Sunday, December 2, 2012

जाती नष्ट का होत नाहीत?


जातिसंस्थेचा उगम कसा झाला? (८) 

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून ते आजतागायतपर्यंत आर्य वंशवाद फोफावत गेल्याने जातिसंस्थेची मांडणीही कशी चुकत गेली हे आपण मागील लेखात थोडक्यात पाहिले. खरे तर डा. बाबासाहेब आंबेडकरांनी आर्यवंशवाद सर्वात आधी धुडकावून लावला होता. "पुरातन काळी जो काही संघर्ष होता तो धार्मिक स्वरुपाचा होता, वांशिक स्वरुपाचा नव्हता." असे त्यांनी स्पष्ट करुनही वंशवादाची पाळेमुळे नव्याने जागृत व्हायला लागलेल्या समाजघटकांत घट्ट रोवली जावू लागली. मूलनिवासीवादाच्या आधारावर अनेक सामाजिक संघटना वाढु लागल्या व तळागालात आपापला प्रचार-प्रसार करु लागल्या. आजही अशा अनेक संघटना आहेत व त्यांचे मोठ्या प्रमाणावर अनुयायी आहेत. वंशभावना ही जातभावनेपेक्षा विखारी असते याचा जगाने अनुभव घेतलेला आहे. आपण तो वेगळ्या परिप्रेक्षात घेवू लागलो आहोत. प्रत्यक्षात भारतातील एकही जातीघटक शुद्ध रक्ताचा, अगदी शुद्ध भारतीय रक्ताचा आहे असे म्हणता येत नाही असेही डा. बाबासाहेब आंबेडकरांनी लाहोर येथील जातपात तोडक मंडळाच्या अधिवेशनाच्या (त्यांनी न दिलेल्या) अध्यक्षीय भाषणाच्या मसुद्यात स्पष्ट केले होते, परंतु त्यांच्याच अनुयायांनी पुढे त्यांच्या मतांवर हरताळ फासल्याचे चित्रही आपल्याला दिसून येते.

आधुनिक काळात शिक्षण हे एक जातीसंस्थेचा उच्छेद करण्याचे मोठे साधन ठरेल अशी एक आशा विचारवंतांना होती. आधुनिक शिक्षणामुळे जगाकडे पाहण्याचही दृष्टी बदलण्याची सर्वाधिक संभावना असल्याने व त्यातुनच जातींची आजच्या वर्तमानातील निरर्थकता लक्षात येत जातीभेद व नंतर जाती नष्ट होतील अशी आशा बाळगणे चुकीचे नव्हते. परंतु प्रत्यक्षातील चित्र हे अत्यंत वेगळे असल्याचे आपण पहात असतो. शहरांत केवळ नाईलाजाने बाह्य व्यवहारात जातीभेद अथवा अस्पृष्यता पाळली जात नसली तरी ग्रामीण भारतात मात्र जातीभेदाचे चित्र आजही भिषण आहे. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार २००१ ते २००५ या कालात दलित्यांविरुद्ध एक लाख छप्पन हजार गुन्हे घडले. त्यात ३,४०६ गुन्हे दलितांच्या खुनाचे होते तर ६,१६३ गुन्हे बलात्काराचे होते. गेल्याच महिन्यात तमिळनाडुतील धर्मपुरी जिल्ह्यातील संपुर्ण दलित वस्ती जाळुन टाकण्यात आली. असंख्य गुन्हे दाखलही होत नसतात.

हे झाले फक्त दलितांविरुद्धचे गुन्हे. मुलीने अथवा मुलाने परजातीय मुलाशी लग्न केले तर त्यांचा अमानुष छळ ते निघृण हत्याही सर्रास होत असतात. यात उच्च शिक्षितही मागे नसतात. शिक्षितांचे अगणित जातीय गुन्हे अशा प्रकारचे आहेत कि ते कायद्याच्या चौकटीत येत नसले तरी सांस्कृतीक दहशतवादाच्या सावटाखाली ते येतात. या दहशतवादात आजकाल उच्च ते निम्न जाती सामील झालेल्या आपल्याला दिसतात. स्वजातीयांचे हित विरुद्ध अन्यजातियांचे अहित यासाठी एक विलक्षण संघर्ष सुरू झाल्याचे आपण पाहतो. शिक्षणसंस्था एकार्थाने अशा जातीय संघर्षाचे अड्डे बनलेले दिसत आहेत. एस.सी/एस्टी/ओबीसींबाबत प्र्यक्टिकल्स, वायव्हात वारंवार मुद्दाम नापास करण्याचे प्रमाण चिंताजनक आहे असे शुद्धोधन आहेरांसारखे विचारवंत म्हणतात तेंव्हा याबाबत चिंता वाटणे स्वाभाविक आहे. एम्स वा आय.आय.टी सारख्या आंतरराष्टीय ख्यातिप्राप्त संस्थांत दलित-आदिवासी विद्यार्थ्यांना छळामुळे आत्महत्या कराव्या लागल्यात. दुसरीकडे जातीय दबावाच्या जोरावर, खरे म्हनजे झुंडीच्याच, आपापल्या, प्रसंगी अतार्किक, मागण्या पदरात कशा पाडता येईल याकडे वाढता कल बनू लागला आहे. विरोध-प्रतिरोधाच्या गदारोळात जातीय भावना तीव्र होत चाललेल्या असतांना व या गोष्टींचे नेतृत्व करणारे शिक्षितच असतांना आपली शिक्षणव्यवस्था मूल्यशिक्षण देण्यात पुर्णतया अपेशी ठरली आहे असेच म्हणावे लागते.

