भविष्यात काय घडू शकेल याचा वेध घेत त्यानुसार आताच पुर्वतयारी करु पाहणारे जगात अनेक प्रगत देश आहेत. त्यांचे विचार ज्ञान-विज्ञानविषयकच नव्हे तर अगदी राजकीय वर्चस्वाच्या भविष्याचाही वेध घेतात. आपण यातही मागे असतो हे वेगळे सांगायची गरज नाही. प्रवाहपतितासारखी आपली अवस्था झालेली आहे. म्हणजे प्रवाह नेईल तसा वहायचे. आपण आपल्या फोहायची दिशाच ठरवायची नाही. आमचे असंख्य प्रश्न आहेत. सामाजिक समस्या आहेत. राजकीय नेतृत्वांच्या समस्या आहेत. काही प्रश्न तर मध्ययुगीन काळातल्यासारखेच आहेत. भटके-विमूक्त, दलित, आदिवासी आजही जगण्याच्याच संघर्षात आहेत तर पुढचे भविष्य कसे पाहणार? एके काळी सुस्थितीत असणारेही आज दरिद्र होत दारिद्र्यावर मात करण्यासाही आरक्षणाचीच मागणी करतात, म्हणजे आमची बुद्धी यापुढे जायला तयार नाही. आजचे प्रश्न आम्ही सोडवू शकत नसू तर उद्याचे काय सोडवणार हा प्रश्न पडणे व त्यामुळे खिन्न होणे भाग असले तरी प्रयत्न करुच नये असे नाही.
आपण मागील लेखांत कृत्रीम बुद्धीमतीमुळे जगात काय बदल होणार आहेत, रोजगार कसे गमावले जाणार आहेत व नव्या रोजगार संध्या या बदलातुनच उत्पन्न करणे कसे आवश्यक आहे हे पाहिले होते. आपण आपली शिक्षणपद्धती भविष्याला तोंड देण्यासाठी कशी आमुलाग्र बदलावी लागेल यावरही प्रारंभिक विचार केला होता. याचे मुख्य कारण म्हणजे सुदृढ विद्यार्थीकेंद्री शिक्षणाशिवाय आम्ही भविष्य पेलणारी पिढी घडवू शकणार नाही याची जाणीव व्हावी. आज आम्ही जेथे आहोत त्या जागेवरुन पुढे पाहिले तर आपण किती मागे आहोत याची जानीव होईल.
शिक्षण हा एक व्यवसाय नव्हे तर धंदा झाला आहे. आज लोकांना खाजगी शाळांचे आकर्षण वाटते खरे पण तेथील शिक्षकांचा दर्जा तपासला तर तो अत्यंत निकृष्ट असल्याचे लक्षात येईल. बव्हंशी खाजगी शाळा-महाविद्यालयांतील शिक्षकांचे वेतनमानही कागदावरचे वेगळे तर प्रत्यक्षातील वेगळे असे चित्र आहे. विना-अनुदानित महाविद्यालयांतील अध्यापकांची अवस्था तर शोचणीय आहे. बी.एड./डी.एड करणा-यांचे पीक जोमात असले तरी शिक्षंणातील त्यांना काय समजते हे पाहिले तर चिंतेची मळभे दाटुन येतात. आपले अध्यापक आपण जो विषय शिकवतो त्यातील ज्ञान अध्ययावत ठेवण्याचा मुळीच प्रयत्न करत नाही. विद्यापिठीय स्तरापर्यंत हीच अवस्था आहे. म्हणजे शिक्षण संस्था खाजगी असो कि सरकारी, शिक्षकांची अवस्थाच जेथे अशी आहे तेथे विद्यार्थ्यांचे काय असणार?
विद्यार्थी ज्ञानार्थी नाहीत ही एक दुसरे अत्यंत महत्वाची अडचण आहे. महाविद्यालयीन तरुण परिक्षा जवळ आली कि मगच अभ्यासाला लागतात. तास बुडवणे ही फुशारकीची बाब वाटते. परिक्षा जवळ आली कि गाईडस किंवा सरळ सरळ नकला करणे याचे प्रमाण नको तेवढे वाढत आहे. परिक्षेत मार्कच महत्वाचे वातत असल्यने किती समजले यापेक्षा परिक्षेच्या वेळेस किती लक्षात राहिले यालाच महत्व दिले जाते. नंतर मग सारे विसरले तरी चालते. मुळात त्यांचा कल कोठे आहे हे पाहुन पालकही त्यांना हव्या त्या शाखेत प्रवेश देत नसल्याने तर ही समस्या अजुनच गहन होऊन जाते. आहे त्या शिक्षणातही रस उत्पन्न करता येणे शक्य असले तरी तोही प्रयत्न ना अध्यापक करत ना विद्यार्थी करत. यामुळे आज आपली महाविद्यालये बेरोजगार उत्पन्न करणारे कारखाने बनले असल्यास नवल नाही. कारण मुळात "नोकरीसाठी शिक्षण" असाच काहीसा समज आपला झाला आहे आणि तो समूळ चुकीचा आहे हे लक्षात घेतले जात नाही. रोजगार मागणारे जास्त पण त्यांना रोजगार देण्याचे काम कोण करणार हा प्रश्नही आम्हाला शिवत नाही.
