Friday, June 23, 2023

सारे काही गरजांपोटीच?

  


 मनुष्याची प्रगती ही आजवर त्याच्या मानसिक व भौतिक गरजांशी जोडली गेलेली आहे. आपण म्हणतो, एकविसाव्या शतकात माणूस प्रगत अवस्थेत पोहोचला आहे, ज्ञान- विज्ञानाने आजवरचा कळस गाठला आहे आणि याहीपुढच्या क्षितीजापार त्याला धाव घ्यायची आहे. पुरातन मानव मात्र अविकसित होता असा दावा बिनदिक्कतपणे केला जातो. मनुष्याचा मेंदू उत्क्रांतीच्या नियमाने विकसित होत जात आज सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे असे मानून आदिमानवाच्या अविकसिततेशी त्याचे पुरेसे उत्क्रांत नसण्याशी संबंध लावला जातो. असे करत असताना आपण अनेक मुलभूत बाबींचा विचार केलेला नसतो हे उघड आहे. आजची वैद्न्यानिक प्रगती ही माणसाचा मेंदू उत्क्रांत झाला म्हणून झाली कि त्याच्या बदलत्या सामाजिक परिप्रेक्षात कालनिहाय निर्माण झालेल्या गरजांची पूर्ती करण्यासाठी झाली हा खरा प्रश्न आहे.

जेंव्हा या धरतीवर मानव अस्तित्वात आला तेंव्हा त्याच्यापुढचे प्रश्न वेगळे होते. प्रकृती आणि अन्य प्राणी प्रजातीशी संघर्ष करत स्वत:चे अस्तित्व टिकवणे ही त्याची मुलभूत गरज होती. त्या गरजांच्या पूर्ततेसाठी त्याने जे शोध लावले त्यांचा विचार केला तर आजचा मानव उलट अडाणी वाटू लागेल. आदिमानवाने निसर्गाने न दिलेली शस्त्रे आपल्या भवतालातील उपलब्ध साधनसामग्रीचा अभ्यास करून पाषाण, हाडे, लाकूड यापासून निर्माण केली. थंडी-उन-वा-यापासून रक्षण करण्यासाठी जनावराची कातडी ते लोकर/सुत यांना विणून वस्त्रांचा शोध लावला. अग्नीचा उपयोग संयतपणे करून जीवन सुधरवण्यासाठी कसा करायचा याचा मार्ग शोधला. सर्वात महत्वाचा शोध म्हणजे भाषेचा शोध! निसर्गाने दिलेल्या स्वरयंत्राचा उपयोग करून आपण निरनिराळे ध्वनी निर्माण करू शकतो आणि त्या ध्वनींचे क्रम ठरवू, त्यातून आपण अर्थपूर्ण ध्वनी (शब्द) निर्माण करू शकतो हा त्याचा शोध क्रांत्रीकारी नव्हता असे कोण म्हणेल? आज भाषा ही सर्वांना सहजसुलभ उपलब्धी वाटते कारण त्यात असलेले आदिमानवाचे योगदान पूर्ण विस्मरणात टाकले गेले आहे. पण भाषा ही त्याची गरज होती. धोक्याचे इशारे देणे, शिकार कोठे आहे हे सांगून त्यासाठी शिकार कशी करता येईल याबाबत निर्णय घेऊन सामुहिक हालचाल करणे, अन्य सामुहिक व व्यक्तिगत सुचना/आदेश देणे/घेणे यासाठी भाषेची त्याला नितांत गरज होती आणि ती त्याने प्रयत्नपूर्वक बनवली. जेंव्हा पहिल्यांदा एखादा शब्द कोणी बनवला असेल तर त्याचा अर्थ काय घ्यायचा हे टोळीतील लोकांना शिकवणेही तेवढेच महत्वाचे होते. आद्य भाषा ही अर्थात गरजेपुरतीच मर्यादित असणार हेही उघड आहे. जसजसे मानवाने अधिक क्षेत्र व्यापले. बाह्य जगच नव्हे तर आंतरिक मानसिक जगातील कल्पना, भाव-भावनांनाही अर्थपूर्ण शब्द देण्याची गरज निर्माण झाली आणि त्यापोटी भाषाही प्रगत होत राहिली.

तेंव्हा मानवाची लोकसंख्या मुळात कमी होती. अन्य प्राणीविश्व मात्र धरतीवर राज्य करत होते. या विश्वापेक्षा आपले मानवी विश्व श्रेष्ठ आहे याची त्याला जसजशी कल्पना येऊ लागली तसतशी त्याने व्यवस्था बनवायला सुरुवात केली. आदिम धर्मही त्यातूनच तयार झाले. सामाजिक नीतीनियम असले पाहिजेत याची जाणीव त्याला झाली आणि आद्य नितीतत्वे व धर्म-नीती-तत्वे त्याने शोधली. नुसती शोधली नाहीत तर त्यांचा कटाक्षाने वापर करायला सुरुवात केली. जशी लोकसंख्या वाढली त्याने राज्य, गणराज्य या संकल्पना शोधून सामाजिक व्यवस्थेला राजसत्तेचेही अधिष्ठान दिले.

सामाजिक मानसिकतेची जी गरज तीच पूर्ण करण्यासाठी शोध लावले जातात. मृत्युनंतर काय हा प्रश्न भेडसावत असल्याने त्याने सुव्यवस्थित दफन पद्धती शोधल्या. इजिप्तमधील गगनचुंबी पि-यामिड्स, जे बांधणे आजच्या आधुनिक तंत्रज्ञानालाही शक्य नाही ,ते बांधण्याची नुसती कला नव्हे तर शास्त्रही त्याने विकसित केले. ममीफिकेशनच्या तंत्राचा शोध लावला. पि-यामिड्स म्हणजे दफनस्थाने  ही तत्कालीन समाजाची मानसिक गरज होती आणि तिच्या पूर्ततेसाठी तो आवश्यक शोध लावत राहिला. आज ती गरज उरली नाही म्हणून तसे किंवा त्यापेक्षा अधिक वरचढ तंत्रज्ञान अस्तित्वात आले नाही, विकसित झाले नाही,. याचा अर्थ आजचा मानव अविकसित आहे असाही होत नाही. खरे तर आजचे बरेचसे तंत्रज्ञान हे प्राचीन तंत्रद्न्यानाचे सुधारित प्रारूप आहे असे म्हणावे लागते.

शेतीचा शोध हा तर मानवी इतिहासातील अजून एक महत्वाचा क्रांतीकारी टप्पा. या शोधाने मानवी जीवन समग्र बदलले. भटका मानव स्थिर झाला. शेतीच्या शोधामुळे शेतीउपयोगी साधनांचेही त्याने शोध लावले. उपयुक्त उत्पादने करण्यासाठी मुळात ती कशी आणि कशापासून तयार करायची यासाठी आवश्यक कल्पकता आणि बुद्धी त्याच्यात नसती तर हे झाले नसते. शेतीमुळे मानवी भाषा अधिक प्रगत झाल्या. हजारो नवे शब्द बनवावे लागले. त्याना अर्थ द्यावा लागला. वाक्याचा अर्थ थेट पोचवण्यासाठी आणि त्यात अर्थबदल होऊ नये यासाठी त्याने प्राथमिक का होईना व्याकरणाचा शोध लावला. शेतीमुळे जंगले क्रमश: नष्ट होत गेली आणि मानवी लोकसंख्या वाढत गेली हे एक वास्तव आहे. अन्य प्राणीविश्व या संघर्षात टिकू न शकल्याने त्यांचीही संख्या रोडावत गेली. असंख्य प्राणीप्रजाती कालौघात नष्ट झाल्या. ही मानवी प्रज्ञेची मोठी हार आहे असेही म्हणता येईल. पण मानवाने जेही काही केले ते तगून राहण्याच्या अनावर गरजेपोटी केले हे विसरता येत नाही.

