Monday, May 27, 2013

शिक्षणव्यवस्थेची मूल्याधारित पुनर्रचना आवश्यक!


आपल्या गुणाधारित शिक्षणव्यवस्थेमुळे प्रत्येक विषयात उत्तीर्ण होणे अनिवार्य ठरते हे आपण पाहिले. या व्यवस्थेचा सर्वात मोठा दोष म्हणजे विद्यार्थी हा घोकंपट्टी करणारा भारवाही हमाल बनुन जातो व त्याची नैसर्गिक कौशल्ये/कल दुर्लक्षित राहतात. यातुनच नवनिर्मितीची क्षमता क्रमश: घटवली जाते. भारतियांत नवनिर्मितीची क्षमता नव्हती म्हणुन आपण ज्ञानविज्ञानात मागे पडलो ते पडलोच याबाबत आपण मागील लेखात चर्चा केली. भारतीय एकुणातीलच व्यवस्थेने नवनिर्माण क्षमतेचे मानसिक अपहरण केले होते हेही आपल्या सहज लक्षात येईल. दैववाद हे त्याचे कारण नसून प्रत्येक समाजघटकातील मुलांना आधी पोटार्थीच कसे बनवता येईल अशी शिक्षणपद्धती व मूल्यपद्धती जोपासली गेली असल्याचे आपल्या लक्षात येईल.

आपला पुरोहितवर्गही "भिक्षुक" म्हणुन अभिमानाने मिरवत असे तर इतरजण बालवयापासुनच परंपरागत धंद्यांत आंधळेपणे ढकलले जात असत. यात प्रत्येकात कोणत्या ना कोणत्या नवनिर्मितीची क्षमता असली तरी तशी संधी मिळणे अशक्यप्रायच होते! स्वतंत्र विचार करण्यासाठी अर्थव्यवस्था अनुकूल अथवा प्रतिकूल ठरू शकतात हे आपण जागतिक इतिहासात डोकावून पाहिले तरी लक्षात येईल. दहाव्या शतकानंतरची भारतीय अर्थव्यवस्था आणि तत्पुर्वीची अर्थव्यवस्था व नवनिर्मिती यात आपण तुलना केली तर हा मुद्दा सहज लक्षात येइल.

वर्तमान युगात आपल्या शिक्षणपद्धतीने खरे तर इतिहासापासून धडा घेत स्वतंत्र विचार करु शकणारी, नवनिर्मितीची प्रेरणा केंद्रीभुत ठेवत ज्ञानाधारित शिक्षणव्यवस्था अंगिकारणे आवश्यक होते. दुर्दैवाने तसे झाले नाही. उलट आपली शिक्षणव्यवस्था ही बेरोजगार निर्मितीचे मोठे कारखाने बनले. बेरोजगार शिक्षितांकडे दुसरे जगण्याचे कौशल्यच शिक्षणपद्धतीने दिले नसल्याने सुशिक्षितापेक्षा अशिक्षितांतच जगण्याची कौशल्ये अधिक आढळतात असे शिक्षणतज्ञच म्हणत असतील तर यावर गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे.

सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे गुणाधारित शिक्षणपद्धती निर्मितीक्षमतेला मारक आहे हे उघड आहे. उदा. माझा कल वा आवड इतिहासाकडे आहे व मला गणितात अथवा विज्ञानात गती नाही. अशा परिस्थितीत मी गणित अथवा विज्ञान शिकणे व त्यात पास होणे अनिवार्य असावे काय? समजा मारुन मुटकून घोकंपट्टी करत मी त्यात पास जरी झालो तरी त्याचा, मला कसलेही आकलनच झाले नसल्याने, भावी जीवनात काही उपयोग आहे काय? मला सोडा त्या आकलनरहित अवस्थेत जेही विषय पास झालो त्यांत मी त्यात अधिकची भर घालत समाजाला उपयोगी बनू शकतो काय? यात माझे जी आवड, इतिहास, त्याचे काय होईल? इतर विषयांत पास होण्याच्या दडपणाखाली मला नाईलाजाने इतिहासाकडे दुर्लक्ष करावे लागणार नाही काय? म्हणजे ज्यात मला आवड आहे त्यात मला अधिकाधिक प्राविण्य (अगदी शिक्षणपद्धतीत दिलेल्या पाठ्यक्रमाबाहेर जात) मिळविण्याची संधी मिळणार आहे काय? त्या आवडीच्या विषयावर अधिक चिंतन मनन आणि नवा दृष्टीकोन स्वतंत्रपणे जोपासण्याची मला या पद्धतीत संधी आहे काय? या पद्धतीत माझा आणि शिक्षकांचा वेळ/परिश्रम व शासन (आणि माझे पालक) खर्च करत असल्याने तो खर्च ज्यात मला रस नाही त्यावर वाया घालविण्यासारखे नाही काय?

