Tuesday, August 21, 2012

ज्यांनी जगाला झिंगवले...



मनुष्याचा इतिहास हा मोठा अजब आहे. मानवाने प्रतिकुल निसर्गाशी झुंज घेण्यासाठी जसे जीवनोपयोगी शोध लावले तसेच विरंगुळ्यासाठी, बेधुंद होण्यासाठीही काही शोध लावले. मद्याचा शोध यापैकीच एक म्हणता येईल. पाश्चात्य जगात मद्यप्रतिष्ठा आहे असे मानण्याचा आपला कल आहे. पण ते खरे नाही. भारतात एके काळी मद्याला अत्यंत प्रतिष्ठा होती. पुरुषच काय पण स्त्रीयाही विपुल प्रमाणात मद्यपान करत असत. गांवोगांवी मद्यपानाच्या सार्वजनिक सोयीसाठी पानकुट्या असत. भारतात मद्य बनवण्याचा शोध अत्यंत प्राचीन काळी लागला असे मत सर जोन व्यट या इतिहाससंशोधकाने व्यक्त केले आहे. भारतात या संपुर्ण व्यवसायाचे श्रेय कलाल या जातीकडे जाते. ही जात देशभर आढलत असली तरी तिला स्थानपरत्वे वेगवेगळी नांवेही पडलेली दिसतात. उदा. कलाल, कलवार, कलार, कलान ही नांवे अधिक प्रचलित असली तरी सोंडी, शौडिक, सुंडि अशीही नांवे उत्तर व दक्षीण भारतात प्रचलित आहेत.

या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे मद्य निर्मितीतील त्यांची विशेष कुशलता. भारतात मद्यनिर्मितीचा शोध सिंधुकाळापासुनच लागला असावा. तत्पुर्वी नशेसाठी लोक इफेड्रा व भांगेचाचाच उपयोग करत असत. वेदांत वैदिकजन जे सोमपान करत तो सोम म्हणजे अन्य काही नसुन इफेड्रा या वनस्पतीचाच रस होय. सोमपानाला एवढे महत्व होते कि ऋग्वेदाचे पहिले कांड हे सोमसुक्त म्हणुनच ओळखले जाते. अर्थात सुरेचा शोधही तोवर लागलेला होताच. पहिले मद्य हे ताड, शिंदी, नारळ अशा वृक्षांच्या रसाला आंबवून केले गेले असे साधरणतया मानले जाते. परंतु उर्ध्वपातन करुन मद्य बनवायचे शास्त्र विकसीत व्हायला इसपु सुमारे एक हजार सालापर्यंतचा काळ लागला. उर्ध्वपातनाची कल्पना मानवाला सुचली ही एक विज्ञानातील मानवाचे पुढचे पाऊल आहे असे मानले जाते. अविरत निरिक्षण व सातत्याने केलेल्या प्रयोगांमुळे ही कला विकसीत झाली. "कलाल" हे सार्थ नांव या समाजाला पडले ते यामुळेच!

ग्रीक पुराणकथांत डायोनियसला मद्याची देवता मानले गेले आहे. भारतात मद्याची अशी देवता मात्र नाही...असे असले तरी आद्य मद्यनिर्माता हा विश्वकर्माच आहे असे मानण्याचा प्रघात आहे. उर्ध्वपातन करुन मद्य बनवण्याची कला भारतीय हैहय वंशातील सहस्त्रार्जुनाच्या काळात (इसपु १०००) भारतात विकसीत झाली असे मानले जाते. भट्टीवर भांड्यात उकळती, वेगवेगळ्या मिश्रणाची, आंबवणे ठेवून ती वाफ नलिकेतुन नेत ती वाफ थंड करत थेंबाथेंबाने मद्य दुस-या पात्रात जमा करणे अशी ही मुळ प्रक्रिया. प्राचीन नलिका या मातीच्या वा लोहाच्या असत. मुख्य म्हणजे मुळात ही प्रक्रिया शोधने हे मानवी कल्पकतेची (व अपरिहार्य गरजेचीही) एक झलक होय. पण ही प्रक्रियापद्धत कशी शोधली गेली याबाबत इतिहास मौन पाळतो. आपण फक्त तर्क करु शकतो!