औद्योगिक क्रांतीही गरजेपोटीच झाली. सारे शोध तत्कालीन युरोपियन मानसिक गरजाधारित झाले. अधिकाधिक उत्पादन, सर्वत्र विक्री, त्यातही मक्तेदारी ही भांडवलदारच नव्हे तर श्रमिकांचीही गरज बनली. या गरजेपोटी नवनव्या सामाजिक तत्वज्ञानांचाही जन्म होऊ लागला. सामाजिक संघर्षाची परिमाणे बदलली. आपापले वर्चस्व टिकवण्यासाठी नवे सामाजिक सिद्धांत जन्माला घातले जाऊ लागले कारण नव्या भांडवली आणि साम्राज्यशाही मनोवृत्तीची तीही गरज होती. आज नवे तंत्रज्ञान म्हणून जेही काही आपल्या माथ्यावर मारले जात आहे, तेही भांडवलशाही प्रवृत्तीतून. किंबहुना आमच्या प्रगल्भतेच्या व्याख्याच बदलून गेलेल्या आहेत. आता सामुहिक गरजांपेक्षा व्यक्तीकेंद्रित गरजांनाच प्राधान्य दिले जाते, किंबहुना व्यक्तिवादी असणे हीच एक गरज बनवली गेलेली आहे.

इतिहासात आदीमानवाने जे सर्वोपयोगी शोध लावले तसे शोध आज लावले जाण्याची शक्यता नाही. कारण आजच्या मानवाच्या गरजाच मुळात बदललेल्या आहेत. शोधही त्या गरजांच्या पूर्तीसाठी लावले जात आहेत. आज कोणाला कैलास लेणे बनवायची गरज वाटत नाही, मग त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान कशाला शोधले जाईल? हो, गरजा निर्माण करण्यासाठी मात्र नवनवे शोध लावले जातील. तसे शोधही मानवी जगाची अपरिहार्य गरज बनून जाईल. त्यासाठीच आपल्याला नेमके काय हवे हे समजण्यासाठी आजच्या मानवाने मुळात आपल्याच गरजा निश्चित केल्या पाहिजेत!

-संजय सोनवणी 

Monday, June 19, 2023

तख्त


 शाहजादा अकबराला आलमगिर औरंगजेबापासून तोडण्याच्या संभाजी महाराजांच्या  प्रयत्नांना अखेर यश मिळते. अकबर दुर्गादास राठोड आणि असंतुष्ट राजपुतांच्या पाठींब्यावर औरंगजेबाविरुद्ध बंड करून स्वत:ला सार्वभौम पातशहा घोषित करतो. संभाजी महाराजांच्या पाठींब्याने राजपूत आणि अकबर आपल्याविरुद्ध एकत्र येणे म्हणजे आपल्या सत्तेला धोका हे ओळखून औरंगजेबाच्या राजकीय चाली सुरु होतात. त्यामुळे अकबराला अनेक आघाड्यावर अपयश येवू लागते.

इकडे संभाजी महाराजही आपले सिंहासन सुरक्षित ठेवण्यासाठी घरचे आणि बाहेरचे याविरुद्ध संघर्षात व्यस्त होतात. त्यांना महाराष्ट्रातच अनेक आघाड्यांवर अडकून पडावे लागतेत्यामुळे ते अकबराच्या सहाय्याला उत्तरेत जाऊ शकत नाही. अकबराला अपयश येतेय हे पाहून आणि आपल्याला थोडी उसंत हवी म्हणून ते शेवटी अकबरालाच महाराष्ट्रात यायचे निमंत्रण देतात. औरंगजेबाचे तख्त अकबराच्या ताब्यात आले तर सत्तेचे समीकरणे बदलतील आणि अप्रत्यक्ष का होईना हिंदुस्तानची सत्ता आपल्या हाती येईल असा त्यांचा होरा असतो. अपयशी अकबर शेवटी महाराष्ट्रात येतो. संभाजी महाराजांचा आश्रय घेतो.

आपल्याच पुत्राला फितवले म्हणून चवताळलेला औरंगजेब संभाजीमहाराजांच्या नाशासाठी महाराष्ट्राची वाट धरतो. त्यावेळेस औरंगजेबाच्या छावणीवर हल्ला करून त्याला कैद करून ठार मारण्याचाही बेत संभाजी महाराज आखतात, पण इकडे रायगडावर संभाजी महाराजांच्याच हत्येचा कट  शिजलेला असतो. अकबरामुळे तो कट उघडकीला येतो आणि दोषी मंत्री आणि त्यांच्या साथीदारांना हत्तीच्या पायी तुडवून मारले जाते.  

सत्ताभिलाषात्यासाठी केली आणि घडवली जाणारी क्रूर नाट्ये एकीकडे तर मानवी स्नेहबंध टिकवण्यासाठी किंवा स्वप्नांच्या पूर्तीसाठी निर्माण केलेली किंवा होणारी भावनाट्ये दुसरीकडे यांच्या संमिश्र खेळातून मानवी प्रेरणा नेमक्या कशा वर्तन करतात याचा शोध घेत हे नाटक साकार होते.

तख्त! मी जवळपास वीस वर्षांनी रंगमंचासाठी लिहिलेले हे नाटक!

 

Tuesday, June 13, 2023

SUSTAINABLE ECONOMY

 माझ्या पुण्यनगरीमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या “आर्थिक अराजक का माजते?” या लेखाचा प्रसिद्ध पत्रकार श्री. अरुण दीक्षित यांनी अनुवाद केला व तो प्रा. श्याम बोरावके यांनी नीती आयोग, राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना पाठवला असून त्या लेखातील मांडणीनुसार विचार करून आर्थिक धोरणांत बदल करण्याची विनंती केली आहे. सरकार सहसा कोणाचे ऐकण्याच्या फंदात पडत नाही, पण तरीही श्री. दीक्षित व प्रा. बोरावके यांना ही मांडणी महत्वाची वाटली व ती सरकारपर्यंत पोहोचवली याबद्दल त्यांचे आणि मूळ मराठी लेख दै. पुण्यनगरीने प्रसिद्ध केला याबद्दल त्यांचेही आभार.