हे इतिहासाचे उदाहरण सर्वच विषयांबद्दल लागू आहे. पाठ्यक्रमाबाहेर असलेल्या पण जगण्याची साधने असलेल्या विषयांत...म्हणजे चित्रकला, लोहारकाम, कृषिशास्त्र, सुतारकाम इ. मद्धे एखाद्याला रुची असेल वा अंगभूत कौशल्य असेल तर ते कौशल्य प्राविण्यात बदलवत विद्यार्थ्याला त्यात तज्ञ बनवण्यासाठी अनुकूल अशी आपली शिक्षणव्यवस्था आहे काय?

एक अथवा दोन आवड असलेल्या विषयांतच संधी देत, पास होण्याची त्या विषयांची मर्यादा वाढवत अन्य विषयांतील गुण कितीही कमी अथवा जास्त असले तरी विद्यार्थ्याला पुढील वर्गात पाठवले तर काय अनर्थ होणार आहे काय?

हे प्रश्न अशासाठी विचारले कि यावर गंभीरपणे चिंतन करण्याची गरज आहे. यात असा प्रतिप्रश्न उपस्थित होवू शकतो तो हा कि विद्यार्थ्याचा नेमका कल कसा ठरवायचा? आज ज्या विषयाची आवड वाटते त्याची आवड पुढेही राहिलच हे कशावरुन?

तसेही आता सातवीपर्यंत विद्यार्थी पास होण्याचा तणाव नसल्याने निर्धास्त असतात. या सात वर्षांच्या कालावधीत विद्यार्थ्याचा कल, आवड, जिज्ञासा नेमकी कोणत्या विषयात आहे हे शिक्षकांना (व पालकांनाही) समजणे अशक्य नाही. त्याला मानसशास्त्रीय चाचण्यांचीही जोड देता येवू शकते. याच काळात ज्यात कल वाटतो त्या विषयांत अधिकचे (अभ्यासक्रमाबाहेर जात) स्वातंत्र्यही देता येवू शकते. शेवटच्या परिक्षेत कल असलेल्या विषयांतील मार्कच गृहित धरुन त्याला त्याच विषयात (अथवा एकापेक्षा अधिक विषय असतील तर निवदसंधी देत) माध्यमिक, उच्चमाध्यमिक व पदवी शिक्षण दिले तर काय होइल?

याचा सर्वात मोठा फायदा हा होईल कि विद्यार्थी आपल्या आवडीच्या क्षेत्रात पदवी वयातच एरवी आपल्या शिक्षणव्यवस्थेत अशक्य आहे असे अधिकचे प्राविण्य मिळवू शकेल. तज्ञ बनू शकेल. त्यातुनच नवनिर्मितीला वाव मिळु शकतो आणि देशात विविध विषयांतील व त्यांच्या शाखा-उपशाखांतील पारंगत अशा तज्ञांच्या फौजा उभ्या राहू शकतात हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

