त्या काळी एकटा-दुकटा व्यापारी आपला मूल्यवान माल दूर देशीच्या बाजारपेठेत नेणे शक्यच नसे, कारण लुटारूंची धास्ती. त्यामुळे त्या काळाचे सारे व्यापारी आधीच नियोजन करत आणि एकत्रच आपापले तांडे घेऊन प्रवासासाठी बाहेर पडत. भारतीय व्यापा-यांनी तर श्रेण्याच स्थापन केलेल्या होत्या. विशिष्ट प्रकारचा माल विकणा-यांची एकत्र येऊन स्थापन केलेली संस्था म्हणजे श्रेणी. गांधार भागात या श्रेण्यांना नेकम असेही म्हणत. जातककथांमध्ये व्यापारी व उत्पादकांच्या श्रेण्यांची बहारदार वर्णने वाचायला मिळतात. श्रेण्यांनी केलेल्या दानधर्माचे असंख्य शिलालेख आपल्याला देशभर मिळतात. एकत्र येऊन व्यापार केल्याचे फायदे तर होतेच पण प्रवासासाठी बाहेर पडणा-या तांड्यांना सुरक्षेसाठी रक्षकांची व्यवस्था करणेही शक्य होई. याचा फायदा धर्मप्रचारक/अभ्यासक आणि सामान्य प्रवासीही घ्यायचे. ते शक्यतो अशा तांड्यांसोबतच प्रवास करायचे.
दर २५-३० किलोमीटरच्या टप्प्यावर व्यापारी मुक्कामासाठी थांबत. या जागा ठरलेल्या असत. अशा जागेवर रात्रीच्या मुक्कामासाठी सराया, तर पोट भरण्यासाठी खानावळी असत. घोडे, खेचरे अथवा बैल बदलल्याची, चारा-पाण्याची आणि इतर दुरुस्त्यांचीही सोय अशा ठिकाणांवर केली जाई. एकंदरीत व्यापारी मार्गावरील अशा गावांची आर्थिक भरभराट व्हायची. सम्राट अशोकाचे बव्हंशी शिलालेख अथवा स्तंभ आपल्याला व्यापारी मार्गावरच मिळतात याचेही कारण झटपट राजाज्ञाचा प्रसार हे होते. जेथे दुर्गम प्रदेश असत, कोसोनकोस लोकवस्तीच नसेल तेथे व्यापा-यांनी थांबा कोणता हे कळावे म्हणून रस्त्याच्या आजूबाजूलाच खुणा केलेल्या असत. सर्व बौद्ध शिल्पचित्रे आपल्याला अशा थांब्यांच्या ठिकाणी चिन्ह म्हणून वापरली गेलेली दिसतात.
हिमालयातून जाणारे व्यापारी बैलगाड्यांचा वापर करणे शक्यच नव्हते कारण तशी भौगोलिक स्थितीही नव्हती. त्यामुळे खेचरे, शिंगरे अथवा घोडे सामान न्यायला वापरली जात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर माल नेता येणे शक्य नसे. फक्त दुर्मिळ व मौल्यवान मालच अशा भागांतील मार्गांवरून नेला जायचा. गिलगीट भागातील हुंझा खोरे हे व्यापारी मार्गांचे मिलनस्थळ तर होतेच पण मध्य आशियात जाणारा सर्वात अवघड मार्ग तेथूनच जात होता. तेथून चारी दिशाना अनेक फाटे फुटत. एक मार्ग बाल्टीस्तानमार्गे कारगिल-लेह-ल्हासा असा जाई. एक मार्ग बुर्झील खिंडीतून काश्मीरला जाई. अफगाणिस्तानातील वाखान प्रांताला जाणारा एक मार्ग येथेही होता. सिंधू नदीच्या काठाने स्वात खोरे पार करत जलालाबादच्या मुख्य रस्त्याला भिडता येई तर एक मार्ग तक्षशिलेला पोहोचे. खुंजेराब खिंडीतुनही एक मार्ग जाई पण तो अजूनच अवघड असल्याने त्याचा वापर कमी असे. खुंजेराब या शब्दाचा वाखी भाषेत अर्थच “रक्ताची दरी” असा आहे. आता काराकोरम हायवे मात्र याच खिंडीतून येतो. दोराह खिंडीतून उत्तर अफगाणिस्तानातील चित्राल येथे जाता येई.
