Monday, May 13, 2013

महासत्ता बनायचे तर ज्ञानसत्ता हवीच!

शाळा-कोलेजांत दिले जाणारे शिक्षण हे शिक्षण नसून काय शिकावे याचे विद्यार्थ्याला दिशादिग्दर्शन करणारे असावे असे इमर्सन या शिक्षणतज्ञाने अठराव्या शतकात म्हटले होते.  मला वाटते हा मुलभूत पाया आपल्या शिक्षणव्यवस्थेतून पुरता दुर्लक्षिला गेलेला आहे. लिहा-वाचायला शिकणे ही शिक्षणाची पहिली पायरी असली तरी विद्यार्थ्याचा एकुण कल लक्षात न घेता पहिली ते दहावी अभासक्रमातील सारेच विषय सर्वच विद्यार्थ्यांवर सरसकट थोपलेले असतात. प्रत्येक विषयात विद्यार्थ्याने अधिकाधिक गूण मिळवावेत एवढीच माफक अपेक्षा आपली शिक्षणव्यवस्था ठेवून असते. सर्वच विषयांत प्रत्येक विद्यार्थ्याला सारखाच रस असणे शक्य नसते. ज्यात रस आहे त्यात अभ्यासक्रमाबाहेर जात कुतुहल दाखवणे विद्यार्थ्याला शक्य असले तरी आपली शिक्षणपद्धती तसे करू देत नाही. किंबहूना कुतुहल वाढवणे हाच अभ्यासक्रमाचा हेतू असतो हेच लक्षात घेतले जात नाही.

त्यामुळे रस नाही असे विषय विद्यार्थी सोप्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करतात व तो म्हणजे पाठांतर...! ज्यांची स्मरनशक्ती चांगली आहे असे विद्यार्थी चमकतात तर उर्वरीत घोकंपट्टीच्या आधारावर सुटका करुन घेण्याचा प्रयत्न करतात. यात बव्हंशी विद्यार्थी शिक्षणातील रस गमावून बसतात व उरते एक औपचारिक, शिक्षण नव्हे तर शिक्षा वाटणारी शिक्षणप्रक्रिया. जे शिकावे वाटते, ज्यात अधिक प्राविण्य मिळवावे वाटते ते विषय बालवयातच मागे पडतात व विद्यार्थी हा शिक्षणाला कंटाळलेला पण नाईलाज म्हणुन शिकणारा असा घटक बनत जातो. या प्रक्रियेत पदवीपर्यंत पोहोचेपर्यंत अगणित विद्यार्थी शेवटी गळुन पडतात. तोवर शिक्षणाबद्दलचे विद्यार्थ्याचे मत हे "रोजगारार्थ शिक्षण" असेच बनून गेले असल्याने सहविद्यार्थीही त्याचे रोजगाराच्या जीवघेण्या शर्यतीतील महत्वाचे स्पर्धक बनलेले असतात. यातून जी असामाजिक मानसिकता बनते त्यावर आपल्याला गंभीरपणे विचार करावा असे वाटत नाही.

पास होणे व पुढे जाणे या प्रक्रियेत पास होण्याला अनन्यसाधारण महत्व दिले जाते ते शिक्षक, पालक ते समाजाकडून. नापास होणारा विद्यार्थी हा कुचकामी असतो, बुद्धीहीन असतो असा समज आपण करुन घेत असतो तेंव्हा "बुद्धी"च्या व्याख्येबद्दल आपला सनातन गैरसमज असतो. दरवर्षी दहावी-बारावीनंतर नापास झालेल्या अनेक विद्यार्थ्यांच्या आत्महत्या या आपल्या समाजमानसाच्या मानसिक असंतुलनाचा अपरिहार्य भाग आहे.

