Friday, April 29, 2022

शिक्षण: ज्ञानयुगाकडे कि अंधारयुगाकडे नेण्याचे साधन?



शिक्षण हे भावी पिढी सक्षम आणि प्रगल्भ होण्याचे एक अत्यंत महत्वाचे साधन आहे. पण अनेक विचारधारा हे मान्य करत नाही. शिक्षण हे आपल्याला सोयीच्या विचारांची बनवणे हे त्यांना शिक्षणाचे उद्दिष्ट वाटते. त्यामुळे अभ्यासक्रमांवर ज्या विचारधारेचे राज्य असते त्या विचारधारेचा प्रभाव आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो हे आपण आजवर पाहिले आहे. त्यासाठी इतिहास असो कि पार विज्ञान, यातही फेरफार करून हवे ते अंश विद्यार्थ्यांना शिकवायला भाग पाडले जाते. कोवळ्या वयातच हे होत असल्याने विद्यार्थीही नकळत त्या पद्धतीच्या शिक्षणाच्या-विचारधारेच्या प्रभावात जातो हे एक वास्तव आहे. पालक सहसा कधीही आपल्या मुलांना काय शिकवले जात आहे यात रस घेत नसल्याने ते आपल्या पाल्याला काय चुकीचे आणि काय बरोबर हे सांगण्याच्या स्थितीत नसतात. आणि “जिज्ञासा” निर्माण करणे हा शिक्षणाचा एक महत्वाचा हेतूच आपल्या शिक्षणपद्धतीतून समूळ सुटला असल्याने विद्यार्थीही प्रश्न विचारण्याच्या फंदात न पडता “परीक्षेत येणा-या प्रश्नांना परीक्षकाला हवी वाटतील अशीच उत्तरे लिहून जास्तीत जास्त मार्क कसे मिळवायचे?” या प्रश्नानेच अधिक भेडसावलेले असतात. त्यामुळे भविष्यात पुढेही काय शिकवले, काय बरोबर, काय चूक याची पडताळणी करून पाहत नाहीत. कारण “मार्क म्हणजेच मेरीट” अशा समजाचे सारे शिकार झालेले आहेत. जिज्ञासा-चिकित्सा हे विषय तर बादच आहेत!

अलीकडेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसइ) इयत्ता अकरावी आणि बारावीच्या इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयांच्या अभ्यासक्रमातून शीतयुद्धाच्या काळातील अलिप्ततावादी चळवळ, आफ्रिका आणि आशियातील काही देशांत झालेला इस्लामी साम्राज्यांचा उदय, मुघलकालीन न्यायव्यवस्था अशा इतिहासाला कात्री लावली आहे तर दहावीच्या अभ्यासक्रमातून अन्नसुरक्षेबाबतचा संपूर्ण धडाच काढून टाकला आहे. उर्दूतील प्रसिद्ध कवी फैज अहंमद फैजयांच्या दोन कवितांचे अंशही काढून टाकण्यात आले आहेत. जे वगळले आहे ते बव्हंशी नेमके नेहरू आणि इस्लामच्या संदर्भातील आहे. विद्यमान सरकार हे उजव्या विचारसरणीचे व पुनरुज्जीवनवादी असल्याने हे घडले आहे हे सहज कोणाच्याही लक्षात येईल.

२०१४ साली जेंव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शपथ घेतल्यानंतर त्यांना रा. स्व. संघाचे शिक्षणपद्धतीतील तज्ज्ञ विद्या भारती प्रत्यक्ष भेटले होते. त्यांनी भारतीय संस्कृती, इतिहास, विज्ञान, तत्त्वज्ञान वगैरेंतील भारतीयांचं योगदान अभ्यासक्रमात असायला हवं यासाठी त्यांना आपला कार्यक्रम दिला. त्यानंतर काही दिवसांत मानव संसाधन खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर स्मृती इराणींनी काय केलं असेल तर अभ्यासक्रमात वेद-उपनिषदं, प्राचीन हिंदू भारतीयांचे विज्ञान, सामाजिक शास्त्र, तत्त्वज्ञान, व्याकरण आणि भाषा यातील योगदान समाविष्ट करण्यासाठी पावलं उचलायला सुरुवात केली आणि तसे निर्देश अधिकार्यांना दिले गेले होते. त्यानंतर अभ्यासक्रमांत वेळोवेळी हस्तक्षेप केला गेला याची यादी मोठी जाईल.

 आता तर भाजप सरकारने गेल्या बारा हजार वर्षांचा इतिहास लिहिण्यासाठी समिती नेमली आहे. त्या समितीत केवळ उत्तर भारतीय ब्राह्मण आहेत. विशेष म्हणजे ते सर्व संघ विचारांचे आहेत. वेदकाळ प्राचीन ठरवणे, रामायण-महाभारत खरेच घडले होते हे सिद्ध करणे आणि महत्वाचे म्हणजे सिंधु संस्कृतीचे जनक वैदिक धर्मीयच होते हे दाखवणे आणि हेच वैदिक आर्य जगभर पसरत इंडो-युरोपियन भाषा आणि संस्कृतीचे वाहक कसे झाले हे दाखवणे हा या समितीचा इतिहासलेखनामगील हेतू आहे. यात द्रविड संस्कृती, जैन-बौद्ध संस्कृती, उत्तरपूर्वेची संस्कृती याला स्थानच नाही कारण या समितीत यातील एकालाही प्रतिनिधित्व नाही. प्राकृत पाली भाषा त्यांच्या दृष्टीने अस्तित्वातच नाही. आणि विशेष म्हणजे हा नवा इतिहास २०२४ पासून अभ्यासक्रमात सामाविष्ट करण्याचे सुतोवाच सांस्कृतिक व पर्यटनमंत्री प्रल्हाद पटेल यांनी केले आहे.

