(महाराजा यशवंतराव होळकरांचे चरित्र मी सध्या लिहित आहे. या महान सेनानी व पहिल्या स्वातंत्र्ययोद्ध्याबद्दल गैरसमजच अधिक पसरवुन त्यांना विस्म्रुतीत ढकलण्यात आले आहे. हा अन्याय दूर करण्याचा हा प्रयत्न आहे. पुर्ण चरित्र पुढील महिन्यात प्रकाशित होईलच...त्यातील हा एक भाग...)
यशवंतरावांना लावण्यात आलेला एक असह्य कलंक म्हणजे त्यांनी पुणे संपुर्ण लुटले, जाळले व प्रजेवर अनन्वित अत्याचार केले. यशवंतरावांनी ज्यांची घरे लुटली ती फक्त शिंदें-समर्थकांची व बाजीरावाच्या सल्लागारांची. एकच वाडा जाळला तोही म्हाळुंग्याला, पुण्यात नव्हे. हा वाडा दौलतरावाचा सरदार अंबुजी इंगळे याचा होता. याशिवाय यशवंतरावांनी अन्य कोनावर जुलुमजबरदस्ती केली, लुटालुट केली वा होळकरी दंगा म्हणतात तसा प्रकार केलेला नाही वा तशा स्वरुपाचा एकही पुरावा आस्थित्वात नाही. तरीही आजही अगणित लोकांच्या मनात त्यांची एक खलपुरुष म्हणुनच प्रतिमा रंगवली गेलेली आहे...हे एक अघटितच आहे, पण त्याबद्दल पुढे.
यशवंतराव मोठ्या पेचात सापडले होते. पेशव्याची गादी रिक्त झाली होती. फौजेचे तनखे थकु लागले होते. पुण्यातही स्मशानशांतता होती. वाणी-उदीम दुकाने उघडत नव्हते. बाजारपेठा ठप्प झाल्या होत्या. काहीतरी त्यांनाच करावे लागणार होते.
त्यांनी स्वता: व्यापा-यांना आपापले व्यवसाय सुरु करायला सांगितले. जेथे वाद होते तेथे भाव बांधुन देण्यातही पुढाकार घेतला. चिंचवदमद्धेही महाराजांनी जीवन सुरळीत होण्यासाठी प्रयत्न केले. लोकांमद्धे भय होते ते आधी दुर करायला हवे होते. हळुहळु पुण्यातील लोकजीवन सुरळीत होवू लागले.
दरम्यान त्यांच्या मातोश्री, पत्नी व कन्या मुक्त केल्या गेल्या होत्याच. खंडेराव व त्याची माता मात्र अन्य ठिकाणी कैदेत असल्याने ती सुटका साधली नाही. पती-पत्नीची पुनर्भेट तब्बल ५ वर्षांनी झाली होती. भिमाबाई आता सहा वर्षांची झालेली होती. तिचे बालपणही पहायला न मिळालेला हा अभागी पिता. एवढा काळ हा सारा परिवार शिंदेंच्या कैदेत होता. सीतेला ज्या प्रकारे रावणाच्या कैदेत अनेक वर्ष काढावी लागली त्याचीच ही दुर्दैवी पुनराव्रुत्ती. या नीचपणाबद्दल मराठी इतिहासाने दौलतराव शिंद्यांचे वाभाडे काढल्याचे मी कधी कोठे वाचलेले नाही.
बाजीराव येत नाही हे स्पष्ट होताच यशवंतरावांनी मोरोबादादा व बाबा फडके यांच्या मार्फत अम्रुतरावाला निमंत्रित करुन त्याला पेशव्यांतर्फे कारभार करायला लावायचे त्यांनी ठरवले. . पुण्यातील बाजीरावाच्या काळात अडगळीत फेकल्या गेलेल्या काही जुन्या मुत्सद्द्यांचे पुनरुज्जीवन करण्यत आले. अम्रुतराव तेंव्हा जुन्नर येथे होता. त्याला ही संधीच होती. तो पुण्याला आला. १२ नोव्हेंबर १८०२ला त्याने कारभार हाती घेतला. पेशवा होण्याचे त्याचे जुने स्वप्न. पेशव्याचा प्रतिनिधी म्हणुन काम पहायलाही त्याची हरकत नव्हती...पण आता बाजीराव पुण्याला असा येत नाही हे स्पष्ट झाल्यावर त्याने यशवंतरावांशी करार केला. या करारानुसार यशवंतरावांनी अम्रुतरावाला खालीलप्रमाणे मदत करायची होती...