बरे, हे शिकलेले, पदवीधर, ज्या शाखांमद्धे शिकतात त्यात किती प्राविण्य मिळवलेले असतात? जगण्यासाठीचे असे कोणते कौशल्य त्यांनी शिक्षनपद्धतीमुळे आत्मसात केलेले असते? तज्ञांच्या मते अशिशिक्षित व्यक्ती या उलट सुशिक्षितांपेक्षा जगण्याची साधने प्राप्त करण्यात अधिक कुशल असतात. सुशिक्षित बेरोजगार अशी जशी एक व्यापक अवस्था आहे तशी अशिक्षित बेरोजगार मिळणे अवघड आहे कारण किमान अशिक्षिताला जगण्याची साधने मिळवण्यासाठी सामाजिक लाज वाटत नाही. आज कोट्यावधी शिक्षीत बेरोजगार आपल्या पारंपारिक व्यवसायात पडु इच्छित नाहीत. शेतक-यांची मुले शेतीवर राबण्यात, आहे त्या शेतीकामाला विकसीत करण्यात कमीपणा मानतात. हीच बाब अन्य पारंपारिक व्यवसायांची. मग नवीन संध्या शोधणे, विकसीत करणे ही तर खुपच दुरची बाब झाली. याचे महत्वाचे कारण म्हणजे सफेदपोश नोक-यांचे आपल्या समाज व शिक्षणसंस्थांनी वाढवलेले अनिवार आकर्षण.

आणि यामुळेच आपली शिक्षणपद्धती ही निष्क्रीय, अनुत्पादक बेरोजगार निर्माण करणारी संस्था बनली आहे. कोणतीही व्यवस्था समस्त शिक्षीत समाजाला रोजगार देवू शकत नाही. रोजगार निर्माण करणारेही तेवढ्याच प्रमाणात (मग तो स्वयंरोजगार का असेना) कसे निर्माण होतील अशी शैक्षणिक रचना करावी लागते. श्रमप्रतिष्ठा व ज्ञानप्रतिष्ठा यांच्यात संतुलन साधावे लागते. पण गाढवही गेले आणि ब्रह्मचर्यही गेले अशा पद्धतीने ज्ञान तर नाहीच नाही आणि श्रमप्रतिष्ठाही नाही अशा विचित्र परिस्थितीत आपली शिक्षणव्यवस्था अडकलेली आहे.

याची परिणती पहायला हवी. केंद्रीय श्रममंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतीय एकुण रोजागार क्षेत्रात फक्त ७% रोजगार संघटित क्षेत्र देते तर ५% असंघटित क्षेत्र देते. उर्वरीत रोजगार हा अजुनही स्वयंरोजगार व शेतीक्षेत्रावर अवलंबून आहे आणि हा शेतीरोजगार बव्हंशी अर्धवेळ स्वरुपाचा आहे. जरी सध्या खाजगी क्षेत्र वाढत असले तरी त्याच वेळीस शासकीय नोक-या कमी होत आहेत. एकुणात जेवढ्या प्रमाणात शिक्षितांची संख्या वाढत आहे त्याच्या व्यस्त प्रमानात रोजगाराच्या संध्या वाढत आहेत...म्हणजेच शेतीक्षेत्र हेच आजही रोजगाराचे प्रमूख माध्यम आहे. असे असतांनाही कृषी संसाधनांनाच रोजगाराच्या व्यापक व सक्षम संध्यांत परिवर्तीत करणे ही काळाची गरज असतांनाही मुळातच आपली शिक्षनपद्धती उलट्या दिशेने जात असल्याने तसे होण्याची संभावना दिसत नाही. बेरोजगारीचा हा विस्फोट ही शेवटी आपल्या शिक्षणपद्धतीची अपरिहार्य परिणती आहे.

ज्ञाननिष्ठा, तर्कनिष्ठा, कल्पनाशक्ती व निर्मितीक्षमता ही शिक्षणपद्धतीची चतु:सुत्री असायला हवी होती. आता तरी असायला हवी. पण आपले दुर्दैव हे आहे कि आपले अगदी विज्ञानाचे शिक्षण आणि धर्मशिक्षण यात फरक उरलेला नाही. धर्मशिक्षक जसे शंका व्यक्त करण्यावर बंदी घालतात तसेच आमचे विज्ञानशिक्षकही विद्यार्थ्याला शंका विचारायला बंदी घालतात. नैसर्गिक कुतुहलाची हत्या ही अशी होते. ज्ञानाची वाढ थांबते ती अशामुळे. अगदी चित्रकला शिकवनारे शिक्षकही रेखाटने व रंगभरणाच्या तांत्रीक बाजुंनाच महत्व देतात, सृजनाला नाही. प्रयोगशीलतेला नाही. चित्रकारितेतही जेथे "कुशल कामगार" निर्माण केले जातात तेथे चित्रकारांची आणि कला-अविकसीत रसिकांची काय गत असेल?