या पद्धतीचा होणारा संभाव्य पण सर्वात महत्वाचा फायदा असा कि विद्यार्थ्याला एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणुन आपली बांधणी करता येणे सहज शक्य आहे. प्रचलित शिक्षणपद्धतीत प्रत्येक विद्यार्थी हा मानसिक कुंठेतून अपरिहार्यपणे जात असतो. केवळ गरजेपोटी जेंव्हा नको ते विषयही अभ्यासावेच लागतात, अधिकाधिक गुण मिळवत इतरांशीच्या स्पर्धेत अविरत संघर्षायमान रहावे लागते तेंव्हा मानवी व्यक्तिमत्वाचे आकुंचन होत विकासशील नव्हे तर स्पर्धाधारित नागरिक निर्माण होणे अपरिहार्य आहे. यातुन जी समाजव्यवस्था (राजकीय/आर्थिक/बौद्धिक) आकाराला येते ती तशीच संकुचित व परस्परांकडे स्पर्धेच्या भावनेने पिडीत झाल्याने नकारात्मक असते. आणि नकारात्मक मनोवृत्तीच्या समाजात नवनिर्मिती कशी होणार? विद्यार्थीदशेतच काय शिकायचे आहे याचे विद्यार्थ्याचे स्वातंत्र्य नाकारले जात असेल तर कोणत्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाचे नागरिक आम्ही घडवणार आहोत?

आज शिक्षण पुर्ण होऊनही विद्यार्थ्यांना नोक-यांसाठी स्पर्धा परिक्षा का द्याव्या लागतात? याचाच अर्थ आधी जे काही शिकले, मेरिटचे गुण मिळवले ते निरर्थक होते असे आम्हीच मान्य करतो असे नव्हे काय? दोनशे जागांसाठी दोन लाख अर्ज हा सध्याचा सरासरी नोकरी मागणारे आणि उपलब्ध नोक-या यांतील अवाढव्य तफावत दर्शवत नाही काय? या परिक्षा, त्यांतील नेहमीचे गोंधळ व जीवघेणी स्पर्धा यातून आपण निकोप समाज घडवत नसून हिंस्त्र आणि स्वार्थप्रणित नागरिक घडवत असतो असे नव्हे काय? जीवनाची श्रेष्ठ मुल्ये या निरर्थक स्पर्धात्मकतेमुळे हरपतात व आज आपली जी भ्रष्ट व्यवस्था उभी राहिलेली आहे तिला आपली शिक्षणव्यवस्थाच कारणीभूत नव्हे काय?

या जगात स्कोप नाही असा विषय नाही. एखाद्या क्षेत्रात संध्यांची निर्माण होणारी लाट ही चिरकालिक नसून तात्पुरती असते. त्यामुळे जे अशा लाटांवर स्वार आधी होतात ते फायद्यात जात असले तरी नंतरच्या झुंडी मात्र क्रमश: कशा तोट्यात जावू लागतात हे आपण आय.टी. क्षेत्राबाबतही पाहू शकतो. बरे या झुंडी स्वत:चे असे काही नवयोगदान देण्याच्या स्थितीत असतात काय? याचे उत्तर जवळपास नाही असेच असते...कारण तसे प्राविण्य त्याच्याकडे नसतेच.अशा शिक्षनपद्धतीत फक्त नोक-या मागणारे अधिक असतात तर नोक-या निर्माण करु शकणारे अत्यल्प. या परिस्थितीत राष्ट्राचा अर्थविकास होणे कसे शक्य आहे? ज्ञानविकासाची मग बातच नको!

त्यामुळे आपल्याला आपल्या शिक्षणपद्धतीचा फेरविचार करणे अनिवार्य असे बनले आहे. प्रत्येक मूल हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे व त्याचे स्वत:चे असे विकसित होवू शकणारे स्वतंत्र ज्ञानविषय आहेत हे मानसशास्त्रीय भान आपल्याला येणे अत्यावश्यक आहे. त्याचे भान ठेवतच तशी शिक्षणपद्धती बनवली गेली पाहिजे. राबवली गेली पाहिजे!