शौंडिक (सुंडी, सोंडी ही अपभ्रंशित नांवे) हे नांवही या जातीला मिळण्याचे एक कारण आहे. प्राचीन काळी पानकुटीत (मद्यपानगृहांना पानकुटी असे म्हटले जात असे.) चषकांत मद्य जे वाढले जायचे ते पखालीतुन हत्तीच्या सोंडेच्या आकाराच्या चर्मनलिकेतुन. त्यामुळे अशा मद्यदात्यांना म्हटले जावु लागले शौंडिक. पुढे त्यातुनच अनेक पोटजाती पुढे आल्या. पुर्वी मद्य साठवण्यासाठी पखालींचाच उपयोग केला जात असे. भारतीय मद्य जसे निर्यात होई तसेच रोममधुनही मद्य आयात करण्यात येत असे. रोमन मद्य हे चार ते पाच फुट उंचीच्या, मोठ्या घेराच्या अंफोरा नामक कुंभांतुन आणले जात असे. महाराष्ट्रात उत्खननांत अशा कुंभांचे अनेक अवशेष मिळालेले आहेत.

वेदकालात मद्याला "सुरा" असे म्हनत. मद्य व सोमरस एकत्र मिसळुन विकायचीही पद्धत होती. त्या मिश्रणामुळे कडक नशा होते असा समज होता. कोकटेलची याला प्राचीन पद्धत म्हणता येईल. मद्याची व सोमरसाची दुकाने वेदकाळातच उघडायला सुरुवात झालेली होती असे याज्ञवक्ल्य स्मृतीनुसार दिसते. मद्य बनवनारे व ते विकणारे असे दोन वर्ग एकाच व्यवसायात निर्माण झालेलीही आपल्याला वेदकाळातच दिसते. सार्वजनिक मद्यपानगृहांत (पानकुटी) अनेक प्रकारची मद्ये सजवुन ठेवली जात असत व विविध प्रकारांच्या चषकांतुन ग्राहकांना दिली जात असत. काही चषक सोण्याचे व रत्नजडीत असत तर काही स्पटिकांचे...काही लाकडी तर काही मातीचे...ज्याची जशी आर्थिक ताकद तसा चषक व उंची मद्य...हे ओघाने आलेच! हळुहळु भारतात मद्यनिर्मितीचे स्वतंत्र शास्त्रच बनु लागले. उसाचा रस, द्राक्षरस, मोहाची फुले, यव व तांदुळ अशा अनेक पदार्थांपासुन मद्य निर्माण केले जात असे. अमरकोशात चोवीस प्रकारच्या मद्यांची नोंद मिळते...यावरुन मद्यशास्त्राच्या प्रगतीचा अंदाज येईल.

उच्चभ्रु लोक शक्यतो मसाल्यांनी सुगंधीत केलेले मद्य पीत असत. मदिरा जेवढी जुनी तेवढी तिची नशा औरच असेही त्यांना समजलेले होते. निघंटरत्नाकरात "जुने मद्य व तेहे सुगंधीत केले असेल तर ते नुसती नशाच देत नाही तर सर्व रोगांचा नाश करते" असे म्हणुन ठेवले आहे.

