Saturday, March 18, 2017

कशासाठी शिकायचे?


Image result for education



आपण आपल्या देशात स्वबळावर कृत्रीम बुद्धीमत्ता असणारे संगणक अथवा यंत्रे बनवू शकण्याची आज तरी शक्यता दिसत नाही. फार कशाला, आम्ही भारतीय स्वत:ला संगणक प्रणाली क्षेत्रातील माहिर समजतो. जवळपास घरटी आमच्याकडे असे तज्ञ आज आहेत असे आम्ही समजतो. पण वास्तव हे आहे कि आज संघणकासाठी लागणारी एकही भाषा भारतियाने संकल्पिलेली नाही कि निर्माण केलेली नाही. या क्षेत्रात आपले स्थान "बौद्धिक श्रमिकाचे" आहे. भविष्यात सर्वच क्षेत्रात काय काय बदल होण्याची संभावना आहे हे आपण पाहणारच आहोत, पण हे पाहण्यासाठी सर्वप्रथम लागते ती या बदलाला तोंड देण्यासाठी लागणारी बुद्धीमत्ता. तीच जर आम्ही विकसीत केली नाही तर अर्थातच आमचे भवितव्य अंधारलेले राहणार यात शंका बाळगायचे कारण नाही. 

आज वास्तव हे आहे कि आपल्या शिक्षणाचा, शिक्षकांचा आणि म्हणून मुळात विद्यार्थ्यांचाच दर्जा ढासळलेला आहे. त्यामुळे आपले एकुणातील सामाजिक चारित्र्यही ढासळलेलेच राहणार. आज आपले अनेक सामाजिक प्रश्न ज्वलंत बनले आहेत ते मुळात नीट शिक्षण आणि आकलनक्षमतेच्या अभावात हे आपल्या लक्षात येत नाही. आपले नेतेही शिकुन अशिक्षितच असल्याने आपल्याला आपल्या शिक्षणपद्धीतच बदल करावा लागेल हे त्यांना समजलेले नाही. त्यामुळे आपली शिक्षणव्यवस्था जेंव्हा बदलायची ती बदलो, आपल्याला तरी आत्ताच बदलावे लागणार आहे. त्यासाठी केवळ आपला आपल्या जीवनाकडे एकुणातच पहायचा दृष्टीकोण बदलावा लागणार आहे. जे सजग आहेत त्यांना कंबर कसावी लागेल व विद्यार्थ्यांना ज्ञानार्थी बनवण्यासाठी स्वत: प्रयत्न करावे लागतील. पालकांनाच यात अधिक पुढाकार घ्यावा लागेल.

विद्यार्थ्यांना खुपदा ते कशासाठी शिकत आहेत हेच माहित नसते. शाळेत व त्यानंतर महाविद्यालयात जाणे असा जणु नियमच असल्याप्रमाने ९०% विद्यार्थी अभ्यासक्रमाच्या भोव-यात अडकावले जात असतात. अमूक विषय आपण का शिकायचा, का शिकवला जातोय आणि त्या विषयाची अंतिम परिणती काय हेच जर माहित नसेल तर शिकून फक्त माठ बाहेर पडणार. पाल्यांना आपल्याला नेमके काय व का हे ठरवायला जमत नसेल तर पालकांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. सध्या आपल्या पाल्याला शाळेत पाठवतो येच निरुद्देश्यपणे अथवा आपली अपुर्ण स्वप्ने साकारण्यासाठी. पाल्याच्या स्वप्नांचे पंख छाटुन कोणताही पाल्य महान कामगिरी बजावण्याची शक्यता नाही हे आपल्याला लक्षात घ्यावे लागेल.