अन्यथा भारत ज्ञानकारणापासून ते अर्थकारणापर्यंत आजवर ज्या भिक्षुकी अवस्थेत आहे त्यात पुढेही विषेष फरक पडणार नाही. जाग येईल तोवर आपली साधनसंपत्ती जवळपास नष्ट झाली असेल व आर्थिक दृष्ट्या आपण पुन्हा अराजकाने हिंस्त्र बनलेल्या मध्ययुगात फेकले गेलेलो असू याचे भान आपल्याला वेळीच आले पाहिजे.

-संजय सोनवणी
९८६०९९१२०५
Read This also...

And this also!

5 comments:

  1. संपूर्ण सहमत सर.....

    Whether Software or Hardware,,,,, to be frankly speaking, most of the Indian Technocrats(!!!!!!????) are sophisticated highly paid Labours...... Since right from 1985 (Rajiv Gandhi's Era) except few peoples have innovated new things in these IT Field like as Vinod Khosala(SUN Systems), Arun Dham (Intel Corporation), ......(These are NRIs) and Here in India, Sam Pitroda(CDOT), Dr. Vijay Bhatkar(Super Computer PARAM)....... But What about most of the One Million IT Technical People in INDIA??????

    Even I am being a part of these field for sake of Bread and Butter.........since last 20 years,
    And Even I feel "AbsoluteShame" about myself being in these unavoidable circuimstances that learn continuously New Technology, adapt it and give the Training to People who wanted to do Career(????!!!!!) in these IT field i.e. only to get high amount of money, perks etc....... NO Innovations, No Satisfaction.....

    But one thing is Very True What Sanjay Sonawani Sir said that "Whoever comes first in these IT Field, would be more successful in all respect and Remaining followers are less successful than first one.

    ReplyDelete
    Replies
    1. I agree with you Dnyanesh. I came to the conclusion that overall environment does not support any innovation. The present generation of business leaders are product of old methods. Which Indian manufacturing company pioneered good IT systems? IT was looked as non revenue department. It's after indian companies success indian big business houses looked into IT but by that time most of the innovation was already done in US. That's the reason our people can open companies in US/UK but in India people do not pay you much. This whole attitude that earning good money is looked as evil is 70% responsible for this present culture. Do our political leaders have capacity to take tough decisions? Can they take such decisions? It was P V Narsinha rao who took such decisions but he is long forgotten.