म्हणजेच शिक्षण नव पिढीचे मनोविश्व अधिक व्यापक व प्रगल्भ बनवत जात्युच्चभावनेतून बाहेर पडेल ही अपेक्षा सर्वच जातीघटकांनी बाद केली आहे हे आपल्या लक्षात येईल.

आंतरजातीय विवाहांमुळे जातिसंस्था नष्ट होईल असाही आशावाद अनेक विचारवंतांनी व्यक्त केला आहे. शासकीय ते विचारकांच्या गोटांतुन आंतरजातीय विवाहांना सक्रिय समर्थनही काही प्रमाणात मिळत असते. पण हा मार्ग यशस्वी ठरलेला नाही. आंतरजातीय विवाह झाल्याने "जात" जात नाही. फारतर दोन जातींचे दोन कुटुंबापुरते, तेही झालेच तर, ते स्नेहमिलन होते.  पण त्यामुळे विवाहित दांपत्याची वा अन्य नातेसंबंधियांची जातभावना नष्ट होते असे चित्र मात्र दिसत नाही. मुलांना बापाची जात लागण्याची प्रथा आपल्याकडे आहे. आता मुले सोयीनुसार आईचीही जात लावू शकतात असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा असल्याने जातभावनेला पायबंद कसा बसेल हा प्रश्नच आहे. ठरवून आंतरजातीय लग्ने अत्यंत क्वचित व स्वजातीय मुलगी/मुलगा मिळणे असंभाव्य असते तेंव्हाच होतात. म्यट्रिमोनी (मग त्या वेब साईट असोत कि वृत्तपत्रे) जातवार जाहीराती प्रसिद्ध करत असतात. त्यातही उच्चजातियांच्या जाहिरातींत एस.सी./एस.टी. एस्क्युजची ठळक सुचना असतेच. थोडक्यात आजही जातीअंतर्गतच विवाहाला सर्वच सर्वोच्च प्राधान्य देतात, त्यात सूट मिळाली तर आपल्याच पोटजातीला मिळते. आंतरजातीय विवाह झाले तर ते प्रेमविवाह स्वरुपाचे असतात. ते झाले तरी जात सुटत नाही. अशा स्थितीत जातिसंस्था नष्ट करण्याचे साधन म्हणुन आंतरजातीय विवाहांकडे पहाता येत नाही असे दुर्दैवाने म्हणावे लागते.

मुळात जातिसंस्थेच्या उगमाच्या महत्वाच्या कारणात स्वजातीय विवाहपद्धती एक महत्वाचे कारण आहे हे आपण आधी पाहिलेलेच आहे. खरे तर पुर्वी स्वजातीयांशे विवाहसंबंध जुळवण्यामागील कारणे सर्वस्वी व्यावहारिक होती. आज ती कारणे अपवाद वगळता उरलेली नाहीत. पारंपारिक व्यवसाय आता जवळपास नष्ट होण्याच्या बेतात आहेत. तरीही जातीअंतर्गत विवाहांना प्राद्घान्य मिळत असेल तर सर्व-सामाजिक सुरक्षिततेची भावना कोणत्याही जातिघटकात विकसीत करण्यात आपल्याला घोर अपयश आले आहे असे म्हणावे लागेल. कदाचित हे भारतीय लोकशाहीचेही अपयश असू शकेल, कारण आपल्याला लोकशाहीची मुलतत्वे स्वीकारुनही मुलभुत मानसिकतेत बदल घडवता आलेला नाही वा तसे होण्यासाठीचे व्यापक प्रावधान नाही हेही वास्तव आहे. .

