Tuesday, February 18, 2014

परिवर्तनाचे तत्वज्ञान...आणि आपण!


परिवर्तन हा शब्द आपण नेहमीच ऐकत असतो...बोलत असतो. एका अर्थाने अतिपरिचयाचा झालेला हा शब्द आहे. आहे त्या स्थितीत बदल घडवून आनणे म्हणजे परिवर्तन असा आपण परिवर्तनाचा ढोबळमानाने अर्थ घेतो. वरकरणी तो अर्थ बरोबरही वाटेल. पण तो तेवढ्यापुरता मर्यादित नाही हे आधी लक्षात घ्यायला पाहिजे. बदल म्हणजे नेमका कशात, कसा आणि बदलाचे उद्दिष्ट काय याचे तर्कसंगत भान असेल तर परिवर्तन हा शब्द यथार्थ रित्या अभिव्यक्त होऊ शकतो. थोडक्यात परिवर्तनाचे तत्वज्ञान असावेच लागते. परिवर्तन हे केवळ प्रतिक्रियास्वरुप असेल तर ते परिवर्तन योग्य असेलच असे नाही. 

बदल हा सृष्टीचाच नियम आहे. मानवजात या पृथ्वीतलावर अवतरली तेंव्हापासून ती परिवर्तीत होत राहिलेली आहे. हे परिवर्तन बाह्य जसे होते तसे मानसिकही होते. आदिम समाजव्यवस्था, धर्म, राजव्यवस्था व अर्थव्यवस्था या परिवर्तनातूनच साकारत गेल्या. कालानुसार बदलत राहिल्या. हे बदल आजही घडत आहेत. त्यासाठी आवश्यक असणारी नवनवी साधने आजही मानवजात शोधते आहे. म्हनजेच सातत्याने परिवर्तनाची प्रक्रिया सुरु आहे. किंबहुना परिवर्तन हा आपल्या जगाचा स्थायिभाव आहे. आपली इच्छा असो अथवा नसो, आपण परिवर्तनाच्या जगड्व्याळ प्रक्रियेत अपरिहार्यपणे सामील असतो.

परंतू आपण जेंव्हा परिवर्तनाबाबत बोलतो तेंव्हा आपल्याला आहे त्या स्थितीपेक्षा अधिक वेगळी, चांगली स्थिती हवी असते. म्हणजे परिवर्तनाच्या प्रक्रियेत तटस्थ भागिदार म्हणून न राहता त्याचा प्रेरक हिस्सा होण्याची भावना असते. ती नेता म्हणून असेल वा पाठीराखा म्हणून असेल. जगभर या रीतीने राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक परिवर्तने झाली आहेत व भविष्यातही होत राहतील. 

परिवर्तनासाठी मुलभूत तत्वज्ञानाची गरज असते. तत्वज्ञानाच्या अभावात परिवर्तन होत नसते. नवीन तत्वज्ञान हे जुन्या तत्वज्ञानाला बदलवून, आधुनिक संदर्भातील आशय देऊन तरी बदलत असते अथवा जुन्या तत्वज्ञानाचा समूळ पाया उखडवून टाकत बदलत असते. उदाहरणच द्यायचे झाले तर भांडवलशाहीवादी तत्वज्ञानाला समूळ नष्ट करण्यासाठी साम्यवादी तत्वप्रणालीचा उदय घडवला गेला. अनियंत्रित राजेशाही अथवा हुकूमशाहीला संपवण्यासाठी लोकशाहीच्या तत्वज्ञानाचा उदय झाला. भविष्यात अजून वेगळी राज्यसंस्थेची प्रारुपे शोधली जातील. कारण कालसुसंगत परिवर्तन हे नेहमीच आवष्यक असते. उदा. मी आधुनिक राष्ट्रवादाकडुन सर्व राष्ट्रांचे विलिनिकरण होत एक जग:एक राष्ट्र ही संकल्पना कशी रुजेल याचे विचार मांडतो. आज हे स्वप्नवत वाटले, अशक्यप्राय वाटले तरी उद्या ते तसेच होणार नाही असे नाही. जगभर ईश्वरदत्त राजेशाहीची जागा लोकशाही घेईल असे तरी कोणाला वाटले होते?

मी हे वरील विचार अत्यंत व्यापक परिप्रेक्षात मांडले आहेत. परिवर्तनाचा नियम जसा वैश्विक आहे तसाच तो समाजघटकांतर्गतही आहे. भारतीय समाजव्यवस्थेच्या संदर्भात तर हा नियम अत्यंत जटील होऊन जातो. याचे कारण म्हनजे भारतात राजकीय लोकशाही जरी अवतरली असली तरी सामाजिक लोकशाही अद्याप अवतरलेली नाही. 

सामाजिक लोकशाही म्हणजे राजकीय व्यवस्था, सत्तेतील राजकीय पक्ष कोणीही असो, पण सर्व समाजघटकांना राजकीय, आर्थिक, सामाजिक असा समान न्याय हे ते सामाजिक लोकशाहीचे तत्व होय. भारतात सर्वाधिक असलेला धर्म म्हणजे हिंदू धर्म होय. या धर्माची गंमत अशी आहे कि हा धर्म दोन धर्मांचे कडबोळे आहे. ते दोन धर्म म्हणजे वैदिक आणि शैवप्रधान हिंदु. दोन धर्मांचे सम्मिलन समान पायावर झाले असते तर ते स्वागतार्हच होते. परंतू वास्तव हे आहे कि वैदिक धर्म उर्वरित शैवप्रधान धर्मावर वर्चस्व गाजवून आहे. वैदिक धर्माशी वाकडे असण्याचे कारण नाही, परंतु जन्मजात जातींवरून विषमता...उतरंड आणि उतरत्या क्रमाने हीनभाव हा वैदिक तत्वज्ञानाचा स्थायिभाव आहे. आणि गेल्या किमान हजार वर्षांच्या वैदिक धर्माच्या निकटच्या परिस्थितीजन्य सहवासाने समतेच्या असलेल्या शैवप्रधान हिंदुंच्या जीवनाचाही तो अपरिहार्य भाग बनला आहे. 

