Saturday, October 20, 2018

धनगर आणि मराठा आरक्षण : प्रश्न आणि राजकारण


Image result for धनगर आणि मराठा आरक्षण
मराठा व धनगर आरक्षणाच्या मुद्द्याने महाराष्ट्रात गेली काही वर्ष राजकीय व सामाजिक वातावरण तापवलेले आहे. निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसे हे वातावरण अधिकच तापवले जाण्याची चिन्हे आहेत. धनगर समाजाचा प्रश्न मराठ्यांप्रमाणे आरक्षण मिळवण्याचा नसुन वर्गबदलाचा आहे. म्हणजे धनगरांना ओबीसी अंतर्गत भटकी जमात म्हणून आरक्षण आहेच. ते अनुसुचित जमातीत नेत एस.टी. च्या सवलती लागु कराव्यात या प्रश्नाशी निगडित असुन मराठ्यांना मात्र आता आरक्षण नाही. त्यांनी ओबीसी घोषित करुन आरक्षण लागु करावे. त्यांना ते कधी ओबीसींत वाटा न मागता स्वतंत्र हवे असते तर कधी ओबीसीच्या सध्याच्या आरक्षण मर्यादेतच हवे असते. राणे समितीला मुलत घटनात्मक वैधता नसतांनाही राज्य सरकारने ते आरक्षण मंजुर केले होते. त्याला आव्हान देण्यात आल्याने आता हा मुद्दा उच्च न्यायालयात राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाची वाट पहात रेंगाळत पडलेला आहे. 

धनगरांच्या बाबतीतही फडणविस सरकारने टिसकडे (टाटा समाजशास्त्र संशोधन संस्था)  धनगर समाजाची पाहणी करणे तसेच धनगर व धनगड एकच आहेत किंवा कसे या संदर्भात अहवाल तयार करण्याचे काम दिले. राणे समितीला जसा घटनात्मक वैध दर्जा नव्हता तसाच टिसकडेही नाही हे सरकारला महित असतांना त्यांच्याकडे काम सोपवले गेले यात वेळकाढुपणा करणे हाच एकमेव उद्देश्य असल्याचे दिसते. टिसचा अहवाल जरी अधिकृत रित्या विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात आला नसला तरी तो धनगरांच्या अनुसुचित जमातीत समावेशाला प्रतिकूल आहे अशा बातम्या झळकल्याने धनगर समाजात मोठी अस्वस्थता पसरली आहे. तिचा परिणम निवडणुकांवर काय होऊ शकेल व मराठ्यांची भुमिकाही काय असेल हे तपासने महत्वाचे तर ठरेलच पण या आरक्षणाच्या मागण्या व त्यासाठी केली जाणा-या आंदोलकांकडे नेमके को्णते ठोस मुद्दे आहेत हेही पहायला हवे.
 
मराठा समाजात आता बेरोजगारीमुळे व शेतीचे पिढ्यानुपिढ्या तुकडीकरण होत आल्याने दारिद्र्याचे प्रमाण वाढले आहे हे खरे आहे. शिक्षनात हा समाज मोठ्या प्रमाणावर मागे राहिला आहे हेही खरे आहे.राजकीय क्षेत्रात मात्र या समाजाकडे आज जवळपास ६५% वाटा आहे हेही एक वास्तव आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील बहुतेक शिक्षणसम्राटही याच समाजातून आले असून पतसंस्था, सहकारी ब्यंका, साखर कारखाने, सूतगिरण्या आदिंच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या नाड्याही याच समाजाच्या हातात आहेत. ओबीसींच्या आरक्षणामुळे ग्रामपंचायतींवरील सत्ता मात्र कमी होत चालली आहे. या समाजाची नेमकी खंत काय आहे? शिक्षण-रोजगारातील वाटा कमी होतोय ही कि सत्तेत वाटेकरी निर्माण झालेत ही? 

