मराठी विश्व साहित्यसंमेलनाच्या निमित्ताने दै. लोकसत्ताने "साहित्त्यिकानां न भयं न लज्जा" हा अग्रलेख नुकताच लिहुन वाचकांना सहसा माहित नसलेल्या साहित्यिकांच्या असाहित्त्यिक साहित्यप्रकाराला थेट भिडवले. अर्थातच यावर साहित्त्यिकांकडुन फारशा (किंबहुना नाहीतच...) प्रतिक्रिया आल्या नसल्या तरी इतरांच्या खांद्यावरुन बंदुकी झाडण्याचे काम केले आहे. टोरोंटो वारीचा आता मुद्दाच उरलेला नसला तरी हा विषय चर्चेत आहेच. आजही लोकसत्ताने टोरोंटो वारीत सहभागी झालेल्यांची यादीच प्रसिद्ध करुन त्यातील साहित्त्यिकांची यत्ता विचारली आहेच. त्याचवेळीस अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी होणा-या निवडणुकीच्या मतदारांचा मुळात साहित्याशी कितपत संबंध आहे याचीही चर्चा झालेली होतीच. यात वाचकांचे नेमके स्थान काय व एकुणातील आपली वाचनसंस्कृती याबद्दलही प्रश्न उपस्थित होतात.
मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळावा, ती वैश्विक व्हावी, इतकी कि एक दिवस मराठी साहित्त्यिकाला नोबेल मिळावे अशी आशा बाळगणारे मराठीत कमी नाहीत. पण मुळात मराठी साहित्याचीच यत्ता काय यावर आधी विचार केला पाहिजे.
पाश्चात्य भाषांत अत्यंत बाल, किशोर, कुमार साहित्याची अत्यंत सृजनशील अशी विपुल प्रमाणात निर्मिती होत असते. त्यामुळे मुलांना लहान वयातच वाचनाची गोडी लागते. यात रहस्य, थरार, गूढ, अद्भुतरम्य अशा विविधरंगी साहित्याचा समावेश असल्याने व सहित्त्यिक दर्जाही उत्तम असल्याने मुलांना आपापल्या आवडीनुरुप विपूल साहित्य उपलब्ध असते.
याउलट अत्यंत केविलवाणे असे मराठीचे चित्र आहे. मुळात मुलांसाठी लिहिण्याचीच आपल्या साहित्त्यिकांना लाज वाटते. भा. रा. भागवतांचा अपवाद वगळला तर आजीवन बाल-किशोरांसाठी लिहिणारा लेखक नाही. पण आता ते आउटडेटेड झाले आहे. जे सहित्य प्रसिद्ध होते त्याची लायकी जवळपास शुण्यवत अशीच आहे. अपवादाने अधुन-मधुन एखाददुसरे चांगले पुस्तक येते खरे, पण एखाद्या पुस्तकाने बाल-किशोर मराठी वाचनाकडे वळण्याची शक्यता नाही.
वाचनाची सवय लहानपणापासुन लागली तर मुलांच्या मनोविश्वावर सकारात्मक परिणाम होतो याचे भान आपल्याला कधीच नव्हते. आजही नाही. प्रकाशक जीही काही मुलांसाठीची म्हनवली जानारी पुस्तके काढतात ती अक्षरश: कोणत्यातरी शासकीय योजनेत त्यंची वर्णी लावण्यासाठी. त्यामुळे दर्जाचा विचार व अपेक्षा करता येत नाही. ही पुस्तके शेवटी शाळांच्या कपाटांत वा गोदामांत सडणार आहेत हे जसे प्रकाशकांना माहित असते तसेच खरेदी करणा-या शासकीय अधिका-यांनाही. त्यामुळे मुलांच्या आवडींचा, त्यांच्यातील वाचनसंस्कृतीचा विचार कोण आणि का करेल?
ज्याचा हिस्सा त्याला मिळ्ण्याशी मतलब!