यामुळे एक विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. सामाजिक विषमता आहे हे एक वास्तव आहे आणि ते कोणीही नाकारू शकत नाही. आता सामाजिक विषमताच आहे म्हटल्यावर सामाजिक लोकशाही कशी अस्तित्वात येणार? आणि सामाजिक लोकशाहीच नसेल तर राजकीय लोकशाही कोठून येणार? आमची आजची लोकशाही ही सरंजामदारीच्या नांवाखाली अस्तित्वात आलेली लोकशाही आहे. येथे वैदिक धर्मानुसार जे खालचे आहेत, हीण आहेत त्यांना निर्णयप्रक्रियेत सोडा पण प्रशासनातही बरोबरीचे स्थान नाही. आरक्षणामुळे काही अल्पांश लोकांना सत्ता व प्रशासकीय निर्णयप्रक्रियेतील भागीदारी मिळाल्याचे वरकरणी चित्र दिसत असले तरी वरचष्मा मात्र वैदिकांनी मानलेल्या उच्च जातींचाच असतो हेही एक वास्तव आहे. उतरंडीतील जातींचे प्रशासकीय अधिकारी काय अथवा राजकीय नेते काय, अंतिम सामाजिक निर्णयांतही दुय्यम ठरतात हे आपण पाहतो ते यामुळेच!

यात त्यातल्या त्यात बाजी मारुन जाणारे काही उतरंडीतील समाजही आहेत. ते अत्यल्प आहेत. पण त्यांची बाजी कोठवर मारली जाते? त्यांच्या जाती/समाजातील महापुरुषांच्या स्मारकांच्या जागा, एखाददुसरे पद...एवढ्यापुरतीच. पण तेही सहजी होत नाही. झुंडशाही केली तरच तेही मिळते. अन्यथा तेही व्यवस्थेचा भाग म्हणून सहजी मिळण्याची शक्यता नाही. आणि अशा अत्यल्प समाजांनाही अशाच वरवरच्या विजयांमद्धे भावनिक आनंद असतो. यात कोणते परिवर्तन आहे?

याच देशातील असंख्य पण उतरंडीतले समाज असे आहेत कि ते झुंडशाही कधी करत नाहीत, किंबहुना तो त्यांच्या जीवनशैलीचा भागच आहे, त्यांच्याकडे कोण लक्ष देतो? ते आपल्या न्याय्य मागण्या वेळोवेळी मांडत असतात. पण त्यांच्याकडे लक्षही दिले जात नाही कारण राजकीय लोकशाहीत ते बसत नाही आणि सामाजिक लोकशाही तर आणायचीच नाही!

म्हणजे आपली लोकशाही ही अजुनही वैदिक उतरंडीच्या जीवावर जगते. सार्वभौम लोकशाहीची मुलतत्वे अद्याप ख-या अर्थाने रुजलेली नाहीत. म्हणजेच वरकरणी लोकशाहीचे परिवर्तन आले असले, त्याचा छोटा-मोठा फायदा सर्वांनाच होत असला तरी राष्ट्रीय विकासाच्या फायद्याचे समान वाटेकरी म्हणून असंख्य समाजगट नाकारले गेलेले आहेत असेच चित्र भारतीय लोकशाहीचे आहे.

येथे आपण काही समाज वानगीदाखल घेऊयात. महाराष्ट्रात धनगर समाज हा किमान १०% आहे. जातनिहाय गणना झालेली नाही म्हणून हा किमान अंदाज दिला आहे. ही संख्या जास्तीचीही असू शकेल. म्हणजे किमान एक कोटी दहा हजार एवढी धनगरांची संख्या आहे. हा समाज पुरातन काळापासून निमभटका, पशुपालनात अग्रणी असा समाज आहे. या समाजातून सातवाहन ते मध्ययुगातील मल्हारराव असे थोर राजघरानी ते योद्ध्ये होऊन गेले. स्त्री-पुरुष समता मानणारा हा समाज. इंग्रजकाळात चरावूकुरणांचे सरकारीकरण केले गेल्याने हतबल झालेला हा समाज शेती/शेतमजुरी ते सामान्य चाक-या यात अडकला. आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्याती अग्रणी नेत्यांनीही या समाजाच्या हलाखीकडॆ लक्ष दिले नाही. स्वातंत्र्य मिळून आज ६७ वर्ष उलटलीत...पण आमच्या आधुनिक राजकारण्यांनाही त्यांच्याकडे लक्ष द्यायची गरज वाटत नाही. त्यांच्या न्याय्य मागण्या मान्य न करणे, राजकीय/प्रशासकीय प्रतिनिधित्व 
न देणे आणि त्यांचे उरले सुरले उपजिविकेचे साधनही हिरावने हा उद्योग २६ जानेवारी १९५० साली अस्तित्वात आलेल्या लोकशाही सरकारने केला. असाच अन्याय ढोर-चर्मकार समाज असो कि वडार, कैकाडी असो कि रामोशी...अशा अल्पसंख्य समाजांबाबतही केला. म्हणजे पुरातन कालापासून ज्यांनी भारतीय अर्थव्यवस्था/कलाव्यवस्था सांभाळली तेच सगळ्यात जास्त दुर्लक्षणीय घटक बनले.

म्हणजे भारतात वरकरणी झालेले समानतेचे परिवर्तन हे खरे परिवर्तन मानताच येत नाही. कसे असेल हे परिवर्तन? ते नाही कारण समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत, हात देत वर घेत समान संधी देण्याचे धोरण शासनाचे जसे नाही तसेच ते एकुणातील समाजाचेही नाही. कारण जो समाज वर्चस्वतावादाचे वैदिक मुलतत्वे जपतो तो सत्ताधारी समाज, मग पक्ष कोणताही असो, डोक्यावर बसलेला आहे.

म्हणजेच परिवर्तन झालेले नाही. परिवर्तन सामाजिक / राजकीय व्यवहारातीलच नसते...केवळ स्वार्थी गरजांपोटी झालेले नसते तर 
तर परिवर्तन या मानवतेच्या समतेच्या सहृदय भावनेवर झालेले असते. समतेची, मानवतेची भावना अजून भारतात तरी जागी झालेली नसल्याने आणि अजुनही लोकशाहीप्रधान निवडणूकांतही "जात" भावनाच प्रबळ राहत असेल तर आम्ही लोकशाहीलाच नालायक आहोत असे नव्हे काय?

म्हणजे पुण्याचा खासदार मातंग...धनगर किंवा एखादा शिंपी व्हावा यासाठी तिकिट तसे का दिले जात नाही? पुण्यात त्यांचे मतदान कमी आहे! म्हणजे मतदान जात भावनेवरच होते असा विश्वास जर प्रत्येक पक्षात असेल तर परिवर्तन कसे होणार? समता कशी येणार? जातीय समीकरणे लोकशाहीला मारक आहेत...तारक नव्हेत. 