धर्म बदलला तर जातिसंस्था नष्ट होईल असा प्रचार करण्याचा काही कथित विचारवंतांचा कल दिसतो आहे. जाती हे हिंदू धर्माचे अविभाज्य अंग असल्याने हा धर्मच सोडला तर जातिसंस्था व तदनुषंगिक विषमता नष्ट होईल असा यामागील तर्क आहे. हा तर्क तसा नवीन नाही. बाबासाहेबांनीही धर्मांतराची घोषणा केली व प्रत्यक्षातही आणली ती हिंदू धर्मातील अन्याय्य व अस्पृष्यता बाळगणा-या जातिव्यवस्थेवर लाथ मारण्यासाठीच. तटस्थपणे पाहिले तर या तर्कात फारसा अर्थ नाही हे आपल्याला धर्मांतरीत बांधवांकडे पाहून लक्षात येते. धर्म बदलला म्हणुन जात बदलत नाही हे वास्तव अधिक ठळक होते. भारताबाहेर मुस्लिमांत पंथ असले तरी जाती नाहीत. परंतु भारतात मध्ययुगातच जे धर्मांतरीत झाले तेही आजतागायत आपल्या मुळच्या जातीभावना जपून आहेत असे आपल्या लक्षात येईल. म्हणजे गेल्या पाच-सहाशे वर्षांतही येथील मुस्लिमांची जात नष्ट झालेली नाही. खरे तर असे होणे हेच मुळात इस्लामच्या मुलतत्वांविरोधात आहे. ख्रिस्त्यांची व बौद्ध धर्मियांचीही अवस्था वेगळी नाही. आपापल्या पोटजातींचेही निर्मुलन धर्मांतराने साध्य झालेले नाही तर मग जाती कशा नष्ट होणार? आजही असंख्य मुस्लिम/ख्रिस्ती धर्मीय ओबीसी/एस.सी/एस.टी. अंतर्गत गटांत विभागले गेलेले आहेत हे एक वास्तव आहे. मुस्लिम-ख्रिस्त्यांतील जातीव्यवस्था हिंदूएवढी अन्यायकारक नाही असा तर्क अनेकदा दिला जातो, पण ते तेवढे वास्तव नाही.दक्षीणेत दलित ख्रिश्चनांसाठी स्वतंत्र चर्चेस व दफनभुम्या असतात. उत्तरेतही वेगळी परिस्थिती नाही.शीख धर्मही अस्प्रूश्यता पाळतो. मुस्लिम धर्मात अस्पृष्यता नसली तरी जातीभेद आहेत. त्यामुळे खरा प्रश्न माझ्या मते धर्माचा नसून जाती आणि अस्पृष्यतेबद्दलच्या भारतीय उपखंडातील उत्तरकालात निर्माण झालेल्या सर्व समाजाच्या मानसिकतेत आहे. ती नेमकी कशी व कोणत्या परिस्थितीत निर्माण झाली यावर जोवर अधिकचे संशोधन होत नाही तोवर ही मानसिकता समूळ बदलता येणार नाही. कायद्याने जरी कितीही संरक्षण दिले असले, व्यवहारातून अस्पृष्यता ब-याच प्रमाणात नष्ट झाली असली तरी मानसिकतेत अद्याप विशेष फरक पडलेला दिसत नाही.

या गोंधळाच्या काळातच वैदिक धर्मीय चक्क हिंदुंचेच पुरोहित बनत गेले हे वास्तवही नजरेआड करून चालणार नाही. स्वधर्माच्याच इतिहासाचे अज्ञान अथवा त्या इतिहासाबाबतच घोर अनास्था असेल तर वेगळे काय होणार? धर्मांना शिव्या देत पुरोगामी होता येत नसते तर धर्मावरच आरुढ व्हावे लागते. धर्मविहिन जग हे मोहक स्वप्न असले तरी जोवर असुरक्षिततेने ग्रासलेले समाज आहेत ते धर्म सहजी त्यागणार नाहीत...मग जात त्यागणे तर दुरच. वस्तुनिष्ठ विचार केल्या खेरीज जातभावनेचे निदान होणार नाही व त्या अभावात कोणताही उपचार असंभाव्य आहे हे लक्षात घ्यावे लागेल.

जातीव्यवस्थेला अथवा अस्पृष्यतेला धर्माचे अधिष्ठान नाही, वैदिक धर्मातही धिग्वन, आयोगव, चांडाळादि जाती सोडल्या तर अस्पृष्यतेचे संकेत मिळत नाहीत. त्या जाती नष्टही झाल्या आहेत. अस्पृष्यता तरीही आहे यामागे काही ऐतिहासिक कारणे असुही शकतील, पण ही परंपरा हिंदुंनी वैदिकांकदून आयात करत राबवली एक वास्तव आहे. भारतीय समाज हा मुख्यता: चार घटकांत वाटला गेला होता. निर्माणकर्ता (Manufacturere...यात कुणब्यापासून ते लोहार, सुतार, चर्मकार आदि सर्वच निर्मिती करनारे घटक आले), सेवापुरवठादार (यात व्यापारी, नगर/ग्रामरक्षण, पोलिसी सेवा, पौरोहित्यादि धार्मिक सेवा, स्वच्छता ई.) आदिवासी व भटका विमूक्त समाज. हे ते चार घटक होत. याचा वर्णव्यवस्थेशे काहीएक संबंध नाही हे येथे लक्षात घेणे गरजेचे आहे. एकार्थाने ही भालचंद्र नेमाडे म्हनतात तशी आडवी व्यवस्था होती, उभी नव्हे. राजव्यवस्था या घटकांतील सर्वोच्च प्रतिनिधींनी मिळुन बनलेली असे. राजा कोणत्याही जातीचा असू शकत होता. वैदिक साहित्याने सरसकट त्यांच्यासाठी शूद्र शब्द वापरला आहे. शंभर टक्के प्रशासन एकाच जातीच्या हाती कधीही नसे. राज्यकर्ते तेवढे हुशार होते. परंतु एतद्देशीय सत्ता संपल्यानंतर मात्र अकराव्या-बाराच्या शतकापासुन भारतात अकल्पित सामाजिक उलथापालथ झाली आहे व त्यावर आपण मागील लेखांत चर्चा केलेलीच आहे. या सामाजिक उलथापालथीचे सामाजिक मानसशास्त्रही आपण पाहिले आहे. वर्ण आणि जाती या स्वतंत्र व्यवस्थांत भेसळ करण्याच्या नादात आडवी व्यवस्था उभी बनली हेही एक वास्तव आहे. या सर्वातून अर्थदृष्ट्या व राजकीय दृष्ट्या कंगाल झालेल्या संस्कृतीतुन भारतीय उपखंडात सर्वांतच जातीय जाणीवा तीव्र झाल्या आहेत. आज त्या अधिकच तीव्र होत आहेत.

