Monday, December 31, 2012

मी नववर्षाच्या शुभेच्छा देत नाही.....

आपल्या लक्षात आले असेलच
कि मी कोणालाही नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत...
असे नाही कि मी हिंदुत्ववादी आहे आणि म्हणून
पाडव्यालाच शुभेच्छा देईल...
तेही नसेल तर
पटेतीच्या देईल किंवा हिजरी सनाच्या देईल...
नव्हे...मी कोणत्याही
नववर्षाच्या शुभेच्छा
तेंव्हाही आणि आताही
मलाही आणि कोणालाही
मुळात देणारच नाहीहे!

कोणी बनवली ही वर्षे आणि ही कालगणना?
कोण म्हणाले २०१२ गेले आणि २०१३ आले?
काळ तर नाही म्हणाला...
कोण म्हणाला शके अमूक झाले आणि कलियुग तमूक झाले?
काळ त्याहीपुर्वी होता आणि याहीनंतर राहणार आहे
जर काळालाच आपले
मोजमाप करण्याची नाही गरज
तर मी तरी का करू?
मी नववर्षाच्या शुभेच्छा तरी का देवू?

कालपुरुष याक्षणी माझ्यासोबत आपल्या
चिरकालच्या खंतेत
उदास होऊन बसलाय
म्हणतोय तो आपल्या
भग्न स्वरात...
"मी वाहतोय विश्व घेवून...
एका क्षणाच्याच परिघात
माणसं मात्र अजुनही मागेच...
लागले मला मोजायला
रहात पार त्या दि:कालाच्या सीमेपलीकडे
तसेच जसे होते ते आदिम युगात
पण खरे सांगू तुला...
माणसाला काळ मोजायला यायला लागला
असे माणसाला वाटले
आणि
तेथेच माणसाचा काळ संपला...

"खरे सांगतो तुला
क्षणांत महिन्यांत वर्षांत आणि युगांत
मोजता येईल असा मी नव्हे
मी मागुन पुढे जात नाही कि पुढुन मागे येत नाही
मी असतो तेथेच
जेथे चीरकाळापासुन होतो
आपल्याच चीरवेदनांत
आणि माणुसही आणि ही अवघी जीवसृष्टीही
असते तेथेच
जेथे तिची सुरुवात झाली
बाकी सारे भ्रम

आणि मलाही या भ्रमांसोबत वहायचा पुरता कंटाळा आलाय!"

आता मलाही
मला उमजून चुकलेय
हे वर्ष-बिर्ष काही नसतं
आठवडा नसतो कि दिवस नसतो
एकच सनातन क्षण असतो
ओंजळीत ओठंगलेला
तो थांबलेला
आणि वाहताही
मागुन पुढे कि पुढुन मागे
काय फरक पडतो?

पण असतो खरा एकच एक क्षण
त्याला आपण काळ म्हणतो
आपण काळासोबत पुढे चालल्याच्या भ्रमात असतो
पण
असतो तेथेच
त्या ओठंगलेल्या ओंजळीतील क्षणात
ना मागे
ना पुढे
असतो तेथेच
साकळलेलो
आपल्याच सनातन
थांबलेपणात!

आपण पुढे जात नसतो
म्हणुन आपण बदललो समजत असुनही
बदललेलो नसतो
असतात फक्त बदलल्याचे
भ्रम-विभ्रम...
सुखावणारे
त्रस्त करणारे
त्या ओठंगलेल्या क्षणात...

तो एक क्षणच महांकाळ आहे...
तो पुढे जात नाही कि
पुढुन मागे येत नाही
खरे तर तो नाहीच...
एका क्षणाचा स्वामी
पण अनंत विभ्रमांत प्रकटणारा
कालपुरुष
सांगतोय
मी ऐकतोय
आणि तरीही
नुमजून ठार बहिरा
आणि घोर आंधळा
गारठून बसलेलो त्या एका क्षणात!

मी नववर्षाच्या शुभेच्छा देत नाही.
देणार नाही
नवीन वर्ष नाही
कि नवीन क्षण नाही
एकच चिरंतन क्षण
ज्यात आपण सारेच
गोठून बसलेलो
ना पुढुन मागे जात
ना मागून पुढे जात...

होतो तेथेच!

No comments:

Post a Comment

पांडुरंग बलकवडॆ एवढ्या खालच्या थराला गेले कसे?

  पांडुरंग बलकवडॆ एवढ्या खालच्या थराला गेले कसे? Sanjay Sonawani    ·  Pune    ·  Shared with Public 10 janewari 2013 पांडुरंग बलकवडे यांच्य...