श्री. दीक्षित यांनी केलेला अनुवाद व त्यांच्या टिप्पण्या खाली-
Please kindly read the article published in Daily "Punyanagari" (10th June,2023) by senior journalist "Sanjay Sonwani" (9860991205) under the title "Arthabhashya" and "Why is there economic chaos?".( In India )
Translated from Marathi....... It will help to give ALL CONCERNED a CLEARER VISION for knowing WHAT AILS THE RURAL AREAS...
《" A SUSTAINABLE ECONOMY contributes to a balanced culture. Of course, for that, the division ( allotment )of the investment resources should be done in a balanced proportion between vital and psychological needs. In fact, if we look at the trend of the global economy as a whole over the past few decades, the sources of investment have been largely driven by the illusion of sustainable development and unjustified growth in industries that produce innovative information technology or illusory pleasure products.
Therefore, the very foundation of the social structure itself is being disrupted. On the other hand, financial investment is gradually decreasing in sectors like agriculture, animal husbandry, rural infrastructure/ industries etc.
New technologies must be developed to make human life comfortable. There is no reason to disagree that products based on that should come into the market.Only the speed of its supply and the psychological technique used to force it down everyone's throats and alternatively to impose a false sense of happiness on the people, to keep the economy intact, and to impose voluntary, economic slavery on the people is fatal.
We need new technologies that will contribute to increasing human intellectual capacity, productivity, creativity, but in reality it does not seem to be happening. On the contrary, the unfortunate picture is that these technologies are 'isolating' the human group instead of bringing them together.
A person who does not adopt new technology is considered outdated, whether that person actually uses the technology or not. Whether or not the technology really changes the life of the person, but due to these new industries in the new technology, everyone is being thrown into the competition to make them spend on illusonory things.
These technologies do not seem to make human life pleasant and comfortable. No one can deny the fact that these technologies are creating new stresses and leading humans into new crisis. We are moving steadily towards the end of human efficiency. While technology is meant to be used to enhance self-efficacy and creative expression, be it in work style or intellectual capacity, it is expected to continue to grow, but in the current situation, it seems to be happening only in exceptions.
In fact, the natural energy that should come from learning new things, from a sense of temporary stability, is also being lost. This is creating an economic, psychological, chaos (anarchy) and it's visible, social consequences are also visible. This has certainly become a matter of concern.
With the explosion of information technology industry, we have become efficient as a society, we should think that we have become a confused and therefore anti-social. It is necessary to inculcate this philosophy that no technology should be incompatible with social consciousness. A traditional but human-beneficial economy and another flourishing, brilliant economy but dangerous to human life and unbalanced ,in this conflict, the economy due to the new delusional illusion will eventually collapse!
As a result, there is no doubt that the society will be left economically and psychologically impoverished forever.
A sustainable economy contributes to a balanced culture, while an economy based on an unbalanced distribution based on artificiality is responsible for the destruction of culture and harm to social health. It should be noted that if the economic policy of the government and the society is to invest only for work, then it is the beginning of economic chaos.
Economics should not run on mental agitations, but this is exactly happening now. If we continue at this pace, the consequences of this chaos will be so dire that first of all there will be a global, financial and intellectual famine. Today's investments in other sectors will also be worthless. Because that investment is not sustainable.
The question of who will survive in the absence of a 'sustainable economy' should be pondered upon now.Also, economists and psychologists should think about the mental problems that are going to arise from it and the serious effects that are going to have on the society as a whole, as the savings-dominated economy is unknowingly being pushed towards the debt-dominated system.
However, this scholarly commentary and discussion-analysis done by senior journalist SANJAY SONWANI, on a very complex, complicated but equally sensitive topic, in a simple and easy language that can be easily understood by the common man, is really a remarkable thinker, and is relevant to all responsible parties. Equally true! —————"》
Journalist Arun Dixit.11/6/2023
All reactions:
Sunil Tambe

Monday, June 12, 2023

नव्या जगाची आव्हाने कशी पेलणार?

 



