Sunday, June 7, 2015

"समरसता" श्री. पतंगे...एक समीक्षा (भाग १)

माझे मित्र श्री. रवींद्र गोळे यांनी मला "समरसता" हे श्री. रमेश पतंगे यांचे समरसतेचे तत्वज्ञान मांडणारे पुस्तक आवर्जुन वाचायला पाठवले याबद्दल त्यांचे नितांत आभार. श्री. पतंगे यांनी त्यांच्या पुस्तकात समरसतेचे तत्वज्ञान मांडतांना अनेक मुद्द्यांचा उहापोह केलेला आहे. वेद, बुद्ध, कृष्ण यांचे पुरातन दाखले देत बाबासाहेब आंबेडकर, गांधीजी, विवेकानंद, गोळवलकर गुरुजी, म. फुले, गाडगेबाबा, हेडगेवार इत्यादि समरसतेचे कसे व कोणत्या महनीय मुल्यांसाठी समर्थन देतात याचे विवेचन यात आहे. एका दृष्टीने हे समरसतेच्या सिद्धांताची मांडणी करणारे तत्वज्ञान आहे व त्यामुळे त्याची समीक्षा त्याच पातळीवर केली जाणे आवश्यक आहे.

पुस्तकाची सुरुवातच समरसता या शब्दाचा शब्दकोशातील (मराठी शब्द रत्नाकर) अर्थ त्यांनी दिला आहे व तो - "मानसिक वृत्तीची एकरुपता, तल्लीनता" असा आहे. आदर्श मराठी शब्दकोशानुसार तोच अर्थ "संयोग, मिलाप, सहवास" असा दिला आहे असे ते म्हणतात. व्यक्तिश: आणि समूहश:ही एखाद्या विषयाशी समरस झाल्याखेरीज कोणालाही आस्वादक बनता येत नाही (पृष्ठ १४) असे म्हणत ते म्हणतात समरसता हा मानवजातीचा असा गुणधर्म आहे की जो मनुष्याचे अन्य प्राण्यांपासूनचे वेगळेपण स्पष्ट करतो. मनुष्याचे वेगळेपण म्हणजे मनुष्याजवळ धर्म आहे, धर्माशिवाय माणूस पशुसारखा असतो. मानवी संस्कृतीचा विकासही समरसतेच्या भावनेने झाला आहे असे विधान करत  हेडगेवारांना हिंदू संघटनाबाबत उद्द्घृत करतात, "परस्परविरोधी विचार आणि आचार असणा-या लोकांचे संघटन होऊ शकत नाही. संघटनेसाठी समान इतिहास, समान आकांक्षा, समान मूल्यविचार, धर्माविषयी समान धारणा आवश्यक आहे. हिंदू समाजात अशी समानतेची अनेक स्थाने आहेत व त्यावर भर देण्याचा मार्ग डा. हेडगेवारांनी स्वीकारला......सामाजिक समरसता हा हिंदू संघटनेचा आत्मा आहे." (पृष्ठ ९७)

पहिली बाब येथे आपण लक्षात घ्यायला हवी ती ही कि धर्मामुळे माणूस इतर प्राण्यांपासून वेगळा आहे असे आजीबात नाही. मनुष्य हा बोलतो आणि बुद्धीमत्तेच्या जोरावर कृत्रीम साधने शोधत जीवन सुखमय करण्याचा प्रयत्न करतो ही बाबच त्याला अन्य प्राण्यांपासून वेगळी पाडते. धर्म ही अशाच अनेक कृत्रीम बाबींपैकी एक कृत्रीम बाब आहे जी मनुष्य निर्मित आहे, निसर्ग निर्मित नाही. धर्माची उपयोगिता सामाजिक रक्षण, पारलौकिक जीवनाची सोय आणि आध्यात्मिक समाधान एवढीच आहे. पारलौकिक जीवन हीसुद्धा एक काल्पनिक संकल्पना असली तरी मृत्युभयाने ग्रासलेल्या माणसांना तो एक मानसिक आधार आहे एवढेच. धर्माशिवाय मनुष्य का नाही याची कारणे माणसाच्या नैसर्गिक दुर्बलतेत आहेत, निसर्गात नाहीत. धर्माशिवाय माणूस पशुसारखा आहे हे विधान धाडसी आहे. ग्रीकांचा धर्म कोणता होता हे विचारले तर आज संघाची पंचाईत होऊन जाईल, कारण ज्याला धर्म म्हणता येईल असा धर्म ग्रीकांनी मुळात स्थापनच केला नाही अथवा अवलंबिला नाही. पण ग्रीकांनी प्रत्यक्षप्रमाणदर्शी विज्ञान व तत्वज्ञानाचा पाया घातला, एक अवाढव्य संस्कृती निर्माण केली हे नाकारता येणार नाही. किंबहुना धर्म ही गुढवादी व भयवादी लोकांची उपज असते. ती मानवाच्या अस्तित्वाची पुर्वअट असती तर जगात वेगवेगळे धर्म नसते...अनेक नष्ट झाले नसते व नवीन स्थापनही झाले नसते. धर्मातच एकरुपता असती. वैविध्य नसते. आणि धर्म एकमेकांचे शत्रूही झाले नसते.

