Monday, October 29, 2012

जातिसंस्थेचा उगम कसा झाला? (४)



दुष्काळ आणि इस्लामी सत्ता...


  अर्थव्यवस्था हा कोणत्याही समाजाचा/राष्ट्राचा मुलभूत कणा असते. एक वेळ धर्माशिवाय मनुष्य जगू शकतो...अर्थाशिवाय नाही. अर्थाची निर्मिती होते ती बहुविध उत्पादनातून व त्याच्या व्यापारातून. उत्पादने व व्यापाराला अनेक सेवांचीही गरज असते. उदा रक्षण सेवा, वाहतुक सेवा. वाहतुक ही जलमार्गे असू शकते अथवा खूष्कीच्या. मागणी आणि पुरवठा नेहमीच अर्थव्यवस्थेचा तोल सांभाळत असतात. तेजी-मंदीची चक्रे कोणत्याही अर्थव्यवस्थेत अपरिहार्य अशेच असतात. असे असले तरी मागणी वाढवणे, वाढत्या मागणीसाठी पुरवठा वाढवणे ही बाजु उत्पादक सांभाळत असतात. राजव्यवस्थेचे कार्य असते ते म्हणजे कराच्या मोबदल्यात उत्पादक/सेवा घटकांना पुरेसे संरक्षण देणे, व्यापार उदीम वाढेल अशी धोरणे राबवणे व उत्तेजन देणे. सरासरी दहाव्या शतकापर्यंत पश्चिमोत्तर टापु वगळला तर भारतीय राजवटीही तुलनेने स्थिर अशाच होत्या. राजवट बदलली तरी अर्थव्यवस्थेला धक्का लावायचा विचार सत्ताधारी करत नसत. कौटीलीय अर्थशास्त्रात राजाची अर्थव्यवस्थेबद्दलची कर्तव्ये स्पष्ट केली आहेत. राजसत्ताही अनेक उद्योगांच्या मालक असत. उदा. खाणव्यवसायावर बव्हंशी राजसत्तांचीच मालकी असे.



या काळात व्यापाराच्या व्याप्तीमुळे शहरोशहरी व्यापारी व उत्पादकांच्या श्रेण्या असत. या श्रेण्या साधारणपणे आजच्या व्यवसायकेंद्रीत संघटना व पतपेढ्या असतात त्या स्वरुपाच्या होत्या. या श्रेण्यांना राजदरबारी महत्व असे. कोनताही व्यवसायावर परिणाम करणारा निर्णय घेतांना या श्रेण्यांचे मत विचारात घेतले जात असे. मूक्त स्पर्धा, वाढता नफा यामुळे उत्पादनेही वाढती होती. त्यामुळे उत्पादनपद्धतीही सर्वस्वी वेगळी होती. बौद्ध जातकांमद्धे बुरुड, कुंभार, लोहार, विणकर ई. उत्पादक घटकांनी गांवेच्या गांवे वसवली असल्याचे निर्देश मिळतात. याचाच अर्थ असा कि उत्पादनांचे केंद्रीकरण झाले असून व्यापा-यांमार्फत उत्पादित माल अन्यत्र वितरीत केला जात असे. स्वयंपुर्ण ग्रामरचना तेंव्हा अस्तित्वात आलेली नव्हती. अर्थातच जन्माधारीत जातीव्यवस्थाही अस्तित्वात आलेली नव्हती, कारण वाढते उत्पादन करण्यासाठी आवश्यक भासणारी कुशल मनुष्यबळाची गरज.



अर्थव्यवस्था प्रवाही असते, वर्धिष्णु असते तेंव्हाचे सामाजिक नियमही लवचीक असतात याचा अनुभव जग पुरातन काळापासून घेत आलेले आहे. याचा अर्थ वर्गव्यवस्था नसते असे नाही पण वर्गबदल हा सहज व स्वाभाविक होत जातो. या काळात धर्मसंस्था ही समाजाच्या पारलौकीक गरजांची पुर्ती करत असली तरी ती व्यवस्था केंद्रीभुत नसते. त्यामुळेच कि काय राजे-सम्राटही सहिष्णु असत. म्हणजे ते ब्राह्मणांना दान-दक्षीणा देत तसेच बौद्ध विहारांनाही आर्थिक मदत करत. समाजही या तत्वाला अपवाद नव्हता. उदा. अनेक बौद्ध लेण्यांना देणग्या देणा-यांत विविध व्यवसायी...कुंभार, लोहार ते व्यापारीही दिसतात ते याचमुळे. ब्राह्मणही स्मृतींनी त्याज्ज्य ठरवलेल्या व्यवसायांत पडतांना दिसतात. सातवाहन काळात अनेक ब्राह्मण सैनिकी, कृषीकर्म ते व्यापार-उदीमात पडलेले दिसतात. धर्मसत्तेपेक्षा इहसत्ता महत्वाची असल्याने जेथे अर्थार्जन अधिक होईल त्या व्यवसायात पडने हा मानवी स्वभाव आहे. आणि भारतात तसे झालेलेही आहे.



