Sunday, April 3, 2022

"अथातो ज्ञानजिज्ञासा"


प्रज्ञा असल्याखेरीज ज्ञानाची पायरी गाठता येणे अवघड असते. प्रज्ञा म्हणजे, मला वाटते ते असे- जीवन्/निसर्ग्/विश्व यातील गुढे उलगडण्याची अनावर जिज्ञासा. बादरायणांनी "अथातो ब्रह्मजिज्ञासा" अशीच ब्रह्मसुत्रांची सुरुवात केलेली आहे. म्हणज ब्रह्माबाबतची गुढे उलगडण्याची जिज्ञासा असेल तरच पुढील वाचावे असा त्या सूत्राचा मतितार्थ आहे. येथे "ब्रह्म" शब्द स्रुष्टीचे/विश्वाचे धर्म मूलकारण या अर्थाने येतो. जिज्ञासेचा विस्तार प्रज्ञेचाच आधारे होवु शकतो असे मला वाटते...आणि प्रज्ञा ही जिज्ञासेशिवाय अस्तित्वात असु शकते काय? कि दोन्ही एकाकार, परस्परावलंबी आहेत?
समजा नसल्या तरी जिज्ञासा हीच मानवी ज्ञानाला पुढे नेणारी बाब आहे हे तर नक्कीच. आहे त्या उपलब्ध ज्ञानाला मानवी सुखांसाठी प्रायोजित उपकरणांमद्धे बदलवणे वेगळे आणि आहे त्या ज्ञानाला आव्हाने देत बौद्धिक झेप घेणे वेगळे. दोहोंमागील प्रेरणा वेगळ्या आहेत. एक प्रेरणा तात्काळ अर्थक्रांती/सूखक्रांती घडवू शकण्याची संभावना बाळगते तर प्रज्ञात्मक जिज्ञासु प्रेरणा आहे त्या ज्ञानधारांनाच क्रांतिक रुप देत मानवी जीवनाला अधिकात अधिक अर्थ देण्याची संभावना बाळगते. भौतीक सुख मिळणे जेवढे आवश्यक आहे त्याहीपेक्षा अधिक बौद्धिक सूख मिळणेही मानवी समाजाच्या एकुणातील मानसिक संवर्धनासाठी आवश्यक असते.
आहे त्या ज्ञानाचे खंडन/मंडन करत अत्यंत अकल्पनीय ज्ञानधारांना जन्म देणे आणि मानवी मन सतत " या निशां सर्वभुतानां तस्यात जागर्ति संयमी" या उक्तीनुसार मानवी मन जागे कसे राहील याची काळजी वाहणे हे प्रज्ञेचे कार्य असते जे जिज्ञासेशिवाय अशक्यच आहे. मानवी समाज इतिहासकाळात अनेकदा अंधारयुगात गेला आहे. जेंव्हा मानवी जिज्ञासा धर्मांनी वा राजसत्तांनी रोखली तेंव्हा तेंव्हाच अशी अंधारयुगे आली आहेत...
आणि आज आपण तर माहितींच्या अवाढव्य ढगांमुळे निर्मित माहितीच्या अंधारात तर आलेलो नाहीत ना? माहितीलाच ज्ञान समजण्याची घोर चूक आपण करत तर नाही आहोत ना?
माहिती वाईट असते काय? नक्कीच नाही. पण ती जेवढी सोपी आणि उथळ होत जाते तेवढेच माहितीचे मूल्य कमी होत जाते. उपलब्ध माहितीचे मूल्यांकन कसे करावे हे प्रज्ञेखेरीज होवु शकत नाही. ज्या काळात माहिती मिळवणे अवघड होते, त्या काळात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी असोत कि Dr. आंबेडकर, आदी शंकराचार्य असोत, म. फुले, रा. गो. भांडारकर असोत कि धर्मानंद कोसंबी, यांनी प्रज्ञा व ज्ञानात्मकतेची जी झेप गाठली होती ती आज कोठे गेली? कारण माहिती कोणती, कोठली आणि कशी विश्लेषनात्मक पद्धतीने वापरत सिद्धांत साधावेत याचे ज्ञान त्यांच्याकडे होते. आणि ती मिळवण्यासाठीची अपार जिज्ञासाही त्यांच्याकडे होती. आज माहितीचा महापूर आहे...कोणती माहिती सत्य कोनती असत्य हे मात्र शोधण्याचा, विश्लेषण करण्याचा महामूर कंटाळा आहे...मग प्रज्ञात्मक ज्ञानाची प्राप्ती होवून नवविचारांचे सर्जन कसे होणार?
रिचर्ड बर्टनचे उदाहरण देण्याचा मोह आवरत नाही. हा अभिनेता रिचर्ड बर्टन नव्हे...जीवावरची संकटे पेलत या माणसाने, जेथे गैरैस्लामी प्रवेशु शकत नव्हता त्या मक्का-मदिनेला जीवावरची संकटे पेलत भेट दिली...अरेबियन नाईट्सचा हजारो पानी अब्यासपुर्ण टीपांसहित अनुवाद करत इस्लाम्/अरबी जग जगापुढे आणले. (बर्टन यांनी भारताला भेट देवून त्यावरही खूप लिहिले आहे.) याला मी "अथातो ज्ञानजिज्ञासा" असे म्हणतो.
मग आपण कोठे आहोत? इतिहासलेखनही उथळ, एकतर जातीयवादी/धर्मवादी वा वंशवादी द्रुष्टीने आजच्याही काळात होत असेल तर आपण ज्ञानात कोणती गुणात्मक प्रगती केली हा प्रश्न उभा राहतो. आपले इतिहास लेखन हे प्राय: सोयिस्करच इतिहाससामग्री वापरुन वा आळसाने सर्व उपलब्ध संदर्भही न तपासुन केले जात असेल तर याला जिज्ञासा अथवा प्रज्ञा म्हणता येत नसून निव्वळ बनचुकी हमाली आहे असे म्हणता येते.
थोडक्यात, क्षेत्र कोणतेही असो, च्यनेलवरील उथळ पण बौद्धिक वाटना-या चर्चा काय, किंवा वृत्तपत्रीय विश्लेषणे काय, किंवा संशोधनात्मक म्हटले जाणारे ग्रंथ काय, अपवाद सोडले तर स्वत:च्य प्रज्ञेच्या दिवाळखो-या काढत, प्रसंगी लबाड्या करत असतात आणि वाचकांना स्वांतसुखाय वातावरणात नेत एका मानसिक नशेत नेत त्यांचाही बौद्धिक विकास खंडित करत असतात.
एकुणातील समाजाच्या प्रज्ञेचा...अपार जिज्ञासेचा मार्ग, विचारकलहाचा सृजनात्मक मार्ग यामुळे कुंठित होतो याचे भान आपल्याला येणार काय? आम्ही प्रश्न विचारायला शिकणार काय? अथातो ज्ञानजिज्ञासा...असे म्हणनार आहोत काय?

No comments:

Post a Comment

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...