हा मुद्दा अशासाठी आहे कि प्रगल्भ समाज घडवण्याच्या कार्यात आपली शिक्षणपद्धती अत्यंत अपयशी ठरते आहे. डेसिडिरयस इ-यस्मस यांनी "शिक्षण हे ज्ञान, तर्कशुद्धता आणि अनुभव मिळवण्यासाठी दिले जावे..." असे म्हटले होते. युरोपात ज्ञानक्रांती झाली तिला आमचे एतद्देशीय विद्वान "भौतिक क्रांती म्हणुन त्याज्ज्य" असे आजही हीनवत असतात आणि आमच्या अस्तित्वात कधीही नसलेल्या आध्यात्मिक क्रांतीलाच सर्वोपरी मानत आपले मानसिक समाधान करुन घेत असतात. पण अगदी अध्यात्मही झाले तरी आध्यात्मिक तत्वज्ञानातही आम्ही नवव्या शतकातील शंकराचार्यांनंतर गेल्या बाराशे वर्षांत एका कणाचीही भर घालू शकलेलो नाही हे कोण सांगणार? .खरे तर माणसाला प्रगल्भ बनवत, जगण्यासाठी सक्षम बनवत, संधी निर्माण करत प्रत्येक क्षेत्रात अग्रगामी राहनारा समाजच खरा आध्यात्मिक असतो हे लक्षात घ्यायला हवे.

याउलट आमची समाजरचना ही लबाड, ढोंगी आणि पथभ्रष्टांची कशी आहे याचे चित्र शिक्षणव्यवस्थेतीलच (आर्थिक ते नैतीक) अपार भ्रष्टाचारातुन सहज पाहता येते...इतर क्षेत्रांबद्दल मग काय बोलावे? ज्या समाजात विद्यार्थी आणि शिक्षकही भ्रष्ट असतात, ज्यांच्या शिक्षणप्रेरणा या ज्ञानप्रेरणा नसून शैक्षणिक अडाणीपनातुन व पोटभरु वृत्तीतून निर्माण होतात त्या समाजाचे भवितव्य काय असू शकते?

पोट भरण्यासाठी व इतरांचेही पोट भरण्यासाठी सक्षम बनवणे, स्वावलंबी बनवणे हे जेवढे आवश्यक आहे तेवढेच...किंबहुना त्याहीपेक्षा जास्त आवश्यक असते ते हे कि भावी पिढ्यांना एक प्रगल्भ विकासशील नागरीक बनवणे. तसे आम्ही करत नाही आहोत. एका अज्ञानाच्या व्यामोहात सापडलेलो आहोत...जसे मध्ययुगात होतो त्याच मानसिकतेत आहोत. त्यामुळेच कि काय आम्ही अपवादात्मक एखाददुसरी उदाहरणे वगळता जागतीक ज्ञानसंपदेत भर घालु शकलेलो नाही. आणि आमची शिक्षणपद्धती मुळात तशी इच्छाही निर्माण होवू देत नाही.