पण राजकीय पक्ष परिवर्तनाला तयार नाहीत. जनताही त्यासाठी तयार नाही. तसेही एकवेळ चालेल पण नेते तरी मग सर्वच जातीयांच्या अखिल कल्यानासाठी प्रतिबद्ध आहेत काय? 

तर तसेही नाही. जातभावना आरक्षनाने नव्हे तर जातीधारित मतदानाच्या अपेक्षांनी वाढवली आहे.

सर्व जातींना खूष करण्यासाठी जातीय महामंडले त्याचीच उपज आहे.

पण हे परिवर्तन नव्हे. हा पुरोगामीपणाही नव्हे. उलट हा सर्वच समाजांना अंतत: रसातळाला नेणारा मार्ग आहे. रहाटाची चाके उलट दिशेने फिरवण्याचा प्रकार आहे. 

याचे कारण म्हणजे हे सर्वच सामाजिक/राजकीय दृष्ट्या शोषित समाज आता थोडे का होईना डोळे उघडू लागले आहेत. त्यांना फार नसले तरी किमान आताच्या लोकशाहीतील आपले नंगेपण, वंचितपण समजू लागले आहे. किंबहुना परिवर्तनाची गरज अन्य समाजांपेक्षा या समाजांना अधिक जानवू लागली आहे. 

आणि काय आहे हे परिवर्तन?

१. सामाजिक समान दर्जा आणि आत्मभान.
२. राजकीय/प्रशासकीय निर्णयप्रक्रियेत समान वाटा.
३. समान विकासाच्या संध्या.

किमान या तीन गोष्टी साध्य झाल्या तर, अथवा त्या दिशेने वाटचाल सुरू झाली तर आम्ही ख-या परिवर्तनाच्या दिशेने निघु. या परिवर्तनात "माझ्या जातीचे हित" ही नव्हे तर स्रवच शोषितांचे हित हा मुख्य गाभा असला पाहिजे. म्हणजे धनगरांवर अन्यय होत असेल तर आगरी कोळींसकट सर्व समाज त्यांच्या मागे निस्वार्थीपणे उभ्या राहिल्या पाहिजेत आणि महादेव कोळ्यांवर अथवा कोनाही आदिवासी समाजांवर अन्याय होत असेल तर उरवरीत शोषित समाज त्यांच्या मागे उभे राहिले पाहिजेत. यालाच सामाजिक लोकशाही म्हणतात! 

आपल्याला परिवर्तन पाहिजेच आहे. हे परिवर्तन विनाशक/हिंसक पायावर टिकणार नाही तर सृजनात्मक/रचनात्मक पायावर कायमचे टिकेल. जाती सोडा अथवा धरा तो आता मुद्दा नसून सर्वांचे सकल हित हाच मुद्दा आहे. जे शोषक आहेत ते (काही अप्वाद वगळता) आपली भुमिका सोडणार नाहीत. 

आणि जेंव्हा शोषक आपली भुमिका सोडण्याच्या भुमिकेत नसतो तेंव्हा शोषितांनी सकारात्मक भुमिकेतून परिवर्तनाचे आंदोलन छेडले पाहिजे. 

तेंव्हाच ते मुलगामी, कालजेयी आणि सर्वांनाच (शोषकांनाही) हितकारी असे होऊ शकेल! 

11 comments:

  1. अप्रतिम लेख !
    अभिनंदन !

    अनुज, बारामती

    ReplyDelete
  2. परिवर्तन: (चेंज).

    पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या प्रारंभापासून विश्वाच्या दोन वैशिष्ट्यांना तात्त्विक विचारात मध्यवर्ती स्थान लाभले आहे. वस्तूंमध्ये होणारे परिवर्तन किंवा बदल आणि वस्तूंची अनेकता, अनेक भिन्न वस्तूंचे अस्तित्व ही ती वैशिष्ट्ये होत. ही वैशिष्ट्ये परस्परांशी संबंधित आहेत. थेलिझ (इ. स. पू. सहावे शतक) इ. मायलेशियन तत्त्ववेत्त्यांनी वस्तुजातामागे कोणतेतरी एक मूलतत्त्व आहे आणि त्याच्यापासून कोणत्यातरी प्रक्रियेने अनेक भिन्न वस्तू उद्भवतात, असे मानले आहे. ह्या विचारामागचे गृहितकृत्य असे, की खरेखरे अस्तित्व हे स्थिरस्वरूप आणि एक आहे; परिवर्तन व अनेकता ही अस्तित्त्वाची दुय्यम व गौण वैशिष्ट्य आहेत आणि त्यांचा उलगडा करावा लागतो.

    पार्मेनिडीझ (इ.स.पू. सहावे-पाचवे शतक)याच्या तत्त्वज्ञानात गृहीतकृत्य स्पष्ट झाले. पार्मेनिडीझच्या म्हणण्याप्रमाणे 'जे आहे, ते आहे व जे नाही, ते नाही'. परिवर्तन होणे, काही घडणे म्हणजे 'जे नाही (नव्हते) ते आहे' असे होणे आणि हा विचार आत्मव्याघाती असल्यामुळे परिवर्तन घडणे, हे तर्कतःच अशक्य आहे. पण परिवर्तन होते, घटना घडतात असा आपला अनुभव आहे.तेव्हा परिवर्तन हा आभास आहे आणि जे आहे ते, खरीखुरी वास्तवता अचल, अपरिवर्तनीय असते, हे तिचे सम्यक् स्वरूप आहे, असे पार्मेनिडीझ मानतो. ⇨ बारुक स्पिनोझा (१६३२-७७), ⇨ एफ्. एच्. ब्रॅड्ली (१८४६-१९२४) इ. केवलवादी तत्त्ववेत्त्यांनी भूमिका मूलतः अशीच आहे.