यामुळे हुंझाला एक अपार महत्व प्राप्त झाले होते. मध्य आशियात ज्यांना जायचे असे ते गाडी तर सोडा, खेचरे-घोडेही वापरू शकत नसत. झुलत्या दोरांच्या मार्गाने फक्त पाठीवर ओझे लादलेले हमाल जाऊ शकत. त्यामुळे येथवर येणारे व्यापारी आपल्या सोबतचे ओझेवाहू प्राणी येथेच सोडत. स्थानिक हमाल भाड्याने घेत आणि माल नदीचा भयंकर प्रवाह ओलांडून पल्याडच्या बाजूला जात. तेथे त्यांना दुसरे ओझेवाहू प्राणी भाड्याने मिळण्याची सोय असे. हमाल मंडळी तिकडून आलेल्या व्यापा-यांचा माल पुन्हा पाठीशी घेत हुंझाला परत येत.
येथे अनेक दिशांनी येणारे मार्ग एकत्र येत असल्याने चारी बाजूंनी येणा-या देशोदेशीच्या व्यापा-यांत येथे सौदेही होत. या व्यापा-यांत चीनी, लडाखी, तिबेटी, सोग्दियानी, अफगाणी, रशियन ते भारतीय व्यापारी सामील असत. येथे राहण्यासाठी सराया तर होत्याच पण बौद्ध स्तुपही अनेक होते. अनेक व्यापारी त्यांना दान देत. सा-या व्यावसायिक गोष्टी जुळून यायला किंवा हवामान अनुकूल व्हायला कधीकधी अनेक दिवस अथवा महिने लागत असल्याने व्यापारी आणि सोबत आलेल्या लोकांन फावला वेळही पुष्कळ असे. हा वेळ ते कसा घालवत?
हुंझा खो-यात हुंझा, नगर, शतीयाल आणि हल्डीकेश थांब्यांच्या परिसरात रस्त्यांलगत अगणित शिल्पचित्रे व लघुलेख सापडले आहेत. इसपू ५००० वर्ष एवढी जुनी प्रागैतिहासिक शिकारचित्रेही येथे मिळाल्याने हा मार्ग तेवढाच पुरातन आहे असे आपण म्हणू शकतो.
या चित्रांवरून तेथे व्यापारी पहाडी-बोकडांच्या शिकारी ते बुद्धीबळासारखे खेळ खेळण्यात वेळ घालवत. याच काळात सांस्कृतिक, भाषिक देवाणघेवाणही होत असे. आपण येथे येऊन गेलो हे सांगणारे ब्राह्मी, खरोश्ती, शारदा, आदि लिपींत लिहिलेले प्राकृत ते ग्रीक भाषेतील लघुलेख (ग्राफिटी) जसे आहेत तसेच सोग्डीयन व चीनी भाषेतील लघुलेखही आहेत. हे लेख लिहिणारे व्यापारी, बौद्ध भिक्षु, प्रवासी तसेच आक्रमक राजनयिक अधिकारीही आहेत. आपण कोण, वडिलांचे नाव ते तेथे येण्याची तारीख एवढाच तपशील बहुतांश लेखांत आहे. एकार्थाने आपल्या स्मृती कोणत्याना कोणत्या रूपाने जतन करायची प्रवृत्ती पुरातन आहे असे म्हणता येईल. एका अर्थाने तत्कालीन जागतिक संस्कृतींचा मिलाफ व्हायचे हे स्थळ होते आणि त्याचे मुबलक पुरावे या लघुलेखांतून आपल्याला मिळतात.