थोडक्यात धर्म हा माणसांच्या जीवनाचा मनुष्यनिर्मित आधार आहे, निर्मिती आहे. ती दैवी नाही. धर्माशिवाय मनुष्य पशू असतो हे विधान धाडसी आहे आणि धर्माचे अतिरेकी महत्व वाढवणारे आहे. आधुनिक काळात सर्वच मानवजात बुद्धीवादी होत धर्माची आवश्यकता क्रमश: कमी नेतील अशा तत्वज्ञानाची आवश्यकता आहे. वाढवण्याची नाही.

दुसरे म्हणजे समरसता म्हणजे सर्व समाजाच्या मानसिक वृत्तीची एकरुपता असा अर्थ पतंगेंना अभिप्रेत आहे. समरसतेच्या अर्थात एवढीच बाब येत नसून समरसता म्हणजे व्यक्तीगत अस्तित्वांचे सामुदायिक हिताच्या कार्यात विसर्जन. मानसिक एकरुपता या विसर्जनाखेरीज शक्य नाही हे उघड आहे. येथे एक बाब लक्षात घ्यायला हवी ती अशी किहिटलरने थर्ड राईशची कल्पना वापरतांना समरसतेचाच उपयोग केला होता. तो म्हणतो राष्ट्रीयत्वाचा एकरुप आत्मा आणि सामाजिक न्यायाची भावना जर्मन तरुणांच्या हृदयात अशा रितीने एकवटवली पाहिजे कि सर्व जर्मन समाज एकमेकांशी समान प्रीत, समान अभिमान, समान वंश आणि समान आकांक्षा या प्रेरणांनी एकत्रीत होईल आणि अशारितीने अपराजित आणि अभंग राहील. (माईन कांफ, हिटलर, पृष्ठ ३८७) हिटलर एका परीने अगदी जर्मन लोकांच्या समरसतेबाबतच बोलतो आहे. डा. हेडगेवारही काही वेगळे सांगत आहेत असे नाही. हेडगेवारही जवळपास तेच म्हणत आहेत. समान इतिहास, समान आकांक्षा, समान मूल्यविचार ई. काही वेगळे बोलत नाहीत. कदाचित हेडगेवारांची हिटलरच्या अंतिम ध्येयाशी सहमती नसेल हे आपण येथे गृहित धरुयात. पण तरीही या तत्वांचाही विचार केला पाहिजे.

पहिली बाब म्हणजे कोणत्याही मानवी घटकांचा इतिहास समान असु शकत नाही. भारताला (अथवा हिंदुंना) समान इतिहास आहे हे विधान मुळात भावनिक पण अनैतिहासिक आहे. समान इतिहास म्हणजे सर्वांना समान वाटणा-या ऐतिहासिक घटना नव्हेत तर सर्वांनीच इतिहासात जे गाजवले अथवा जे भोगले ते समान असणे होय. कारण इतिहासाकडे राह्ट्रीय अथवा धार्मिक दृषटीने पाहता येत नाही. एकार्थाने मग सर्वांचाच इतिहास जागतिक बनतो, त्याला पृथक करता येत नाही. राष्ट्र-धर्म या आधारावरही नाही. समान इतिहास हा कोणत्यातरी भौगोलिक एककातील सर्वच लोकांचा सर्वांनीच भोगलेला इतिहास. भारत हे त्या दृष्टीने कधीच राष्ट्र नसल्याने भारतातील असंख्य राज्ये/साम्राज्ये व त्यांचे भुभाग याचा इतिहास एवढा वेगवेगळा आहे कि भारतीय उपखंडाच्या इतिहासाला समान इतिहास म्हणता येणार नाही. त्याला राष्ट्रीय इतिहासात गुंफण्याचा प्रयत्न वरकरणी स्तुत्य वाटला तरी शेवटी त्याचे विवेचन तुकडे करुनच करावे लागते, ते अनेकदा परस्परांच्या विरोधात असते आणि म्हणूनच त्याला "समान इतिहास" म्हणता येत नाही कि ज्यायोगे लोक एकत्र संघटित होतील.

