Wednesday, June 8, 2011

हिंदू धर्माची व्याख्या का होवू शकली नाही?

हिंदू धर्मासमोरील समस्या (भाग २)
हिंदू धर्माची व्याख्या का होवू शकली नाही?


हिंदू धर्माची निश्चित अशी व्याख्या नाही हे मी पुर्वी "मी हिंदू का नाही?" या याच ब्लोगवर प्रसिद्ध झालेल्या लेखात स्पष्ट केले होते. व्याख्या का नाही याची कारणे शोधणे आधी आवश्यक आहे.नंतर आधुनिक परिप्रेक्षात या धर्माची सर्वमान्य व्याख्या करता येणे शक्य आहे कि नाही यावरही विचार करता येईल.
आधीच्या लेखात स्पष्ट केल्याप्रमाणे आजचा हिंदु धर्म हा यद्न्य धर्म (ज्याला काही अंशी वैदिक धर्मही म्हणता येईल) आणि मुर्तिपुजक शैवप्रधान धर्म याचे मिश्रण झाले आहे. यद्न्य धर्मात अर्थातच मुर्तिपुजेला स्थान नाही. यद्न्य धर्माची मुख्य दैवते इंद्र, वरुण, मित्र, अदित्य इ. आहेत आणि त्यांची संख्याही मोठी आहे. ३३ प्रकारचे देव यात येतात. ही दैवते बव्हंशी निसर्गाची अनेकविध रुपके असून त्यांना यद्न्यातील आहुतींच्या मार्फत आवाहन करून संतुष्ट केले जाते, प्रार्थना केल्या जातात. हा धर्म सरस्वती नदीच्या काठावर राज्य करणा-या सुदास या पुरू वंशीय राजाच्या कारकिर्दीत सरासरी इ.स.पु. २५०० मद्धे सुरु झाला. वशिष्ठ हा या धर्माचा मुख्य प्रणेता म्हणता येत असला तरी १० ऋषिकुळातील जवळपास ३५० ऋषिंनी जवळपास १००० वर्षांच्या कालौघात रचलेल्या ऋग्वेदाच्या रुपात आणि समकालीन साम आणि यजुर्वेदाच्या रुपात हा धर्म स्वतंत्रपणे विकसीत होत गेला. या धर्मात आत्मा, पुनर्जन्म, अमरता, पुजा, संन्यास इत्यादिंना स्थानच नव्हते. हा पुर्णतया स्वतंत्र तत्वद्न्यान व कर्मकांड असनारा धर्म होता.

या धर्माच्या उदयाआधीच पुरातन सिंधु संस्क्रुतीपासुन एक लौकिक धर्म आस्तित्वात होता. त्याला आपण आज शैवप्रधान मुर्तिपुजकांचा धर्म म्हनतो. या धर्माचा कोणीही द्न्यात संस्थापक नाही इतका तो पुरातन आहे. किंबहुना आदिम माणसाने सुफलता विधी, जन्म-म्रुत्युच्या अनाकलनीय रहस्याने भारावुन जात या धर्माची निर्मिती केली जिचे अवशेष आज आपण अन्य पुरातन संस्क्रुत्यांतही पाहू शकतो. हा धर्म पुरातन असल्यानेच त्याला आगम धर्म असेही म्हटले जाते. हा धर्म शिव-शक्ति प्रधान असला तरी यक्ष किन्नरादि असंख्य देवता या धर्मात आहेत. त्यांची आजही पुजा होते. या धर्मात प्रतिमापुजन (शिवलिंग) ते मुर्तीपुजन महत्वाचे असून योग, संन्यास, तप, व्रत, तंत्रे ई. तत्वांचा समावेश होतो. आत्मा, पुनर्जन्म, मोक्ष, अद्वैत असे सिद्धांत या तत्वद्न्यानात येतात.

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी वैदिक संस्क्रुतीचा इतिहास या ग्रंथात स्पष्टपणे नमुद केले आहे कि "हिंदू धर्माच्या इतिहासात वैदिक धर्माचा कालखंड हा बराचसा मध्योत्गत स्वरुपाचा आहे. तो कालखंड अतिशय अर्थपुर्ण असला तरी, त्या कालखंडातील धार्मिक विचासरणीने हिंदु धर्माच्या रचनेवर व स्वरुपावर प्राणभुत व दुरगामी प्रभाव निस्चितपणे पाडलेला नाही."

