Tuesday, November 14, 2017

फॅसिस्ट पुरोगामी


Image result for fascist



अस्पृश्यता हा भारतीय समाजावरील सर्वात मोठा कलंक मानला जातो. स्वातंत्र्यपुर्व काळातील अस्पृश्यतेच्या कुप्रथेने एक मोठा समाज अन्याय, वेदना आणि आक्रोशांच्या विदारक चक्रव्युहात अडकलेला होता. स्वातंत्र्यानंतर घटनेने अस्पृश्यता संपवली असली तरी अजुनही अनेक रुपांत ती शेष आहे. महिला व दलितांना आजही काही ठिकाणी प्रवेशबंदी आहे. त्याविरोधात पुरोगामी वर्ग नेहमी आवाज उठवत असतो. प्रसंगी आंदोलनेही करत असतो. अस्पृश्यता हे एक पाप आहे असे हा वर्ग मानतो असे आपण पाहतो. पण अस्पृश्यता आहे, प्रत्यक्ष समाजव्यवहारात कमी असली तरी वर्तनात व विचारांत ती आहे हेही एक वास्तव आहे आणि त्याचे काय करायचे हा आपल्यासमोरील मोठा प्रश्न आहे. 

धर्मवादी, धर्मांध किंवा ज्यांना फॅसिस्ट समजले जाते अशा कोणत्याही धर्माच्या अथवा विचारधारांच्या समुहाविरुद्ध पुरोगामी असतात असे साधारनपने मानले जाते. फॅसिस्ट या शब्दाची व्याख्या आपण आधी पाहिली पाहिजे म्हणजे हा फॅसिझम फॅसिस्टविरोधात आहेत असा जे आव आणतात त्यांच्यातही रुजला जात असल्याने तो केवढा धोकेदायक बनला आहे हे आपल्याला समजेल. 

अतिरेकी राष्ट्रवादाची/धर्मवादाची निर्मिती करत लोकांना एकव्युहात आक्रमकपणे सामावून घेण्याचा प्रयत्न करत, अर्थवाद, वंशवाद अथवा धर्मवादाला आधारास घेत जी सामाजिक व राजकीय व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो त्याला फॅसिझम म्हणतात व या तत्वज्ञानाच्या एकनिष्ठ पाईकास फॅसिस्ट असे म्हणतात. यात मानवी स्वातंत्र्य, मानवता, विचारांचा खुलेपणा याला स्थान नसते. फॅसिझम कोणत्यातरी तत्वाला, धर्माला वा अर्थरचनासिद्धांताला टार्गेट करत त्याला शत्रू घोषित करत असतो. आपली सारी व्युहरचना त्या वास्तविक अथवा काल्पनिक शत्रुच्या नायनाटासाठी वापरत असतो. 

अस्पृश्यता ही एक प्रकारच्या फॅसिझमचेच लक्षण असते. अस्पृश्य मानला गेलेला समाज उर्वरीत समाजाच्या दृष्टीने शत्रुसमच असतो. अन्याय करण्यास योग्यच असतो. जणू त्यांनी उर्वरीत समाजाविरुद्ध काहीतरी गर्हणीय असाच गुन्हा केलेला आहे असा समज उर्वरीत स्पर्श्य समाजाचा असतो. त्याला धार्मिक, शुचिता वगैरे तत्कालीक बहाणे देता आले असले तरी एकुणातील दृष्य परिणाम हा एका समाजाला त्याच्या अधिकारांच्या स्वातंत्र्यापासून वंचित करणे हाच असतो.

यात एक बाब हरपते व ती म्हणजे हे स्पृश्य-अस्पृश्यतेचे नियम ठरवण्याचा अधिकार स्पृश्यांना कोणी दिला? त्यांची शुचितेची व्याख्या अंतिम आहे हे कोणी सांगितले? अमुक खालचा आणि तमुक वरचा हे ठरवायला कोनते मापदंड वापरले गेले? ते मुळात मुदलातच नसतील तर मग समाजव्यवस्थेतील उच-नीचता हा केवळ बहुसंख्येच्या मान्यतेच्या बळावर अल्पसंख्यकांवर आपली सत्ता लादण्याचा प्रयत्न नाही काय? आणि हेच प्रश्न आपण वेगळ्या परिप्रेक्षात, आधुनिक काळातही विचारु शकतो.