तीच बाब मुल्य विचारांची. कोणाची मुल्ये अनुकरणीय ह नेहमीच तीढा असतो. कृष्णाची मुल्य रामाच्या मुल्यांसारखी नाहीत. बुद्ध-महावीरांची मुल्य-विचारसरणी पुन्हा वेगळाच छेद देते. अवैदिकांची पिढ्यानुपिड्या जपलेली एक मुल्यव्यवस्था आहे. वैदिक मुल्यव्यवस्था पुन्हा वेगळीच बाब आहे. यात समानतेचे काही बिंदू सापडून त्याची रेखा बनवता येईल. नाही असे नाही. पण हे पुन्हा स्वतंत्र धर्म आहेत. कारण मुल्यरचना ही जर धर्माशी निगडित करायची असेल तर कोणत्या धर्माची मुल्यरचना...हा प्रश्न उद्भवतो. बौद्ध, वैदिक, अवैदिक, जैन, शीख हे सारे हिंदू धर्मांतर्गत येतात असे समजून जरी सर्वांच्या मुल्यांची मोट बांधली तर अधिकच गोंधळाची स्थिती निर्माण होते. मुळात आम्ही हिंदू आहोत हे किती बौद्धांना मान्य होईल? आम्ही हिंदू आहोत असे वैदिकांचे म्हणने असेल तर ते वैदिक अधिकारांचा त्याग करायला किती सज्ज होतील? वर्णव्यवस्थेकडे पतंगेही निषेधाने पहात नाहीत. ज्या वर्णव्यवस्थेचा जन्म ज्या पुरुषसुक्तातून झाला ते पुरुषसुक्त वैदिक पुरोहित मंडळी अवैदिक देवतांसमोत निरलसपणे म्हणत असते. त्याबद्दल या समरसतेच्या तत्वज्ञानात स्पष्ट विधाने हवी होती. हिंदू व्हायचे असेल तर मुळात अशा बाबी आधी हद्दपार करायला हव्यात याचे भान या समरसता तत्वांत आहे काय हा प्रश्न निरुत्तरीत राहतो हे येथे लक्षात घेतले पाहिजे. पतंगे वर्णव्यवस्थेचे खापर मनुस्मृतीवर फोडतात, पण ही व्यवस्था हिंदू व्यवस्था नाही तर वैदिक व्यवस्था आहे आणि ती नेहमीच वैदिकांपुरतीच (आजही) सीमित आहे हे लक्षात घ्यायला हवे. मनुस्मृतीतील शूद्र म्हणजे वैदिकांच्या परंपरागत सेवकवर्ग. (पहा राजवाडॆ, भांडारकर, दांडेकर, राज पृथी.)  त्यांना धनसंचयाचे अधिकार नव्हते व उष्टे अन्न ते जुनी वस्त्रे द्यावीत हा जो मनुचा नियम आहे तो इतर अवैदिकांना (हिंदुंना) लागू असता तर भारतात नंद, मौर्य, सातवाहन, यादवादि अवैदिक सम्राट झाले नसते हे उघड आहे. तेंव्हा वैदिक स्मृत्यांना हिंदुंशी जोडण्यात काय अर्थ आहे? सांस्कृतिक आकलन चुकले तर त्यावरचे उपायही चुकणार हे उघड आहे. अवैदिकांचे माहात्म्य घटण्याची धार्मिकतेपेक्षा इतर अनेक वेगळी कारणे आहेत. पण वैदिकांचेही सांस्कृतिक माहात्म्य कायम अबाधित राहू शकलेले नाही हेही लक्षात ठेवायची गरज आहे.