त्यामुळे धर्म बदलला म्हणजे जाती नष्ट होतील हा एक भ्रम आहे हे आपल्या लक्षात येईल. असंख्य जातीजमाती ज्या या कथित व्यवस्थेखाली चिरडल्या गेल्या आहेत असे आपण समजतो तेही मग धर्म का बदलत नाहीत हाही प्रश्न या निमित्ताने उठतो. अन्न्याय्य व्यवस्थेला चिकटुन राहण्यामागची त्यांची मानसिकता नेमकी काय आहे? कि व्यवस्थेत अन्याय आहे हे त्यांना मान्य नाही? आणि समजा धर्म बदलला तरी जातीय भावनांचा विनाश का होत नाही?

माझ्या मते धर्मबदलास अनुकूल असलेल्या पण प्रत्यक्षात ते अयशस्वी का घडतात याचे भान नसलेल्या सुधारकी मंडळीची काहीतरी गफलत होते आहे. धर्म ही समस्या नसून आपापल्या जातीविषयकची आपली मानसिकता ही खरी समस्या आहे. ही मानसिकता पुरातन नाही. आदिम नाही. पुरातन टोळीवादाशी तर तिचा सुतराम संबंध नाही. ही मानसिकता धर्माने निर्माण केलेली नाही. बदलत्या परिस्थितींत सुरक्षिततेच्या आत्यंतिक भावनांतून एक स्वकेंद्रीत व स्व-समाजकेंद्रीत मानसिकता बळ धरु लागते. एकाच समाजाची स्वतंत्र बेटे बनू लागतात. अशी स्वतंत्र राष्ट्रे एकमेकांवर कुरघोडी करायला सिद्ध होत जातात. येथे धर्माची भुमिका निव्वळ बघ्याची ठरते. किंबहुना प्रत्येक बेटाचा धर्म आपसूक स्वतंत्र बनत जातो. परस्परहीनभावनेत वृद्धी होत जाते. हिंदू धर्म म्हणजे असंख्य जातीनिष्ठ धर्मांचे कडबोळे आहे असे बाबासाहेब म्हणतात ते खरे वाटावे अशी स्थिती आहे. अशा परिस्थितीचाही फायदा घ्यायला पुरोहित वर्ग अर्थातच सज्ज असतो. म्हणजे एक जात म्हणुन स्वतंत्र भावबंध व संस्कृती असलेले राष्ट्र बनलेले व ते आणि आपण अशी सरळ सामाजिक विभाजनी करुन बसलेले आपली पाळेमुळे नीट समजावून न घेताच व्यवस्था अन्यायकारक आहे असे म्हणत धर्म जरी बदलून बसले तरी त्यातून जातिसंस्था संपण्याची सुतराम शक्यता नाही हे येथे लक्षात घेणे आवश्यक आहे.

शिक्षण, विवाह, धर्मबदलादि साधनांनी जात संपवली नाही हे आपल्या लक्षात आले असेलच. किंबहुना जातिभावना वाढवायला "आरक्षण" हा एक कळीचा मुद्दा पुढे आलेला आहे. जातनिहाय आरक्षणामुळे एक उलटेच सामाजिक अभिसरण घडते आहे व सामाजिक जातीय तेढ कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. आजवर आपण उच्चवर्णीय आहोत अथवा त्यांच्याशी आपले काही पुरातन नाते आहे असे दाखवण्याची जी गतशतकापर्यंत अहमअहिका होती ती आता समुळ उलटी होवू लागली आहे. म्हणजे "आम्ही उच्चजातीय नसून निम्नजातीय आहोत" असे सांगत आरक्षणात भागीदार होण्याची व भागीदारी मागण्याची एक प्रक्रिया सुरु झाली आहे. आरक्षित जातीघटकांमद्ध्ये आधीच अंतर्गत संघर्ष आहे. उदा. मातंग समाज नवबौद्ध समाजच आरक्षणाचा अधिक लाभार्थी आहे म्हणुन आम्हाला स्वतंत्र आरक्षण द्यायला हवे अशी मागणी करत आहे तर धनगर समाज आम्ही भटके-विमुक्त नसल्याने आम्हाला अनुसुचित जमातींत आरक्षण द्यायला हवे अशी मागणी करत आहेत. तत्वत: त्यांच्या मागण्या चुकीच्या असतीलच असेही नाही. पण अंतर्गत संघर्ष आहे हे एक वास्तव आहे. पण आजकाल अनारक्षित घटकही आरक्षितांच्या छावनीत ख-या-खोट्या मार्गाने डेरेदाखल होण्याचा प्रयत्न करत असल्याने जातीयतेची परिमाणे ही अधिकच युद्धायमान झाल्याचेही चित्र आपण आज पहात आहोत. भविष्यात याची लवकर उकल होण्याची शक्यता नाही. आरक्षनामुळे दुर्बल जाति-घटक आर्थिक/शैक्षणिक उत्थान करत पुरेसे राजकीय प्रतिनिधित्व मिळवतील व समाज एकजिनसी होईल अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षातील आकडेवा-या सांगतात कि आरक्षणामुळे जेवढे सामाजिक हित अभिप्रेत होते तेवढे अद्याप साधले गेलेले नाही. याचाच अर्थ असा कि आरक्षण पुढेही चालुच राहील. आरक्षण पुढेही चालु राहण्याचा पुढचा अर्थ असा कि जातीव्यवस्थेचा समूळ अंत होणे नजिकच्या भविष्यात शक्य नाही. आरक्षण नसले तर वंचित घटकांचा विकास नुसता ठप्प नव्हे तर तो उलट्या दिशेने धावू लागेल. त्याच वेळीस आरक्षण तर ठेवा पण जाती नष्ट करा असे विधानही अज्ञानमुलक होवून जाईल. त्यामुळे जातविरहित आरक्षनाचे नवे मोडेल विकसीत करत त्यची अंमलबजावणी शक्य आहे काय याचाही विचार आपल्या विचारवंतांना  व समाजशास्त्रज्ञांना करावा लागणार आहे. जाती नष्ट करणे कोनत्याही कारणाने अशक्य असेल तर जातींतर्गतची नवी व्यवस्था निर्माण करत परस्परविद्वेष हा परस्परसहकार्यात बदलवता येईल काय हेही पाहिले पाहिजे...ते पुढील लेखात.