त्याउलट पुरोगामी मात्र सर्व मानव समान आहेत, माणसात परिवर्तन होत असते हे जाणून त्या मानवतावादी परिवर्तनासाठी प्रबोधनात्मक कार्य लेखन, वक्तृत्व व आपल्या वर्तनातून करत असतात. पुरोगामीपणाकडे अनेक बाजुंनी पाहता येते. पुरोगामीपणाची व्याख्या जरा व्यापक आहे. ती जीवनाची सारी अंगे स्पर्शते. मग ती भौतिक असोत, ज्ञानात्मक असोत वा निखळ वैचारिक असोत. जोही कोणी काल होता त्या स्थितीपेक्षा आज वैचारिक/ज्ञानिक/आर्थिक उत्थान करीत उद्या याहीपेक्षा मोठा पल्ला गाठायचा प्रयत्न करत असतो आणि अधिकाधिक मानवतावादी जो होत जातो त्याला आणि त्यालाच फक्त पुरोगामी म्हणता येते. असे पुरोगामी अस्तित्वात आहेत हे समजयच्व्हे मापदंड काय, की ते केवळ म्हणताहेत म्हणून पुरोगामी हाही प्रश्न उपस्थित होतो. 

पुरोगामी हा परिवर्तनवादी असतो हे ओघानेच आले. स्वत:सोबतच समाज आणि एकुणातील शोषणकारी  व्यवस्था यात बदल घडवण्याचा तो प्रयत्न करीत असतो. सर्व समाजच एका व्यापक ध्येयाकडे वाटचाल करेल अशी आशा तो बाळगून असतो. त्यात द्वेष, विखार यांचा लवलेशही नसतो. समाज पुरोगामी, परिवर्तनवादी बनावा असा प्रयत्न करणे हे सुदृढ समाज निर्मितीसाठी आवश्यक आहे असे विवेकी लोक मानतात. ज्या गोष्टी समाज स्वत:हून करणार नही त्या कायद्याने करण्याचा प्रयत्न केला गेला जातो. सतीप्रथा ते अस्पृष्यताबंदी या बाबी कायद्यानेच कराव्या लागल्या. हा इतिहास आपल्याला माहितच आहे. तरीही समाज रातोरात बदलत नाही. त्याची मानसिकता बदलायचा प्रयत्न करावाच लागतो. 

हे झाले तात्विक स्तरावर. समाज हा एकजिनसी कधीच नसतो. तो एकविचाराचा व्हावा असा प्रयत्न फॅसिस्ट जसे करत असतात तसाच प्रयत्न पुरोगामीही करत असतात. दोघांच्या पद्धतीत मात्र प्रचंड फरक असतो. उद्देश्यांतही फार मोठा फरक असतो. सर्वसाधारण समाजाचा तात्विक स्तर हा तेवढा प्रगल्भ झालेला नसल्याने तो अनेकदा नकळत कोणत्या ना कोणत्या बाजुला झुकत असतो. समाजाला असे आपल्या बाजुने झुकवण्याचे प्रयत्न मात्र बव्हंशी गट करत असतात. त्यामुळे समाज हा अंततोगत्वा अनेक विचारगटांचा समूह बनतो. आणि हे समुह प्रत्येकाशी संघर्षाच्या भुमिकेत जात असतात. सामाजिक विचारकलह त्यातून निर्माण होत अधिकाधिक सर्वगामी विचारशक्ती समाजमनात यावी यासाठी असे विचारकलह उपयुक्तच असतात असे म्हणायला प्रत्यवाय नसावा.

