आपल्या गुणाधारित शिक्षणव्यवस्थेमुळे प्रत्येक विषयात उत्तीर्ण होणे अनिवार्य ठरते हे आपण पाहिले. या व्यवस्थेचा सर्वात मोठा दोष म्हणजे विद्यार्थी हा घोकंपट्टी करणारा भारवाही हमाल बनुन जातो व त्याची नैसर्गिक कौशल्ये/कल दुर्लक्षित राहतात. यातुनच नवनिर्मितीची क्षमता क्रमश: घटवली जाते. भारतियांत नवनिर्मितीची क्षमता नव्हती म्हणुन आपण ज्ञानविज्ञानात मागे पडलो ते पडलोच याबाबत आपण मागील लेखात चर्चा केली. भारतीय एकुणातीलच व्यवस्थेने नवनिर्माण क्षमतेचे मानसिक अपहरण केले होते हेही आपल्या सहज लक्षात येईल. दैववाद हे त्याचे कारण नसून प्रत्येक समाजघटकातील मुलांना आधी पोटार्थीच कसे बनवता येईल अशी शिक्षणपद्धती व मूल्यपद्धती जोपासली गेली असल्याचे आपल्या लक्षात येईल.
आपला पुरोहितवर्गही "भिक्षुक" म्हणुन अभिमानाने मिरवत असे तर इतरजण बालवयापासुनच परंपरागत धंद्यांत आंधळेपणे ढकलले जात असत. यात प्रत्येकात कोणत्या ना कोणत्या नवनिर्मितीची क्षमता असली तरी तशी संधी मिळणे अशक्यप्रायच होते! स्वतंत्र विचार करण्यासाठी अर्थव्यवस्था अनुकूल अथवा प्रतिकूल ठरू शकतात हे आपण जागतिक इतिहासात डोकावून पाहिले तरी लक्षात येईल. दहाव्या शतकानंतरची भारतीय अर्थव्यवस्था आणि तत्पुर्वीची अर्थव्यवस्था व नवनिर्मिती यात आपण तुलना केली तर हा मुद्दा सहज लक्षात येइल.
वर्तमान युगात आपल्या शिक्षणपद्धतीने खरे तर इतिहासापासून धडा घेत स्वतंत्र विचार करु शकणारी, नवनिर्मितीची प्रेरणा केंद्रीभुत ठेवत ज्ञानाधारित शिक्षणव्यवस्था अंगिकारणे आवश्यक होते. दुर्दैवाने तसे झाले नाही. उलट आपली शिक्षणव्यवस्था ही बेरोजगार निर्मितीचे मोठे कारखाने बनले. बेरोजगार शिक्षितांकडे दुसरे जगण्याचे कौशल्यच शिक्षणपद्धतीने दिले नसल्याने सुशिक्षितापेक्षा अशिक्षितांतच जगण्याची कौशल्ये अधिक आढळतात असे शिक्षणतज्ञच म्हणत असतील तर यावर गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे.
सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे गुणाधारित शिक्षणपद्धती निर्मितीक्षमतेला मारक आहे हे उघड आहे. उदा. माझा कल वा आवड इतिहासाकडे आहे व मला गणितात अथवा विज्ञानात गती नाही. अशा परिस्थितीत मी गणित अथवा विज्ञान शिकणे व त्यात पास होणे अनिवार्य असावे काय? समजा मारुन मुटकून घोकंपट्टी करत मी त्यात पास जरी झालो तरी त्याचा, मला कसलेही आकलनच झाले नसल्याने, भावी जीवनात काही उपयोग आहे काय? मला सोडा त्या आकलनरहित अवस्थेत जेही विषय पास झालो त्यांत मी त्यात अधिकची भर घालत समाजाला उपयोगी बनू शकतो काय? यात माझे जी आवड, इतिहास, त्याचे काय होईल? इतर विषयांत पास होण्याच्या दडपणाखाली मला नाईलाजाने इतिहासाकडे दुर्लक्ष करावे लागणार नाही काय? म्हणजे ज्यात मला आवड आहे त्यात मला अधिकाधिक प्राविण्य (अगदी शिक्षणपद्धतीत दिलेल्या पाठ्यक्रमाबाहेर जात) मिळविण्याची संधी मिळणार आहे काय? त्या आवडीच्या विषयावर अधिक चिंतन मनन आणि नवा दृष्टीकोन स्वतंत्रपणे जोपासण्याची मला या पद्धतीत संधी आहे काय? या पद्धतीत माझा आणि शिक्षकांचा वेळ/परिश्रम व शासन (आणि माझे पालक) खर्च करत असल्याने तो खर्च ज्यात मला रस नाही त्यावर वाया घालविण्यासारखे नाही काय?
