"किस ओफ लव" हे कथित संस्कृती रक्षकांच्या दंडेलशाहीविरुद्धचे अभिनव आंदोलन प्रथम केरळात सुरु झाले. पाहता पाहता ते दिल्ली ते मुंबई येथेही पसरले. संस्कृतीरक्षकांनी दंडेलशाही, विकृत धमक्या अशा सर्व अस्त्रांचा वापर केला असला तरी तरुणाई मात्र मागे हटली नाही. भारतात सांस्कृतीक दंडेलशाही ही आजची नाही. रा. स्व. संघ व त्या परिवारातील बजरंग दलापासून ते विश्व हिंदू परिषदेने अनेकदा दडपशअही ते हिंसक घटनांतून सांस्कृतिक वर्चस्ववाद समाजावर लादायचे अनेक प्रयत्न केले आहेत. २००६ मद्ध्ये एम. एफ. हुसेनसारख्या जागतिक दर्जाच्या चित्रकारावर भारतमातेचे विवस्त्र चित्र काढल्याने "धार्मिक भावना" दुखावल्याचे गुन्हेही दाखल केले गेले. त्यांची कथित वादग्रस्त (?) चित्रे लिलाव व त्यंच्या वेबसाईट वरुन काढून टाकायला सांगत शेवटी माफीही मागावी लागली. या कलावंताचा मृत्युही विजनवासात झाला. विश्व हिंदु परिषद आणि हिंदू जागृती समिती यामागे होती.
या संघटनांनी वेळोवेळी जे उपद्व्याप केलेले आहेत ते पाहता सामाजिक कलात्मक अथवा अभिव्यक्तीच्या भानावर गदा आणण्याचे यांचे प्रयत्न नवीन नाहीत. मुलींनी बारमद्ध्ये जावू नये, विशिष्ट प्रकारचे (अंगप्रदर्शन न करणारेच) कपडे घालावेत, सातच्या आत घरात इत्यादि सांस्कृतीक फतवेही काढले गेले. बलात्काराचे मुळ मुलींच्या वेषातच आहे असेही जावईशोध लावले गेले. अनेक (पुस्तके/संशोधनांसहित) कलाकृतींवरही घोषित-अघोषित बंद्या घातल्या गेल्या. अलीकडचेच ज्वलंत उदाहरण म्हणजे वेंडी डोनिगर यांच्या "द हिंदू : अल्टरनेट स्टोरी" या पुस्तकाविरुद्ध प्रचंड गदारोळ उडवत ते पुस्तक मागे घ्यायला लावले गेले. यामागे संघाशीस संबंधीत "शिक्षा बचाओ आंदोलन" समिती होती. डा. रामानुजन यांच्या "थ्री हंड्रेड रामायनाज" या प्रबंधावरही हिंदुत्ववाद्यांनी गदारोळ करत दिल्ली विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून या प्रबंधाला काढून टाकायला भाग पाडले गेले. अशी उदाहरणे अनेक आहेत.
म्हणजे लिखित वा कलात्मक अभिव्यकी ते व्यक्तीचे घटनेने दिलेले आचारस्वातंत्र्य यावर दंडेलशाही करत गदा आणण्याचे प्रयत्न नवे नाहीत. त्यासाठी धर्माचा आधार घेतला जातो. भाजपाचे शासन आल्यापासून या प्रकारांत तर चिंता करावी एवढी वाढ होत आहे. धर्माचे नांव घेत दंडेलशाही होते पण धर्मात असे खरेच आहे काय यावरही आपण नंतर चर्चा करुयात, आधी या "किस ओफ लव" या अनोख्या आंदोलनाचा उदय आणि प्रसार कसा झाला हे पाहुयात!
केरळमद्ध्ये सुरुवात!
केरळमद्ध्येही सांस्कृतिक दंडेलशाही नवीन नाही. २०११ मद्ध्ये विवाहित स्त्रीशी प्रेमसंबंध ठेवले म्हणून एका तरुणाची धर्मवाद्यांनी हत्या केली. जून १४ मद्ध्ये एका रंगमंच अभिनेत्रीने सहकलाकाराबरोबर रात्री प्रवास केला म्हनून पोलिस स्टेशनवरच अडकवून ठेवले. जुलै २०१३ मद्ध्ये अलापुझा बीचवर "अनैतिक कृत्य" करत आहे या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली. त्यात भर पडली ती जय हिंद या मल्याळी वाहिनेने कोझीकोडॆ येथील एका क्यफेच्या पार्किंगमद्ध्ये एक तरुण जोडपे प्रेमाराधना करत असल्याचा व्हिडियो प्रसारित केल्याने. भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी यावर संतप्त होऊन त्या क्यफेवरच हल्ला केला. मोडतोड व मारहानी केल्या.