      Delete
  2. संजयजी आपल्या उपरोक्त्‍ा विवेचनाने विद्यार्थी पालकाचे सामान्य माणसाचे डोळे उघण्याचे जाणीवा जागृत करण्याचे कार्य होत आहे. अगदी मनापासून आपणाला सलाम व आभार. मात्र हस्तीदंती मनोऱ्यातील शिक्षण तज्ञ व राजकारणी संस्थाचालक यांना याचे काहीही सोयर सुतक नाही. नव्हे त्यांच्या गावीही नाही. युजीसी असो वा पीएचडी अथवा कुलगुरु व नाव गाजलेले संशोधक हे लोक आतापर्यंत अतिशय traditional thinking करणारे पाठय पंडीत राहिले आहेत. वयानुसार म्हणा किंवा पाठांतरवादी लोकांचे प्राबल्य असणारे शिक्षण रचना असो अथवा 85 चा टुकार शिक्षण पॅटर्न असो विद्यार्थ्याकडे नेहमीच नकारात्मक दृष्टीने बघीतले जात होत व आहे. त्यांच्याविषयी करुणा मानवता त्यांचा आपण वर उल्लेखिल्याप्रमाणे सर्वांग विकासासाठी काय करावे हे त्यांना सूचलेलेच दिसत नाही. ते आपण आपल्या लेखांमधून वारंवार निदशर्नास आणता व पुढील धोक्याची सूचना अत्यंत प्रामाणिकपणे जीवतोडपणे आपल्या भूमिकांमधून लक्षात येते. तथापि, 8 वी ते 12 हा कालावधी वरीलप्रमाणे शिक्षण पध्दती अवलंबिण्यास तांत्रिक दृष्टी विकास करण्यास व स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा अतिशय महत्वाचा टप्पाच आहे. एखाद्याला इंग्रजी अथवा गणित येत नाही म्हणून नापास करणे का, त्याला टेक्निकल माईंड असू शकत नाही काय, परफॉर्मिग आर्टस, डिझाईनिंग,सोनारकाम सुतारकाम कृषी त्यासोबतचे पूरक उद्योग कम्प्युटर हार्डवेअर यांत या लहान वयांत योग्य शिक्षण व संधी मिळाल्याने विद्यार्थ्याचा पाया अतिशय पक्का होतो. व वयाची 17-18 वय होई पर्यंत जाणीवा जबाबदाऱ्या वाढून एक जबादार Skilled expert/व्यक्ती निर्माण होऊ शकते. बाकीचे शिक्षण भाषा त्याला तर काम करतांनासुध्दा व्यापार उद्योगाचय गरजेनुसार डिमांड सप्लाय पध्दतीने सुध्दा शिक्षा येतील . तर मग हे एवढे विषयांचे कुंपण का त्याच्याकडे एवढया नकारात्मकतेने अडवले जाते. व खोटे पाठांतराचे मेरीटचा गाजावाचा क्लास वाल्यांचा धंदा तसेच आता तर सांगतो आय.ए.एस.सारख्या आऊटडेटेट जुनाट सिस्टमचा उदोउदो करुन तसेच त्या संबधित प्रशासकीय केंद्र काढून जनतेची विद्यार्थ्याची फसवणूक केली जात. आहे. अहो मोजके अधिकारी करुन किती सामाजिक स्तर उंचावता येईल व समाजाला त्याचे आउटपूट काय, त्याऐवजी मल्टीनॅशनल कंपन्या असेा वा इतर मोठे उद्योग, शेती अशास्तरांसाठी चांगल्या मॅनेजमेंट इन्स्टिटयूट IIMS Ahmedabad सारख्या प्रत्येक जिल्हयात उभारुन त्यांचा व्यापार उद्योग व सर्वसामान्य जनतेला प्रत्यक्षपणे मदत केल्याचे सिध्द होईल. अन्यथा किती दिवस हे लोक धुळफेक करताहेत. या सर्व विषयांच्या कम्पल्शन मुळे 10 वी पास होत नाही म्हणून कित्येक मुलांची आयुष्यांची राखरांगोळी झाली आहे.कित्येक गुन्हेगारीकडे वळले. आपण सांगतलेल्या सिस्टम प्रमाणे जर शिक्षण पध्दतीचा अवलंब झाला तर नक्कीच जबाबदार नागरीक घडविता येईल व रिकामी कटटयावर बसलेली बेरोजगार मुले केवळ राजकीय पक्षांच्या घोषणांना फसून दगडफेक नुकसान करुन्‍ स्वत:चे किंवा कुटंबाचेही नुकसान करीत आहेत. राजकीय पक्ष व संघटना यांचे हे सोपे टार्गेट आहे. याउलट शिक्षण पध्दतीत तातडीने बदल केल्याने वयात रोजगार व वयात लग्न सुध्दा होऊ शकेल हे मुलांना नाही तर मुलींनासुध्दा छोटी मोठी कोर्सेस कामे करुन आत्मनिर्भर होता येईल. वेळेत लग्न,डॉक्टर किंवा श्रीमंत सेटल फॅमिलीच्या अमाप अवास्तव अपेक्षेपुढे मुलामुलींच्या पालकांनी करुन मुलामुलींचे तारुण्य व लग्नाचे वय वाढविण्याचे पातक होणार नाही. मी तर एखाद्या विद्यार्थला कमी मार्क मिळाले तर त्याला किंवा त्यांच्या पालकाला जबाबदार फारसा धरणार नाही. तर आपण सांगितलेली ती नवेपण व स्वयंसिध्दता न देणारी जुनाट शिक्षण रचना व राबविणाऱ्यांनाच जबाबदार धरेल. नवीन पिढी खुपच शार्प आहे. मला तर वैभवशाली भारत घडविण्याच्या फार मोठया अपेक्षा त्यांच्यात दिसतात. धन्यवाद. अभय वांद्रे, मुंबई