म्हणजेच कोणी कोणता उद्योग-व्यवसाय करावा यावरही बंधन नव्हते असे आपल्याला दिसते. परंतू अकराव्या शतकापासून एकुणातील अर्थव्यवस्था संकटात सापडु लागलेली दिसते. सन १०३३, १०4३ व १०५२ असे सलग तीन भिषण राष्ट्रव्यापी दु:ष्काळ भारतात पडल्याची नोंद आहे. या दु:ष्काळाने अन्न-पाण्याच्या शोधात फार मोठ्या प्रमानावर विस्थापन तर झालेच परंतु लक्षावधी माणसे व जनावरे मरण पावली. मुख्य उत्पादन अन्नधान्याचे...ते पुरते ठप्प झाले. अन्य उत्पादनांची मागणीही अर्थातच पुरती घटली. अन्न विकत घ्यायला पैसा नाही तेथे अन्य उत्पादनांना कोण विचारतो? त्यामुळे उत्पादनकेंद्रेही ओस पडणे स्वाभाविक होते. थोडक्यात द्वितीय महायुद्धानंतर जशी एक महामंदी आली होती त्यापेक्षाही भिषण अशी महामंदी भारतात या दुष्काळांनी आणली.



दुष्काळांचे सत्र येथेच थांबले नाही. १६३० पर्यंत जवळपास २५० पेक्षा अधिक प्रदेशनिहाय दुष्काळ भारतात पडले याची नोंद डच व्यापारी व्ह्यन ट्विस्टने करुन ठेवली आहे. मृत प्राणी...कधी मृत माणसेही खावून जगायची वेळ या दुष्काळांनी आणली होती. त्यात १३९६ ते १४०७ या काळात पडलेल्या दुर्गादेवीच्या भयंकर दुष्काळाची नोंद जागतीक पातळीवर घेतली गेली, एवढा तो प्रलयंकारी होता. समग्र अर्थव्यवस्था भुइंसपाट करणा-या या दुष्काळाने निर्मानकर्त्यांना रस्त्यावर आणुन सोडले नसले तरच नवल!



इस्लामी आपत्ती!



इस्लामी स्वा-या भारतावर सातव्या शतकापासुनच सुरु झाल्या होत्या. मोहम्मद बिन कासीमने सन ७२२ मद्धे राजा दाहीरचा पराभव केला व सिंध-मुलतानवर कब्जा केला. दहाव्या शतकानंतर गझनीच्या मोहमदापासुन भारतावरील हल्ले वाढु लागले. उत्तर भारताला याचा अर्थातच मोठा झटका बसला. तेराव्या शतकाच्या आरंभीच (१२०६) इस्लामी सत्ता गुलाम घराण्याच्या निमित्ताने दिल्लीत स्थिरस्थावर झाली. पुढे इस्लामी सत्तेचा विस्तार दख्खनेतही होवू लागला. देवगिरीची यादव सत्ता ते विजयनगरचे साम्राज्य इस्लामी घशात गेले. थोदक्यात हिंदू सत्ता सर्वकशरित्या बुडवल्या गेल्या व इस्लामी शरिया राजवटी सुरु झाल्या.



