Monday, December 19, 2011

इतिहास फक्त वादळे निर्माण करण्यासाठी?

इतिहास हा मानवी मनावर प्रभाव गाजवणारा फार महत्वाचा घटक असतो. इतिहास हा कसा सांगितला गेला आहे यावर समाजाचे त्याबाबतचे आकलन अवलंबुन असते. असे असले तरी सामान्य माणसांवर वदंतांचा प्रत्यक्ष घडलेल्या इतिहासापेक्षा अधिक प्रभाव असतो असे आपल्याला सामान्यतया दिसून येईल. इतिहास हा जेत्यांचा वा समाजवर्चस्ववादी घटकांच्या वा वर्चस्ववादी होवू पाहणा-यांच्या मानसिक तुष्टीकरणासाठी लिहिला जात असल्याने तो तटस्थ व निरपेक्ष असतोच असे नाही. दुसरे असे कि इतिहासकार हासुद्धा एक मनुष्यच असल्याने त्याच्या लेखनावर त्याच्या समजुती, पुर्वग्रह आणि त्यानुरुप असलेल्या त्याच्या व्यक्तिगत आकलनाचा प्रभाव पडत असतो. अनेकदा एकाच पुराव्याचे आकलन/विश्लेषन इतिहासकारपरत्वे बदलते असते. या नियमाला अपवाद नसतात असे नाही. परंतु मग त्यांनाही त्यांच्या नव्य संशोधनामुळे सामाजिक पुर्वग्रहांना, रुढ समजुतींना धक्का बसत असल्याने लोकांच्या रोषाला तोंड द्यावे लागते आणि त्यातुन जी वादळे निर्माण होतात तशी पुर्वग्रहविरहित, संपुर्ण द्न्यान-चिकित्सात्मक इतिहाससंशोधनास खिळ बसते.
अलीकडेच दिल्ली विद्यापीठातुन अभ्यासक्रमात असलेल्या "थ्री हंड्रेड रामायनाज" या रामकथा ही विविध ३०० वेगवेगळ्या प्रादेशिक संस्करणात कशी बदलली आहे याचा शोध घेणा-या ए. के. रामानुजन यांच्या प्रबंधाला काही परंपरावादी, पुर्वग्रहांनी मंडित विद्यार्थी संघटनांनी तोडफोड आंदोलने करुन अभ्यासक्रमातुन मागे घ्यायला भाग पडले. खरे तर इतिहास संशोधनकार्यात कोणतीही ऐतिहासिक व्यक्ती वा तीसंबंधाचे लेखन चिकित्सेला मुक्त वाव देणारे असले पाहिजे, तरच इतिहासाचे आकलन सम्म्रुद्ध होण्यास मदत होवू शकते. परंतु भारतीय जनमानसाला अशी चिकित्सा सहसा मान्य नसते. खरे तर इतिहासाच्या गाभा-यात श्रद्धेला वा पुर्वग्रहांना मुळी प्रवेशच नसतो. निखळ सत्त्याचा शोध हेच इतिहासकाराचे कार्य असते, मग जे सामोरे येईल ते किती का कटु असेना, त्याची निर्भीड मांडनी केलीच पाहिजे. परंतु जातीय झुंडशाह्या मुलतत्ववादी बनत अशा मांडण्यांना अनेकदा सुरुंग लावतात. परंतु हाच छुपा का होईना, मुलतत्ववादी दुर्गुण बव्हंशी इतिहासकारांत घुसला असल्याने त्यांच्या संशोधनाला व त्याहीपेक्षा त्यांच्या मांडनीला जातीय पुर्वग्रहांची पुटे चढलेली आपल्याला दिसतात, मग ते कोणत्याही जाती/धर्माचे का असेनात. वाचकांचाही द्रुष्टीकोन सहसा असाच जातीय परिप्रेक्षातीलच असल्याने व श्रद्धा वा समजुतींना नवीन पुराव्यांच्या परिप्रेक्षात चिकित्सकपणे व उदारपणे पाहण्याची मनोव्रुत्तीच नसल्याने इतिहासावरुन आपल्याकडे वारंवार वादंगे होत असतात.