    ह्याच्या पूर्णपणे विरोधी मत ⇨ हेराक्लायटस (इ.स.पू.सु. ५३६-४७०) याने मांडल. ह्या मताप्रमाणे परिवर्तन, बदल, प्रक्रिया हेच अस्तित्वाचे अंतिम स्वरूप आहे. सामान्यपणे वस्तू बदलते, तिच्यामध्ये परिवर्तन होते असे आपण म्हणतो. असे म्हणण्यात वस्तू स्थिरपणे टिकून राहते पण तिचे स्वरूप कधी असे, कधी वेगळे असते, असे अभिप्रेत असते. पण अशा टिकून राहणाऱ्या वस्तू असतात हेच हेराक्लायटस नाकारतो. पार्मेनिडीझचा युक्तिवाद असा होता, की परिवर्तन आत्मव्याघाती आहे. कारण त्याच्यात जे आहे ते नाही व जे नाही ते आहे, असे मानावे लागते. हेराक्लायटसचे उलट म्हणणे असे, की असे आत्मव्याघाती असणे हे वास्तवतेचे स्वरूप आहे. वास्तवतेतच परस्परविरोधी तत्त्वांचा ताण असतो; परस्परविरोधी तत्त्वांची गतिशील एकता असेच वास्तवतेचे स्वरूप आहे. स्थिरस्वरूप वस्तू नसतात. त्यांच्या स्वरूपातच विरोधी तत्त्वांचा ताण असतो आणि त्यामुळे त्या सतत बदलत असतात. त्यांचे एक स्वरूप असते आणि ते कधीकधी परिवर्तन पावते असे नसते; तर एक विशिष्ट परिवर्तन हेच वस्तूचे स्वरूप असते. आधुनिक तत्त्ववेत्त्यांमध्ये ⇨ जी. डब्ल्यू. एफ्. हेगेल (१७७०-१८३१ आणि ⇨ आंरी बेर्गसाँ (१८५९-१९४१) ह्यांनी ह्या दृष्टिकोनाचे प्रतिपादन केले आहे.

    अस्तित्व हे अपरिवर्तनीय असते आणि परिवर्तन हा आभास आहे हे एक मत आणि परिवर्तन, प्रक्रिया हेच अस्तितावाचे सम्यक् स्वरूप आहे हे विरुद्ध मत, यांच्यामधील मध्यममार्गी मत असे मांडता येईल: अनेक मूलतत्त्वे असतात आणि प्रत्येक मूलत्त्व अपरिवर्तनीय असते. ही मूलतत्तवे वेगवेगळ्या प्रमाणात एकत्र येतात किंवा परस्परांपासून विभक्त होतात आणि वस्तूमध्ये दिसणारा व घडून येणारा बदल याच्यात सामावलेला असतो. उदा., अनेक परमाणू असतात, प्रत्येक परमाणू अपरिवर्तनीय असतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे परमाणू वेगवेगळ्या प्रमाणात एकत्र आल्याने किंवा विभक्त झाल्याने वस्तूमध्ये परिवर्तन घडते.

    खरेखुरे अस्तित्व अपरिवर्तनीय असले पाहिजे हा सिद्धांत आणि परिवर्तन हे अनुभवाला येणारे वस्तूंचे वैशिष्टि्य, ह्यांच्यात सुसंवाद कसा साधायचा, त्यांचा सुसंगत व्यवस्था कशी लावायची, हा तत्त्वज्ञानातील एक मध्यवर्ती आणि चिरंतन प्रश्न आहे. परिवर्तन हे कालात घडत असल्यामुळे कालाचे स्वरूप काय आहे आणि वास्तवतेमध्ये कालाचे स्थान काय आहे, हे प्रश्नही ह्या प्रश्नाशी संबंधित आहेत. ह्या प्रश्नांना तत्तववेत्त्यांनी जी उत्तरे दिली आहेत त्यांच्यावरून त्यांचे द्रव्यवादी तत्त्ववेत्ते-म्हणजे स्थिरस्वरूप द्रव्याला प्राधान्य देणारे-उदा., स्पिनोझा, ब्रॅड्ली; प्रक्रियावादी, उदा., बेर्गसा आणि मध्यममार्गी उदा., ⟶ जी. डब्ल्यू. लायप्निट्स (१६४६-१७१६), ⟶ इमॅन्युएल कांट (१७२४-१८०४), हेगेल, ⟶ ए. एन्. व्हाइटहेड (१८६१-१९४७) इ. असे वर्गीकरण करता येईल. ह्या संदर्भातील आणखी एक मुद्दा असा, की जर सर्व परिवर्तन निश्चित नियमांना अनुकरून घडते असे आपण मानले, तर एका अर्थाने परिवर्तनाला आपण गौण स्थान देत असतो. ह्यामुळे बेर्गसाँसारखे प्रक्रियावादी तत्तववेत्ते परिवर्तन हे अस्तत्वाचे मूलभूत स्वरूप आहे एवढेच म्हणत नाहीत, तर विश्वाची प्रगती सर्जनशील असते, भविष्यकाल नियमांनी जखडलेला नसतो, मुक्त असतो असे मानतात.

    ReplyDelete
  3. परिवर्तन म्हणजे केवळ बदल नाही.
    तात्पुरती वरवरची मलमपट्टी नव्हे, तर रोग मुळासकट पूर्णपणे बरा करण्यासाठी केलेली उपाय योजना होय!

    माधव घोटकर

    ReplyDelete
  4. भारतीय परिवर्तन तत्त्व:

    विश्वात काहीही शाश्वत अपिरवर्तनशील नाही. विश्वाच्या उत्पत्ती-स्थिति-लयाचे चक्र निरंतर चालू राहते, असा विचार ऋग्वेदातील नासदीय सूक्तात स्पष्टपणे प्रथम व्यक्त झाला. याच्या उलट श्वेताश्वतर उपनिषदात विश्व हे क्षर आणि अक्षर यांचा संगम होय; असा विचार मांडला आहे. क्षर म्हणजे परिवर्तनशील असे हे दृश्य विश्व; हे ज्या जड द्रव्याचे बनले आहे ते प्रकृतिरूप द्रव्य होय; हे क्षर नित्य बदलणारे आहे. अक्षर म्हणजे अमर असा परमेश्वर होय. त्यानंतर ⇨ सांख्यदर्शनात आणि भगवदगीतेत, विश्वामध्ये परिणामी नित्य आणि कूटस्थ नित्य अशी दोन तत्त्वे असून त्या दोन तत्त्वांचे मिळून विश्व बनले आहे, असा सिद्धांत मांडला आहे. परिणामी नित्य म्हणजे सतत प्रतिक्षणी परिवर्तन पावणारे, बदलणारे प्रकृतितत्तव होय आणि कूटस्थ नित्य म्हणजे जे तत्त्व विकार पावत नाही, असे शुद्ध स्वरूपात राहणारे तत्त्व होय. कूटस्थ म्हणजे निर्विकार. जीवात्मे म्हणजे पुरुष आणि परमेश्वर म्हणजे परम पुरुष ही कूटस्थ नित्य होत. जीवात्मे आणि परमेश्वर हे शाश्वत निरंतर साक्षी म्हणजे द्रष्टे आहेत आणि सतत परिणामी नित्य प्रकृताचेच दृश्य विश्व हे रूप होय.