सर्वसामान्य माणूस हा नेहमीच विविध व अनेकदा परस्परविरोधी विचारधारांच्या गोंगाटात वावरत असतो. अशा लोकांचे कोणत्या ना कोणत्या विचारधारांशी नाते जुळून त्यांचे शाश्वत-अशाश्वत गट बनणे स्वाभाविक होऊन जाते. या गटांतील वैचारिक संघर्ष स्पृहणीय असला तरी बहुतेक वेळा एक गट दुस-या गटाला वैचारिक "अस्पृष्य" जेंव्हा मानू लागतो तेंव्हा मात्र फॅसिस्टविरोधी म्हणवणारे लोकही नकळत स्वत: प्रति-फॅसिस्ट होताहेत असे चित्र दिसू लागते आणि ते पुरोगामीपणाच्या दारुण पराभवाचे लक्षण आहे असे आपण म्हणू शकतो. यात फॅसिस्टही एक माणुस आहे, फॅसिस्टपणातील धोके जसे दुस-यांना आहेत तेवढेच त्याला स्वत:लाही आहेत आणि तो बदलू शकतो हे अभिप्रेतच नसते. यातून ही वेगळी झुंडशाही आकाराला येते. आणि परिवर्तनवादाचे मग काय होणार हा प्रश्न उपस्थित होतो.

भारतात सध्या भाजपचे सरकार आहे. ते संघ विचारधारेवर आधारीत राजकीय पक्षाचे सरकार आहे. पंतप्रधान मोदी हे संघाचे माजी स्वयंसेवक असल्याने या सरकारला संघीस्ट सरकार मानले जाते. संघ हा वरील दिलेल्या व्याख्येत ब-यापैकी बसत असल्याने त्याला फॅसिस्ट म्हणायची प्रथा आहे. अर्थातच भारतातील पुरोगामी लोकांनी त्याला शत्रू मानून टाकले आहे व जे जे संघाचे ते ते निषिद्ध आहे असेच ते मानतात. कम्युनिस्ट हे संघाचे शत्रू असल्याने कम्युनिस्ट हे आपले मित्र अथवा समविचारी नसले तरी त्यांच्याशी सामाजिक/राजकीय सोयरिक करायला यांची हरकत नसते. अगदी आंबेडकरवाद आणि मार्क्सवादातील साम्यस्थळे शोधत दोहोंची मोट बांधण्याचा प्रयत्न होतो. इतका की काही महान पुरोगामी विचारवंत माओवादाची व गांधीवादाची तुलना करीत माओवादी हे शस्त्र हाती घेतलेले गांधीवादी आहेत असे म्हणतात. कन्हय्याकुमारमधे आपला नायक पाहण्याची प्रवृत्ती काही समाजांत निर्माण झाली आहे. पुन्हा त्याला आंबेडकरवाद्यांनी स्विकारावे की नाही यावरचे वादंगही आहे. संघ या दोघांचा शत्रु आहे व त्याला नेस्तनाबुत केल्याखेरीज देशाचे कल्याण होणे शक्य नाही असा त्यांचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष दावा आहे. त्याउलट लालभाई हे देशशत्रू आहेत असा संघाचा दावा आहे. पुरोगाम्यांना "फुर्र्रोगामी" "फेक्युलर" वगैरे नव्या संज्ञा संघवादी अथव संघ प्रेमींनी निर्माण केलेल्याच आहेत. त्यांच्यातील तुमुळ युद्ध सर्व आघाड्यांवर खेळले जाते. सामाजिक माध्यमांमुळे या संघर्षाला कसलेही वैचारिक गांभिर्य न येता उभयपक्षी सवंग उथळपणाचा उद्रेक होतांनाही आपल्याला दिसतो. 

तर असे हे गट बनतात. प्रत्येक जण आपापल्या गटाचे अलिखित संकेत पाळतात व ते म्हणजे गट विचाराशी "गद्दारी" करायची नाही. अशा गद्दारांना सामाजिक माध्यमांतुन "नारळ देणे" ही नित्याची बाब असते. अनेक नियतकालिकेही अशा कोणत्या ना कोणत्या झुंडींचे प्रतिनिधित्व करतांना दिसतात. एवढेच नाही तर कोणत्या ना कोणत्या झुंडीत्व नुसता प्रवेश मिळवायचा नाही तर त्या गटाचे वैचारिक (?) नेतृत्व करायचे या आकांक्षेने पछाडलेले तथाकथित विचारवंतही जीवाचा आटापिटा करतांना दिसतात. हा आटापिटा अनेकदा कीव येण्याच्या पातळीवर जातो. ते आपण आपापल्या गताशी निष्ठावंत राहण्याचा वा आपण आहोत असे दाखवण्याचा प्रयत्न करतातच पण सर्वांपेक्षा जास्त उग्र भाषा वापरली तरच आपले नेतृत्व उंचावेल असा त्यांचा भ्रम असतो. त्यामुळे काही समाज-विसंगती पहायला मिळतात.  

