Friday, April 29, 2022

व्यवसाय करायचाय?

 नव-उद्योजकांसाठी मी सरहद कॉलेजमधील विद्यार्थ्यांसमोर मांडलेले मुद्दे-

१. व्यवसाय करायचा कि नाही हा निर्णय थोर उद्योजकांच्या यशस्वी कहाण्या ऐकून अथवा motivational स्पीकर्सचे ऐकून, तात्पुरते प्रोत्साहित होत तर मुळीच घेऊ नका. तुम्हीच तुमचे मोटीव्हेटर असले पाहिजेत!
२. ध्येय पक्के करा. आपल्या कौशल्य आणि आवडीनुसार व्यवसायाचे काटेकोरपणे निश्चित क्षेत्र ठरवा. संधी शोधा. त्यासाठी वेळ द्या.
३. बाजारपेठेचा अभ्यास करा. बाजारपेठ अस्तित्वात नसली तर ती निर्माण कशी करता येईल याचा विचार करा. गरजा नसलेल्या वस्तूंची (अथवा सेवांची) गरज निर्माण करणे हे ख-या व्यावसायिकाचे कौशल्य असते.
४. भांडवलाच्या किमान आवश्यकता नक्की करा. ते उभे करण्याचे वास्तव मार्ग शोधा.
५. भावनात्मक न होता, किंवा कोणाच्या यशस्वी कथा वाचून, ऐकून, पाहून नक्कल न करता आपल्या व्यावसायिक योजनेची रूपरेखा ठरवा.
६. व्यवसायात थियरी आणि प्रक्टिकल यात प्रचंड अंतर असते. भारतात तर जास्तच. जाणकारांचे विश्वसनीय मार्गदर्शन मिळवा. पहिल्या पिढीचे व्यावसायिक असाल तर एक तरी मेंटोर मिळवा. ज्या व्यवसायात जायचे त्यातील व्यावसायीकांचे वर्तुळ निर्माण करा.
७. फायनान्सर (कोणी असलाच तर) त्याच्याशी चर्चा करताना भावनिक स्वप्नाळू वगैरे होऊ नका.
८. व्यवसायाची नितीमत्ता आणि सामाजिक नितीमत्ता यात फरक असतो. त्याचे नेहमीच भान ठेवा. वेळ पडली तर संभाव्य नुकसान मर्यादित राहील अशा खुशाल तडजोडी करा.
९. नफा हेच ध्येय आहे आणि नफ्यासाठीच उद्योग चालवायचा आहे हे पक्के लक्षात ठेवा. तोट्यात गेलात तर सरकार काय कि समाज काय, सख्खा भाऊही कामाला येणार नाही हे पक्के समजून असा.
१०. अपयशाची पर्वा नको पण अपयश आलेच तर पर्यायी तरतूद करून ठेवा. चुकांमधून शिका. यश तर चुकुनही डोक्यात जाऊ देवू नका, कारण अवेळी झपाट्याने मिळालेले यश अनेकदा भावी अपयशाचे कारण बनते.
आणि शेवटचे...भावनिकता ही व्यावसायिकाची सर्वात मोठी शत्रू असते.
-संजय सोनवणी

हुंझा येथील प्राचीन स्मृतीलेख आणि शिल्पचित्रे!



 

त्या काळी एकटा-दुकटा व्यापारी आपला मूल्यवान माल दूर देशीच्या बाजारपेठेत नेणे शक्यच नसे, कारण लुटारूंची धास्ती. त्यामुळे त्या काळाचे सारे व्यापारी आधीच नियोजन करत आणि एकत्रच आपापले तांडे घेऊन प्रवासासाठी बाहेर पडत. भारतीय व्यापा-यांनी तर श्रेण्याच स्थापन केलेल्या होत्या. विशिष्ट प्रकारचा माल विकणा-यांची एकत्र येऊन स्थापन केलेली संस्था म्हणजे श्रेणी. गांधार भागात या श्रेण्यांना नेकम असेही म्हणत. जातककथांमध्ये व्यापारी व उत्पादकांच्या श्रेण्यांची बहारदार वर्णने वाचायला मिळतात. श्रेण्यांनी केलेल्या दानधर्माचे असंख्य शिलालेख आपल्याला देशभर मिळतात. एकत्र येऊन व्यापार केल्याचे फायदे तर होतेच पण प्रवासासाठी बाहेर पडणा-या तांड्यांना सुरक्षेसाठी रक्षकांची व्यवस्था करणेही शक्य होई. याचा फायदा धर्मप्रचारक/अभ्यासक आणि सामान्य प्रवासीही घ्यायचे. ते शक्यतो अशा तांड्यांसोबतच प्रवास करायचे.

दर २५-३० किलोमीटरच्या टप्प्यावर व्यापारी मुक्कामासाठी थांबत. या जागा ठरलेल्या असत. अशा जागेवर रात्रीच्या मुक्कामासाठी सराया, तर पोट भरण्यासाठी खानावळी असत. घोडे, खेचरे अथवा बैल बदलल्याची, चारा-पाण्याची आणि इतर दुरुस्त्यांचीही सोय अशा ठिकाणांवर केली जाई. एकंदरीत व्यापारी मार्गावरील अशा गावांची आर्थिक भरभराट व्हायची. सम्राट अशोकाचे बव्हंशी शिलालेख अथवा स्तंभ आपल्याला व्यापारी मार्गावरच मिळतात याचेही कारण झटपट राजाज्ञाचा प्रसार हे होते. जेथे दुर्गम प्रदेश असत, कोसोनकोस लोकवस्तीच नसेल तेथे व्यापा-यांनी थांबा कोणता हे कळावे म्हणून रस्त्याच्या आजूबाजूलाच खुणा केलेल्या असत. सर्व बौद्ध शिल्पचित्रे आपल्याला अशा थांब्यांच्या ठिकाणी चिन्ह म्हणून वापरली गेलेली दिसतात.

हिमालयातून जाणारे व्यापारी बैलगाड्यांचा वापर करणे शक्यच नव्हते कारण तशी भौगोलिक स्थितीही नव्हती. त्यामुळे खेचरे, शिंगरे अथवा घोडे सामान न्यायला वापरली जात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर माल नेता येणे शक्य नसे. फक्त दुर्मिळ व मौल्यवान मालच अशा भागांतील मार्गांवरून नेला जायचा. गिलगीट भागातील हुंझा खोरे हे व्यापारी मार्गांचे मिलनस्थळ तर होतेच पण मध्य आशियात जाणारा सर्वात अवघड मार्ग तेथूनच जात होता. तेथून चारी दिशाना अनेक फाटे फुटत. एक मार्ग बाल्टीस्तानमार्गे कारगिल-लेह-ल्हासा असा जाई. एक मार्ग बुर्झील खिंडीतून काश्मीरला जाई. अफगाणिस्तानातील वाखान प्रांताला जाणारा एक मार्ग येथेही होता. सिंधू नदीच्या काठाने स्वात खोरे पार करत जलालाबादच्या मुख्य रस्त्याला भिडता येई तर एक मार्ग तक्षशिलेला पोहोचे. खुंजेराब खिंडीतुनही एक मार्ग जाई पण तो अजूनच अवघड असल्याने त्याचा वापर कमी असे. खुंजेराब या शब्दाचा वाखी भाषेत अर्थच “रक्ताची दरी” असा आहे. आता काराकोरम हायवे मात्र याच खिंडीतून येतो. दोराह खिंडीतून उत्तर अफगाणिस्तानातील चित्राल येथे जाता येई.

यामुळे हुंझाला एक अपार महत्व प्राप्त झाले होते. मध्य आशियात ज्यांना जायचे असे ते गाडी तर सोडा, खेचरे-घोडेही वापरू शकत नसत. झुलत्या दोरांच्या मार्गाने फक्त पाठीवर ओझे लादलेले हमाल जाऊ शकत. त्यामुळे येथवर येणारे व्यापारी आपल्या सोबतचे ओझेवाहू प्राणी येथेच सोडत. स्थानिक हमाल भाड्याने घेत आणि माल नदीचा भयंकर प्रवाह ओलांडून पल्याडच्या बाजूला जात. तेथे त्यांना दुसरे ओझेवाहू प्राणी भाड्याने मिळण्याची सोय असे.  हमाल मंडळी तिकडून आलेल्या व्यापा-यांचा माल पुन्हा पाठीशी घेत हुंझाला परत येत.

येथे अनेक दिशांनी येणारे मार्ग एकत्र येत असल्याने चारी बाजूंनी येणा-या देशोदेशीच्या व्यापा-यांत येथे सौदेही होत. या व्यापा-यांत चीनी, लडाखी, तिबेटी, सोग्दियानी, अफगाणी, रशियन ते भारतीय व्यापारी सामील असत.  येथे राहण्यासाठी सराया तर होत्याच पण बौद्ध स्तुपही अनेक होते. अनेक व्यापारी त्यांना दान देत. सा-या व्यावसायिक गोष्टी जुळून यायला किंवा हवामान अनुकूल व्हायला कधीकधी अनेक दिवस अथवा महिने लागत असल्याने व्यापारी आणि सोबत आलेल्या लोकांन फावला वेळही पुष्कळ असे. हा वेळ ते कसा घालवत?

हुंझा खो-यात हुंझा, नगर, शतीयाल आणि हल्डीकेश थांब्यांच्या परिसरात रस्त्यांलगत अगणित शिल्पचित्रे व लघुलेख सापडले आहेत. इसपू ५००० वर्ष एवढी जुनी प्रागैतिहासिक शिकारचित्रेही येथे मिळाल्याने हा मार्ग तेवढाच पुरातन आहे असे आपण म्हणू शकतो.

