Sunday, March 26, 2017

जातजाणीवा आणि आपले शिक्षण


Image result for casteism in indian education


आज भारतात सर्वात मोठी समस्या असेल तर ती म्हणजे जातीयवाद. आधुनिक भारतात शिक्षणाचा प्रसार जसजसा होईल तसतशी जातीयता संपेल अशी आशा आपल्या समाजधुरीणांना होती. प्रत्यक्षात स्वातंत्र्यपूर्व काळातही जेवढा जातीयवाद नसेल तेवढा स्वातंत्र्योत्तर काळात वाढला. १९९१ नंतर जागतिकीकरण आले. सारे विश्व एक खेडे बनले. संगणकक्रांतीने आज तर जगाचे दरवाजे कधी नव्हे एवढे खुले झाले. यामुळे तरी भारतियांची विचारपद्धती व्यापक, वैश्विक बनायला हवी होती. पण प्रत्यक्षात उलटेच झाले. जातजाणीवांचा आता होत असलेला उद्रेक कोणाही विचारी माणसाला अस्वस्र्थ करेन एवढा झाला आहे. प्रत्येक जातीच्या तर आहेतच पण पोटजातींच्याही संघटना आहेत,. प्रत्येक जातीच्या अस्मिता टोकदार होत चालल्या आहेत व प्रसंगी त्या हिंसक पातळीवरही जात आहेत. 

या वाढत्या जातीयवादाची अनेक कारणे आहेत. सामाजिक विचारवंत त्याबद्दल बोलतही असतात. जातीयता नको असे म्हणणारे विचारवंत आणि साहित्यिकही प्रत्यक्षात मात्र जातजाणीवा अत्यंत हुशारीने जपतांना दिसतात. जाती उच्चाटण करण्यासाठी ज्या चळवळी होतात त्यंच्या कार्यक्रमांत वक्त्यांची जात जाहीरपणे सांगण्यात येते. माझी जात शोधून काढण्यासाठी गेली दहा वर्ष एवढा आटापिटा झालाय कि आता हसू यायचेही थांबलेय. बरे हे लोक सामान्य नाहीत! मोठमोठे समाजवादी, आंबेडकरवादी, शिवशाहीवादी वगैरे विचारवंत यात सामील आहेत. जातीयवादाचा हा उद्रेक पाहिला कि आपण जगाशी स्पर्धा करण्यापेक्षा आपापसात तिरस्कार करत एकमेकांना संपवण्याच्या मार्गावर आलो आहोत कि काय हा प्रश्न पडतो.

पण खोलात विचार केला तर जातजाणीवांची सुरुवात आधी घरात सुरू होते. शाळेत मुलगा जायला लागल्यावर तरी ती संपवायचा प्रयत्न होईल अशी अपेक्षा आपण आपल्या शिक्षण पद्धतीकडून व शिक्षकांकडून करू शकतो. पण प्रत्यक्षात शालेय वयातच जात जाणीवाच नव्हे तर लिंगभेदात्मक जाणीवा विकसित करण्यात आपली शिक्षणपद्धती व शिक्षक हातभारच लावताहेत असे विदारक चित्र आहे.

समीर मोहिते या धडाडीच्या तरुणाने टाटा समाज विज्ञान संस्थेमार्फत तिनेक वर्षांपुर्वी कोकणातील दोन गांवातील सातवी व नववीत शिकणा-या विद्यार्थ्यांचे एक सर्वांगीण सर्वेक्षण केले. त्यातील निरिक्षणे काळजीत टाकणारी आहेत. त्याला आढळलेल्या (व काही मी स्वत: अनुभवलेल्या) काही बाबी येथे नमूद करणे गरजेचे आहे.