डा. बाबासाहेबांच्या रिडल्समुळे असेच झंझावात महाराष्ट्रात उठले होते. राम आणि क्रुष्ण हे साक्षात इश्वरी अवतार असल्याने त्यांची चिकित्साच केली जावु शकत नाही असा पवित्रा सनातन्यांनी जसा घेतला तसाच श्रद्धाळु समाजानेही घेतला हे वाचकांच्या स्मरणात असेलच. खरे तर विद्वेषरहित चिकित्सेमुळे मानवी द्रुष्टीकोनाला नवीन आयाम मिळतात व आपलीच प्रगल्भता वाढत असते हे आपला समाज लक्षातच घेत नाही हे एक दुर्दैवच आहे.
मानवी महानायकांचे उदात्तीकरण करणे, त्यांना देवत्व/विभुतीत्व देवू पहाणे हा एक विचित्र छंद महाराष्ट्राला जडलेला आहे. जेथे स्वजातीय अशा महानायकांत नसतात तेंव्हा स्वजातीयांतील दुय्यम व्यक्तींना महनीयत्व बहाल करण्यासाठी पुराव्यांची तोडफोड करणे हाही एक छंद इतिहासकारांना लागलेला आहे. याला कोणत्याही जातीचा माणुस वा इतिहासकारही बव्हंशी अपवाद नाही. आपल्या वंशाची नाळ रामायण-महाभारतकालीन महापुरुषांपर्यंत जोडण्याची परंपरा बहुतेक जातींत आहे, ती केवळ आपल्याही जातीची/कुळाची महत्ता ठसवण्यासाठीच!
ब्रिटिशांनी शिवाजी महाराजांचा जो इतिहास लिहिला तो वर्चस्ववादी भावनेतुनच असल्याने त्यांचेही चित्रण लुटारु/बंडखोर असेच केले होते. पुढे महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांचा पवाडा लिहुन त्यांचा इतिहास सर्वप्रथम मांडला. पवाड्यात आपण सर्वस्वी इतिहास शोधु शकत नाही हे खरे असले तरी तो महाराजांना न्याय देण्याचा पहिला प्रयत्न होता. पुढे १९०५ साली केळुस्कर गुरुजींचे "छत्रपती शिवाजी महाराज" हे पहिले शिवचरित्र प्रसिद्ध झाले. परंतु साधनांची कमतरता आणि लोक-समजुतींचा पगडा यामुळे ते परिपुर्ण बनणे शक्यच नव्हते. त्यात संभाजी महाराजांबद्दल तत्कालीन प्रवाद जवळपास जसेच्या तसे आलेले आहेत. परंतु पुढे शिवाजी महाराजांबद्दल प्रचंड संशोधन झाले. अजुनही सुरुच आहे. प्रसिद्ध इतिहास संशोधक श्री गजानन भास्कर मेहेंदळे यांचा "Shivaji: His Life & Period" हा हजार पानी ग्रंथही लवकरच प्रसिद्ध होत आहे. संभाजी महाराजांबाबतही नवी संशोधने करत त्यांच्याबाबतचे सारे प्रवाद दुर सारत वा. सी. बेंद्रे आणि नंतर कमल गोखले यांनी त्यांचे प्रामाणिक चित्रण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आज संभाजी महाराजांबद्दलचे अपसमज ब-यापैकी दुर झाले आहेत.
