Tuesday, September 6, 2011

"दहशतवादाची रुपे"

माझे "दहशतवादाची रुपे" हे दहशतवादावर विविधांगांनी प्रकाश टाकणारे पुस्तक लवकरच प्राजक्त प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. या लेखनामागील भुमिका खाली दिलेली आहे.

भुमिका

दहशतवादाच्या असंख्य रुपांनी आजचे समग्र मानवी जीवन व्यापले आहे. त्याची गती ज्या पद्धतीने वाढत चालली आहे तिची चिंता वाटणे स्वाभाविक आहे. सारा मानवी समाज एका भयाच्या सावटाखाली जगत आहे. जगातील धर्म, राज्यव्यवस्था, सांस्क्रुतिक संघर्ष आणि अर्थव्यवस्था विविध प्रकारच्या दहशतवादाची कारणे बनली आहेत. त्यामुळे दहशतवादाचा विचार समग्र वेगळ्या पद्धतीने करावा या हेतुने मी हे लेखन केले आहे.

दहशतवादाची मानसिकताच मुळात कशी निर्माण होते हा महत्वाचा प्रश्न मी जवळपास सर्वच प्रकरणांतुन चर्चेला घेतलेला आहे. एवढेच नव्हे तर दहशतवादाचा इतिहास त्या-त्या दहशतवादाच्या परिप्रेक्षात घेतलेला आहे. त्यावरुन दहशतवाद, मग तो कोणत्याही स्वरुपाचा असो, त्याची बीजे प्राचीन काळातच पडलेली आहेत असे स्पष्ट होते. म्हणजे द्न्यान-विद्न्यान-समाजव्यवस्थांच्या क्शेत्रात आधुनिक मानवाने कितीही प्रगती केली असली तरी तो आपल्या हिंसक आणि वर्चस्ववादी आदिम भावनांबाहेर अद्याप पडलेला नाही आणि हे सर्वच आधुनिक समाजाचे घोर अपयश आहे.

हिंसक दहशतवादाचा खात्मा प्रतिहिंसेने करावा हा मतप्रवाह सध्या सर्वच समाजघटकांवर पडत चाललेला आहे. मला वाटते ही मानसिकता दहशतवादाचा अंत कधीही करु शकणार नाही. खरे तर प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या पातळीवर दहशतवादीच असते. त्याची परिमाने वेगळी असतात एवढेच. हिंसक दहशतवाद अशा व्यापक समष्टीच्या एकुणातील भावनांची अल्प गटांकडुन होणारी अभिव्यक्ती असते असे नाईलाजाने म्हणावे लागते. आर्थिक दहशतवाद व सांस्क्रुतीक दहशतवादात हिंसा नसते पण त्याचे जे गंभीर परिणाम एकुणातील सर्वच समाजांना कसे भोगावे लागतात हेही मी स्वतंत्र प्रकरणांतुन लिहिले आहेच. येथे थोडक्यात सांगायचे तर वर्तमानात व भविष्यात हिंसक दहशतवादापेक्षा हे दहशतवाद हत्यारे म्हणुन मोठ्या प्रमाणावर अवलंबले जातील आणि त्याची परिणती जागतीक समतोल ढासळण्यात होईल. यावर आत्ताच चिंतन करणे आवष्यक आहे.

एखादी हिंसक दहशतवादी घटना घडली कि लोक जागे होतात. दहशतवाद्यांवर व त्यांच्या धर्मावर तोंडसुख घेतले जाते...काही दिवस समाज ढवळुन निघाल्यासारखा वाटतो आणि सारे काही शांत-शांत होते. तो पुन्हा जागा होतो जेंव्हा अजुन दुसरी घटना घडते. हे सर्वच जागतीक समाजांची भयंकर नैतीक व सामाजिक चुक आहे. दहशतवादी घटना एकाएकी होत नसते. त्या घटनेसाठी नकळत आपण निमंत्रण देत असतो याचे भान गमावले गेले आहे. खरे तर दहशतवादाविरुद्धचा लढा सरकारने नव्हे तर अखिल मानवी समुदायानेच लढायचा असतो. धर्मद्वेष/जातीद्वेष/संस्क्रुती द्वेष आणि वर्चस्ववादी भावना यांचा अंत होत नाही तोवर सरकारांनी कितीही प्रयत्न केला तरी दहशतवाद संपु शकत नाही. आणि या शतकात तर अनेक सरकारेच कोणत्या ना कोनत्या प्रकारच्या दहशतवादांत सक्रीय भाग घेत असल्याने स्थीति अधिकच गंभीर होत चालली आहे. मानवी जीवनाचे मुल्य पायतळी तुदवले जात असुन अखिल वैश्विक मानवतेच्या कल्पनांना पुरेपुर सुरुंग लागलेला आहे.

हे पुस्तक दहशतवादांच्या अनेक रुपांवर प्रकाश टाकते. सुजाण वाचकांनी त्यावर चिंतन करावे व दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात आपापले योगदान द्यावे ही अपेक्षा. या पुस्तकातील अनेक लेख किर्लोस्कर मासिकात २००९-१० या काळात प्रसिद्ध झाले होते. त्यावर असंख्य वाचकांनी आपापली मते नोंदवली होती. प्रस्तुत पुस्तक रुपांतर करत असतांना मला त्यांचा बहुमोल उपयोग झाला आहे. मी सर्वांचा आभारी आहे. पण सर्वात मोठे आभार किर्लोस्करचे साक्षेपी संपादक श्री. विजय लेले यांचे. हे पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल माझे धाकटे बंधु समान श्री. जालिंदर चांदगुडे यांचेही मी आभार व्यक्त करतो.

आपला,
संजय सोनवणी

No comments:

Post a Comment

जनानखान्यांचे अद्भुत विश्व!

  जनानखाना, ज्याला अंत:पूर, राणीवसा किंवा हरम असेही म्हटले जाते त्याबाबत समाजामध्ये अनेक समजुती प्रचलित आहेत. शत्रूच्या जिंकलेल्या स्त्रीय...