मग स्वत:चे व्यक्तिगत भवितव्य हे जर एका फक्त रोजगाराभिमुख स्पर्धकाचे असेल तर आम्ही कोणत्या जोरावर महासत्ता बनण्याच्या वल्गना करतो? महासत्ता ही ज्ञानसत्तेच्याच जोरावर बनू शकते. ज्ञानसत्ताच अर्थसत्ता निर्माण करू शकते कारण अर्थोत्पादन ही ज्ञानाचीच तार्किक व अंतिम परिणती असते. तिची परिमाणे वेगवेगळी असू शकतात. बापजाद्यांच्या जमीनी विकून अथवा दुस-यांच्या हडपुन अर्थोत्पादन होत नसते.  देशी नैसर्गिक साधनसामग्री उध्वस्त करुन, म्हणजे बाहेर विकून, अर्थोत्पादन होत नसते. उसशेती ज्याप्रमाने इतर उत्पादनांसाठी न्याय्य वाटा न देता जलसंपत्ती उधळते...तसे करुनही शाश्वत अर्थोत्पादन होत नसते. आपल्याला "अर्थ" कळाला नाही कारण आपली शिक्षणपद्धतीच मुळात अर्थाला समजण्यात अपेशी ठरलेली आहे!

(क्रमश:)

For previous article, pls click bellow..

http://sanjaysonawani.blogspot.in/2013/05/blog-post_11.html 

12 comments:

  1. "याचे महत्वाचे कारण म्हणजे सफेदपोश नोक-यांचे आपल्या समाज व शिक्षणसंस्थांनी वाढवलेले अनिवार आकर्षण."

    चरखा आणि झाडूला स्वातंत्र्यलढ्यात महत्वाचे स्थान देणारे गांधीजी अशा वेळी नेमके कळतात.

    ReplyDelete
  2. अहो गांधीवादी साहेब ,

    चीनचा आणि पाकिस्तानचा विषय निघाला तर

    त्या सीमेवरून सैन्य काढून घ्या असा

    सुविचार (?) मांडून नेहरू पटेलांना त्रस्त करणाऱ्या

    मूर्ख महात्म्याची आठवण आपण का लिहिली नाहीत

    गांधींचे गुणगान गायचे असेल तर ,

    त्यानी स्वातंत्र्य मिळाल्यावर कॉंग्रेसपक्ष विसर्जित करा आणि

    राष्ट्र सेवादला सारखे पक्षातीत समाजकार्य करा असा आग्रह धरला होता .

    याची पण नवीन पिढीला माहिती दिली पाहिजे

    ReplyDelete
  3. अगदी योग्य बोललात सर. ३ वर्षात इंग्लंडमध्ये मला हेच चित्र थोड्या फार फरकाने दिसले. तिकडेही प्रचंड प्रमाणात बेकारी आहे. पण महत्वाचा फरक असा आहे की एखादयाकडे उत्तम कल्पना असली तर त्याच्या मेहेनातीवर तो नक्कीच उद्योजक बनू शकतो. पण ह्याचा वेगळा परिणाम असा आहे की प्रत्येक गोष्टच फक्त पैसे आणि पैसेच कमावण्यासाठी होते. तुम्ही कुठेही जा सगळीकडे पैसे काढले जातात आणि आता तेच चित्र आपल्याकडे आले आहे. त्यातुन आपल्याकडे जातीपातीच्या राजकारण कोणीच कोणाला चांगली दाद देवून पुढे जाऊ देत नाही. जो तो फक्त दुसरा पुढे गेला म्हणून कुढत बसतो.

    ReplyDelete
    Replies
    1. चैतन्यजी, आपले अनुभव शेयर केले तर आपल्याला आपली चर्चा अधिक सकारात्मकतेने पुढे नेता येइल. आपल्या सविस्तर प्रतिक्रियेची वाट पाहतोय.