आजचा काळ जागतिकीकरणाचा आहे असे आपण मानतो. पण जेंव्हा आपण आपली समाजरचना आणि जागतिकीकरणाचा विचार करतो तेंव्हा अनेक प्रश्न उपस्थित होतात. महत्वाचे प्रश्न म्हणजे जागतिकीकरणाला अनुकुल अशी आमची मानसिकता आहे काय? जागतिकीकरणातुन जी नवी जागतिक संस्कृती बनत आहे तिचा स्वीकार करत स्वत:त अनुकुल बदल घडवण्याचे मानसिक सामर्थ्य आमच्यात आहे काय? जागतिकीकरणामुळे जागतिक पातळीवर जी नवी संस्कृती बनू पहात आहे तिच्यात आमचा काही प्रभावी वाटा असणार आहे काय कि आम्ही केवळ नाईलाजाने या सांस्कृतिक लोंढ्याचा अपररिहार्य भाग बनणार आहोत? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एकीकडे जागतीक संस्कृती स्वीकारली जात असताना पुन्हा स्वसंस्कृतीचे मग काय या प्रश्नानेही हवालदिल होणे योग्य कि अयोग्य? थोडक्यात आम्ही नव्या जगाची आव्हाने पेलण्यास मानसिक दृष्ट्या समर्थ आहोत काय?
या निमित्ताने अजुनही अनेक प्रश्न उपस्थित करता येतील, पण येथे आपल्याला या प्रमुख प्रश्नांवर चर्चा करायची आहे. पहिल्या प्रश्नाला अनुसरुन एक उपप्रश्न असा आहे कि मुळात जागतिकीकरण ईष्ट आहे कि अनिष्ट. याचे उत्तर सोपे आहे खरे तर. जागतिकीकरण ही मुळात नवीन संकल्पना नाही. पुरातन काळापासुन ही प्रक्रिया सुरु झालेली आहे. जागतिकीकरणाचा अर्थ म्हणजे अशी अर्थव्यवस्था जी प्रांत-राष्ट्रांच्या सीमा ओलांडत पसरत जाते व त्याबरोबरच सांस्कृतिक देवानघेवाण होत जात प्रगल्भ व सर्वसमावेशक मानसिकता बनते.
पुरातन काळी जेंव्हा आंतरराष्ट्रीय व्यापार सागरी व खुष्कीच्या मार्गाने सुरु झाले तीच जागतिकीकरणाची प्राथमिक सुरुवात होती. भारतातुन सुती वस्त्रांपासुन ते मसाल्यांपर्यंतचे पदार्थ अरबस्थान, ग्रीस, इजिप्त, मध्य आशिया, चीन अशा वेगवेगळ्या राज्यांत जात व तिकडुन सोने ते पार मद्यही आयात केले जात असे. व्यापाराबरोबरच संस्कृतीचेही आदान-प्रदान होत असे. बौद्ध धर्म आशियाभर पसरला तो या व्यापारी मार्गांवरूनच. सूर्य पुजा ही भारतियांनी मध्य आशियातुन आलेल्या मगी लोकांकडुन घेतली. परस्पर भाषांतही एकमेकांचे शब्द मिसळत गेले. जगभर अनेक संस्कृतिनी कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या संस्कृतीवर राज्य तरी केले वा गुलाम तरी बनवले. रोमने प्रदिर्घ काळ युरोप व उत्तर आफ्रिका ते आशिया खंडाच्या काही प्रदेशावर साम्राज्य गाजवले. त्यातुनही त्या भागांत रोमनांश संस्कृती निर्माण झाली. तसेच त्यापुर्वी ग्रीकांश संस्कृत्या बनल्याच होत्या. भारतात ग्रीक, शक, हुण, कुशाण यांनी प्रदिर्घ काळ राज्ये गाजवली...अर्थात त्यांनी येथील संस्कृतीचा काही भाग उचलला तर त्यांच्या संस्कृतीचा काही भाग एतद्देशीयांनी स्वीकारला. हे एकार्थाने जागतिकीकरणच होते.
म्हणजेच जगाला जागतिकीकरण नवे नाही. फार तर एवढेच म्हणता येते कि औद्योगिक क्रांतीपूर्वी त्याचा वेग अत्यंत मंद होता तर औद्योगिक क्रांतीनंतर तो झपाट्याने वाढत गेला. आज माहिती-तंत्रज्ञानाच्या विस्फोटाने तर तो वेग भोवळ येईल एवढा वाढला आहे. असे असले तरी जागतिकीकरणाच्या मुख्य उद्दिष्टापासून आजचे समाज ढळले आहेत असेही आपल्याला म्हणता येईल. आज भारतीय मानसिकता जागतिकीकरणाचे फायदे घेत असल्याने ती जागतिकीकरणाला अनुकुल आहे असेच म्हणावे लागेल. परंतु ही अनुकुलता गोंधळयुक्त आहे.
जागतिकीकरण हवे आहे पण संस्कृतीवर आक्रमण नको अशी काहीशी विचित्र मानसिकता आहे. पण आक्रमण रोखणे सोडा....त्या आक्रमनाच्या लाटेवर आपण स्वार झालेलोच असतो याचे भान मात्र नसते. लाटेवर स्वार म्हणजे प्रवाह नेईल त्या दिशेने जात राहणे. पण या प्रवाहाला दिशा देईल असे काही भरीव योगदान भारतीय देत आहेत असे मात्र सहसा दिसणार नाही. त्यामुळे जागतिकीकरणातील प्रवाहपतित घटक एवढेच आपले स्थान राहील कि काय अशी भीती वाटणे स्वाभाविक आहे. हे एकतर्फी जागतिकीकरण झाले. बहुसंख्य सेवा आणि उत्पादने ही आयात केलेली असतात. निर्यातीच्या स्तरावर आपण अजूनही मागेच रेंगाळत आहोत आणि हळूहळू त्यातील वाटाही कमी होत जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान विकसित करून ते जागतिक पटलावर नेण्यात आपल्याला आजही अपयश येते आहे.
पुरातन जागतिकीकरण हे उभयपक्षी स्वातंत्र्य मानत घडत होते. प्रत्येक संस्कृतीने उत्पादन-सेवांत आपापली वैशिष्ट्ये टिकवलेली होती. पण आता तशी स्थिती राहिली नाही. असे असले तरी जागतिकीकरण अनिष्ट आहे असे आज म्हनता येत नाही. पण आपला जागतिकीकरणाकडे पहायचा दृष्टीकोन बदलावा लागणार आहे.
जागतिकीकरणात आज आपले स्थान पाहिले तर बौद्धीक कामगार स्वस्तात पुरवणारा देश म्हणुन आपली ख्याती आहे. साखर ते वस्त्रे आज निर्यात होतात पण ती सरकारी अनुदानांशिवाय जागतीक बाजारात विकलीच जावु शकत नाही एवढी किंमतीत तफावत आहे. भारताचा आयात-निर्यात व्यापार हा आतबट्ट्याचा आहे. काही अवाढव्य भारतीय कंपन्या सोडल्या तर भारतीय कंपन्या देशांतर्गतच उच्च विकासदर गाठु शकलेल्या नाहीत. परदेशात विस्तार करणे तर दुरच राहिले. याचा अर्थ असा होतो कि ग्राहक म्हणुन व बौद्धीक/शरीरश्रमी कामगार म्हणुन आम्ही जागतिकीकरणात आहोत हे खरे आहे पण जागतिक बाजारपेठेत मुल्यवर्धीत सेवा व उत्पादने विकण्यात आम्ही अत्यंत मागे पडलेलो आहोत. याचाच अर्थ असा होतो कि जागतिकीकरनाला अनुकुल अशी आमची एकतर्फी भुमिका आहे...पण दुस-या बाजुसाठी आवश्यक अशी नव-सृजनात्मक मानसिकता घडवण्यात आम्ही अपयशी ठरलेलो आहोत. आमची समाजव्यवस्था, शिक्षणव्यवस्था, मुल्य व्यवस्था आणि राजकीय व्यवस्था आमची मानसिकता बदलण्यातील सर्वात मोठे अडथळे आहेत. ते दुर कसे करायचे हाच आमच्या समोरचा आजचा गंभीर प्रश्न आहे.
यावर जोवर आम्ही व्यापक विचारमंथन व कठोर आत्मपरिक्षण करत नाही तोवर आमची मानसिकता ख-या अर्थाने जागतिकीकरनाला लायक नसून अर्थ-गुलामीलाच लायक आहे हे समजुन चालावे लागणार आहे.
आमच्या संस्कृती रक्षकांना नेहमीच पुरातन संस्कृतीच्या भवितव्याची काळजी लागुन राहिलेली असते. कोनतीही संस्कृती यच्चयावत जगात जशी होती तशीच्या तशी चीरकाळ टिकत नसते याचे भान त्यांना नसते. भारतीय संस्कृतीचेच म्हणावे तर हिंदू, वैदिक, समन संस्कृती, ( बौद्ध-जैन) ते इस्लामी संस्कृती...यात कालौघात किती परिवर्तने झाली हे इतिहासाकडे निर्लेप मनाने एक दृष्टीक्षेप टाकला तरी थक्क व्हायला होते. आज जागतिकीकरणामुळे वेगाने संस्कृती बदलते आहे आणि हा बदल थांबवणे ही अशक्यप्राय बाब आहे. येथेही पुन्हा प्रश्न हाच कि आम्ही फक्त सांस्क्रुतीक "घेवाणी"च्या बाजुने असनार आहोत कि "देवाणी"च्याही बाजुने? आणि देवाण-घेवाण ही फक्त तुल्यबळांतच होत असते. आम्ही मानसिक व बौद्धिक दृष्ट्या सबल होण्यासाठी काय करत आहोत? मुळात सर्वांचे आर्थिक उत्थान व्हावे यासाठी आमच्याकडे काय कार्यक्रम आहे?
खरे तर स्वत:शी व समाजाशी बेईमानी वृत्ती ही प्रबळ होत जात सृजनक्षमतेचा आत्माच हिरावून घेत आहे. जीवनातील बहुतेक क्षेत्रात या बेईमानी वृत्तीचा पदोपदी अनुभव येत असतो. मग जर आमची संस्कृतीच अशी बेईमानीची असेल तर आमच्या संस्कृतीला कोण घेणार? आणि बेईमानीच्या पायावर सामाजिक व सर्वसमावेशक अर्थ-क्रांती घडु शकत नाही...जागतिकीकरणात फार तर ग्राहक बनता येईल पण विक्रेते बनता येणार नाही. म्हणजे जागतिकीकरण एकतर्फीच राहील जे तसेही आता झालेलेच आहे. आम्हीच आमची सृजनात्मकता मारुन टाकण्याचा चंग बांधला आहे. आमचे आईबाप आम्हाला धाडसी बनण्याचे स्वातंत्र्य नाकारतात...जेथे कल आहे तेच शिकण्याचा व तेच करीअर म्हणुन करु देण्याचा मुलभुत अधिकार नाकारतात. मग गुलाम कधी मानसिक तुरुंगाच्या भिंती तोडुन पळतोय होय? आणि गुलामांना कधी संस्कृती असते होय?
-संजय सोनवणी



जीवनाचे सौंदर्य

 जीवनाचे सौंदर्य

काव्यात नाही
गीतात नाही
संगीतात नाही
ना तत्वज्ञानात ना भक्तीत
मैत्रीत न प्रीतीत
ते हे सारे जगण्यात आहे!
मनसोक्त जगुयात!
-संजय सोनवणी

Friday, June 9, 2023

चातुर्वर्ण्य

 


चातुर्वण्र्य : वैदिक परिप्रेक्षात ठीक ; भारतीय परिप्रेक्षात गैरलागू!