मद्यनिर्मितीचा उद्योग भारतात खेडोपाडी प्राचीन काळापासुन पसरलेला होता. खेड्यांतील पानकुट्या गांवाबाहेर असत. गाथा सप्तशतीत अशा पानकुट्या व मद्यपानाला समर्पित केलेल्या अनेक गाथा आहे. स्त्रीयाही मद्यपानात मागे नव्हत्या हे वर नमुद केलेलेच आहे. घरात साठवलेले मद्य त्या पीत असत. त्यांच्य मुखाला येणा-या मद्यसुगंधावरही अनेक अप्रतीम कविता गाथासप्तशतीत येतात.  पण त्याच्याही पुर्वी रामायण काळात सीता व तिच्या दास्याही मद्य घेत असत असा उल्लेख मिळतो. लंकेत तर मद्याची रेलचेल होती. मदिरापानाने धुंद झालेल्या स्त्रीयांची वर्णणे रामायणात अनेक वेळा येतात. एवढेच नव्हे अशोकवनात रामाची सीतेशी पहिली भेट झाली तेंव्हा रामाने सीतेला स्वहस्ते मद्य प्यायला दिले होते. महाभारताचे तर विचारायला नको. कौरव पांदव व त्यांच्या स्त्रीया तर मद्यपान करतच पण कृष्णही मद्यपान करत असे. द्रोपदी व सुभद्रा यांनी वनविहाराला गेल्या असता मद्यपान करुन आलेल्या खुशीत आपले दाग-दागिने इतर स्त्रीयांवर उधळुन टाकले असे आदिपर्वात म्हतले आहे. एवढेच नव्हे तर यादवांचा विनाश हाच मुळात अति-मद्यपानाच्या धुंदीत आपापसात झगडुन झाला हे आपल्याला माहित आहेच. कालिदासाच्या काळातही प्रियजनांच्या आग्रहाखातर स्त्रीया मद्य घेत. शिव स्वत: मद्य पितो व पार्वतीलाही पाजतो असे कुमारसंभवात कालिदास लिहितो. अज आपल्या लाडक्या इंदुमतीला स्वत:च्या मुखातील मद्य पाजतो. रस्त्याच्या कडेला असलेल्या "सोंडिआपन" या तत्कालीन गुत्त्यांचाही उल्लेख कालिदास करतो. याचा अर्थ येवढाच कि तत्कालीन समाजात मद्यपान ही निषेधार्ह बाब होती असे दिसत नाही. इसवी सनाच्या दुस-या शतकातील एका कुशाण शैलीतील शिल्पात मद्यधुंद गणिकेला इतर कसे सावरत आहेत हे दृष्य कोरण्यात आलेले आहे. वारांगना आणि मद्य यावर कुट्टनीमत व कामशास्त्रात विस्ताराने लिहिले गेलेले आहे. किंबहुना त्याला एक सामाजिक प्रतिष्ठा होती. उच्चभ्रु काय आणि जनसामान्य काय, मेजवान्या,  रिकाम्या वेळी व उत्सवप्रसंगी मद्यात झिंगणे पसंत करत असत. आणि तत्कालीन सामाजिक स्थिती व लोकांची मुळात असलेली उत्सवप्रियता व जीवनाचा आनंद मनमुराद लुटण्याची मनोवृत्ती पाहता ते स्वाभाविकही होते. आजचे नैतीक निकष पुरातन कालाला लावणे याला आपण सांस्कृतीक अडाणीपणा म्हणतो.

यादवांचा विनाश अतीव मद्यपानामुळे झाला या जनस्मृतींमुळेच कि काय, तेंव्हापासुन मात्रसुरापान करुन होणारी भांडणे, कलह याबाबत वेदांतच नमुद केले गेलेले होतेच. सोमपान हे यज्ञप्रसंगापुरतेच मर्यादित होवू लागले. मद्यपानाबाबत सामाजिक निषेध व्यक्त होवू लागला असावा. विशेषत: ब्राह्मणांवर हे निषिद्ध सर्वात आधी आले व क्रमाक्रमाने पुढील शेकडो वर्षांत समाजात पसरत गेले. अर्थात निषिद्ध मानने व ते पाळणे यात मोठा फरक असतो आणि तो भारतात आजतागायत राहिलेला दिसतो. म्हणजे सामाजिक दृष्ट्या मद्यपान निषिद्ध...पण पिणारे काही केल्या कमी होत नाहीत.

परंतु या सामाजिक निषिद्धाचा फटका कलाल समाजाला बसणे स्वाभाविक होते. पानकुटीला "चंडालकुटी" असे संबोधले जावू लागले असे गाथा सप्तशतीवरुन लक्षात येते. याचा अर्थ मद्य जरी सर्वांना प्रिय असले तरी ते बनवणारे व विकणारे मात्र गांवाबाहेर बहिष्कृत असे सामाजिक चित्र निर्माण होऊ लागले. पण कलालांच्या (वा शौंडिकांच्या) आर्थिक परिस्थितीत फारसा फरक पडला नाही. तो पडणे शक्यही नव्हते कारण उच्चभ्रु असोत कि जनसामान्य, मद्याच्या मागणीत फरक पडलेला दिसत नाही. बंगालमधील कलाल तर आताआतापर्यंत एवढे श्रीमंत होते कि ते शंभर टक्के वार्षिक अशा अवाढव्य व्याजाने कर्जे देत आणि वसुलही करण्याची शक्ती बाळगत!