उदाहनार्थ संघ धर्मवादी अथवा धर्मांध आहे असे मानले तर देशात मुस्लिम/ख्रिस्ती/जैन/बौद्ध धर्मांधही असतात याकडे लक्ष देण्यास सहसा को्णाला फुरसत मिळत नाही. घेतली तर  त्यांच्याबद्दल मात्र तुलनेने सौम्य भुमिका घेतली जाते. किंवा त्या धर्मांधतेच्या उदयाचे खापर अन्य धर्मांधांवर फोडले जाते. सर्व प्रकारची धर्मांधता वाईट असेल तर आपण अशी निवडक भुमिका कोणत्या वैचारिक पायावर घेतो हे त्यांना समजत नाही. यातुन कोणत्याही प्रकारची धर्मांधता संपनार नाही हे यांच्या गांवी तरी आहे की नाही हा प्रश्न पडतो.

मानवी हत्यांनाही त्या नेमक्या कोणाच्या व कोणत्या गटातील लोकांच्या हे बारकाईने पाहिले जाते. म्हणजे माओवाद्यांने सुरक्षा दलांचे शेकडो कर्मचारी व हजारो नागरिक ठार मारले तरी कसलाही गदारोळ पहायला मिळत नाही. त्याची तात्विक मिमांसा करण्याचा प्रयत्नही होत नाही. उलट काही नेते उघडपने नक्षलवादाचा प्रचार-प्रसार करणा-यांना प्रोत्साहन देतात.  हत्या कोणाच्याही असोत,. द्वेष कोणाचाही असो, ब्रेनवाशिंग करणारे कोणीही असोत, हे सारे जर वाईट असेल, यालाच आपण फॅसिझम म्हणनार असू तर मग पुरोगामी म्हणवणारे करतात त्याला काय म्हणायचे हा प्रश्न पडल्याखेरीज राहणार नाही.

बरे, हे येथेच थांबत नाही. मुळात कोणत्या मंचावर जायचे आणि कोणत्या नाही याबद्दलही आपल्याकडे अलिखित संकेत ठरुन गेलेले आहेत. एवढेच नव्हे तर वक्त्यांपैकी कोणाला बोलवायचे आणि कोणाला नाही याचेही असेच अलिखित संकेत पाळले जातात. समजा तुम्ही आंबेडकरी गटाबद्दल पुरेसे प्रेम आहे, बाबासाहेबांवर (आणि गेला बाजार शाहु-फुलेंवर) श्रद्धा असने आणि सर्व दलितशत्रु समजल्या गेलेल्या समाजांचे तुम्ही शत्रु असायला हवे अशी एक अलिखित अट पाळली जानार असेल तरच तुम्हाला बोलावले जानार. समजा तुम्ही तसे नाही आणि तरीही तुम्हाला बोलावले गेले तर त्या गटाला दुस-या गटाच्या टीकेला सामोरे जावे लागनार. समजा एखादा बहुजनवादी म्हणवणारा चुकुन अथवा जाणीवपुर्वक संघाच्या वा संघशाखांच्या मंचावर गेला तर मेलेल्या जनावराला गिधाडे जशी चोचा पारत राहतात तशा चोचा जीवंतपणी अशा व्यक्तीला सहन कराव्या लागतात. संघही आपल्या मंचावर येणारी व्य्क्ती ही किमान soft हिंदुत्ववादी आहे की नाही याचीही चाचपणी करणार. आणि समजा कोणी याहीपार विचार करत निखळ वैचारिकतेचा, विचारस्वातंत्र्याचा पुरस्कार केला आणि सर्वांना मंच उपलब्ध करुन दिला तर त्यांचा बाजार उठण्याचीच शक्यता जास्त.

