Tuesday, June 14, 2011

हिंदू धर्मासमोरील समस्या-४.

वर्ण-जातीव्यवस्थेचे स्तोम वाढले नेमके कधी?हिंदु शब्द कोठुन आला याबद्दल आजही वाद होत असतात. हिंदू हे नाव या धर्माने स्वत: घेतल्याचा मात्र एकही पुरावा नाही. मुळात हे नाव प्रादेशिक होते हे मात्र मान्य करावे लागते आणि प्रादेशिक म्हणजे सिंधु नदीच्या खो-यात राहणारे ते हिंदू अशी सरधोपट प्रांतीय व्याख्या होती. पर्शियन लोक स चा उच्चार ह असा करतात. पारशी धर्माचा प्रमुख धर्मग्रंथ अवेस्तात सप्तसिंधुला "हप्तहिंदु" तर असुर या शब्दाला अहुर असे म्हटले आहे. अरबी लोकांचा येथे संबंध नाही. त्यामुळे हिंदु हा शब्द पारशी भाषिकांची देणगी आहे आणि ती धर्मात्मक नसून प्रादेशिक आहे हे उघड आहे.

तत्पुर्वी येथील धर्माला (शाखानिहाय) सनातन धर्म, स्मार्त धर्म, गोधर्म, लिंगपुजकांचा धर्म, व्रात्य धर्म, श्रुती-स्म्रुती-पुराणोक्त धर्म अशी काही नावे होती, पण ती अखिल समाजाची धर्म म्हणुन व्याख्या करत नव्हती आणि ते तेंव्हा अभिप्रेतही नव्हते. याचे कारण म्हणजे "धर्म" हा शब्द religion या अर्थाने घेतला गेलाच नव्हता. Religion हे व्यक्तिप्रणीत विशिष्ट धर्म प्रवर्तनाचे नाव आहे. हा Religion बव्हंशी आस्तित्वातील धर्मांना पर्याय म्हणुन निर्माण झाले आहेत. अरबांच्या प्रतिमापुजक धर्माला वगळी व्यक्तिप्रणीत दिशा देण्यासाठी इस्लामचा जन्म झाला. मुळ बहुदैवतवादी ज्यु धर्माला पर्याय देण्यासाठी ख्रिस्ती धर्माचा उदय झाला. परंतु भारतात जैन आणि बौद्ध, शिख हे religion वगळता पुरातन काळापासुन सुरू राहिलेला धर्मही आस्तित्वात राहिला. त्या धर्माचा संस्थापक असा कोणी नव्हता. वैदिक धर्माचा प्रणेता वशिष्ठ ऋषी मानला तरी त्यालाही धर्मसंस्थापक असे बिरुद देता येत नाही.

खरे तर शैवप्रधान असो कि वैदिक...हे दोन्ही धर्म हे समुहाने निर्माण केलेले धर्म होते. त्या-त्या मानवी समुदायांच्या धार्मिक श्रद्धांचे आविष्करण त्यांच्या धर्मश्रद्धांत/कर्मकांडांत झाले होते. वैदिक हे प्राय: पशुपालक समाजाचे असल्याने व पशुधन व्रुद्धी हे त्यांचे जीवितासाठी अत्यावश्यक असल्याने स्वभावता: ऋग्वेद हा गोधनव्रुद्धीसाठीच्या अविरत प्रार्थनांनी भरला आहे. शैवप्रधान धर्म हा क्रुषिवलांनी निर्माण केला असल्याने त्यात सुफलता विधी महत्वाचा मानुन शिव आणि शक्तीचे जे प्रतीक बनवले ते आपण शिवलिंगात पाहू शकतो. यद्न्य धर्मातही सुफलता विधी (पशुधनव्रुद्धीसाठी) महत्वाचा असल्याने यद्न्य ही योनी तर अग्नी हे वीर्य असे कल्पुन समीधांना लिंग मानले आहे हेही येथे लक्षात घ्यावे लागते. शेवटी प्रतीके काहीही असली तरी ती सुफलता विधीशी निगडीत आहेत हे येथे लक्षात घ्यावे लागते.

