Saturday, May 11, 2013

निर्मितीक्षमतेचा अभाव?




भारतात इंग्रज येण्यापुर्वी अथवा त्यांनी मेकालेप्रणित शिक्षणपद्धती अस्तित्वात आणन्यापुर्वी भारतात शिक्षणपद्धती कशा प्रकारची होती हेही आपल्याला समजावून घ्यायला हवे. भारतात संस्कृत, पर्शियन व अरेबिक भाषांतून शिक्षण देनारी महाविद्यालये व विद्यालये होती हे आपण मागील लेखात पाहिले आहे. यांची संख्या अर्थातच अत्यल्प अशी होती. या महाविद्यालयांतील शिक्षण हे बव्हंशी धार्मिक व पारंपारिक असे. या तीनही भाषांमधील ज्ञान हे अत्यंत प्राथमिक दर्जाचे आणि समकालीन विचारप्रवाहांना सामावून घेणारे अथवा त्याला पुढे नेणारे नव्हते. त्यामुळे शेकडो वर्ष जुने ज्ञान हेच काय ती येथील उपलब्धी होती. कलकत्ता, बनारससारख्या मोठ्या श्हरांतच ही अत्यल्पसंख्य महाविद्यालये होती. संस्कृतच्या पाठशाळही अशाच अत्यल्प होत्या.

येथील शिक्षणपद्धती ही मुळातच पाठांतराधारित होती. व्यावहारिक उपयुक्ततेपेक्षा धार्मिक कार्य करण्यास उपयुक्त अशा पुरोहितांची, पुराणपंडितांची अथवा ज्योतिष-न्यायशास्त्र्यांची निर्मिती करणे हाच काय तो त्यांचा प्रधान उद्देश्य होता. तेवढ्यापुरती ही महाविद्यालये यशस्वी होत होती हे मान्य केलेच पाहिजे. परंतू त्याच वेळेस हेही लक्षात घेतले पाहिजे कि अठराव्या शतकात या पदवीधरांना सामावून घेईल, म्हणजेच यथायोग्य रोजगार देईल अशी मात्र स्थिती नव्हती. १८२३ मद्धेच राजा राममोहन राय यांनी इंग्रज सरकारला पत्र लिहून ही महाविद्यालये पुर्णपणे बंद करून सरसकट आधुनिक इंग्रजी शिक्षण सुरु करण्याची मागणी केली होती. १८३५ मद्ध्ये अशाच संस्कृत पाठशालेच्या विद्यार्थ्यांनी मेकालेची भेट घेवून बेरोजगारीचीच व्यथा मांडली होती.

या पाठशाला अथवा मदरसे भारताला नवीन नव्हते. शेकडो वर्ष त्या सुरुच होत्या. परंतू त्या का सुरू ठेवायच्या, त्यात काय बदल घडवायचे याची मात्र कोनत्याही धुरीणाने पर्वा केली नाही. याचे कारण म्हणजे मुस्लिम जेवढे परंपराप्रिय व कर्मठ होते तेवढेच वा त्यापेक्षा अधिक वैदिकधर्मीय कर्मठ होते. जुन्या ग्रंथांतील ज्ञान हे दैवी असून त्यात कसलाही फेरफर करण्याचा आपल्याला हक्क नाही ही समजूत दोन्ही प्रकारच्या शिक्षणपद्धतींत एवढी रुजलेली होती कि त्यापारचा विचार करण्याचा विचारही कोणी केल्याचे दिसत नाही. त्यामुळे इंग्रज आल्यानंतर अपरिहार्य म्हणुन अनेक जण इंग्रजीही शिकले असले तरी त्याचा उपयोग रोजगारासाठी करणे एवढाच उद्देश्य राहिला. शिक्षण हे ज्ञानाच्या वर्धनासाठी व त्याचा एकजीव सुसंस्कृत व सुदृढ समाज निर्माण करण्यासाठी असते हे कोणेही लक्षात घेतले नाही.