इतिहासाचे शास्त्र ज्यांना समजत नाही अशा उजव्या लोकांना या बदलांचे अप्रूप वाटेल खरे, पण कोणाचाही इतिहास, मग तो प्रांत-देश असो कि व्यक्ती, तुकड्यामध्ये वाटता येत नाही. नकळतपणे तो इतिहास हा समग्र समाजाचा बनून जात असतो व त्या त्या समाजातील एकाच वेळेस सहअस्तित्वात असणा-या इतिहासांचे प्रतिनिधित्व करत असतो. इतिहासाचे तत्वज्ञानही असते. आम्ही जेंव्हा इतिहासाचा प्रवाह सैद्धांतिक चौकटीत अथवा आमच्या तर्कनिष्ठ चाकोरीत बसवू पाहतो तेंव्हा इतिहास आम्हाला हसू लागतो. आमचे इतिहासाचे सामान्यीकरण विनाशक ठरू लागते. इतिहास आमच्या नियमांनी कधीच चालत नाही.

पण आम्ही जेंव्हा इतिहासाबाबत स्वनिर्मित नियम बनवतो ते मानवी दोषांनी लिप्त असतात म्हणून आम्ही सांगत असलेला इतिहास हा इतिहास नसून इतिहासाबाबतच्या राजकीय भावनांनी प्रेरित सुसज्जित कल्पना असतात. त्याकडे साशंकतेने पहायलाच हवे. आणि शोधायला गेले तर सर्वच देशांचा इतिहास आरंभापासून आजपर्यंत गौरवशाली आणि अभिमानास्पदच होता असे मानण्याची स्थिती नाही.

 

पण यापारही जो सत्य इतिहास असतो तोही आम्हाला पसंत पडतोच असे नाही. आजवर दिसणारे वास्तव पचवायची शक्ती वाढवायला हवी कारण ते वास्तवही वास्तव असेलच असे नाही. कारण शेवटी इतिहास ख-या अर्थाने आपल्या हाती लागत नाही. आपल्या हाती लागतात ते केवळ समज जे कधीही बदलू शकतात. हीच बाब सातत्याने विकसित होत असणा-या विज्ञानालाही लागू पडते आणि काहीच अंतिम नाही किंवा आता पर्यंत हाती आले ते संपूर्ण सत्यही नाही हे विद्यार्थ्याना समजावून सांगत त्याला पुढील संशोधनाच्या दिशा देणे हे शिक्षणाचे कार्य आहे.

 

पण तसे होत नाही. अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर “आपल्या सोयीचे” इतिहास लादले जातात. विज्ञानाच्या नावाखाली वैदिक विमान, कॉस्मेटिक सर्जरी असले अवैज्ञानिक विषय किंवा विशिष्ट धर्माचा द्वेष वाटतो म्हणून त्यांचा इतिहास वगळणे यातून एकंदरीत शिक्षणाची तर हत्या होतेच पण भावी पिढीही मानसिक दृष्ट्या अर्धवट, पंगु आणि म्हणूनच राष्ट्राच्या विकासासाठी नालायक अशी जन्माला येते. यातूनच एकांगी वैचारिक अतिरेकी जन्माला यायचा धोका निर्माण होतो. मध्ययुगात नेमके असेच घडायचे. राजसत्ता व धर्मसत्ता शिक्षणावर अंकुश ठेवून असायच्या. आपली शक्ती वाढावी यासाठी प्रसंगी प्राणार्पण करणारे राजनिष्ठ सैनिक व धर्मनिष्ठ नागरिक हवेत म्हणून “युद्धात मेलास तर स्वर्ग मिळेल” किंवा “हे धर्मयुद्ध आहे, त्यात भाग घेणे हे तुझे कर्तव्य आहे.” हे जिहादी तत्वज्ञान ते अगदी गीतेचेही सार ठसवले जायचे. किंबहुना तेंव्हाच्या शिक्षणाचा तो गाभाच होता. बाकीचे शिक्षण या तत्वाला पूरक असेच असायचे. फ्रेंच प्रबोधनाने अनिर्बंध राजसत्ता आणि धर्मसत्तेला आव्हान दिले आणि कलेपासून विद्न्यानापर्यंत असलेला त्यांचा अंकुश झिडकारून लावला तेंव्हा कोठे ख-या विज्ञाननिष्ठ पिढ्या निर्माण व्हायला सुरुवात झाली. आज आपण त्या आधुनिक तंत्रज्ञानाची फळे चाखतो आहोत. रोजगार मिळवतो आहोत. पण आपले शिक्षण मात्र क्रमश: आपल्याला प्रबोधनपूर्व अंधारयुगात ढकलत नेते आहे याचे भान दुर्दैवाने आम्हाला अद्याप आलेले नाही. विज्ञानातील नवे शोध लावावेत, इतिहासाकडे पहायाची दृष्टी व्यापक करत नेत त्यातही निकोप संशोधन करावे असे विद्यार्थी घडवण्याकडे आमचा कल नाही.

 

अंधारयुगाकडे होत जाणारी ही वाटचाल कशी थांबेल हे पाहणे आमचे कर्तव्य आहे.

 

-संजय सोनवणी

 

No comments:

Post a Comment

  Jaina Origin of the Yoga Sanjay Sonawani Yoga is thought to be first elaborated in the Upanishads. They are considered to be the last ...