या चित्रांवरून तेथे व्यापारी पहाडी-बोकडांच्या शिकारी ते बुद्धीबळासारखे खेळ खेळण्यात वेळ घालवत. याच काळात सांस्कृतिक, भाषिक देवाणघेवाणही होत असे. आपण येथे येऊन गेलो हे सांगणारे ब्राह्मी, खरोश्ती, शारदा, आदि लिपींत लिहिलेले प्राकृत ते ग्रीक भाषेतील लघुलेख (ग्राफिटी) जसे आहेत तसेच सोग्डीयन व चीनी भाषेतील लघुलेखही आहेत. हे लेख लिहिणारे व्यापारी, बौद्ध भिक्षु, प्रवासी तसेच आक्रमक राजनयिक अधिकारीही आहेत.  आपण कोण, वडिलांचे नाव ते तेथे येण्याची तारीख एवढाच तपशील बहुतांश लेखांत आहे. एकार्थाने आपल्या स्मृती कोणत्याना कोणत्या रूपाने जतन करायची प्रवृत्ती पुरातन आहे असे म्हणता येईल. एका अर्थाने तत्कालीन जागतिक संस्कृतींचा मिलाफ व्हायचे हे स्थळ होते आणि त्याचे मुबलक पुरावे या लघुलेखांतून आपल्याला मिळतात.

चीनशी भारताच्या असलेल्या संपर्काचा सन चवथ्या शतकातील एक शिलालेखीय पुरावा येथे मिळाला आहे. हा लेख वेई सम्राटाच्या गु-वेई लॉंग या अधिका-याच्या बदलीसंबंधी आहे तर एक तिबेटी लेख तेथील यशस्वी झालेल्या पहाडी बोकडांच्या शिकारीसंदर्भात आहे. बौद्ध भिक्षूंचे व व्यापा-यांचे तर असंख्य लघुलेख आहेत. तत्कालीन नावे व त्यांचे मुळ स्थान यावरून तेथे येणा-या लोकांचा भौगोलिक विस्तारही समजतो. चित्रांमध्ये मात्र प्राबल्य आहे तेथील पूज्य मानल्या गेलेल्या पहाडी बोकडांचे. असे म्हणतात की स्थानिक तांत्रिक या बोकडांचा मुखवटा घालत आणि मग त्यांच्यां अंगात येई. मग ते प्रत्येक समस्येवर उत्तर सांगत. असे असले तरी बोकडांची संख्या विपुल असल्याने शिकारीवरही प्रतिबंध नव्हता.

थोडक्यात, व्यापारी मार्ग कितीही संकटांनी भरलेला असला तरी संधी मिळाली कि मौजमजा करण्याची संधी व्यापारी व तांड्यातले लोक सोडत नसत. जीवनातील क्षणभंगुरता ज्यांना सातत्याने पहावी लागते ते साहजिक बुद्धाच्या धर्माकडे आकर्षित होणे स्वाभाविक म्हणावे लागेल.  हुंझा भागातील ही पुरातन इतिहास सांगणारी चित्रे व लघु-लेख जागतिक वारशात गणली जातात. अर्थात अगणित लेख व चित्रे काळाच्या ओघात मानवी दुर्लक्ष किंवा प्राकृतिक उत्पातात नष्ट झालेली आहेत हेही एक वास्तव आहेच.

पण, व्यापारी थांबे हे निश्चितच प्रवासाने थकलेल्या प्रवाशी ते श्रामिकाचे लाडके विश्रांतीस्थान होते. अशा ठिकाणी मानवाने आपल्या आठवणी, श्रद्धा जतन तर केल्याच पण असे अवशेष कोठे दिसले तर हा पुरातन व्यापारी मार्ग असावा याच्या खुणाही ठेवल्या गेल्या. कारगिल भागातील सुरु नदीचे खोरे आणि बाल्टीस्तानकडे जाणा-या सिंधू नदीच्या काठच्या मार्गावर आजही व्यापारी थांब्यांच्या स्मृती बुद्धाच्या विशालकाय पाषाण-चित्रांतून जतन झालेल्या आहेत. महाराष्ट्रातील बहुतेक किल्ले व लेण्या व्यापारीमार्गांवरच आहेत हेही लक्षात घ्यावे लागते. व्यापारी मार्गांनी नुसती देशाची अर्थसंस्कृती प्रबळ केली असे नाही तर सांस्कृतिक उत्थानालाही मोठा हातभार लावला हे लक्षात घ्यावे लागते ते यामुळेच!

-संजय सोनवणी






शिक्षण: ज्ञानयुगाकडे कि अंधारयुगाकडे नेण्याचे साधन?



शिक्षण हे भावी पिढी सक्षम आणि प्रगल्भ होण्याचे एक अत्यंत महत्वाचे साधन आहे. पण अनेक विचारधारा हे मान्य करत नाही. शिक्षण हे आपल्याला सोयीच्या विचारांची बनवणे हे त्यांना शिक्षणाचे उद्दिष्ट वाटते. त्यामुळे अभ्यासक्रमांवर ज्या विचारधारेचे राज्य असते त्या विचारधारेचा प्रभाव आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो हे आपण आजवर पाहिले आहे. त्यासाठी इतिहास असो कि पार विज्ञान, यातही फेरफार करून हवे ते अंश विद्यार्थ्यांना शिकवायला भाग पाडले जाते. कोवळ्या वयातच हे होत असल्याने विद्यार्थीही नकळत त्या पद्धतीच्या शिक्षणाच्या-विचारधारेच्या प्रभावात जातो हे एक वास्तव आहे. पालक सहसा कधीही आपल्या मुलांना काय शिकवले जात आहे यात रस घेत नसल्याने ते आपल्या पाल्याला काय चुकीचे आणि काय बरोबर हे सांगण्याच्या स्थितीत नसतात. आणि “जिज्ञासा” निर्माण करणे हा शिक्षणाचा एक महत्वाचा हेतूच आपल्या शिक्षणपद्धतीतून समूळ सुटला असल्याने विद्यार्थीही प्रश्न विचारण्याच्या फंदात न पडता “परीक्षेत येणा-या प्रश्नांना परीक्षकाला हवी वाटतील अशीच उत्तरे लिहून जास्तीत जास्त मार्क कसे मिळवायचे?” या प्रश्नानेच अधिक भेडसावलेले असतात. त्यामुळे भविष्यात पुढेही काय शिकवले, काय बरोबर, काय चूक याची पडताळणी करून पाहत नाहीत. कारण “मार्क म्हणजेच मेरीट” अशा समजाचे सारे शिकार झालेले आहेत. जिज्ञासा-चिकित्सा हे विषय तर बादच आहेत!

अलीकडेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसइ) इयत्ता अकरावी आणि बारावीच्या इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयांच्या अभ्यासक्रमातून शीतयुद्धाच्या काळातील अलिप्ततावादी चळवळ, आफ्रिका आणि आशियातील काही देशांत झालेला इस्लामी साम्राज्यांचा उदय, मुघलकालीन न्यायव्यवस्था अशा इतिहासाला कात्री लावली आहे तर दहावीच्या अभ्यासक्रमातून अन्नसुरक्षेबाबतचा संपूर्ण धडाच काढून टाकला आहे. उर्दूतील प्रसिद्ध कवी फैज अहंमद फैजयांच्या दोन कवितांचे अंशही काढून टाकण्यात आले आहेत. जे वगळले आहे ते बव्हंशी नेमके नेहरू आणि इस्लामच्या संदर्भातील आहे. विद्यमान सरकार हे उजव्या विचारसरणीचे व पुनरुज्जीवनवादी असल्याने हे घडले आहे हे सहज कोणाच्याही लक्षात येईल.

२०१४ साली जेंव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शपथ घेतल्यानंतर त्यांना रा. स्व. संघाचे शिक्षणपद्धतीतील तज्ज्ञ विद्या भारती प्रत्यक्ष भेटले होते. त्यांनी भारतीय संस्कृती, इतिहास, विज्ञान, तत्त्वज्ञान वगैरेंतील भारतीयांचं योगदान अभ्यासक्रमात असायला हवं यासाठी त्यांना आपला कार्यक्रम दिला. त्यानंतर काही दिवसांत मानव संसाधन खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर स्मृती इराणींनी काय केलं असेल तर अभ्यासक्रमात वेद-उपनिषदं, प्राचीन हिंदू भारतीयांचे विज्ञान, सामाजिक शास्त्र, तत्त्वज्ञान, व्याकरण आणि भाषा यातील योगदान समाविष्ट करण्यासाठी पावलं उचलायला सुरुवात केली आणि तसे निर्देश अधिकार्यांना दिले गेले होते. त्यानंतर अभ्यासक्रमांत वेळोवेळी हस्तक्षेप केला गेला याची यादी मोठी जाईल.

 आता तर भाजप सरकारने गेल्या बारा हजार वर्षांचा इतिहास लिहिण्यासाठी समिती नेमली आहे. त्या समितीत केवळ उत्तर भारतीय ब्राह्मण आहेत. विशेष म्हणजे ते सर्व संघ विचारांचे आहेत. वेदकाळ प्राचीन ठरवणे, रामायण-महाभारत खरेच घडले होते हे सिद्ध करणे आणि महत्वाचे म्हणजे सिंधु संस्कृतीचे जनक वैदिक धर्मीयच होते हे दाखवणे आणि हेच वैदिक आर्य जगभर पसरत इंडो-युरोपियन भाषा आणि संस्कृतीचे वाहक कसे झाले हे दाखवणे हा या समितीचा इतिहासलेखनामगील हेतू आहे. यात द्रविड संस्कृती, जैन-बौद्ध संस्कृती, उत्तरपूर्वेची संस्कृती याला स्थानच नाही कारण या समितीत यातील एकालाही प्रतिनिधित्व नाही. प्राकृत पाली भाषा त्यांच्या दृष्टीने अस्तित्वातच नाही. आणि विशेष म्हणजे हा नवा इतिहास २०२४ पासून अभ्यासक्रमात सामाविष्ट करण्याचे सुतोवाच सांस्कृतिक व पर्यटनमंत्री प्रल्हाद पटेल यांनी केले आहे.