ही प्रतीके निर्माण करणारा तत्कालीन मानवी समुदाय हा अद्वितीय होता असे म्हणने क्रमप्राप्त आहे. पराकोटीची संवेदनशिलता असल्याखेरीज अखील मानवी समुदायांना प्रेरीत करणारी, अव्याहत आव्हान देणारी प्रतीकशिलता जन्मास येत नाही. प्रतीकांच्या बाबतीत आजचा मानवी समुदायही या पुरातन पुर्वजांच्याच प्रतीकांचा आधार घेतो यात सारे आले.

थोडक्यात नंतर कालौघात जरी वैदिक आणि शैवप्रधान संस्क्रुत्यांचे मिश्रण झाले असले तरी मुलभुत मानवी धर्मभावना सुफलतेच्या कल्पनेतुनच आलेल्या होत्या. या दोन्ही धर्मांना रुढ अर्थाने कोणी-एक संस्थापक नव्हता. हे धर्म जनसमुहाने नैसर्गिक भावना व जीवनेच्छुक निकडीतुन निर्माण केले होते. या धर्मांना तत्वद्न्यान देणारे असंख्य होते. त्यामुळे तत्वद्न्यानात परस्परविरोध असणे स्वाभाविक होते. त्यामुळे ईश्वराचे आस्तित्व न मानणारा चार्वाकही होवू शकत होता, वेद हे धुर्त निशाचर पाखंडी लोकांचे तत्वद्न्यान आहे असे तो ठामपणे म्हणु शकत होता. तसेच यद्न्य हे वेदांचे (म्हणजे द्न्यानाचे) उच्छिष्ट आहे, यद्न्यापेक्षा तप, द्न्यान-संन्यास महत्वाचे असे औपनिषदिक तत्वद्न्यान उच्च रवाने सांगत यद्न्याची महत्ता घटवत आहेत असेही दिसते. एवढेच नव्हे तर प्रत्येक व्यक्तिचा धर्म (नैतिकतेच्या आधारावर) स्वतंत्र असतो हे अद्भुत तत्वद्न्यानही आपल्याला कर्णाच्या क्रुष्णाशी झालेल्या चर्चेवरून लक्षात येते. म्हणजे व्यक्तिधर्म आणि समाजधर्म यांत विभेद असू शकतो याचे असे दिग्दर्शन जागतीक धर्मेतिहासात दुर्मीळ आहे.

वैदिक असो कि शैवप्रधान, हे दोन्ही धर्म हे मुळात समुहप्रवर्तीत असल्याने त्यातील मुळ गाभा एकच असला तरी दैवतेतिहास हा संम्मीश्र झाला आहे हे स्पष्ट दिसते. शैवप्रधान धर्मात प्रारंभी शक्ती (मात्रुदेवता) हीच सर्वश्रेष्ठ होती तर शिव दुय्यम होता. पुढे जशी पित्रुसत्ताक पद्धती जोर धरु लागली तसे शिवाचे माहात्म्य वाढले. आधी शक्ती व शिवाची आराधना स्वतंत्रपने होत असे. सिंधु संस्क्रुतीत याचे विपुल पुरावे उपलब्ध आहेत. मात्रुदेवला व पुरुषदेवता निदर्षक शाळुंका (योनीपुजक) तर प्रस्तरखंड (लिंगपुजक) फार मोठ्या प्रमाणात सापडले आहेत. जेंचा शिव व शक्ती यातील तादात्म्य मानवी समाजाने शोधले तेंव्हा शिवलिंग स्वरुपात दोहोंचे एकाकारत्व पाहिले गेले.

वैदिक धर्मात प्रथम असुर वरुण हाच सर्वश्रेष्ठ दैवत होता. पुढे इंद्रमाहात्म्य वाढले व वरुण दुय्यम बनला. कधी अग्नी तर कधी प्रजापतीलाही महत्व बहाल केले गेले. प्रत्येक ऋषिकुळाने आपापल्या इष्ट दैवताला महत्व दिल्याचे स्पष्ट आहे.