      Delete
    2. नमस्कार सर,

      माझे अनुभव खाली देत आहे. मुख्यत्वे माझे क्षेत्र आयटी संधर्भात आहे. त्यामुळे काही मर्यादा नक्कीच आहेत.
      १) युके आणि यूएस मध्ये तुमच्याकडे चांगली कल्पना असेल तर नक्कीच स्वतःच धंदा करता येतो. विशेषतः आयटी मध्ये नविन वेबसाईट जसे की किरण माल विकणे. किंवा छोट्या प्रमाणात एखादी अकौनटची प्रणली किंवा मान्युफक्चारिंग साठीची प्रणली तुम्ही तयार करून विकू शकता. इथे तुम्हाला मदत करायला लोक नक्कीच येतील. एक लॉर्ड शुगर म्हणून इसम आहे. दर वर्षी तो बीबीसीवर एक कार्यक्रम करतो. त्याच्या अनेक कंपन्या आहेत. एकतर त्याच्या कंपन्यांमध्ये काम करण्यासाठीची जागा किंवा तुम्ही एखादी कल्पना घेवून या तुम्हाला तो १.५ मिलियन किंवा २.५ मिलियन पौंडची मदत करून त्याचा बिसनेस पार्टनर बनवतो. त्या मध्ये कित्येक लोक येतात आणि सगळेच उच्च शिक्षित असतात असे काहीही नाही. १-२ तर अगदी १०वी शिकलेल आणि त्यांचा स्वतःचा घरगुती क्लिनिंगचा धंदा होता. एकाचा घराला काचा बनविण्याचा होता. आता आपल्याकड पण असतात पण इथे त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन मला वेगळा वाटला. आपल्याकडे साफसफाई करणारा अतिशय कमी लेखाला जातो. इथे मला ते जाणवले नाही.
      २) बीबीसीची सीबीबीसी म्हणून एक लहान मुलांसाठी वाहिनी आहे. सुरवातीला मला आवडली नाही पण नंतर जस् जसे मुलाबरोबर बघत गेलो तेंव्हा जाणवले की आपल्याकडच्या कथा इतक्या बाळबोध आणि सतत नैतिकतेचा मारा करतात तसे ह्यांच्या नसतात. म्हणजे चांगले वागावे असेच त्यातून पण शिकवले जाते पण त्यांचा अप्रोच सगळा लहान मुलांना त्यांच्या बुद्धीला झेपेल असा आहे. १० मिनिटांचे अनेक उत्तम कार्यक्रम आहेत. यूट्युबवर timmy time, shaun the sheep, chuggington, or iconicles ह्याच्या क्लिप्स जरूर पहा. उत्तम विश्व तयार करतात. timmy time मध्ये तिथल्या आजूबाजूच्या जीवानात दिसणारे प्राणी म्हणजे त्यांची बाळे शाळेत जातात. ते सगळे माझा मुलगा तो शाळेत जे काही कारण होता तसेच होते आणि त्याच्याशी तो आपले अनुभवविश्व जोडू शकत होता. आता एक दिवस ते सगळे कसे तयार करतात ह्याची पण क्लिप दाखवली होती. त्यामध्ये लागणारे तंत्रज्ञ आणि कलाकार ह्यांची मेहेनत वाखाणण्यासारखी होती. आपल्याकडे असे होताना दिसताच नाही. मुळात असा विचार आपण करूच शकत नाही. आपल्याकडे आपण प्रचंड इमोशनल आणि मोठ मोठी वाक्ये ह्यापलीकडे आपल्या सेरीअल्स जात नाहीत. काही काही त्यांच्या जुन्या सेरीअल्स पण प्रचंड आवडून जातात. आपल्याकडे रामायण महाभारत म्हणजे फक्त नैतिकतेचा आणि भाराजारीत वाक्यांचा भडीमार. म्हणजे ह्या प्रकारात तुम्हाला जर क कल्पना असली तर तुम्ही असे काही करून पुढे जाऊ शकता. इथे मला आपल्याकडे त्यासाठी लागणारी कष्ट करायची तयारी कमी पडते असे मत झाले आहे.
      ३) मुळात मी आयटी मध्ये पण पहिले आहे की आपण एकाही जगाला भूरळ पडावी अशी प्रणली तयार करू शकलो नाही. मुळात तशी दृष्टीच नाहीये. मी सुरवात ज्या कंपनी मधून केली त्यांची एक प्रणली होती ती त्यांची चांगल्या ३-४ कंपन्यांमध्ये उपयोगात आणली होती पण मुळात फरक हां आहे की पुढे जेंव्हा १९९० च्या दशकात ओरकाल आणि एसएपी आले तेंव्हा ह्या कंपनीला गाशा गुंडाळावा लागला. आता १० वर्षानंतर विचार करता असे वाटते की मुळातच तशी दृष्टी नव्हतो. आयपाड किंवा आयफोन वगैरे आपण तयार करूच शकत नाही कारण विचार करूनही आजूबाजूचे वातावरण तसे नाहीये. आपल्याला प्रोह्चाहन मिळत नाही. आता सौर उर्जेला खरे म्हणजे सगळीकडे प्रचंड स्कोप आहे पण आपल्याकडे स्वस्तात परवडेल असे काही फार होताना दिसत नाही. तेवढा एकतर अवेरनेस नाही किंवा विचार करायची इच्छा नाही.
      ४) साधे शाळेचे बघा सर. सगळ्या इंग्लंड आणि अमेरिकेमध्ये लोक स्वेच्छेने कौन्सिलच्या शाळेत मुलांना पाठवतात. आता कौन्सिलची शाळा म्हणजे चक्क आपल्याकडची मुन्सिपाल्टीची शाळाच झाली की. तिथेही खाजगी शाळा आहेत पण तिकडे फक्त प्रचंड श्रीमंतांची मुले जातात. गरजच नाहीये तिकडे पाठवायची. शाळेत अडमिशन साठी एकाच फॉर्म भरा आणि त्यामध्ये आपले प्रेफरन्सेस द्या. शाळेत जागा असतील त्याप्रमाणे घरापासून जवळच्या शाळेत आपल्याला जागा मिळेल. मुलांनी शाळेत चालत यावे ही अपेक्षा जेणेकरून शरीराची हालचाल होईल आणि व्यायाम होईल. प्रत्येक शाळेला उत्तम बाग आहे. अगदी लंडन सारख्या गजबजलेल्या शहरात प्रचंड बाग आहेत. कुठेही जा किमान ५ मिनिट चालत अंतरात एक तरी बाग मिळेल किंवा १० मिनिटमध्ये एकतरी छोटी आणि चांगली बऱ्यापैकी मोठी बाग मिळेल. आता आपल्यासारखे एका राहत्या इमारतीत शाळा असले कुठेही मी पहिले नाही.