समान इतिहास आणि धर्माविषयी समान धारणा ही डा. हेडगेवारांनी सांगितलेली संघटनाविषयीची मुलतत्वे कितपत उपेगी ठरतील हे वरील परिप्रेक्ष्यात पाहिले पाहिजे. हा सांस्कृतिक व धार्मिक गोंधळ संपला पाहिजे हे मान्य करुयात. पण त्यासाठी नेमकी काय उपाययोजना आहे? अवैदिकांना वेदाधिकार देऊन हा गोंधळ मिटवू असे वरकरणी म्हणता येईल, पण आता तो अधिकार द्यायची वेळ कधीच टळून गेली आहे. सुधारणांची सर्वाधिक गरज वैदिक धर्मियांना आहे. त्यांनाही त्यांच्या फुले-बाबासाहेबांची गरज आहे. ते असो. हा वेगळा मुद्दा झाला. पण समान इतिहास सर्व समुदायांचा आहे हे खरे नाही आणि धर्माविषयी समान धारणा हाही मुद्दा खरा नाही.

आता आपण संघटनाच्या मुद्द्याकडे वळुयात. संघटनात एक विचार, एक आचार आणि एक आकांक्षा इत्यादि मुल्यांचा समावेश होतो हे आपण सर्वच संघटनांच्या बाबतीत पाहु शकतो. मग त्या कम्म्युनिस्ट असोत कि ख्रिस्ती. किंबहुना प्रत्येक संघटना ही आपल्याच विशिष्ट विचारधारेचे अनुयायी वाढवण्याच्या प्रयत्नांत असते हे आपण जगभर पाहू शकतो. त्या अर्थाने प्रत्येकाला "समरस" झालेले अनुयायी हवे असतात. कोणी त्यासाठी बौद्धिके घेईल तर कोणी क्यडर क्यंप चालवील. उद्देश्य एकच असतो. त्या अर्थाने हेडगेवार (अथवा गोळवलकर) वेगळे बोलत आहेत असे नाही. पण ते संघटनेसाठी व त्यापुरतेच खरे आहे. समस्त मानवीसमुदायाला (ते धर्मीय/राष्ट्रीय का असेनात) ही तत्वे कशी मान्य होतील हा खरा प्रश्न आहे.

पतंगे म्हणतात, " हिंदू संघटन याचा अर्थ जातीपाती, पंथ, भषा इत्यादी भेदांच्या वर उठून आपली ओळख हिंदू म्हणून स्विकारणे ही होय. वर्ण अथवा जातीय अस्मिता कायम ठेवून हिंदू संघटन करणे अशक्य आहे."

किंबहुना समरसता जी हवी आहे ती हिंदू संघटनासाठी. जाती-वर्ण यांचा विलय करत प्रत्येकाने आपली ओळख निखळ "हिंदू" ठेवावी असा ध्येयवाद या विधानात आहे. जात आणि वर्ण या संकुचित अस्मिता होत असेही पतंगे म्हणतात. (पृष्ठ ९७) वर्णाने अस्मिता बाळगणारे तीन गट या देशात आहेत. ते म्हणजे ब्राह्मण, क्षत्रीय आणि वैश्य. यात ब्राह्मण वगळता अपवादाने उर्वरित दोन वर्णांना "वर्ण" म्हणून वैदिक धर्माधिकार आहेत. शुद्रांना ते अधिकार ते वैदिक नसल्याने कधीच नव्हते. आजही नाहीत. आणि त्यांना शुद्र हे नाव वैदिक्जांनी दिले आहे, त्यांनी स्विकारलेले नाही. अवैदिक आपली ओळख आपल्या जातीने करुन देतात. "मी शूद्र आहे" अशी ओळख अवैदिक कधीच करुन देत नाहीत कारण मुळात ती त्यांची ओळखच नाही. ब्राह्मण, क्षत्रीय व वैश्य अशी ओळख ठेवणारे अस्तित्वात आहेत. त्यामुळे वर्णीय ओळख विसरणे ही वेगळी बाब झाली आणि जातीय ओळख पुसणे ही दुसरी बाब झाली. समजा या दोन्ही ओळखी पुसत एकमात्र "हिंदू" हीच ओळख ठेवायची तर यत्किंचितही भावनिक न होता प्रत्यक्ष स्थितीचा विचार केला पाहिजे.