    सांख्यदर्शनाप्रमाणे परिणामी नित्य व कूटस्थ नित्य ही दोन सत् तत्त्वे होत. सत् तत्त्व कधीही असत् होत नाही, म्हणजे त्याचा अभाव नसतोच आणि जे असत् असते, ते कधीही सत् बनत नाही. आकाश, वायू, तेज, प्रकाश, जल, पृथ्वी, अंतःकरण त्याचे कामक्रोधादी विकार, जाणीव, विचार इ. सगळे कार्यरूप अंतर्विश्व आणि बहिर्विश्व हे सारखे परिवर्तन पावत असते. यावर आक्षेप असा, की ते सत् कार्य आहे, ते उत्पन्न होऊन विनाश पावते, उत्पत्ति-स्थिति-लयाचे चक्र सारखे सुरू असते, अशा स्थितीत सत् कार्य हे असत् होत नाही व जे असत् असते ते कधीही सत् कार्य बनत नाही, हा सिद्धांत अनुभवाने बाधित होतो. या आक्षेपाला सांख्यदर्शनाचे उत्तर असे आहे, की उत्पत्तीपूर्वी घटपदादी दृश्य कार्यपदार्थ असतातच; परंतु ते कार्यपदार्थ तिरोभूत म्हणजे लपलेले असतात आणि कारणसामग्रीने ते उत्पन्न होतात, म्हणजे आविर्भूत अथवा प्रकट होतात. त्यांचा विनाश होतो म्हणजे, ते पुन्हा तिरोभूत किंवा अदृश्य होतात. तात्पर्य असे, की उत्पत्तीपूर्वी आणि विनाशानंतर कार्ये असताततच; उदा., चित्रपटामध्ये क्रमाने, ओळीने चित्रे रेखाटलेली असतात. चित्रपट गुंडाळून ठेवला तरी ती नष्ट होत नाहीत आणि चित्रपट उघडला म्हणजे ती उत्पन्न होत नाहीत; तसे हे सर्व कार्यरूप विश्व सतत कायम राहतेच; यास सांख्यदर्शनात 'सत्कार्यवाद' ही संज्ञा आहे.

    ⇨ वैशिषिक दर्शनामध्ये आरंभवाद सांगितला आहे. आरंभापूर्वी म्हणजे उत्पत्तीपूर्वी कार्ये नसतात. त्यांना असत् म्हणतात. म्हणजे कार्याचा प्रगभाव असते.कारणसामग्री जुळल्यावर ती सत् बनतात.नंतर कार्याचा नाश होतो; म्हणजे कार्याचा अभाव होतो. यास प्रंध्वसाभाव म्हणतात.

    ⇨ बौद्ध दर्शनाप्रमाणे अक्षर किंवा नित्य असे काहीच नाही; जे जे सत् आहे ते ते उत्पत्तीपूर्वी असत् असते. सगळे अस्तित्व हे परिवर्तनशील आहे. परिवर्तनरहित असे द्रव्य, असा आत्मा किंवा परमेश्वर नाही. ज्याला द्रष्टा किंवा आत्मा म्हणून म्हणतात तोही जाणीव किंवा ज्ञानरूपच आहे. ज्ञानाचा अखंड प्रवाह वाहत असतो. प्रत्येक ज्ञान किंवा जाणीव ही क्षणिक असते. म्हणून तात्पर्य असे, जे जे सत् ते क्षणिक असते. सतत परिवर्तनशीलता हाच सतचा स्वभाव आहे, असे बौद्ध दर्शन मानते.

    ReplyDelete
  5. सामाजिक परिवर्तन : ( सोशल चेंज )

    सामाजिक संरचनेत फेरबदल घडविणारी प्रक्रिया. मानवांचे रीतिरिवाज, आचार–विचार, संस्था, संघटना, जीवनपद्घती, भोवतालचा परिसर, व्यक्तिव्यक्तींमधील वर्तन यांमध्ये सतत बदल होत असतात. आदिम अवस्थेपासून ते सांप्रत काळापर्यंत मानवी समाजाच्या सर्व अवस्थांमध्ये सतत परिवर्तन झाल्याचे दिसते.

    मॅकायव्हर यांच्या मते सामाजिक संबंधांतील परिवर्तनाला सामाजिक परिवर्तन म्हणता येईल. मूलभूत अर्थाने समाजरचनेतील बदल म्हणजे सामाजिक परिवर्तन होय. अमेरिकन समाजशास्त्रज्ञ हॅरी जॉन्सन यांच्या मते हे परिवर्तन जैविक, सांस्कृतिक, आर्थिक, तांत्रिक आणि राजकीय क्षेत्रांतही घडून येते.

    समाजातील कोणताही बदल म्हणजे सामाजिक परिवर्तन नव्हे; तर सामाजिक कृतींचे व आंतरक्रियांचे आकृतिबंध, मूल्ये, सांस्कृतिक फलिते आणि प्रतीके या आविष्कारांसह होणाऱ्या बदलांना सामाजिक परिवर्तन असे म्हणतात. समाजाच्या, विविध भागांच्या परस्परसंबंधांच्या स्वरुपात बदल झाला की, समाजरचनेत परिवर्तन घडून येते. पर्यायाने सामाजिक परिवर्तन घडून येते.