इंग्रजांचा धोका सर्वप्रथम ओळखुन त्यांच्याशी एकहाती झुंज देत, त्यांना अठराच्या अठरा युद्धांत पराजित करणा-या यशवंतराव होळकरांना आत्ता-आत्तापर्यंत महाराष्ट्र फक्त "पुणे जाळणारा-लुटणारा यशवंतराव" म्हणुन ओळखत होता. त्यांनी इंग्रजांशी केलेली-जिंकलेली दोन युद्धे तर जागतीक युद्धेतिहासात सामाविष्ट केली गेलेली आहेत, त्यांनी जी सर्वप्रथम राष्ट्रभावना निर्मण करण्याचा प्रयत्न केला तो तर पुर्णपणे दुर्लक्षिण्यात आला. पण आपल्याकडे जातीय द्रुष्टीकोन हा सर्वप्रथम येत असल्याने होळकरांचे प्रामाणिक चरित्र लिहिलेच गेलेले नव्हते. पण आता यशवंतराव होळकरांनी पुणे ना जाळले होते ना लुटले होते हे सिद्ध झाले आहे. पण म्हणुन इतिहासकारांचा छुपा जातीय रोष अद्याप गेला आहे काय?
खरे तर सातत्याने इतिहास संशोधने यासाठीच व्हायला हवीत कि कोणावरही अकारण अन्याय होवु नये तसेच कोणाचे अकारण उदात्तीकरण झाले असेल तर तेही लोकांसमोर कठोर चिकित्सा करत आणले जावे.
पण मुळ इतिहास हा वर्चस्ववादी भुमिकेतुन लिहिला गेला असल्याने, कोणाचे उदात्तीकरण करायचे, कोनाला बदनाम करुन ठेवायचे आणि कोणाला गडप करुन टाकायचे ही, एकार्थाने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणत त्याप्रमाणे "इतिहासविघातुक प्रव्रुत्ती" होती आणि आजही ती शेष असावी हे एक महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.
शिवाजी महाराजांच्या ख-या इतिहासाला सामोरे आणले जात असतांना, स्वत:ला ज्येष्ठ-श्रेष्ठ म्हनवणारे आणि खरोखरीच ज्यांनी रात्रंदिवस राबुन अनमोल कार्य केले असनारे संशोधकही दुर्दैवाने या इतिहासविघातुक द्रुष्टीपासुन मुक्त राहिले नाहीत. जातीय अहंकाराचे फणे खरे तर उभारण्याचे आता तरी काहीएक कारण उरलेले नसावे. इतिहास अधिकाधिक, जरी सर्वस्वी नसला तरी, नि:पक्षपाती होत जाण्याची गरज आहे. परंतु अशा उज्ज्वल इतिहासात आपल्याही जातीघटकाचे वर्चस्व कोनत्या ना कोनत्या रुपात असले पाहिजे या भावनेतुन प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रित्या संत रामदास आणि दादोजी कोंडदेवांबाबत मात्र तसे गतशतकापासुन वारंवार घडते आहे आणि यामुळे अकारण जी वादळे निर्माण केली जातात त्यातुन आपल्या बहुतेक इतिहासकारांच्या मनाचा कोतेपणाच दिसुन येतो. दादोजी हे बालपणीचे गुरु तर रामदास हे मोठेपणीचे गुरु अशी मांडनी त्यांनी सहसा सोडली नाही. समजा गुरु नव्हते तरी त्यांचा स्वराज्य उभारणीत मोलाचा वाटा होता हा हेकाही सहसा सोडला जात नाही. समजा ते खरे असते आणि निर्विवाद पुराव्यांनी सिद्ध झाले असते तर ते मान्य करायलाही कोणाचीही हरकत नव्हती. पुर्वी न. र. फाटकांनी रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते हे सत्य खणखणीतपणे मांडले होते. पण अजुनही अनेक इतिहासकार वारंवार तिय्यम दर्जाच्या उत्तरकालीन वा बनावट साधनांचा आधार घेत वारंवार शिळ्या कढीला उत आनण्याचा प्रयत्न करत असतात.
