Sunday, March 11, 2018

संस्कृत नव्हे, मराठीच अभिजात भाषा!


संस्कृत नव्हे, मराठीच अभिजात भाषा!
रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखालील अभिजात मराठी समितीने बनवलेल्या २०१३ च्या अहवालात काही त्रुटी आहेतच आणि समितीमधील काही संस्कृतनिष्ठ विद्वानांमुळे त्या निर्माण झाल्या असाव्यात, अशी शंका यायला बरीच जागा आहे. उदाहरणार्थ वि. वा. मिराशींनीच स्पष्ट केलेले असूनही नाणेघाट शिलालेखातील ‘महारठी’ हा शब्द भाषावाचक नसून पदवाचक आहे हे समितीने लक्षात घेतलेले नाही.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून गेली पाच-सहा वर्षे मराठी भाषाप्रेमी व भाषा अभ्यासक मागणी करीत आहेत. संस्कृत हीच आर्यभाषांची जननी आहे असे मानणारे काही भाषिक वर्चस्ववादी अर्थातच या मागणीला मोठी खीळ घालत आहेत. मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी एक कोटीच्या वर मराठी भाषकांनी समर्थन दिले आहे. तरी अभिजाततेचा दर्जा अद्याप दृष्टिपथात नाही. कोणतीही भाषा अभिजात आहे याचा अर्थ ती प्राचीन, स्वतंत्र आणि साहित्यसंपन्न असते. अभिजाततेचा दर्जा मिळणे म्हणजे भाषिक व सांस्कृतिक न्यूनगंडापासून व दुय्यमपणापासून सुटका होणे. मराठीला संस्कृतच्याच वर्चस्वतावादी मानसिकतेत ठेवण्याचे प्रयत्न नवीन नाहीत. संत एकनाथांनीही संस्कृत भाषा देवांपासून झाली, मग प्राकृत चोरांपासून झाली का, हा रोकडा प्रश्न विचारला होता. भाषिक व म्हणूनच सांस्कृतिक न्यूनगंडास दूर हटवण्यासाठी नेमका हाच प्रश्न महत्त्वाचा होता व आहे.

खरे तर मराठी अथवा महाराष्ट्री प्राकृताच्या उगमाबद्दल अनेक विद्वानांनी चर्चा केलेली आहे. जे. ब्लॉख यांनी १९१४ साली लिहिलेल्या “फॉर्मेशन ऑफ मराठी लँग्वेज’ या पुस्तकात फार महत्त्वाची निरीक्षणे नोंदवलेली आहेत. थोडक्यात ती अशी : ऋग्वेदाच्या प्राचीन संपादकांनी अन्य बोलीभाषांना आत्मसात करत अथवा त्यापासून उधारी करत ऋग्वेदाची वैशिष्ट्यपूर्ण भाषा घडवली आहे. (पृ.२) मराठी ही सरळ महाराष्ट्री प्राकृताशी नाते सांगते. अन्य प्राकृत भाषांचा प्रभाव नगण्य आहे. मराठीचे ध्वनिशास्त्र गुंतागुंतीचे व अन्य आर्यभाषांपेक्षा स्वतंत्र आहे. (पृ ४५), अनेक प्राकृत घाट संस्कृतात घुसले आहेत. संस्कृत ही स्वतंत्र भाषा नसून मिश्र भाषा आहे. (पृ. ४८) हेमचंद्र ज्यांना अपभ्रंश भाषा म्हणतो त्या भाषांचा मराठीशी काहीही संबंध नाही तर मराठीचा संबंध थेट प्राचीन प्राकृताशीच आहे. (पृ. ३०-३१) प्राकृत म्हणजेच महाराष्ट्री प्राकृत. शौरसेनी, मागधी, अर्धमागधी वगैरे अन्य प्राकृत भाषा दुय्यम आहेत. मराठीचा पाया स्थानिक वैशिष्ट्यपूर्ण प्राचीन बोलींचा आहे जो अन्य भाषांत समांतरपणे आढळत नाही. (पृ.३२) सातवाहन काळात स्थानिक प्राकृत राजभाषा व साहित्यभाषा बनली व तिला वैभव आले. भारतातील कोणतीही भाषा कोणावर लादली गेल्याचे भाषाशास्त्रीय उदाहरण मिळत नाही. (पृ. ४४). मी येथे ब्लॉख यांनी दिलेली अत्यंत थोडकी उदाहरणे घेतली आहेत, पण ती मराठी भाषेच्या स्वतंत्र वास्तवावर प्रकाश टाकण्यास पुरेशी आहेत.