विद्यार्थी आपले मित्र शक्यतो आपल्या जातीतीलच निवडतो. शिक्षक आवडता कि नावडता हे तो आपल्या जातीचा आहे कि नाही यावरून ठरते. तथाकथित पुरोगामी म्हणवणारे शिक्षक विद्यार्थ्यांना लहाण वयातच ब्राह्मणद्वेषाची पायाभरणी करतात. आपल्या क्रिकेट टीमचा कप्तान शक्यतो आपल्याच जातीचा असावा, नसला तर तो किमान समकक्ष जातीचा असावा असा विद्यार्थ्यांचा आग्रह असतो. शिक्षकही स्टाफरुममध्ये आपापल्या जातीचे कोंडाळे करतात. शिक्षक दलित असेल तर त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण हीनभावनेचाच असतो. ही झाली जातीबाबतची निरिक्षणे. लिंगभेदाच्या जाणीवाही अशाच आहेत. मोहितेंच्या निष्कर्षानुसार, मुलींनी घरकामाकडे जास्त लक्ष द्यावे असे बव्हंशी मुलांना वाटते. मुलगे मात्र त्यात नाखूश असतात कारण त्यांच्या दृष्टीने ते बायकांचे काम आहे.  

त्यापेक्षा भयानक बाब म्हणजे कोकणात (अन्यत्र तरी मी पाहिले नाही) मुख्य फलकावर शिक्षकांच्या नांवापुढे त्यांची जात लिहिली जाते. अन्यत्र लिहिली जात नसेल कदाचित, पण जात शोधण्यात आपले लोक किती वस्ताद असतात हे आपल्याला माहितच आहे.  शहरी शाळांमध्ये, अगदी खाजगी इंटरन्यशनल स्कुल्सचीही अवस्था याबाबतीत वेगळी नाही. जातीभेद व उच्चनीचतेच्या जाणीवा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे विकसित होतच राहतात.

अभ्यासक्रमात जे धडे व कविता असतात तेही जातिनिहाय (समभाव दाखवण्यासाठी) निवडले जातात. म्हणजे ज्ञानेश्वरांचा अभंग हवा तर मग चोखा मेळ्याचाही हवा. धडेसुद्धा जाणीवपुर्वक विविध जातींच्या लेखकांचे निवदले जातात. मग ते शिक्षणासाठी उपयुक्त असोत कि नसोत. कारण आपल्या अभासक्रम ठरवणा-या समित्यांचेही सदस्य जातनिहाय निवडले जातात. अनेक जाती आपापल्या महापुरुषांवरचे धडे क्रमिक पुस्तकात घालावेत यासाठी आग्रही असतात, प्रसंगी आक्रमकही होतात. त्यात पुन्हा कोणाच्या भावना दुखावणारा मजकूर येईल याचाही नेम नसतो. नशीब गणितात आणि विज्ञानात आम्हा लोकांचे तसे काही स्थानच नसल्याने "मग याच जातीचे शोध का? आमच्या जातीच्या शास्त्रज्ञाकडे का दुर्लक्ष केले?" असे वाद नाहित. आमचातून असे वैज्ञानिक व गणिती निर्माण होण्याची शक्यताच नसल्याने किमन या स्तरावर तरी वाद जाणार नाहीत हे आम्ही आमचे नशीब मानावे काय?

शालेय जीवनातच जातजाणीवा विकसित झाल्यावर, जतिनिहाय राग-लोभ निर्माण झाल्यानंतर तो विद्यार्थी तथाकथित उच्च-शिक्षित झाल्यावर कसा जातजाणीवांतून बाहेर पडनार? कारण सारा समाजच जेंव्हा जातीय होत जातो तेंव्हा अपवाद असलेल्यांची घुसमट व कुचंबना स्वाभाविकच आहे.  