इतिहासाचे शास्त्र ज्यांना समजत नाही अशा उजव्या लोकांना या बदलांचे अप्रूप वाटेल खरे, पण कोणाचाही इतिहास, मग तो प्रांत-देश असो कि व्यक्ती, तुकड्यामध्ये वाटता येत नाही. नकळतपणे तो इतिहास हा समग्र समाजाचा बनून जात असतो व त्या त्या समाजातील एकाच वेळेस सहअस्तित्वात असणा-या इतिहासांचे प्रतिनिधित्व करत असतो. इतिहासाचे तत्वज्ञानही असते. आम्ही जेंव्हा इतिहासाचा प्रवाह सैद्धांतिक चौकटीत अथवा आमच्या तर्कनिष्ठ चाकोरीत बसवू पाहतो तेंव्हा इतिहास आम्हाला हसू लागतो. आमचे इतिहासाचे सामान्यीकरण विनाशक ठरू लागते. इतिहास आमच्या नियमांनी कधीच चालत नाही.

पण आम्ही जेंव्हा इतिहासाबाबत स्वनिर्मित नियम बनवतो ते मानवी दोषांनी लिप्त असतात म्हणून आम्ही सांगत असलेला इतिहास हा इतिहास नसून इतिहासाबाबतच्या राजकीय भावनांनी प्रेरित सुसज्जित कल्पना असतात. त्याकडे साशंकतेने पहायलाच हवे. आणि शोधायला गेले तर सर्वच देशांचा इतिहास आरंभापासून आजपर्यंत गौरवशाली आणि अभिमानास्पदच होता असे मानण्याची स्थिती नाही.

 

पण यापारही जो सत्य इतिहास असतो तोही आम्हाला पसंत पडतोच असे नाही. आजवर दिसणारे वास्तव पचवायची शक्ती वाढवायला हवी कारण ते वास्तवही वास्तव असेलच असे नाही. कारण शेवटी इतिहास ख-या अर्थाने आपल्या हाती लागत नाही. आपल्या हाती लागतात ते केवळ समज जे कधीही बदलू शकतात. हीच बाब सातत्याने विकसित होत असणा-या विज्ञानालाही लागू पडते आणि काहीच अंतिम नाही किंवा आता पर्यंत हाती आले ते संपूर्ण सत्यही नाही हे विद्यार्थ्याना समजावून सांगत त्याला पुढील संशोधनाच्या दिशा देणे हे शिक्षणाचे कार्य आहे.

 

पण तसे होत नाही. अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर “आपल्या सोयीचे” इतिहास लादले जातात. विज्ञानाच्या नावाखाली वैदिक विमान, कॉस्मेटिक सर्जरी असले अवैज्ञानिक विषय किंवा विशिष्ट धर्माचा द्वेष वाटतो म्हणून त्यांचा इतिहास वगळणे यातून एकंदरीत शिक्षणाची तर हत्या होतेच पण भावी पिढीही मानसिक दृष्ट्या अर्धवट, पंगु आणि म्हणूनच राष्ट्राच्या विकासासाठी नालायक अशी जन्माला येते. यातूनच एकांगी वैचारिक अतिरेकी जन्माला यायचा धोका निर्माण होतो. मध्ययुगात नेमके असेच घडायचे. राजसत्ता व धर्मसत्ता शिक्षणावर अंकुश ठेवून असायच्या. आपली शक्ती वाढावी यासाठी प्रसंगी प्राणार्पण करणारे राजनिष्ठ सैनिक व धर्मनिष्ठ नागरिक हवेत म्हणून “युद्धात मेलास तर स्वर्ग मिळेल” किंवा “हे धर्मयुद्ध आहे, त्यात भाग घेणे हे तुझे कर्तव्य आहे.” हे जिहादी तत्वज्ञान ते अगदी गीतेचेही सार ठसवले जायचे. किंबहुना तेंव्हाच्या शिक्षणाचा तो गाभाच होता. बाकीचे शिक्षण या तत्वाला पूरक असेच असायचे. फ्रेंच प्रबोधनाने अनिर्बंध राजसत्ता आणि धर्मसत्तेला आव्हान दिले आणि कलेपासून विद्न्यानापर्यंत असलेला त्यांचा अंकुश झिडकारून लावला तेंव्हा कोठे ख-या विज्ञाननिष्ठ पिढ्या निर्माण व्हायला सुरुवात झाली. आज आपण त्या आधुनिक तंत्रज्ञानाची फळे चाखतो आहोत. रोजगार मिळवतो आहोत. पण आपले शिक्षण मात्र क्रमश: आपल्याला प्रबोधनपूर्व अंधारयुगात ढकलत नेते आहे याचे भान दुर्दैवाने आम्हाला अद्याप आलेले नाही. विज्ञानातील नवे शोध लावावेत, इतिहासाकडे पहायाची दृष्टी व्यापक करत नेत त्यातही निकोप संशोधन करावे असे विद्यार्थी घडवण्याकडे आमचा कल नाही.

 

अंधारयुगाकडे होत जाणारी ही वाटचाल कशी थांबेल हे पाहणे आमचे कर्तव्य आहे.

 

-संजय सोनवणी

 

Friday, April 15, 2022

जाती-धर्मवादात कला गुरफटू लागते तेंव्हा….

 


जयंती, झुंड, काश्मीर फाईल्स, पावनखिंड, मी वसंतराव हे चित्रपट त्यातील आशयापेक्षा जास्त गाजले ते धर्म आणि जातीय परीप्रेक्षांना महत्व आल्यामुळे. अभिजनीय (सदाशिव पेठी) बहुजनीय, दलित, आदिवासी यासारखे सामाजिक भेद ठळक करणारे साहित्यप्रकार रूढ होऊन तर बराच काळ झाला. साहित्य-संमेलनेही जाती-वर्ग आधारित भरतात. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तर उच्चवर्णीयांचा आखाडा आहे हा आरोप नवा नाही. अजूनही वाचक लेखकाचे आडनाव बघून त्याचे पुस्तक वाचायचे कि नाही हे ठरवतो तेंव्हा आपल्या साहित्यिक जाणीवा केवढ्या संकुचित झाल्या आहेत हे लक्षात येते. चित्रपटांचेही तेच होऊ लागले आहे.

कोणतीही कला मानवी जीवनाचे व्यापक दर्शन घडवत वाचक/श्रोता/प्रेक्षकांना जीवनाकडे पहायचा प्रगल्भ दृष्टीकोन देण्यासाठी असते असे सामान्यतया मानले जाते. समाजातील कोणत्याही वर्गाचे जीवनदर्शन असो, ते सर्वांन आपले वाटेल, त्यातील आनंद, व्यथा-वेदनांशी नाळ जोडली जात कलेशी तादात्म्य साधता येईल असेच चित्रण करणे हे लेखक, दिग्दर्शक व चित्रकारांचे कार्य आहे. ते केल्याखेरीज वरची गोष्ट घडणे असंभाव्य आहे हे ओघाने आलेच. म्हणजे कलाकृती निर्माण करणा-यावरची कलात्मक जबाबदारी ही अधिक असते. आपण ज्या समाजात राहतो आहोत तो विचार व भावनात्मक दृष्टीने अधिक प्रगल्भ व्हावा यासाठी कलाकाराची सामाजिक  जबाबदारीही मोठी असते. “कलेसाठी कला कि जीवनासाठी कला” हा घन विवाद मराठीत होऊन आता अनेक दशके उलटली. नंतर सहसा असे साहित्य-वैचारिक वाद झाल्याचे आपल्याला आध्गळून येणार नाही. पण कलेसाठी कला असो कि जीवनासाठी कला, कलाकाराचा दृष्टीकोनच  जर निकोप नसेल तर त्याचे कला ही पोटार्थी अथवा राजकीय स्वार्थासाठीची कला आहे असे म्हणावे लागेल.

आणि आजकाल साहित्य असो कि चित्रपट यात अशा पोटार्थी (किंवा राजकीय स्वार्थी) कलाकारांची भरमार वाढली आहे हे आपल्या सहज लक्षात येईल. आपला चित्रपट गल्लाभरू व्हावा किंवा विशिष्ट वर्गाने तरी आपले पुस्तक विकत घ्यावे यासाठी अनेक तडजोडी केल्या जातात. विषयही स्वयंप्रेरणेने नव्हे तर अशाच गल्लाभरू विचारांना बळी पडून ठरवले जातात. तसेच लेखन अथवा चित्रण केले जाते. ते जेंव्हा समाजासमोर प्रदर्शित होते तेंव्हा त्याकडे लोकही जातीय/धार्मिक/वर्गीय चष्म्यातून पाहू लागतात. समाजमाध्यमांवर अथवा वाहिन्यांवरील चर्चांमध्ये त्याचे प्रतिबिंब उमटते. समाज हा आपापसात विभागला गेल्याचे विदारक चित्र त्यामुळे उभे राहते आणि हा काही कलेचा उद्देश आहे असे म्हणता येणार नाही. किंबहुना “कला” या संकल्पनेचाच तो घोर अनादर होत असतो.