आपल्या शिक्षणपद्धतीचा प्रमूख उद्देश नोकरदार निर्माण करणे आहे असे मानले जाते. ठीक आहे, हा का उद्देश्य असेना. प्रत्यक्षात हे नोकर "दर्जेदार नोकर" बनावेत हे कोठे शिकवले जाते? कार्यक्षमता आणि दर्जा याचे शिक्षण शाळेपासुनच मिळायला हवे ही अपेक्षा असते. पण आम्ही, शिक्षणाचा मर्यादित हेतू जरी गृहित धरला तर तोही साध्य करण्याचा प्रयत्न करत नाही. मुळात आपण उद्देशच ठरवलेला नाही. पास होंणे...चांगले मार्क मिळवणे म्हणजे हुशार हे आमच्या डोक्यात कोणी घुसवले? तसे असते तर एम.ए.चा गोल्ड मेडालिस्ट विद्यार्थी कसलीही स्पर्धा परिक्षा द्यावी न लागता सरळ कलेक्टरपदी नियुक्त व्हायला हवा. होते का तसे? होत नाही कारण शाळा-महाविद्यालयातील मार्क म्हणजे बुद्धीमत्ता व कौशल्य आहे असे सरकारच मानत नाही. आपण मात्र मानतो ही आपली चूक आहे. य चुकीनेच आपण आपल्या अनेक पिढ्यांचे वाटोळे केले आहे व आजही आम्हाला आमच्या जन्मजात अडाणीपणामुळे यात बदल घडवावा व तो आम्हीच घडवू शकतो हे लक्षात येत नाही. मग ज्ञान, उद्योजकता वगैरे कधी शिकवले जानार?

त्यामुळे मार्कांकडे विशेष लक्ष न देता विद्यार्थ्याचे आकलन कसे वाढेल यावर आपण भर देवू शकतो व आवडीच्या विषयात अधिक प्रगती करायला वाव देवू शकतो. अनेक विद्यार्थी विचारतात, "अमूक क्षेत्रात स्कोप आहे का?" खरे म्हणजे स्कोप नाही असे जगात एकही क्षेत्र नाही. अगदी नवी क्षेत्रे शोधून इतरांनाही स्कोप देता येईल इतके स्कोप आहेत. प्रत्येक विषय हा महत्वाचा व मोलाचा आहे. हे सांगायला आधी शिक्षक लागायचे. आता कोणत्या विषयात काय स्कोप आहे ही माहिती तुम्ही संगणकावरुन मिळवू शकता. तीहे जगभरची. महत्वाचे हे समजावून घ्या कि स्कोप नाही असा विषय अस्तित्वात नसतो. उलट आज ठराविक लोकप्रिय क्षेत्रांकडेच धावायची विद्यार्थ्यांची प्रवृत्ती असल्याने महत्वाच्घा असंख्य क्षेत्रांत माणसांचाच तुडवडा आहे. उदा. मुलभूत विज्ञानाकडे आज खूप क्वचित विद्यार्थी जातात. त्यामुळे एकीकडे भरमसाठ बेरोजगार आहेत तर दुसरीकडे अनेक क्षेत्रात माणसांचाच तुटवडा आहे. 

मग अशा स्थितीत, केवळ रोजगार हे उद्दिष्ट ठेवले तरी त्या उद्दिष्टाला समजावून न घेता कसलीच योजना न केल्याने काय गफलत झाली आहे हे लक्षात येईल. म्हणजे नोकरदार व्हायचेय पण तो कसा आणि कोणत्या क्षेत्रात हे तरी आम्हाला ठरवता यायला काय हरकत आहे? असे केले म्हणजे उद्दिष्टाच्या दिशेनेच प्रयत्न करता येतील. त्या क्षेत्रात प्रत्यक्ष कसे कामकाज चालते हे पाहता येईल. त्या क्षेत्रातील आधुनिक व ताजी माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न करता येईल. अद्ययावत राहता येईल. थोडक्यात, नोकरदारीच करायची तर चांगली नोकरदार तरी बनावे कि नाही?. पण उद्देश स्पष्ट् असला पाहिजे. यात कालपरत्वे काही बदल व सुधारणा होत जातात. एखादवेळेस एकदम नवीनच व आवडीची दिशा अवचित मिळू शकते. पण ज्यांची सुरुवातच निरुद्देशपणे होते त्यांना अनेकदा "संधी" म्हणजे काय हेच समजत नाही. अर्धवट ऐकलेली माहिती, करियर काउंसिलिंगवाल्याच्या लबाड्या, स्पर्धा परिक्षांचा विस्फोट यात "मला काय नेमके करायचे आहे?" हा प्रश्न सुटून जातो. आम्हाला हे थांबवायला हवे.