सांस्कृतिक दंडेलशाहीचा हा नमुना पाहून केरळभरचे तरुण संतप्त झाले. हजारो तरुणांनी २ नोव्हेंबर रोजी कोची येथील मरिन ड्राईव्हवर "किस ओफ लव" आंदोलन छेडन्याची घोषणा केली. त्याप्रमाणे तरुण जमा झाले. आधी शांततामय मोर्चा काढला...पण पोलिसांनी तरीही पन्नास कार्यकर्त्यांची प्रतिबंधात्मक अटक केली. हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्तेही जमा झाले. त्यांनी अक्षरश शारीरीक बळ वापरत चुंबन घेऊ पाहणा-यांना अडवायला सुरुवात केली. पोलिसांनी या संघटनांच्या कार्यकर्त्यांना अडवायचा कसलाही प्रयत्न केला नाही. उलट आंदोलकांनाच आत घातले गेले.
यामुळे तरुणांत अस्वस्थता पसरणे स्वाभाविक होते. आम्हाला आमच्या प्रेम करण्याच्या, प्रणयाराधना करण्याच्या हक्कापासून कोणीही रोखू शकत नाही हाच संदेश या "प्रेम-चुंबन" आंदोलनातून द्यायचा होता. सोशल नेटवर्कींग साईट्सवरुन या आंदोलनाने प्रचंड लोकप्रियता गाठली. या आंदोलनापासून स्फुर्ती घेत त्याचे लोन दिल्ली व मुंबईतही पसरले.
दिल्ली एपिसोड
दिल्लीमध्ये जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील पखुरी झहीर आणि अबार सुमित्रन या तरुणांनीही हे आंदोलन दिल्लीत करायचे ठरवले. फेसबुकवर आंदोलनाची तारीखही घोषित केली गेली. तरुणांनी लाखोंच्या संख्येत या घोषणेला प्रतिसाद दिला. दिल्ली विद्यापीठाचे विद्यार्थीही पुढे सरसावले. संघ परिवाराला हे सहन होणे शक्य नव्हते. आंदोलकांन अक्षरश: असांस्कृतिक अश्लील धमक्या जावू लागल्या. "चुम्माच कशाला, संभोगही द्या कि!" अशा अश्लील मागण्या आंदोलकांकडे वेबवरुन होऊ लागल्या.झहीर डीएनएला दिलेल्या मुलाखतीत म्हणतो...याच प्रवृत्तींना धडा शिकवण्यासाठी आम्ही आंदोलन करत होतो...अशा हल्ल्यांनी, फोनवरुन दिलेल्या धमक्यांनी उलट आमचा निर्धार प्रबळ झाला." त्यातच कलकत्ता येथे एका तरुणीला केवळ मिनिस्कर्ट घातला म्हनून थिऎटरमद्ध्ये प्रवेश नाकारला गेला. याची प्रतिक्रिया कलकत्त्यातही उमटली. आंदोलकांचा निर्धार अधिकच प्रबळ झाला.
विरोधकांचे म्हणणे होते कि किस ओफ लव तोही रस्त्यावर हे आमच्या हिंदू परंपरांच्या विरोधात आहे. त्यामुळे आम्ही या प्रकाराचा कठोर निषेध करनारच! पण तरुणांनी या निषेधाला न जुमानत, शिव्या-धमक्यांना न घाबरता ८ नोव्हेंबर रोजी रा. स्व. संघाच्याच कार्यालयासमोर हे आंदोलन छेडायचे ठरवले. सोशल मिडियावरुन संघपरिवाराच्या धमक्यांत वाढ होऊ लागली.
आंदोलनाच्या दिवशी हिंदू सेनेच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी केली. पहिले चुंबन घेतले गेले तेंव्हा हाणा-मारीचाही प्रयत्न झाला. तरीही तरुण घाबरले नाहीत. पोलिसांनी यावेळीस अपेक्षित अशी पक्षपाती भुमिका घेतली. आंदोलकांना डी. बी. रोडवरून रा.स्व. संघाच्या कार्यालयाकडे जाण्यापासून त्यांनी आंदोलकांना अडवले. असे असले तरी आंदोलकांनी आपला निषेध नोंदवण्यात यश मिळवले हे येथे उल्लेखनीय आहे.