हे इतिहासाचे उदाहरण सर्वच विषयांबद्दल लागू आहे. पाठ्यक्रमाबाहेर असलेल्या पण जगण्याची साधने असलेल्या विषयांत...म्हणजे चित्रकला, लोहारकाम, कृषिशास्त्र, सुतारकाम इ. मद्धे एखाद्याला रुची असेल वा अंगभूत कौशल्य असेल तर ते कौशल्य प्राविण्यात बदलवत विद्यार्थ्याला त्यात तज्ञ बनवण्यासाठी अनुकूल अशी आपली शिक्षणव्यवस्था आहे काय?
एक अथवा दोन आवड असलेल्या विषयांतच संधी देत, पास होण्याची त्या विषयांची मर्यादा वाढवत अन्य विषयांतील गुण कितीही कमी अथवा जास्त असले तरी विद्यार्थ्याला पुढील वर्गात पाठवले तर काय अनर्थ होणार आहे काय?
हे प्रश्न अशासाठी विचारले कि यावर गंभीरपणे चिंतन करण्याची गरज आहे. यात असा प्रतिप्रश्न उपस्थित होवू शकतो तो हा कि विद्यार्थ्याचा नेमका कल कसा ठरवायचा? आज ज्या विषयाची आवड वाटते त्याची आवड पुढेही राहिलच हे कशावरुन?
तसेही आता सातवीपर्यंत विद्यार्थी पास होण्याचा तणाव नसल्याने निर्धास्त असतात. या सात वर्षांच्या कालावधीत विद्यार्थ्याचा कल, आवड, जिज्ञासा नेमकी कोणत्या विषयात आहे हे शिक्षकांना (व पालकांनाही) समजणे अशक्य नाही. त्याला मानसशास्त्रीय चाचण्यांचीही जोड देता येवू शकते. याच काळात ज्यात कल वाटतो त्या विषयांत अधिकचे (अभ्यासक्रमाबाहेर जात) स्वातंत्र्यही देता येवू शकते. शेवटच्या परिक्षेत कल असलेल्या विषयांतील मार्कच गृहित धरुन त्याला त्याच विषयात (अथवा एकापेक्षा अधिक विषय असतील तर निवदसंधी देत) माध्यमिक, उच्चमाध्यमिक व पदवी शिक्षण दिले तर काय होइल?
याचा सर्वात मोठा फायदा हा होईल कि विद्यार्थी आपल्या आवडीच्या क्षेत्रात पदवी वयातच एरवी आपल्या शिक्षणव्यवस्थेत अशक्य आहे असे अधिकचे प्राविण्य मिळवू शकेल. तज्ञ बनू शकेल. त्यातुनच नवनिर्मितीला वाव मिळु शकतो आणि देशात विविध विषयांतील व त्यांच्या शाखा-उपशाखांतील पारंगत अशा तज्ञांच्या फौजा उभ्या राहू शकतात हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
या पद्धतीचा होणारा संभाव्य पण सर्वात महत्वाचा फायदा असा कि विद्यार्थ्याला एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणुन आपली बांधणी करता येणे सहज शक्य आहे. प्रचलित शिक्षणपद्धतीत प्रत्येक विद्यार्थी हा मानसिक कुंठेतून अपरिहार्यपणे जात असतो. केवळ गरजेपोटी जेंव्हा नको ते विषयही अभ्यासावेच लागतात, अधिकाधिक गुण मिळवत इतरांशीच्या स्पर्धेत अविरत संघर्षायमान रहावे लागते तेंव्हा मानवी व्यक्तिमत्वाचे आकुंचन होत विकासशील नव्हे तर स्पर्धाधारित नागरिक निर्माण होणे अपरिहार्य आहे. यातुन जी समाजव्यवस्था (राजकीय/आर्थिक/बौद्धिक) आकाराला येते ती तशीच संकुचित व परस्परांकडे स्पर्धेच्या भावनेने पिडीत झाल्याने नकारात्मक असते. आणि नकारात्मक मनोवृत्तीच्या समाजात नवनिर्मिती कशी होणार? विद्यार्थीदशेतच काय शिकायचे आहे याचे विद्यार्थ्याचे स्वातंत्र्य नाकारले जात असेल तर कोणत्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाचे नागरिक आम्ही घडवणार आहोत?