      Delete
  4. ४) मी स्वतः एक छोटासा कोर्स केला. शिक्षक सध्या काय चालू आहे त्याचा अभ्यास करायला देत. स्वतः एखादा अवघड प्रश्न आला नाही तर मी अभ्यास करून सांगतो असे म्हणत असत. ह्याउलट आपल्याकडे शाळे पासून ते अगदी इंजिनियरिंग पर्यंत मला एकाच अनुभव आला तो म्हणजे हाताच्या बोटावर सोडले तर शिक्षक आपल्या हातात मार्क आहेत त्यामुळे मनमानी करणार.
    आता ह्या सगळ्याची काळी बाजू अशी आहे की सगळीकडे प्रचंड पैसे लागतात. जो तो काहीही करून पैसे जास्त मिळतील असेच पाहतो. एकाच प्रकारचे शिक्षण असल्याने आणि जॉब्स कमीच असल्याने बेकारी वाढते आहे. मला वाटते तोच प्रकार आपल्याकडे आहे. सगळे इंजिनियर किंवा डॉक्टरकीच्या मागे आहेत कारण तिथे थोडे का होईना पैसे मिळतात बाकीच्या ठिकाणी काहीच शास्वती नाही. त्यांची लोकसंख्या मर्यादित असल्याने गोष्टी आपल्यासारख्या हाताबाहेर गेलेल्या दिसत नाहीत. पण सर्वसामान्य माणसाचे राहणे हे इतके खर्चिक आहे की तो तासही मेटाकुटीलाच आलेला दिसला.

    पण तरीही आधी म्हटल्याप्रमाणे एकाधि चांगली कल्पना असेल तर नक्कीच धंदा सुरु करायला फायदा होतो. आपल्याकाडे धंदा फक्त गुज्जू मारावादींच्या हाते. ते चांगले वाईट हा वेगळा मुद्दा झाला पण गेल्या काही वर्षात सगळीकडे किरण मालाची दुकाने ही राजस्थानी आणि तिकडल्या लोकांचीच. मला हेच कळत नाही की आपल्या लोकांना का नाही वाटत आपण काही चालू करावे?

