Saturday, August 26, 2017

आर्यवंशीय अहंगंड

आर्यवंशीय अहंगंड

पुरातत्त्वशास्त्र, अनुवंशशास्त्र आणि जनुकशास्त्र या खरं तर निखळ ज्ञानशाखा. मात्र, वर्चस्ववादाने पछाडलेले देशोदेशींचे समूह या शास्त्रांचा वापर राजकीय हेतूंसाठी करू लागले आहेत. गेल्या काही वर्षांपासून भारतीय परिघातही हेच चित्र सातत्याने दिसू लागले आहे. त्यातूनच आर्य हे मूळचे भारतीयच, सिंधू संस्कृतीची निर्मिती वैदिक आर्यांनीच केली, आदी सिद्धांत पुुरातत्त्वशास्त्राच्या आधारे रेटले जाऊ लागले आहेत. येत्या सप्टेंबर महिन्यात पुरातत्त्व संशोधक हरियाणा राज्यातल्या राखीगढी येथील उत्खननात सापडलेल्या सांगाड्यांच्या जनुकांविषयी निष्कर्ष जाहीर करणार आहेत. त्यानिमित्ताने हा खास लेख...

एके काळी आर्य आक्रमण सिद्धांत डोक्यावर घेऊन नाचणारे व युरोपियन भाषा व वंशविद्वानांच्या सूरात सूर मिसळणारे कोलांट उडी मारत गेली काही दशके आर्य आक्रमण झाले नसून आर्य हे मुळचे भारतीयच आहेत व येथुनच ते युरोपपर्यंत पसरले आणि आर्य भाषा आणि संस्कृतीचा प्रसार केला असे सांगू लागले. एवढेच नव्हे तर सिंधू संस्कृतीची निर्मिती वैदिक आर्यांनीच केली व तेथे सापडलेल्या मुद्रांवरील भाषा ही वैदिक संस्कृतच असून त्यात वैदिक पुराकथा नोंदवलेल्या आहेत असे एन. राजाराम व एन. झा सारखे विद्वान सांगू लागले. सिंधू संस्कृतीत कालीबंगन येथे सापडलेल्या चुल्हानांना यज्ञकुंड म्हणुनही घोषित करण्याचे प्रयत्न झाले. अर्थात पाश्चात्य विद्वानांना हा दावा मान्य होणे शक्य नव्हतेच. मायकेल विट्झेल, स्टीव्ह फार्मरसारखे लोक देशी आर्य संकल्पनेला कडाडुन विरोध करत राहिले व आर्य हे स्टेप-पोंटियाक प्रदेशातून स्थलांतरानेच युरोपप्रमाणेच भारतात पोहोचले आणि इंडो-युरोपियन भाषा संस्कृतीचा प्रसार झाला हे मत पुरातत्वीय, भाषिक व ऋग्वेद-अवेस्ता आणि हुर्रियन भाषेतील किक्कुल्लीच्या अश्व-प्रशिक्षण लेखनाला व बोगोझ्कोय करारनाम्यासारख्या फुटकळ लेखनाला आधार घेत मांडु लागले. तेच ते पुरावे वापरत या विषयावर एवढे  परस्परविरोधी सिद्धांत मांडले गेले आहेत की कोणाला अक्षरश: भंजाळून गेल्यासारखे होईल. एवढेही करून तथाकथित आर्यांचे अथवा पुरा-इंडो-युरोपियन भाषा बोलणा-यांचे मूळ स्थान कोणते हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला आहे. 

