Friday, April 1, 2022

व्यापारी मार्गांना “रेशीम मार्ग” हे नाव कसे मिळाले?



व्यापारी मार्ग प्राचीन असले तरी त्यांना रेशीम मार्ग (सिल्क रूट) ही संज्ञा एकोणीसाव्या शतकात मिळाली. १८७७ साली फर्डीनंड रिक्तोफेन या जर्मन भूगोलतज्ञाने व प्रवाशामुळे ही सद्न्या लोकप्रिय झाली. त्याने चीनला किमान सात वेळा भेट दिली. या मार्गावरून सर्वात मोठ्या प्रमाणात व्यापार व्हायचा तो खूप नफा असलेल्या रेशमाचा त्यामुळे त्याने “रेशीम मार्ग” ही संज्ञा वापरली पण ती केवळ चीन ते इटलीपर्यंत पोचणाऱ्या मुख्य मार्गांपुरतीच मर्यादित होती. पण पुढे सर्वच प्राचीन व्यापारी मार्गांना रेशीम मार्ग म्हणण्याचा प्रघात पडला. पण खरे तर या मार्गांवरून फक्त रेशीमच नव्हे तर घोडे-गुलाम-चहा ते अनमोल रत्नांचा आणि बहुमुल्य लोकरीपासून बनवलेल्या वस्त्रांसहित असंख्य वस्तूंचा व्यापार व्हायचा. आणि हे मार्ग संपूर्ण आशियात जाळ्याप्रमाणे पसरलेले होते. पण हे रस्ते अखेर मिळत ते चीनची तत्कालीन राजधानी चंगन ते पश्चिम आशिया आणि पूर्व युरोपला जाणाऱ्या मूख्य मार्गाला. हा मार्ग किमान चार हजार मैल लांबीचा होता.

तसे पाहिले तर चीनचा पश्चिम आशियाशी व्यापारी मार्गाने पुरातन संपर्क होताच. इसावीपूर्व १००० मधील चीनी रेशमाचा अंश इजिप्तमधील एका दफनात प्राप्त झाला आहे. पण तेंव्हा चीनी प्रशासन हे व्यापारी मार्गांबद्दल जागरूक नव्हते. पण व्यापारी मार्गाचे महत्व त्यांना समजले ते इसपू १३० मध्ये व तेंव्हापासून मध्य आशियातून जाणाऱ्या व्यापारी मार्गावर स्वामित्व प्रस्थापित करण्यासाठी चीनने प्रयत्न सुरु केले. आणि याला निमित्त घडले मध्य आशियातील पूर्वोत्तर भागातील रानटी टोळ्यांशी चीनच्या उडालेल्या संघर्षाचे!

हां घराण्याचा सम्राट वू डी तेंव्हा चीनचा शासक होता. त्याच्या काळात झायन्ग्नू या भटक्या टोळ्यांच्या समुहाने चीनी सीमांना हल्ले करून त्रस्त करून सोडले होते. त्यांच्याशी लढायला तशाच युएझीसारख्या भटक्या टोळ्यांची गरज भासली म्हणून सम्राटाने झांग क्विआन या आपल्या अधिकाऱ्याची नेमणूक केली. युएझी टोळ्या आणि झायन्ग्नू टोळ्यांतही संघर्ष होतच असल्याने आपल्याला त्यांची मदत होईल अशी सम्राट उ डीची कल्पना होती. झांग क्विआन या कामगिरीवर निघाला. युएझी टोळ्यांच्या प्रदेशाकडे जाणारा मार्ग नेमका झायन्ग्नू टोळ्यांनी व्यापलेल्या प्रदेशातून जात होता. त्यांना चुकवत क्विआंग पुढे निघाला खरे पण शेवटी त्याचा माग झायन्ग्नू टोळ्यांना लागलाच. त्यांनी क्विआनच्या पथकावर हल्ला करून त्याला कैद केले. त्याची ही कैद एक-दोन नव्हे तर तब्बल १३ वर्ष टिकली. या काळात क्विआनने मध्य आशियातून होत असलेला व्यापार पाहिला आणि चीनी सम्राटाला त्यांचा अधिक चांगला उपयोग होईल हे त्याने हेरले.

