Friday, February 12, 2016

मला समाजाच्या इतिहासात रस आहे.

Niranjan C. Pradhan, my friend has asked me a question, "खर आहे संजयसाहेब. आपलीच प्रत्येक जातीवर लिहिलेली पुस्तकं आहेत. त्यात लिहिलेला इतिहास खरा आहे, त्याबाबत वादच नाही. पण त्यामुळे स्वतःच्या जातीबाबत अभिमान / दुराभिमान वाढतच जातो. मग आपल्यात व ब्राम्हणांमधे फरक तो काय ?"
My reply is...
निरंजनजी, हा एक विचित्र तीढा आहे. मुळात अगणित समाजांना आपला कसलाही इतिहास माहितच नाही. ठरावीक समाजांचा माहित आहे. तो किती खरा किती खोटा या वादात न जाताही, अनेकांना आपल्याला इतिहासच नसावा असे वाटावे अशी आपल्या एकंदरित इतिहासाची पद्धत आहे. त्यामुळे आपण या व्यवस्थेत नगण्य होतो असा समज फार जाती-जमातींत आहे. आम्ही हजारो वर्ष असेच पिचलेलो, हरलेलो आणि शोषलो गेलेलो होतो असाही समज भारतात अनेक घटकांत व्यापक आहे. न्य़ुनगंडाने हे समाज शिकार होतात. खरे तर प्रत्येक समुहघटकाचे भारतीय संस्कृतीत महत्वाचे योगदान आहे. पण ते कोणी सांगितलेले नाही. ते कष्टही घेतलेले नाहीत. त्यंचा इतिहास शोधल्याने, तो सांगण्याने दुराभिमान तर दुरच, किमान न्यूनगंड राहणार नाही असा प्रयत्न कोणी करायचा? आपण इतर समाजांना तुच्छ समजत हेटाळणीनेच वागवत असू तर तो दोष कोणाचा? आणि प्रत्येकाला इतिहास असतोच. प्रत्येक समाजाचा इतिहास हा अपरिहार्यपणे सर्वच समाजाचा इतिहास असतो हे आपण लक्षात घ्यायला हवे कारण कोणताही समाज सर्वस्वी एकाकी (Isolated) नसतो.
आपापली पाळेमुळे शोधायची आस सर्वांतच असते. आर्यांच्या मुलस्थानाचा (किंवा आर्यभाषा बोलणा-यांच्या मुलस्थानाचा) शोध वैदिक आणि युरोपियन आजही तेवढ्याच उमेदीने, आपापले सिद्धांत अनेकदा बदलत घेतच आहेत हे वास्तव नाही काय? मग अन्य समुहांनी आपापला इतिहास, आपापली पाळेमुळे शोधली तर कोठे बिघडले? खरे तर अजून त्यांनी सुरुवातही फारशी केली नाही. आर्यवाद्यांच्या प्रभावात त्यांनी फक्त आपली विरोधी भुमिका नोंदवली आहे. जातीचा इतिहास म्हणजे त्या-त्या व्यवसायाचा इतिहास असे मानत मी अनेक जातींचा इतिहास लिहिला आहे आणि लिहित राहील आणि त्याचा हेतू जातीचा दुराभिमान वाढवणे नव्हे तर त्या-त्या जातींना त्यांचे ऐतिहासिक सांस्कृतिक योगदान सांगत न्य़ुनगंडाच्घ्या भावनेतून बाहेर काढणे हे आहे. दुराभिमान कोणाला वाटावा अशी माझी यत्किंचितही इच्छा नाही किंवा तशी माझी मांडणीही नाही. त्यामुळेच कदाचित माझी मांडणी अनेक जाती समुहांना मान्यही नाही. मान्य असणे किंवा अमान्य असणे ही वेगळी बाब असून त्यातून प्रत्येक समुहाला आपापला गतकाळ धुसर का होईना, पण खरा दिसावा अशी माझी तळमळ आहे. त्यातून भारतीय संपुर्ण जाती-जमात समुदाय हा ताठ मानेने जगेन असे मला तरी वाटते.
हे काम अनावश्यक वाटु शकते. पण इतिहासात तुटलेले दुवे शोधायचे काम कोणा-ना-कोणाला तरी करावेच लागते. मी हे अनावश्यक कार्य करत आहे असे समजायला हरकत नाही. पण ९०% लोकांच्या इतिहासाखेरीज भारताचा इतिहास पुर्ण कसा होणार? कोठे आहे तो इतिहास? आपल्याकडे आहेतो राजकीय आणि धार्मिक इतिहास. समाजांचा इतिहास शोधणे हे फार महत्वाचे आहे असे मला वाटते कारण तेच सामाजिक घटक आज जिवित आहे...त्या काळचे राजकारण आणि तेंव्हाचे जेही असेल ते धर्मकारण आज कुचकामी आहे.
मला समाजाच्या इतिहासात रस आहे.

1 comment:

  1. परशुराम खरा कि खोटा कोण जाणे पण त्याची जयंती मोठ्या हिरहिरीने कोण साजरी करते?

    ReplyDelete

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...