हा सत्तापालट अर्थातच रक्तरंजीत होता. भारतीय समाजजीवनावर व एकुणातील अर्थव्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होणे स्वाभाविक होते. अरबी व्यापा-यांनी सातव्या शतकापासुनच समुद्री व्यापार आपल्या हातात घ्यायला सुरुवात केली होती. इस्लामी सत्ता जसजशा जगभर पसरु लागल्या तसतशा त्या त्या देशातील इस्लामी सत्तांनी व्यापाराच्या आर्थिक दिशा बदलायला सुरुवात केली. एका अर्थाने मोनोपलीकडे ही वाटचाल सुरु होती. नवव्या-दहाव्या शतकापर्यंतचे भारताचे आंतरराष्ट्रीय व्यापारातील स्थान डळमळीत व्हायला लागले होते. अरबांनी भारतीय बंदरांच्या क्षेत्रात स्थायिक व्हायला सुरुवात केली होती. एकट्या चेऊलला दहा हजारापेक्षा अधिक मुस्लिमांनी तळ ठोकलेला होता. भड्पोच, मलबारची स्थितीही वेगळी नव्हती. अन्य देशांत, जेथे भारतीय वस्तुंची बाजारपेठ होती तेथेही इस्लामी सत्ता स्थापन झाल्याने इस्लामी व्यापा-यांना सर्वत्र एकच व्यापार व कायदेपद्धत अंगिकारता आली होती. अरबी समुद्री चाचे भारतीय जहाजांवर हल्ले चढवत बेसुमार लुटालुटही करू लागले होते. कायदा आणि धर्म हे एकच बनल्याने इस्लामी व्यापा-यांना एक सुलभता मिळाली. शेर शहा सुरीने इस्लामी व्यापा-यांना उत्तेजन देण्यासाठी त्यांच्यावरील सर्व कर रद्द केले. देशांतर्गत महामार्गही बांधायला सुरुवात केली. हिंदू व्यापा-यांना करात सवलती नव्हत्या. एका अर्थाने संपुर्ण व्यापार मुस्लिमांच्या हाती गेला.



हिंदू सिंधुबंदी प्रकरणाने मागे पडले हा जो आरोप होतो त्यात विशेष तथ्य नाही कारण विदेशांशीचा संबंध ज्या व्यापारासाठी येत होता तोच मुलात हिंदुंच्या हाती राहिला नाही. सत्ता सर्वस्वी त्यांच्या हाती गेल्याने देशी उत्पादकांना मिळणारा भावही कमी होत गेला. एका अर्थाने उत्पादक निर्माणकर्ते हे शोषित बनत गेले. ती परंपरा इंग्रजांचे राज्य आल्यानंतरही कायम राहिली...नव्हे अधिक भिषण बनली.



कोणतीही व्यवस्था आपोआप निर्माण होत नसते. दुष्काळ आणि इस्लामी सत्तेच्या कचाट्यात सापडलेल्या भारतीय निर्मानकर्त्यांच्या हाती मग नेमके काय उरले होते? त्याचा जाती जन्माधारीत होण्याशी नेमका काय संबंध होता हे आपल्याला तपासून पहायला हवे.



१. मागणीतील घटीमुळे उत्पादन मर्यादित होत जाणे स्वाभाविक असते. उत्पादन मर्यादित झाले कि आहे त्या व्यवसायात अधिकची स्पर्धा नको म्हणुन त्यांत प्रवेश बंद किंवा अत्यंत अवघड केला जात असतो.

२. राष्ट्रीय व विदेशी गरजाधारीत अतिरिक्त उत्पादन करण्यापेक्षा स्थानिक गरजा पूर्ण करता येईल एवढेच उत्पादन करण्यावर भर असतो.

३. यामुळे उत्पादन संस्थांचे विकेंद्रीकरण होत ते पार ग्रामनिहाय बनत जाते. एक ग्राम हे एका व्यावसायिकाचे एकार्थाने कायमचे आश्रयस्थान बनून जाते. गांवात स्पर्धक नको असे प्रत्येक व्यावसायिकाला वाटत असल्याने त्याला अनुसरुन काही सामाजिक संकेत बनू लागतात व राज्यव्यवस्थेचे प्रतिनिधी त्याचे नियमन करु लागतात. थोडक्यात नवी पुनर्रचित व्यवस्था ही जीवनसंघर्षातील एक अपरिहार्य गरज बनुन जाते.

४. नवीन शोधांची गरजच संपल्याने आहे त्याच आर्थिक परिप्रेक्षात आहे तीच स्थिती टिकवण्याची गरज भासते व त्यातुनच समाज मानसशास्त्र आकार घेवू लागते. नवीन लोकांना आपल्या व्यवसायात प्रवेश देणे बंद केले जाते. ज्याने त्याने आपापला पारंपारिक व्यवसाय करण्याचा अपरिहार्य संकेत निर्माण होतो.

५. हे नियमन करण्यासाठी प्रत्येक व्यवसायाच्या पंचायती बनवल्या जातात. नीति-नियमांची फेराअखणी होते व त्यांची एक बंदिस्त चौकट बनत जाते.

६. आता व्यवसाय ही अपरिवर्तनीय "जात" बनत जाते कारण व्यवसायबदल जवळपास असंभाव्य झालेला असतो. पंचायतीने जातीबाह्य केले तर ती भयंकर शिक्षा ठरते कारण अन्य व्यवसायांत प्रवेश अशक्य असतो. त्यामुळे सामाजिक मानसिकता ही जातीला धरुन राहण्याची बनत जाते. किंबहूना जात हीच सुरक्षेचे एक कवच बनून जाते.