पण हे झाले महाविद्यालयांचे. त्यांची संख्या अत्यल्पच होती. पण मग प्राथमिक शिक्षण भारतात उपलब्ध होते कि नव्हते? ते फक्त वैदिकजनांसाठीच होते कि अन्य समाजांसाठीही होते? आजवर असा प्रचार केला गेला आहे कि वैदिकजन वगळता अन्य समाजांना शिक्षणाचा अधिकार नव्हता व ते शिक्षणापासून वंचित होते. पण ते खरे नाही. अर्थात येथे शिक्षण या शब्दाचा अर्थ लिखान-वाचन एवढ्यापुरताच मर्यादित आहे. शिक्षण म्हणजे नेमके काय हे भारतियांना अद्यापही कळालेले नाही तर तेंव्हा काय कळणार? असो.

ब्रिटिश राज्य येण्यापुर्वी भारतात, विशेषत: ग्रामीण भारतात नेमकी कशी शिक्षण पद्धती होती याबाबत आपल्या लोकांनी लिहून ठेवलेले नाही. परंतू माउंटस्टुअर्ट एल्फिस्टनने पेशवाई खालसा केल्यानंतर लगेच १८१८ मद्धेच एक अहवाल तयार केला. त्या अहवालात म्हटले आहे कि पेशवाईच्या काळात अनेक गांवांत-खेड्यांत प्राथमिक शाळा होत्या आणि ज्या कौशल्यांची सामान्य पातळीवरील प्रत्यक्ष जीवन व्यवहारात आवश्यकता होती ती कौशल्ये शिकण्यासाठी विद्यार्थी शाळेत जात.

याच प्रकारे इंग्रजांनी वेगवेगळ्या जिल्यांतील अधिका-यांकडुन १८२० ते १८३० या काळात शिक्षणाची व्यवस्था व परिस्थिती विषद करणारे अहवाल मागवले. त्यावरून दिसते कि;

१. जवळपास सर्वच गांवांत प्राथमिक शाळा होत्या.
२. या शाळांचा खर्च काही व्यक्ती करत असत. संपुर्ण गांव नव्हे. कसलीही शासकीय मदत या शाळांना मिळत नसे.
३. या शाळा एक-शिक्षकी असून विद्यार्थ्यांची संख्या १५ ते ३५ एवढी असे.
४. हे शिक्षक ब्राह्मण, प्रभू, भंडारी, कुणबी, वाणी, शिंपी या जातीतून येत.
५. शिक्षकाला दरमहा चर ते सहा रुपये नगदी अथवा वस्तूरुपात मिळत. यातील नगदी पैसे व वस्तू विद्यार्थ्यांच्या पालकांनी थोड्याथोड्या प्रमाणात दिलेली असत. (दोन आणे ते एक रुपया, ऐपतीप्रमाणे.)
६. दलित व स्त्रीया वगळता सर्व जातीतील विद्यार्थ्यांचा यात भरणा असे. (गुजराथेतील अहमदाबाद जिल्ह्याच्या अहवालानुसार एकुण २७०० विद्यार्थ्यांपैकी ११०० बनिया व ४०० ब्राह्मण होते.)

या व्यतिरिक्त हत्यारे चालवण्याचे शिक्षण, धार्मिक शिक्षण मल्लविद्या यांचेही शिक्षण स्वतंत्रपणे आपापल्या आवडीनुसर घेतले जात असे. ऐपत असनारे स्त्रीया-मुलांसाठी घरगुती शिक्षकाची सोय करत असत. ("अपूर्ण क्रांती"  रा. भा. पाटणकर (पृष्ठ १२०-१२१) 

यावरुन सिद्ध होणारी बाब म्हणजे शिक्षणव्यवस्था प्राथमिक स्वरुपातील का होईना सार्वत्रीक होती. शिकू इच्छिणा-या सर्वांनाच या शाळांत प्रवेश होता. शिक्षक हे ब्राह्मणच असत असेही नाही. या शाळांत जे शिक्षण दिले जाई ते लिहिणे, वाचणे, पत्रव्यवहार, व्यावहारीक गणित अशा स्वरुपाचे असे. मुले व्यावसायिक शिक्षण आपापल्या घरीच पालकांकडुन घेत असत. संस्कृत पाठशाळा मात्र फक्त ब्राह्मणांसाठीच असत.