खरे तर या सर्वच झुंडी एका परीने फॅसिस्टच झालेल्या आहेत असे म्हनायला प्रत्यवाय नाही. विचारांचा कडवेपणा हे फॅसिस्ट असल्याचे लक्षण असेल तर पुरोगामी/बहुजनवादी म्हनवनारे लोक फॅसिस्टच आहेत असे म्हणता येईल. एका संघटनेने सर्व ब्राह्मण पुरुषांना ठार मारुन त्यांच्या बायकांवर बलात्कार करण्याचे आवाहन एका पुस्तिकेत केले होते. पुरोगामी महाराष्ट्रात खुद्द ब्राह्मनही गपगार राहिले होते. आम्ही काही मित्रांनी याविरुद्ध आवाज उठवल्यावर मग इतरांना कंठ फुटला हे अलीकडचेच वास्तव आहे. ही संघटना स्वत:ला पुरोगामी असल्याचे समजते. हा "फॅसिस्ट पुरोगामीपणा" नाही असे कोण म्हणेल?

कोणत्याही संघटनेशी उघड संबंध नसलेले पण वैचारिक सोयरिक घेतलेले असंख्य विचारवंत आज भारतात आहेत. असे विचारवंत पुन्हा कोणत्या ना कोनत्या गटाशी संबंधित अहेत आणि ते त्यांच्या लेखनावरून, वक्तव्यांवरुन सहज लक्षात येते. या लेखनाचे वैशिष्ट्य हे असते की ते आपल्याला मान्य असलेल्या विचारधारेचेच सिद्धांत अंततोगत्वा कसे खरे आहेत हे प्रसंगी कोलांट उड्या मारुन, पुराव्यांची मोडतोड करून सिद्ध करण्याचा आटापिटा करत असतात. संघाकडे अशा विद्वानांची कमतरता नाही. पण बाकी गटही साळसुद आहेत असे मानण्याचे कारण नाही. संघाचा इतिहास दुषित आहे असे म्हणतांना कम्युनिस्टांचा इतिहास सत्यनिष्ठ आहे, पुरोगाम्यांचा इतिहास खरा आहे किंव बहुजनवाद्यांनी लिहिलेला इतिहास खरा आहे असे म्हणायची सोय नसेल तर खरा विषय जो "इतिहास" त्याचे भवितव्य ते काय असणार? इतिहास हे सध्या आपापले गट मजबुत करण्याचे शस्त्र म्हणून वापरले जात आहे हे तर स्पष्टच आहे. यात इतिहासाचे विज्ञान हरवले जानार हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

गांधीवादाचेही सध्या तसेच झाले आहे. गांधीद्वेषाचे परंपरा जपना-या संघधारेच्या मोदींनी एकाएकी गांधीजींचा उदौदो सुरु केल्यावर पायाखालची जमीन सरकली ती गांधीवादी पुरोगाम्यांची. आपल्या महानेत्याचे अपहरण केले जात आहे हे त्यांना सहन होने शक्य नव्हते. त्यांनी मग गांधीजींनाच पुन्हा फडता्ळातून बाहेर काढत संघ गांधीजींची प्रतिमा कशी बदलवण्याचा अश्लाघ्य प्रयत्न करत आहे हे सांगायला सुरुवात केली. गांधीजी कधीही समाजवादाचे समर्थक नसतांना समाजवाद्यांनाही गांधीजींचा पुळका येऊ लागला. यात गांधीजी कोठे राहिले? हे खरे गांधीवादाबद्दलचे प्रेम होते की केवळ मोदींनी गांधींना हात घातल्याबद्दलची प्रतिक्रिया होती?

हा निखळ विचारवाद होता की केवळ प्रतिक्रियावाद होता? गांधीजींचाच शस्त्रासारखा उपयोग करण्याचा हा प्रयत्न नाही काय? यात गांधीवादाची कोनती मुल्ये जपली गेली? यावर चिंतन करण्याची जबाबदारी न घेता याला पोकळ उत्तरे देण्यात धन्यता मानली जाईल हे उघड आहे.

धर्मांधांचे तसेच विचारांधांचे सहिष्णुतेशी वाकडेच असते हे उघड आहे. कोनत्याही तत्वावर अतिरेकी प्रेम असणे हे फॅसिस्ट असण्याचे लक्षण असते. मग ते राष्ट्रप्रेमही का असेना. त्याच वेळीस कोणाचाही अतिरेकी द्वेष करणे, त्यांना अस्पृश्य मानणे हेही फॅसिस्ट असल्याचे लक्षण आहे. पुरोगामीपणा हा परिवर्तनवादाशी अपरिहार्यपणे जोडला गेलेला असतो पण त्याचे भान हरपून कोणत्यातरी गटाचे मतपरिवर्तन होणे शक्य नाही असे मानत, वैचारिक का होईना, कोणत्याही प्रकारची अस्पृश्यता मानतो तो गांधीवादी असुच कसा शकतो? 