मग येथे प्रश्न निर्माण होतो तो असा कि मुळात हिंदू नावाचा धर्म (Religion) आस्तित्वत आहे तरी कि नाही? हिंदु हा Religion नाही हे तर वरील विवेचनावरुन दिसुन येते कारण वैदिक असो कि शैव, या दोन्ही धर्मांना आणि त्यांच्या मिश्रणास कारण घडेल असा एकही धर्मप्रवर्तक अस्तित्वात नाही. त्यामुळेच एक विशिष्ट धर्मनियमांची चौकट या धर्माला नाही. त्यामुळेच त्याला अव्याख्येय म्न्हनण्याचा प्रघात पडला असावा.

पण ज्या अर्थी एका विशिष्ट जनसमुदायाला जग "हिंदू" समजते व त्या रीतिने त्यांच्याशी व्यवहार करते, त्या अर्थी अन्य सर्वच धर्मसमुहांतून वगळलेल्या गेलेल्या जनसमुदायाला हिंदू म्हणवून घेणे क्रमप्राप्त आहे. तो का वगळला जातो याचाही विचार केला पाहिजे.

हिंदू बहुदैवतवादी आहेत, आत्मा- त्याचे अमरत्व आणि पुनर्जन्मादि कल्पनांवर ते विश्वास ठेवतात तसेच ते मुर्तीपुजक आहेत आणि वर्ण-जातीभेद पाळतात आणि ही वास्तवे अन्य धर्मांत नाहीत म्हणुन ते आपसुक वेगळे ठरतात. परंतु मुळात वर्नभेद-जातीभेद या दोन्ही धर्मात होते काय हा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर स्पष्ट येते ते म्हणजे नाही. किंबहुना वर्ण हे कर्मप्रधान होते. वर्णांतर सहज होत होते. स्म्रुती काहीही म्हणत असल्या तरी त्यांचा समाजजीवनावर कसलाही प्रभाव नव्हता. ब्राह्मनाला शस्त्र पहाणे हेसुद्धा वर्ज्य ठरवले असले तरी ब्राह्मण राजे होत. इस ७ व्या शतकात भारतात आलेल्या ह्युएनत्संगाने लिहून ठेवले आहे कि भारतात ५ राजे क्षत्रीय, तीन ब्राह्मण, दोन वैश्य व दोन शुद्र होते. याचाच अर्थ असा कि स्म्रुती धाब्यावर बसवल्या गेलेल्या होत्या. त्यांचा समाजजीवनावर किमान १० व्या शतकापर्यंत कसलाही प्रभाव नव्हता. एवतेव त्या स्म्रुती म्हनजे व्यक्तिगत धर्मनियमांचे विचार होते असेच म्हणावे लागते. त्यांना समाज मान्यता होती असे दिसत नाही. महाराष्ट्राचे संस्थापक सातवाहन हे शुद्रच होते. त्यांना राज्यस्थापनेआड कोणतीही स्म्रुती आली नाही हे उघड आहे. त्यामुळे जाती-वर्णभेद हे आजच्या हिंदू धर्माचे मुळ अंग नाही हेही उघड आहे, पण गेल्या हजार वर्षांतील पाखंडी धर्मनेत्यांनी वर्ण-जाती हाच धर्माचा पाया मानल्यामुळे आजची ही भयंकर स्थीति उद्भवली आहे. भग्वद्गीता सुद्धा जन्मानुसार वर्ण मानत नसून कर्मानुसार मानते हेही स्पष्ट आहे. ऋग्वेदातही जन्माधारीत वर्णव्यवस्था नाही. जातीव्यवस्था तर नाहीच नाही. सिंधु संस्क्रुतीतही (जी शैवप्रधान होती) त्यातील अवशेषांवरुन वर्गभेद होते परंतु त्यांना जातीनिहाय स्वरुप नव्हते हे सिद्ध होते.

