Wednesday, May 20, 2015

विचार आणि भाषा

विचार करायला भाषेची गरज आहे काय आणि हाच खरे तर अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. मुळात मनुष्य विचार करतो म्हणजे काय करतो? विचार आधी मनुष्यप्राण्यात अवतरला कि मन? मन नेमके काय असते? विचाराचा विचार होऊ शकतो काय? खरे आहे. प्रश्न अनंत आहेत आणि खरे तर या प्रश्नांची अंतिम उत्तरे अजुन मिळालेली नाहीत. पण एक बाब अत्यंत स्पष्ट आहे ती ही कि विचारांना भाषेची गरज नसते. किंबहुना भाषेत बद्ध होऊ शकणारे विचार हे नेहमीच अत्यल्प असतात. भाषा ही नेहमीच तोकडी असते. विचार नाही. त्यामुळे भाषेत बद्ध न होऊ शकणारे, भाषेची पुरेशी प्रगल्भता न येणा-यांचे विचार हे जगासाठी नेहमीच अनुपलब्ध राहतात. पण म्हणून विचार नसतात असे नाही. भाषा ही कृत्रीम अवस्था आहे. मनुष्याने ती गरजेसाठी पुराकाळापासून विकसीत केलेली आहे. त्याची, पुराकाळातील माणसाची, अभिव्यक्ती आपण आजच्या परिप्रेक्षात समजावून घेऊ शकण्यात तोकडे पडतो ते त्यामुळेच. पुरातन मानव मिथ्गकांतुनच जगाकडे पाहत होता. शब्दांत (भाषेत) उतरलेली मिथके आणि त्याला अभिप्रेत मिथके यात पुरेसे साम्य असण्याची शक्यता नाही, कारण कोणत्या शब्दाने त्याला काय अभिप्रेत होते हे आपण नीट समजावून घेऊ शकत नाही, घ्यायचे झाले तर खुप प्रयास करावे लागतात, थोडे आदिम बनावे लागते. कारण आपले विचार, आजचे, वरकरणी भाषेत झाले आहेत असे वाटले तरी अगणित विचार भाषाविहिन असतात, आणि त्यांना आपण सुप्त अथवा अव्यक्त विचार म्हणत असलो तरी ते मानसिकतेवर परिणाम करत असतात. 

दुसरे असे कि जगभरच्या मानवाच्या विचारपद्धतींत अथवा मानसिकतेत एक प्रकारचे नैसर्गिक समानत्व आहे. अभिव्यक्तीच्या पद्धती वेगळ्या असतील, पण मिथ्थकथा नाहीत, भाषा नाही, कला नाही असा जगात एकही मानवी समुदाय नाही. स्थानिक भौगोलिक संरचनांमुळे निर्माण होणा-या मानसिक प्रभावांतून अभिव्यक्त्यांचे स्वरुप बदलत असले तरी अभिव्यक्ती ही असतेच. त्यात श्रेष्ठ-कनिष्ठपणा ठरवायचा प्रयत्न चुकीचा ठरतोइ तो यामुळेच.

भाषा ही माणसाची नैसर्गिक आणि मुलभूत गरज आणि उपज आहे असे मानशास्त्रज्ञही मानतात. भाषेचा प्रवास हा विलक्षण आहे. तो प्रत्येक काळात, प्रत्येक मानवी समुहाच्या आणि व्यक्तीकेंद्रित संस्कृतीचा उद्गार आहे. एक उदाहरण देतो, कारस्थान हा शब्द एकोणिसाव्या शतकापर्यंत, खटपटी-लटपटी करुन बुद्धीमानता दाखवत यश मिळवणारा/री यांना उद्देशुन वापरला जाई. आता मी कोणाला कारस्थानी म्हटले तर तो माझा गळाच आवळायला धावेल. इतिहासात अनेक शब्द आणि संज्ञांचे असे झाले आहे, याला कारण शब्द हे काळाप्रमाणे, त्या काळच्या सांस्कृतिक गरजांप्रमाणे अर्थ बदलत जातात, वेगवेगळ्या छटा धारण करत जातात किंवा भाषेतुनच बाद होत जातात. जसे जाते, उंबरा, उखळ ई अनेक शब्द मराठीतुन बाद होत चालले आहेत. किंवा उद्या हे शब्द राहतीलही कदाचित पण त्या शब्दांनी निर्दिष्ट होणारे अर्थ वेगळे असतील.

हा भाषेचा प्रवास पिढी-दर-पिढी बदलत जातो, आणि तीच भाषेची गंमत आहे. आता आपण प्राचीन काळात जाऊ. गो, म्हणजे गाय, या शब्दातुन गाय, आकाश, ढग, नदी, झरे ई अनेक अर्थ परिस्थितीजन्य अर्थभेद दाखवतात. यात त्या काळच्या माणसाने कशी कल्पना केली असेल हे आपण (समजायचे असेल तरच) समजु शकतो. पण पर्यायी शब्दांची अडचणही एकच शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरायची सवय लावत असेल असेही आहे.