गॉर्कीच्या “आई” या कादंबरीने रशियन राज्यक्रांतीला बळ दिले. बंकिमचंद्रांच्या “आनंदमठ” कादंबरीतील वंदे मातरम गीताने भारतीय स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा दिली. महाकवी रवीन्द्रनाथ टागोरांनी देशाला नुसते राष्ट्रगीत दिले नाही तर मानवी संवेदनांना कोमल मनाने स्पर्श करत व्यापक जीवनदृष्टी दिली.  शरतचंद्र असोत कि अमृता प्रीतम वा प्रेमचंद, महाराष्ट्रातील अण्णा भाऊ साठे असोत कि वि.स. खांडेकर, दक्षिणेतील एस. एल. भैरप्पा असोत कि गिरीश कर्नाडांसारखे अनेक थोर लेखक, कवी व नाटककार यांनी वाचकाला एक सखोल जीवनदृष्टी दिली. साहित्याने जगभरच्या मानवसमाजाला भविष्याकडे जाण्याची सहृदय प्रेरणा देण्याचे काम अशा अनेक साहित्यिकानी केले. इब्सेन सारख्या नाटककाराने समग्र नाट्यकलाशास्त्र बदलवून टाकले. पुढे चित्रपट कला आली. भारतात आरंभीच्या काळात अमीर-गरीब संघर्ष किंवा हिंदू-मुस्लीम त्नावाताही त्यांची मैत्री हा अनेक चित्रपटाचा मुख्य गाभा राहिला. “गर्म हवा” हा असाच एक चित्रपट. राष्ट्र स्वतंत्र झाल्यानंतर नव्या भारताचे स्वप्न घेऊन राष्ट्रनिर्मानाचे कार्य एकोप्याने हाती घ्यावे असा संदेश देणारेही अनेक चित्रपट आले. “प्रेम” या विषयाचे अनेकविध पैलू दाखवणा-या चित्रपटांची तर रांगच लागली. पण १९७० नंतर ही दिशा बदलली. प्रेमाकडून हिंसेकडे नकळत प्रवास सुरु झाला. गेल्या दहा वर्षात तर राजकीय (म्हणजेच धार्मिक अथवा जातीय) मुलभूत उद्देश डोळ्यासमोर ठेवून अनेक चित्रपट येऊ लागले. या चित्रपटांची निर्मिती करतांनाच मुळात आधीच हेतू स्पष्ट असल्याने समाजात कधी नव्हे असे दुभंगमय वातावरण निर्माण होऊ लागले.

“आमचा आणि तुमचा” ही वाटणी समाजशास्त्रात नेहमीच विघातक मानली जाते. कलेतही जेंव्हा निर्मात्यापासून ते प्रेक्षकापर्यंत हे लोण पसरते आणि संघर्ष सुरु होतो तेंव्हा कलेच्या उद्दिष्टांबद्दलच मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होते. “द काश्मीर फाईल्स” चा परिणाम तर खूपच विघातक झाला. मुळात दिग्दर्शकाने विशिष्ट विचारसरणीच्या लोकांच्या भावना भडकाव्यात, सत्यदर्शन मात्र तीळमात्र घडू नये, फक्त संघप्रणीत विशिष्ट धर्माचीच सहानुभूती मिळावी अशा “उदात्त” हेतूने चित्रपट बनवला. प्रदर्शित झाला. हा विशिष्ट वर्ग त्याचे नुसते समर्थान करून थांबला नाही तर मुस्लीम द्वेषाने अंध झाला. १९९० साली घडलेल्या दुर्दैवी घटनेची तार्किक छाननी न करता “हा चित्रपट म्हणजेच सत्य” असे वातावरण बनवले गेले. या चित्रपटामुळे सत्य कळाले असे जेंव्हा सांगितले जाऊ लागले तेंव्हा प्रश्न असा आहे कि गेली बत्तीस वर्ष मग हे स्वत:ला “जागरूक” म्हणवणारे काय करत होते? मुळात खुद्द काश्मिरी पंडितांना हा चित्रपट मान्य आहे काय? म्हणजे, कलेचीच हत्या कशी केली जाते आणि कलेचा उपयोग केवळ राजकीय हेतू साध्य करण्यासाठी कसा केला जातो हे “काश्मीर फाईल्स” चित्रपट हे अत्यंत दुर्दैवी उदाहरण आहे. दहशतवाद केवळ बंदुकीचा नसतो. “कलेचा दहशतवाद” ही सज्ञा या चित्रपटाने दुर्दैवाने सार्थ ठरवली असेच आपल्याला म्हणावे लागेल.

“झुंड” बाबतही तेच झाले. अमिताभ बच्चन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला वंदन करतो याचेच काही समाजघटकांना एवढे अप्रूप वाटले कि ते त्याच्याच गवगव्यात चित्रपटाचा मुख्य गाभाच विसरून गेले. “एका उच्चवर्णीयाला मग कशाला चित्रपटात घेतले?” असे उद्दाम प्रतीप्रश्नही विचारले गेले. अभिनेता आणि दिग्दर्शक यांची जातही जेंव्हा काढली जाते तेंव्हा सामाजिक अनर्थकारी स्थिती उद्भवते. थोडक्यात हाही चित्रपट “कला” न राहता दुहीचे कारण बनला.

सध्या साहित्यही याला अपवाद राहिलेले नाही. कथा-कादंब-या-इतिहास आणि कविताही विशिष्ट जात किंवा धर्माचे लांगुलचालन करण्यासाठी बेतून लिहिल्या जातात. बाबासाहेब पुरंदरेसारख्यांनी लिहिलेल्या इतिहासाला नाकारण्यासाठी तेवढीच धादांत खोट्याने भरलेली प्रति-इतिहासाची पुस्तके लिहिली जातात. धमासान चर्चा होते, वाद होतात. साहित्य हे साहित्य आणि इतिहास हा इतिहास राहिलेले नाही हे आपण गेल्या दोन-तीन दशकांचा इतिहास पाहिला तरी सहज लक्षात येईल. कलेने समाज-राजकीय ढोंगाचे आवरण  चढवले आहे. “सोयीचा इतिहास हाच खरा इतिहास” असे लिहिणारे ठरवतात तसेच वाचणारेही. कलेसोबत इतिहासाचाच मृत्यू झाला आहे.

तरीही अशा गोंधळलेल्या वातावरणात काही माणुसकीचे कलात्मक हुंकार जिवंत आहेत. जाती-धर्म-प्रांत यापार जाऊन सामान्यांनीही कलेकडे निव्वळ कला म्हणून पाहिले पाहिजे आणि तिचे सार्थ मूल्यमापन केले पाहिजे. कला ही कोणत्याही जाती-धर्म-प्रांताची दासी नाही हे सत्य समजावून घ्यावे लागेल. जीवनाशी हात सुटला कि साहित्य संपते. इतिहासही होता तसा स्वीकारण्याचे धैर्य नसले कि खोटे इतिहास जन्माला येतात. साहित्य अथवा इतिहासही कोणत्याही जातीय-धार्मिक अभिनिवेशातून अथवा द्वेषातून आलेला नसला पाहिजे. असे जर होऊ शकले तरच आम्ही प्रगल्भ कलासक्त नागरिक बनण्याच्या दिशेने वाटचाल करू. देश असेच नागरिक घडवतात!

-संजय सोनवणी

गिलगीट मधील हुंझा खोरे- सर्वात धोकेदायक व्यापारी मार्ग!



झांग क्विआन या चीनी अधिका-याने केलेल्या सर्वेक्षणानंतर चीनची व्यापारी मार्गांकडे पहायची दृष्टी बदलली. चीन ते भारतासहित पर्शिया या विशाल भूप्रदेशाशी व्यापार वाढवण्याची योजना सुरु झाली. यात सर्वात अशक्यप्राय असा प्रदेश म्हणजे मध्य आशियातील तक्लमाकन वाळवंट (तारीम खोरे). येथे असलेली हाडे गोठवणारी थंडी, बेभरवशी हवामान, वाळूची सतत होणारी वादळे, पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष आणि या विस्तीर्ण प्रदेशातील भटक्या रानटी लुटारू टोळ्या यातून मार्ग काढत शिस्तबद्धरीत्या व्यापारी तांड्यांमार्फत आयात व निर्यात करणे हे एक दिव्यच होते. झायन्ग्नू टोळ्यांनी मांडलेल्या उच्छादामुळे हा सर्व प्रदेश त्रस्त होता.

युएझी ही जमातही कमी उपद्रवी नव्हती. पण झायन्ग्नू टोळ्यांनी त्यांनाही पश्चिमेकडे सरकायला भाग पाडले. याचा शेवट  बॅक्ट्रियावर युएझी टोळ्यांची सत्ता प्रस्थापित होण्यात झाला आणि बॅक्ट्रिया हे व्यापारी मार्गांच्या जाळ्याचे मिलनस्थळ असल्याने साहजिकच युएझी लोकांचे व्यापारावर स्वामित्व निर्माण झाले. युएझी जमातीतील कुशाण टोळ्यांनी पुढे भारतावर आक्रमण केले आणि तक्षशिला येथे राजधानी स्थापन केली. हे लक्षात घ्या कि तक्षशीला हे तत्कालीन व्यापाराचे फार मोठे केंद्र होते. पूर्व ते पश्चिम भारत जोडणारा “उत्तरापथ” यावरील पश्चिमेचे ते अखेरचे टोक होते. तेथून सिंधू नदीच्या काठाने उत्तरेकडे पार काश्मीर आणि मध्य आशियापर्यंत पोचणारे मार्ग जसे होता तसाच खैबर खिंडीतून पश्चिम आशियाशी जोडणाराही प्राचीन व्यापारी मार्गही होता. पूर्वेकडे जाणारा उत्तरापथ हा ताम्रलिप्ती बंदरापर्यंत जोडलेला होता. या मार्गावर पाटलीपुत्र-मथुरेसारखी विख्यात व्यापाराने बहरलेली विशाल नगरेही होती. त्यामुळे कुशाणांनी प्रथम तक्षशिलेलाच राजधानी बनवणे स्वाभाविक होते. कनिष्काच्या काळात पुरुषपूर (पेशावर) ही राजधानी बनली आणि तक्षशीलेचे व्यापारी महत्व कमी होत गेले. कुशाणांनी पश्चिमोत्तर व्यापारी मार्गांचा वापर मोठ्या कुशलतेने तर केलाच पण उतरेतून गिलगीट-बाल्टीस्थानमधून जाणा-या अति-दुर्गम मार्गांचाही वापर वाढवला आणि आपली सत्ता मध्य अशीयापर्यंत पोचवत तेथील व्यापारी मार्गांवर नियंत्रण आणले.