मराठ्यांना आरक्षण मिळायचे आसेल तर त्यांना सामाजिक मागास या व्याख्येत प्रथम बसवावे लागेल. सत्तेत एके काळी व आजही कोनत्या ना कोणत्या रुपाने सहभागी असलेल्या समाजास केवळ आज दारिद्र्याची अनवस्था कोसळली आहे या कारणाने सामाजिक मागास कसे ठरवता येईल हा एक प्रश्न आहे. कोणत्याही समाजास आरक्षण देतांना त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात पुरेसे प्रतिनिधित्व आहे की नाही हा मुद्दा सर्वप्रथम लक्षात घेतला जातो. शिवाय "आम्हाला राजकीय नको, फक्त नोक-या व शिक्षणातले आरक्षण हवे" असेर्ही कोणाला म्हणता येत नाही. कारण आरक्षण असे तुकडे करुन देता येत नाही. समजा वेगळा प्रवर्ग तयार करायचा ठरवले असले तरी आरक्षणाची ५०% ची मर्यादा ओलांडता येत नाही. त्यासाठी घटना दुरुस्तीच करावी लागेल. सामाजिक मागासच्या व्याख्या बदलाव्या लागतील तसेच राजकीय प्रतिनिधित्वाची अट काढुन टाकावी लागेल. म्हणजे मराठ्यांना (व जाट, गुज्जर, पाटीदारांना) आरक्षण द्यायचेच असेल तर घटनेत बदल करणे अनिवार्य आहे. राज्य सरकार त्यात काही करु शकत नाही. पण हे वास्तव समजावुन न घेता मराठा आंदोलनाचा प्रश्न पेटवला गेलेला आहे हे उघड आहे. यात नेत्यांचे राजकारण होत असुन आरक्षणाची आस लाऊन बसलेल्या मराठा तरुणांची भावनिक फसवणुक होते आहे हे लक्षात घेतले पाहिजे. किंबहुना राजकीय नेतृत्वे प्रस्थापित करण्यासाठी आरक्षण हा कळीचा मुद्दा बनवला तर गेलेला नाहीय ना याचाही विचार करायला पाहिजे.

शिवाय मराठा आरक्षण आंदोलनांनी ओबीसी समाजघटकात प्रचंड अस्वस्थता निर्माण केली असुन कधी एकत्र न येणा-या ओबीसी जाती एकत्र येत मराठ्यांविरुद्ध उभे ठाकायची सुरुवात झाली आहे. किंबहुना त्यांचा मराठ्यांच्या ओबेसीकरणास विरोध आहे कारण त्यातुन ओबीसींवर काय आक्रेत कोसळू शकणार आहे याची त्यांना कल्पना येवून चुकली आहे. मराठ्यांना आरक्षण हा केवळ मराठ्यांच्या उन्नतीचा भाग नसुन तो ओबीसींच्या हक्कांत प्रबळ वाटेकरी निर्माण करणारा प्रकार आहे आणि त्यात ओबीसींना हाराकिरीच करावी लागणार हे संकट त्यांनी ओळखले आहे. त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी हाही एक संघर्ष उभा ठाकला असुन निवडणुकांवर याही संघर्षाची गडद छाया असणार हे उघड आहे.

धनगर आरक्षणाचा तिढा अजुनच विचित्र आहे. किंबहुना तो विचित्र बनवला गेला आहे. खरे तर धनगर ही जमात असल्याचे राज्य सरकारला मान्य असल्यानेच त्यांना एनटी (सी) या प्रवर्गात आरक्षण दिले गेले. पण ही समाजशास्त्रीय घोडचूक होती. धनगर समाज हा कधीही गांवगाड्याचा भाग नव्हता. आदिम काळापासुन मेषपालन हाच ज्यांच्या उपजीविकेचा व्यवसाय आहे त्यांना अनुसुचित जमातींत आरक्षण न देता ओबीसींत कसे दिले गेले हा गंभीर समाजशास्त्रीय प्रश्न असतांनाही तसे केले गेले. धनगरांच्या मते अनुसुचित जमातीत त्यांचा समावेश आहेच पण तो भाषाशास्त्रीय चुकीतुन "धनगड" असा लिहिला गेला व ती चुक दुरुस्त न करता धनगरांचे न्याय्य हक्क डावलले गेले. 

येथे महत्वाची बाब अशी की धनगड नांवाची जमात संपुर्ण देशात अस्तित्वातच नाही. ओरान जमातीचीही ही पोटजमात नाही. धानाच्या शेतावर काम करणा-या सालगड्यांना "धांगड" म्हटले जाते, पण ते केवळ एक संबोधन आहे, ती कोणतीही पोटजमात नाही. शिवाय ओरान जमातीच्या लोकांना आपल्याला कोणी "धांगड" म्हणने अपमानास्पद वाटते. (संदर्भ- Maharashtra, Part 3, edited by B. V. Bhanu, पृ. १५८६) धांगड हा शब्द व धनगड हा शब्द इंग्रजीत एकाच स्पेलिंगने व्यक्त होत असला तरी देवनागरीत तो "धांगड" नव्हे तर "धनगड" असाच सर्वत्र लिहिला जातो. अनेक परिपत्रकांत आदिवासी मंत्रालयाने "धनगर" असाच शब्दप्रयोग केला आहे, धांगड अथवा धांगर असा नाही. त्यामुळे धनगड हे ओरान जमातीचे उपनांव म्हणून शेड्युल्ड ट्राईबच्या यादीत सामाविष्ट केले गेले नसून ते स्वतंत्र व धनगर जमातीच्या समकक्ष आहे हे स्पष्ट आहे. पण केंद्र व राज्य सरकार हे मान्यच करायला तयार नाही.