श्री. गजानन भास्कर मेहंदळे यांनी शिवाजी महाराजांचे कोणीच गुरु नव्हते असे अलीकडच्याच एका मुलाखतीत मांडले आहे. ते म्हणतात कि "शिवकालाविषयी जे अस्सल पुरावे आहेत त्यात कोठेही दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरु होते असे म्हटलेले नाही. तसा उल्लेखही कोठे सापडत नाही, हे मी ३० वर्षांपुर्वीच लिहुन ठेवले आहे. परंतु त्याचबरोबर माझे असेही म्हणणे आहे कि दादोजी हे चांगले ग्रुहस्थ असल्याची आणि त्यांच्या न्यायदानाविषयी शिफारस करनारी शिवाजी महाराजांची स्वत:ची चार पत्रे उपलब्ध आहेत. म्हणजे तो माणुस नालायक तर नव्हता? शिवाजीराजे किंवा शहाजीराजे यांनी जी कामगिरी सोपवली ती सुविहितपणे पार पाडली होती. मग इतिहासात होवुन गेलेल्या त्या व्यक्तिसाठी एवढा गहजब का?" पुढे ते अशीही पुस्ती जोडतात कि दादोजी गुरु होते असे पुरावे जसे नाहीत तसेच ते गुरु नव्हते असेही पुरावे नाहीत.
इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे मात्र जवळपास तीच इतिहासाची साधने वापरत दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे शिक्षक होते, दादोजींबद्दल शिवाजी महाराजांना पराकोटीचा आदर होता व दादोजींच्या निधनानंतर त्यांना खुप शोक झाला असे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात.
खरे पाहता, शिवाजी महाराजांना कोणीच गुरु नव्हता, पण दादोजी शहाजी राजे व शिवाजीराजांचे एकनिष्ठ व प्रामाणिक सेवक होते असे म्हनतांना, मुळात दादोजींची शहाजी राजांनी आपल्या चाकरीत नेमणुक केली होती असा एक तरी अस्सल पुरावा उपलब्ध आहे काय? तो कधीही सादर केला गेला आहे काय? तर त्याचे उत्तर आहे "नाही". "ते गुरु असल्याचे पुरावे नाहीत तसेच नसल्याचेही नाहीत" हे विधान हा शब्दछल आहे हे कोणाच्याही सहज लक्षात येईल. ज्या साधनांच्या आधारावर असे दावे केले जातात वा त्याच आधारावर जे दावे नाकारले जातात, जावु शकतात याचा अर्थ काय होतो? एवढाच कि या फक्त समजुती आहेत, जातीनिष्ठ पुर्वग्रहयुक्त आकलन आहे, त्यात नि:संदिग्धता नाही. एवतेव ते दावेच मुळात चुकीचे आहेत. अशी मांडणी करतांना मात्र त्याच साधनांतुन जे प्रश्न उपस्थित होतात त्या प्रश्नांना मात्र हेच लोक हातही घालत नाहीत. खरे हे आहे कि दादोजी हे आजीवन आदिलशहाचे कोंडाना व दौंड प्रांताचे सुभेदार होते. या सुभेदारीच्या प्रदेशातच शहाजी महाराजांची पुणे, सुपे व शिरवळ प्रांताची जहागीर होती. सुभेदार-दीवाण हा नेहमी केंद्रीय सत्तेकडुनच नियुक्त केला जात असे, जहागिरदारास तसला अधिकारच नव्हता. सुभेदारावर महसुल जमा करणे, सरकारात भरणा करणे, सुभ्यातील जनतेची खुशहाली पाहणे, अधिकाधिक जमीनी लागवडीखाली आनणे अशी कामे असत. दादोजी जे वतन/जमीनींच्या वादांबाबत निवाडे करत ते आदिलशहाचा सुभेदार या नात्याने, त्याच्या सुभेदारीच्या क्षेत्रात. या सुभेदारीच्या क्षेत्रात शहाजी राजांचीही जहागीर होती. तत्कालीन स्थितीत जमीन-सा-यासंबंधीचे निवाडे केले जात ते मलिक अंबरने घालुन दिलेल्या महसुल पद्धतीनुसार. मलिक अंबरची ही महसुलाची पद्धत जवळपास सर्वत्र स्वीकारली गेली होती. (मलिक अंबर हा गनीमी काव्याचा जनकही मानला जातो.) त्यामुळे ते प्रदेश आपल्या स्वामित्वाखाली आणल्यानंतर त्यासंबधीचे पुर्वीचे दादोजींचे निवाडे/महसुल पद्धत (खरे तर मलिक अंबरची महसुल पद्धत) पुढेही शिवाजी महाराजांनी कायम ठेवली एवढेच त्या चार पत्रांवरुन सिद्ध होते. पण यातुन ते शिवाजी महाराज वा शहाजीराजांचे सेवक (कारभारी) होते व त्यांचे सेवक या नात्याने ते निवाडे केले होते हे कोठे सिद्ध होते? सुभेदार कोठे कारभारी होतो काय?