अलीकडे जनुकीय शास्त्र आर्य प्रश्न सोडवण्यासाठी वापरायला सुरुवात झाली आहे. हिंदू व इंडिया टुडेमध्ये मरिना सिल्वा प्रभुतींच्या भारतीय उपखंडातील जनसंख्येच्या बाबतीत जनुकीय आनुवांशिकी मांडणा-या मार्च १७ मधे प्रसिद्ध झालेल्या प्रबंधावर आधारित लेख प्रसिद्ध झाले आणि एकच खळबळ उडाली. या संशोधनानुसार भारतात आर्यांचे आगमण इसवी सनपूर्व दोन ते तीन हजार वर्षांपुर्वी झाले. याआधी २०१५ मध्ये नेचर मासिकातही मॉर्टेम अॅलनटॉफ्ट प्रभुतींनी युरोप व मध्य आशियातील १०१ सांगाड्यांतून मिळालेल्या जनुकांचा अभ्यास करून काढलेले निष्कर्ष प्रसिद्ध झाले. याच वर्षी सायंस मासिकात डेव्हीड राइश व आयोसिफ लाझार्डिस यांनी प्रकाशित केलेल्या अहवालात याम्नाया संस्कृतीचे चार सांगाडे मिळवून जवळपास असेच निष्कर्ष काढले होते. प्रिया नुरजानींनी तत्पुर्वी २०१३ मध्ये दक्षीण भारतीय आणि उत्तर भारतीय जनुकीय आनुवांशिकी स्वतंत्रपणे वेगळी होती असा निष्कर्ष काढला होता. हिंदुत्ववादी विद्वानांनी लगोलग हिंदुमध्ये आलेल्या लेखावर टीकेची झोड उठवायला सुरुवात केली. आता डेक्कन कॉलेजचे कुलगुरु वसंत शिंदे राखीगढी येथील उत्खननात सापडलेल्या सांगाड्यांतील जनुकांतून नवी राजकीय हलचल होईल असे नि:ष्कर्श घोषित करणार आहेत. म्हणजेच कदाचित ते आशिया व युरोपात झालेल्या जनुकीय प्रवाहाचा उगम हरियाणातुनच कसा झाला हे कदाचित घोषित करतील. याचे कारण म्हणजे संस्कृतिक वर्चस्वतावादी कारणासाठी "आम्ही बाहेरुन आलो" हे मान्य करायची आता वैदिकवाद्यांत हिंमत उरलेली नाही. थोडक्यात इंडो-युरोपियन भाषिकांचा प्रश्न निर्णायकपणे सोडवण्यासाठी जनुकीय संशोधन विद्वानच कुचकामी ठरवत असून परस्परविरुद्ध नि:ष्कर्ष त्याच संशोधनाचा वापर करीत काढत आहेत व सामाजिक व सांस्कृतिक परिप्रेक्षात गोंधळ माजवून देत आहेत हे आपल्या लक्षात येईल.

मुळात हे सारे राजकीय हेतुंनी प्रेरित आहे हे उघड आहे. युरोपियनांचा आणि भारतातील वैदिकवाद्यांचा वर्चस्वतावाद यामागे असून निखळ संशोधन हा मुळात हेतुच नाही. मुळात जनुकीय शास्त्र अजून विकासावस्थेत आहे. शिवाय जनुकांवरून वंश अथवा त्या लोकांची भाषा समजत नाही तर काही प्रमाणात आनुवांशिकी समजते. डेव्हीड राइश प्रभुतींनी मोकळ्या मनाने मान्य केले होते की ते लोक कोणती भाषा बोलत होते हे जनुकांवरुन सांगता येणार नाही. शिवाय जेथुन आर्य स्थलांतरित होऊ लागले ती याम्नाया संस्कृतीही स्वतंत्र नसून त्यांच्या जनुकांत कॉकेशियन व निकट-पुर्वेतील जनुकांचे सम्मिश्रण आहे. म्हणजेच ज्या जनुकांना मुळचे इंडो-युरोपियन अथवा आर्यन समजले जाते ते मुळातच मिश्र जनुकांचे होते. शिवाय कोणती जनुके कोणत्या प्रांताची हे ठरवण्याचे मार्कर असल्याने जनुकीय प्रसार स्थलांतर अथवा संक्रमणाने होतो हा सिद्धांत पुरेसा नसून जनुकीय साधर्म्यांचे कारण प्रादेशिक भुगर्भशास्त्रात शोधावी लागतात हे मी नुकतेच भुगर्भशास्त्रीय व जनुकीय अहवालांचा अभ्यास करून नुकतेच दाखवून दिले आहे. द्रविड भाषा व उतरेतील कथित आर्यभाषा बोलणा-या प्रदेशांचे भुगर्भशास्त्रीय प्रारुप प्रचंड वेगळे असून तेच भाषा-संस्कृती व जनुकीय साम्य-विभेदाचे कारण आहे असे मी सिद्धांतन केले आहे. केवळ मानवी स्थलांतरांमुळेच जनुकीय प्रवाह प्रसारित होतात हे मत तितकेसे खरे नाही. प्रत्येक जनुकावर त्याच्या भुशास्त्रीय संरचनेची व त्याच्या खाद्यसंस्कृतीची छाप असते हे मी नक्कीच म्हणू शकतो. आडवळणाने विविध भुभागांचे जनुकीय गट वेगळे आहेत ही बाब जनुकीय शास्त्राने मान्य केलीच आहे, पण त्यांनी जनुकांचे संक्रमण हे केवळ स्थलांतराने झाले आहे असा ग्रह करून घेतला आहे व त्या आधाराने सिद्धांत मांडले जात आहेत यामागे केवळ वर्चस्वतावाद आहे हे उघड आहे. 