येथे महत्वाचा हा मुद्दा येतो तो हा कि सर्वसामान्यांना शिक्षण उपलब्ध नव्हते हा दावा जर खरा नाही तर, यात अधिक प्रगती साधावी असे येथील शासन व्यवस्था वा समाजनियंत्यांना का वाटले नाही? बरे ही वरील माहिती ही १८३० सालापर्यंतची असली तरी ही परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली असली पाहिजे. ही परंपरा नसती तर अवैदिक संतांची परंपरा भारतात सुरुही झाली नसती हेही येथे लक्षात घ्यायला पाहिजे. असे असले तरी एक महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो तो हा कि प्राथमिक शिक्षण मिळाल्यानंतर का होईना अध्यात्मीक रचनांपुढे जात अन्य वैचारिक/सैद्धांतिक व व्यवसायमुलक लेखन का झाले नाही? या प्रश्नाचे उत्तर शोधल्याखेरीज आम्ही आमचा वर्तमान स्वच्छपणे पाहू शकणार नाही.

मार्च १८२४ मद्धे एल्फिस्टनने शिक्षणविभागाला सादर केलेल्या टिपणात प्रचलित शिक्षनपद्धती आपल्या (इंग्रजांच्या) ताब्यात घेत तिला आधुनिक सुसंगत स्वरुप देण्याची सुसंगत योजना मांडली व त्यानुसार भारतात रयत व शासन यांच्या संयुक्त सहभागातील शिक्षणपद्धती राबवण्यात आली. तोवर भारतात अशा प्रकारच्या शिक्षणपद्धतीचा विचारही झाला नव्हता.

निर्मितीक्षमतेचा अभाव?

भारतीय मानसिकतेत निर्मितीक्षमतेचा एकुणातच अभाव असावा असे वाटावे असे चित्र दिसते. शिक्षण निर्मितीक्षम, कल्पक आणि धोरणी नागरिक बनवण्यासाठी असते हा सिद्धांत पुढे आला तेंव्हा युरोपातील शिक्षणपद्धती या आपल्या भारतीय शिक्षणपद्धतीपेक्षा फारशी अद्वितीय वगैरे नव्हती. बव्हंशी लोक लिहा-वाचायलाच शिकलेले असत. धर्म-तत्वज्ञानादि शाखांचे शिक्षण ल्यटीनमद्ध्येच दिले जात असे. अशी परिस्थिती असतांनाही निर्मितीक्षम प्रतिभाशाली निर्माण झालेच. त्यांनी धर्मसत्ता पुरती नाकारली. तेथेच त्यांच्या वैचारिकतेला मोकळे रान मिळाले आणि ज्ञान-विज्ञानाची क्रांती सुरू झाली.

धर्मसत्ता नाकारण्यासाठी एक डोळस तर्कबुद्धीचे गरज असते. ती केवळ शालेय वा उच्च शिक्षणाने येत नाही. वास्तवाचे भान आणि आकलन व त्यावर प्रतिक्रियास्वरुप विचारांच्या सुस्पष्ट मांडणीची गरज असते. ज्ञान हे अनावर कुतुहल आणि जिज्ञासेतून निर्माण होते. धर्मसत्ता हे नेहमीच मानवी समाजाला पुराणपंथी गारुडात ठेवण्यातच समाधान मानत असते व तसे अविरत प्रयत्न करत असते. हा जगभरचा संघर्ष आहे. त्यात युरोपाने धर्मसत्तेला यशस्वी आव्हान देत ज्ञानसत्तेला सर्वोपरी बनवले. अर्थात हाही प्रवास सोपा नव्हता. ब्रुनोसारख्या शास्त्रज्ञाला जीवंत जाळले गेले तर ग्यलिलिओला आजन्म कैद मिळाली. अगणित प्रागतिकांचा छळ झाला.

