Tuesday, April 26, 2011

पण हा एकाकीपणा वाढतच जात असतो!

मानवी समाजाची प्रगल्भता ही एकतेत असते कि संघटीत पण जातीय/वंशादि पायावर विखुरले असण्यात? जीवा-शिवात ऐक्क्य पाहनारे, स्रुष्टी आणि अखिल मानवादि प्राणिमात्रात अद्वैत पाहणारे तत्वद्न्य याच भुमीत होवुन गेले. कणाद, कपिल मुनी, भ्रुगू (हे सारे असूर संस्क्रुतीचे होते) यांनी भौतिक तत्वद्न्यानाला/शास्त्राला महत्ता दिली. प्रजा ज्या तत्वद्नानामुळे जीवनधारण करते तोच धर्म असतो असे युधिष्ठीर सांगतो. फक्त पाच गावांवर सला करु पाहणारा युधिष्ठीर एक प्रकारे तत्कालीन गांधीयन तत्वद्न्यान वापरतांना दिसतो. प्रजा म्हणजे अवघा समाज यातील ऐक्याची संकल्पना मुळात नवीन नाही. बुद्ध-महावीरानेही याच महनीय संकल्पनांची महती सातत्याने गायलेली दिसते. बुद्धाचे असंख्य अनुयायी ब्राह्मणच होते. जात-वर्ण धर्मनेत्यांनी नाकारुनही अनुयायी मात्र कोरडेच राहीले. मानवतेची अगाध करुणा कधी त्यांना स्पर्शलीच नाही. अनुयायांनी धर्माला जे रुप दिले ते धर्मसंस्थापकांना अभिप्रेत होते काय?

थोडक्यात धर्मद्न्य वा संस्थापकांना कोठडीबंद करून अनुयायांनीच धर्मांचे वाभाडे काढले असल्याचे आपल्याला दिसते. उदाहरणे असंख्य आहेत. उदा. बुद्धाला नेमका कोणता धर्म सांगायचा होता यावर वाद होत कुशाणकाळात तिसरी धर्मसंगिती भरवावी लागली...बुद्ध धर्मात दोन गट पडले. जैन धर्मात श्वेतांबर व दिगंबर हे दोन तट पडले. ख्रिस्त्यांत क्यथोलिक आणि प्रोटेस्टंट हे दोन गट पडले. उपगटांची तर गणतीच नाही. म्हणजे धर्म जो सांगितला होता तो, धर्म ज्याचे आकलन झाले आहे तो आणि धर्म असा असला पाहिजे असे वाटतो तो...असे धर्माचे व्यक्तिनिष्ठ तुकडे पडत गेले आहेत असे दिसुन येते.

संघटनांचेही/पक्षांचेही असेच होते. बाबासाहेबांनी जो रिपब्लिकन पक्ष स्थापला तो आज किती हिस्शांत वाटला गेला आहे? बाम्सेफ आज किती आहेत हाही संशोधनाचा विषय आहे. मराठा सेवा संघातुन किती फुटुन निघाले? मराठा हितवर्धीनी आज किती संघटना आहेत? खुद्द ब्राह्मणांच्या जातीनिहाय...चित्पावन ते देशस्थ किती संघटना आहेत? छोट्या जाती...उदा...शिंप्यांच्याही किमान १०-१२ संघटना असतील.

याला आपण विखुरलेपण म्हणु शकतो. याला काहीकेल्या एकतेचे तत्वद्न्यान राबवू पाहणारे भारतीय उदात्त संस्क्रुतीचे पाईक म्हणता येणार नाही. संघटणेपुरती अभेद्य एकता अभिप्रेत असते हे खरेच आहे पण एकुणातील समाज म्हणुन एकता नाकारली जात असते आणि तेथेच समाजाचा एकुणातील अभ्युदय खंडित केला गेलेला असतो.

त्याच्या परिणामांची जाण मात्र मानवी घटकांना नसते.

मानवी इतिहास लाखो वर्ष जुना आहे. भारतातील इतिहास आता किमान १४-१५ लाख वर्ष मागे जातो. तो अबोल इतिहास आहे आणि दगडी शस्त्रांच्या मार्फतच ढूडाळावा लागत आहे...शस्त्रे हाच मानवी पुरातिहेसाचा पुरावा आहे...आजचाही आहे...भविष्यातील वेगळा काय असणार आहे?