वैचारिक विरोध हा तुमचे विचार ठाम पण प्रगल्भतेच्या दिशेने वाटचाल करनारे असतील तर ही वैचारिक अस्पृश्यता पाळण्याचे मुळात कारणच काय? 

फॅसिस्ट लोकही माणसे असतात. माणुस हाच कोणत्याही सर्जनशील विचारकाचा केंद्रबिंदु असतो. कोणी फॅसिस्ट म्हणून जन्माला येत नाही. वर्ण व जाती जन्माधारित आहेत असे समजायचा अवैज्ञानिक काळ उलथुन बराच काळ झाला आहे. मनुष्य एखाद्या विचारधारेचा टोकाचा समर्थक बनतो हेच त्याच्या फॅसिस्ट असल्याचे लक्षण आहे. मग पुरोगामी म्हणवनारेही याच व्याख्येत येतात. मुळात विषय परिवर्तनाचा असतो. मनुष्य एखाद्या विचारधारेच्या टोकाशी जात असेल तर त्याची मानसिकता समजावून घेण्याची जबाबदारी व त्याला बदलवण्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी ख-या परिवर्तनवाद्यावर येते. कोणालाही बदलवण्याचा प्रयत्न न करता वाळीत टाकने, त्यांना अस्पृश्य मानणे हा एकविसाव्या शतकातील गंभीर वैचारिक व नैतिक गुन्हा आहे हे आपण समजावून घ्यायला हवे.

शेवटी धर्मांध जसे टोळीवादाचा आश्रय घेतात तसेच जर पुरोगामी म्हणवनारे गटही टोळीवादालाच शरण जात आपापल्या अवांच्छणीय स्वार्थांना साध्य करण्यासाठी झटत असतील तर त्याला पुरोगामी कसे म्हणता येईल? अशाने  फॅसिझम संपणार नाही तर तो दुप्पट गतीने वाढत सर्वांनाच आपल्या विळख्यात घेत सर्वनाश करेल यात शंका बाळगण्याचे काही कारण नाही. शक्य असेल तर सर्वांनी सर्वांच्या मंचावर जावे, एकावे व ऐकवुन यावे व काय घ्यायचे ते लोकांच्या स्वातंत्र्यावर सोडून द्यावे. झुंडशाही ही पुरोगामेपनात/परिवर्तनतावादात बसत नाही याचे भान आपल्याला यायला हवे. प्रतिगामी जे करतात तेच पुरोगामी करत असतील तर दोघेही प्रतिगामीच राहतील आणि परिवर्तनाची शक्यताच संपुन जाईल हे आपल्याला समजायला हवे.

अस्पृश्यता हा कलंक असेल तर वैचारिक अस्पृश्यता हा त्याहुनही भिषण अपराध आहे व तो आपल्या देशाच्या प्रगल्भ वाटचालीसाठी योग्य नाही. फॅसिझममुळे अन्य समुदायांवर अत्याचार झाले हे जेवढे खरे आहे तेवढेच त्या नादात फॅसिस्टांनीही आपला विनाश करुन घेतला आहे हा इतिहास या देशातील धर्मांध/विचारांध व त्यांच्या समर्थक पुरोगामी म्हणवणा-या गटांनी लक्षात घेतला पाहिजे. 

(Published in Sahitya Chaprak, Nov. 2017)

6 comments:

  1. Good writing after a long time.

    ReplyDelete
  2. Bhau kadam ne ya warshi ghari ganpati baswala mhanun tyla baudh dharmatun baher karnyachi dhamki dalit baudh lokani dili, shevati wad nako mhanun Bhau ne mafi magun prakaran mitawale, tenva tathakathit dhongi purogami lokani botchepi bhumika ghetli

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. A very good write up covering important aspects . Thanks !

    ReplyDelete
  5. माझं पण थोडस असच मत आहे

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...