वाचकांच्याही यत्ता असतात. बाल-किशोर साहित्याचा अभाव आहे, ठीक. पण मग पुढे तरी काय? ज्याला पहिलीतच यश नाही त्याने एकदम जी.ए. हातात धरावेत अशी अपेक्षा करता येत नाही. वाचनाची सवय लागायला वाचकाला आधी रंजक साहित्य हवे असते. तेही दर्जेदार असायला हवे. आपल्याकडे त्याचीही वानवा. रहस्यकथा, गुढकथा, भयकथा, थरारकथा, विनोदी साहित्य....
परकीय कथावस्तुंवर आधारीत का होइना मराठीत एके काळी रंजक सहित्याची मोठी लाट होती. गो. ना,. दातार ते शिरवळकर एवढा प्रवास मराठीने केला. लाखो लोकांना वाचक बनवले. वाचनालये गजबजु लागली ती याच लेखकांमुळे. हेच वाचक मग अधिक गंभीर साहित्याकडे वळाले.
पण मग ही परंपरा खंडितच झाली. मराठी समिक्षकांनी रंजक लेखकांना साफ नाकारले. रंजक लेखक हा साहित्यिकच नसतो हे म्हणतांना त्यांनी अगथा ख्रिस्ती, गार्डनर यांना मात्र जगाने नुसते डोक्यावर घेतले नाही तर राष्ट्रीय पुरस्कारही दिले. आपल्याकडे अशा रितीने हिणवुन घेत मग रंजक लेखन करायला कोण पुढे येणार? स्वतंत्र प्रतिभेने नव्या काळाशी सुसंगत, अधिक व्यापक परिमाणे घेवून येणारे नवे रंजक पण अनुभवविश्वात भर घालणारे साहित्यिक मराठीने निर्माण केले नाहीत. मारिओ प्युझो, जेफ्री आर्चर, फ़ोरसीथ...छे. आमची मजल तेथवर गेलीच नाही. आम्ही अवलंबुन राहिलो मग अनुवादांवर. मराठीतील जीही काही वाचन संस्कृती आहे ती थोडीफार या रंजक साहित्याच्या अनुवादांमुळे. मराठी साहित्त्यिकांचे योगदान अल्पांश आहे हे नाईलाजाने म्हणावे लागते.
मराठी साहित्यिकांची (किती जणांना साहित्त्यिक म्हणायचे हा प्रश्नच आहे.) सर्वात मोठी समस्या ही आहे कि एक पुस्तक प्रकाशित होते न होते, त्याला पारितोषिक कसे मिळेल, त्यावर परिचय कसे येतील...मग त्यावर आधारित पुढचे डाव काय..फायदे काय यातच लेखक गुंतुन पडत जातो. एकदा तर मी एका लेखकाची कादंबरीचे हस्तलिखित वाचलेलेही नसता मल सांगितले कि ही कादंबरी तुम्ही फक्त प्रकाशित करा, राज्य शासनाचा पुरस्क्कार मिळणारच आहे. तो एवढ्या ठामपणे बोलत होता कि त्याने काहीतरी फिल्डींग लावलेलीच आहे याची मला खात्रीच पटली. मी ती कादंबरी नाकारली. दुस-या वर्षी त्याच्या कादंबरीला खरोखरच पारितोषिक मिळालेले होते. आपल्या साहित्त्यिक पुरस्कारांच्या या यत्तेवर कोणाही सुजान वाचकाला शरम वाटायला हवी कारण बव्हंशी पुरस्कार हे अक्षरश: म्यनेज केलेलेच असतात याबाबत कोणीही शंका बाळगु नये. पुरस्कारप्राप्त पुस्तक वाचणे ही एक शिक्षाच बनुन जाते आणि वाचक गंडवला जातो. लेखक १०% कोट्यातील फ्ल्यट मिळवायला पात्र ठरतो...काय वाचन संस्कृती वाढवणार?
तो कशाला आपली साहित्त्यिक म्हणुनची यत्ता वाढवायचा प्रयत्न करेल?