त्यामागे कारणे आहेत. सध्याचे स्थिर आदिवासी धनगरांच्या एसटीतील समावेशाला विरोध करत आहेत. त्यांनाही आपल्यात कोणी वाटेकरु नको आहे. त्यांना दुखावण्याची राजकीय इच्छाशक्ती नसलेले नेते आता चुक मान्य करुन धनगरांशी न्याय करण्याच्या मानसिकतेत नाहीत. काका कालेलकरांनी धनगर समाजाच्या दुर्दशेबाबत आपल्या १९५६ च्या अहवालात सविस्तर लिहिले होते. पी. के. मोहंती यांनी तर म्हटले होते की भटक्या आणि विमुक्त जमातींची अवस्था डोंगरद-यातील स्थिर आदिवासींपेक्षाही भयानक असतांना महाराष्ट्र शासनाने त्यांचा समावेश अनुसुचित जमातीत न करुन देशातले एकमेव बौद्धिक मागास राज्य असल्याचे सिद्ध केले आहे. खरे तर आदिवासींचे तीन प्रकार पडतात. डोंगरद-यांत स्थिर राहिलेले, निमभटके पशुपालक व बंजारांप्रमाने नित्य भटके हे सर्व आदिवासी होत. पण राज्य व केंद्र सरकार आपल्या राजकीय अपरिहार्यतेमुळे निवडणुकीपुरत्या, अनेकदा तद्दन खोट्या, घोषणा करत धनगरांचा गैरवापर करत आले आहेत.

त्यात धनगरांकडे एकजिनसी सर्वमान्य नेतृत्व नाही. राजकीय व आर्थिक तत्वज्ञानाचा अभाव आहे. धनगरांचे अनेक नेते असुन त्यांचे गटतट व प्रश्नांबाबतची सखोल जाणीव नसणे हा एक मोठा दोष आहे. मराठ्यांमध्ये जेवढी राजकीय व सामाजिक जाणीव तीव्र आहे त्यात धनगर खुपच मागे पडतात. त्यामुळे त्यांची मागणी न्याय्य असली तरी भाबडेपणा व अतीभावनिकतेच्या आहारी गेल्याने दिली जाणारी आश्वासने मुळात राज्य सरकार कशी पुर्ण करणार आणि करत नसल्यास कशी पुर्ण करुन घ्यावी याची ठोस आखणी त्यांच्याकडे नाही. त्यामुळे याही निवदणुकीत त्यांच्या हाती आश्वासनांपलीकडे काही लागेल असे चित्र दिसत नाही. जो कोणी प्रबळ पण पुर्ण करता येणार नाही असे आश्वासन देईल त्याच्या मागे मोठा वर्ग जाईल असे फार तर म्हणता येईल. धनगर सत्ताबदल करु शकण्याची संख्यात्मक शक्ती बाळगुन आहेत व सर्व राजकीय पक्षांना याची जाणीव आहे. कोणता ना कोणता पक्ष त्यांना याही वेळेस आपल्याकडे वळवेल, पण धनगर समाजाची मागणी पुर्ण केली जाईल असे आत्तापर्यंतचे तरी चित्र नाही. 

टिसचा अहवाल तसाही घटनात्मक दर्जा नसल्याने कसाही असला तरी धनगरांसाठी निरुपयोगी आहे. राज्य सरकार मनात असेल तर धनगरांना "धनगड" नांवाने प्रमाणपत्रे जारी करु शकते कारण धनगड अथवा धांगड नांवाची कोनतीही दुसरी जमात महाराष्ट्रात रहात नाही. तसे करायचे नसेल तर केंद्र सरकारकडे धनगडचे धनगर करावे असा प्रस्ताव पाठवु शकते. यापैकी एकही काही न करता टिसला नेमणे म्हणजे धनगरांची हेतुत: फसवणुक करणे. ही फसवणुक धनगरांच्या लक्षात आल्याने त्याचा परिणाम विद्यमान सरकारला फटका बसण्यात होऊ शकतो. या आरक्षण आंदोलनांतुन धनगर समाजातही नवी नेतृत्वे निर्माण होत आहेत, किमान जागरुकता येत आहे हे फलित असले तरी त्याचे रुपांतर न्याय्य मागण्या मान्य करण्यात होते की नाही हे पाहने महत्वाचे ठरेल.