‘चातुर्वण्र्य कधी अस्तित्वात असेल काय?’ हा प्रा. शेषराव मोरे यांचा लेख म्हणजे सांस्कृतिक अभ्यासाच्या अभावातून येणाऱ्या बाळबोध समजुतींचा एक नमुना आहे. भारतीय संस्कृतीचे प्रधान लक्षण म्हणजे चातुर्वण्र्य व्यवस्था असे म्हणताना मोरे हे विसरले आहेत की, गुणनिहाय चातुर्वण्र्य व्यवस्था फक्त वैदिक धर्म-संस्कृतीची व्यवस्था होती; भारतीय संस्कृतीची नाही. मनुस्मृतीच मोरेंच्या विधानाला पाठबळ देत नाही. मनुस्मृतीनुसार शूद्राला संपत्तीसंचय, वेद व यज्ञकर्माची अनुमती नाही. मनुनेच ‘वैदिकाने शूद्रांच्या राज्यात निवास करू नये’ अशी स्पष्ट आज्ञा दिली आहे. शूद्र म्हणजे जेही वैदिक धर्मीय नाहीत ते. निर्वसित शूद्र वेगळे व अनिर्वसित शूद्र (म्हणजे वैदिकांच्या सेवेतील काही मोजके लोक व वैदिक कक्षेबाहेरील वैदिकेतर समाज) वेगळे, हे मोरेंच्या अवलोकनात कसे आले नाही याचे नवल वाटते. शूद्राला संपत्तीसंचयाचाच जर अधिकार नाही तर शूद्र राजे कसे होते? ब्राह्मण ग्रंथातही शूद्र व असुर राज्यांचे अनेक उल्लेख आहेत. शूद्र म्हणजे वैदिकधर्मीय नसलेला समाज. त्यामुळेच ‘अंगविज्जा’ या महाराष्ट्री प्राकृत ग्रंथात हुण, कुशाण, यवनादी परकीयांनाही शूद्रच म्हटले गेले आहे.
चातुर्वण्र्य संस्था ही भारताचे सामाजिक वास्तव नव्हते हे मोरेंनी म्हटले असले तरी ते वैदिकधर्मीयांचे नेहमीच वास्तव होते व यामुळेच महाभारतात (गीतेतही) वर्णसंकराच्या संकटाबाबत गांभीर्याने चर्चा करावी लागली हे ते विसरतात. वैदिक हा अल्प लोकांचा धर्म होता व त्यामुळे त्यांना संकराची भीती होती व त्याची काळजी वाटणे त्यांना भाग होते. त्यामुळे वैदिकांचे ते सामाजिक वास्तव नव्हते, असे म्हणता येत नाही.
ऋग्वेदाच्या रचना काळी ‘वर्णव्यवस्था’ अस्तित्वात नव्हती हे खरे असले तरी वैदिक धर्म भारतात आल्यानंतर त्यांना स्वत:ची तशी नवी व्यवस्था करणे भाग होते. वर्ण हे स्थापना काळी गुणनिहाय असले तरी लवकरच ते जन्माधारित बनले. पुरुषसूक्ताची रचना या काळातील आहे. ऋग्वेदात ते नंतर घुसवले गेले. मोरे येथे पुराणांतील मन्वंतराच्या कपोलकल्पित कथा सांगत, मनू व सप्तर्षी हे ‘निवडमंडळ’ होते हे सांगत वर्णातूनच जातिसंस्था बनली असे अनैतिहासिक विधानही बिनदिक्कतपणे करतात. शेवटी हेच मोरे, चातुर्वण्र्याला ‘कल्पना’ ठरवतात आणि ‘असे असेल तर मग जातिव्यवस्था कोठून आली,’ असा प्रश्न वाचकावर सोडतात.
वर्ण व जाती यांचा एकमेकांशी कधीच संबंध नव्हता व नाही. जाती म्हणजे व्यवसाय व जवळपास दहाव्या शतकापर्यंत एका जातीतून दुसऱ्या जातीत जायचे प्रमाण मोठे होते. नवीन व्यवसाय आले तशा नव्या जाती जन्माला आल्या तर काही व्यवसायच नष्ट झाल्याने त्या जातीही नष्ट झाल्या. रथकार, सूत, हालिक वगैरे अशा अनेक जाती याची उदाहरणे आहेत. वैदिक वर्णाचे मात्र तसे नव्हते व नाही. ती एक उतरंड होती, जातिसंस्थेप्रमाणे आडवी व लवचीक व्यवस्था नव्हती. दोन वेगळ्या धर्म-समाजव्यवस्थांना एकत्र समजत सांस्कृतिक विश्लेषण करायला गेले तर काय सामाजिक गोंधळ होतात हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे.
वेद हे बाहेरून आलेल्या वैदिकांचे हे खरे आहे, पण त्यांना ‘आर्य’ संबोधत प्रा. मोरे अजून एक गंभीर चूक करतात. आर्य वंश सिद्धांत कधीच मोडीत निघाला आहे व मानवाची वांशिक वाटणी अवैज्ञानिक व चुकीची असल्याचे १९५२ सालीच युनेस्कोने जागतिक मानववंश शास्त्रज्ञांच्या परिषदेत सादर झालेल्या जाहीरनाम्यात प्रसिद्ध केलेले आहे, हे प्रा. मोरेंच्या अवलोकनात नसावे हेही नवल आहे. आर्य-अनार्य हे शब्दच वंशनिदर्शक असल्याने या शब्दाचा वापर अधिक तारतम्याने व जबाबदारीने करायला हवा होता.
वैदिकांच्या चातुर्वण्र्य व्यवस्थेचा संकल्पनात्मक प्रभाव भारतीयांवर असला तरी ते वैदिक वगळता भारतीयांचे ते कधीही सामाजिक वास्तव नव्हते. अन्यथा नंद ते सातवाहन अशी अनेक शूद्र राजघराणी अस्तित्वात आली नसती. त्यामुळे चातुर्वण्र्य काय आहे, ते वैदिकांचे सामाजिक वास्तव होते की नाही ही चर्चा वैदिकांच्या परिप्रेक्ष्यात ठीक असली तरी भारतीयांच्या संदर्भात ती सर्वस्वी गैरलागू आहे.
– संजय सोनवणी


Tuesday, June 6, 2023

Valley of Knowledge and Book Village in Kashmir

  

Valley of Knowledge and Book Village in Kashmir

An effort to make Kashmir again a seat of learning!

 

Buzz talk at the recently concluded World Book Fair in New Delhi was Sarhad’s announcement to make Lolab Valley of Kupwara district as “Valley of Knowledge” and Argam Village of Bandipora District as “Book of Village.” in collaboration with J&K Union Territory administration. Shri Yuvraj Malik of the National Book Trust was so impressed by the idea that NBT sponsored a book stall at the World Book Fair to promote the idea among knowledge lovers coming from across the globe.