तक्षशिलेपासून सिंधु नदीच्या काठाने जो मार्ग पुढे हिमालयातून जाई तो दुर्गम व धोक्याचा होता. पण खरे धोके सुरु होत ते गिलगीट भागातून जातांना. गिलगीट या हिमालयीन रांगात वसलेल्या भागाचे प्राचीन नाव दरद कारण येथे दरद जमातीच्या लोकांची वसती होती. चीनी साहित्यात या प्रांताला मोठे बोलूर (गिलगीट) आणि छोटे बोलूर (बाल्टीस्थान) असे उल्लेखिले गेले आहे कारण या दोन्ही स्वतंत्र शाही सत्ता होत्या आणि दोन्ही सत्तांचे चीनशी कधी प्रेमाचे तर कधी संघर्षाचे संबंध होते.  आपसातही ते अनेकदा संघर्ष करत असत. त्यांचे काश्मीरशीही वैर होते. कल्हणाने आपल्या राजतरंगिणीत पर्वती भागातील दरद लोकांच्या काश्मीरवर सतत होणा-या आक्रमणांचे अनेक उल्लेख केले आहेत.

गिलगीट-बाल्टीस्थानाचे महत्व वाढण्याचे कारण म्हणजे दोन्ही प्रदेशांतून मध्य आशियातील प्रमुख् रेशीममार्गाला भिडणारे रस्ते येथून जात होते. पहिला म्हणजे तक्षशिलेवरून गिलगीटमधून जाणारा व्यापारी मार्ग तर दुसरा मार्ग उत्तर अफगाणिस्तानमधून येत होता. दोन्ही मार्ग हुंझा खो-यात एकत्र येत पुढची वाटचाल सुरु होत असे. ही वाटचाल मिन्टक खिंड किंवा त्यापासूनच तीस किलोमीटर दूर असलेल्या किलिक खिंडीतून होत असे. मिन्टक खिंड हिमनदीने व्यापल्यानंतर किलिक खिंडीचा वापर वाढला. हा मार्ग मध्य आशियातील चालाचीगु खोरे, काश्गर किंवा पामीर पठारावरून पश्चिमेकडे वळणा-या रेशीममार्गाला मिळत.

हा मार्ग अतिदुर्गम असला तरी मध्य आशियाला पोचणारा हा मार्ग तुलनेने कमी लांबीचा होता. त्यामुळे लवकर पोचता येई हे खरे पण जगले वाचले तरच कारण हुंझा भागातील लोक हिंस्त्र लुटारू होते. शिवाय मार्ग एवढा दुर्गम कि माल वाहतुकीसाठी केवळ माणसांचाच उपयोग केला जाऊ शकत असे. याचे मुख्य कारण म्हणजे हुंझा नदीचे खोल दरीतून वेगवान पाण्याने काठोकाठ भरून वाहणारे पात्र. मग व्यापा-यांनी काढलेला मार्ग असा कि पाठीवर ओझे घेतलेले (गुलाम किंवा मजूर) नदीच्या काठावरील उंच कड्यांमध्ये ठिसूळ डबरात ठोकलेल्या खुंट्याना दोर बांधून त्यावरच्या फळकुट्या किंवा कड्यात खोचलेल्या फांद्यांवरून तोल सावरत पुढे सरकत असत. थोडे जरी घसरले तर खाली वेगवान वाहणा-या हुंझा नदीत पडून जीव जाणे क्रमप्राप्त असे. शिवाय दोर ज्या खुंट्याना बांधलेले असत तेही निसटण्याची सतत भीती असे. अक्षरश: जीव मुठीत धरून हा प्रवास होत असणार.

पण ओलावलेले तळपाय व हात निसटू नये म्हणून तळपायांवर “तुंबर उना” चूर्ण लावत असत अशी माहिती आपल्याला “वासुदेवहिंडी” या जैन महाकाव्यात मिळते. यात कवीने केलेले या मार्गाचे भीषण वर्णन पाहता या काव्याचा कर्ता किंवा त्याला माहिती देणारा प्रवासी स्वत: त्या मार्गाने गेला असावा याची खात्री पटते. कारण सर ऑरेल स्टीन हे प्रसिद्ध पुरातत्वविद या मार्गाने मध्य आशियात गेले होते. त्यांनी या मार्गाचे “सर्वात धोकेदायक मार्ग” असे वर्णन करून ठेवलेले आहे. असेच या मार्गाचे अंगावर काटे आणणारे भीतीदायक वर्णन एडवर्ड नाईट आणि जेनेट मिर्स्की या प्रवाशांनीही करून ठेवलेले आहे. झुलत्या धोकेदायक मार्गावरून वळावे लागते तेथे नदी ओलांडणे भागच होते. नदीचे प्रवाह एवढे वेगवान रोंरावते कि नदी ओलांडनेही अशक्य व्हावे. मग व्यापा-यांनी लढवलेली शक्कल म्हणजे या नदीवर दोर आणि फळ्यांनी पूल बनवला व त्यावरून नदी ओलांडली जायची.

या झुलत्या दोर-वाटांना “रफिक” असे स्थानिक भाषेत म्हटले जाते. चीनी साहित्यात या झुलत्या धोकेदायक मार्गाला क्झीयांडू असे म्हटले गेले आहे व हा झुलता मार्ग संपतो तेथे भारताची (कुशाणांची) सीमा सुरु होते असे उल्लेख उपलब्ध आहेत.

हा मार्ग अशक्यप्राय असला तरी हजारो व्यापारी शतकानुशतके त्याचा वापर करताच राहिले. मध्य आशियात बौद्ध धर्म पोचवण्यासाठी भिक्षुही या मार्गाचा वापर करत असत. तसे अनेक पुरावे खुद्द हुंझा येथे कोरलेल्या असंख्य प्रस्तरलेखांत व चित्रांवरून मिळतात. सुमारे चाळीस हजारांपेक्षा जास्त असलेली ही चित्रे आणि लिखित माहिती तत्कालीन संपूर्ण आशियातून तेथे आलेल्या मानवी समाजांची फार आगळी-वेगळी माहिती पुरवते. व्यापारी व धर्मप्रचारक कोणत्या संकटांना तोंड देत होते हे तर समजतेच पण त्याहीपेक्षा फावल्या वेळात ते नेमके काय करत असत याचीही माहिती मिळते.

गिलगीट-बाल्टीस्थान काश्मीरच्या अधिपत्याखाली प्रथम आणला असेल तर तो ललितादित्य महान या काश्मीरच्या सम्राटाने. व्यापारी मार्गांचे महत्व समजून त्याने तेथील शाही सत्तांचा अंत केला. व्यापारी मार्गांचे महत्व त्याला माहित होते. दुर्दैव असे कि हा भाग आता भारताच्या अधिपत्याखाली नाही. चीनने काराकोरम मार्ग या भागाच्या जवळूनच बांधला आहे. हुंझाचे ऐतिहासिक महत्व संपले आहे. पण किमान सहा हजार वर्ष हुंझावरून जाणारा बिकट मार्ग आजही तत्कालीन व्यापारी, प्रवासी आणि धर्म-प्रचारकांच्या साहसी जीवनाची साक्ष देतो आहे आणि त्याचे पुरावे तत्कालीन लोकांनी तेथेच खडकांवर लिहून अथवा चित्रित करून ठेवले आहेत. त्याविषयी पुढील लेखात.

-संजय सोनवणी

Sunday, April 3, 2022

विद्रोह म्हणजे तिरस्कार?

 विद्रोह चुकीचा नसून विद्रोह म्हणजे तिरस्कार आणि हिंसा असे समजात ते चूक आहे. पण आता अशा काही संघटना फोफावत आहेत की ज्यांचा अंतिम हेतू समजावून घेण्यात येणारे अपयश ही खरी समस्या आहे.

दुर्दैवाने काही संघटनांनी संघाप्रमाणेच मुर्ख आणि आततायी वक्त्यांची फौज उभारण्याचा गेल्या काही काळापासून सपाटा लावला आहे. बहुजनवादाच्या नांवाखाली हे वक्ते प्रयत्नपुर्वक अनेक विचारमंचांवर येतात आणि मग विषय कोणताही असो, आपल्याच अजेंड्याकडे नेतात.
अनेकांच्या ते लक्षात आले तरी पर्यायी समतोल विचारी मांडणी करणारे वक्तेच तयार केले गेलेले नसल्याने ते केवळ ’कार्यक्रम तर पार पाडला’ या भावनेत कृतकृत्य राहतात किंवा मिळाले ते ज्ञान दिव्य आहे या समजुतीत राहतात.
बरे, त्यालाही हरकत नाही...पण परिणामस्वरुप बहुजनांची नुसती दिशाभूल केली जात नाही तर आपल्याच वादाच्या अंमलाखाली त्यांना आणायचा प्रयत्न होतो. काही भले-भलेही त्या अंमलापासुन मुक्त नाहीत.
बहुजनवाद्यांनी वैदिकांच्या एका अंमलातून बाहेर पडण्यासाठी दुस-या विकृतीकडे नेऊ शकणा-या अथवा नेणा-या अंमलाखाली जावे हे केवळ त्यांचे मस्तक त्यांच्या धडावर नसल्याचे लक्षण आहे.
विद्रोहाचा पाया सर्जनाचा असतो हे ज्यांना समजत नाही, पाठ केलेली भाषणे पोपटपंचीसारखी एकपात्री नाट्यप्रयोगाप्रमाणे करीत वीष पेरत जातात, ते समाजात कसलाही बदल घडवून आणु शकत नाहीत कारण त्यांची ती पात्रताच नाही.
बहुजनवाद्यांनी अशा सर्व संघटनांपासून सावध रहायला हवे. ते तुमच्या नव्हे तर त्यांच्या वैचारिक सत्तेसाठी झटत आहेत, मग भले त्यात विचार असोत अथवा नसोत!