मानवी मेंदू हा विचार करण्यासाठी, नवनवीन संकल्पना शोधण्यासाठी आणि पुर्ण सामर्थ्याने अभिव्यक्ती करण्यासाठी असतो. तेवढी नैसर्गिक शक्ती ही प्रत्येक व्यक्तीत असतेच. प्रश्न असतो तिच्या विकसनासाठी योग्य मार्ग देण्याचा. दिशा देण्याचा. त्यात आम्ही क्रमश: कमी पडत गेल्याने आज साक्षरांची मोठी फौज निर्माण झालीय खरी. पण सुशिक्षितांच्या अभावामुळे असहिष्णुता जोमाने फोफावत चालली आहे. एखाद्या जातीय संघटनांची खोट्या इतिहासाने भरलेली व म्हणुनच उथळ विचारांची चार पुस्तके वाचून "क्रांतीकारक" बनण्याची स्वप्ने पाहणारी तरुणांची पिढी बनते ती यामुळेच. भडक भाषा, विशिष्ट जातीसमुहाला सातत्याने शिवीगाळ केल्याने समाज बदलत नसतो याचे भान तथाकथित विचारवंतांनी व म्हणुण त्यांच्या अनुयायांनीही गमावले असेल तर याचा अर्थ हाच निघतो कि आमची तरुण पिढी घडवण्यात आमची शिक्षण व्यवस्था व जातजाणीवांनी भारावलेले अडानी शिक्षक अपयशी ठरणारच हे वेगळे सांगायची गरज नाही.

जाती जायच्या असतील तर आधी आपल्या शिक्षणपद्धतील व म्हणूनच शिक्षकांना जाती-धर्म निरपेक्ष बनावे लागेल. राजकारणाचा शिक्षणातील हस्तक्षेप एकदाचा संपुष्टात आणावा लागेल. राजकीय पक्षांच्या विचारप्रणाल्या त्यंच्याजवळ. पण सत्तापालट झाला कि नवे सरकार स्वानुकूल बदल अभ्यासक्रमात का करते? विद्यार्थी काय त्यांचे गुलाम आहेत काय? त्यांना "आपल्या" विचाराचे बनवण्याचा अट्टाहास का? त्यांना स्वतंत्र बुद्धीने विचार करून भविष्यात ठरवू द्या की कोणती विचारसरणी त्यांना पसंत आहे ते!  या उठवळ राजकारणाला शिक्षणपद्धतीतून समग्र हद्दपार करणे आज अत्यंत आवश्यक झाले आहे. आणि यात पुढाकार घावा लागेल तो शिक्षकांना आणि पालकांना. मुल शाळेत घातले, फी भरली कि आपली जबाबदारी संपली असे वाटणारे पालक मुलाचे पहिले शत्रू असतात. आणि दुसरा त्याचाच शिक्षक. शिक्षकाला "गुरुजी" असे आदराने म्हणायची एके काळी पद्धत होती. आता शिक्षकांनाही बहुदा स्वत:ची योग्यता समजल्याने गाडे भाडोत्री "सर" वर आले आहे. ही शिक्षकांची अधोगती आहे. ही नसती तर त्यांनी नैतिकतेने सत्ताधा-यांच्या विरोधात त्यांच्या हस्तक्षेपाबद्दल आवाज उठवला असता. पण तसे होत नाही. ग्रामीण भागातले अनेक शिक्षक शिक्षणेतर खाजगी कामांत गुंतणे पसंत करतात. स्वलाभासाठी संघटनांची दडपणे वापरतात. पण भावे पिढीच्या कल्यानासाठी आपल्याला काय बदल व्हावेत यावर साधी चर्चाही करत नाहीत, मग दबाव आणणे तर दुरचे बाब झाली. पालकांनाही यासाठी आपण तरी पुढाकार घेतला पाहिजे, कारण आपल्याच मुलाच्या भवितव्याचा प्रश्न आहे असे वाटत नाही एवढे ते बेजबाबदार आहेत. मुलाचे फी भरली, वह्या-पुस्तके घेतली, क्लासेस लावले, त्याच्या हौशी-मौजी केल्या म्हणजे आपण कर्तव्यदक्ष पालक या गचाळ भावनेतून बाहेर पडले पाहिजे.

आपल्याला देशाचे भवितव्य घडवायचे कि नाही या प्रश्नाचा निकाल एकदाचा लावून टाकला पाहिजे.

(Published in Indradhanu Supplement, Dainik Sanchar, 26 March 2017)

1 comment:

  1. समोरचा जातीयवादी म्हणून मी पण जातियवादी ही विचार प्रणाली नाश पावली पाहिजे
    राहिला अभ्यासक्रम तर त्यासाठी आपलं काय मत काय आहे सर

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...