भारतात असे स्वतंत्रपणे का घडले नाही? येथे काही वाचकांना आर्यभट, भास्कराचार्य ते वराहमिहिर यांचे उदाहरण देण्याचा मोह होईल...पण त्याचा काहीएक उपयोग नाही कारण त्यांचीही परंपरा अर्धवट मद्धेच सोडुन देण्यात आले होती. काही मंडळीला मुस्लिम राजवट हे सोपे कारण सुचेल परंतू तेही खरे नाही कारण आक्रमणकाळ वगळला तर नंतर त्यांनीही शिक्षणव्यवस्थेत हस्तक्षेप केल्याचे दिसून येत नाही. शिक्षण या देशात कधीच सार्वत्रिक नव्हते हे खरे आहे पण शिकू इच्छिणा-यासाठी (काही समाजघटक वगळता) शिक्षण उपलब्ध होते. मुस्लिमांनी मदरसे/मकतब्यांमार्फत त्यांची शिक्षणपद्धती जशी अंमलात आणली तशीच एतद्देशियांची शिक्षण पद्धतीही सुरुच राहिली. असे असतांनाही स्वतंत्र विचारक प्रदीर्घ काळात आणि संपुर्ण देशातुन मुळात निर्माणच होवू नयेत असे का घडले असावे?

धर्माचा पगडा हे कारण द्यावे तर मग तो जगात कोणत्या राष्ट्रात कोणत्या समाजात नव्हता? प्रश्न पडु नयेत, कुतुहल वाटु नये व त्याचा पाठपुरावा करण्याचे इच्छाच असू नये असे असल्याखेरीज ज्ञाननिर्मितीबाबत निरिछ्छा निर्माण होणे शक्य नाही. सभोवतालच्या सामाजिक परिस्थितीबाबत जाणीवा मृतवत असाव्यात तरच सामाजिक विचार जन्माला येनार नाहीत. ज्ञानयोगाबाबत आध्यात्मिक चर्चा बरीच असतांनाही ज्ञानाला अध्यात्म समजल्याने ज्ञान हा शब्द फक्त पारिभाषिक राहिला असेच म्हणने क्रमप्राप्त आहे. संतांची मांदियाळी बरीच असली तरी त्यांनीही सामाजिक जाणीवांचे भौतिक उन्नयन करण्याऐवजी आध्यात्मिक उन्नयनालाच महत्व दिले हेही उघडच आहे.

तत्कालीन शिक्षणपद्धतीत शिक्षण घेणारे आपापले जातिसापेक्ष व्यावसायिक शिक्षण घरीच मिळवत असत हे आपण वर पाहिलेच आहे. प्रचलित व्यवसायांत, व्यवसाय पद्धतीच्या अंगाने म्हणा कि उत्पादन पद्धतीच्या अंगाने, परंपरागत पद्धतींपेक्षा अधिकाधिक कार्यक्षम बनवाव्यात हा विचार व्यावसायिकांनाही सुचलेला दिसत नाही. तसे प्रयत्नही कोणी केलेले आढळुन येत नाहीत. ही स्थितीस्थापकता समाजमनावर असलेल्या अद्भुत आध्यात्मिक व धार्मिक गारुडामुळे आली होती असे म्हणावे तर राजरोसपणे राज्यकर्ते ते सरंजामदारशहा असामाजिक कृत्ये (जी अधार्मिक या संज्ञेत सहज मोडतात) देशभर सरसकटपणे आणि सातत्याने करत आलेली दिसतात. त्यामुळे आमच्या जिज्ञासा धार्मिक जाणीवांमुळे मेल्या होत्या असे म्हणुन चालणार नाही. आपला इतिहास म्हणुन आपल्याला तत्कालीन राजे-सरंजामदारांच्या कृत्यांचे उदात्तीकरण करण्याचा मोह होणे स्वाभाविक असले तरी तसे करणे आपल्याला आपल्या प्रश्नाचे वास्तवदर्शी उत्तर देणार नाही. 