हे तर्कतीर्थांचे नीरिक्षण अत्यंत सुयोग्य आहे. याचे कारण असे यद्न्य धर्म ईसपु. ३०० च्या दरम्यान लौकिकार्थाने पुर्णतया नष्ट झाला. ईंद्रादि वैदिक देवता अत्यंत दुय्यम बनल्या. उलट पुरातन शैवप्रधान मुर्तिपुजकांचा धर्मप्रवाह मात्र अव्याहत सुरु राहीला. याचा अर्थ वैदिक धर्म कर्मकांडात्मक अर्थाने संपला असला तरी वैदिक धर्मीय संपले होते असा त्याचा अर्थ नाही. यद्न्य हे अत्यंत खर्चिक व दीर्घकाल चालणारे असल्याने त्यांना मिळनारा आर्थिक वाटा संपला होता. (सहस्त्रार्जुनाने अनेक यद्न्य करून कर्ज वाढवले आणि शेवटी मदत मागायला गेला जमदग्नीकडे. (जमदग्नी भ्रुगु वंशीय असून अवैदिक संस्क्रुतीचा होता हे मी असुर परशुरामाचे रहस्य या किस्त्रीम मद्धे प्रसिद्ध झालेल्या विस्त्रुत लेखात स्पष्ट केले आहे.) त्यातुन जो संघर्ष निर्माण झाला त्यातुनच जमदग्नीचा खुन व नंतर परशुरामाने याद्निकांचे केलेले शिर्कान याला पुराणिक ब्राह्मणांनी क्षत्रियसंहाराचे रूप दिले. असो.

अर्थोत्पादनासाठी यद्न्य हे साधनच न उरल्याने वैदिक धर्मियांना पुरातन शैवप्रधान धर्मात परत यावे लागले. मुळचे वैदिकही असुर संस्क्रुतीचेच होते. याला प्रमाण म्हणजे वरुण, इंद्र ते आदित्यांना ऋग्वेदात वारंवार आदाराने "असूर वरुण", असूर ईंद्र असे संबोधले गेले आहे. असूर शब्दला नंतर बदनाम केले गेले हेही खरेच आहे, पण त्यावर नंतर.

थोडक्यात मुळात तत्वधारा व कर्मकांडात्मक अर्थाने पुरातन शैवप्रधान धर्म आणि वैदिक धर्म यात पराकोटीचा विभेद होता. यद्न्यकर्मांच्या अस्तानंतर वदिकांना परत मुळ धर्मात परत यावे लागले. ते आले, त्यांनी होता तो पुरातन धर्म स्वीकारला, परंतु हे स्वीकारण करत असता त्यांनी त्यावर वैदिक कलमे करण्यास सुरुवात केली. हे आत्मसन्मानासाठी, समजुत काढुन घेण्यासाठी केले कि त्यामागे काही विद्वान आरोप करतात तसे काही छुपे स्वार्थ होते यावर आपण नंतर चर्चा करुयात.

वैदिकांनी शैव दैवतांचे छुपे वैदिकिकरण करण्यास सुरुवात केली हे तर खरेच आहे. उदा. शिव आणि ऋग्वेदातील रुद्र यांचा काहीएक संबंध नसता रुद्र म्हणजेच शिव असे विवेचन करण्यास सुरुवात केली. तर शक्तिचे ऋग्वेदातील आदितीशी तादात्म्य आहे असे दर्शवायला सुरुवात केली. हा दैवत-संकर ख्रिस्ती आणि इस्लाममद्धेही केला गेला आहे हेही येथे लक्षात घ्यायला हवे. (अल्लाह हा शब्द मुळचा यहुदी धर्मातील आहे. त्याचे मुळ स्वरुप इस्लाममद्धे पुरेपुर बदलले आहे.) ग्रीक देवता रोमन संस्क्रुतीने स्वीकारल्या त्या आपली लेबले लावून हेही ध्यानी घ्यायला हवे. असो.