    आता पुढील शिक्षणाचे पण मी बघितले दोन प्रकारची कोलेजेस बघितली. एक आपल्याकडे येवून जोरदार जाहिरात करणारी. विशेतः आंध्र आणि पंजाब मधून भरपूर मुले येतात शिकायला पण ही कॉलेजेस चांगल्या दर्जाची असतीलच ह्याची खात्री नाही. ह्याउलट जी उत्तम आहेत ते आपला दर्जा टिकून ठेवतात. अर्थात तिथेही थोडाफार उन्नीस बीस हा प्रकार आहेच पण आपल्यासारखे धाल्धालीत गंडवणे नाहीये. जर का तक्रार केली तर नक्कीच शिक्षा होईल ह्याची खात्री आहे. हाच माझ्यामते फार मोठा फरक आहे. जो तो आपले काम चोख करतो. मला किमान १०-१२ भरतोय भेटले की ज्यांनी तिकडे जावून आपले व्यवसाय सुरु केले. फरक म्हणजे नविन काही चालू करताना आपल्या शासना सारख्या आद्काठ्या नाहीयेत. प्रचंड मोठा टाकस देतात पण देताना आपल्याला नक्की काहीतरी चांगले इन्फ्रास्ट्रक्चर मिळेल ह्याची खात्री आहे.

    बराच विस्कळीत झाला प्रतिसाद. अजून काही सुचले तर नक्कीच लिहीन. पण मुख्य म्हणजे रोजच्या जीवनात लागणारी सोय करणे ह्यावरच जास्त भिस्त आहे.आता शेवटचे उदाहरण. इथे अनेक म्हातारे एकटे राहतात त्यांच्यासाठी किंवा अगदी आपल्यासारख्या तरुण लोकांसाठी सामान वाहून नेण्यासाठी एक २ चाके असलेली हातगाडी मिळते. माझ्या आईसाठी मी ती घेतली. आता ह्याला काही फार मोठ्या संशोधनाची गरज नाहीये पण आपल्याकडे अजूनही तशी गाडी मला दिसली नाही. अश्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी जाणवल्या. त्यासाठी प्रत्येकाने अगदी उच्च शिक्षित झाले पाहिजेल असे काहीच नाही. पण आपल्या समाजात तसा मान मिळत नाही किंवा लोक बुद्धी नाही असेच म्हणतात. ह्याला काय म्हणावे?

    ReplyDelete
  5. अजून एक आठवले सर. मुलाला शाळेत जाताना अजिबात ५ वह्या आणि ७-८ पुस्तके घेवून जावे लागत नाही. ३-४ वर्षांच्या मुलाला लिहिता आलेच पाहिजेल अशी अजिबात सक्ती नाही. शाळेतच अगदी माती आणि पाण्यात खेळू देतात. अंडे आणि त्यातून बाहेर येणारे चिकन पिल्लू. अश्या अनेक छोट्या छोट्या गोष्टींमधून शिक्षण चालते. मुलाला चित्रकला आवडत होती तर त्याला त्यामध्ये प्रोतचाहन देत होते. मुळात एका टेबलावर रंगकामाचे सर्व साहित्य ठेवलेले. ज्याला पाहिजेल ते त्याने करावे. सर्व मुलांच्या चित्रकालेमधून एक वार्षिक कालेंडर केले होते. थोड्या मोठ्या म्हणजे अगदी ३-४ च्या विध्यार्थ्यांना पण घरी अभ्यास करायला भारंभार गोष्टी दिल्याचे दिसले नाही. मात्र भारतीय आई बाप तिकडे पण आपल्या पद्धतीने घोकंपट्टी करून घेतात. ऑफिस मध्ये पण जाणवायचे आपण लोक कोडिंगमध्ये उत्तम पण प्रोजेक्ट मोठ्या प्रमाणावर करणरे वगैरे आपल्या लोकांना जमत नाही. जमत नाही असे नाही लोकांना नीट वागवायची वृत्तीच नाही. खुस्मास्गीरीला प्राधान्य. ते गोऱ्यांच्यामध्ये पण चालते. पण वेळ आली तर पृष्ठभागावर लाथ पण घालतात. आपल्याकडे म्हणजे सगळा कारभार आपल्या बॉसची मर्जी कशी सांभाळायची ह्यावर अवलंबून. मी २ प्रचंड मोठ्या मल्टीनाशनल मध्ये काम केले जिथे जिथे भारतीय बॉस असेल तिथे डोक्याला ताप. जिथे गोरा वर आला तिथे वातावरण सुधारले किंवा आपल्या कल्पना चांगल्या पद्धतीने मांडता आल्या. इथे माझ्यामते आपण जसे वाढलो त्यामुळे आपण तश्याच चक्रात अडकून राहतो आणि मग अपण तसेच सगळे करतो असे मला वाटते.