"अथातो ज्ञानजिज्ञासा"


प्रज्ञा असल्याखेरीज ज्ञानाची पायरी गाठता येणे अवघड असते. प्रज्ञा म्हणजे, मला वाटते ते असे- जीवन्/निसर्ग्/विश्व यातील गुढे उलगडण्याची अनावर जिज्ञासा. बादरायणांनी "अथातो ब्रह्मजिज्ञासा" अशीच ब्रह्मसुत्रांची सुरुवात केलेली आहे. म्हणज ब्रह्माबाबतची गुढे उलगडण्याची जिज्ञासा असेल तरच पुढील वाचावे असा त्या सूत्राचा मतितार्थ आहे. येथे "ब्रह्म" शब्द स्रुष्टीचे/विश्वाचे धर्म मूलकारण या अर्थाने येतो. जिज्ञासेचा विस्तार प्रज्ञेचाच आधारे होवु शकतो असे मला वाटते...आणि प्रज्ञा ही जिज्ञासेशिवाय अस्तित्वात असु शकते काय? कि दोन्ही एकाकार, परस्परावलंबी आहेत?
समजा नसल्या तरी जिज्ञासा हीच मानवी ज्ञानाला पुढे नेणारी बाब आहे हे तर नक्कीच. आहे त्या उपलब्ध ज्ञानाला मानवी सुखांसाठी प्रायोजित उपकरणांमद्धे बदलवणे वेगळे आणि आहे त्या ज्ञानाला आव्हाने देत बौद्धिक झेप घेणे वेगळे. दोहोंमागील प्रेरणा वेगळ्या आहेत. एक प्रेरणा तात्काळ अर्थक्रांती/सूखक्रांती घडवू शकण्याची संभावना बाळगते तर प्रज्ञात्मक जिज्ञासु प्रेरणा आहे त्या ज्ञानधारांनाच क्रांतिक रुप देत मानवी जीवनाला अधिकात अधिक अर्थ देण्याची संभावना बाळगते. भौतीक सुख मिळणे जेवढे आवश्यक आहे त्याहीपेक्षा अधिक बौद्धिक सूख मिळणेही मानवी समाजाच्या एकुणातील मानसिक संवर्धनासाठी आवश्यक असते.
आहे त्या ज्ञानाचे खंडन/मंडन करत अत्यंत अकल्पनीय ज्ञानधारांना जन्म देणे आणि मानवी मन सतत " या निशां सर्वभुतानां तस्यात जागर्ति संयमी" या उक्तीनुसार मानवी मन जागे कसे राहील याची काळजी वाहणे हे प्रज्ञेचे कार्य असते जे जिज्ञासेशिवाय अशक्यच आहे. मानवी समाज इतिहासकाळात अनेकदा अंधारयुगात गेला आहे. जेंव्हा मानवी जिज्ञासा धर्मांनी वा राजसत्तांनी रोखली तेंव्हा तेंव्हाच अशी अंधारयुगे आली आहेत...
आणि आज आपण तर माहितींच्या अवाढव्य ढगांमुळे निर्मित माहितीच्या अंधारात तर आलेलो नाहीत ना? माहितीलाच ज्ञान समजण्याची घोर चूक आपण करत तर नाही आहोत ना?
माहिती वाईट असते काय? नक्कीच नाही. पण ती जेवढी सोपी आणि उथळ होत जाते तेवढेच माहितीचे मूल्य कमी होत जाते. उपलब्ध माहितीचे मूल्यांकन कसे करावे हे प्रज्ञेखेरीज होवु शकत नाही. ज्या काळात माहिती मिळवणे अवघड होते, त्या काळात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी असोत कि Dr. आंबेडकर, आदी शंकराचार्य असोत, म. फुले, रा. गो. भांडारकर असोत कि धर्मानंद कोसंबी, यांनी प्रज्ञा व ज्ञानात्मकतेची जी झेप गाठली होती ती आज कोठे गेली? कारण माहिती कोणती, कोठली आणि कशी विश्लेषनात्मक पद्धतीने वापरत सिद्धांत साधावेत याचे ज्ञान त्यांच्याकडे होते. आणि ती मिळवण्यासाठीची अपार जिज्ञासाही त्यांच्याकडे होती. आज माहितीचा महापूर आहे...कोणती माहिती सत्य कोनती असत्य हे मात्र शोधण्याचा, विश्लेषण करण्याचा महामूर कंटाळा आहे...मग प्रज्ञात्मक ज्ञानाची प्राप्ती होवून नवविचारांचे सर्जन कसे होणार?
रिचर्ड बर्टनचे उदाहरण देण्याचा मोह आवरत नाही. हा अभिनेता रिचर्ड बर्टन नव्हे...जीवावरची संकटे पेलत या माणसाने, जेथे गैरैस्लामी प्रवेशु शकत नव्हता त्या मक्का-मदिनेला जीवावरची संकटे पेलत भेट दिली...अरेबियन नाईट्सचा हजारो पानी अब्यासपुर्ण टीपांसहित अनुवाद करत इस्लाम्/अरबी जग जगापुढे आणले. (बर्टन यांनी भारताला भेट देवून त्यावरही खूप लिहिले आहे.) याला मी "अथातो ज्ञानजिज्ञासा" असे म्हणतो.
मग आपण कोठे आहोत? इतिहासलेखनही उथळ, एकतर जातीयवादी/धर्मवादी वा वंशवादी द्रुष्टीने आजच्याही काळात होत असेल तर आपण ज्ञानात कोणती गुणात्मक प्रगती केली हा प्रश्न उभा राहतो. आपले इतिहास लेखन हे प्राय: सोयिस्करच इतिहाससामग्री वापरुन वा आळसाने सर्व उपलब्ध संदर्भही न तपासुन केले जात असेल तर याला जिज्ञासा अथवा प्रज्ञा म्हणता येत नसून निव्वळ बनचुकी हमाली आहे असे म्हणता येते.
थोडक्यात, क्षेत्र कोणतेही असो, च्यनेलवरील उथळ पण बौद्धिक वाटना-या चर्चा काय, किंवा वृत्तपत्रीय विश्लेषणे काय, किंवा संशोधनात्मक म्हटले जाणारे ग्रंथ काय, अपवाद सोडले तर स्वत:च्य प्रज्ञेच्या दिवाळखो-या काढत, प्रसंगी लबाड्या करत असतात आणि वाचकांना स्वांतसुखाय वातावरणात नेत एका मानसिक नशेत नेत त्यांचाही बौद्धिक विकास खंडित करत असतात.
एकुणातील समाजाच्या प्रज्ञेचा...अपार जिज्ञासेचा मार्ग, विचारकलहाचा सृजनात्मक मार्ग यामुळे कुंठित होतो याचे भान आपल्याला येणार काय? आम्ही प्रश्न विचारायला शिकणार काय? अथातो ज्ञानजिज्ञासा...असे म्हणनार आहोत काय?

आरक्षण संकल्पनेचा पुनर्विचार आवश्यक!


भारतात आरक्षण हा नेहमीच कळीचा मुद्दा राहिलेला आहे. खरे तर हा समाजकारणाचा, समतेच्या तत्वावर सामाजिक व्यवस्थेमुळे वंचित-शोषित राहिलेल्या वर्गांच्या सामाजिक उत्थानाचा, मुख्य प्रवाहात येत आत्मसन्मान मिळण्याचा विषय. आरक्षण ही संकल्पनाच मुळात व्यवस्थेत मागे पडलेल्यांना विशेष संधी देत सर्वांच्या बरोबरीने पुढे घेण्यासाठी वापरलेली क्लुप्ती म्हणून जन्माला आली. त्यासाठी अशा वंचित घटकांना मागासपनातून बाहेर पडण्याची संधी मिळावी यासाठी सरकार त्यांच्यासाठी विशेष प्रावधाने करते. किंबहुना ती कल्याणकारी सरकारची जबाबदारी आहे असेही मानले जाते. प्रगत देशांतही “Positive discrimination” हे तत्व वापरले जाते. तत्वता: आरक्षण हा मुद्दाच मुळात मागासलेलेपण दूर करण्यासाठी आहे, समाज मागासच रहावा यासाठी नाही हे पण आधी लक्षात घेतले पाहिजे.

म्हणजेच हा सामाजिक विषय आहे. पण भारतात हा मुख्य विषय बाजूला पडून हा विषय राजकारणाचा विषय कधी बनला हे जनतेच्या लक्षातच आले नाही. आरक्षणाचे मुलतत्व जाणून बुजून विसरले जावून संधीसाधू राजकारणाच्या नादात आरक्षणहा राजकारणप्रणीत सामाजिक लढ्यांचा आणि म्हणूनच सामाजिक विद्वेष वाढवण्याच्या खेळीचे एक साधन बनून गेला. जवळपास सर्वच भारतीय समाज स्वत:ला सामाजिक मागास म्हणवून घेत, तशी सर्वेक्षने करवून घेण्याचा आग्रह धरत आरक्षणाच्या कक्षेत येनकेनप्रकारेन येण्यासाठी संघर्ष करू लागले. जातीय नेते आणि जातीचे विचारवंत आपली जात कशी मागास आहे आणि आरक्षण हा आमचा कसा हक्क आहे यासाठी रस्त्यावर  उतरू लागले. न्यायालयाचे दरवाजे ठोठावू लागले किंवा राजकीय शक्ती वापरत आरक्षणाचे लाभ मिळवण्यासाठी विधीमंडळांना वापरू लागले. सत्ताधारी असो की विरोधी पक्ष, आरक्षणाचा प्रश्न हा राजकीय प्रश्न करत मतपेढ्या जपत वाढवायचा प्रयत्न करू लागले. अनेक नेते आरक्षणाच्या संघर्षातून निर्माण झाले, पदे भूषवू लागले. आम्हाला आरक्षण नाही तर कोणालाच नाही...अशा उद्दाम गर्जनाही आपण ऐकलेल्या आहेत. ज्यांना जातीच्या आधारावर मागास ठरवून घेता येणे अशक्य होते असे समाज आरक्षणाचा आधार आर्थिक असला पाहिजे असा आग्रह धरू लागले आणि तसे आरक्षण मिळवण्यात तात्पुरते का होईना यशस्वी झाल्याचेही आपण पहिले आहे. आरक्षणाच्या रांगेत असलेल्या त्या त्या समाजाचे आंदोलनांमुळे काही भले झाले कि नाही याचा लेखाजोखा सर्वांच्या समोर आहे. यातून त्या त्या आरक्षणाच्या रांगेत उभे असलेल्या समाजांना (किंबहुना नेत्यांना) राजकीय लाभालाभ मिळाले असले तरी सामाजिक प्रश्न सुटन्याऐवजी सामाजिक वीण विस्कटन्यास मात्र हातभार लागला हे मात्र स्पष्ट आहे. यातून आरक्षणाचे घटनात्मक मुलतत्व यात बाजूलाच राहिले असल्याचे चित्र आपल्याला दिसेल.