या कैदेच्या काळात त्याने पळून जायचे अनेक प्रयत्न केले पण शेवटी तो यशस्वी झाला. मध्य आशियातील तोवर माहित नसलेल्या मार्गांनी तो पश्चिमेकडे सटकला. तोवर युएझी टोळ्या या बॅक्ट्रिया हे व्यापारी मार्गावरचे उत्तर अफगाणिस्तानमधील महत्वाचे व्यापाराचे केंद्रबिंदू असलेले दहा लक्ष लोकसंख्येचे शहर व राज्य जिंकून तेथे तात्पुरते का होईना पण स्थिर झाले होते. बॅक्ट्रियामधील चारी दिशांनी होणारा व्यापार आता त्यांच्या नियंत्रणाखाली आला होता. चीनी कागदपत्रांमध्ये बॅक्ट्रियाला दाक्शिया असे उल्लेखले गेलेले आहे. क्विआन तेथे आला आणि तेथल्या वैभवाने अक्षरश: स्तिमित होऊन गेला. तेथील बाजारपेठेत  विविध प्रदेशांमधून येणाऱ्या वस्तू पाहून तो चकित तर झालाच पण त्याला तेथे चीनमधून आलेले रेशीम तसेच चौकोनी बांबूही दिसले. या वस्तू येथवर कशा पोचल्या याची त्याने चौकशी केली असता त्याला त्या मध्य आशीयामार्गे व काही भारतामार्गे आल्याचे समजले. ही माहिती त्याच्या दृष्टीने मोलाची होती. पण मध्य आशियातून जाणारा मार्ग झायन्ग्नू टोळ्यांच्या उपद्रवाने त्रस्त होता आणि त्याला या टोळ्यांचा उपद्रव होणार नाही अशा मार्गाचा शोध होता.

त्याने मग भारतात जाणाऱ्या व्यापारी मार्गांची चौकशी सुरु केली. काही मार्ग युनान ते पूर्व भारत असे येत पार तक्षशिलेपर्यंत पोचतात हे त्याला समजले पण त्याला त्या मार्गांचे पर्यवेक्षण करायचे होते. बॅक्ट्रियामध्ये पाहिलेला भारतीय बनावतीचा माल त्याला फार उपयोगाचा वाटला. त्यामुळे त्याने तेथून तक्षशिलेपर्यंत जाण्याचा मार्ग शोधायचा प्रयत्न केला. त्या काळात सिंधू (चीनी उच्चार शेंडू) प्रांत ग्रीकांच्या अंमलाखाली होता. त्याने लिहून ठेवले कि “शेंडू राज्य दाक्सियापासून हजारो मैल दूर आहे. तेथे उष्ण आणि दमट हवामान असून तेथील लोक युद्धाच्या वेळी हत्तीवर बसतात.”  

अर्थात क्विआनला शेंडू प्रांतात पोचण्यासाठी सुरक्षित मार्ग सापडला नाही. पण पुढे त्याने चहा-घोडा मार्ग (किंवा दक्षिण रेशीम मार्ग) शोधून काढला जो तिबेट, नेपाळ ते पाटलीपुत्र असा येत होता. पण हे झाले नंतरचे. सम्राट उ डीला व्यापारी मार्गांचे महत्व समजल्यावर त्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरु केले आणि आज “रेशीम मार्ग” म्हणून प्रसिद्ध असलेला मार्ग त्याच्या प्रयत्नांनी आकाराला आला.