(क्रमश:)

-संजय सोनवणी
९८६०९९१२०५

7 comments:

 1. संजय ,
  शतशः धन्यवाद ,
  या लेखाबद्दल आपले कौतुक करावे तितके थोडेच !
  आपण अत्यंत विस्तृतपणे आणि समर्थपणे जात,धर्म आणि आरक्षण असे समग्र विवेचन केले आहे.
  ते अत्यंत बोधप्रद आणि अर्थपूर्ण झाले आहे यात यःकिंचित वाद नाही..
  दुसरी आनंदाची गोष्ट -
  विवेचनात सर्वत्र ब्राह्मण हा शब्द आपण कटाक्षाने टाळला आहे-पुरोहित असा यथार्थ शब्द निवडला आहे.-त्याबद्दल आपले अभिनंदन !
  कारण आधीच ब्राह्मण वादामुळे या शब्दाचा नको तितका वापर झाल्याने विषयातला नेमकेपणा अधोरेखीत होत नसे तो या लेखात स्पष्ट दिसतो.

  जाती नष्ट का होत नाहीत ? असा आपण विषय घेतला आहे.
  जोपर्यंत जातीशी आरक्षणाने समाजाचे थेट आर्थिक नाते जोडले गेले आहे तोपर्यंत जात सहजासहजी नष्ट होणार नाही. पूर्वी आरक्षण नव्हते त्या वेळेस पण
  सबळ जातीव्यवस्था होतीच.म्हणजे आरक्षणाने आर्थिक वर्गीकरणाने जातीचा भेदाभेद घट्ट झाला असे म्हणूया फारतर !
  एखाद्या तथाकथित दुर्लक्षित ,वंचित समाज घटकाचे जर आरक्षणाने सबलीकरण होत असेल , आर्थिक प्रगती होत असेल तर चांगलेच आहे ना !
  मी तरी एक हिंदू म्हणून नेहमी आग्रह करत असतो की ज्याची जातीभेदाबद्दल तक्रार आहे त्याने सुटका करून घेण्यासाठी धर्मच बदलावा !
  (बाबा रे - नाही न तुला हे पसंत -जा -जिथे मन शांत होईल अशा धर्मात जा )-असे ते थोडक्यात माझे मत. कारण आत्ताची परिस्थिती बघता खरच असे म्हणावेसे वाटते की
  आपल्या लोकांची मानसिकता समजणे फार फार अवघड आहे - आपण भारतीय हे समजायला एकतर फार सोपे आणि त्याच वेळेस अशक्य कोटीतले अवघड आहोत.
  डॉ.बाबासाहेबांचा सुद्धा एक प्रकारे पराभवच झाला नाही का ?.त्यांचे एक मत मात्र पटत नाही - पुरातन काळी झगडा धार्मिक होता - वांशिक नव्हता - हे पटत नाही
  . पुरातन म्हणजे नेमका कोणता काळ.त्याकाळी फक्त वंशच होते ,धर्म -आज कालच्या कल्पनेतला नव्हताच !असलाच तर श्रीकृष्णाने सांगितलेला -श्रीरामाने सांगितलेला - म्हणजे कोणता ?
  त्याला कोणते नाव ? हिंदू तर निश्चित नाही - नाही का ? असो ! माझ्या मते त्या परंपरा होत्या - चालीरीती होत्या - आर्य परंपरा , द्रविड परंपरा-नंतरच्या शैव-वैष्णव आणि शाकत - गाणपत्य परंपरा -
  अशा परंपरा हा त्या काळाचा महिमा आहे.त्या परंपरा नृत्य-नाट्य -लेखन-संगीत- तत्वज्ञान - नीतीमत्ता अशा सगळ्यात दिसतात.

  आरक्षण नव्हते तेंव्हा काय होते ?

  ReplyDelete
 2. आरक्षण नव्हते तेंव्हा काय होते ?

  अगदी पूर्वीपासून आत्ता पर्यंत एकत्र विचार केला तर आपली खेडी ही एकामागोमाग एक अशा व्यवस्थांचा - गरजांचा - परिपाक आहेत .ग्राम्र राज्ये ते साम्राज्ये -नंतर वतनदार-
  अनेक अधिकारी-पाटील -देशमुख-कुलकर्णी--अशी रहाटी -हे झाले प्रशासकीय व्यवस्थापनाचे -धार्मिक सामाजिक स्तरावर काही वेळा व्यवसायाने वर्ण तयार झाले - काहीवेळा वर्ण बदल लादला गेला.