युद्ध आणि मद्य

प्राचीन काळी भारतीय सैन्यात हत्तींचे प्रमाण मोठे असे. युद्धाच्या वेळी हत्तींना मद्य प्यायला लावले जायचे. यामुळे बेधुंद झालेले हत्ती उन्मत्तपणे शत्रु सैन्यात कसलीही पर्वा न करता घुसत शत्रुसैन्याची दानादान उडवुन देत असल्याचे उल्लेख परकीय प्रवाशांनीही केलेले आहेत. युआन श्वांग हा चीनी प्रवासी सातव्या शतकात महाराष्ट्रात आला होता. त्याने महाराष्ट्राच्या केलेल्या वर्णनात तर मराठी योद्धे युद्धाला तयार होण्यासाठी मद्यधुंद होतात आणि मग एक भालाईत शत्रुच्या हजार सैनिकांना भारी पदतो. सम्राट हर्षवर्धनही मराठी लोकांना जिंकु शकला नाही त्याचे कारण म्हणजे मराठे सैन्य मद्य पिवून लढतांना भारी पडतात असेही तो नमुद करतो. ही प्रथा पार पानिपत युद्धापर्यंत चालत आलेली दिसते. तत्कालीन बुणग्यांत कलालांचाही समावेश होता. वीरश्री संचारण्यासाठी मद्यपान समाजमान्य होते असेच दिसते. या पद्धतीत आजही फरक पडलाय असे दिसत नाही हे आधुनिक युद्धतंत्रातील, सहसा अप्रकाशित ठेवल्या जात असल्या तरी, प्रत्यक्ष उदाहरणांवरुन दिसते.

असे असले तरी आधीच म्हटल्याप्रमाणे कलालांचा आर्थिक नसला तरी सामाजिक दर्जा मात्र घसरतच गेला. अनेकांनी इस्लाम व शीख धर्मातही प्रवेश केला. तेथेही त्यांची सामाजिक श्रेणी वाढली नाही. हिंदु कलाल हे बव्हंशी शिवभक्त व देवीभक्तच आहेत. या जातीत विविध वंशीय, काही प्रमानात परकीयही, आहेत व ते स्वाभाविक आहे. या जातीत मुळचे ब्राह्मण व क्षत्रीय वर्णीयही उतरले व हा व्यवसाय जसा सामाजिक दृष्ट्या बदनाम होवू लागला तसे तेही आपला मुळ दर्जा हरपुन बसले असेही मत रिश्लेसारखे मानववंशशास्त्रज्ञ व्यक्त करतात.

हा अत्यंत कौशल्याचा व्यवसाय होता. खेडोपाडी त्याची व्याप्ती जवळपास आता-आतापर्यंत होती.  आधुनिकीकरनाने अवाढव्य कंपन्या, साखरकारखानेच मद्यनिर्मितीत उतरल्याने कलालांची कला निष्प्रभ ठरत गेली. उंची मद्ये बनवणे त्यांना व ग्राहकांनाही परवडणारे नव्हते. मग हातभट्टी ही अत्यंत निकृष्ठ दर्जाची दारु बनवण्यात वापरली जावु लागली. त्यात सरकारी निर्बंध एवढे वाढले कि कलाल म्हणजे गुन्हेगार असाही समज होवू लागला. कडक मद्याच्या नांवाखाली मद्यनिर्मितीत असे काही घाणेरडे पदार्थ वापरले जावू लागले कि पिणा-यांना मरणाशीच गळाभेट घ्यावी लागावी.

कलाल समाज आता मद्यनिर्मितीच्या व्यवसायातुन बाहेर पडला आहे. जगण्याच्या नव्या वाटा त्यांनी स्वत:च शोधल्या आहेत. कलाल असोत कि शौंडिक...पोटजातींचा प्रश्न एवढा आहे कि ते आपापसातही उच्च-नीच भेद पाळतात. परंपरागत व्यवसाय तर गेला पण जात मात्र चिकटुन आहे. ही जातीय धार्मिक मानसिकता कोणाची पाठ सोडत नाही...ती का याचे समाज-मानसशास्त्र आपल्याला समजावुन घ्यावे लागणार आहे. कलालांनी राजे-महाराजे असोत कि आपले अवतारी पुरुष...योद्धे असोत कि जनसामान्य...यांना हजारो वर्ष झिंगवत त्यांच्या जीवनाला आनंदाचा मादक आधार दिला हे मात्र खरे.

मद्यपान हे वाईटच आहे...पण ती एक मानवी संस्कृतीच्या इतिहासातील एक महत्वाची घटनाही आहे. ती दखल या लेखात घेतली आहे...मद्यपानाची स्तुती करण्यासाठी नाही...