शस्त्रे बदलली. भाषा, संस्क्रुती, जात, धर्म, वंश यांचीही अभिनव शस्त्रे बनवली...

मानवी इतिहास हाच मुळात युद्धांचा इतिहास बनलेला आहे.

तेच वर्तमानही आहे.

मग भविष्य युद्धायमान नाही तर काय असणार?

प्रतिक्षणी आम्ही कोणत्या ना कोणत्या युद्धात असतोच. कोनती ना कोणती बाजु आम्ही घेतलेली असतेच. कारण युद्धात जिंकायचे आहे. ते मग अन्य जातीयाविरुद्ध असो कि वंशीयाविरुद्ध, पक्षाविरुद्ध असो कि संस्क्रुतीविरुद्ध...

असे बाजु घेनारे नेहमीच विवेक हरवून बसलेले असतात...कारण आपला पक्ष/जात/धर्म हरला तर तो आस्तित्वचा प्रश्न आहे असे वाटते...
पण जे विवेकी असतात...व्यापक पायावर एकुणातीलच समाजाचा विचार करू लागतात त्यांना संपवणे हे या सर्वच टोळीबहाद्दरांचे काम बनून जाते.

मानवाने आहे त्या स्थितीपेक्षा व्यापक विचार करावा हे धर्ममार्तंड काय किंवा संत काय, राजे-महाराजे काय किंवा नेते काय यांना कधीच अभिप्रेत नसते. "ठेविले अनंते तैसेची रहावे..." असे संत तुकारामादि संतांची शिकवण असते तर पुर्वजांनी जी रुढी घालुन दिली तसेच पुढेही वर्तन करावे असे बाप सांगत असतो. रुढीसंकेत तोडण्याची हिम्मत सहसा भारतात कोणी दाखवलेली दिसत नाही. त्यामुळे एका अभद्र संकेत परंपरेत समाज/जाती/धर्मीय डुबवले जातात आणि त्यांचा अखेर कडेलोट होतो. केला जातो. तुकाराम कालसुसंगत कि कालविसंगत हा वाद त्यामुळे निर्माण झाला तर उद्रेकी प्रतिक्रिया उठणे स्वाभाविक आहे. पण चिकित्सा नाकारणे त्याहुन भयंकर आहे. रामदासांनी तर जे तत्वद्न्यान (?) मांडले आहे, त्यातील काही बाबी वगळता ते सांप्रदायिकच आहे...पण हेही ऐकायचे नाही असे ठरवून बसलेल्या नवसांप्रदायिकांचे काय करायचे? चिकित्सा नको...हाच काय तो अट्टाग्रह आहे.

याचा अर्थ ख-या स्वातंत्र्याच्या संध्या मिळतच नसतात असे नाही. जे ते मिळवतात त्यांना रोखता येण्याचे सामर्थ्य नाही म्हणुन कथित अनुयायी वाट पाहतात आणि अशा पद्धतीने त्याभोवती जाळे विणत जातात कि अंतत: त्या महानायकाचा अंत अपरिहार्य होवून बसतो. येशु ख्रिस्ताचा घातकी त्याचाच अनुयायी होता. परिणाम येशुला क्रुसावर चढावे लागले. ज्युलियस सीझरचे खुनी त्याचेच एकेकाळचे मित्र आणि अनुयायी होते. शिवाजी महाराजांची हत्त्या करणारे शेवटी कोण होते? संभाजी महाराजांच्या हत्येचा कट करणारे कोण होते? (पहा: "शिवपुत्र संभाजी": कमल गोखले.) सावरकरांनी नेमके कोणत्या परिस्थितीत प्रायोपवेशन केले? गांधींची हत्या करणारा गांधीअनुयायी नव्हता...पण गांधी मेले तर बरे अशी भावना कोन्ग्रेसींत होतीच...नाहीतर गांधीजींना मारण्याचे आधे किमान ४ प्रयत्न हौन गेल्यानंतरही त्यांच्या रक्षणासाठी कोन्ग्रेसी सरकारने कसलीही तजवीज का केली नाही?
अनुयायांना आपला नायक जोवर डोईजड होत नाही तोवर हवाच असतो. जोवर त्यांचे स्वार्थ बिनदिक्कत साधले जातात तोवर नायक/नेते हवेच असतात. पण अनुयायीच नायकाचा घात घडवतात हा इतिहासच आहे.

