प्रत्येक
मराठी वाचकाने लहानपणी चांदोबा मासिक वाचलेले असते. त्यातल्या अद्भूतरसाने
भरलेल्या जादूच्या गोष्टी, राजे-राण्या, राजपुत्र, राजकन्या, राक्षस, भुते, वेताळ,
जादूगार, पऱ्या यांचे जादुई विश्व आणि त्याबद्दलचे आकर्षण त्याच्या मनात खोलवर
दडलेले असते. प्रौढ वयात देखील त्यांना या साऱ्या गोष्टी खुणावत असतात. त्यामुळे
पिढ्यानपिढ्या विविध लेखक प्रौढांसाठी देखील असे अद्भूतरम्य वाड्मय लिहीत असतात
आणि असे वाड्मय लोकप्रिय होत असते. गेल्या शतकाच्या आरंभी महाराष्ट्रात गो. ना.
दातार या लेखकाने रेनॉल्डसच्या अशा
शैलीतल्या कादंबऱ्यांची ‘कालिकामूर्ती’, ‘अधःपात’, ‘बंधुद्वेष’ अशी बेमालूम
रूपांतरे केली होती आणि ती वाचकांच्या पसंतीला इतकी उतरली की आज देखील त्यांच्या
नव्या नव्या आवृत्त्या प्रकाशित होत असतात. नंतरच्या काळात नाथमाधव, शशी भागवत,
सुहास शिरवळकर आदि लेखकांनी देखील असे विपुल लेखन केले आणि ते वाचकांनी डोक्यावर
घेतले.
‘क्लिओपात्रा’,
‘ओडिसी’ सारख्या ऐतिहासिक पात्रांवर- घटनांवर आधारित चित्तथरारक कादंबऱ्या आणि
‘असुरवेद’, ‘द अवेकनिंग’सारख्या स्वतंत्र कादंबऱ्या लिहून वाचकांच्या मनात वेगळे
स्थान मिळवलेल्या संजय सोनवणी यांनी ‘हिरण्यदुर्ग’ ही अफलातून आणि भली मोठी
साडेतीनशे पानांची चित्तथरारक कादंबरी वाचकांना सादर केली आहे. अद्भूतरसावर प्रेम
करणाऱ्या वाचकांना जे जे हवे ते सगळे या हिरण्यदुर्ग मध्ये आहे. पुनर्जन्म, शाप,
जादू, चमत्कार, दैवी चमत्कार, युद्धे आणि शेवटी नायकाचा शेवट या सर्व मसाल्याची
कादंबरीच्या पानोपानी रेलचेल आहे. सिंहभद्र आणि केतुमाल हे दोन प्रवासी एका निबिड
अरण्यात एकमेकांना भेटतात आणि कादंबरीला सुरुवात होते. आपण दोघे एकमेकांचे
जन्मोजन्मीचे शत्रू आहोत आणि आपल्यापैकी एकाचा विनाश या जन्मी अटळ आहे हे भागधेय
त्यांना ठाऊक नाही. ते उशीराने समजते आणि त्यांचे मार्ग भिन्न होतात. यातला
सिंहभद्र हा नागवंशीयांचा पक्षपाती आहे आणि त्याच्यावर साक्षात शिवशंकराचा वरदहस्त
आहे. तर केतुमाल उर्फ पुलोमा हा गरुडवंशीयांचा पुरस्कर्ता आहे. पण त्याच्या पाठीशी
कोणी स्वर्गस्थ देवता उभी राहिलेली जाणवत नाही. सद्यस्थितीतला संघर्ष हा
दोघांच्याही अस्तित्वाचा प्रश्न आहे. कथानकातली राजकन्या देवसेना ही दोघांना हवी
आहे. अर्थातच घनघोर संघर्ष आणि युद्धे झाल्यावर शेवटच्या संघर्षात नायकाचा –
सिंहभद्राचा विजय होतो. त्याला त्याचे राज्य मिळते. त्याला देवसेना लाभते. खलनायक
पुलोमाचा आणि त्याच्या अनुचरांचं सर्वनाश होतो.
एकदा
वाचायला घेतलेली ही कादंबरी संपेपर्यंत खाली ठेववत नाही हे अगदी खरेच. वाचक हिला
डोक्यावर घेतील याची देखील खात्री वाटते. परंतू कादंबरीमध्ये अधूनमधून डोकावणारे
मुद्रणदोष वाचताना क्वचित रसभंग करीत राहतात. कथेच्या सुरुवातीला एकमेकांना
भेटलेले आणि एकमेकांशी रुजुतेने वागणारे सिंहभद्र आणि केतुमाल ‘आपल्या माणसात’
गेल्यावर त्यांच्या डोक्यावर जन्मोजन्मीच्या इतिहासाचे ओझे लादले जाते आणि ते
एकमेकांचे हाडवैरी बनतात हे अगदी वर्तमानाशी नाते सांगणारे आणि प्रतीकात्मक झाले
आहे. मात्र पुलोमा खलनायक का आणि सिंहभद्र नायक का? हे वाचकांच्या मनावर नेमके
बिंबत नाही. पुलोमाच्या आणि त्याच्या पूर्वजांच्या नावे काही दुष्टकृत्ये काही
पानांवर डोकावतात. पण तरी त्यातून पुलोमाचे खलनायक असणे वाचकांच्या मनात पुरेसे
ठसत नाही. याचा देखील शोध वर्तमानात घ्यायचा का?
* * *
- विजय
तरवडे
हिरण्यदुर्ग / संजय सोनवणी
पाने – ३५२ किंमत रु. ३५०/
प्रकाशक – जालिंदर चांदगुडे
प्राजक्त प्रकाशन
३०३, वर्धमान हाईट्स,
बाजीराव रस्ता, पुणे ४११००२
No comments:
Post a Comment