७. स्थानिक वा केंद्रवर्ती राजसत्तांना या व्यवस्थेला मान्यता देण्याखेरीज पर्याय नसतो. किंबहुना परकीय सत्तांना असे पर्याय देणे गैरसोयीचे व तोट्याचे वाटत असल्याने स्वधर्मियांचे हित मुख्य बनत वैधर्मीय अधिक कसे पिचत जातील हेच त्यांचे प्रामुख्याने ध्येय बनते. कररचनाही तशाच कठोर बनत जातात.

८. वर्गीय व्यवस्था व त्यातील लवचिकता पूर्णपणे संपुष्टात येवून ती जन्माधारीत जातीव्यवस्थेत बदलत कठोर होवू लागते व त्याची परिणती ती अन्याय्य होण्यात होते.



जगात कोठेही जातीव्यवस्था आढळत नाही याचे कारण भारतियांवर जी गंडांतरे कोसळली तशी अन्य देशांत कोसलली नाही. भारतात इस्लामने जवळ्पाचशे वर्ष राज्य केले असले तरी संपुर्ण भारत इस्लाममद्धे त्यांना बदलवता आला नाही. समजा अन्य देश जसे इस्लामी आक्रमनासमोर कोलमडुन संपुर्ण इस्लामी बनले तसा भारतही बनला असता तर जन्माधारीत जातीव्यवस्थेची निर्मिती झाली असती काय? सततचे दुष्काळ व शोषक सत्ता यांच्या दडपनाखाली मुळची भारतीय व्यवस्था कोलमडली नसती तर मुळात या व्यवस्थेची गरज भासली असती काय?



या प्रश्नांची उत्तरे नाही असेच आहे. सर्वप्रथम हे लक्षात घ्यायला लागते कि कोनतीही व्यवस्था बनते ती तेंव्हाच जेंव्हा ती समाजाचीच अपरिहार्य गरज असते. कोणी सांगितली म्हणुन ती सर्वांनी ऐकली असे कधीही होत नसते.



असे असले तरी आपल्या धर्माची या बाबत नेमकी काय भुमिका होती? राजसत्तांची काय भुमिका होती? जातेव्यवस्था बनली पण जातीश्रेष्ठतावाद कोठुन निर्माण झाला यावरही आपल्याला चिंतन करायचे आहे...ते पुढील भागात.



(क्रमश:)



6 comments:

  1. जातींचा उगम हा एक गुंतागुंतीचा विषय आहे. आपण तो सहज सोप्या रुपात आमच्यापर्यंत पोहाचावाताय याचे कौतुक आहे. धर्म आणि अर्थ याचा संबंध जातींच्या उगमाशी आहे. पुढच्या लेखाबाबत उत्सुकता आहे.

    ReplyDelete
  2. तार्किक विवेचन. पण आजवर आपण जे ऐकत आलो - वाचत आलो - शिकत आलो, त्यापेक्षा हे पूर्ण वेगळे आहे. आज आपल्या समाजातील राजकारण सत्ताकारण ज्या गृहीतांवर आधारलेले आहे, त्या गृहीतांना आपल्या विवेचनात फारशी जागाच रहात नाही. या मांडणीवरून जातीसंस्थेचा उगम व्यापार - उत्पादक या लोकांमधून झाल्याचे मानावे लागेल - हे ही प्रस्थापित विचाराशी न जुळणारे आहे. (मला व्यक्ती म्हणून असे वाटते, की जातिसंस्थेचा उगम कसा झाला हा अभ्यासाचा विषय असू शकतो. पण आज समोर असलेल्या लोकांनी एकमेकांचा जातीवरून विचार करायची, राग/लोभ - मैत्री/शत्रुत्व - कौतुक/मत्सर या गोष्टी जातिआधारित असण्याची गरज आहे का? स्वत:ला पुरोगामी म्हणवणारी माणसे ही असे का वागतात)

    ReplyDelete
  3. संजय सोनवणी सर,

    धनगर या जातीची निर्मिती कशी झाली, हे सांगा.कारण धनगर ही जगातील सर्वांत महत्त्वाची जात आहे.

    भगवान श्रीकृष्ण, प्रभू येशू ख्रिस्त, चंद्रगुप्त मौर्य असे अनेक महापुरुष धनगर होते, हे आपण यापूर्वीच सिद्ध केलेले आहे. आता ही जात नेमकी कशी जन्माला आली, हे सांगून टाका.

    ReplyDelete
    Replies
    1. धनगर ही जात नसून "जमात" आहे...एक आद्य व्यवसाय आहे.

      Delete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...