दादोजींवर अन्य अनेक आक्षेप आहेत, परंतु त्यांचा प्रतिपाद्य विषयाशी संबंध नाही. दादोजी महान मानव असतील परंतु मुळात ते आदिलशहाचे म्रुत्युपावेतो सुभेदार होते. महसुलाच्या हिशोबात काही गफलत झाल्याने अदिलशहाने घोरपडे सरदारांना कोंडान्यावर चालुन जायला सांगितले होते व दादोजींची हार झाल्यानंतर खरे तर देहांत शासनच व्हायचे परंतु ब्रह्महत्त्या हे महत्पापात गणले गेले असल्याने हातावर निभावले. या संदर्भातील पुरावे दुर्लक्षण्याचे काय कारण? ते समजा असत्य आहेत तर त्याबाबत संशोधनपर चर्चा करुन, तसे पुरावे सादर करुन त्यांचा निकाल का लावला जात नाही? काय हरकत आहे? "मग इतिहासात होवून गेलेल्या या व्यक्तीचा पुतळा उखडुन फेकण्यचे कारण काय?" असा प्रश्न श्री. मेहंदळे यांनी विचारला आहे. तो समजा रास्तही आहे, कारण दादोजी इतिहासात होवून गेले हे सत्यच आहे. पण मग समजा दादोजींच्या पुतळ्याचे तेथेच पुन्हा पुनर्वसन करायचे असेल तर मग त्यांचा आणि शिवाजी महाराज व शहाजी महाराजांचा नेमका संबंध काय हेही अस्सल पुराव्यांनिशी सिद्ध करायला हवे. दादोजींनी आपया हयातीत कोंडाना शिवाजी महाराजांना का मिळु दिला नाही यावरचेही संशोधन मांडायला हवे. ते करता येत नसेल तर दादोजींबाबत ज्यांना आदर आहे त्यांच्यासाठी त्यांचा अन्यत्र हवा तेथे स्वतंत्र पुतळा असु शकतो, परंतु ज्या इतिहासाशी त्यांचा प्रत्यक्ष संबंध नसुन त्या प्रदेशाचा, तोही अदिलशहाचा सुभेदार या नात्याने आहे त्यांला शिवेतिहासातील महत्वाची व्यक्ती असे कसे म्हटले जावु शकते?
१६३० साली महाराष्ट्रात भिषण दुष्काळ पडला होता. इतका कि लोक म्रुत जनावरे आणि शेवटी तर म्रुत माणसांचेही मांस खावुन जगायचा प्रयत्न करत होते. गांवेच्या गांवे ओस पडली होती. सर्वत्र म्रुतांचे ढिगारे पडलेले दिसत. या दुष्काळाला थोरला दुष्काळ म्हणतात. या दुष्काळाचे ह्रुदयद्रावक वर्णण व्ह्यन ट्विस्ट या डच व्यापा-याने लिहुन ठेवले आहे. तुकाराम महाराजांनीही आपल्या अनेक अभंगांत या प्रलयंकारी दुष्काळाची वर्णने केलेली आहेत. दादोजींनी दुष्काळ ओसरल्यानंतर गांवे पुन्हा वसवण्याची कामगिरी सुरु केली ती त्या प्रांताचा सुभेदार या नात्याने. ती त्यांची जबाबदारीच होती. त्यात त्यांची कार्यक्षमता मान्य करायलाच हवी, पण ही शहाजीराजे आदिलशाहीत गेले ते १६३६ मद्धे हेही येथे लक्षात घेतले पाहिजे. ही पुनर्वसने तोवर जवळपास होवून गेली होती. त्यामुळे शहाजी राजांच्या आद्न्येने त्यांनी गांवे वसवली हा केला जाणारा दावाच निराधार ठरतो. या भिषण दुष्काळाबद्दल इतिहाससंशोधक का सहसा बोलत नाहीत हे येथे लक्षात यावे. त्यामुळे घटनाक्रमात अदलाबदल करुन काय साध्य केले जात आहे? याला इतिहास संशोधन म्हनतात का असा प्रश्न प्रत्येक इतिहासकाराने स्वत:लाच विचारला पाहिजे.