१. रायगडावर कैदेत असलेल्या सवाई माधवरावाच्या पत्नीला, यशोदाबाईला मुक्त करुन अम्रुतरावाचा मुलगा तिला दत्तक घ्यायला लावायचा आणि त्याच्यासाठी पेशवाईची वस्त्रे सातारकर छत्रपतींकडुन देववायची.
२. या बाल-पेशव्याचा प्रतिनिधी म्हणुन अम्रुतरावने दौलतीचा कारभार पहायचा.
३. अम्रुतरावाला यशवंतरावांनी पुर्ण संरक्षण द्यायचे व शिंद्यांचा बंदोबस्त करायचा.
या बदल्यात अम्रुतरावाने यशवंतरावांना युद्धखर्च व हा वरकड खर्च यासाठी एक कोटी रुपये द्यायचे.
परंतु यशोदाबाईंना रायगडावरुन सोडवुन आणण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले.बाजीराव तेंव्हा रायगडावरुन निसटुन सुवर्णगडावर जावून पोहोचला होता. यशवंतरावांनी मग मानेंना साता-याला पाठवुन खुद्द अम्रुतरावासाठी पेशवाईची वस्त्रे आणुन दिली व आपला शब्द पाळला. पण काही ना काही कारणाने (बव्हंशी कारणे त्याच्या सल्लागारांनीच निर्माण केली होती.) अम्रुतरावाची ती वस्त्रे स्वीकारण्याची हिम्मत झाली नाही. अम्रुतरावानेही पैसे देण्यासाठी चालढकल सुरु केल्यावर मात्र यशवंतरावांनी त्याच्यावर दबाव वाढवला. शहरातील श्रीमंतांवर पट्टी बसवुन पंचविस लाख उभे करण्याचा निर्णय अम्रुतरावाने व त्याच्या कारभा-यांनी घेतला. वसुलीचे काम हरीपंत भावेवर सोपवण्यात आले. हा अम्रुतरावाचा सरदार होता. त्याला मदत म्हणुन काही यशवंतरावांचेही लोक द्यावेत अशी अम्रुतरावाने विनंती केल्यावरुन यशवंतरावांनी सरदार नागो जीवाजी, हरनाथसिंग व शेखजी हे तीन सरदार दिले.
म्हणजेच अम्रुतरावाच्या आदेशानेच पुण्यात पट्टी वसुली सुरु झाली होती. या वसुलीचे नेत्रुत्व त्याचाच सरदार हरीपंत भावे हा करत होता. मी माझे निष्कर्ष मांडण्याआधी, कितीही पुर्वग्रहदुषित असली तरी, अन्य इतिहासकारांनी याबाबत काय लिहिले आहे ते त्यांच्याच शब्दात मांडतो...
१. रियासतकार श्री. गो.स. सरदेसाई: (मराठी रियासत, खंड ८) ..".गांवांत एकच हाक झाली. कोणी तांब्या ठेवून पैसा देत नाही. पैसा न मिळाल्यास पठाणांचे हवाली करितात. प्राणांशी गांठ आहे, ब्राह्मण म्हणजे तुच्छ, श्रीहरीचा कोप प्रजेवर झाला. होळकराचे लोकांनी तमाम शहर लुटून घरोघर खणत्या लावून द्रव्य, भांडे, सोने, रूपे, जवाहीर, कापड यांची लूट केली. तोफखाना लुटला. सोन्याची अंबारी अमृतरावांनी होळकरास दिली. पुढे राजकारण सिद्ध होत नाही असे अमृतरावास दिसों लागले, तेव्हा त्यांनीही रात्रीस लोक व कारकून पाठवून लोकांच्या घरांत शिरून घरे खणून चीजवस्त जे सांपडेल ते आपल्या डेऱ्यास नेत गेले. पुण्यांत कोणी गृहस्थ नामांकित पाहून त्याजवर पठाणांस वरात देऊन पाठवावे, पठाणांनी त्यांस धरून मारहाण मनस्वी करावी. वीरेश्वरभट कर्वे व जिवाजीपंत नेने मारतां मारतां मेले. याप्रमाणे शहर बेजार झाले. पौषापासून चैत्र वद्य १४ पावतो चार महिने अमृतरावाचे दरवडे पुण्यास चालू होते. हरि भाव्याने लोकांचे सामान लुटून ब्राह्मणभोजने घातली. चिंचवडास बहुत उपद्रव लागला. ब्राह्मण विष खाऊन मरतात. दर असामी एक तोळा अफू पदरी बांधून आले होते. होळकरांनी आज्ञा वंदन करून तेच बैठकेस मना चिठ्ठी देऊन चिंचवडास हुजरे पाठवले.'