  आपण म्हणता त्याप्रमाणे सगळा बिघाड इ.स.१००० च्या आसपास झाला असे दिसते.
  माझ्या मते ,आपल्या धर्म आणि कर्म व्यवस्थेला पहिला मुसलमानी दणका याच काळात बसला.
  इथे संपूर्ण नवीन संस्कृतीचे आक्रमण होत होते.त्यांचे क्रौर्य आपल्या सुरक्षित सुरचित वैचारिक धार्मिक मांडणीला उधळून लावत होते.
  सर्व वर्ण व्यवस्था आणि त्याच्या ईश्वरी (?) मांडणीला सुरुंग लावला जात होता.
  पुरोहित वर्गाला स्पष्ट दिसत होते कि हे नवे आक्रमण आणि नवी सत्ता यात आपल्याला शून्य स्थान आहे .
  मग आपली पकड असलेली प्रजा बाटवली जात आहे -आपली पकड ढिली होत आहे.आपल्या रचलेल्या आराखड्यावर आलेले संकट अंशतः निस्तरण्यासाठी काय करावे -
  तर हे जातीचे खूळ उचलून धरावे ! पुरोहित वर्गात हे धार्मिक आक्रमण रोखण्याची हुशारी नाही आणि हिंदू राज्यकर्त्यांच्या तलवारीत ती ताकद नाही .
  मग या सर्व प्रजाजनांची समजूत कशी काढायची ?
  तर जात हे अंतिम आधाराचे शस्त्र ! -धर्म बुडाला तरी जात या भव सागरात तारून नेते इतकी ती महत्वाची !जातीचा अभिमान हा असा तयार झाला असेल का ?
  पराभूत शासकानी पण या कल्पनेला उचलून धरत ही पद्धत अवलंबिली असावी.शेवटी विजय आपलाच हे प्रजेला सांगत आपले समाजातले स्थान
  अढळ राखणे त्यामुळे उच्च् वर्गीयांना सहज शक्य झाले.नाहीतर पराभूत पुरोहित वर्ग जेत्यांचा गुलाम झाला असता.जेत्यांनी आणि जीतानी केलेला हा करार होता राज्य आमचे आणि तुमच्या धार्मिक राज्याचे तुम्ही स्वामी असा हा खेळ चालू झाला .तो आज पर्यंत चालूच आहे.

  आपण एक समजून घेतले पाहिजे की शिक्षणात शिक्षक म्हणून ब्राह्मण लोकांची जागा अस्पृश्यांनी घेतली आहे.आरक्षणामुळे विद्यार्थी पण बी सी -ओ बी सी जास्त.
  त्यांची प्रगती त्यांना कठीण वाटू लागली कि ते ओरडा सुरु करतात !अन्याय झाला अशी !उच्च वर्णीय प्रजेत ब्राह्मण आणि मराठा दोन्ही येतात.महाराष्ट्रात लोक संख्येत ब्राह्मणांची टक्केवारी नगण्य आहे.मग दलितांवर अन्याय कोण करते ?
  शेतीतून पण ब्राह्मण कधीच कूळ-कायद्या पासून हद्दपार झालाय ! असो.
  आरक्षणाने जेव्हढे सामाजिक हीत अपेक्षित होते तेव्हढे साधले गेलेले नाही हे विधान एकदम पटते .

  माझ्यामते बारकाईने पाहिल्यास जातपात स्वयंपाक घरातून सुरु होते.आपल्याकडे स्त्रीच्या हातात धार्मिक परंपरा जपण्याची जबाबदारी असते.
  सर्व धार्मिक विधी - सोवळे ओवळे -पवित्रता-विटाळ ,शकून , अपशकून , तिथून चालू होते.सर्व सण - घराण्याचे रीतीरिवाज - यावर तिचे मत सर्व श्रेष्ठ असते.
  कोणता विधी कधी आणि कशा प्रकारे केला तर तो रीतसर होईल याचे एक तंत्र असते.त्यात इतर जातीचा प्रवेश निषिद्ध !