आर्य सिद्धांताने जगाचे सर्वात मोठे नुकसान केले आहे. भारतापुरते बोलायचे तर द्रविड विरुद्ध उत्तरेतील आर्य हा संघर्ष गेले शतकभर केवळ या सिद्धांतामुळे धुमसत आहे. मुलनिवासीवादाचा जन्म याच आर्य सिद्धांतातून झाल्याचे सामाजिक परिणाम आपण पहात आहोत. अलीकडेच पुन्हा द्रविडस्थानाच्या मागणीला जोर मिळाला आहे. सिंधू संस्कृती द्रविडांचीच निर्मिती व आर्यांनी त्यांना दक्षीणेकडे सरकायला भाग पाडले हा तर दक्षीण भारतीय विद्वानांचा लाडका सिद्धांत. अस्को पारपोला ते इरावथम महादेवन यांनी तर सिंधू लिपीत आदिम द्रविड भाषा शोधण्याचा अथक प्रयत्न केला आहे हे सर्वश्रुत आहे. वैदिक आर्य भारतातीलच हे सिद्ध करण्यासाठी श्रीकांत तलागेरी. संघप्रेमी कोन्राड एल्स्ट, मायकेल डॅनीनो, बी. बी. लाल ते राजारामसारखे विद्वान आटापिटा करत आले आहेत. आता डॉ.वसंत शिंदे या टीममध्ये सहभागी झाले आहेत असे दिसते कारण राखीगढीचे उत्खनन पुर्ण झालेही नसता माझ्याच पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात राखीगढीची साईट आता पाकिस्तानात गेलेल्या हरप्पा-मोहेंजोदरोपेक्षा पुरातन आहे हे ते सिद्ध करणार आहेत असे ते प्रत्यक्ष पुरावे व त्यांची काटेकोर तपासणी होण्याआधीच म्हणाले होते. राखीगढीच्या जनुकीय संशोधनाचे नि:ष्कर्ष त्यामुळेच पुर्वग्रहदुषित असनार व ते वैदिकवाद्यांना, म्हणजेच संघविचारांना बळ देणारे ठरणार हे सांगायला नको.

युरोपियनांना आपला इतिहास मागे खेचायचा होता. आताच्या वैदिकवाद्यांनाही आपला इतिहास बदलायचा आहे. दोन्हीही बाजू केवळ राजकीय हेतुंनी प्रेरित होत अर्धसत्यालाच पुर्णसत्य मानत आले आहेत. राखीगढीच्या जनुकांत आर१ ए १ए गटाच्या समकक्ष प्राचीन जनुके मिळणार हे सहज शक्य आहे याचे कारण ते लोक येथलेच होते हे एकमेव कारण नसून ज्या भुगर्भीय स्थितीचे ते अपरिहार्य रहिवासी आहेत त्या स्थितीमुळे मिळणार आहेत. साडेचार हजार वर्षांपुर्वीची याम्ना अथवा त्या भागातील सांगाड्यांत मिळणा-या त्याच समकक्ष जनुकांवरून प्राचीन वैदिक आर्यांनी भारतातून स्थलांतर केल्यामुळे ती जनुकीय स्थिती अस्तित्वात आली हा संभाव्य निष्कर्ष सरळ सरळ विज्ञानाचा खून असेल हे उघड आहे. आज जगात प्रदेशनिहाय ए ते आरपर्यंत अनेक जनुकीय गट आहेत. त्यातील आर हा गट आर्यांचा अथवा केल्टिक लोकांचा आहे असे मानले जाते. हा गट फक्त युरेशीयाच्यातच सापडतो. गंमत म्हणजे द्रविडांचा जनुकीय गट एल आहे, आर नाही. प्रश्न असा पडायला हवा की हे स्थलांतर करणारे आर्य महाराष्ट्रापाशीच चार हजार वर्षांपुर्वी कसे थांबले? तिकडे कसा या "आर्य" जनुकांचा प्रसार झाला नाही? ते आशियाला लागुन असलेल्या उत्तर आफ्रिकेत न जाता अत्यंत प्रतिकूल हवामान असलेल्या युरोपातच का गेले? आर जनुकगट उत्तर आफ्रिकेत का आढळत नाही? थोडक्यात जनुकीय साम्याची व फरकांची कारणे स्थलांतरांत नसून भुशास्त्रीय व पर्यावरणीय कारणांतही आहेत हे लक्षात घेतले गेले पाहिजे.