    संकलित (क्यूम्युलेटिव्ह) सामाजिक बदलांमुळे मानवी सामाजिक इतिहासाची घडण झाली आहे. जनसांख्यिकीय संक्रमण किंवा एखाद्या नवराज्याची निर्मिती यांसारखे महत्त्वाचे बदल, ही पायाभूत परिवर्तने होत. अन्य इतर तुलनात्मक बदल सामान्य होत. संकलित सामाजिक परिवर्तनवादी समाजशास्त्रज्ञ असा प्रश्न उपस्थित करतात की, व्युत्कांतिनिष्ठ स्पष्टीकरण सर्व महत्त्वाच्या संक्र मणांना देता येणार नाही. संकलित सामाजिक परिवर्तने सर्व सामाजिक जीवनातील वैश्विक, प्रक्रियात्मक गुणविशेषांहून वेगळी करावी लागतील. समाजशास्त्रज्ञ प्रामुख्याने प्रक्रियात्मक सामाजिक वर्तनाचा अभ्यास करतात. उदा., सर्व प्रकारचे आकृतिबंध सापेक्षतः स्थिर असूनही सामाजिक जीवनातील विशिष्ट अभिलक्षणे कशी बदलू शकतात, या गतिशील प्रक्रियांवर ते लक्ष केंद्रित करतात. सामाजिक विषमता आणि अस्पृश्यता यांच्या निर्मूलनासाठी समाजातील व्यक्तींनी त्यांचे कौटुंबिक, सांस्कृतिक आणि दैनंदिन व्यवहार बदलले. नव्या मूल्यांचे शिक्षण देण्यास सुरू वात केली. कल्याणकारी योजनांतूनही तळागाळातील माणसांच्या उदयाचे लक्ष्य महत्त्वाचे मानले. जो कसेल त्याची जमीन झाली आणि औद्योगिक धोरण ठरविताना कामगार संघटनांना सहभागी करून घेण्यात आले. तसेच राज्यसंस्थेत एकाधिकारशाहीऐवजी लोकशाही प्रस्थापित झाली. भांडवलशाही अर्थव्यवस्थेला समाजवादी लोकशाही वा साम्यवादी अर्थव्यवस्था हे पर्याय पुढे आले. परंपरागत अवजारांऐवजी यंत्रांचा वापर होऊ लागला. सतीची प्रथा, बहुपत्नीत्व रद्द होऊन एकऐपत्नीत्वाचा कायदा झाला. हे सर्व बदल समाजव्यवस्थेत दीर्घकालीन परिवर्तन घडवून आणण्यास प्रेरक ठरले. सामाजिक परिवर्तन हे पुरोगामी किंवा प्रतिगामी, वर्धमान किंवा ऱ्हासमान, स्थायी किंवा अस्थायी, कायमचे किंवा हंगामी, योजनापूर्वक किंवा योजनाविरहित, एकदिशावर्ती किंवा बहुदिशावर्ती, उपकारक किंवा अपकारक, हितकारक किंवा हानीकारक अशा कोणत्याही प्रकारचे असू शकते.

    ReplyDelete
  6. सांस्कृतिक मानवशास्त्रज्ञांचे दोन गट आहेत. एका गटाच्या मते सामाजिक परिवर्तनाचा उगम प्रसारात आहे, तर दुसऱ्या गटाच्या मते सामाजिक परिवर्तनाचा उगम शोधात किंवा आविष्कारात सापडतो. सामाजिक परिवर्तनाचा उगम प्रसारात आहे असे म्हणणाऱ्यांच्या मते फॅशन्स, कला, क्रीडा, साहित्य, विज्ञान, दळणवळणाची साधने, औषधे यांतील शोध, बदल प्रसारमाध्यमांद्वारे जगभर प्राप्त होतात. हे बदल प्राचीन काळापासून समाजातील लोकांनी इतर समाजातील लोकांपासून स्वीकारलेले असतात. या परिवर्तनामुळेच कित्येक आदिवासींनी आपली विशेष प्रगती करून घेतली आहे. उदा., न्यूझीलंड देशातील माओरी जमातीच्या लोकांनी या मार्गाचा अवलंब करून एका दशकात सुसंस्कृत लोकांमध्ये स्थान मिळविले आहे. प्राचीन गीक संस्कृतीचा पगडा सर्व जगभर पडला आहे. सामाजिक परिवर्तनाचा उगम शोधात किंवा आविष्कारात आहे, असे म्हणणाऱ्यांच्या मते सांस्कृतिक प्रगती ही अन्य लोकांचे अनुकरण करून घडली, हे संभवनीय नाही. विविध समाजांत दृग्गोचर होणारे सांस्कृतिक गुणविशेष त्या त्या समाजातील लोकांनी स्वतंत्रपणे लावलेल्या शोधांतून निर्माण झालेले असतात.

    प्रत्येक तंत्र वा कल्पना अगर आचार एका समाजातून दुसऱ्या समाजाकडे जाताना त्याच स्थितीत राहत नाही. इतर समाजांकडून घेतलेल्या गोष्टींचा आपल्या समाजाच्या विशिष्ट वातावरणात योग्य उपयोग करता यावा, म्हणून त्या गोष्टींत बदल केले जातात. म्हणजे प्रसार आणि शोध या दोन्ही गोष्टी एकमेकांत अगदी बेमालूमपणे मिसळलेल्या आढळतात. म्हणून सामाजिक परिवर्तनाचा उगम प्रसार व शोध या दोन्ही गोष्टींत आहे.

    यांत्रिक आणि तांत्रिक क्षेत्रांतील नव्या शोधांमुळे उत्पादनवाढीला आणि बाजारपेठांमधील खरेदी–विकी व्यवहारांना वेग येऊन देशाची आर्थिक स्थिती सुधारते; परंतु असे सर्वत्र घडत नाही; कारण काही देश आर्थिक मागासलेपणामुळे नव्या तांत्रिक–यांत्रिक गोष्टींचा स्वीकार करू शकत नाहीत. येथे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, नव्याला विरोध करण्याची वृत्ती अशा गोष्टींचा प्रभाव असतो. त्यामुळे सामाजिक परिवर्तन कोणत्याही समाजात सारख्याच गतीने होते, असे आढळत नाही.

    बदलणाऱ्या परिस्थितीला अनुसरून मनुष्य आपल्या सामाजिक संबंधांत जाणीवपूर्वक बदल करत असल्याने सामाजिक परिवर्तन घडते. मानवाची जगण्यासाठी जी सतत धडपड चालू असते, त्यासाठी तो प्रयत्नपूर्वक पर्यावरणाशी जुळवून घेऊन फेरबदल करत असतो. या पर्यावरणाशी येणाऱ्या संबंधांतच परिवर्तनाची बीजे आढळतात. यंत्रांचा उपयोग सुरू झाल्यावर शेकडो माणसे एकत्र येऊन कारखान्यात काम करू लागली. अठराव्या–एकोणिसाव्या शतकांतील ग्रेट ब्रिटनमधील औद्योगिक कांतीने उत्पादनात आमूलाग बदल घडला. तिचा जागतिक उत्पादननिर्मितीवर परिणाम झाला. त्याचे वैकासिक स्वरू प सर्वत्र आढळते. औद्योगिक कांतीने आधुनिक सामाजिक बदलात मूलभूत परिवर्तन घडविले. म्हणजेच पर्यावरणाशी येणाऱ्या संबंधातील बदलांमुळे सामाजिक परिवर्तन घडून येते.