रियासतकारांचे हे विवेचन परस्परविरुद्ध आहे हे ठळक शब्दांतील विधाने वाचताच लक्षात येईल. पण सर्वप्रथम म्हनजे पुर्वग्रहदुषित असुनही रियासतकार यशवंतरावांनी पुणे जाळले असे कोठेही म्हणत नाहीत.
दुसरे असे कि "होळकराचे लोकांनी तमाम शहर लुटून घरोघर खणत्या लावून द्रव्य, भांडे, सोने, रूपे, जवाहीर, कापड यांची लूट केली. तोफखाना लुटला. सोन्याची अंबारी अमृतरावांनी होळकरास दिली..." हे विधान पुरेपुर विसंगतीने भरलेले आहे. जर होळकरांचेच लोक लुट करत होते तर लुटुन आनलेली सोन्याची पालखी होळकरांनाच देनारा अम्रुतराव कोण? हा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. होळकरांच्याच लोकांनी लुट केली तर ती होळकरांकडेच जाणार हे उघड आहे. म्हणजेच काय वाट्टेल ते करुन यशवंतरावांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. लुट करणारे अम्रुतरावाचेच लोक होते हेही येथे ठळक होते.
तिसरे विधान अजुन महत्वाचे आहे. "पौषापासून चैत्र वद्य १४ पावतो चार महिने अमृतरावाचे दरवडे पुण्यास चालू होते. हरि भाव्याने लोकांचे सामान लुटून ब्राह्मणभोजने घातली..." या वाक्क्यात मात्र चार महिने सतत अम्रुतरावाचे दरोडे चालु होते असे स्पष्ट म्हटले आहे. वाक्य स्वयंस्पष्ट आहे. त्याचा सरदार हरी भावे काय लायकीचा होता हेही येथे स्पष्ट होते. लोकांचे सामान लुटुन ब्राह्मनभोजने घालणारा हा नालायक. यशवंतराव पुण्यात १३ मार्च १८०३ पर्यंत होते. पौष महिना साधारणपणे जानेवारीत येतो. अम्रुतराव पुण्यात १९ एप्रिलपर्यंत होता. येथे हा चार महिन्याचा कालावधी जुळतो. याचा अर्थ असा कि यशवंतराव जोवर पुण्यात होते तोवर ज्या वसुल्या केल्या जात होत्या त्या फक्त श्रीमंत नागरिकांकडुन आणि तोही फारसा जुलुम जबरदस्ती न करता. पण यशवंतराव निघुन गेल्यानंतर आणि बाजीराव इंग्रजी फौजेसह पुण्याला यायला निघाला आहे हे कळताच अम्रुतरावाने पुणेकरांवर मिळेल तेवढे धन काढुन घेण्यासाठी अत्याचार केले व त्याचे पाप मात्र यशवंतरावांच्या माथी थोपले असेच स्पष्ट्पणे म्हणावे लागते.
रियासतकारांचे शेवटचे वाक्य हे चिंचवडच्या देवस्थानाच्या ब्राह्मणांबाबत आहे. अम्रुतरावाने त्यांच्यावरही वसुलीचा रोखा काढला होता व ते वसुलीसाठी नादले जात होते. यशवंतरावाणी स्वत: तो रोखा रद्द करुन त्यांची परत पाठवणी केली आहे.
आता आपण दुस-या पुराव्याकडे वळुयात.