एकंदरीत येती निवडणुक ढासळ्ती अर्थव्यवस्र्था, बेरोजगारीचा विस्फोट व सामाजिक असंतोषाच्या पार्श्वभुमीवर जशी होनार आहे तशीच आरक्षणाची वचने आणि प्रत्यक्ष केलेले काम हेही कळेचे मुद्दे राहणार आहेत. घोडामैदान जवळच आहे. 

-संजय सोनवणी   

4 comments:

  1. एकदम तार्किक विश्लेषण केले आहे सर!!!

    ReplyDelete
  2. प्रकरण मा.न्यायालयात दावा दाखल आहे किंवा कसे,याबाबत काही निदेश दिले आहेत काय, टिस अहवाल वैधानिक नसला तरी त्यातील निषकर्ष ला प्रतिवादाच्या तयारी साठी व यापुढेही सरकारने एखादे वैधानिक दर्जा देऊन आयोग नेमला व टिस प्रमाणेच शिफारशी झालयल्यास प्रतिवादासाठी टिस चयच्या शिफारशी वा माहिती आपण येथे मांडून प्रतिवाद करावा, जेणेकरून समाजाची दिशाभूल थांबेल.

    ReplyDelete
  3. आपल्यापेक्षा लहान भावांचे ताट हिसकावणे सोपे असते... आपसात भांडायला फार काही मर्दानगी लागत नाही...परंतू ओपनच्या 50 टक्के जागांवर साडेतीन टक्के कब्जा करून बसले आहेत, असे बोलायला-लिहायला हिम्मत लागते... ती हिम्मत अजून आमच्या विचारवंतांकडे आलेली नाही... त्यामुळे ते यांना ओबीसीत घुसवा... त्यांना आदिवासींच्या ताटात बसवा ... असे काहीतरी सोपे--सोपे लिहीत-बोलत असतात... आपली महान ''अक्कल'' आपसात भांडणं लावण्यासाठी वापरण्याएवजी... या सर्वांना एकत्रितपणे ब्राह्मणशाही विरोधात लढायला सांगा ना!... ज्यांना जास्तीचं आरक्षण हवे असेल किंवा ज्यांना इकडे-तिकडे घुसखोरी करून आरक्षण हवे असेल त्यांनी ब्राह्मणांच्या ताब्यातील 50 टक्के ओपन जागात आरक्षण मागावे... मराठा धनगर, पटेल, जाट वगैरे जातींना एकत्रित करून त्यांना आधी 50 टक्के आरक्षण मर्यादा तोडण्यासाठी आंदोलन करायला लावले पाहिजे, त्यासाठी मार्गदर्शन केले पाहिजे... उगाच आपली ''अक्कल'' धांगड-धनगडचा शब्दच्छल करून खराब का करीत आहेत??? आरक्षणावरील 50 टक्के मर्यादा तोडण्याचे आंदोलन करणे म्हणजे डायरेक्ट ब्राह्मणांच्या विरोधात आंदोलन करणे होय... आणी आमच्या बहुजन जाती ब्िाह्मणांना ''भूदेव'' मानत असल्याने, त्यांच्या विरोधात आंदोलन करायला घाबरतात.. तेथे त्यांची मर्दानगी नाही दाखवीत... मात्र लहान भाऊ असलेले ओबीसी-आदिवासी यांच्या विरोधात मिषा पीळतात व मर्द असल्याचे भासवतात... .. खरोखर मर्द असाल तर किमान एकतरी मोर्चा ब्राह्मणांच्या विरोधात काढून दाखवा ..50 टक्के मर्यादा तोडण्यासाठी... मग मी समजेल की खरोखर तुम्हाला ''अक्कल'' आहे....

    ReplyDelete
  4. एवढं रागावू नका सर,ओपन ठेवलेलया 50 टकके जागांपासून कोणाला वंचित ठेवले आहे, सधन कुटूंबानी आरक्षणाच्या ABCD /खिचडीत वाटा घेतांना/ देतांना त्या त्या प्रवर्गाना लोकसंखयेवाईज मालकी हककापेक्षा 50 टकके संख्यात्मक प्रमाणात उपलबध जागांच्या/गुणवत्तेच्या प्रमाणात समन्यायी स्वरुपात दयावे. नाहीतर 75 टककेही राखीव ठेऊन त्याचा vice-versa च होईल. म्हणजे एका बस मध्ये आरक्षित 75जागा पेक्षा वेटींग वालेच डोईजड होतात. पण वरील प्रकरणी दुध का दुध होऊन जाऊ दया.

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...