आज आपण वर्तमानाकडे पाहिले तरी आपल्या लक्षात येईल कि भारतीय मानसिकतेत मध्ययुगीन मानसिकतेपेक्षा गुणात्मक वाढ झालेली दिसून येत नाही. पाश्चात्य शिक्षणपद्धतीमुळे व वर्तमानातील जागतिकीकरणामुळे जे आमच्यात बदल झालेले दिसतात ते बाह्यात्कारी आहेत व ते अपरिहार्यतेमुळे स्वीकारले गेले आहेत. त्यात आमचे स्वत:चे असे स्वतंत्र योगदान आढळुन येणार नाही. जे आहे ते अनुकरणात्मक योगदान आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

नवनिर्मितीच्या मानसिक जाणीवांचा अभाव हे एकमेव कारण या मानसिक कुंठांना असले पाहिजे असे मला वाटते. नवनिर्मितीच्या छंदाखेरीज ज्ञानाची निर्मिती होत नसते. ज्ञानाच्या निर्मितीखेरीज अर्थनिर्मिती असंभाव्य आहे. इंग्रजांची शिक्षणपद्धती सुरु झाल्यानंतर दादाभाई नवरोजी, नवरोजी बैयरामजी, जमशेदजी टाटा या तशा मध्यमवर्गीय अवस्थेतुनच येत शिकलेल्या तरुणांनी जागतीक बाजारात/उद्योगात तरुण वयात पाय ठेवला. तसे इंग्रजी शिक्षण घेतलेल्या हिंदु विद्यार्थ्यांबाबत घडलेले दिसत नाही. उलट ते सुरक्षीत नोक-यांतच घुसतांना आणि काही अपवादात्मक तरुण पत्रकारिता/प्रकाशन/समाजकार्य अशा कार्याला लागलेले दिसतात. मुंबई चेंबर ओफ कोमर्स सुरु झाली तेंव्हा चार इंग्रज आणि तीन पारशी एवढेच चेंबरचे सदस्य होते.

"आम्हाला तशी उद्योगव्यवसायाची परंपराच नव्हती..." हे विधान येथे कुचकामी आहे कारण आधुनिक अर्थशास्त्रीय जगताच्या परिप्रेक्षात त्यात एकार्थाने सारेच नवे भागीदार होते व ते तेथेही प्रशिक्षणार्थीच होते हे येथे लक्षात घ्यायला हवे. यथोचित साहसाचा अभाव हे आमच्या निर्मितीक्षमतेचे मारेकरी तर ठरले नसेल? स्पर्धेला तोंड देण्यासाठी स्वत:ला सक्षम करण्याऐवजी आम्ही आजही जसे जागतीक बाजारपेठेत बव्हंशी सेवकभावनाप्रेरीत अथवा भिकारीच असतो तशीच मानसिकता तेंव्हाही नव्हती असे कसे म्हणता येईल?

याचाच दुसरा अर्थ असा होतो कि नवनिर्मितीची प्रेरणा भारतियांत नव्हती म्हणुन शिक्षणपद्धतीत बदल करण्याची इच्छा हजारो वर्ष झाली नाही. नवशिक्षितांनी त्या कामचलावू शिक्षणाचा उपयोग प्राप्त परिस्थितीत फक्त उदरभरणापुरता केला व बाह्य वास्तवांकडे डोळे मिटुन घेतले...कारण नवनिर्मितीची संभावनाच त्यांच्यात नव्हती.  नवनिर्मितीच्या प्रेरणांच्या अभावात आम्ही समाजोपयोगी असे कसलेही नवसिद्धांतन करु शकलो नाही आणि तसे करू शकलो नाही म्हणुन समाजमानसशास्त्राचीही कसलीही उत्क्रांती झाली नाही. आम्ही इंग्रजांनी शिक्षणपद्धती दिली, ती नोकरीच्या गरजांपोटी उचलली आणि आजही त्याच प्रेरणांनी शिक्षणार्थी आहोत.