२. मराठ्यांचा इतिहास खंड - ३ ( संपादक :- अ. रा. कुलकर्णी आणि ग. ह. खरे )
प्रकरण ८ ) ले. सुमन वैद्य
"...१८०२ पर्यंत होळकराने शिंद्यांचे सामर्थ जवळपास संपुष्टात आणले. ते पाहून अमृतरावाने पेशव्याच्या विरोधात चाललेल्या कारस्थानांना गती दिली. यासाठी मोरोबा फडणीस व बाबा फडकेची त्यास मदत होती. यशवंतरावाने दक्षिणेत येऊन पेशव्यास पाठिंबा देणाऱ्यांचे पारिपत्य करावे, खुद्द पेशव्यास पकडून शासनाची सर्व सूत्रे अमृतरावाकडे सोपवावीत. शिंद्यांचा पराभव करून दक्षिणच्या राजकारणातून त्याचे समूळ उच्चाटन करावे. या बदल्यात अमृतरावाने होळकरास एक कोटी रूपे रोख द्यावेत, मल्हारराव होळकराचा* मुलगा खंडेराव यास होळकर घराण्याचा प्रमुख व यशवंतरावास त्याचा प्रतिनिधी म्हणून मान्यता द्यावी असे ठरले. ( * हा मल्हारराव तुकोजी होळकराचा मुलगा )
बाजीराव पुणे सोडून गेल्यावर यशोदाबाईस पुण्याला आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. यशोदाबाईच्या मांडीवर अमृतरावाचा मुलगा विनायकबापू यास दत्तक देऊन त्यास पेशवा बनविण्याचा त्यांचा विचार होता. यशोदाबाई रायगडावर कैदेत होती. तिला सोडवून आणायला फौज पाठवली पण याचवेळी बाणकोटच्या खाडीत ब्रिटीश आरमार आल्याने होळकराची फौज मागे आली.
जानेवारी १८०३ मध्ये दौलतराव शिंदे दक्षिणेत येत असल्याच्या बातम्या आल्या. त्यामुळे अमृतराव गडबडून गेला. त्याशिवाय होळकर व अमृतराव यांच्यात तंटा निर्माण झाला. अमृतरावाने बोलल्याप्रमाणे १ कोट रुपये होळकरास दिले नाहीत. तेव्हा त्याने ते पुण्यातून सक्तीने वसूल केले. त्या लुटालुटीत अमृतरावाचा देखील सहभाग होता. मार्च १८०३ मध्ये होळकराने पुणे सोडले. जाताना औरंगाबाद, बीड, पैठण इ. तालुक्यांत त्याने मनसोक्त लुटालूट केली. ब्रिटीश फौज पुण्यानजीक आल्यावर १९ एप्रिल रोजी अमृतराव पुणे सोडून गेला. पुण्यात त्याने जी काही लुटालूट केली त्या लुटीतील संपत्ती हत्ती, उंट, गाड्या यांवर लादून नेली. वाटेत चाकण, राहुरी, संगमनेर व पंचवटीसह नाशिक हा सर्व मुलुख त्याने लुटून फस्त केला."
रियासतकार व सुमन वैद्य यांच्या माहितीत फरक आहे हे उघड आहे. अम्रुतरावाने यशवंतरावांना १८०२ मद्धेच ते उत्तरेत असतांनाच संपर्क साधुन एक कोटीच्या बदल्यात त्यांनी दक्षीणेत येवून शिंद्यांचा बंदोबस्त करावा व खुद्द पेशव्यास पकडुन सर्व सुत्रे अम्रुतरावाकडे सोपवावीत हे विधानच मुळात अनैतिहासिक आहे हे आतापर्यंत मी यशवंतरावांचा जो इतिहास मांडला आहे त्यावरुन स्पष्ट होते. बाजीरावापेक्षा अम्रुतराव बरा असे यशवंतरावांचे मत होते हे खरे असले तरी बाजीरावाला हटवुन/अटक करुन अम्रुतरावाला पेशवा बनवायचे असते तर पुण्याच्या लढाईअगोदरच यशवंतरावांनी अम्रुतरावाला आपल्याकडे बोलावून घेतले असते व बाजीरावाला पाठलाग करुन, पकडुन अम्रुतरावाला पेशवा बनवले असते. तसे झालेले दिसत नाही. त्यामुळे ही हकीगत निराधार वा ऐकीव गप्प आहे असे म्हणता येते. बाजीराव परत येत नाही व दौलतीला कारभारी नाही हे स्पष्ट झाल्यानंतरच अम्रुतरावाला पुण्याला बोलावुन घेण्यात आलेले आहे.
