Saturday, November 4, 2017

मुहुर्तांना सोने खरेदी करायचे की म्युच्युअल फंड?


भारतियांना सोन्याचे अननुभूत आकर्षण आहे हे अगदी पुरातन काळापासुनचा इतिहास पाहिला तरी सहज लक्षात येते. आजही त्या स्थितीत फारसा बदल झाला आहे असे नाही. विशिष्ट मुहूर्तांवर सोने खरेदी करणे ही आपल्याकडे एक परंपराच होऊन बसली आहे. दागिण्यांची आपली हौस समजून घेता आली तरी सोने हा गुंतवणुकीचा किती आदर्श पर्याय आहे हे आपण पुन्हा एकदा तपासून पाहिले पाहिजे. खरे तर सोन्यातील गुंतवणूक ही अर्थव्यवस्थेच्या उलाढालीत कसलीही भर घालत नसल्याने ही एक अनुत्पादक गुंतवणूक मानली जाते. सोन्याचे भाव भविष्यात वाढतील हीच काय ती गुंतवणुकदाराला आशा असते. शिवाय अडीअडचणीला सोने बाजारात कधीही विकून रोकड मिळवता येते ही भावनाही यामागे काम करत असते. पण ही भावना खरे तर आता तरे कालबाह्य व्हायला हवी याची काही कारणे आहेत व ती आपल्या अर्थ साक्षरतेशी निगडित असल्याने आपण त्यावर येथे थोडक्यात विचार करु.

सोन्याचा भाव निरंतर वाढतच राहील अशी आशा सोन्यातील गुंतवणुकीमागे असते. सोनेच नव्हे तर चांदी व मौल्यवान खड्यांतील गुंतवणुकीबाबतही हेच म्हणता येईल. सोन्यावर आपल्याला कोणताही लाभांश अथवा व्याज मिळनार नसते. भविष्यात भाव वाढतच राहतील असे म्हणावे तर २०१२ साली ३१,०५० रुपये प्रती तोळा गेलेला सोन्याचा भाव आज २८,५०० रुपये प्रतितोळ्याच्या आसपास घोटाळतो आहे. म्हणजे गेल्या पाच वर्षांत सोन्याच्या भावात सरासरी दहा टक्क्यांनी घटच झाली आहे असे आपणास दिसून येईल. (सोर्स- https://www.bankbazaar.com/gold-rate/gold-rate-trend-in-india.html moneycontrol.com) भविष्याचा कल काय असेल हे सर्वस्वी मागणी-पुरवठ्यावर आधारित आहे. भविष्यातील मागणी काय असेल हे अनेक घटकांवर ठरते. उदा. अर्थव्यवस्थेतील अनिश्चिततेची भिती हे महत्वाचे कारण सोन्यामधील गुंतवणुकीचे असते. भारतात मध्ययुगात सातत्याने असलेली राजकीय अस्थिरता व युद्धे यामुळे सोने गुंतवणुकीचा कल मोठा होता. गुंतवणुकीचे शेतजमीनीव्यतिरिक्त पर्यायही उपलब्ध नव्हते. आपत्तीत शेती तडकाफडकी विकता येणेही अशक्य असल्याने भारतियांनी सोन्यातील गुंतवणुकीला प्राधान्य देणे स्वाभाविक असले तरी आजतागायत तीच मानसिकता आपल्यावर राज्य करत आहे हे आपल्या लक्षात येईल. याचा गैरफायदा अनेकदा सोन्याचे व्यापारी कसे घेतात हे फोर्ब्ज या आंतरराष्ट्रीय नियतकालिकाने "सोन्यातील गुंतवणूक वाईट का?" हे विषद करतांना दाखवून दिले आहे. (सोर्स- https://www.forbes.com/sites/johnwasik/2016/11/18/four-reasons-why-gold-is-a-bad-investment/#705f1eb23a03)

सोने म्हणजे रोकड तरलता हा एक गैरसमज आहे. भविष्यासाठीची गुंतवणूक म्हणून तिला प्रभावी मानता येत नाही. ही गुंतवणूक एक प्रकारची मृत गुंतवणूक असल्याने अर्थव्यवस्थेलाही तिचा फायदा नाही. भारतातील मंदिरे व घरांत वीस हजार टनांपेक्षा अधिक सोने पडून आहे. या सोन्याचे मूल्य किमान ८०० अब्ज डॉलर एवढे आहे. अर्थव्यवस्थेला मात्र हे संपत्तीबळ कुचकामी आहे. भारत सरकारलाही याची चिंता असल्याने पर्याय म्हणून गोल्ड बॉण्ड आणले जातात. यावर २.५% व्याजही देवू केले जाते. (सोर्स- इकॉनॉमिक टाईम्स , फेब्रु. २०१७) पण तरीही सामान्यपणे लोकांचा कल प्रत्यक्ष सोनेच घरात (अथवा बॅंक लॉकरमधे) ठेवण्याकडे असतो असे सामान्यपणे आपण पाहू शकतो.

याउलट म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीचे आहे. एक तर यात किती व्यापक पर्याय उपलब्ध आहेत हे आपण पाहिलेच आहे. एक वेळ सोने चोरी जाऊ शकते पण तुमची म्युच्युअल फंडाची चोरी कोणी करु शकत नाही. यात उणे-अधिक वाढीचा हवा तेंव्हा फायदा घेता येत असून तुम्हाला रोकडसुलभताही सांभाळता येते. आपण केवळ २०१६ ची एकुण सर्व गुंतवणुक पर्यायांची तुलना जरी केली तरी आपल्याला म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीने सर्वाधिक, म्हणजे १७.६%, परतावा दिला आहे हे आपल्या लक्षात येईल. (सोर्स- इकॉनॉमिक टाईम्स-२ फेब्रु. २०१७). सोन्यातील गुंतवणुकीचा तरलता हा जो लाभ आहे तो म्युच्युअल फंडातही आहेच. शिवाय सोन्यातील गुंतवणूक आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक यांची तुलना केली तर जोखिमीचे प्रमाण म्युचुअल फंडात तुलनेने कमी आहे असे आपणास दिसून येईल. कोणत्याही गुंतवणुकीप्रमाने म्युचुअल फंडातील गुंतवणूक ही फंडाची मागील कामगिरी आणि संबंधित कागदपत्रांची तपासणी करुनच करावी. ही सुविधा येथे आहे. सोन्याच्या बाबतीत मात्र प्रत्येक खरेदीदार तज्ञ नसल्याने विकत घेतल्या जाणा-या सोन्याची शुद्धता स्वत: तपासू शकत नाही. विश्वासाच्या बळावरच सामान्यपणे ही गुंतवणूक होते. तसा प्रकार म्युचुअल फंडाबाबत होत नसल्याने म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय बनतो. देशाच्या अर्थव्यवस्थेलाही यामुळे हातभार लागतो. त्यामुळे गुंतवणूक करतांना हा पर्याय लक्षात ठेवला पाहिजे व मुहुर्तांना सोने खरेदी करण्याऐवजी म्युच्युअल फंड खरेदी करण्याकडे आपला कल वाढवला पाहिजे.


अधिक माहितीसाठी खालील लिंकला भेट द्या
https://www.reliancemutual.com/campaigns/RMFContest/index.html

(वैधानिक सूचना: म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते. कोणतीही गुंतवणूक करतांना योजनेशी संबंधीत कागदपत्रे काळजीपुर्वक पहावीत व मगच गुंतवणुकीचा स्वजबाबदारीवर निर्णय घ्यावा.)

No comments:

Post a Comment

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...