आम्ही ज्ञानार्थी बनायची जी प्रक्रिया असते तीपासून वंचित राहिलो ते राहिलोच!

(क्रमश:)
See Also: http://sanjaysonawani.blogspot.in/2013/05/blog-post_6.html

2 comments:

  1. संपूर्ण सहमत सर - जबरदस्त लेख, भारतीय समाज आणि लोकांच्या मानसिकतेवर योग्य त्या ठिकाणी बोट ठेवले.

    1) "धर्मसत्ता नाकारण्यासाठी एक डोळस तर्कबुद्धीचे गरज असते. ती केवळ शालेय वा उच्च शिक्षणाने येत नाही. वास्तवाचे भान आणि आकलन व त्यावर प्रतिक्रियास्वरुप विचारांच्या सुस्पष्ट मांडणीची गरज असते. ज्ञान हे अनावर कुतुहल आणि जिज्ञासेतून निर्माण होते. धर्मसत्ता हे नेहमीच मानवी समाजाला पुराणपंथी गारुडात ठेवण्यातच समाधान मानत असते व तसे अविरत प्रयत्न करत असते. हा जगभरचा संघर्ष आहे. त्यात युरोपाने धर्मसत्तेला यशस्वी आव्हान देत ज्ञानसत्तेला सर्वोपरी बनवले. अर्थात हाही प्रवास सोपा नव्हता. ब्रुनोसारख्या शास्त्रज्ञाला जीवंत जाळले गेले तर ग्यलिलिओला आजन्म कैद मिळाली. अगणित प्रागतिकांचा छळ झाला."

    2) "याचाच दुसरा अर्थ असा होतो कि नवनिर्मितीची प्रेरणा भारतियांत नव्हती म्हणुन शिक्षणपद्धतीत बदल करण्याची इच्छा हजारो वर्ष झाली नाही. नवशिक्षितांनी त्या कामचलावू शिक्षणाचा उपयोग प्राप्त परिस्थितीत फक्त उदरभरणापुरता केला व बाह्य वास्तवांकडे डोळे मिटुन घेतले...कारण नवनिर्मितीची संभावनाच त्यांच्यात नव्हती. नवनिर्मितीच्या प्रेरणांच्या अभावात आम्ही समाजोपयोगी असे कसलेही नवसिद्धांतन करु शकलो नाही आणि तसे करू शकलो नाही म्हणुन समाजमानसशास्त्राचीही कसलीही उत्क्रांती झाली नाही. आम्ही इंग्रजांनी शिक्षणपद्धती दिली, ती नोकरीच्या गरजांपोटी उचलली आणि आजही त्याच प्रेरणांनी शिक्षणार्थी आहोत.

    आम्ही ज्ञानार्थी बनायची जी प्रक्रिया असते तीपासून वंचित राहिलो ते राहिलोच!"

    ReplyDelete
  2. नवनिर्मितीच्या मानसिक जाणीवांचा अभाव हे एकमेव कारण या मानसिक कुंठांना असले पाहिजे असे मला वाटते.

    Hey khare karan aahe.. Ani aajunachi teech sthiti aahe. Tase pahile tar aplyakade evhdya IIT / IIM aahet, khoryane mark kadhun doctor / engineer hotat, pan ashi kuthlihi jagtik patilichi nirmiti hotana disat nahi.
    Me swataha IT madhe aahe ani IT madhe kaay chalte hey pahun tar mazi khatri zali aahe, ki jo paryant aplyakade 'Research oriented' shikshan ani manasikta yet nahi, jo 'work ethic' banat nahit, to paryant kahi honar nahi.
    Thode faar kala / chitrapatat pahave tar teethe he choryamarya (Hindi madhe visheshtah) kivha Remix diste.

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...