    ReplyDelete
  7. समाजाच्या सांस्कृतिक व्यवस्थेत सारखा बदल होत असल्याने सामाजिक परिवर्तन चालू राहते. एका पिढीतील मूल्ये पुढच्या पिढीतील लोकांना मान्य होत नाहीत. मातापित्यांना ज्या गोष्टी आवडतात, त्या मुलांना आवडतीलच असे नाही. कुटुंबपद्घती, विविध सण–उत्सव साजरे करण्याच्या पद्घती यांत बदल होतात. मानवाच्या प्राथमिक अवस्थेत नर–मादी एवढेच संबंध होते. त्यातून स्वैराचार घडत असे. त्यानंतर विवाहसंस्था आली. कुटुंबात संस्कृतीची निर्मिती झाली. ज्वालामुखीचा उद्रेक, रोगराई, प्रचंड पूर अगर वादळ, उष्णतामान, पर्जन्यमान, हिमयुगाची सुरू वात किंवा अस्त, नदीप्रवाह बदलणे या नैसर्गिक घडामोडींमुळेही सामाजिक परिवर्तन होते. या आकस्मिक बदलांना अनुरूप असे बदल मानवाला आपल्या सामाजिक जीवनात करावे लागतात. जैविक परिस्थितीतील आनुवंशिकतेच्या व संकराच्या तत्त्वांमुळे सामाजिक परिवर्तन होते. जननप्रमाण आणि मृत्यूप्रमाण या दोन्ही गोष्टींवर नियंत्रण ठेवता आल्याने समाजाच्या लोकसंख्येच्या रचनेत बदल होत जातो आणि याचा प्रभाव सामाजिक परिवर्तनावर पडतो.
    मानव स्वतःच्या गरजा भागविण्याचा प्रयत्न करत असताना नवीन तंत्राचा उपयोग करतो. बाष्पयंत्राच्या शोधामुळे प्रचंड सामाजिक परिवर्तन झाले. समाजाच्या अर्थव्यवस्थेत मूलभूत बदल झाले.

    सामाजिक परिवर्तनाला साहाय्यभूत गोष्टी जशा समाजात असतात, तशा सामाजिक परिवर्तनाला काही मारक गोष्टीही असतात. परंपरावादी, सनातनी धर्माचे अनुयायी, अशिक्षित समाज नव्या संशोधनाला विरोध करताना आढळतो. त्यामुळे नवनवीन उपकम करणे शक्य होत नाही व प्रगती थांबते आणि परिवर्तन घडून येत नाही. जेव्हा परिवर्तनानुकूल शक्ती समाजात जास्त प्रभावी ठरतात, तेव्हा परिवर्तनाला गती मिळते. भारतात राज्यशासन, व्यापार, शिक्षण, दळणवळण या गोष्टींत स्वातंत्र्योत्तर काळात झालेली प्रगती ही भारतीय सामाजिक परिवर्तनाची गती आहे. परिवर्तनाचा वेग असमान असतो. कधी सामाजिक हस्तक्षेपामुळे व कधी राजकीय उदासिनतेमुळे गती कमी पडलेली दिसते.

    समाजाचे उद्दिष्ट लक्षात घेऊन परिवर्तनाची दिशा ठरविली जाते. उदा., आधुनिक समाजात उत्पादनवृद्घी हे एक उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करून घेण्याच्या हेतूने तंत्रविद्येचा उपयोग केला जातो, तेव्हा उत्पादनवृद्घीच्या दिशेने परिवर्तन होते. जर उत्पादनात वृद्घी न होता घट होऊ लागली, तर परिवर्तन चालू असते; पण ते परिवर्तन उलट दिशेने होत आहे असे म्हटले जाते.

    ReplyDelete
  8. सामाजिक परिवर्तनाच्या स्वरुपासंबंधी दोन सिद्घांत सांगितलेले आहेत. एक, सामाजिक परिवर्तन चकाकार स्वरुपाचे असते आणि दुसरे, रेषाकार स्वरुपाचे असते. कोणत्याही घटनांची जेव्हा अगदी पूर्वीची पुनःपुन्हा आवृत्ती होते, तेव्हा चकाकार स्वरुपाचे परिवर्तन घडते. उदा., ऋतुचक, कुंभमेळ्यासारखे उत्सव, उद्‌गम, विकास, ऱ्हास व नाश हा चकाकार कम सामाजिक घटनांतदेखील दिसून येतो. जेव्हा कोणत्याही घटनांचे एखाद्या विशिष्ट दिशेनेच निरंतर परिवर्तन होत असते, त्या कमामध्ये कधीही फरक पडत नाही आणि घटना केव्हाही त्याच स्वरू पात आवृत्त होत नाहीत, तेव्हा रेषाकार किंवा रेखात्मक परिवर्तन असते. प्रगतीच्या दिशेने सरळ रेषेत चालू असणारे ते एकरेषात्मक परिवर्तन होय. ते कधी थांबत नाही वा बंद पडत नाही. आजही सुधारित रबरी चाकांची बैलगाडी चालू आहे.

    ऊर्ध्वगामी आणि अधोगामी चढउतार परिवर्तनात असतात. व्यापारातील तेजी–मंदी, चलनी नाण्याच्या मूल्यामधील वाढ–घट हे ऊर्ध्वगामी किंवा अधोगामी पद्घतीने होतात. कित्येकदा परिवर्तन तरंगांच्या स्वरुपाचे असते. लोकांच्या आवडी–निवडी, फॅशन्स, क्रिकेटच्या खेळाडूंबद्दलचे प्रेम कमी–अधिक होते, नटनट्यांबद्दलची मते बदलतात. प्रसारमाध्यमे, जाहिरातींमुळे माणसे भारावून जातात आणि परिवर्तनास अनुकूल होतात. काही वेळा चुकीचे आणि भयानक परिणाम करणाऱ्या बाबीही स्वीकारल्या जातात.