ही अलीकडची उदाहरणे दिली आहेत ती अशासाठी कि मुळात इतिहासकारांवर, मग ते कोणत्याही जाती-धर्माचे असोत, पक्षपाताचा आणि पुर्वग्रहांचा दोष येतो तो असा. असा इतिहास विश्वसनीय कसा असेल? इतिहासकाराच्या सद्सद्विवेकबुद्धीवर सामान्यांचा पराकोटीचा विश्वास असतो. सारी साधने त्यांना सर्वांना अभ्यासने शक्य नसते. इतिहासकाराने इतिहासाचे केलेले मुल्यांकन त्याच्या द्रुष्टीकोनात, द्न्यानात व समजुतींत नवी भर टाकत असते. त्यातुन समाज-ऐक्याची वा दुहीची एक भावना निर्माण होत असते. ज्यांचा गौरव गावा वा ज्यांना अकारण मोठे केले गेले आहे त्यांचे वास्तव, मग ते कोनत्याही जाती-धर्मातील असोत, चित्रीत होणे खरे तर अभिप्रेत असते. पण मग आपण आधीच जातीय अस्मिता केवळ टोकदार नव्हेत तर काटेरी होत आहेत हे अनुभवत असतांना जर जातीसापेक्ष अहंगंड सुखावण्यासाठी काही विधाने केली, काही पुरावे चर्चेतही न घेता सोयिस्कर विधाने केली तर त्यांनी लिहिलेला इतिहास अविश्वसनीय होनार नाही काय?
थोडक्यात इतिहासात आपल्या जातीय अस्मिता जाग्या ठेवण्यासाठी कोणाचे तरी उत्थान करायचे वा कोनाचे तरी अवमुल्यन करायचे हे इतिहास संशोधनात सर्वतया चुकीचे आहे. बरे हा इतिहास विपर्यासाचा रोग नव्याने वर्चस्ववाद निर्माण करु पाहणा-यांनाही लागला आहे हे अधिकचे दुर्दैव. तेही हिरिरीने खोटा इतिहास बिनदिक्कतपणे सांगत फिरतात व काही समाजघटकातील तरुणांची माथी भडकावतात. इतिहास संशोधनामुळे जातीय ताणतणाव दुर करण्यापेक्षा ते वाढवण्यास हातभार लावणे हे कोणत्याही सुसंस्क्रुत समाजाला शोभनारे नाही. आपल्या जातींचे म्हणुन जे नायक-महानायक-अवतार ठरवलेलेच आहेत त्यांची चिकित्साही नाकारायची ही प्रव्रुत्तीही इतिहासविघातक आहे. या जातीय वर्चस्ववादाच्या लढाईत ख-या इतिहासाचा खुन पडतो आहे हे मात्र नक्की.