स्थलांतरितांनी संस्कृती लादली हे मत केवळ वर्चस्वतावाद निर्माण करण्यासाठी मांडले जाते. धर्माचा प्रसार वेगवेगळ्या कारणांनी होऊ शकतो. बौद्ध धर्म अन्य पौर्वात्य देशांप्रमाणे बॅक्ट्रियातही गेला होता. तो काही स्थलांतराने नव्हे तर प्रचारकांमुळे गेला. सिंधू संस्कृतीचा व्यापार शेकडो वर्ष मेसोपोटेमिया व इजिप्तशी होता. तेथे हजारो भारतीय व्यापा-यांच्या वसाहती होत्या. म्हणजे जनुकीय संक्रमण झाले असणार. पण अद्याप जनुकशास्त्राला ’सेमेटिक-इंडियन’ प्रकाराचा जनुकगट सापडलेला नाही. वैदिक धर्मही इराणमधून भारतात आला तो विदेथ माथवाच्या नेतृत्वाखाली भारतात विस्थापित झालेल्या पाचशे-हजार लोकांमुळे व येथे प्रचारितही झाला. मोठे मानवी स्थलांतर त्याला कारण नव्हते. धर्मप्रसार व जनुकप्रसार या दोन अत्यंत वेगळ्या बाबी आहेत. येथले वैदिक हे बव्हंशी धर्मांतरित आहेत. त्यांनी आपले मुळ कोठे शोधण्याचा अट्टाहास करत आपला वर्चस्वतावाद दाखवण्यासाठी विज्ञानाला वेठीस धरत हवे ते निष्कर्ष काढावेत ही सामाजिक, सांस्कृतिक परिप्रेक्ष्यात गंभीर चूक आहे. समजा यांचे आताचे निष्कर्ष तात्पुरते खरेही मानले आणि उद्या युरोप ते भारतातही याहीपेक्षा प्राचीन सांगाडे मिळालेच तर आताच्या निष्कर्षांचे काय होईल? 

"आफ्रिकेबाहेर" सिद्धांतावर आताच त्यामुळे प्रश्नचिन्हे निर्माण होत आहेत.  हा सिद्धांत १९८७ मध्ये अस्तित्वात आला कारण एक लाख तीस हजार वर्षांपुर्वीचा सर्वात जुना होमो सेपियनचा मानवी सांगाडा तेथे सापडला. त्यावरुन एका धाडसी सिद्धांताची निर्मिती करत साठ हजार वर्षांपुर्वी पृथ्वीतलावर मानवी वितरण कोणत्या मार्गाने झाले याचे नकाशेही बनवले गेले. अलीकडेच पुर्व आफ्रिकेत मोरोक्कोमध्ये त्याहूनही किमान एक लाख वर्ष जुना सांगाडा सापडला. जगाच्या पाठीवर अजून कोठेतरी दुसरीकडेच त्याहुनही एखादा जुना सांगाडा सापडू शकतो. होमो सेपियनचाही पुर्वज म्हणता येईल असे मानवसदृश्य पुर्वज सुमारे अडिच कोटी वर्ष आधी आफ्रिकेत अवतरले हा आधी मानव आनुवांशिकी शास्त्रज्ञांचा कयास  होता. पण त्याहुनही जुने, म्हणजे तब्बल तीन कोटी सत्तर लाख वर्ष जुने अवशेष मिळाले ते म्यानमारमध्ये. म्हणजे याहुनही जुने अवशेष अगदी श्रीलंकेतही मिळू शकतात. आउट ऑफ आफ्रिका सिद्धांत मांडण्यात ही घाईच नव्हती काय? मग मनुष्य आधी श्रीलंकेत अवतरला असा सिद्धांत नव्याने मांडत स्थलांतराचे नवे नकाशे बनवायचे की काय? बरे मनुष्य एकाच ठिकाणी अस्तित्वात आला तर मग त्याच्या जनुकांची प्रादेशिकता ओळखता येण्याचे छाप (मार्कर्स) कसे विकसित झाले हे जनुकीय शास्त्र सांगत नाही. माझ्या म्हणण्याप्रमाणे भुगर्भशास्त्रीय कारणांनी ते निर्माण होतात. जनुके प्रादेशिक चिन्हे वागवतात हे सिद्ध झाले आहे व त्यावरच आधारीत कोणते जनूक मुळचे कोठले हे दाखवत मानवी स्थलांतराचा सिद्धांत मांडला जातो हे मात्र आश्चर्यकारक आहे. भारतीय संघनिष्ठ वैदिकवादी विद्वानही युरोपियन-केंद्रित सिद्धांत वैदिक केंद्री बनवू पाहतात व सामाजिक समतोल बिघडवत राजकारणाचे प्यादे बनतात ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे पुरातत्वीय खात्याच्या विद्वानांनीही सांस्कृतिक राजकारणाचे प्यादे बनावे ही!