आमच्या शिक्षकांना व प्राध्यापकांना आपापल्या क्षेत्रातले ज्ञान अद्ययावत ठेवायला काय हरकत आहे? त्यांनी ते ठेवले तरच ते विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबाहेरील ज्ञान देत त्यांना अधिकाधिक ज्ञानपिपासू बनवायला मदत करू शकतील ना? पण त्यांना त्यासाठी वेगळे वेतन मिळनार नाही. मिळणा-या वेतनाच्या प्रमाणात मुळात कामच करायचे नाही असे तत्व कसोशीने राबवले जाते तेथे हे अवघड जाईल हे खरे. पण काही जण तरी चांगले शिक्षक असतील वा होऊ पहात असतील. ते पुढाकार घेऊ शकतात. विद्यार्थ्याच्या जाणीवांच्या कक्षा विस्तारु शकतात. शिक्षण नेमके का व कशासाठी हेच आम्हाला सुस्पष्ट होत नाही तोवर आम्ही शिक्षण दिले काय किंवा न दिले काय, काही फरक पडणार नाही.

अनेकदा शि्कवले जाण्याचा दर्जा काय असनार आहे हे शिक्षकांच्या दर्जावरुनच ठरते. अनेक शिक्षक चांगले आहेत हेही खरे आहे. शिक्षणबाह्य कामांमुळे ते पार चेपले गेले आहेत हेही खरे आहे. पण त्याच वेळीस आपल्या पाल्यांच्या पिढ्या विनाशाच्या दरीकडे आपणच घेऊन चाललो आहोत याचेही भान त्यांना असायला हवे. किंबहुना केवळ पेशानेच शिक्षक असलेले लोक नव्हेत तर त्या त्या क्षेत्रातील यशस्वी लोकांनी शिक्षकाच्या भुमिकेत जात ज्या चूका आपल्या हातून झाल्या त्या परत होऊ नयेत यासाठी प्रयत्न करावेत. 

ज्ञान सर्वत्र आहे. पण ते कसे निवडून घ्यायचे हे जे शिकवतो तो खरा शिक्षक. जेवढ्यांना शक्य आहे तेवढ्यांनी असे शिक्षक बनावे. पण य लेखापुरती महत्वाची गोष्ट म्हणजे, शिक्षणाचा उदेश्य हा माहित असलाच पाहिजे. पालकालाही आंणि पाल्यालाही. निरुद्देश्य शिक्षण कोणाच्याही कामाला येणार नाही. स्वत:च्याही नाही आणि देशाच्याही नाही. किंबहुना असे निरुद्देश्य विद्यार्थी देशाच्या अर्थ व समाजव्यवस्थेवरील ओझेच असेल. 

सरकार शिक्षण पद्धतील आमुलाग्र बदल करेल तेंव्हा करेल. पण आम्ही स्वत:च खुप काही आजच करु शकतो. एक लक्षात ठेवणे आवश्यक आहे ते हे कि, तेच राष्ट्र बलाढ्य होते ज्या देशातील ज्ञानाचा पाया प्रबळ आहे. आणि शिक्षणव्यवस्थाच हा पाया प्रबळ करू शकते. आमचा देश मागास आहे कारण आमची शिक्षणव्यवस्थाच मागास आहे. पण आम्ही सरकारचीच वाट का पहायची? आमच्या पुढच्या पिढ्या घडवायला दर वेळेस सरकारनेच पुढे यावे या अपेक्षांत काही अर्थ नाही. शिक्षणाचा उद्देश समजावून न घेता घेतलेले शिक्षण म्हणजे केवळ निरर्थक हाराकिरी असते हे आम्हाला आधी लक्षात घ्यावे लागेल.

No comments:

Post a Comment

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...