ख-या इतिहास संशोधनाला धोका आहे तो या वर्चस्ववादी मानसिकतेचा. शक्यतो आपल्या जातीतीलच महनिये तेवढी निवडायची, नसतील तर कोणाचे तरी उत्थान घडवुन आणायचे, अन्य जातीयांतील त्यांच्या आदरणीयांना घाणेरड्या भाषेत झोडपत रहायचे आणि ज्या जाती अद्याप आपला इतिहास लिहु शकत नाहीत त्यांच्या इतिहासाला हात न लावता त्याला कालांधारात फेकुन द्यायचे यातुन आपल्याला एक समग्र समाज म्हणुन गतकाळ कधीही ठळकपणे पाहता येणार नाही. इतिहास लेखनाची ही पद्धत नव्हे...शिस्त कितीही असेल!
असेच होत राहिले तर मग आपण कसले भवितव्य घडवणार?
यासाठी आपल्याला इतिहास संशोधनात दोन्ही टोकाच्या भुमिका वगळत, जी समतोल, चिकित्सक आणि सत्याचे दर्शन वा दिग्दर्शन करु शकेल, दोन्ही अतिरेकी टोके गाठणार नाही, अशा तिस-या भुमिकेची आवश्यकता आहे. यासाठी जातीय गंडांतुन बाहेर आलेल्यांनाच पुढाकार घ्यावा लागेल हे नक्कीच. अन्यथा इतिहास हा फक्त वादळे निर्माण करत सामाजिक मन:स्वास्थ्य बिघडवण्यासाठीच असतो कि काय असा समज होईल. आणि त्यात इतिहास कोठेतरी हरवला जाईल. आणि ते काही केल्या समाजाच्या हिताचे नाही.

-संजय सोनवणी



5 comments:

  1. This society is becoming like pressure cooker. The only difference is that the pressure of the vapor is rising and there is no room for it to get out in a constructive manner. Because the people who made this pressure cooker never imagined that the pressure level would reach so high!! Its going to result in a cultural blast. At least I don't want to have blood on my hands.

    ReplyDelete
  2. दादोजी आजन्म आदिलशाहीचे सुभेदार होते हे सत्य आहे परंतु १९३६ नंतर शहाजी राजे सुद्धा आजन्म आदिलशाहीचे सरदार होते हे अमान्य करणार का ?
    तसे असेल तर शहाजी महाराज जे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आहेत त्यांचे स्वराज्यातील योगदान अमान्य होईल का ?

    ReplyDelete
  3. आदरणीय संजयजी,
    आपण लिहिलेला लेख उत्तम आहे. व्यवसायाने मी एक अभियंता असल्याने त्यातील ऐतेहासिक घटनांची मी पुष्टी करू शकत नाही किंवा त्या चूक की बरोबर हे सांगण्याएवढा माझा त्या विषयातील अभ्यास नाही. पण आपल्या लेखाच्या विषयाबाबत मी काही लिहू इच्छितो.
    फक्त इतिहासाच्या विषयातच नव्हे तर ज्ञानाच्या सर्व शाखांमध्ये प्रगती साठी व नवीन संशोधनासाठी सचोटीची फार आवश्यकता असते. इंग्रजी भाषेत त्याला intellectual integrity हा एक सुरेख शब्द आहे. त्याची आपल्या देशात फार मोठी वानवा आहे. आपल्या देशात संशोधन, नवीन नवीन शोध, नवीन तंत्रज्ञानाचे निर्माण या गोष्टी का होत नाहीत याचे ते माझ्या मतानुसार ते एक मुलभूत कारण आहे. इतर राष्ट्रामध्ये प्रमुखतः त्या राष्ट्रांमध्ये जिथे वैज्ञानिक द्रुष्टीकोनाचा विकास झाला अश्या राष्ट्रांमध्ये intellectual integrity चे बाळकडू लहानपणापासून दिले जाते. मी सध्या एका अमेरिकन विद्यापीठ मध्ये उच्च शिक्षण