चीनशी भारताच्या असलेल्या संपर्काचा सन चवथ्या शतकातील एक शिलालेखीय पुरावा येथे मिळाला आहे. हा लेख वेई सम्राटाच्या गु-वेई लॉंग या अधिका-याच्या बदलीसंबंधी आहे तर एक तिबेटी लेख तेथील यशस्वी झालेल्या पहाडी बोकडांच्या शिकारीसंदर्भात आहे. बौद्ध भिक्षूंचे व व्यापा-यांचे तर असंख्य लघुलेख आहेत. तत्कालीन नावे व त्यांचे मुळ स्थान यावरून तेथे येणा-या लोकांचा भौगोलिक विस्तारही समजतो. चित्रांमध्ये मात्र प्राबल्य आहे तेथील पूज्य मानल्या गेलेल्या पहाडी बोकडांचे. असे म्हणतात की स्थानिक तांत्रिक या बोकडांचा मुखवटा घालत आणि मग त्यांच्यां अंगात येई. मग ते प्रत्येक समस्येवर उत्तर सांगत. असे असले तरी बोकडांची संख्या विपुल असल्याने शिकारीवरही प्रतिबंध नव्हता.
थोडक्यात, व्यापारी मार्ग कितीही संकटांनी भरलेला असला तरी संधी मिळाली कि मौजमजा करण्याची संधी व्यापारी व तांड्यातले लोक सोडत नसत. जीवनातील क्षणभंगुरता ज्यांना सातत्याने पहावी लागते ते साहजिक बुद्धाच्या धर्माकडे आकर्षित होणे स्वाभाविक म्हणावे लागेल. हुंझा भागातील ही पुरातन इतिहास सांगणारी चित्रे व लघु-लेख जागतिक वारशात गणली जातात. अर्थात अगणित लेख व चित्रे काळाच्या ओघात मानवी दुर्लक्ष किंवा प्राकृतिक उत्पातात नष्ट झालेली आहेत हेही एक वास्तव आहेच.
पण, व्यापारी थांबे हे निश्चितच प्रवासाने थकलेल्या प्रवाशी ते श्रामिकाचे लाडके विश्रांतीस्थान होते. अशा ठिकाणी मानवाने आपल्या आठवणी, श्रद्धा जतन तर केल्याच पण असे अवशेष कोठे दिसले तर हा पुरातन व्यापारी मार्ग असावा याच्या खुणाही ठेवल्या गेल्या. कारगिल भागातील सुरु नदीचे खोरे आणि बाल्टीस्तानकडे जाणा-या सिंधू नदीच्या काठच्या मार्गावर आजही व्यापारी थांब्यांच्या स्मृती बुद्धाच्या विशालकाय पाषाण-चित्रांतून जतन झालेल्या आहेत. महाराष्ट्रातील बहुतेक किल्ले व लेण्या व्यापारीमार्गांवरच आहेत हेही लक्षात घ्यावे लागते. व्यापारी मार्गांनी नुसती देशाची अर्थसंस्कृती प्रबळ केली असे नाही तर सांस्कृतिक उत्थानालाही मोठा हातभार लावला हे लक्षात घ्यावे लागते ते यामुळेच!
-संजय सोनवणी
सर, हिंदू धर्माचं ब्लॅक होल सारख झालं आहे जे त्याच्या आत आहे ते दिसणे आणि पाहणे अशक्य होत आहे. जे चमकते आहे तेच दिसते आहे.😢
ReplyDeleteसर, घोड्यांचा वापर वैदिकांच्या आगमनानंतर सुरू झाला की ते येण्याच्या आधीपासून घोड्यांचा वापर होत होता? कृपया उत्तर द्यावे.
ReplyDelete♥️लेख आवडला.
ReplyDelete