Thursday, June 25, 2015

सांस्कृतीक आणीबाणी

आणीबाणीच्या आठवणी निघत आहेत. आणीबाणी लागली तेंव्हा मी दहा-अकरा वर्षांचा असेल. रहायचो वरुड्यात. आमच्या गांवात आणीबाणीची दहशत होती खरे पण ती कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रियांसाठी जबरदस्ती पकडून न्यायचे म्हणून. स्वेच्छेने नसबंदी करुन घेणारे अत्यंत तुरळक. नसबंदी केल्यावर पैसे दिले जायचे. त्या आशेने नसबंदी करुन घेणारे महाभागही होतेच. पण अधिक करुन दुरुन जीपचा धुरळा उडतांना दिसला कि बाप्प्ये लोक लपायला माळ, ओढे गाठत. आम्हाला गम्मत वाटे. सरकारी कर्मचा-यांना कोटा पुर्ण करणे भाग असल्याने मग काही म्हातारेही पकडुन नेले जात. आमच्या गांवचा पुजारी जिजाबा हा म्हातारा...पण त्याचीही सक्तीची नसबंदी झाली. म्हातारा वेदनांनी रात्र रात्र एवढा विवळायचा कि विचारु नका. लोकांनी नसबंदीची धास्त खाल्ली होती.

संततीनियमनासाठी निरोध वाटपाचे काम तेंव्हा शिक्षकांकडेच असायचे. माझे वडील शिक्षक. निरोधाचे फुगे कसे बनवायचे हे आम्हाला आमच्या पाटलानेच शिकवले. त्या फुग्यांनी आमचे बालपण रंजक केले. बाकिच्या बाप्प्यांनी त्याविना उत्सव केले असणार हे उघड आहे.

दुसरी धास्ती लेव्हीची. विशिष्ट धान्य सरकारजमा करावे लागे एवढे आठवते. एकदा काय झाले, आमच्या गांवातील एका वस्तीवर एकाच्या घराला लागली आग. ती पसरत गंजीपर्यंत गेली. सारा गांव घर विझवायला धावलेला. पण तो माणुस म्हणतोय...घर नंतर आधी गंज वाचवा. लोकांना काही कळेना...पण बाबा कोकलून बोलतोय म्हटल्यावर लोक गंजीकडे वळले. गंजीतुन जी काही धान्याची पोती निघाली म्हणता....आम्हा पोरांना वाटले खजिना म्हणतात तो हाच!

तिसरी धास्ती म्हणजे तगाईच्या वसुलीची. एवढ्या सक्तीची वसुली मी कधी पाहिली नाही. देणेकरी तगाईदाराची भांडी-कुंडीही उचलून नेली जात. माझ्या समक्ष तीन-चार घरांचे हाल असे झालेले पाहिलेले आहेत.

बाकी सरकारी अधिकारी ठिकाणावर आले होते. वक्तशीरपणा वाढला होता. साठेबाज-काळाबाजारवाले गळाठले होते. पण इंदिराजी चांगले करताहेत हे कोणाला वरील कारणांमुळे वाटणे शक्य नव्हते. मोहन धारिया आमचे त्यावेळचे हिरो होते. त्यांचे भाषण एस. पी. कोलेजच्या मैदानावर पुण्यात होते. ते भाषण ऐकायला जाण्यासाठी मी भयंकर दिव्य करत गेलो...परत आलो. पण ते भारावलेपण लवकरच जनता पक्षाच्या तमाशाने हिरावले गेले. आणिबाणी का वाईट होती ते मला वरील प्रसंगांपुरतेच प्रत्यक्ष माहित आहे. पण आता वाटते....बुडवे लोक...तगाई काय किंवा अन्नधान्य काय, किंवा लोकसंख्येत भरमसाठ भर घालण्याचा जन्मजात परवाना आपल्याला मिळालाय असे माननारे लोक तेंव्हाही होते आणि आता तर फारच आहेत.

आणिबाणी वाईट होती काय? अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा किती गळा घोटला गेला हे तेंव्हा मला माहित नव्हते आणि आता जेही काही इतरांचे वाचुन माहित आहे त्यावरुनही मला तो काळ चुकीचा होता असे वाटत नाही. ज्यांनी कधी दुष्काळ पाहिला नाही, मिलोच्या भाकरी किंवा सुकड्या खाल्ल्या नाहीत त्यांना त्याचे महत्व समजणार नाही. य देशात ज्या बाबी सक्तीच्या हव्यात त्या कधीच नसतात आणि नको त्या टुक्कार (अ)सांस्कृतिक सक्त्या करायचे प्रयत्न् होतात...दहा दहा पोरे काढायच्या सुचना दिल्या जातात त्या नतद्रष्टांना तर आणिबाणीबद्दल बोलायचा अधिकारही नाही.

लोकांमधील अप्रामाणिकपणा तेंव्हाही होता आणि आता तर त्या अप्रामाणिकपणाचा विस्फोट झाला आहे. प्रशासनाने आपली पकड एवढी घट्ट केली आहे कि मंत्री-संत्री प्रामाणीक असले तरी हतबल व्हावेत. भ्रष्टाचाराचा विळखा प्रशासनामुळे अधिक वाढला आहे हे अमान्य करण्याचे काहीएक कारण नाही. जनतेलाही प्रामाणिक अधिकारी नकोत. सर्व क्षेत्रांत माफिया घुसलेले आहेत.

अडवाणी आणीबानीच्या शक्यतेबाबत बोलले. त्यांना खोमच्यात टाकल्याचा उद्वेग त्यांनी व्यक्त केला यापार त्यांच्या वक्तव्याला फारसे महत्व देता येत नाही. आणीबाणी आजही तशी आहेच...फक्त तिचे रुपडे बदललेय. ते सांस्कृतिक दहशतवादाची पातळी गाठते आहे....आणि ग्व्याड लागणा-या भक्तांच्या मांदियाळीमुळे ती तशी सुसह्य वाटतेय...

पण या अघोषित सांस्कृतीक आणीबाणीची भयावहता कल्पनातीत असणार आहे ते आम्हाला कसे कळणार?

No comments:

Post a Comment

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...