खुद्द ऋग्वेदात अनेक प्राकृत प्रयोग आलेले आहेत. किंबहुना प्राकृत आणि अवेस्तन शब्दांचेच सुलभ ध्वनीबदल करीत वैदिक संस्कृत व नंतरचे संस्कृत बनले आहे. अहुरऐवजी असुर, मिथ्रऐवजी मित्र अशी अवेस्तन शब्दांचे ध्वनीबदल केल्याची असंख्य उदाहरणे देता येतील. इंद्रऐवजी इंद, वृंद ऐवजी वुंद असे मूळचे प्राकृत प्रयोग ऋग्वेदात जसेच्या तसेच राहिलेले आहेत. व्याकरणाचा पायाही प्राकृतच असल्याचे अनेक उदाहरणांवरून आढळून येते. उदा. देवास:, सत्यास: ऐवजी देवा:, सत्या: इ. खरे तर ऋग्वेदाची भाषा अवेस्तन (प्राचीन पर्शियन) आणि भारतातील स्थानिक प्राकृत यांचे मिश्रण आहे. एवढेच नव्हे तर ऋग्वेदातील ६% शब्द द्रविड व मुंड भाषेतून वैदिक संस्कृतात उधार घेतलेले आहेत. “भाषेचं मूळ’ या माझ्या पुस्तकात मी संस्कृत भाषा इसपू पहिले शतक ते इसवी सनाचे दुसरे शतक या काळात कशी क्रमश: विकसित होत गेली हे ग्रांथिक, शिलालेखीय व नाणकशास्त्रीय पुराव्यांवरून साधार दाखवले आहे. त्या दृष्टीने संस्कृत हीच आधुनिक भाषा ठरत असून प्राचीन प्राकृत भाषांवर संस्कार करत ही नवी भाषा बनवलेली आहे. परंतु ती आधुनिक असूनही तिला अभिजात दर्जा आणि ज्यापासून ती बनली त्या महाराष्ट्री प्राकृताला व त्या भाषेची थेट वंशज असलेल्या मराठीला मात्र अभिजात दर्जा नाकारणे हे कर्मदरिद्रीपणाचेच नव्हे तर भाषाशास्त्रीय दृष्टिकोनही नसल्याचे निदर्शक आहे.

त्यामुळे संस्कृत भाषा अपभ्रंश स्वरूपात येऊन प्राकृत (पाअड) भाषा बनल्या हे इंडो-युरोपीय भाषा सिद्धांत मांडणाऱ्या या पाश्चात्त्य व एतद्देशीय संस्कृतनिष्ठ विद्वानांचे मत टिकत नाही. उलट मूळ प्राकृत शब्दांचेच उच्चारसुलभीकरण करीत संस्कृत विकसित होत गेली हे बुद्धिस्ट हायब्रीड संस्कृत ग्रंथ, शिलालेखीय ते नाण्यांवरील भाषेतून सिद्ध होते. महाराष्ट्री प्राकृतात हालाचा ‘गाथा सतसई’ हा अनमोल काव्यसंग्रह जसा उपलब्ध आहे तसेच ‘अंगविज्जा’ हा तत्कालीन समाजजीवनावर प्रकाश टाकणारा इसवी सनाच्या पहिल्या शतकातील गद्य ग्रंथही उपलब्ध आहे. या भाषेतील शब्द व व्याकरण पूर्णतया स्वतंत्र असून ते संस्कृताचे रूपांतरण नव्हे. समजा तसे असते तर या प्राकृत शब्दांआधीचा त्यांच्या मूळ संस्कृत स्वरूपाचा लिखित अथवा शिलालेखीय पुरावा अस्तित्वात असला असता. पण अगदी वैदिक धर्माचे आश्रयदाते असलेल्या शुंग कालातील शिलालेखही स्वच्छ प्राकृतात आहेत. ‘गाथा सप्तशती’चे संपादक स. आ. जोगळेकरांनाही सातवाहनांनी केलेल्या यज्ञांचे वर्णन प्राकृतात कसे, हा प्रश्न पडला होता व त्यांनी या ग्रंथाच्या प्रस्तावनेत तो नमूदही केला. शुंगांच्याही अश्वमेध यज्ञाचे वर्णन प्राकृतात आहे. मुळात जी भाषाच अस्तित्वात नव्हती त्या संस्कृत भाषेत त्यांचे वर्णन कसे करणार? आणि मग संस्कृत शब्दांचे अपभ्रंश म्हणजे प्राकृत असा अर्थ पुराव्यांच्या अभावात कसा काढता येईल? संस्कृत भाषा व तिचे पाणिनीकृत व्याकरण गुप्तकाळात सिद्ध झाले. तिसऱ्या शतकानंतर मात्र आधी द्वैभाषिक (प्राकृत लेख व त्याचा संस्कृतमधील अनुवाद) व नंतर संस्कृत शिलालेख/ताम्रपटांचा विस्फोट झालेला दिसतो हे येथे लक्षात घ्यायला पाहिजे. असंख्य प्राकृत ग्रंथांची भाषांतरे अथवा छाया याच काळात झाल्या. गुणाढ्याच्या ‘बृहत्कथे’चेच काय पण “प्राकृतप्रकाश” या वररुचिकृत प्राकृत व्याकरणाचेही संस्कृत अनुवाद झाले. याचे कारण संस्कृत ही ग्रंथव्यवहाराची मुख्य भाषा बनली. असे असले तरी प्राकृतातही समांतरपणे ग्रंथनिर्मिती होतच राहिली, त्यामुळे प्राकृत व्याकरणाचाही अभ्यास गरजेचा बनला.

रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखालील अभिजात मराठी समितीने बनवलेल्या २०१३ च्या अहवालात काही त्रुटी आहेतच आणि समितीमधील काही संस्कृतनिष्ठ विद्वानांमुळे त्या निर्माण झाल्या असाव्यात, अशी शंका यायला बरीच जागा आहे. उदाहरणार्थ वि. वा. मिराशींनीच स्पष्ट केलेले असूनही नाणेघाट शिलालेखातील ‘महारठी’ हा शब्द भाषावाचक नसून पदवाचक आहे हे समितीने लक्षात घेतलेले नाही. या अहवालात आधी संस्कृत शब्द व नंतर त्यांची प्राकृत रूपे दिल्याने मराठी ही संस्कृतोद्भवच आहे की काय, अशी शंका निर्माण होते. मुळात जुन्या काळातील संस्कृत हीच आद्य भाषा या समजाखाली असलेल्या विद्वानांचेच लेखन संदर्भ म्हणून वापरल्याने व अन्य उपलब्ध पुराव्यांकडे पठारे समितीतील संस्कृतनिष्ठांनी दुर्लक्ष केल्याने अशा अनेक त्रुटी निर्माण झाल्याचे दिसते. संस्कृत ही अतिप्राचीन भाषा हा समज बाळगणे काहींसाठी सोयीचे असले तरी तसे प्रत्यक्ष पुरावेच उपलब्ध नाहीत आणि स्वसंतुष्टीकरण करणारे (गैर)समज म्हणजे पुरावे नव्हेत, याचे भान ठेवले गेलेले नाही.

पाअ पडिस्स (पाया पडतो), दिअर (दीर, हिंदीत देवर), खखरात वंस निर्वंस करस (क्षहरात वंश निर्वंश केला) असे असंख्य प्राचीन प्राकृत भाषाप्रयोग व शब्द आजतागायत नैसर्गिक ध्वनीबदल स्वीकारत पण अर्थ तोच ठेवत चालत आले आहेत. यातील एकही शब्द मूळ संस्कृतमधील नाही तर असे अनेक शब्द संस्कृतनेच ध्वनीबदल करत उधार घेतल्याचे दिसते. महाराष्ट्री प्राकृताचा प्रभाव आजच्याही भाषेवर प्रामुख्याने असून याच (व अन्य प्राकृत/द्रविड) भाषेतून संस्कृतची निर्मिती झाली असल्याने प्राकृत भाषाच संयुक्तरीत्या संस्कृतच्या जनक ठरतात. संस्कृतची निर्मिती ग्रांथिक कारणासाठी झाल्याने संस्कृत भाषेत कालौघातील अपरिहार्य असलेले कसलेही बदल दिसत नाहीत. महाराष्ट्री प्राकृत ते आजचे प्राकृत हा प्रवाहीपणा ठेवला असल्याने मराठी भाषाच तामिळप्रमाणे भारतातील खऱ्या अर्थाने अभिजात भाषा आहे, संस्कृत नव्हे, याचे भान ठेवले गेले पाहिजे. मराठी भाषकांना भाषिक व सांस्कृतिक गुलामीच्या भावनेतून बाहेर पडण्यासाठी कंबर कसावी लागेल.

(Published in Divya Marathi) 

2 comments:

  1. चांगले मुद्दे मांडले आहेत. मराठीला अभिजात दर्जा मिळणे दुय्यम आहे, मुख्य प्रश्न हा कि नवीन मराठी पिढीवर हिंदी आणि इंग्लिश चा मारा, जो मराठीचा गळा घोटत आहे. एक मूठभर संस्कृत समर्थकयांचा विरोध सोडले तर मराठीला खरा धोका किव्हा आव्हान हिंदी आणि इंग्लिश चे आहे. त्यात इंग्लिश हे गरजेचे आहे, त्यामुळं ते टाकता येत नाही. हिंदी हि राष्ट्रभाषा असल्याचा खोटा प्रचार करून गली उतरवली गेली. त्यात विदर्भाची नाळ मध्य प्रांताशी जुळलेली त्यामुळे हिंदी चा सुळसुळाट होताना दिसतो. मराठी ला अभिजात दर्जा मिळाला तरी किती फायदा होईल. सध्याची लयाला गेलेली वाचन संस्कृती (त्यात मराठी किव्हा देशी भाषांची स्थिती अजून वाईट) पाहता मराठीचा दैनंदिन वापर, मराठी सिनेमांना चित्रपटगृह मिळवून देणे आणि एक अस्मिता जोपासणे जास्त गरजेचे आहे.

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...