  आणि तिथेच जातीचा प्रश्न येतो .आज काल शेवटी सारांशाने विचार केला तर जात याचा अर्थ काय ?
  रात्रीच्या प्रवासात स्त्री एकटी प्रवास करत असेल तर स्त्री पुरुष भेद म्हणजेच स्त्रीजात आणि पुरुषजात - दोन स्त्रिया एकमेकांना सांभाळतच प्रवास करतील.त्यांची जात काहीही असो.जात या कक्षेत सुरक्षितता हा पण एक मुख्य हेतू असतो.गृहीतच असतो तो !.
  अंतर प्रांतीय प्रवास असेल - पुणे -अहमदाबाद -तर गुजराथी - मराठी भाषिकांना आपापली भाषा बोलणारे जवळचे वाटतात-
  मग तो बोहरी असो वा खोजा -तो गुजराथी बोलतो म्हणजे जवळचा .असे बरेच वेळा दिसते !मराठी मग तो लेवा पाटील असो,ब्राह्मण असो किंवा मराठा असो-ते काही वेळाने आपण सारे बंधू बंधू असे वागतात.नंतर "आमच्यात असे चालते -असे चालत नाही "अशा निर्मळ गप्पा मारतात-जातपात मान्य करत आपापल्या भूमिका मांडतात.विचारांची देवाण घेवाण करत प्रवास चालू असतो.
  हॉटेल,बस ,रेशन दुकान ,ग्यासचे वितरण , हॉस्पिटल प्रसुतीग्रह अशा जागी अजूनतरी भेदाभेद नाही हे विशेष.
  उद्या समजा तिथेपण आरक्षण आले तर ?
  जन्माला येताना बी सी .ओ.बी.सी.यांना प्राधान्य आणि आरक्षण - तर काय ?
  कुत्रा चावलाय - दोघांना - एक ब्राह्मण आणि एक बी.सी.तर ५२ टक्के भरणा होई पर्यंत ब्राह्मण तडफडत ठेवणार का ?
  असे अनेक प्रश्न निर्माण होतील.
  मूळ हेतू जर समजला नाही तर विचारांचा पराभव अटळ असतो.
  विचार शुद्ध असून उपयोग नाही.त्याची अंमलबजावणी सुद्धा प्रामाणिकपणे झाली पाहिजे.तरच जातपात टिकवूनही माणुसकी जिवंत राहील !

  ReplyDelete
  Replies
  1. Dear Dattatrayji, please for god sake do not dilute a very important subject on name of reservation. Caste system and untouchability is fact and inhuman practice in India. We have been practicing several hundreds of years in India. Reservation has started in last 50 to 60 years. Why reservation is there? Because of our inhuman practice. This is basis of reservation. May be because of reservation they get education or job. We will have to provide them equality in social, education, political and economic. If you fill these disparity. Then who needs reservation? Today we prove our merit among the socially disadvantaged people. But then we are asking them to prove yourself from general category people. This is unfair with them. We have been taking education last thousands of years till we are not perfect. How do we expect from them compete with general category within few years?
   Do not mix reservation and merit together. It is opportunity for them to come main stream of India. It is better not talk about our merit. We have been ruled by more than 250+ years by Britishers, Portuguese and Dutch and so on. Where was our merit that time?
   Please try to understand 85-90 % Indian are from category (OBC/SC/ST/NT/VJNT/ADIVASI). How can marginalize them? Ulitimately we want progress of India for whom. These are majority people of India. We have taken already taken reservation of thousands of years as Brhamin (on Top of Caste System), Kshatriya ( King's son is prince and Ultimately King) and so on.
   So please do not confuse the people of India. Lets go to the root of cause of it. Lets us Annihilate the Caste System.
   Inter caste marriages are major remedy to destroy caste system.
   Then question will not arise whom to give reservation.

   Delete
 3. प्रिय अनानिमस ,
  माझा मुद्दा जातीचा अभीमान बाळगण्याचा आहे.
  आणि तो बाळगताना त्याबद्दल लाज वाटण्याचे काहीच कारण नाही.
  मी ब्राह्मण आहे पण माझे बहुतांशी मित्र ब्राह्मणेतर आहेत हे लिहिण्यात काय चूक आहे.त्या मित्रानी तर माझे अभिनंदन केले आहे !.
  आपण बरेच जण शाळा सोडल्यावर अनेक वर्षानंतर आमची १९६५ ची एस एस सी ची अ तुकडी असे म्हणत दरवर्षी एकत्र येतो.
  गप्पा मारतो.आठवणी काढतो.तसेच थोडेसे जातीचा अभिमान बाळगणे या बाबत म्हणता येईल.
  मी माझे पूर्वज , त्यांचे गोत्र ,त्यांनी आपल्यासाठी केलेला त्याग असे ते सगळे असते साधारणपणे.
  एकत्र येणे याला चांगलेपणा कारणीभूत असतो.हलकटपणा नव्हे.

  कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ हा मुद्दाच नाहीये !.कारण ते सर्व व्यक्तीसापेक्ष असते.
  यापूर्वी याच ठिकाणी जात कधीच पूर्णार्थाने " शुद्ध " नसते यावर सफल चर्चा झालेली आहे.
  श्री.संजय सोनवणी यांनी सुंदर मांडणी करत हा मुद्दा यापूर्वीच यशस्वीपणे मांडला आहे.

  ब्राह्मणांना या शिक्षणाच्या दुकानातून डबल पैसे देऊन शिक्षण घ्यावे लागणार ! त्यांच्या साठी जातीचे आरक्षण नाही - ते यापुढे सरकारी जागा अडवणार नाहीत.
  ते अजून अजून शिकतात आणि अति उच्च पातळीवर जाऊन बसतात ! ध्रुव बाळासारखे ! ब्राह्मणांची आरक्षणाबाबत तक्रार असूच शकत नाही.
  असलीच तर ती मराठा समाजाची असेल कदाचित.

  " मी आरक्षणाबद्दल काय लिहिले आहे - तर आरक्षणाने जर एखाद्या दुर्लक्षित वंचित समाज घटकाचे आर्थिक सबलीकरण होत असेल तर चांगलेच आहे ना ! "
  परंतु ,
  घटनेने आरक्षण कायमचे दिलेले नाही इतकेच मला सांगायचे आहे.ती काही कायमची मक्तेदारी नाही.ती एक तात्पुरती व्यवस्था आहे.
  शासनातली खुर्चीची ताकद आपणास माहीतच असेल.तिथे पूर्वी ब्राह्मण बसत असतील - आज अस्पृश्य बसतात.
  दोघेही भ्रष्टाचाराचे पुजारीच ! कुणीही धुतल्या तांदुळा सारखे नाही !.