लोकसत्ताचा आरोप...कि बहुतेक साहित्त्यिक हे राजकारण्यांच्या दावणीला बांधलेले असतात तो खराच आहे. त्यामुळे त्यांचे व्यक्तिगत काही लाभ होतही असतील...पण साहित्त्यिकांनी (अनेक विचारवंतांनीही) आपापल्या अस्मिता गहाण टाकण्यातुन निर्माण झालेला सर्वात मोठा सांस्कृतीक धोका हा आहे कि ही मंडळी कोणत्याही सामाजिक प्रश्नांवर तोंड उघडत नाहीत. मत काहीही असो, कोनाला पटो अथवा न पटो पण ते अभिव्यक्त करण्याचे स्वातंत्र्य ते गमावून बसले आहेत असे आपण सहज पाहु शकतो. पु. ल., दुर्गाबाइंची येथे आठवण येणे स्वाभाविक आहे...पण गेले ते दिन गेले. साहित्तिकांनी काही ते सर्वच अशी मजल मारली असल्याने समाजाशी काही घेणे-देणे नसणारे, "मी तुझी पाठ खाजवतो...तू माझी खाजव" वृत्तीचे माफियांना (राजकारण्यांनाही) लाजवतील असे पण अतिक्षुद्र मनोवृत्तीचे कंपु बनवलेले आहेत.
अशा कुपमंडुक साहित्त्यिकांकडुन नोबेल विनर साहित्त्यिक निर्माण होईल कसा? वैश्विकतेला कवेत घेत मानवी जीवनाचे असंख्य पदर उलगडुन दाखवत वाचकाला प्रगल्भ करणा-या कलाकृती निर्माण होतीलच कशा? तसे होणार नसेल तर वाचन संस्कृती बहरेलच कशी?
मराठीत गाजलेल्या (बव्हंशी गाजवल्या गेलेल्या) कृती या तुलनात्मक साहित्याच्या अंगाने पहायला गेले तर अजुनही प्राथमिक पातळीवर आहेत असे प्रसिद्ध तुलनाकार समीक्षक डा. आनंद पाटील म्हणतात हे खरेच आहे.
त्याहीपेक्षा अजुन भीषण बाब म्हणजे साहित्य क्षेत्रातील जातीयवाद. ब्राह्मण, मराठा, ओबीसी व दलित अशी जातीय विभागणी मराठी साहित्यात झालेली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे ब्राह्मणी आहे हा आरोप आजचा नाही. त्यातही देशस्थ-कोकणस्थ ही जातीय बाब डोकावतेच...यंदाही डोकावतेय! मराठा समाजही त्यांचे साहित्य संमेलन स्वतंत्र आयोजित करतो. ओबीसींचेही आता, दुबळे असले तरी, भरु लागले आहे. मुस्लिम, आदिवासी साहित्यसंमेलनेही होतात. विद्रोही साहित्य संमेलने नेहमीच प्रकाशात असतात ती त्यातील विद्रोही जाणीवांमुळे...पण विद्रोही नेमका कोण हे ठरवायचे तंत्र जातीयच असते! ब्राह्मणी संमेलने (आजवरच्या अध्यक्षांचा इतिहास पहा) केवळ सहानुभुती वा आपण जातीयवादी नाही हे दाखवण्यासाठी अधुन मधुन दलित वा मुस्लिम लेखकाची अध्यक्षपदी निवड घडवून आणत असतात...पण ओबीसींना अत्यंत क्वचित असे स्थान मिळाले आहे.
आता या सर्व प्रकारात साहित्त्यिक योग्यता हा निकष नसतो. दोन-चार, कोणाहे वाचकाला न आठवणारी पुस्तके लिहिणारे अनेक महाभाग साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बनलेले आहेत.