एका अर्थाने झायन्ग्नू टोळ्यांशी सुरु झालेला संघर्ष हा चीनच्या मध्य आशिया आणि पश्चिम अशीयाबाबतच्या राजकीय आणि आर्थिक धोरणांत आमुलाग्र बदल करणारा ठरला. क्विआनसारख्या दूरदृष्टीच्या साहसी अधिकाऱ्याची मदतही चीनला लाभली. जागतिक व्यापाराच्या आणि सांस्कृतिक देवाण-घेवाणीच्या कक्षाही यामुळे वाढल्या. प्रवासी, व्यापारी, धर्मोपदेशक तसेच विविध कलांत व वस्तूनिर्मितीत पारंगत साहसी लोकांची वर्दळही वाढू लागली. त्यांना रक्षण पुरवणे व त्या बदल्यात कर घेणे ही स्थानिक राजांची फायदेशीर जबाबदारी बनली. त्या अर्थाने खरा रेशीम मार्ग इसपू दुसऱ्या शतकात अस्तित्वात आला.

या काळात भारतातून नीळ, मसलीन (तलम वस्त्र), मसाले, जडी-बुटी, अलंकार, शाली, बहुमुल्य रत्ने, सोने, धान्य, मीठ, जनावरे आणि गुलामांचीही निर्यात केली जात होती. हा रेशीम मार्ग बनण्यापूर्वी युनानमधून ब्रह्मदेशमार्गे भारतात अनेक चीनी वस्तू येताच होत्या. त्यात रेशीमही होते. पण तो मार्ग अत्यंत बिकट असल्याने या वस्तूंचे प्रमाण अत्यंत अल्प होते. तिबेटमधील ल्हासा, नेपाळ ते पाटलीपुत्र मार्ग खुला झाल्यानंतर मात्र चीनी वस्तूंचा ओघ भारतात मोठ्या प्रमाणावर सुरु झाला. तिसऱ्या शतकातील अर्थशास्त्रात “चीनपट्ट” या नावाने रेशमाचा उल्लेख पहिल्यांदाच आला असून त्यावर किती कर घ्यावा याचे निर्देश आहेत. झांग क्विआनसारखा प्रशासकीय अधिकारी जीवावरची संकटे झेलूनही एखाद्या राष्ट्राला आर्थिक समृद्धीच्या मार्गावर कसा आणू शकतो याचे हे एक उल्लेखनीय उदाहरण आहे.

याच काळात बॅक्ट्रिया मागोमाग बामियान, बुखारा, समरकंद, खोतान, ल्हासा, लेह यासारखी शहरेही भरभराटीला येऊ लागली. या प्रगतीबरोबरच राज्यांच्या आर्थिक आकांक्षाही वाढल्या. व्यापारी मार्गांवर ज्याची सत्ता ते श्रेष्ठ अशी भावना निर्माण झाली. यामुळे अगदी चीन-तिबेट युद्धही पेटले. काश्मीरने या युद्धांत सक्रीय सहभाग घेतला. मध्य आशियात तर संघर्षाने वेगळेच परिमाण गाठले. या मार्गांमुळे अनेक रोगांच्या साथीही दूरवर पसरल्या, तशाच वनस्पती व प्राणी-किटकही. त्याचा इतिहास आपण पुढे पाहणारच आहोत. पण रेशीम मार्ग ही जगाची आर्थिक व सांस्कृतिक जीवनवाहिनी बनायला कशी सुरुवात झाली याचा हा आढावा आहे.

आज चीन प्राचीन रेशीममार्गांचा पुनरुद्धार करतो आहे. या मार्गांचे महत्व आजही संपलेले नाही हे चीनने ओळखले आहे हाच याचा अर्थ. आकाशप्रवास सुरु झाल्यानंतर खुश्कीचे आणि सागरी मार्ग बंद पडतील अशी शक्यता विल ड्युरांट या जागतिक कीर्तीच्या इतिहासकाराने व्यक्त केली होती. पण ती शक्यता सत्यात येण्याची शक्यता नाही. खुश्कीचे मार्ग हे नेहमीच भू-राजकीय वर्चस्व गाजवतील एवढाच काय तो संदेश आहे.

 

No comments:

Post a Comment

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...