शब्द किंवा भाषा ही नेहमीच तोटक्या असतात. नवीन शब्द निर्माण करण्यात आजचा आधुनिक माणूस कमी पडतो असे म्हटले जाते., व्याकरणाची मोडतोड करत व्यामिश्र नि गुंतागुंतीचा, विद्यमान भाषेत न मांडता येणारा विचार, मांडायचा तर भाषेला आहे तशी वापरुन ते साध्य करता येत नाही. भाषांना प्रवाही ठेवायचे कि प्रमाणभाषांच्या नादान्या करत भाषा बंदिस्त करत नेत तिचा विकास खुंटवायचा हे आपल्याला पहावे लागेल. थोडक्यात भाषेचा प्रवाह जेवढा अग्रगामी ठेवला जाईल तेवढीच ती विचारांना शब्द देण्यात यशस्वी ठरेल. आदिमानवांच्या गुहाचित्रांतील रेषांत जो जोम आढळतो तो आधुनिक चित्रकारांना साधता येत नाही याबद्दल अनेकदा कला क्षेत्रात चिंता असते. पुरातन मानवांनी शब्द निर्माण केले पण त्यात आपण आधुनिक काळात किती भर घालु शकलो हा एक प्रश्नच आहे.

थोडक्यात विचार भाषेत येत नसून भाषा हे विचारांचे माध्यम आहे. म्हणजेच आपण नकळत विचार भाषेत अनुवाद करुन मांडतो. नि म्हणूनच विचारजसे येतात तसेच्या तसे मुलार्थाने कधीही मांडता येत नाहीत, तीच भाषेची सर्वात मोठी अडचण आहे. भाषेच्या उपयुक्ततेसहित ही सर्वात मोठी असलेली भाषेची अडचण समजावून घेता आली पाहिजे, भाषेला रुढ व्याकरण अथवा शब्दमाला यापार जात व्यक्त व्हायला हवे! गुंतागुंतीच्या विचारांना नवे शब्दरुप देता यायला हवे.

त्यासाठी आपला मानवी समाज तेवढा प्रतिभाशाली आहे काय?

3 comments:

  1. आप्पा सुंदरच रे संजय !
    बाप्पा - मस्तच रे संजय भाऊ ! !
    आप्पा - आपल्याला जे भावतय ते दुसऱ्याला सांगितलेच पाहिजे , हि अवस्थाच किती महान आहे कारण सर्वसाधारण आदिम मानव हा स्वार्थी धरला जातो , स्वसंरक्षण हा त्याच्या जीवनाचा गाभा , अध्यात्म वगैरे फार पुढच्या गोष्टी झाल्या , मला जे दिसले , जे उलगडले , या जीवनाचा अर्थ लागला हे कुणाबरोबर तरी शेयर करणे ही अत्यावश्यक बाब झाली ती अवस्था किती थोर आहे !
    बाप्पा - खरे आहे रे आप्पा - तू अगदी भाउक झाला आहेस , पण एक बघ - समोरचा माणूस घातकी आहे , स्वार्थी आहे , हे ज्यावेळी शेजारच्याला सांगायची उर्मी मानवाला दाबून ठेवता येईना , आणि खाणा खुणा अपुऱ्या पडायला लागल्या तेंव्हाच बोल जन्माला आले असतील , पहिल्यांदा पोपट , कोकिळा यांच्या सारखे भावनात्मक ( ? ) चित्कार असतील , हळूहळू तेचतेच हुंकार वापरून शब्द जन्मले असतील , समजले जाऊ लागले असतील ,
    आप्पा - एका पिढीत हे घडले असेल का ? मग त्याचे , त्या चीत्कारांचे साठे आणि रेकोर्ड पुढच्या पिढीकडे कसे दिले गेले असेल , त्यात , व्याकरणाचा वापर करून शित्स्तबद्ध मांडण्याचे कौशल्य कसे आत्मसात केले गेले असेल ? सगळेच महान !
    बाप्पा - हे विचार जितके फुलवावेत तितके फुलात जातात !
    आप्पा - संजय , गमतीदार विषय मांडल्या बद्दल खास कौतुक केले पाहिजे -
    बाप्पा - खवचट पणा बाजूला ठेवून !

    ReplyDelete
  2. माननीय संजय सोनवणी ,
    पुण्यात जितेंद्र आव्हाड याने उगाच बळेच शिवशाहीर पुरंधरे यांच्या बाबत वक्तव्य केले
    २४ मे २०१५ ला आव्हाड चा पोपट झाला ,
    एका क्वार्टर वर जमा होणारी गर्दी जमवून असले चाळे जर तो करणार असेल तर त्यांचे राजकीय भवितव्य काय असणार ?
    हा माणूस इतका मूर्ख कसा ?
    संजय सोनावनी यांनी अशा वेळी त्यांच्या बोलण्यावर भाष्य केले पाहिजे
    कारण हि घाण पुण्यात येऊ देता कामा नये - तशी सांस्कृतिक जबाबदारी संजय सोनवणी आणि प्रभूतींची आहे .

    ReplyDelete
  3. माननीय संजय सोनवणी ,
    पुण्यात जितेंद्र आव्हाड याने उगाच बळेच शिवशाहीर पुरंधरे यांच्या बाबत वक्तव्य केले
    २४ मे २०१५ ला आव्हाड चा पोपट झाला ,
    एका क्वार्टर वर जमा होणारी गर्दी जमवून असले चाळे जर तो करणार असेल तर त्यांचे राजकीय भवितव्य काय असणार ?
    हा माणूस इतका मूर्ख कसा ?
    संजय सोनावनी यांनी अशा वेळी त्यांच्या बोलण्यावर भाष्य केले पाहिजे
    कारण हि घाण पुण्यात येऊ देता कामा नये - तशी सांस्कृतिक जबाबदारी संजय सोनवणी आणि प्रभूतींची आहे .

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...