पण या संकरातुनच आजचा हिंदु धर्म निर्माण झाला आहे हे विसरता येत नाही. सर्वच शैवप्रधान दैवतांचे मुळ ऋग्वेदात दाखवण्याच्या नादात आणि जेही पुरातन साहित्य-तत्वद्न्यान संस्क्रुतात आहे ते वैदिकच हा भ्रम निर्माण करण्याच्या नादात धर्माच्या मुळ ढाच्यातच विक्रुती निर्माण झाल्या आहेत. उदा. अथर्ववेद हा यद्न्यधर्मियांचा नाही. एकही उपनिशद यद्न्यधर्मियांचे नाही. ते कसे हे मी नंतर स्पष्ट करतोच.

हा संकर झाला आहे हे तर वास्तव आहेच. परंतू हा संकर वैदिकप्रधान आहे हा जो समज निर्माण केला गेला, केला जातो तो मात्र समुळ अनैतिहासिक आणि चुकीचा आहे. खरे तर यद्न्य धर्माने आपले लौकिक आस्तित्वच गमावले होते आणि आहे. वेद माहात्म्य नेहमीच वैदिकाश्रयी लोकांपुरतेच मर्यादित राहिले हेही वास्तव आहेच. टिलक-गोळवलकरादि मंडळीने हिंदु धर्माची व्याख्याच मुळात वैदिकाश्रयी करण्याचे प्रयत्न केल्याने हिंदू धर्माची व्याख्या होणेच शक्य नव्हते आणि कालत्रयी ती त्या पद्धतीने होणारही नाही. सावरकरांची हिंदु धर्माची व्याख्या मुळात भौगोलिक स्वरुपाची असल्याने तिची दखल येथे घेता येत नाही. हिंदु हा शब्दही मुळात कोणत्याही प्राचीन धार्मिक साहित्यात येत नाही त्यामुळे त्याचाही येथे उपयोग नाही.

हिंदु धर्म एक "धर्म" म्हणुन कमजोर झाला आहे याचे कारण याद्न्यिक आस्तित्व व वेदमाहात्म्य लौकिकार्थाने संपुनही त्याची कलमे शैवप्रधान पुरातन धर्मावर झाली असल्याने आणि त्याच माहात्म्याचा गौरव आजही केला जात असल्याने एक भ्रामक स्थिती उत्पन्न झाली आहे. वैदिक धर्म चांगला कि वाईट हा प्रश्न येथे नसून धर्माची अवनती होण्यात या विचित्र संकराने मोठा हातभार लावला आहे हे मी येथे स्पष्टपणे नमूद करतो.

यामुळेच हिंदु धर्माची सर्वमान्य व्याख्या नाही. यामुळेच या धर्मात अनेक दोष घुसले आहेत. यामुळेच हा धर्म वर्धिष्णु न रहाता खालावत चालला आहे. धर्मसंकर होत असतात. ते होणे चुकिचे नाही. पण त्यासाठी परस्परांतील चांगले न घेता आपलाच धर्मवर्चस्ववाद आणने कसे संकरीत धर्मालाच विनाशाप्रत नेते याचे उत्क्रुष्ठ उदाहरण म्हणजे हा आज आपण म्हणतो तो हिंदु धर्म.

मी हे लेखन धर्म "गर्व से कहो" वाल्यांना दुखावण्यासाठी नक्कीच करत नाहीहे. उलट सर्वांनी धर्म समजावून घ्यावा व त्यात हे दोष मुळात घुसलेच कसे आणि ते कसे संपवता येतील यावर चिंतन करण्यासाठी आहे.

मी हिंदु धर्माची वास्तव व्याख्या पुढील लेखात करणार असून आपले योगदान स्वागतार्ह आहे.

2 comments:

  1. अत्यंत सुंदर विश्लेषण..
    सोबतीला जोडलेले रेफरंससेस खुप महत्त्वाचे आहेत.

    ReplyDelete
  2. संजय साहेब.
    अत्यंत महत्वाची माहिती.........

    ReplyDelete

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...