  विषय आहे शिक्षणाचा घसरता दर्जा आणि झालेले खेळ खंडोबा.

  पूर्वी राष्ट्रीय शिक्षण मिळावे म्हणून आगरकरांनी - म.फुल्यांनी स्वतःचे संसार ओवाळून टाकले.
  आज राजकीय धेंडे आणि इतर धनदांडगे यांनी शिक्षणाचा बाजार केला आहे.
  you are saying "please donot confuse people of india "
  हे जरा जास्तच होतंय नाहीका ?मी आणि भारताच्या विशाल जनतेला गोंधळात टाकू शकेन ?
  इतका काही मी ग्रेट नाहीये.तो माझा धर्म नाही आणि मला तशी शिकवण नाही - संस्कार नाही की तो माझा पेशाही नाही.

  ती काळजी नसावी.
  आज राजकारणी माणसं माणसात जातीमुळे भेद भाव निर्माण करत आहेत ,आणि
  माझे म्हणणे जातींचा सुनिश्चित अभ्यास केल्यास संपूर्ण समाजाचे भवितव्य उज्वल होईल.
  एखाद्याला टार्गेट करणे ही आजच्या राजकारणातील गरज आहे.समाजकारणातील नाही.!
  अमुक एक भडका उडाला - त्याला अमुक जबाबदार ! मग ती जात असेल - व्यक्ती असेल नाहीतर प्रवृत्ती असेल- त्याला नष्ट करा - त्याला मारा - हा संदेश हिंसाचार पसरवतो.!
  भांडारकर संस्थेच्या बाबतीत ते आपण अनुभवले आहे.नंतर वाघ्या कुत्र्याच्या बाबतीत त्या प्रवृत्ती मधला धोका जास्त ठळकपणे अधोरेखित झाला - नाही का ?.


  मूळ हेतू जर समजला नाही तर विचारांचा पराभव अटळ असतो.
  विचार शुद्ध असून उपयोग नाही.त्याची अंमलबजावणी सुद्धा प्रामाणिकपणे झाली पाहिजे.तरच जातपात टिकवूनही माणुसकी जिवंत राहील !
  असे आणि इतकेच म्हटले आहे मी .आणि त्यात गैर काय ?
  लोभ असावा .हि विनंती . लेखनसीमा.

  ReplyDelete
  Replies
  1. ' ब्राह्मणांची आरक्षणाबाबत तक्रार असूच शकत नाही.
   असलीच तर ती मराठा समाजाची असेल कदाचित'
   --हे विधान पटले नाही . तुमच्यासारख्या काही ब्राह्मणांचा विरोध नसू शकेल कदाचित (ते हि तुमच्या प्रतिक्रियेवरून वाटत नाही )
   पण ब्राह्मणांचा विरोध असूच शकत नाही हे मत धादांत खोटे आहे . अनेकांचा विरोध आहे आणि अनेकांची आरक्षणाची मागणी हि आहे

   Delete
 4. संजय सर,खरं तर जाती अंत किती जणांना हवा आहे हा एक प्रमुख मुद्दा आहे.जाती च्या आधारावर आरक्षण हे एक मुख्य कारण आहे जेणे करुन जात जात नाही.मी माझ्या कॉलेज मध्ये पहायचो कोणी मुलगा आरक्षण घेऊन आला की मुलं लगेच हा अमक्या जातीचा आहे म्हणुन ह्याला येथे जागा मिळाली असं सर्रास पणे म्हणायचे.गरीब लोकांना आरक्षण हे महत्वाचेच आहे पण ते त्यांच्या जातीच्या आधारे न्हवे तर आर्थिक स्थिती प्रमाणे असावे. ह्याचा फ़ायदा असा होईल की पुढची पीढी कोणाची जात कधिच विचारणार नाही. उलट हा मुलगा अथवा मुलगी अत्यंत कठिण परिस्तितीतुन मोठा झाला आहे असे म्हणुन त्याचा गवगवा होईल.जिथे जातीचा उल्लेखच येणार नाही तेथे ’जात’हा शब्द इतिहासजमा व्हायला वेळ नाही लागणार व सर्व जण फ़क्त भारतीय म्हणुन ओळखाल्या जातिल........

  ReplyDelete
  Replies
  1. तिढा मोठा विचित्र आहे. आर्थिक आधारावर आरक्षण दिले तर नेमके निकष ठरवणे आणि मग त्यावर आधारीत आरक्षणाचे वितरण करणे जवळपास अशक्य आहे. नादारीची सर्टिफिकेटस आजही किती सहज मिळवली जातात हे आपल्याल माहित आहेच. ख-या वंचितांना त्याचा लाभ मिळेल काय यावरही विचार करावा लागेल. आरक्षण फक्त एका पीढीपुरते मर्यादित करता येईल काय यावरही गांभिर्याने विचार करावा लागेल. पुढील लेखात मी यावर सविस्तर चर्चा करनारच आहे. तुमचे मुद्देही ग्राह्य धरत त्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न नक्की करेन. धन्यवाद.

   Delete