    ReplyDelete
  3. आदरणीय संजयजी,
    आज देश के सैकड़ों विश्वविद्यालय कालबाहय् हो चुके विषय उतने ही कालबाहय् माने जा चुके तरीकों से पढा रहे है. डा^क्टरेट के विषय और संशोधन पर लिखे प्रबंध देखकर तो अपना ही सर घुन लेने की इच्छा हो जाती है. ये संशोधन समाज के किसी भी वर्ग के काम के नहीं है. किंतु देश का किमती पैसा किसानों और स्वयं रोजगार करने वालों से कॄषी-उपज के बाजार भाव तोड,कर या कर के रूप में वसूला जाता है और इसप्रकार के पाखंड पर लगा दिया जाता है. देश के उच्च शिक्षा संस्थान अय्याशी के अडडें में बदल चुके है. समाज के भविष्य की प्रतिभा का निर्माण वहाँ पर होने की अपेक्षा करना उनके उपर एक अन्याय करने जैसा है. नये जमाने के ज्ञान से उनका रिश्ता काफी पहले टूट चुका है. रही सही कसर राजनीतिक और जातीय अस्मिता से जुडे श्रमिक संघठन पूरी कर दे रहे है. ऐसे माहौल में इन संस्थानों द्वारा दिये जा रहे सारे प्रमाणपत्र खारिज की जा चुकी करेंसी नोट से ज्यादा का महत्व नहीं रखते है जिस पर उसका मूल्य तो छपा है किंतु कोई नहीं जानता कि यह मूल्य कौन अदा करने वाला है. हमारे निर्दोष युवा ये प्रमाणपत्र लेकर बेचारगी में इधर उधर भटकते रहते है. किसी भी अभ्यासक्रम में प्रवेश स 75; संबधित प्रमाणपत्रों की सख्ती ज्ञानदान के दरवाजे समाज के सभी वर्गों के लिये खोलती नहीं है बल्कि सदा के लिये बंद कर देती हैं.
    एक दूसरे किस्म की बेइमानी इन बेकार के प्रमाणपत्रों को अनिवार्य बना कर की जाती है. जिनके पास ये प्रमाणपत्र नहीं है उनके लिये नौकरी या व्यापार के दरवाजे बंद कर दिये जाते है. आपके अनुभव या लंबे समय तक एक व्यवसाय में बने रहने से प्राप्त ज्ञान को स्वीकार करने से इंकार कर दिया जाता है.
    ऐसा वातावरण बना दिया गया है जिसमें प्रमाणपत्र का महत्व असली ज्ञान से ज्यादा हो चुका है. जो पहले ठगा जा चुका है उसका भाव बढाने के लिये सभी बुद्धिमानों को बाहर का रास्ता बता दिया जाता है. यह व्यवस्था विकास की दौड, में सभी को समाहित न करते हुए समाज में एक नये विशेषाधिकारयुक्त वर्ग की रचना करती है. यह एक ऐसी सामाजिक संरचना को जन्म दे रही है जिसमें सूट बूट में घूमने वाले और केवल किताबी ज्ञान और प्रमाणपत्र धारण करने वाले बाबू परम आदरणीय बना दिये गये है और समाज का वास्तविक उत्पादक वर्ग अपराधी बन चुका है. यह व्यवस्था उत्पादक वर्ग को हर कदम पर अपमानित करने वाली है.

    दिनेश शर्मा

    ReplyDelete
  4. पुर्णतः सहमत. गुणाधारीत शिक्षणपद्धतीत नवकल्पणांना वाव तोकडा आहे तसेच व्यक्तीचा सर्वांगीण विकास होऊन तो देशाचा सुजान नागरीक होणे या प्रक्रियेत येणारी अडचणच म्हणावी लागेल. गुणांसाठीच स्पर्धा होणार असेल आणि विजेत्याचे निकष फक्त प्रमाणपत्रावरचे गुणच ठरवीत असतील तर आपण योग्यतेचे परिमाण चुकीचे ठरवत आहोत.

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...