भारतीय समाजात जातीव्यवस्थेमुळे जे समाजघटक नेहमीच शोषित व वंचित राहिले, ज्यांना राजकीय व प्रशासकीय प्रक्रियेत कधीच सामील करून घेतले नव्हते, ज्यांचा आत्मसन्मान हिरावून घेण्यात आला होता व हरपून बसला होता अशा समाजघटकांना संख्या दुर्बलतेमुळे व पर्याप्त संसाधनांच्या अभावामुळे एरवी अप्राप्य असलेल्या संधी प्राप्त करून देण्यासाठी आरक्षणाचे तत्व राबवण्यात आले. या तत्वावर आक्षेप घेत आरक्षणाचे आधार बदलावेत किंवा ते रद्दच करण्यात यावे असा मतप्रवाह भारतात नवा नाही. आर्थिक आधारावरच आरक्षण असावे हा मुद्दा त्यात महत्वाचा. जातिय आधारावर आरक्षण हे कधीही जातीनिर्मुलन करू शकणार नाही हा त्यामागील तर्क. या तर्कांचाही प्रतिवाद आवश्यक बनून जातो.

या तर्कात खोट अशी की भारतात संधी मिळणे किंवा नाकारली जाणे हेच मुळात जातीय आधारावर झालेले असल्याने आरक्षणासाठी जात हाच मुख्य आधार असणार हे उघड होते. दुसरी बाब मग यामुळे जातीनिर्मुलन कसे होईल हा. पण जेंव्हा भारतात आरक्षणच नव्हते तेंव्हा कोठे जाती निर्मुलन झाले? तेंव्हा का जाती अधिकच बंदिस्त आणि घट्ट झालेल्या होत्या? त्यामुळे आरक्षणामुळे जाती अजूनच बंदिस्त होतील या तर्कात तसा अर्थ नाही. आरक्षण काढल्याने झपाट्याने जातीभेद व जातीआधारित अन्याय संपतील किंवा जातीमुळे लाभाच्या बाजूला असलेल्या जाती आपले जातीआधारित हक्क सोडून देतील याची शक्यता नाही. आजही जातीभेदाचे चटके भोगावे लागणारे असंख्य समाजघटक आहेत. आरक्षण त्यांना किमान जगण्याचा मानसिक आधार देत व्यवस्था त्यांच्या हितसंबंधाची काळजी घेत असल्याचा (अनेकदा भ्रमात्मक असला तरी) भास देते. जाती निर्मुलन मग कसे होणार ही चिंता सोडवण्याचे मार्ग आरक्षण रद्द करण्यात नाहीत. तो मार्ग वैचारिक व मानसिकता बदलात असून जातीसंबंधीचे पूर्वग्रह बदलण्यात आहे. पण हा मार्ग अवलंबणे अवघड जाते. कारण आरक्षणविरोधाचा पायाच मुळात जातीद्वेष व संधी नाकारण्याच्या प्रवृत्ती आहेत हे आपल्या थोडा विचार केला तरी लक्षात येईल.

खरे म्हणजे जातीव्यवस्थेबाबतचे आपले सामाजिक आकलन हे मुळात पूर्वग्रहदुषित आहे हे मान्य करण्याची सामाजिक विचारवंतांची व म्हणूनच समाजाची तयारी नसते. जातींचे निर्मिती ही मुळात व्यवसायाधारीत आहे व त्या त्या व्यवसायांच्या उत्थान-पतनातून निर्माण झालेली विपरीत स्थिती जातीव्यवस्था बनवत ती घट्ट करत नेण्यात झाली आहे. आपापल्या व्यवसायात नवा स्पर्धकच नको या प्राथमिक भावनेतून जातीत (व्यवसायात) अन्य नवख्यांना प्रवेश देणे जसे बंद झाले जातीव्यवस्था (व्यवसायव्यवस्था) बंदिस्त झाली. ढासळत गेलेली अर्थव्यवस्था या स्थितीला प्राधान्याने जबाबदार होती. गेल्या हजार वर्षात या अर्थ स्थितीत फरकच न पडल्याने तात्पुरते व्यवस्था म्हणून बंदिस्त झालेली जातीव्यवस्था कठोर व अन्यायी होत गेली. सर्व समाजांना याची लागण झाल्याने  आणि औद्योगीकरणाच्या काळात बदलत्या जगाशी स्पर्धा करण्यात सपशेल अपयशी ठरलेले हे व्यावसायिक संघ देशोधडीला लागणार ह उघड होते आणि तसे झालेही. यातून बाहेर पाडण्यासाठी जे आर्थिक धोरण यायला हवे होते ते सामाजिक विचारवन्तांनी आणायचा अभावानेच प्रयत्न केला. जात हे जरी आर्थिक नसले तरी सामाजिक सुरक्षेचे साधन आहे या जाणीवेतून जातभावना उद्रेकत गेल्याचे चित्र आपण आजही पाहतो. ज्यांना जातीमुळे आणि वर्णामुळे सामाजिक आणि आर्थिक वर्चस्व टिकवता येणे सहज शक्य होते ते तर मुळीच जात अथवा जातभावना सोडणे शक्य नव्हते. अशा जातींच्या आपापल्या सुरक्षा अथवा वर्चस्वाच्या संकल्पनांतून भारतीय समाज आकाराला आलेला असल्याने आरक्षणाचा मूलाधार जात हाच असणार हे उघड होते. जातीनिर्मुलन हा आरक्षणाचा हेतू असूच शकत नव्हता. ते शक्यही नाही. शिवाय जातीनिर्मुलन करायचे म्हणजे नेमके काय करायचे हा प्रश्नही उभा राहतो. जातीभेद नष्ट होऊ शकेल पण आरक्षण ठेवून जातीनिर्मुलन शक्य नाही. व्यक्तीगत पातळीवर (म्हणजे ज्यांना आरक्षण त्यागायचे आहे) ते जात सोडू शकतात. किंबहुना तसेच होत जाणे हे अभिप्रेत आहे. पण त्यासाठी समाजात मुबलक उच्च दर्जाच्या शैक्षणिक, व्यावसायिक आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्या पाहिजेत. त्यासाठी देशाचे धोरणच बदलले पाहिजे. पण ते तसे व्हावे हा आमच्या सामाजिक चर्चेचा कधीच विषयच राहिलेला नाही. सारी चर्चा आरक्ष्हन केंद्रित झालेली आहे आणि हे आपले घोर वैचारिक अपयश आहे असे म्हणायला हरकत नाही.

जातींच्या आधारावर आरक्षण नको तर ते आर्थिक आधारावर असावे कारण आता अनेक कथित वरिष्ठ जातीही दरिद्र झाल्या आहेत असा एक युक्तिवाद आहे. पण आर्थिक आधार म्हणजे काय? दारिद्र्याची नेमकी व्याख्या काय करणार? शिवाय आर्थिक निकष निश्चित करणेत्यानुसार आरक्षणाचे प्रमाण ठरवणे व ते वितरीत करणे ही एक अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. शिवाय आर्थिक स्थिती ही वेगाने अथवा आकस्मितपणे खाली-वर जावू शकते...म्हणजे नेमक्या कोणत्या काळातील अर्थस्थिती व ती कशी ठरवायचीत्यासाठी पुरावे नेमके काय द्यायचेते कोणी तपासायचेत्यासाठीची यंत्रणा कशी राबवायची असे प्रश्न उपस्थित होतात. जेथे लोक आरक्षणासाठी जातीची खोटी प्रमापत्रे मिळवू शकतात व देतात तेथे आर्थिक स्थितीची प्रमाणपत्रे कशी विश्वासार्ह राहणारत्यावरुनही जो संघर्ष पेटु शकेल त्याचे निवारण करायला आपल्याकडे काय यंत्रणा असणार आहेशिवाय गरीबी ही सापेक्ष बाब असल्याने व ती तशी सर्वच समाजघटकांत कमी-अधिक प्रमाणात विखुरलेली असल्यानेआर्थिक आधारही सामाजिक संघर्षाचा नवा केंद्रबिंदु बनुन जावू शकतोहेही आपल्याला लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती हा आरक्षणाचा पाया बनू शकत नाही.

तरीही आर्थीक स्थिती हाच आरक्षनाचा पाया असावा असे मानणा-या संघप्रणीत भाजपा सरकारने २०१८ मध्ये सामाजिक मागास या संज्ञेत बसत नसलेल्या खुल्या गटातील समुहांना आर्थिक दुर्बलतेच्या आधारावर आरक्षण देण्याची तरतूद करणारी १२४ वी घटनादुरुस्ती केली. या घटनादुरुस्तीमुळे भविष्यात आरक्षणाचा आधार सामाजिक मागासपणा राहणार नाही तर केवळ आर्थिक मागासपण रहावा या दिशेने टाकलेले पहिले पाऊल अशी आशा या वर्गाकडून केली गेली. संघीय मंडळी यात आघाडीवर होती. मुळात संघाचा आरक्षणालाच विरोध होता आणि ते असलेच तर त्याचा आधार आर्थिक असावा अशी मते हिरीरीने व्यक्त होत होती. त्याच वेळीस आरक्षणाचा आधार मुळात आर्थिक असू शकत नाहीत्यामुळे ही घटनेच्या मुलतत्वांना छेद देणारी घटनादुरुस्ती रद्द करण्यात यावी अशी याचिका ही घटनादुरुस्ती अंमलात येण्याच्या आधीच सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली. कारण घटनेच्या पंधरा व सोळाव्या कलमानुसार सामाजिक मागासपणा हाच आरक्षणाचा आधार असला पाहिजे हे निक्षून सांगितलेले आहे. १९९२ मध्ये सर्वोच्च न्यायालयानेही आर्थि निकष आरक्षणासाठी पुरेसा नाही हे स्पष्ट केले आहे. ५०% आरक्षणाची मर्यादा सामाजिक न्यायासाठी निश्चित करण्यात आलेली आहे आणि अलीकडेच एका निवाड्यात सर्वोच्च न्यायालयाने त्याचा पुनरुच्चार केला आहे. शिवाय "आर्थिक दुर्बल" हा अनारक्षित घटकांसाठी आरक्षण देण्यासाठी एक नवा गट बनवता येत नाही कारण मग समतेच्या घटनात्मक सिद्धांताला त्यामुळे धक्का पोहोचतो. कारण आर्थिक दुर्बलता सर्वच समाजघटकांत असू शकते. आरक्षण असलेल्या समाजघटकांतही सर्वांनाच आरक्षणाचे लाभ मिळत नसल्याने तेही आर्थिक दुर्बलतेच्या दुष्चक्रात अडकलेले असतात. या घटनादुरुस्तीमुळे आरक्षित समाजातील आर्थिक दुर्बलांना वगळून केवळ खुल्या प्रवर्गांतील आर्थिक दुर्बलांना संधी दिल्यामुळे समानतेच्या मुलभूत तत्वाला हरताळ फासला जातो हे उघड आहे.  त्यामुळे या घटनादुरुस्तीचेही भवितव्य काय असेल याचा अंदाज बांधता येतो.