माणसाला आपली पाळेमुळे शोधण्याची जिज्ञासा असते हे खरे असले तरी ती जिज्ञासा अवैज्ञानिक होत विकृतीकडे झुकली तर कशी विनाशक बनते हे हिटलरने दाखवले आहे. युरोपियन असो की भारतीय...आम्हाला परवडणारा नाही. शास्त्राला त्याच्या मार्गाने प्रवास करू द्यावा व नि:पक्ष संशोधन पुढे येत रहावे. भविष्यात अजुनही अकल्पित असे सापडू शकेल पण तेही तात्पुरते आहे हे लक्षात घ्यायला हवे. विज्ञानाचा प्रवास होतच राहणार, पण त्याचे राजकारण होता कामा नये.

इंडो-आर्यन भारतातले स्थलांतरित?

इंग्लंडमधील हडर्सफिल्ड विद्यापीठातील पीएच.डी करणा-या विद्यार्थिनी मारिया सिल्वा व त्यांच्या सहयोगी विद्यार्थ्यांनी केलेल्या (‘बीएमसी इव्होल्युशनरी बायोलॉजी’ मार्च २०१७) केलेल्या संशोधनानुसार भारतात किमान तीन वेळा ठळक मानवी स्थलांतरे झाली. पहिले स्थलांतर आफ्रिकेतून सरासरी पन्नास हजार वर्षांपूर्वी झाले. हे स्थलांतरित प्राधान्याने शिकारी व अन्नसंकलक होते. दुसरे स्थलांतर इराणमार्गे हिमयुगानंतर दहा ते वीस हजार वर्षांपूर्वी झाले. या स्थलांतरितांनी भारतात कृषी संस्कृतीचा पाया घातला. जनुकीय संकेतांनुसार नंतरचे तिसरे मोठे स्थलांतर इराणमधून साडेचार हजार वर्षांपूर्वी झाले, असे दिसते. हे लोक पुरुषप्रधान संस्कृतीचे होते. पुरुष संक्रामक वाय क्रोमोझोनच्या प्राबल्यानुसार हे लोक इंडो-युरोपीयन म्हणजेच संस्कृत भाषेचेही वाहक होते. या मूळच्या लोकांपैकी काहींचे स्थलांतर युरोपमधेही झाले. तेथे संस्कृतच्या समकक्ष ग्रीक व लॅटिन भाषांचा उदय झाला. कॅस्पियन व काळ्या समुद्राच्या मधल्या भागात या लोकांचा उदय झाला व ते पुरा-संस्कृत भाषा बोलत होते. हेच लोक इराणमध्ये आले व त्यातील काही भारतात स्थलांतरित झाले. पुरातन मानवी सांगाड्यांतील जनुकांवरून मानवी स्थलांतराच्या दिशा शोधता येतात. भारतातील मातृक जनुके प्राचीन असून, पैतृक जनुकांमधे मात्र सरासरी साडेचार हजार वर्षांपूर्वी झालेले नवे बदल टिपता येतात. या कांस्ययुगातील जनुकीय बदलाचे फरक तीव्र असल्याने त्यामुळे इंडो-आर्यन लोकांच्या भारतातील स्थलांतराचा तर्क खरा ठरतो, असे एकंदरीत या अहवालाचे म्हणणे आहे. या संशोधक गटात विद्यार्थ्यांबरोबर मार्टिन रिचर्ड्स हे जनुकीय-पुरातत्वाचे प्राध्यापकही सामील होते.

(Published in Divya Marathi, Rasik Supplement, 27-8-64)

No comments:

Post a Comment

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...