 Valley of Knowledge is a unique idea, the first time in the world, which is shaping up in the amazing Lolab valley of the Kupwara district. This oval-shaped valley, close to the ancient seat of knowledge, Sharda Peth of Neelam Valley, now in POK,  has been enveloped by fabulous beauty and tranquillity. To revive the ancient tradition of knowledge in Kashmir, Lolab Valley has been selected by Sarhad to transform it into a modern seat of knowledge, where an opportunity to continue the process of contribution in knowledge and research will be offered. The libraries, book fairs, and seminars based on various streams of Kashmir’s literature will be conducted around the year with the opportunity to develop new thoughts to enrich the modern world. Sarhad is planning to develop reading spots in tune with the surrounding nature. Sarhad also is in the process of inviting universities and educational institutes to build their modern facilities where students from various countries can come and study in the subjects of their liking with open minds. This way Lolab Valley can acquire the real status of the “Valley of Knowledge”. As an effect, the valley will attract knowledge seeker tourists to contribute to the economy of Lolab Valley.

 Book Villages are not a new idea. There are some book towns in Spain, France, and America, among many nations, are known for book fairs and the availability of easy-to-pick and read books on the streets where readers can get a cozy reading spot to engross in the literature. In India too, though on a small scale, a couple of villages were declared as book villages. But Book Village at Argam (Bandipora District) will be unique in its style as from ancient Kashmiri Manuscripts to modern Kashmiri literature will be made available to the readers in libraries, select homes, restaurants, tourist spots, and on streets. The libraries will be equipped with all modern amenities including the availability of audiobooks. The Argam village will be such kind of village where the ancient wisdom of Kashmir will echo in every visitor's heart.

For ages identity of Kashmir has been a center of knowledge and wisdom.  Kashmir led the literary, philosophical, and religious movements from ancient times that became a guiding force for not only Indians but the people across West, Central, and East Asia. Shaivism and Buddhism flourished here in a unique manner. The fourth Buddhist council was held in Kashmir during the reign of Kanishka. Later on, Sufism also took root in the land of wisdom. By the second century, it became a seat of learning. Kashmiri Buddhist missionaries traveled far and across West, Central, and East Asia to spread Buddhism.  In the fourth century, Kumarjiva was the first known monk, who learned and spread Buddhism in Central Asia to China.  He influenced the Chinese Emperor and spearheaded the translations of Sanskrit works into the Chinese language. Notable scholar Vasugupta founded Kashmiri Shavism. Abhinav Gupta was a scholar of great abilities who wrote many philosophical treaties on Kashmiri Shavism with invaluable fresh visionary contributions. During the glorious era of Lalitaditya Muktapida, in the 8th century, Kashmir saw its empire spreading to Afghanistan, Bactria, Gilgit-Baltistan, Ladakh, and almost half of the Indian subcontinent. During his reign, art, architecture, and philosophy prospered to take new glorious heights. Kalhana of “Rajtarangini” is the first Indian historian who wrote the history o Kashmir chronologically and is considered to be the most accurate. During the reign of the Sultan, of the 15th century, Zain-ul-Abidin, Kashmir set an example of socio-religious harmony. Sufi saints like Sheikh Nooruddin Noorani, who is traditionally revered by Hindus as Nund Rishi, combined elements of Kashmiri Shaivism with Sufi mysticism in his discourses. Kashmir became a land of cultural confluences across Asia, thus creating an entirely unique culture to be proud of.

From ancient times knowledge seekers from around the world have been visiting Kashmir to learn philosophy. World-famous travelers/ monks like Itsing, Xuanzang, O’Kong, Hiecho, Alberuni, Sayyid Ali Hamadani, etc. are notable among them. Their travelogues are full of praises of Kashmir where various branches of knowledge were flourishing unbounded.

The tradition is needed to be revived. The idea of Book Village at Argam and Vally of Knowledge at picturesque Lolab Valley is the pioneering step being taken by Mr. Sanjay Nahar of Sarhad in association with district administrations of UT in this direction. It is necessary to tell the world that Kashmir is not only famous for its amazing natural beauty but it also has a rich tradition of wisdom and knowledge. The efforts in direction were praised by the visitors at World Book Fair is a positive sign that assures, yes, Kashmir is leading towards the epitome of knowledge again to reacquire its lost position!

 

-Sanjay Sonawani 

' कल्की '

 


