṇa ] f (कुणबी) A female domestic slave. 2 The wife of a कुणबी.( सनी पवार या एका एका मित्राने मोल्सवर्थ डिक्शनरीवरुन दिलेला हा एक अर्थ आहे.

येथेही दोन वेगळे स्वतंत्र अर्थ दिलेले आहेत. इंग्रजीत कुणबीण या शब्दाला अत्यंत जवळ जाणारा मात्र अर्थ तोच असणारा एक शब्द आहे व तो म्हणजे concubine . या शब्दाचा ओक्स्फ़ोर्ड शब्दकोशाने दिलेला अर्थ आहे : chiefly historical (In polygamous societies) a woman who lives with a man but has lower status than his wife or wives. आणि A mistress.

प्राचीन रोममद्ध्ये कुंकुबिना ही एक संस्था होती. यात शरीरसुखासाठी ठेवलेल्या (पत्नी नसलेल्या) स्त्रीयांना कुंकुबाईन म्हटले जायचे. बायबलमद्ध्येही याचा उल्लेख मिळतो. या ल्यटीन शब्दावरुनच आजचा इंग्रजी शब्द साधला गेला आहे.

युरोपचा महाराष्ट्राशी संबंध आला तो किंचीत शिवपुर्व काळात. तत्पुर्वी सातव्या आठव्या शतकापासुन युरोपिय व्यापारी येतच होते. दहाव्या शतकात चेऊल बंदरावर येणा-या युरोपियनांबद्दल मीडोज ओफ गोल्ड या अल मसुदीच्या प्रवासवर्णनात कोकणातील जे वर्णन केले आहे त्यात महिनोनमहिने भारतातच रहाव्या लागणा-या विदेशियांना स्त्रीया बरोबर आणल्या नसल्याने सहवासासाठी स्त्रीया ठेवण्याची पद्धत होती असे नमुद केले आहे. या स्त्रीयांना तो कोंकूबिन असेच संबोधतो.(द्वितीय खंड, पान २३१-५५)


प्राचीन रोम/बायबल यातील संदर्भ पाहता कुंकुबिन या शब्दाचा अपब्रंश मराठीत जवळ वाटणारा ’कुणबीण’ झाला असण्याची शक्यता अधिक आहे. तो मी काल म्हटल्याप्रमाणे मराठी कुणबीण शब्दाचा अपभ्रंश नाही हे मी येथे सांगु इच्छितो.

२) कुट्टणी हा वेश्यांसाठीचा एक शब्द संस्कृत वाद्मयात येतो. कुट्टणीमत या ग्रंथात वेश्यांना प्रशिक्षण कसे द्यावे याबद्दल विस्तृत विवेचन आहे. कुणबी हा शब्द "कुटुंबिण" या शब्दावरुन साधला गेला असावा असा इतर अनेक व्युत्पत्त्यांप्रमाणे तर्क आहे. समजा, कुटुंबिण या शब्दापासुन कुणबी हा शब्द साधला गेला असेल तर कुट्टणी या शब्दापासुन कुणबीण हा शब्दही साधला जावु शक्यतो. अर्थात हीही एक शक्यता आहे.

दोन्ही शक्यता पाहता मला पहिली शक्यता अधिक वाटते. पण कुणबीण म्हणजे कुणब्याची बायको नव्हे, हा शब्द जातिशी संबंधीत नसुन वर्गाशी संबंधीत आहे ज्यात हलाखीला पोहोचलेल्या कोणत्याही जातीघटकातील स्त्रीया असत. जी सुंदर आहे व संस्कारक्षम आहे तिला अधिक मुल्य दिले जात असे. त्याचा जातीशी संबंध नाही हे मात्र ठामपणाने मी सांगु शकतो.

"कुणबी" या सज्ञेबद्दल जेथे जेथे वेगवेगळ्या कोशांत माहिती आहे तेथे कुणब्यांच्या काही बायका/स्त्रीया शरीरविक्रय करित असे कोणतेही उल्लेख नाही, तसे असते तर "कुणबीण" या शब्दाची माहिती कुणबी या सदरातच दिली गेली असती. पण प्रत्यक्षात ती स्वतंत्र आहे. म्हणजे दोन सज्ञेमधील फरक माहित असल्याने कुणब्यांनीही तेंव्हा निषेध केला नसावा. अगदी अलीकडेपर्यंतही , ब्रिटिशांनी जातीसंस्थेबाबतील दिलेल्या माहितीतही कुणबी या शिर्षकाखाली कुणबीण हा उल्लेख केलेला नाही अथवा कुनबीण /बटीक ही विशिष्ट जातीची होती असा निर्देश नाही. या वर्गात मझ्या मते सर्वच जातेंतील/धर्मांतील स्त्रीया या वर्गात नाईलाजाने असाव्यात. अन्यथा शिवकाळातही कुणबिणींची खरेदी विक्री झाली नसती. शिवरायंनी या अनिष्ट प्रथेवर लगाम घातला असता. अनेकदा समान शब्द वेगळ्या अर्थाने वापरले जातात हे आपल्याल माहितच आहे. त्यातेलच हा एक प्रकार आहे असे दिसते.

 या संदर्भात अधिकचे संशोधन श्री. राहुल रांजणगांवकर यांनी केले असुन या लिंकवर ते उपलब्ध आहे.

4 comments:

  1. सर महाराष्ट्रात कुणबी हि एक मागासवर्गीय जात आहे.त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल?

    ReplyDelete
  2. सोनवणी सर खूप महान आहेत. मागे त्यांनी एक इतिहासकार विकीपेडिया वरील सोर्स वापरतात म्हणून त्यांची खिल्ली उडवली होती मात्र "राजा शिवछत्रपती आणि आक्षेप!" या लेखात मात्र विकीपेडियाचा वापर केला. दुटप्पी भूमिकेत त्यांचा कुणी हात धरणार नाही. दुसऱ्याने वापरले कि विकी विश्वासार्ह नसते, स्वतःसाठी मात्र "ब्रम्हवाक्य"!

    पुरंदरेंच्या पुस्तकांचा खप किती झाला हे विकिवरून बघून शिवाजी महाराज घराघरात पोचवण्याचे काम केले असे म्हणतात, पण पहिल्या उताऱ्यात स्वतःच म्हणतात कि मी हे पुस्तक आजवर वाचले नव्हते. जर सोनवणी सरांसारख्या "महान" कादंबरीकाराने हे पुस्तक वाचले नसेल सामान्यांची काय कथा. त्यांनी एकदा फेसबुक वरूनच सर्व्हे करावा किती जणांच्या घरात राजा शिवछत्रपती हि कादंबरी आहे.

    कुणबिणी शब्द हा जातीवाचक नाही यासाठी प्रथम दर्जाचे समकालीन पुरावे दयावेत, ब्राम्हणांनी लिहिलेल्या कोषांवर आमचा विश्वास नाही.

    ReplyDelete
  3. अप्रतिम लेख सर...इतके मुद्देसुद व संदर्भासहित लिखाण असूनहि काही लोकांच्या ते पचनी पडत नाही याची खंत वाटते.. :)

    ReplyDelete

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...