अम्रुतराव पुणे सोडुन गेला तेंव्हा त्याने जी लुट हत्ती...उंट...गाड्यांवर लादुन नेली ती पहाता पुण्याचाच नव्हे तर नशिक, पंचवटी, राहुरी, चाकणचाही खरा दरवडेखोर कोण हे लगेच लक्षात येते. येथे अम्रुतरावाचे पाप यशवंतरावांवर ढकलण्याचा प्रयत्न स्पष्ट दिसतो. म्हणजेच जीही काही लुट झाली ती अम्रुतरावाने १३ मार्च ते १९ एप्रिल १८०३ च्या दर्म्यान केलेली आहे, तत्पुर्वी जी काही वसुली झाली त्यातील काही हिस्सा यशवंतरावांना खर्चापोटी अम्रुतरावाने दिलेला दिसतो. अम्रुतरावाने शेवटपर्यंत यशवंतरावांना एक कॊटी रुपये दिले नाही हेही वास्तव आहे. खरे तर या मोहिमेत यशवंतरावांचे आर्थिक नुकसानच झालेले आहे. त्यामुळे परततांना त्यांनी औरंगाबाद, बीड ई. भागातुन खंडण्या वसुल केल्या असतील तर त्याचा दोष कोणाचा आहे? येथे हे लक्षात घेणे आवश्यक आहे कि तत्कालीन राजकीय स्थितीत युद्धखर्च हा जिंकलेल्या जहागिरदार ते तेथील श्रीमंत नागरिकांकडुनच वसुल केला जात असे. तो सहजी मिळाला नाही तरच लुटालुट केली जात असे. त्यात काहीही वावगे मानले जात नसे.
अम्रुतरावाचे वैगुण्य कमी करण्यासाठी होळकरांचाच खोटा पण मोठा बागुलबुवा उभा करण्याचा प्रयत्न तत्कालीन कारभारी व लेखकांनी केलेला दिसतो.
३. आता आपण काही अप्रत्यक्ष पुराव्यांकडे वळुयात. बाहेरगावच्या सरदारांना, सावकारांना पुण्यात जे जे काही घडते त्याची माहिती देण्यासाठी त्यांनी पुण्यात खास बातमीदार (अखबारनविस) ठेवलेले असत. अशाच एका वेंकट बल्लाळ या बातमीदाराने हरि विट्ठल नावाच्या आपल्या मालकास पुण्यातुन पत्र गेले होते. त्या पत्रात "पदरचे सरदार होळकर व शिंदे यांची लढाई पुणेंयावर होवून महाराज वसईस गेले..." एवढाच उल्लेख आहे. होळकरी दंगा वा लुटालुटीचा कसलाही उल्लेख या पत्रात नाही. पत्रलेखक पुण्यातीलच असल्याने त्याने असे काही घडले असते तर नक्कीच उल्लेख केला असता.
जागतिक किर्तीचे इतिहासकार सर जदुनाथ सरकार आपल्या Fall Of The Mughal Empire Vol.5 (1789-1803) या प्रसिद्ध ग्रंथात होळकरांनी उज्जैन, कोटा, मंदसोर, भानसोडा...अशा असंख्य ठिकाणी यशवंतरावांनी खंडण्या वसुल केल्याचे ठलकपणे नमुद केले आहे. काही लुटींबाबतही लिहिले आहे. पण पुण्यात मात्र कसल्याही प्रकारची लुट झाली नसुन फक्त ठराविक श्रीमंतांवर पट्टी लावुन जे देत नव्हते त्यांच्याकडुनच सक्तीने वसुली केली असे नमुद करतात. जर एवढा गहजब ज्या लुटी व जाळपोळींबाबत केला जातो तसे असते तर त्यांनी त्याचाही नक्कीच उल्लेख केला असता.