दिवसेंदिवस सरकारी नोक-या कमी होत जाणार आहेत. आज आहेत त्या रिक्त जागाच भरायला सरकार तयार नाही तर नव्या कोठुन निर्माण होणार? देशात उद्योगव्यवसायांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती झाली तरच नोक-याही उत्पन्न होतील. पण ती मानसिकता विद्यार्थ्यांत उत्पन्न व्हावी यासाठी आपला समाज कसलाही प्रयत्न करत नाही. सरकारी धोरणेही त्याला फारशी अनुकूल नाहीत. परकीय भांडवल येईल व रोजगार मिळेल अशी जी आशा सरकार व लोकही बाळगतात ती भ्रामक असल्याचे आताच स्पष्ट झाले आहे. बेरोजगारीचा विस्फोट झाल्याने भारतात आजच अनेक एके काळच्या प्रगत समजल्या जाणा-या जाती आरक्षणासाठी रस्त्यावर उतरुन आंदोलने करत आहेत. आरक्षण मिळाले म्हणून रोजगार मिळेल हा भ्रम कधी दूर होईल ते होवो. प्रत्यक्षात सरकारी नोक-या वाढण्यापेक्षा भविष्यात घटतच जाणार आहेत हे वास्तव त्यांना कोण सांगणार? समाजनेतेही डोळ्यांवर पट्टी बांधल्याप्रमाणे चालले आहेत व तरुणांच्या भावनांचा राजकीय फायदा उठवत आहेत. पण यातून पुढच्या पिढीचे आपण अक्षम्य नुकसान करीत आहोत याचे भान त्यांना नाही.
आपली शिक्षणव्यवस्था म्हणजे ज्ञानही नाही आणि म्हणून रोजगारही नाही अशा कैचीत सापडली आहे. याला अपवाद नाहीत असे नाही. पण हे अपवाद प्रगती करतात. त्यांच्य प्रगतीपासुन शिकावे, बोध घ्यावा तर तेही नाही. आमच्या डाक्टरेट्सलाही काही अर्थ राहिला नाही. नकला करुन या पदव्या मिळवल्या जातात. प्रसिद्ध तुलनाकार डा. आनंद पाटील म्हणतात कि ९०% प्रबंध हे कचरापेटीत टाकायच्या लायकीचे असतात. अलीकडेच नकलगिरीची उघड झालेली असंख्य प्रकरणे त्यांच्या म्हणण्याला सार्थच ठरवतात. म्हणजेच आमची स्वतंत्र ज्ञाननिर्मितीची प्रक्रियाच संपली आहे कि काय? बनवेगिरी, लबाडी या दुर्गुणांनी आमचा जर अशा रितीने ताबा घेतला असेल तर आम्ही जगाशी झुंज घेणारे बौद्धिक लढवैय्ये कसे तयार करणार आहोत?
शिक्षणपद्धती व सुयोग्य शिक्षण हाच नवा समाज घडवण्याचा ताबा असतो. येत्या पंचविस वर्षांत इंग्लंडमधील विद्यापीठे ज्ञानाची मुख्य उर्जाकेंद्रे बनवण्याच्या दिशेने आजच प्रयत्न सुरु झालेले आहेत. जर्मनी अमेरिकेचे महासत्तापद काबीज करण्यासाठी काय काय करावे लागेल याचा विचार करत शिक्षणात तसा बदल घडवतो आहे. चीननेही शिक्षणपद्धती जागतिक दर्जाची बनवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे व त्याची फळे चीनला मिळतही आहेत. अन्यही देश त्यावर गंभीरपणे विचार करत आहेत. आम्ही तो विचार करणे तर सोडाच, आजच्या समस्या कशा सोडवायच्या या प्रश्नाच्या गर्तेत अडकलो आहोत. तरुणांमधील नैराश्य व संताप ही त्याचीच अटळ फलश्रुती आहे. असे होण्यामागे तरुणांची शिक्षणाबद्दलची अनास्थाही कारणीभूत आहे. ज्या पद्धतीने ते शिकले आहेत त्यात स्वत:च आळशी राहिल्याने, जिज्ञासेची साथ सोडल्याने त्यांना जगण्याचे कोणतेही कौशल्य कमावता आलेले नाही.
आणि शिक्षकांनी शिक्षणाशीच बेईमानी सुरु केल्याने भविष्यातील चित्र अवघड असणार आहे. आपल्याला जर भविष्याला तोंड देत, त्यावर आरुढ होत जगाच्या स्पर्धेत उतरायचे असेल तर ही स्थिती तत्काळ बदलावी लागणार आहे. बहाणेबाजीचे जुने धंदे येथे चालणार नाहीत. ही बेईमानी आपण जगाशी नव्हे तर स्वत:शीच करतो आहोत व त्याची आज गोड वाटत असली तरी भविष्यात वीषवृक्षाचीच निर्मिती करणार आहेत हे लक्षात ठेवावे लागेल. आपल्याला आताच नेमके काय करायला हवे याबाबत पुढील लेखात.
-संजय सोनवणी
(Published in Daily Sanchar, Indradhanu supplement)
No comments:
Post a Comment