Friday, April 1, 2022

समाज माध्यमांवरील अभिव्यक्ती आणि आपण!

 






समाज माध्यमांवर सुरुवातीपासूनच सामाजिक, राजकीय आणि धार्मिक (त्यात जातीयही आले) विभिन्न मताचा डोके चक्रावून टाकणारा गलबला दिसतो. गेल्या दहा वर्षात वेळोवेळी अभिव्यक्तीच्या या उद्रेकात काही बदल होताना जरी दिसत असले तरी त्यात गुणात्मक फरक पडलेला नाही. सुशिक्षित आणि त्यात काही सुप्रसिद्ध लोकही एवढे खालच्या पातळीवर कसे जाऊ शकतात, आपल्या अज्ञानाचे आणि विद्वेषाचे एवढे गहन दर्शन का घडवतात असा प्रश्न स्वत:ला सुज्ञ समजणारे  लोक अनेकदा विचारत असतात. त्यात “व्हॉट्स ॲप युनिव्हर्सिटी” म्हणून आजकाल कुप्रसिद्ध झालेला प्रकार तर खोट्या माहितीचा विस्फोट घडवण्याचे साधन म्हणून ओळखले जाते. आजकाल अभिव्यक्तीसाठी अनेक ॲप्सचा सुळसुळाट झालेला आहे. त्यामुळे सातत्याने ख-या-खोट्या (म्हणजे बव्हंशी खोट्याच) माहितीचा प्रसार ज्या वेगाने होतो तो वेग विलक्षण आहे. प्रकाशापेक्षाही जास्त आहे. कोणीही थक्क व्हावे, भांबावून जावे असा आहे. ट्रोल तर कोणीही आणि एवढ्या प्रमाणात होऊ शकतो कि आपली योग्यता विसरून आपण असे का लिहितो वा वागतो हा प्रश्न कोणालाही पडू नये याचे आश्चर्य वाटते. समाजमन हे एवढे उथळ कसे झाले हा प्रश्न उपस्थित करणारी ही बाब आहे असे वाटून अनेक सामाजिक विचारवंत यामुळे उद्विग्नही झालेले दिसतात. अनेक जण समाज माध्यमांपासून दूर राहणे यामुळेच पसंत करतात.

पण सामाजिक माध्यमांमधील अभिव्यक्तीचे मानसशास्त्र आपण तपासू लागले कि वेगळीच तथ्ये दिसू लागतात. अभिव्यक्तीची साधने बेसुमार वाढली आणि अगदी सुमार लोकांनाही ती वापरायची संधी मिळू लागली म्हणून या उथळतेचा उद्रेक अथवा भस्मासुर झाला आहे असे सरधोपट विधान काही लोक करत असतात. त्त्यात समाजमाध्यमांत लोक आभासी मंचावर असल्याने व वेळेचेही बंधन नसल्याने कोणीही कोणाहीबद्दल वा कशाहीबद्दल काहीही लिहू शकतो आणि जनमतसुद्धा बनवू शकतो हा आत्मविश्वास असल्याने असा बेबंदपणा लोकांत येतो व त्याचे भयकारी दर्शन दिसू लागते असेही मानणारे अनेक आहेत. मतमतांतरांचा गलबला आपल्याला येथेही दिसून येतो. समाजमाध्यमांवर बंदीच असली पाहिजे असे मत व्यक्त करणारे काही अभिव्यक्तीविरोधी गट यातूनच तयार होतात व तेही आपले म्हणणे मांडण्यासाठी समाजमाध्यमाचाच आधार घेतात हेही विशेष!

काही लोक मात्र समाजमाध्यम हे अभिव्यक्तीचे सर्वात सुलभ आणि सर्वदूर पसरणारे साधन असल्याने त्याचा तारतम्याने उपयोग केला पाहिजे असे मानून आपापली अभिव्यक्ती वैचारिक वा कलात्मक सामर्थ्याचा परिघात करत राहतात. पण असे लोक तथाकथित “लोकप्रिय” होतातच असे नाही. आणि याचेही नैराश्य त्यांना कधी ना कधी येतेच. मग असे लोकही कधीतरी स्फोटक विधाने करून आपल्याकडे लक्ष वेढून घेण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

त्यामुळे एकुणातील अभिव्यक्तीचा दर्जा हा काळजीचा प्रश्न वाटणे स्वाभाविक आहे, पण मुळात समाजमाध्यमांचा विस्फोट झाला म्हणून अभिव्यक्ती ही उथळ आणि बेलगाम झाली आहे असा निष्कर्ष मात्र काढता येणार नाही. आभासी आणि सर्वाहाती पोचलेली माध्यमे जेंव्हा नव्हतीच तेंव्हा मनुष्य काही वेगळा होता, प्रगल्भ होता किंवा फार विचारी होता असेही म्हणता येणार नाही. किंबहुना मानवी मानसशास्त्र सर्व काळात मुलभूत पातळीवर एकसमान असेच असते. अभिव्यक्तीही त्या मानसिकतेला धरून तशाच पद्धतीने होत राहते.