या सर्व जातीय प्रकारांमुळे साहित्त्यिकांत जो विभेद, जो अत्यंत निंदनीय आणि आक्षेपार्ह आणि कोणत्याही समाज संस्कृतीला अशोभनीय असल्याने, निर्माण झाला आहे त्याची परिणती मराठीचा एकूणातीलच साहित्त्यिक दर्जा ढासळवत नेत आहे. कारण लेखकाला अमुक जातीचे असणे पुरेसे असते. त्यासाठी सहित्त्यिक लायकी सिद्ध करत बसण्याची गरज नसते. मराठीत जर काही दखलपात्र साहित्य निर्माण झालेले असेल तर ते निव्वळ अपघाताने...आणि म्हणुणच असे साहित्य अत्यल्पही आहे.
वाचनसंस्कृती तेंव्हाच वाढु शकते जेंव्हा तेवढेच विविधांगी साहित्य विपुल प्रमाणात निर्माण होते. तुमच्या कादंब-या पाच-दहा पानांपार वाचवत नसतील तर वाचकाने आपले पैसे त्यावर का वाया घालवावेत? ही अपेक्षा चुकीची नाही काय? वाचक तेच पैसे मग सिनेमा, इंग्रजी (मूळ अथवा अनुवादित) साहित्यच वाचेल कि! केवळ मराठी साहित्यसंस्कृती वाचवायला त्याचे पैसे काही वर आलेले नाहीत.
आणि जेंव्हा वाचायलाच हवे असे त्याच्या आवडीचे साहित्य येते तेंव्हा वाचक बरोबर, प्रसंगी मेहनत घेवुन, ते पुस्तक मिळवतोच असा अनुभव मी अनेकदा घेतला आहे. त्यामुळे वाचकांना वाचायचेच नाही असे नसुन त्याला वाचावे वाटलेच पाहिजे असे देण्यात साहित्त्यिक असमर्थ आहेत म्हणुनच वाचनसंस्कृतीही क्षीणावत चालली आहे.
अत्यंत अपवादात्मक लेखक जागतीकीकरण व त्यामुळे निर्माण होत असलेले बहुसांस्कृतीकीकरण स्पर्शु शकले आहेत. शेतकरी अजुन धड आवाक्यात आलेला नाही. आपण त्याला इतर म्हणतात म्हणुन कृषी/ग्रामीण जीवनाचे उत्कट चित्रीकरण करणारी कादंबरी वगैरे म्हणतात म्हणुन म्हणायचे...पण त्यात खोली किती, वास्तव किती...कि केवळ ज्यांना त्या जीवनाबद्दल काही माहितच नाही त्यांना गंडवले जातेय हे कोण पाहणार? लोकांना ऐतिहासिक/पौराणिक कादंब-यांचे आपल्याकडे वेड आहे हे खरेच आहे. मृत्युंजयसारख्या कादंब-यांनी वाचकांना वेड लावले हेही खरे आहे. पण आजकाल केवळ अशी पुस्तके पटकन खपतील म्हणुन इतिहासातील व पुराणकथांतील हाती सापडेल ते पात्र घ्यायचे आणि कादंबरी ठोकायची असाही एक लेखकीय उद्योग बनला आहे. अर्थात प्रकाशकांचेही त्यांना प्रोत्साहन असतेच. मग दर्जा कोण पहातो...(आणि मग वाचतोही कोण म्हणा!)
थोडक्यात, मराठी साहित्य संस्कृती रसातळाकडे चालली आहे. लोक इतर प्रकारची, माहितीपर, अनुवादित वा वैचारिक पुस्तकांकडे झुकत आहेत. वाचकांची भुक शमलेली नाहीय. शमणारही नाही. उलट सर्व यत्तांना रुचेल असे उच्च (किमान ब-या) दर्जाचे साहित्य येत राहिले तर आहे ती वाचनसंस्कृती भरभराटेल यात मला शंका नाही.
येथवर मी साहित्त्यिक हा साहित्य संस्कृतीचा मुलाधार असल्याने त्यांचा आधी विचार केला आहे. पण प्रकाशक, विक्रेते आणि सरकारी ग्रंथालयांचे ग्रंथपाल आणि खुद्द शासन साहित्य व वाचनसंस्कृतीचे कसे मारेकरी आहेत हे पुढील लेखात!