९मार्च, २०१४
श्री संजय सोनवणी ,
नमस्कार ,
काल मी आपली कादंबरी , ' कल्की ' वाचली . कादंबरी इतकी आवडत गेली की एका बैठकीतच संपवली आहे , आणि मी परत एकदा ही कादंबरी वाचणार आहे . ही कादंबरी वाचल्यावर हे समजले की खरंच आपण फार थोर मोठे साहित्यकार आहात .' सव्यसाची ' ही आपली कादंबरी वाचल्या नंतर ही दुसरी कादंबरी . आता मला आपले सर्वच साहित्य वाचावे लागणार आहे . गेल्या वर्षी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळेस आपला संपर्क आला . तेव्हा आपल्या अफाट साहित्याची कल्पना नव्हती . बृहनमहाराष्ट्रातल्या लोकांची ही कमतरता आहेच हे मान्य करायला काहीच हरकत नाही . तरी इतकी सुंदर कादंबरी लिहिण्यासाठी आपले मनापासून अभिनंदन .
साहित्यकार हा विचारवंत असल्याने भरकटत जाणे स्वाभाविकच आहे .आपले मतमतांतरही इतरांवर बळजबरीने थोपणे राजकारणात , समाजात , धर्मात , साहित्यात आपण रोजच पाहतो . फेसबुकवर नेहमी आपण जे विचार मांडता त्या विचारांशी मी बहुधा सहमत असतो . जातीविहीन समाजाची रचना व्हायलाच हवी , पण त्यासाठी रोज नवे आरक्षण देवून नव्या जातीजमातींची निर्मिती करून नाही . ब्राह्मणवादाचा विरोध करून , राजकारणात , समाजात , नवीन ब्राह्मण बनविण्या सारखेच हे काही तरी आहे . वैदिक / अवैदिक हा वाद आता जुना , पण इतिहासाचे मुल्य मापन आता निष्पक्षतेने व्हायला हवे . कालचे शोध , अविष्कार , परंपरा , संस्कार , आस्था , अनास्था , श्रद्धा , भक्ती आता कालबाह्य असले तरी कोणे एकाकाळी ते जगण्याचे , उन्नतीचे आधार होते हे विसरून चालणार नाही . त्या मुळे आपण इथ पर्यंत आलो, ते नेहमीच चुकीचे होते आणि आज आपण जे विचार मांडतो आहे , वागतो आहे , करतो आहे , तेच बरोबर आहे , हे समजणे योग्य नाही. कारण आजचे हे सगळे बरोबर असले तरी याचे परिणाम यायला अनेक शतके वाया जातील आणि शेवटी त्यांच्याच चुकांचा आधार घेवून आपण नवे शोध , नवे विचार मांडत आहोत. तेव्हा आपले विचार परखडपणे मांडताना ज्या चुका झाल्या त्यात चांगले काय होते हे शोधण्याचा प्रयत्न व्हायला हवा . मला वाटतं आपण प्रत्येक वेळेस आपल्या पूर्वजांना शिव्या देवून मोकळे होतो आणि त्यांना शिव्या देवून आपल्या चुकांना झाकण्याचा प्रयत्न करतो . आपल्या बरोबर चुकून काही चूक घडल्यास , नक्कीच त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात . पण समाजाच्या हितांसाठी पुर्वाग्रही होऊन चालत नाही . विचारांची पूर्वग्रहीता फारच भयानक असते . आपण आपली निष्पक्षता हरवून बसतो . जातीविहीन समाजाच्या माझ्या कल्पनेत रमताना , कालचा पक्षपात विसरून आजची निष्पक्षता गरजेची वाटते .
सुरवातीला फक्त 10 वर्षासाठी आरक्षण ठेवले गेले होते पण गेल्या 75 वर्षातही आपण जातींचे हे विष संपवू शकलो नाही व आज ही शिवाजीच्या सर्व सम्पन वंशजांना आरक्षणाची गरज भासते याला काय अर्थ ? अशाने जातीविहीन समाजची रचना कशी होऊ शकते ? देणारे हातचं सर्व ओरबाडून घेऊ लागले तर समाजात स्वारस्य कसे उत्पन्न होणार ? आणि याचा विचार कोण करणार ? आज आम्ही जे जाती वाढविण्यासाठी प्रयत्न जोमाने करत आहो , तसले स्वार्थी राजकारण आणि स्वार्थी कृत्य वैदिक काळात ही झाले नव्हते . म्हणून विरोधाला विरोध न करता , आजच्या एकूण परिस्थितीत , कोणा एका वर्गासाठी नाही तर , राष्ट्रासाठी , समाजासाठी , काय योग्य आणि काय चांगले आहे ते व्हायला हवे .
जन्माने कर्मकांडी देशस्थ ब्राह्मण असूनही मी देखील जातीविहीन समाजाच्या संकल्पने बरोबरच धर्मविहीन समाजाची नेहमी स्वप्न बघतो . धर्माचा इतिहास ६००० वर्ष जुना आहे , आणि विज्ञानाचा इतिहास फार तर फार ३००-४०० वर्ष जुना आहे . पण विज्ञानाने धर्माला मागे सोडलेले आहे . पण घराघरांमध्ये सडलेली आस्था जाम चिकटली असल्याने , कोणते ही तर्क , कोणतेही मुद्दे भावनांपुढे उपयोगी ठरत नाही . जिथं जास्त गरिबी , उपासमार , तिथंच वंचित/ विप्पन देवाकडे बघतात आणि समर्थ व सम्पन यांच्याकडे देव सतत बघत असतो . अशाच गरिबी व श्रीमंतीच्या दरी मुळे धर्माचे फोफावते . म्हणून धर्मविहीन समाजाच्या कल्पनेसाठी आर्थिक दरी संपविणे गरजेचे आहे .
आता ही आर्थिक दरी संपवायची असेल तर , सर्व मुद्दे बाजूला ठेवून , सर्व स्वार्थी राजकारण बाजूला ठेवून , समाजात गोरगरिबांची विपन्नता संपविणे गरजेचे आहे . वर्णभेद , नस्लभेद , लिंगभेद न करता , कोणी अण्णा , कोणी बाबा , कोणी मोदी , कोणी राहुल , कोणी अरविंद , आणि इतर कोणीही ठामपणे पुढे येत असेल तर त्याचे स्वागत व्हायला हवे . धर्मविहीन समाजाच्या संकल्पनेसाठी शिक्षा , आणि आरोग्य हे ही तितकेच महत्वाचे . आर्थिक विषमता दूर करण्याची ही पाऊल वाट आहे .
शुभेच्छा
विश्वनाथ . शिरढोणकर

Monday, June 5, 2023

सार्वभौमत्वाचा उद्घोष म्हणजे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक!



 

छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून १६७४ रोजी झालेला राज्याभिषेक ही सतराव्या शतकातील भारताच्या इतिहासातील अलौकिक घटना होती. आपण कोणाचेही मांडलिक नसून स्वतंत्र, सार्वभौम राज्यकर्ते आहोत याची ग्वाही या राज्याभिषेकाने दिली. तत्पूर्वी त्यांना औरंगजेबही “जहागीरदार” म्हणत असे. या राज्याभिषेकाने शिवाजी महाराज छत्रपती तर बनलेच पण शककर्तेही बनले.

 

खरे तयार शिवाजी महाराजांचे जीवनच स्वकीय व परकियांशी संघर्ष करून स्वराज्य स्थापनेत गेले. जीवावरची संकटे झेलत त्यांनी विजयश्री प्राप्त केली. त्यांची रणनीती ही आजही जगभराच्या युद्धशास्त्रातील विचारकांच्या अभ्यासाचा विषय राहिलेली आहे. राजनीतीत ते किती धुरंधर होते याची उदाहरणे त्यांच्या दैदीप्यमान दीपस्तंभाप्रमाणे जगाला आजही मार्गदर्शन करत आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे त्यांचे रयतेवर असलेले प्रेम. मध्ययुगात रयत म्हणजे फक्त चिरडली जाण्यासाठी असते असा उद्दाम समज राज्यकर्त्यांचा होता. त्याला मुस्लीम अथवा हिंदू राजे अपवाद नव्हते. मोगलांनी आपली सत्ता कायम टिकवण्यासाठी वतनदा-या – जहागीरदा-यांच्या रुपात भारंभार सरंजामदार निर्माण केले खरे पण शेतकरी, अलुते-बलुतेदार, मजूर अशा शोषित समाजाकडे फक्त एक कर भरणारे अथवा वेठबिगारीवर फुकट राबणारे अशा दृष्टीने पाहिले गेले.  शिवाजी महाराज मात्र एकमेव अपवाद होते. रयत हाच राज्याचा केंद्रबिंदू आहे हे जाणून रयतेच्या हिताचे अगणित निर्णय घेणारे राज्यकर्ते म्हणजे शिवाजी महाराज. त्यांनी वतनदारी प्रथा बंद करून प्रस्थापित सरंजामशाहीला हादरा दिला.

 

शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक का करून घेतला? राज्याभिषेकाला विरोध झाला कि नाही झाला? यावर अनेक वाद उत्पन्न झालेले आहेत. शिवाजी महाराजांचा संघर्ष हा केवळ मुस्लीम सत्ताधा-यांशी नव्हता. इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज आणि अनेक हिंदू सरदार-जहागीरदारही त्यांच्या विरोधात होते. मोगलांतर्फे जसा शाईस्तेखान त्यांच्यावर चालून आला होता तसाच मिर्झाराजे जयसिंगही चालून आले होते. शिवाजी महाराजांनी शक्ती-युक्तीने त्यांच्यावर मात केली असली तरी शत्रूच्या लेखी त्यांचे महत्व एक बंडखोर म्हणूनच होते. या प्रतिमेतून बाहेर पडून आपण सार्वाभाम राजे आहोत अशी द्वाही फिरवण्याची आवश्यकता होती. राज्याभिषेकामुळे त्यांच्या राजकीय निर्णयांना, आदेशांना व प्रशासन यंत्रणेला अधिष्ठान प्राप्त होणार होते. एक न्यायाचे राज्य अस्तित्वात आलेले आहे याची ग्वाही देता येणार होती.