आपण तंत्रज्ञानाचे युग अवतरले त्याही पूर्वीच्या काळात डोकावलो कि आपल्या लक्षात येईल कि आपली मानसिकता चांगल्या किंवा वाईट पद्धतीने बदलवू पाहणारी मर्यादित परिप्रेक्षामध्ये का होईना, साधने तेंव्हाही होती. पारावरच्या गप्पा असोत कि धर्मस्थानामधील प्रवचने असोत कि त्यावरील प्रतिक्रिया. त्यात तेव्हाही पुरेसे गांभीर्य असेच असे नाही. प्रतिक्रिया तर आता समाजमाध्यमात दिसतात त्यापेक्षाही अचकट विचकट असत. प्रसंगी मारा-मा-याही होत. समग्र समाजात हेच चित्र खेडोपाडी असे. विचार मग तो कोणताही असो, दूरवर पोचायला कदाचित वेळ लागत असेल आणि मुळ विचार जसाच्या तसा शेवटापर्यंत जाईलच याचीही खात्री नसे. असंख्य विचार वा प्रतिक्रिया तेथल्या तेथे मरणपंथाला लागत तर काहीचे आयुष्य दीर्घकाळ असे हे खरे पण आता तरी मग काय आहे? आताही अनंत अभिव्यक्ती एखाद्या तासाच्या सोबती असतात. दीर्घकाळ टिकेल असे आताही फारसे नाही आणि पूर्वी होते असेही नाही. बरे, सुप्त अभिव्यक्ती तर सर्वच काळात होती. आजही आहे जी कधी कोणासमोर येत नसली तरी वर्तनातून तिचे दर्शन घडतेच. आणि वर्तनाचे हे मानसंशास्त्र कोणाच्या आकलनात आले आहे असे दिसत नाही.

सर्वच धर्माच्या संस्थापकांनी वा अनुयायांनी आपापले धर्मग्रंथ लिखित स्वरूपात आणले ते त्यात काही विकृती किंवा अर्थबदल होऊ नये म्हणून. पण असे लेखनही लेखनिकांनी अनेकदा भेसळयुक्त विकृत्या करूनच लिहिले गेले व लोकांपर्यंत आपापल्या पद्धतीने वेगवेगळे अर्थ काढत पसरवले असेही आपल्याला दिसते. त्यामुळे मूळ लेखन काय हे शोधायला आजही पंडितांना प्रयास पडतात. शिवाय लोकसमज आणि गैरसमज हे द्वंद्व आहेच! आताही प्रत्येक व्यक्ती आपापले आकलनच प्रसृत करताना दिसतो, मग वास्तव काहीही असो.

प्रसिद्ध वंद्य लोकांची बदनामी करण्यासाठी सर्वकाळ लोकांनी काही ना काही क्लुप्त्या शोधलेल्या आहेतच आणि काही तर आजही समाजमनावर त्या बद्नाम्या राज्य करताहेत! स्थानिक गावपातळीवर तर या बदनाम्या नेहमीच पारावरच्या गप्पांचा भाग होत्या. खोट्याचा वेगाने प्रसार तेंव्हाही होताच होता! आता हे सारे आभासी पटलावर होते. म्हणजेच सर्वच प्रकारची अभिव्यक्ती सर्वच काळात होत होतीआणि आज केवळ मध्यम वाढलेली आहेत म्हणून तो विस्फोट जाणवतो एवढेच. प्रवृत्ती मात्र तीच आहे.

प्राचीन काळापासून मतमतांतरांचा गलबला हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आहे. हा मानवी उथळ अभिव्यक्तीचा परिपाक नव्हता असे कोण म्हणेल? आणि त्य्याचे त्या त्या काळात सामाजिक पर्तीनाम झालेलेच आहेत. अपवाद कोणताही काळ नाही.

मग आजच्या आभासी समाज माध्यमांवर होणारी अभिव्यक्ती उथळ आणि दर्जाहीन आहे कारण लोकच उथळ आहेत असा दावा आपण कसा करू शकतो? अभिव्यक्ती हा मानवाची पुरातन गरज आहे. ती उथळ आहे असे म्हणायचे झाले तर मग “प्रगल्भ म्हणजे काय?” याचेही उत्तर शोधले पाहिजे. तशी सर्वांना पटेल अशी व्याख्या करून तिचे मापदंड प्रस्थापित करायला हवेत. पण तसे करणे हेही “ट्रोल” व्हायला कारण ठरू शकते. या ट्रोल होण्यापासून पुराण्या जमान्यातील महात्मेही सुटलेले नाहीत हेही लक्षात घ्यावे लागेल.

त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा घटक मूलगामी मानून सामाजिक मानसशास्त्राचेच विश्लेषण मात्र सातत्याने करत रहाणे तेवढे आपल्या हातात आहे. नवे तंत्रज्ञान आले म्हणून मनुष्य उथळ झाला असा निष्कर्ष काढणे मात्र घातक आहे. मनुष्य उथळ होताच, आहेच पण त्याला आता तरी प्रगल्भ कसे करायचे हा खरा प्रश्न आहे आणि तो मार्ग सोपा नाही.

-संजय सोनवणी

 

No comments:

Post a Comment

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...