आज शिक्षण पुर्ण होऊनही विद्यार्थ्यांना नोक-यांसाठी स्पर्धा परिक्षा का द्याव्या लागतात? याचाच अर्थ आधी जे काही शिकले, मेरिटचे गुण मिळवले ते निरर्थक होते असे आम्हीच मान्य करतो असे नव्हे काय? दोनशे जागांसाठी दोन लाख अर्ज हा सध्याचा सरासरी नोकरी मागणारे आणि उपलब्ध नोक-या यांतील अवाढव्य तफावत दर्शवत नाही काय? या परिक्षा, त्यांतील नेहमीचे गोंधळ व जीवघेणी स्पर्धा यातून आपण निकोप समाज घडवत नसून हिंस्त्र आणि स्वार्थप्रणित नागरिक घडवत असतो असे नव्हे काय? जीवनाची श्रेष्ठ मुल्ये या निरर्थक स्पर्धात्मकतेमुळे हरपतात व आज आपली जी भ्रष्ट व्यवस्था उभी राहिलेली आहे तिला आपली शिक्षणव्यवस्थाच कारणीभूत नव्हे काय?
या जगात स्कोप नाही असा विषय नाही. एखाद्या क्षेत्रात संध्यांची निर्माण होणारी लाट ही चिरकालिक नसून तात्पुरती असते. त्यामुळे जे अशा लाटांवर स्वार आधी होतात ते फायद्यात जात असले तरी नंतरच्या झुंडी मात्र क्रमश: कशा तोट्यात जावू लागतात हे आपण आय.टी. क्षेत्राबाबतही पाहू शकतो. बरे या झुंडी स्वत:चे असे काही नवयोगदान देण्याच्या स्थितीत असतात काय? याचे उत्तर जवळपास नाही असेच असते...कारण तसे प्राविण्य त्याच्याकडे नसतेच.अशा शिक्षनपद्धतीत फक्त नोक-या मागणारे अधिक असतात तर नोक-या निर्माण करु शकणारे अत्यल्प. या परिस्थितीत राष्ट्राचा अर्थविकास होणे कसे शक्य आहे? ज्ञानविकासाची मग बातच नको!
त्यामुळे आपल्याला आपल्या शिक्षणपद्धतीचा फेरविचार करणे अनिवार्य असे बनले आहे. प्रत्येक मूल हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे व त्याचे स्वत:चे असे विकसित होवू शकणारे स्वतंत्र ज्ञानविषय आहेत हे मानसशास्त्रीय भान आपल्याला येणे अत्यावश्यक आहे. त्याचे भान ठेवतच तशी शिक्षणपद्धती बनवली गेली पाहिजे. राबवली गेली पाहिजे!
अन्यथा भारत ज्ञानकारणापासून ते अर्थकारणापर्यंत आजवर ज्या भिक्षुकी अवस्थेत आहे त्यात पुढेही विषेष फरक पडणार नाही. जाग येईल तोवर आपली साधनसंपत्ती जवळपास नष्ट झाली असेल व आर्थिक दृष्ट्या आपण पुन्हा अराजकाने हिंस्त्र बनलेल्या मध्ययुगात फेकले गेलेलो असू याचे भान आपल्याला वेळीच आले पाहिजे.
-संजय सोनवणी
९८६०९९१२०५
Read This also...
And this also!