आपण काही प्रश्न निर्माण करत यावर विचार करुयात. वर्णाची ओळख संपवली तर तिन्ही वर्णाचे निहित असे अधिकार आणि अस्मिता सोडणे हा पुर्वअट झाली. याच अस्मिता पाहिल्या तर या वर्णीय अस्मितांत ब्राह्मणाने ब्राह्मणाचे अधिकार आणि अस्मिता का सोडायच्या हा प्रश्न उरतो आणि कोणता ब्राह्मण, क्षत्रीय अथवा वैश्य याचे उत्तर देईल आणि अस्मिता सोडेल? अपवाद असतात पण ते संघ आणि संघाबाहेरही आहेतच. संघविचाराने अथवा समरसता विचारांनी प्रेरीत समजा कोणी या अस्मिता सोडत असेल असे म्हणता तर मग विनय सहस्त्रबुद्धेंसारख्या माणसालाही "आम्ही संघात जातपात मानत नाही...पण धारावीतील मातंगाघरी गेलो होतो..." असे का सांगावे वाटते? ते जाऊद्या, संघाबाहेरच्या जात्युच्छेदकता हेच आपले ध्येय मानतात अशा (संघविरोधी...ब्राह्मण विरोधीही) चळवळीतील विचारवंतही विचारमंचांवरुन (व्यासपीठ हा शब्द काहींना खटकतो. मला नाही) वक्त्यांची ओळख करुन देतांना त्यांची जात का सांगतात?

माझे उदाहरण नाईलाजाने देतो. माझी जात निकटवर्तीय वगळता कोणाला माहित नाही. दोन अशाच कार्यक्रमात माझी जात मंचावरुन विचारली गेली...कारण मी सांगत नाही. मग काहींना (मी ओबीसी प्रश्नावरील चर्चेत भाग घेतल्याने) मी ओबीसी असल्याचे साक्षात्कार झाले आणि आता "सोनवणी तुम्ही ओबीसी आहात हे समजले, जातही लवकर समजेल..." असे म्हटले गेले. काही मंडळी सोशल मिडियावरुन स्वत:ची ओळख "मी जात विसरलो...पण मी पुर्वाश्रमीचा  अमुक" अशी करुन देत आता "मी माझी जात सांगितली...आता सोनवणींनी आपली जात सांगावी..." असे जाहीर आवाहन करतात आणि असे आवाहन करणारा सद्गृहस्थ चक्क प्राध्यापक!

मला वाटते, हिंदू संघटनाचे ध्येय बाळगणा-यांनी आपण कोठे चूकत आहोत हे पाहिले पाहिजे. पहिली चूक आहे ती मुळात समरसतेच्या तत्वज्ञानात हे समजले पाहिजे. लोक सहजी वर्ण सोडतील, वैदिकता विसर्जित करतील आणि लोक जातीही विसर्जित करतील हा भाबडेपणा (किंवा कावेबाजपणा) झाला. हे करण्यासाठी समरसतेचे तत्वज्ञान सांगितले, प्रसार केला कि झाले हा मिथ्याभ्रम आहे. मुळात समरसतेचे तत्वज्ञान भ्रम वाढवण्यासाठी असते, संपवण्यासाठी नव्हे.

समरसतेत मुळात मानवी प्रेरणांचा विचार केला गेलेला नाही. त्यांच्या वास्तवाचा विचार केलेला नाही. संघाची ही मोठी गफलत आहे. "समरसतेच्या भावनेने संचित वारसाचा स्वीकार केला जातो आणि समरस होऊन त्या वारसात भर घातली जाते. मानवी संस्कृतीचा विकास त्यातून घडत जातो. समरसता आणि संस्कृती विकास यांचा अशा प्रकारचा अतूट संबंध आहे." असे श्री. पतंगे म्हणतात. (पृष्ठ १६) आणि पुढे पतंगे पं दीनदयाळ उपाध्यायांचा हवाला देत म्हणतात "वैचारिक संघर्ष हा आपला जीवनमार्ग बनू शकत नाही. निरंतर संघर्ष हा समतेचा आधार बनू शकत नाही. मानवी समरसतेसाठी देवाणघेवाण, दुस-याचे चांगले स्विकारायची मनोवृत्ती, विविध विचारांतील ऐक्य शोधणे, दुस-या भाषेत विविधतेत एकता शोधणे आवश्यक ठरते." (पृ. ३१)