मुख्य प्रश्न वेगळाच आहे.  सर्वच वंचित घटकांचे खरेच सामाजिक कल्याण घडवून आणायची सरकारची इच्छा असती तर सरकारने केवळ आरक्षनाच्याच गाजरांचा उपयोग न करता तळागाळात आर्थिक व सामाजिक सुधार योजना राबवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असता आणि भारतीय समाजाला अभिशाप बनुन राहिलेली जातीयता आजवर हद्दपार झाली असती. आता तरी या दिशेने समाजाने व शासनाने गंभीरपणे विचार आणि कृती केली पाहिजे. घटनादुरुस्त्या वारंवार करत मूळ घटनाच समूळ बदलुन टाकण्याच्या प्रयत्नांना आता तरी हाणुन पाडले पाहिजे!

अशा स्थितीत नागरिकांची उच्च प्रतीचे शिक्षण देत जीवन जगण्याचे व्यवसाय/रोजगारादि सन्माननीय मार्ग व्यापक प्रमाणात कसे उपलब्ध करायचे, सर्वच वंचित-शोषितांना त्यांच्या परंपरागत अथवा नवकौशल्यांचा वापर करण्याची सुलभ संधी देत क्रयशक्ती कशी वाढवायची आणि त्यांना अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात कसे आणायचे हे आमचे खरे प्रश्न आहेत.

शिवाय आरक्षणाचे तत्व न्याय्य असले तरी ज्या पद्धतीने आरक्षणाची रचना करण्यात आली आहे ती मात्र न्याय्य आहे असे म्हणता येत नाही. खरे तर आरक्षणाची सामाजिक चर्चा करायची तर आरक्षित घटकांना आरक्षणाचा कितपत लाभ झाला, त्यांचे सामाजिक उत्थान झाले काय, झाले नसल्यास का झाले नाही आणि आरक्षणाचा हेतू सफल होत नसेल तर का होत नाही आणि आहे त्या व्यवस्थेत काही बदल करणे आवश्यक आहे काय यावर चर्चा व्हायला हवी होती. पण ती तशी झालेली नाही हे एक वास्तव आहे.

वास्तव हे आहे कि आरक्षित प्रवर्गातील सर्वच जातींना आरक्षणाचे समान लाभ मिळत नाहीत, त्यातील बलिष्ठ जाती आरक्षणाचे अधिक लाभ घेत इतरांना वंचित ठेवतात या दबक्या स्वरात का होईना तक्रारी सुरु झाल्या आहेत. त्यामुळे विशिष्ट प्रवर्गासाठी असणा-या आरक्षणातून आपल्या जातीला तोडून आरक्षण द्या अशाही मागण्या त्यामुळे पुढे आहेत. समान संधी हे आरक्षणाचे मुलतत्व येथे आरक्षित प्रवर्गांतील काही जाती  (आणि त्या त्या जातीत असणारे उच्च वर्गीय) ठोकरून लावत आपल्याच ताटात अधिक कसे येईल याचे पद्धतशीर प्रयत्न करत आरक्षणाच्या तत्त्वालाच हरताळ फासत असल्याचे चित्र समोर येते आहे.

शिवाय एकदा आरक्षणाचा लाभ घेतलेले कुटुंब पिढ्यानुपिढ्या आरक्षणाचा लाभ घेत राहिल्याने त्याच जाती अथवा प्रवर्गातील अन्य गरजवंताची वर्णी आरक्षणात लागण्याची व प्रगती साधण्याची शक्यता मावळून जात्ते. यासाठी एका परिवारातील व्यक्तीना आरक्षणाचा लाभ हा अधिकाधिक दोन पिढ्यांपर्यंतच घेता यावा तरच आरक्षणाचा प्रवाह इतरांकडेही वळू शकेल अशी तरतूद करणे आता आवश्यक झाले आहे. या मागणीसाठी मी २०१४ साली उपोषणही केले होते. पण त्यासाठी सामाजिक जोर जेवढा वाढायला हवा होता तेवढा वाढलेला नाही.

दुसरी बाब म्हणजे आरक्षणांतर्गत प्रवर्ग आणि जातींचे दर दहा वर्षांनी सामाजिक, आर्थिक व राजकीय उत्थानाबाबत सर्वेक्षण करून प्रवर्गांतर्गत आरक्षणाची पुनर्रचना करणे आवश्यक झाले आहे. ज्यांना अधिक लाभ मिळाला आहे त्यांची आरक्षणातील टक्केवारी घटवत ज्यांना कमी अथवा शून्य लाभ मिळाला आहे त्यांना अधिक लाभ दिले पाहिजेत. याच वेळीस आरक्षण असूनही त्याचा लाभ न घेणा-यांची संख्या कशी वाढेल यासाठी नोकरीकेंद्रीकडून व्यवसायकेंद्री मानसिकता बनवण्याचे व्यापक प्रयत्न हाती घेतले पाहिजेत. शिक्षणव्यवस्थेतच तसे बदल केले पाहिजेत.

शिवाय आरक्षणाची टक्केवारी ५०% हुन अधिक न वाढू देता ती कशी कमी कमी करत नेता येईल हे पाहिले पाहिजे. तरच एके दिवशी मुळात आरक्षणाचीच गरज राहणार नाही हे पहावे लागेल. पण सध्याची व्यवस्था आरक्षण संपवावे यासाठी अनुकूल नाही. तसे प्रयत्न कोनत्याही सरकारने, राजकीय नेत्याने वा विचारवन्तांनी केलेले नाहीत. किंबहुना आरक्षण हा विषय आपल्या राजकारण व समाजकारणाचे भांडवल म्हणून वापरत कोट्यावधी तरुणांची दिशाभूल केलेली आहे. जातीद्वेष कमी करण्याऐवजी वाढवण्यात हातभार लावलेला आहे आणि हे काही आपण सुदृढ समाज बनवण्याकडे वाटचाल करत असल्याचे लक्षण नाही.

हे चित्र बदलवन्यासाठी केवळ आरक्षण विरोधक किंवा समर्थक ही भूमिका घातक आहे. व्यापक समाजकेंद्री (जातकेंद्री नव्हे) विचार करून सर्वांचेच सामाजिक उत्थान समतेच्या पायावर कसे होईल यासाठी विचारमंथन करत तो विचार समाजमनात रुजवावा लागेल. अन्यथा आरक्षण अनंत काळ चालू राहील आणि ते थांबवण्याची शक्ती कोणाच्याही हातात राहणार नाही.

आणि आरक्षित अथवा आरक्षणाच्या रांगेत उभ्या असलेल्या सर्वच समाजघटकांनी हे लक्षात घेतले पाहिजे कि आरक्षण हे सामाजिक मागासपण दूर करण्यासाठी दिलेली एक संधी आहे. आरक्षित घटकांपैकी एकही समाजघटक आरक्षणामुळे जर मागासपणातून बाहेर पडला नसेल तर आरक्षणच निरर्थक होऊन जाते, रोजी-रोटी देण्याचे एक साधन बनून जाते आणि आरक्षणाचा हेतूच मुळात “गरीबी हटाव” हा नसल्याने जर आरक्षणामुळे सामाजिक मागासपण कमी होण्याऐवजी ते वाढतच राहणार असेल तर समूळ आरक्षणाच्याच धोरणाचा पुनर्विचार करणे अत्यावश्यक बनून जाते. खरे तर आता आरक्षणाची मर्यादा ५०% पेक्षा वाढवण्याची निरुद्योगी मागणी करण्याऐवजी ती मर्यादा कमी कमी कशी केली जाईल याचाच विचार आम्हाला करावा लागेल. त्यासाठी पावले उचलावी लागतील. आमच्या सामाजिक विचारसरनीत समूळ बदल घडवून आणावा लागेल, त्यासाठी नवे तत्वज्ञान जन्माला घालावे लागेल.

अन्यथा आरक्षणाच्या तत्वाचेच बारा वाजून सारा भारत एके दिवशी सर्वार्थाने मागास झाल्याचे चित्र आपल्याला दिसेल. हे होऊ द्यायचे नसेल तर आपल्याला आरक्षण हा विषय भावनिक अथवा राजकीय न बनू देता आपापले मागासपण दूर करत मानसिक दृष्ट्या ताठ मानेने उभे राहण्यासाठीचे एक साधन एवढ्यापुरताच मर्यादित ठेवावा लागेल हे नक्की!

('सर्वकष" त्रैमासिकात प्रसिद्ध)


जनानखान्यांचे अद्भुत विश्व!

  जनानखाना, ज्याला अंत:पूर, राणीवसा किंवा हरम असेही म्हटले जाते त्याबाबत समाजामध्ये अनेक समजुती प्रचलित आहेत. शत्रूच्या जिंकलेल्या स्त्रीय...