घेत आहे, इथे intellectual integrity हि बाब अतिशय गंभीरपणे घेतली जाते, इतकी की जर तुम्हाला एखादा गृहपाठ दिला असेल तर तो तुमचा तुम्हीच केला पाहिजे प्राध्यापकान्ची परवानगी न घेता तुम्ही इतरांसोबत त्या गृहपाठावर काम करू शकत नाही किंवा इतरांचा पाहू शकत नाही. जर असे आढळले तर तुम्हाला शिस्तभंगाच्या कार्यवाहीला सामोरे जावे लागते व तुम्हाला विद्यापीठातून काढून टाकले जाऊ शकते. या गोष्टी अतिशय गंभीरपणे घेतल्या जातात व त्याची अंमलबजावणी पण तितकीच गंभीरपणे होते. या छोट्या छोट्या गोष्टींचा परिणाम असा होतो की एक तर स्वतः काम केल्यामुळे तुमची पात्रता आणि कार्यक्षमता वाढते. अनेक गृहपाठ हे सर्जनात्मक असल्यामुळे तुमची स्वतःची सर्जनक्षमता वाढते. दुसरी गोष्ट अशी होते की तुम्हाला सत्य मांडण्याची आणि सत्य स्वीकारण्याची सवय लागते. आणि हे सर्व तुमच्या शिक्षणाच्या कालावधीतच झाल्यामुळे ते तुम्ही एक व्यावसायिक म्हणून सुद्धा पुढे तसेच कार्य करता. समाजातील लोकांची विचारसरणी घडविण्यामध्ये शिक्षणाचा फार मोठा वाट असतो जर आपण उत्तम सत्याधीष्टीत शिक्षण देऊ शकलो तरच आपण चांगला समाज घडवू शकतो. दुर्दैवाने आपल्या देशातील सध्यस्थिती एकदम उलट आहे, गांधीजींच्या या देशात शिक्षणक्षेत्र सारख्या पवित्र क्षेत्रात सुद्धा सत्याला फारशी किंमत नाही आणि त्याची जाणीव सुद्धा विद्यार्थ्यांना करून दिली जात नाही. PhD सारख्या पदव्या सुद्धा चुकीच्या मार्गाने आपल्या देशात मिळवल्या जातात हे दुर्दैव. जर काही छोटे आणि सामान्य बदल आपण आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये केले तर आपण देशात अनेक उत्तम गोष्टी घडवू शकतो.

    ReplyDelete
  4. वरील उदय कालगांवकर यांची कमेंट्स वाचली, मला वाटते हा प्रश्न तुम्हाला खूप उशिरा पडला, खर तर हा प्रश्न तिसरीचे- चौथीचे मुले विचारतात, कि आदिलशहा तर आपला शत्रू होता मग तिथ आपले शहाजीराजे सरदार कसे?
    तेव्हा स्वराज्य स्थापनेची सुरुवात झाली नव्हती, प्रत्येक गादीच्या नावाखाली रयतेचे हाल होत होते. हीच भूक शहाजीराजे यांची होती, कि स्वराज्य स्थापन झाले पाहिजे...!! जेव्हा तुम्हाला एखादी संस्था स्थापन करावयाची असल्यास तुम्ही प्रत्यक्ष हाथ घालत नाही,
    तुम्हाला अनुभव,पाठबळाची आवशकता असते. कुठे तरी, कशाची तरी कमतरता असते, मात्र संस्था स्थापन करायची भूक असतेच. तेव्हा शहाजीराजांनी शिवरायांना घडवले, अर्थात ते स्वराज्य संकल्पक ठरतात, आणि शिवाजी राजे स्वराज्य संस्थापक.

    ReplyDelete
  5. मला येथे आवरजून नमूद करावासे वाटते सोनवणी सर, आपल्या वरील लिखाणातील या ओळीचा अर्थ समजायला जास्त उशीर लागला नाही "ते गुरु असल्याचे पुरावे नाहीत तसेच नसल्याचेही पुरावे नाहीत" हे विधान हा शब्दछल आहे हे कोणाच्याही सहज लक्षात येईल, कि दादोजी कोंडदेव, रामदास, भवानी माता शिवरायांना तलवार देतानाचे चित्र, हे सर्व सनातनी लोकांचे किडे.

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...