-संजय सोनवनी
९८६०९९१२०५




5 comments:

  1. अभ्यासपूर्ण लेख. बर्याच माहितीमुळे थोडा रुक्ष झाला आहे. अगदी शेवटच्या परिच्छेदापर्यंत निःपक्षपाती माहिती देणारा लेख, कुठलीही मीमांसा न करता एकदम, "अचानक मद्यपान हे वाईटच" अशा वैयक्तिक निष्कर्षाने संपणे थोडे खटकते. अर्थात कोणत्याही सुजाण नागरिकाचा ह्या निष्कर्षाला विरोध नसावा. असो. थोडा मधुशाला रुपी मद्याचा ओलावा देऊन मी माझी प्रतिक्रिया थांबवतो . . . म्हणजे कोण्या खर्या पीयाक्कडाने लेख वाचला तर "साकी" चा विरह घडवण्याचे पाप आपल्या माथी नको :D
    हरिवंशराय बच्चन विरचित "मधुशाला" मधल्या काही विशेष आवडती अशी पाच कडवी

    बनी रहें अंगूर लताएँ जिनसे मिलती है हाला,
    बनी रहे वह मिटटी जिससे बनता है मधु का प्याला,
    बनी रहे वह मदिर पिपासा तृप्त न जो होना जाने,
    बनें रहें ये पीने वाले, बनी रहे यह मधुशाला।।२८।

    यम आयेगा साकी बनकर साथ लिए काली हाला,
    पी न होश में फिर आएगा सुरा-विसुध यह मतवाला,
    यह अंितम बेहोशी, अंतिम साकी, अंतिम प्याला है,
    पथिक, प्यार से पीना इसको फिर न मिलेगी मधुशाला।८०।

    मेरे अधरों पर हो अंितम वस्तु न तुलसीदल प्याला
    मेरी जीव्हा पर हो अंतिम वस्तु न गंगाजल हाला,
    मेरे शव के पीछे चलने वालों याद इसे रखना
    राम नाम है सत्य न कहना, कहना सच्ची मधुशाला।।८२।

    मेरे शव पर वह रोये, हो जिसके आंसू में हाला
    आह भरे वो, जो हो सुरिभत मदिरा पी कर मतवाला,
    दे मुझको वो कान्धा जिनके पग मद डगमग होते हों
    और जलूं उस ठौर जहां पर कभी रही हो मधुशाला।।८३।

    और चिता पर जाये उंढेला पत्र न घ्रित का, पर प्याला
    कंठ बंधे अंगूर लता में मध्य न जल हो, पर हाला,
    प्राण प्रिये यदि श्राध करो तुम मेरा तो ऐसे करना
    पीने वालांे को बुलवा कऱ खुलवा देना मधुशाला।।८४।

    संपूर्ण कविता : http://manaskriti.com/kaavyaalaya/mdhshla.stm

    ReplyDelete
  2. haa lekh sonavani saraanchyaa agadi jivhaalyaachaa asun tyaani to zingalelyaa sthitit lihilelaa disato!!!

    ReplyDelete
    Replies
    1. हाहाहा;;;विनोद चांगला आहे;;;

      Delete
  3. "त्याच्याही पुर्वी रामायण काळात सीता व तिच्या दास्याही मद्य घेत असत असा उल्लेख मिळतो."
    "एवढेच नव्हे अशोकवनात रामाची सीतेशी पहिली भेट झाली तेंव्हा रामाने सीतेला स्वहस्ते मद्य प्यायला दिले होते. महाभारताचे तर विचारायला नको. कौरव पांदव व त्यांच्या स्त्रीया तर मद्यपान करतच पण कृष्णही मद्यपान करत असे"

    kuthe aahe ullekh ?
    ullekh spashta dya.. nahitar spashta sanga hindu dharamavarcha ragamule asla lihita...

    ReplyDelete
  4. नमस्कार , लेख आवडला. एक प्रश्न आहे. रायगड आणि ठाणे जिल्ह्यामध्ये काळण जात आहे. बरेच जुने लोक दारू गाळण्याचा व्यवसाय होता असे सांगतात. माझा प्रश्न हा आहे की. कलाल वरुण काळण शब्द निर्माण झाला असावा का ? या बद्दल माहीत असेल तर द्यावी

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...