इंग्रज हे यशवंतरावांचे हाडवैरी होते हे जगजाहीर आहे. पण ब्यरी क्लोज वा त्यानंतर पुण्याचा रेसिडेंट बनलेला एल्फिस्टनसुद्धा जाळपोळीबाबत काहीएक नमुद करत नाही.
१-१०-१९४३चा शाहीर खाडिलकरांच्या पोवाड्यात यशवंतरावांचे बव्हंशी जीवन चित्रीत केलेले आहे पण त्यातही पुण्याच्या जाळपोळी वा लुटालुटीचा उल्लेख नाही.
"झुंज" या यशवंतरावांवरील कादंबरीच्या प्रस्तावनेत (येळकोट) लेखक ना. सं. इनामदार यांनीही होळकरांनी पुणे जाळले, पुर्णपणे लुटले या अफवांना कसलाही आधार नाही असे स्पष्टपणे नमुद केलेले आहे.
काही इतिहासकार व यशवंतराव समर्थक "कदाचित इंग्रजांसोबत बाजीराव येत आहे , त्याला येथे कसलीही रसद मिळु नये म्हणुन यशवंतरावांनी "दग्दभु" धोरण स्वीकारले असावे व पुणे जाळले-लुटले असावे असे लंगडे समर्थन करतांना दिसतात. पण मुळात त्याची गरज नाही कारण ते खरे नाही. बाजीराव वसईच्या तहान्वये इंग्रजांचे सार्वभौमत्व मान्य करुन त्यांच्यासह पुण्यात आला व १३ मे १८०३ रोजी पुन्हा गादीवर बसला. दग्दभु धोरनांतर्गत जर खरेच जाळपोळ झाली असती, पुणे पुर्ण लुटुन फस्त झाले असते तर बाजीराव कसा गादीवर बसु शकला असता? शहरात नागरिक तरी नकोत काय? असले तर ते काय जळक्या वाड्या-घरांत इतके दिवस राहिले असते काय? आणि ज्या इंग्रजांनी बाजीरावाला आपला अंकित केले त्यांनी असला काही प्रकार झालाच असता तर त्याच्या तपशीलवार नोंदी केल्या असत्या. कारण बाजीराव इंग्रजांसह पुण्यात येण्याच्या आदल्याच दिवशी अम्रुतरावाने त्याच्याबरोबरीलही कथित अवाढव्य लुटीसह पुणे सोडले होते.
थोडक्यात जे स्पष्ट दिसते ते असे...पुणे जाळले गेले नाही. पुण्यातील श्रीमंतांकडुन काही प्रमानात (जेमतेम पाच ते दहा लाख रुपये) वसुली केली गेली. अम्रुतरावाकडुन , म्हनजे पुण्यातुन, पुर्ण पैसे मिळणे अशक्य आहे हे दिसताच यशवंतराव पुणे सोडुन ससैन्य-सपरिवार निघाले. यशवंतराव निघुन गेल्यानंतर आणि इंग्रज बाजीरावासह येत आहेत हे कळाल्यानंतर अम्रुतरावाने मात्र सरळसोट लुटच केली. त्याला मात्र लुटच म्हणावे लागते कारण आता त्याला पट्टी वसुल करण्याचा कसलाही अधिकारच उरलेला नव्हता. तो आता या नव्या राजकीय घडामोडीमुळे पुण्यात चक्क उपटसुंभ ठरला होता. त्याला तसा स्वत:साठी लोकांकडुन एक पै सुद्धा जमा करण्याचा अधिकार नव्हता. तरीही त्याने संधीसाधु बनत लुट केलेली दिसते. सुमन वैद्य यांचे म्हनणे अतिरंजित असले तरी अम्रुतरावाने ब-यापैकी संपत्ती पुण्यातुन गोळा करुन नेलेली दिसते.