    ReplyDelete
    Replies
    1. अजून एका गोष्टीची गम्मत वाटते आपले सगळे राजकारणी त्यांच्या मुलाना लंडन आणि अमेरिकेला शिकायला पाठवतात. शरद पवारांना लवासा म्हणे लेक डीसट्रिकट वरून सुचले. त्यांना आपल्याकडे उत्तम सार्वजनिक वाहन सोय, रस्ते आणि त्याच्या आजूबाजूला चांगले फुटपाथ करावे हे दिसले नाही. जागोजागी उत्तम बागा आणि घरे भांडताना नियम पाळावेत लोकांनी हे करावेसे वाटले नाही. पण एक मोठे शहर मात्र बसावावेसे वाटले. छोट्या छोट्या गोष्टी ज्या करून लोकांचे जीवन सुधारावे असे एकालाही वाटत नाही. मग हे लोक हजार वेळा युरोप आणि अमेरिका ट्रिप्स करतात ह्यांना काय दिसते? ह्यांना सध्या गोष्टी दिसतच नाहीत का? आपले बाकीचे लोक पण इकडे काय काय कोर्सेसे करतात पण ह्या गोष्टी कश्या दिसत नाहीत ह्याचे मला हल्ली कुतूहल वाटून राहिले आहे. गम्मत म्हणजे सगळ्या सौथ एशियाची हीच कथा आहे. पाकिस्तान घ्या वा बांगलादेश घ्या वा श्रीलंका घ्या. तरी श्रीलंका बरीच चांगली आहे. पण जे जे आपल्यापासून फुटून वेगळे झालेत सगळीकडे हेच चित्र आहे. बहुदा आपल्या डी.एन.ए मध्ये काहीतरी गडबड असावी.

      Delete
    2. आभारी आहे चैतन्य...मला पुढील लेख लिहितांना ही माहिती नक्कीच उपयुक्त ठरेल. I have few more questions, but list them later. Thanks again for responding in detail.

      Delete
    3. जरूर सर. जितके मला माहिती आहे तितके सांगायला नक्कीच आवडेल. आपल्याकडे काहीतरी करून परिस्थिती सुधारली पाहिजेल. आपण लोक फार संकुचित विचार करतो आणि शिकलेले नोकरी एके नोकरीच्याच मागे आहेत. रोजच्या जीवनात उपयोगाच्या गोष्टींमधून उद्योजगता वाढेल ह्याचे भान खरे म्हणजे मला तिकडे राहून आले. आता आपल्याकडे मला आले नाही ह्यात माझा पण दोष असू शकतो. कदाचित तश्या लोकांच्यामध्ये राहिलो नसल्याने असेल किंवा मुळातच तशी विचार करण्याची दृष्टी नाही आणि घरात किंवा आजूबाजूला बघायची सवय नाही म्हणा किंवा आपलाच दोष म्हणा.

      Delete
  6. kamala kami pradhanya dene ani boss kinva markasathi haji haji karane ani kontyahi kamat jat adawi ananae he chaitanya sahebanche mat bilkul patate.

    ReplyDelete
  7. marathi manase kirana dukan chalwatana suddha kami pana/ucch pana ani aham bhav sodat nahi. customerala changali soy dene apeshit asate tarach dukan changale chalate.

    ReplyDelete

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...