म्हणजे जाती-वर्ण हे काही केल्या मुळ (संकरीत असला तरी) धर्माचे व्यवच्छेदक लक्षण मानता येत नाही. कारण ना वैदिक ना शैवप्रधान धर्माने त्यांचे गौरवगान केले आहे. खुद्द महाभारतात (ईसपु. १५००) भीष्माचार्य शांतीपर्वात म्हनतात, " सध्या कोणत्याही वर्णाचा पुरुष कोणत्याही वर्णातील स्त्रीशी विवाह करत असल्याने वर्णसंकर झाला असून कोणीही शुद्ध वर्नाचा राहिलेला नाही. त्यामुळे ज्याच्या अंगी द्न्यान, दया, शीलादि गुण असतील त्यासच ब्राह्मण म्हणावे." याचा सरळ अर्थ असा आहे कि महाभारत काळात अनुलोम-प्रतिलोम विवाहाची बंधने नव्हती. मुक्त विवाह होत होते आणि त्याची असंख्य उदाहरणे आहेत. अर्जुनाने नागकन्या उलुपीशी विवाह केला. क्रुष्णाचा नातू अनिरुद्धाने बाणासुराच्या कन्येशी विवाह केला. सातवाहनांनी शकांशीही विवाहसंबंध केले आहेत. ही काही बोलकी उदाहरणे होत. म्हणजेच महाभारत काळात वर्णव्यवस्थाच लयाला गेली होती, मग त्याचे स्तोम नंतर उत्तरकाळात का वाढवले गेले हा प्रश्न निर्माण होतो त्यावर आपल्याला उत्तरे शोधावी लागणार आहेत. त्याखेरीज आजच्या जातीअंताची चळवळ निर्णायक यशापावेतो पोहोचणार नाही आणि सार्वकालीक धर्म-व्याख्याही बनवता येणार नाही. जातीव्यवस्थेची निर्मिती ही ब्राह्मणांची लबाडी आहे कि त्या व्यवस्थेच्या निर्मितीत सर्वच समाजांचेही स्वार्थ निहित होते यावरही चर्चा करावी लागणार आहे...ती पुढील लेखात.

1 comment:

 1. सर
  अतिशय सुंदर लेख आहे....

  एकूणच मनुस्मृतीचे उदोउदो हे मुसलमानी आक्रमणा नंतर अतिशय मोठ्या प्रमाणात झाले....
  माझ्या माहिती प्रमाणे इ. स. ८०० नंतर हे प्रमाण वाढले ते स्त्री रक्षणासाठी आणि नंतर ते वाढत जाऊन धर्माच्या प्रत्येक अंगात - शाखेत फोफावले.

  कलाकार किव्हा दुय्यम कामे करणाऱ्यांना अनेक बंधने पडली. त्यांची कारणे एकतर युद्ध ज्वर पसरवण्यासाठी किव्हा कमी करण्यासाठी , गुप्तहेरगिरी साठी , नगर कल्याणाच्या , राज्याच्या सुरक्षेसाठी , राज्य कर्तव्यांसाठी आणि इतर अनेक नावाने लादले गेले.
  या मध्ये मुल उद्धेश हा नगर किव्हा राज्य यांचे रक्षण (परकीय आक्रमकान पासून , दुसर्या धर्माच्या प्रसार पासून ) आणि लोक कल्याण असले तरी जेव्हा मोठी राज्ये तयार झाली जशी मोगलाई तसे हेच नियम मनुस्मृती सारखे धर्म ग्रंथ बनून मोठ्या प्रमाणात फोफावले.
  यात सुरुवातीला जरी ब्राम्हणांचा, वैश्यांचा आणि क्षत्रियांचा (त्या वेळचे - गुणा नुसार) लोक कल्याणाचा उद्धेश असला तरी नंतर तो स्वार्थ झाला आणि कला प्रमाणे नंतर तोच अधिकार बनला .

  ReplyDelete