 

तत्पूर्वी राज्याभिषेक झालेले नव्हते असे नाही. यादव, राष्ट्रकुट, सातवाहन इत्यादी राजांनी आपापल्या घराण्यात प्रचलित असलेल्या प्रथेप्रमाणे राज्याभिषेक करून घेतलेले होतेच. पण देवगिरीच्या यादवांच्या अस्ताबरोबरच ती प्रथा बव्हंशी लोप पावलेली होती. गागाभट्टाने पहिला वैदिक राज्याभिषेक केला खरा पण त्याच्यासाठी त्यालाही “राज्याभिषेक प्रकरणं” हा ग्रंथ आधी सिद्ध करावा लागला कारण वैदिक राज्याभिषेक तर कधीच नामशेष झालेले होते. त्यामुळे तशा राज्याभिषेकाच्या संहिताही उपलब्ध नव्हत्या. त्यानंतर काही दिवसातच शिवाजी महाराजांनी निश्चल पुरीकडून तांत्रिक हिंदू पद्धतीनेही राज्याभिषेक करून घेतला व एतद्देशीय प्रथेची नव्याने रुजुवात केली. त्यात वैदिकांनी वैदिक राज्याभिषेक करण्याचा निर्णय शिवाजी महाराजांनी घेतल्यावर विरोधाचा सूर उमटला असे दिसते. वैदिक प्रथा संकुचित असली तरी समाजात (अगदी औरंगजेबाच्या दरबारातही) वैदिक ब्राह्मणांचे वर्चस्व असल्याने वैदिक राज्याभिषेक करून घेतल्याशिवाय शिवाजी महाराजांना अपेक्षित परिणाम साधता येणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी वैदिकांच्या संकुचित धर्मतत्वांमुळे होत असलेल्या विरोधावर मात करत वैदिक राज्याभिषेक करवून घेतला. तांत्रिक राज्याभिषेक करून हिंदू प्रथाही कायम ठेवली. त्यामुळे हिंदू व वैदिक समाजाचेही एक प्रकारे धार्मिक समाधान झाले. अभिषिक्त छत्रपती म्हणून ते सिंहासनारूढ झाले आणि भारतात एका एतद्देशीय क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली. रयतेला धर्माचे अधिष्ठान असलेला राजा मिळाला. परसत्तांना ख-या अर्थाने जरब बसेल अशी सार्वभौम शक्ती निर्माण झाली. तेराव्या शतकानंतर भारतात ख-या अर्थाने एतद्देशीय सार्वभौम राजाचा उदय झाला.

 

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही यच्चयावत देशासाठी अलौकिक घटना आहे ती यामुळेच. शिवाजी महाराज इतिहास जाणून भविष्य बदलवणारे या देशातील एकमेव शासक. रयतेला आश्वस्त करत त्यांना न्यायाचे राज्य देणारा एकमेव महामानव म्हणजे शिवाजी महाराज. त्यांना कोटी कोटी प्रणाम! मानाचा मुजरा!

 

-संजय सोनवणी

 

     

     

     

      

Sunday, June 4, 2023

संजय सोनवणी यांची वैश्विक साहित्यनिर्मिती - डॉ. श्रीपाल सबनीस

 

"मराठी कादंबरी रणांगणच्या पुढे गेलेली नाही. मराठी कादंबरी " तो-ती " च्या चक्रव्युहात अडकून मरणावस्थेला लागलेली आहे. त्यादृष्टीने "मराठी कादंबरी रणांगणच्या पुढे गेलेली नाही. मराठी कादंबरी " तो-ती " च्या चक्रव्युहात अडकून मरणावस्थेला लागलेली आहे. त्यादृष्टीने संजय सोनवणी यांची वैश्विक साहित्यनिर्मिती हे एक महत्वाचे आश्वासक पाऊल आहे. संस्कृतीने माणसाला काय दिले, याबाबत प्रत्त्येक माणसाला अंतर्मूख करून विचार करायला लावणारे लेखन संजय सोनवणी यांनी केले असून त्यांच्या कादंब-यांमद्ध्ये वैश्विक जाणीवांचा विशाल पट आहे आणि तो त्यांनी मर्यादित पानांमद्ध्ये मांडला आहे हे कौतुकास्पद आहे.
"कुशाण, कल्की आणि ओडिसी या तीन वेगळ्या संस्कृत्या, वेगळी पात्रे व वेगळे कालखंड चित्रीत करणा-या कादंब-या असल्या तरी त्यातील माणुसकीचा तळ ढवळणारे सूत्र एकच असल्याने या तीनही कादंब-या वाचतांना एकच महाकादंबरी वाचत असल्यासारखे वाटते. संशोधन, चिंतन आणि स्वतंत्र तत्वज्ञान याला कलात्मकतेत व वेगवेगळ्या शैल्यांत बसवण्याचे आव्हान सोनवणींनी पेलले असल्याने त्यांच्या कादंब-यांना रुढ कादंब-यांच्या चौकटीत बसवता येत नाही.
"संजय सोनवणींचे सामाजिक कार्य व लेखनही अद्वितीय असून ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादात त्यांची कृतीशील भूमिका ही आजवरच्या चळवळीतील सर्व परिभाषांना छेद देणारी असून तिचे स्वागत करायला हवे."
- डा. श्रीपाल सबनीस, ओडिसी, कल्की आणि ओडिसी या कादंब-यांच्या नवीन आवृत्त्यांच्या प्रकाशन समारंभात अध्यक्ष स्थानावरून बोलतांना. हे एक महत्वाचे आश्वासक पाऊल आहे. संस्कृतीने माणसाला काय दिले, याबाबत प्रत्त्येक माणसाला अंतर्मूख करून विचार करायला लावणारे लेखन संजय सोनवणी यांनी केले असून त्यांच्या कादंब-यांमद्ध्ये वैश्विक जाणीवांचा विशाल पट आहे आणि तो त्यांनी मर्यादित पानांमद्ध्ये मांडला आहे हे कौतुकास्पद आहे.
"कुशाण, कल्की आणि ओडिसी या तीन वेगळ्या संस्कृत्या, वेगळी पात्रे व वेगळे कालखंड चित्रीत करणा-या कादंब-या असल्या तरी त्यातील माणुसकीचा तळ ढवळणारे सूत्र एकच असल्याने या तीनही कादंब-या वाचतांना एकच महाकादंबरी वाचत असल्यासारखे वाटते. संशोधन, चिंतन आणि स्वतंत्र तत्वज्ञान याला कलात्मकतेत व वेगवेगळ्या शैल्यांत बसवण्याचे आव्हान सोनवणींनी पेलले असल्याने त्यांच्या कादंब-यांना रुढ कादंब-यांच्या चौकटीत बसवता येत नाही.

"संजय सोनवणींचे सामाजिक कार्य व लेखनही अद्वितीय असून ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादात त्यांची कृतीशील भूमिका ही आजवरच्या चळवळीतील सर्व परिभाषांना छेद देणारी असून तिचे स्वागत करायला हवे."

- डा. श्रीपाल सबनीस, ओडिसी, कल्की आणि ओडिसी या कादंब-यांच्या नवीन आवृत्त्यांच्या प्रकाशन समारंभात अध्यक्ष स्थानावरून बोलतांना.

शेरशहा सुरी: एक कुशल प्रशासक

  शेरशहा सुरीने हुमायूनचा पराभव केला आणि त्याला भारताबाहेर हाकलले. दिल्लीत आता कोणी शासक उरला नसल्याने शेरशहाने स्वत:ला दिल्लीचा सम्राट घोषि...