खरे म्हणजे यात मोठाच विरोधाभास आहे. पहिली बाब म्हणजे संस्कृती म्हणजे काय? माणसाची विविधांगी अभिव्यक्ती म्हणजे संस्कृती अशी थोडक्यात कोणत्याही संस्क्रुतीची व्याख्या करता येते. संस्कृती हे स्थिर, स्थायी आणि अपरिवर्तनीय कधीच नसते. नुसत्या वैदिक संस्कृतीचा विचार केला तर ती किमान तिनशे ते पाचशे वर्ष घडण्याच्याच स्थितीत होती. नंतर येतो तो तिचा भारतात पसरण्याचा काळ आणि त्यातही नंतर झालेली परिवर्तने. सिंधू संसकृतीही एका रात्रीत बनली नाही. कोणतीही संस्कृती नवविचारांच्या प्रकटीकरणांतून घडत जाते. समरसतेचा भाव आला कि नवपरिवर्तनाचा संबंधच येत नाही. समरसता नवनिर्मितीतील सर्वात मोठा अडसर आहे. एकदा आहे त्यात व मागच्या इतिहासाशी समरस झाले कि नवनिर्माण करणे म्हणजे मागच्या संस्कृतीला आव्हान देणे कसे होईल? समरस होऊन वारशात भर घालता येत नाही तर आहे त्याला आव्हान देऊन भर पड्ते.

न्युटन आधीच्या सिद्धांतकांशी समरस झाला कि तो नवा सिद्धांत मांडू शकणार नाही आणि आईन्स्टाईन न्युटनशी समरस झाला तर तो नवे सिद्धांत मांडू शकणार नाही. समरस लोक संस्कृत्यांचे अंध पाईक असतात तर स्वतंत्र विचार करणारे असमरसच संस्कृतीला पुढे नेतात. त्यासाठी वैचारिक संघर्ष अपरिहार्य असाच असतो. उपाध्याय म्हणतात त्याप्रमाणे नव्हे. वैचारिक संघर्ष नसता तर बुद्ध-महावीर-चार्वाक ई. घडले नसते. किंबहुना वैचारिक संघर्षच मानवी संस्कृतीला अग्रगामी, पुरोगामी बनवणारा महत्वाचा आधारस्तंभ आहे. समरसता हा महामार्ग बंद करु इच्छिते हे श्री. पतंगे यांच्या विधानांवरुनच दिसतेस.

समरस लोक संस्कृतीच्या विकसनातील मोठे अडथळे होत. आणि गंमत म्हणजे "दुस-यांचे चांगले शोधायची वृती...समरसतेत सारे जर एकरस आणी एकाकार आहेत तर "दुसरे" कोठुन आले?

मला वाटते मिथ्याविज्ञान आणि मिथ्यातत्वज्ञानातुन मानवी जीवनाचे, हिंदुंचेही, प्रश्न सुटणार नाहीत.  कारण ज्या आधारावर हे तत्वज्ञान बनलेले आहे ते आधार घेत संस्कृती पुढे जाणे तर दुरच....आहे तेथ्गेच ठप्प होईल...आणि ज्यासाठी समरसता हवी असे म्हटले जाते ते प्रश्नही सुटणार नाहीत.

पुढच्या भागात बुद्ध ते शाहू-आंबेडकरांचे विचार कसे समरसतेला उपयुक्त अथवा समर्थक आहेत हे पतंगेंचे विश्लेशन पाहुयात. येथे एवढेच म्हणेल, एकता हवी कि नको? मी एकतेच्याच बाजुने आहे. आपली कधी नव्हे ती निकड बनली आहे. एवढेच कि समरसता  हा मार्ग नाही. कसा...ते पुढील भागात!


यानंतरचा भाग वाचण्यासाठीए येथे क्लिक करा.

http://sanjaysonawani.blogspot.in/2015/06/blog-post_8.html

2 comments:

  1. समाज खरच सारासार विवेकशील होत राहील. तसा तो मध्यम मानसिकतेत असतोच. ती नैसर्गिकच बाब आहे. तरुणाईत तर हेच विचार अतिशय उस्फुर्त उर्जावान नवीन दिवस व नवीन समस्यांना सामोरे जातांना उपयोगी पडत आहेत. त्यांची धारणाही या विश्लेषण पध्दतीने पक्की होईल. त्यांना शब्द उत्कृष्ट मांडणी विचार छेद करण्याची ताकद नक्कीच मिळेल. अभय वांद्रे मुंबई

    ReplyDelete
  2. अतिशय मार्मिक विश्लेषण

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...