    परिवर्तन हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे. मानव रानटी–पाषाणयुगीन अवस्थेतून विद्यमान प्रगत संस्कृतीपर्यंत वाटचाल करीत आला. निरनिराळ्या टप्प्याने विकासित होणे, हा मानवी समाजाचा एक गुणधर्मच आहे. हा विकास उत्कांतिवादाने आणि कार्यात्मक उपपत्तीतून होत असतो. तसेच मार्क्सवादी, गांधीवादी, जे. पी. वादी, आंबेडकरवादी, लोकशाही समाजवादी आणि इतर अनेक प्रेरणा घेऊन काम करणाऱ्या संघटनांमुळे समाजपरिवर्तन होत असते.

    ReplyDelete
  9. परिवर्तन का मतलब सिर्फ नई चीजों का आना नहीं है। यह भी संभव है कि कोई पुरानी चीज फिर से स्थापित हो। हम जिन मूल्यों को पुराना समझ बैठते हैं, वे बार-बार आते रहते हैं। कई बार उन्हें लाने के लिए संघर्ष करना पड़ता है। लेकिन उस संघर्ष के बारे में यह नहीं कहा जा सकता कि वह पीछे जाने के लिए है।

    दरअसल पुरानी चीजों को लाने का अभियान भी नए तरीके से चलाया जाता है। इस तरह नया और पुराना एक-दूसरे में घुलता- मिलता रहता है। हम आज के रास्ते से बीते कल की तरफ बढ़ते हैं। यह बात केवल वैचारिक संदर्भ में ही लागू नहीं होती है बल्कि रोजमर्रा के जीवन से भी इसका गहरा संबंध है।

    जैसे-पोशाक और खानपान में भी यही प्रवृत्ति दिखती है। सचाई यह है कि सभ्यता की यात्रा कुछ-कुछ वृत्ताकार होती है। हम एक सीधी रेखा में न चलकर दरअसल एक विशाल चक्र के इर्द-गिर्द घूम रहे होते हैं।

    संजय कुंदन

    ReplyDelete
  10. सिर्फ सत्ता बदलने से परिवर्तन नहीं होता !
    लीबिया में गद्दाफी के हुकुमतंत्र को बदलकर लोकतंत्र लाने के लिए आन्दोलन खड़ा किया गया ! और गद्दाफी को फांसी पर लटकाकर लोकतंत्र की नीव रखी गई !

    आज भारत में अरविंद केजरीवाल का हुकुमतंत्र देश के लोकतंत्र के खिलाफ आग उगल रहा है ! सड़क छाप आन्दोलन हो या खुद को Anarchist कहने की बात हो यही जाहिर होता है की लोकतंत्र के खिलाफ आने वाले दिनों में जो आन्दोलन खड़ा होगा उसकी नीव अरविन्द केजरीवाल के माध्यम से रखी जा रही है ! देश की जनता को मुर्ख बनाकर कुछ पार्टिया लोकतंत्र का आधार लिए केजरीवाल पर टिपण्णी जरूर कर रहे है ! लेकिन अन्दर से केजरीवाल को मदत भी कर रही है ! क्योंकि इस देश से लोकतंत्र को ख़त्म करना जिनका उद्देश है उनके लिए केजरीवाल एक नए परिवेश में जमीन तैयार करने का काम कर रहे है !
    सोच में फर्क हो सकता है लेकिन वास्तविकता में नहीं !

    जब दिल और दिमाग काम करना बंद कर दे तो इन्सान दूसरो की बुरोइयो में लुप्त होकर बुनियादी तत्व को अक्सर भूल जाते है !और अविचारी निति सामने आने लगती है ! जो आजकल केजरीवाल के साथ हो रही है ! और उनके समर्थक भी उसी दिशा में अग्रेसर हो रहे है ! केजरीवाल बुनियादी बातो को दोहरा तो रहे है लेकिन उन बुनियादी बदलाव को आम जनता से दूर ही रख रहे है ! 2+2=4 बोलो या 1+3=4 बोलो ! बात तो एक ही है ! और हल भी एक ! बदलाव उसे कहते है जिसमे 4+4=8 किया जाये !

    सत्ता परिवर्तन होता है ! लोग सिर्फ सत्ता परिवर्तन ही चाहते है ! केजरीवाल आने से सत्ता परिवर्तन हुआ ! व्यवस्था परिवर्तन नहीं ! और लोगो के जीवनकाल में कोई परिवर्तन नहीं ! यही सोच आज देश के सामने गंभीर समस्या बन कर उभर रही है ! सिर्फ सत्ता परिवर्तन होने से बदलाव नहीं होता ! संवैधानिक संस्कृति की नीव में पलने वाली विचारधारा के संचलन में जबतक उस संकृति और विचारधारा से ताल्लुक रखनेवाले नहीं होंगे ! तबतक देश किसी भी बदलाव या परिवर्तन की दिशा में अग्रसर नहीं होगा !

    सिर्फ सत्ता बदलने से परिवर्तन नहीं होता ! असल में परिवर्तन के लिए सत्ता में बैठे लोगो की विचारधारा बदलनी चाहिए ! वरना हम जहा थे वही पर रुक जायेंगे ! गुलाम को तो खैर गुलामी की आदत पड़ चुकी होती है ! इसलिए उनके लिए कोई नयी मुसीबत नहीं होगी ! हाँ ! लेकिन जिन लोगो को लग रहा है की वो सुरक्षित रहेंगे उनको आने वाली गुलामी से डरने की ज्यादा जरुरत है !

    "लंगूर के हाथ में अंगूर" कुछ ऐसी ही परिस्थितिया आज कल दिल्ली में चल रही है ! दिल्ली वाले आज खुद को कोस रहे होंगे की हमने किस बला को दिल्ली में राज करने का मौका दिया है ! जिनकी खुद की संस्कृति विनाशकारी होती है वो राजनितिक संस्कृतिको भी विनाशकारी बना देते है !@ जिसका खूब नमूना "आप" के माध्यम से केजरीवाल दिल्ली और देश के सामने ला रहे है ! लोकतंत्र की राजनितिक संस्कृति जिन्हें मान्य नहीं, जिन्होंने आज तक लोकतंत्र को ही माना नहीं वो "आप" और "कजरी" भक्त इस बात को नहीं समझ सकते. लेकिन देश देख भी रहा है और समझ भी रहा है ! "आप" का "बाप" जनता इतनी बुद्धू है यह समझने की गलती न करे !


    डॉ. संदीप नंदेश्वर, नागपुर.

    ReplyDelete
  11. खूप चांगला विषय आणि लिहिले आहे ,

    ReplyDelete

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...