अशा स्थितीत अम्रुतरावाबद्दलही आजवर कोणी बोलतांना दिसत नाही. त्याला कोणी सजा देण्याची मागणी सोडा साधा गुन्हेगारही ठरवल्याचे दिसत नाही. यशवंतरावांनी लाखोंचे सैन्य आणुन शिंदेंच्घा फडशा पाडला होता. त्यांनी युद्धखर्च मागणे स्वाभाविक होते. तो तर दिला नाहीच, आणि ज्याचे कार्यकर्तुत्व फक्त पेशव्याचा भाउ आणि पेशवा न आल्यास पेशवा व्हायला उताविळ उमेदवार एवढेच, त्याने पुणे लुटावे, स्वत:चे खिसे भरावेत आणि त्याच्याकडे कोणी बोटही दाखवु नये?
बदनाम करावे ते यशवंतरावांना?
कारणाखेरीज काही होत नाही. येथे कारण आहे आणि ते आपल्या जातीयवादात दडलेले आहे. या जातीयवादी किडीने आपलाच खरा इतिहास पोखरुन टाकला आहे. खरे महानायक बदनाम करुन विस्म्रुतीच्या कालांधारात फेकण्याचे अधम कार्य या वावडीबहाद्द्रांनी केले आहे. इतिहासकारही दुर्दैवाने त्याला अपवाद नाहीत ही खंत आहेच.
यशवंतरावांची पुणे स्वारी त्यांना त्यांचा कबिला मुक्त करता आला एवढ्यापुरतीच यशस्वी झाली. खंडेरावाला सुभेदारीची वस्त्रे द्यायला पेशवा नव्हताच. त्यामुळे तेही कार्य अपुरेच राहिले. शिंदे तर अजुनही उत्तरेतच ठाण मांडुन बसले होते...आता कसला सुलह? पेशवा सरळ इंग्रजांकडे शरणागत होत पळाला होता. पेशवाई वसईच्या कराराद्वारे गहाण टाकुन शिवरायांचे स्वराज्य बुडवले होते. यशवंतरावांच्या स्वारीमुळेच पेशव्याला इंग्रजांचा आश्रय घ्यावा लागला हा आरोपही धादांत असत्य आहे कारण इंग्रजांना मिळण्याचे बाजीरावाचे बेत १८०० सालापासुन चालुच होते व युद्धाआधी १०-१२ दिवस आधीही तो इंग्रजांच्याच गुप्तपणे संपर्कात राहुन कराराचे मसुदे बनवायच्या मागे होता हे आपण आधी पाहिलेच आहे. यशवंतराव शेवटपर्यंत त्याने पुण्यात यावे व फैसला करावा यासाठी मन वळवायचा प्रयत्न करत होते....पण तरीही बाजीरावाच्या या निंद्य पापाचे खापरही, अगदी सर जदुनाथ सरकारही, यशवंतरावांवर फोडतात याला काय म्हणावे?
ज्यु धर्मात पापी माणसे एक मेंढा विकत घेवुन त्याच्या डोक्यावर आपली पापे समंत्रक टाकत आणि त्याचा बळी देत असत. असे केले म्हणजे तो माणुस पापमुक्त झाला असे समजले जाई. मला हे सर्व लिहित असतांना वाटतेय कि तत्कालीन समाजाने यशवंतरावांवर आपली सारीच पातके ढकलण्याचाच निर्धार तर केला नव्हता ना?
Subscribe to:
Post Comments (Atom)
गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी
ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
महार कोण होते? महार कोण होते? या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी सर्वप्रथम महार समाज म्हनजे काय हे समजावुन घ्यायला पाहिजे. जे सध्या माहित आहे त...
वेळेअभावी संपूर्ण वाचले नाही. पण मराठा सत्तेची संपूर्ण वात लागली होती. इथे स्वराज्य आणि देशाचा काही साम्भांधाच येत नाही. छत्रपतींनी जे राज्य उभे केले शंभू राज्यांच्या पश्यत , संताजी धनाजी, थोरले बाजीराव, शिंदे आणि होळकरांनी जे वाढवले तेच स्वताहून नष्ट करण्याचे पाप मराठ्यांच्या (जात नवे) माथी लागले आहे. इथे इंग्रजांनी किवा मुसलमानांनी मराठ्यांचा पराभव नाही केला हि गोष्ट लक्ष्यात घेण्याजोगी आहे.
ReplyDeleteअखबारनविस ही संज्ञा आज कळाली .. धन्यवाद बाकी काय लेख As usual खणखणीत झालाय.
ReplyDelete