मग नायकाचे/नेत्याचे तत्वद्न्यान...मेल्यावर सांगायला कामाला येतेच कि नाही? खुपच.

वरील उदाहरणे वा विवेचन मी प्रवचनार्थी दिलेली नसुन मानवी समाज हा अखिल ऐक्याच्या मानसिकतेत न जाता विखंडित आणि कधी फायदेशीर तर कधी विनाशक परिणाम भोगण्याची अव्याहत आव्हाने नियतीला का देत असतो या प्रश्नावर चिन्तन करण्यासाठी आहे.

एकटेपना, जीवनाची वर्तमानकालीन आणि भवितव्याची अनिस्चितता, गोंधळलेले नातेसंबंध, जीवनाची पेलवता न येणारी अव्याहत वाहत राहणारी गती, मानवी संबंधातील बदलत जानारे जातीय/धर्मीय/वर्गीय संबंध....

या आणि अशाच अनेक भावना मानसाला केंद्रीक्रुत करत जात त्याचे मानसिक सौख्य हिरावत नेतात. त्यातुन द्वेषाचा विखार मानवी सहज-स्वाभाविक सहजीवनाच्या प्रेरणांवर मात करत जातात. नैसर्गिक चलाखी जाग्रुत होत कोणाशी कसे वागायचे याचे स्वयंनियम बनवले जातात आणि मानवी वर्तन हे स्वाभाविक न रहाता क्रुत्रिम बनुन जाते. याचा फायदा धर्मांध/जात्यंध/वंशवादी वा पक्षीय राजकारणी घेतात...ते सांगतात...आम्हीच तुमचे भले करु शकतो...आणि हे दिशांध लोक त्या-त्या लाटांवर वाहवत जातात. संघश/युद्ध सुरुच राहते. तीव्र होते.

सध्याच्या सर्वच यंत्रणा माणसाला माणुस म्हणुन जगु देण्यासाठी नसुन त्याला अधिकाधिक एकाकी करण्याची संयंत्रे आहे. ते समुहाचा/तात्कालिक सुरक्षेचा अभास देतात...आणि त्या त्या परिस्थीतीत त्या त्या लोकांना बरेही वाटते...

पण हा एकाकीपणा वाढतच जात असतो. आज आपण एकुणातील मानवी व्यवस्था पहाल तर जातीत असुनही मानसे एकाकीच आहेत. धर्मात असुनही ते एकाकीच आहेत. जातीय संघटना वा पक्षीय/धार्मिक संघटनांत समष्टी म्हणुन जात आहोत असे वाटत जे जीवापाड प्रयत्न करतात...सर्व आदेश बिनतक्रार पालतात...आपले शोषण होवु देतात...पण त्यांचे विचार करण्याचे, मन:पूत जगण्याचे स्वातंत्र्य नाकारले जाते.

अंतता: त्यांच्या पदरी काय पडते?

असंख्य संघटना, चळवलींचे कार्यकर्ते या शोकांतिकेतुन गेले आहेत...जात आहेत.

त्यात आपल्याला अजून किती काळ भर घालायची आहे?

परत भेटुयात.

2 comments:

  1. माणसामाणसांना जोडण्यासाठीच धर्माची स्थापना होते.मन:शुद्धी हे जवळपास प्रत्येक धर्माचे ध्येय आहे.मूळ ध्येय विसरून जेव्हा धर्मानुयायी कर्मकांडाला महत्व देऊ लागतात तेव्हा धर्मानुयायांमध्ये संघर्ष निर्माण होतो.संजयजी,तुम्हाला कदाचित पटणार नाही पण विपश्यना,योग या आध्यात्मिक गोष्टींतच हा संघर्ष रोकण्याची शक्ती आहे.

    ReplyDelete
  2. It resembles 'Theory of Alienation' of Marx...

    ReplyDelete