विरोध समजावून घ्या!
"किस ओफ लव" हे आंदोलन म्हणजे कोठेही सार्वजनिक ठिकाणी चुंबने घेत फिरण्याला समर्थन देण्यासाठी तरुणांनी हे आंदोलन केले असे संघवाद्यांचे म्हणणे आहे. ते पुढे जावून म्हणतात कि पुढे हे सार्वजनिक ठिकाणी संभोगही करण्याचे आंदोलन चालवतील.याही पुढे जावून ते म्हणतात, तुमची मुलगी, बहीण सार्वजनिक ठिकाणी असे "चाळे करेल" तर चालेल काय? मला वाटते संघवादी मुर्ख आहेत. त्यांना या आंदोलनाचा मतितार्थ मुळीच समजलेला नाही. चुंबनाचे आंदोलन म्हणजे या तरुण आंदोलकांनाही सार्वजनिक ठिकाणी चुंबने घेत हिंडायची हौस आहे असे पसरवण्याचा प्रयत्न म्हणजे संघाच्या कुजबुज मोहिमेचा एक भाग आहे. त्यांचा तर्क हा तर्कहीण आहे. गांधीजींनी पदयात्रा काढत मीठ उचललले म्हणजे त्यांना मीठ चोरायची हौस होती असे नव्हे. संघवादी स्थापनेपासून हिंदुत्ववादाची ढाल पुढे करत ज्या पद्धतीने व्यक्तीगत आचरण आणि अभिव्यक्ती याबाबत जे स्तोम माजवत बंधनांची रेलचेल उभी करत आहे त्याचा असाच निषेध तरुणाई करु शकत होती. तरुणांनी हिंसकता दाखवली नाही. "प्रेमाचे चुंबन"...कोणाचेही जबरी चुंबन आंदोलकांना अभिप्रेतही नव्हते व नाही. तो आपला निषेध नोंदवायचा भाग म्हनुन तरुणांनी अंमलात आणला.
बरे, कायदा याबाबत काय म्हणतो? भारतीय दंड विधानाच्या कलम २९४ (अ) नुसार सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करणे हा दंडार्ह गुन्हा आहे व हा गुन्हा शाबित झाल्यास तीन महिन्यापर्यंतच्या कारावासाची शिक्षाही आहे. परंतू सर्वोच्च न्यायालयाने चुंबन अथवा मिठी मारणे याला अश्लील म्हणता येणार नाही असा निवाडा रिचर्ड गेरे आणि शिल्पा शेट्टीच्या जाहीर चुंबनाबाबत दाखल केल्या गेलेल्या खटल्याच्या संदर्भात दिला आहे. (मार्च २००८). आलिंगन-चुंबन ही प्रेमाची स्वाभाविक अभिव्यक्ती आहे, त्याला अश्लील मानता येत नाही असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
बरे, संघवाद्यांचा चुंबनाला विरोधच मुळात तत्वहीन आहे...दांभिक आहे. खुद्द वसुंधराराजे यांने किरण शा-मुजुमदार या उद्योजिकेचे जाहीर कार्यक्रमात चुंबन घेतले होते. भाजपावाल्यांच्या अशा चुंबनांची रेलचेल आहे. एका स्त्रीने दुस-या स्त्रीचे चुंबन घेणे हे तर संघवाद्यांच्या दृष्टीने महाभयंकर पाप....पण ते चालते. हा संघवाल्यांचा निखळ दांभिकपणा आहे.
धर्म काय होता?
वैदिक धर्मात यज्ञाभोवती सामुहिक संभोग कार्यक्रम चालत. किंबहुना यज्ञसंस्थेची निर्मितीच या लैंगिककतेतून झाली असे वि. का. राजवाडे यांनी "विवाहसंस्थेचा इतिहास" यात नोंदवून ठेवले आहे. कामातूर (कोणत्याही) स्त्रीला संभोग देणे हाच धर्म होय असे वैदिक साहित्य उच्च रवाने सांगते. एवढेच नव्हे तर स्वत:ची पत्नी अतिथीला उपभोगू देण्याचीही प्रथा एके काळी होती. यजुर्वेदातील अश्वमेध प्रकरणात अश्व व राजस्त्रीच्या संभोगाची जी अश्लील वर्णने आहेत ती आजच्या बीस्टयलिटी पोर्नमद्ध्येही सापडणार नाहीत. (यजुर्वेदातील हा भाग त्याच्या इंग्रज अनुवादकाने अनुवादितच केला नाही...त्यालाही तो अश्लील वाटला होता हे येथे लक्षात घेतले पाहिजे.) "कुट्टनीमत" हा ग्रंथ तर तरुण मुलींना आदर्श वेश्या कसे बनवावे याचे प्रशिक्षण देण्यासाठीच लिहिला गेला आहे. संघवाद्यांना ही संस्कृती जपा असे कोणी सांगितले तर ते केवढे भडकतील बरे? संस्कृती म्हणजे कोणाची, कधीची याचे भान संघाला नाही. मग त्यांची सांस्कृतिकता तकलादू असणार हे उघड आहे.
खरे तर "कामसूत्र" हे जगातील या विषयाला पहिले पुस्तक. त्याची निर्मिती शिवाने दिलेल्या ज्ञानातून झाली असे वात्स्यायन ग्रंथाच्या सुरुवातीलाच सांगतो. कालिदास "कुमारसंभव" मद्ध्ये शिव-पार्वतीच्या प्रणयाची-शृंगाराची जी वर्णने करतो ती तर संघाच्या सांस्कृतिक व्याख्येनुसार अश्लील म्हणता येतील अशीच आहेत. त्याच्यावरही बंदी घालायची मागणी त्यांनी कशी केली नाही याचे मला आजही नवल वाटते.
हालाची गाथासप्तशती तर मोकळ्या-ढाकळ्या समाजव्यवस्थेचे प्रतिबिंब. त्यात पती, दिर ते बाह्य प्रेमिक यांच्या मोकळ्या ढाकळ्या शृंगाराची वर्णने काव्यात्मकतेने पुढे येतात. याचा अर्थ तत्कालीन समाजाला ते कधीही अश्लील वा अनैतिक वाटलेले नाहीत. एके काळी भारतात बहुजन वसंतोत्सव साजरा करत. तरुण-तरुणींनी काव्य-संगित मैफिली भरवाव्यात, उद्यानांत फिरावे, मनसोक्त श्रुंगार करावा...जोडीदार मिळवावा हा हेतू त्यामागे होता. तो वैदिकांनी आपल्या नैतिकतेच्या भाकड संकल्पनांपायी बंद पाडायला लावला.
म्हणजे लक्षात घ्या कि खुद्द वैदिक संस्कृतीच एवढी अश्लीलतेने भरली असतांना तेच सम्स्कृतीच्याच नांवाखाली साधे प्रेम-चुंबन-कपडे यावर बोट ठेवत दादागिरी करत असेल तर ते कसे चालणार आणि कोण सहन करणार? संस्कृती ही स्थिर नसते. त्री प्रवाही असते. अमुकच संस्कृती श्रेष्ठ हे ठरवायचे कसलेही मापदंड नाहीत. बलात्कार कपड्यांमुळे होत नसतात. त्यामागे हजारो सामाजिक/आर्थिक आणि मानसशास्त्रीय कारणे असतात. प्रेम करणे हा माणसाचा मुलभूत अधिकार आहे. त्यात निकोपपणा हवा, सेक्सपेक्षा आत्मिय प्रीत महत्वाची असावी ही अपेक्षा चुकीची नाही. पण त्यात अपरिहार्यपणे सेक्स असतोच. आलिंगन-चुंबन हे त्या प्रेमाच्याच आविष्काराचे भाग असतात. संस्कृत्या यामुळे बिघडत नाहीत. वैदिक संस्कृतीवर त्यांच्याच ग्रंथांचे दाखले देत, "हीच का तुमची संस्कृती?" असे जर आता तरुणांनीच विचारले नाही तरच नवल!
रा.स्व. संघ हा संस्कृतीचा उद्धारक नसून विनाशकर्ता आहे हे आता तरी आपल्याला समजावून घ्यावा लागेल. देशभरच्या तरुणांनी ज्या अभिनव पद्धतीने आंदोलन छेडले याबाबत ते नक्कीच अभिनंदनास पात्र आहेत. मनमोकळा समाज अस्तित्वात आणायचा असेल तर तरुणांना पुरेसे समंजस स्वातंत्र्य असलेच पाहिजे आणि ते देण्याची जबाबदारी प्रत्येक पालकावर...समाजावर आहे. संघाचे हे अ-सांस्कृतिक उपद्व्याप सर्वांनी मिळून थांबवावे लागतील याबाबत माझ्या मनात तिळमात्र शंका नाही.
(साप्ताहिक "कलमनामामद्ध्ये प्रकाशित झालेला लेख)