Thursday, February 23, 2012

सामाजिक विषमता...ओबीसींची दुर्दशा...दोषी कोण? (लेख ४)

मानवी जीवनात अन्न-पाणी-वस्त्र-निवारा याइतकीच महत्वाची गरज असते ती म्हणजे आत्मसन्मान. आत्मभान. आपल्या अस्तित्वाची आणि एकुणातीलच व्यवस्थेतील स्थानाची परिपुर्ण जाण. ही जाण सर्वसामान्य समाजाला आली तर ती जाण आपल्या अस्तित्वाच्याच मुळावर येईल याची जाण सर्वाधिक असते ती धर्मसत्ता आणि राजसत्तांना. ती तशी येवु नये म्हणुन एकीकडे धर्माचे स्तोम वाढवत लोकांना त्या जाळ्यात अडकवत प्रदिर्घ गुंगीत टाकणे आणि अनिर्बंध सत्ता गाजवणे हे आजवर राजेशाहीवादी वा हुकुमशाहीवादी सत्ताधा-यांचे प्रमुख ध्येय राहिले आहे. हा जागतिक इतिहास आहे.
रोमच्या सम्राटाने ख्रिस्ती धर्म स्वीकारला तो काही त्याला ख्रिस्ती धर्माची मुलतत्वे पटली म्हणुन नव्हे तर साम्राज्यवादासाठी या धर्माचा उपयोग होवू शकतो हे ध्यानी आले म्हणुन. भारतात वैदिकवादी, जैनवादी ते बौद्धवाद्यांचा उपयोग विविध राजसत्तांनी करुन घेतल्याचे दिसते. कोणत्यानाकोनत्या वा जमेल तेवढ्यांना रक्षण ते सहाय्य या राजसत्तांनी पुरवले ते काही त्यांना खरेच त्या धर्मतत्वांचे शब्दश: पालन करायचे होते म्हणुन नव्हे तर त्यांच्या सत्तेला आव्हान उभे राहु नये यासाठी. हे विधान थोडे धाडसी वाटेल, पण त्याचे विवेचन खालीलप्रमाणे करता येईल.
ख्रिस्त हा शांतीचा व मानवतावादाचा प्रेषित घोता परंतु त्याच्या धर्माचा उपयोग सर्वस्वी रक्तरंजित कारवाया करत साम्राज्यविस्तारासाठी केला गेला. इस्लामची स्थापना हीच मुळात ख्रिस्ती विस्तारवादाला विरोध करण्यासाठी झाली त्यामुळे हिंसकतेची (जिहादी) तत्वधारा या धर्मात आपसुक येणे स्वाभाविक होते. या तत्वधारेचा उपयोग करुन घेत इस्लामी राजसत्तावाद व विस्तारवाद वाढला. धर्म हे त्यांना साधन म्हणुन मिळाले...पण हा विस्तारवाद धर्मासाठी नसुन साम्राज्यवादासाठी होता. धर्माचा व धर्मसत्तांचा त्यांनी हवा तसा वापर करुन घेतला. भारतातही राजसत्तांनी कधी वैदिक, कधी शैव तर कधी वैष्णव तर कधी जैन तर कधी बौद्ध धर्माचा उपयोग करुन घेतला आहे. याचा उपयोग त्यांनीही राज्यविस्तारासाठी केलेला आहे. धर्माचा वा पंथाचा निमित्त म्हणुन उपयोग केला आहे. सम्राट अशोकाने कलिंग प्रकरणानंतर बौद्ध धर्म स्वीकारला असे सर्वसाधारण जनमत आहे, पण ते खरे नाही. अशोक सत्तेवर आला तोच आपल्या थोरल्या बंधुचा, कालाशोकाचा, खुन करुन. त्याला बौद्धधर्मियांचे पाठबळ होते म्हणुनच तो सत्तेत येवू शकला. त्या बदल्यात त्याने धर्मप्रचार केला खरा पण राज्यविस्तारही केला असेच इतिहासावरुन दिसुन येते. जो धर्म प्रबळ तसे आचरण राजांनी ठेवले. मुघल सत्तांनी धर्म बदलला नसला तरी व्यवहारात त्यांचे हिंदुत्वीकरण झालेलेच होते. हिंदु स्त्रीयांशी त्यांची विवाहपरंपरा पाहिली तर औरंगझेब हा ७५% हिंदु रक्ताचाच होता. सत्ताधा-यांनी सत्तेसाठी सर्व प्रकारच्या तडजोडी केलेल्या आहेत व धर्मनेत्यांनी त्यांना हवे तसे धर्मनियम बनवुन पेश केलेले आहेत. वैदिक धर्मियांनी तर पुरातन काळापासुन राजसत्तांना अशी मदत केली आहे व विरोधी धर्मियांची/पंथियांची खच्चीकरणे राजसत्तांचाच वापर करत करवुन घेतली आहेत. तसे करण्यासाठी धार्मिक नियमांनाही हवे तसे वाकवले आहे. भारतात इस्लामी राजवट सुरु झाल्यानंतरच वैदिक मंडळीने कलिवर्ज्य प्रकरण निर्माण करत भारतावर कलियुगी म्लेंछ राज्य करणार ही पौराणिक भविष्यवाणी प्रस्रुत/प्रचारित केली हा योगायोग नसुन वैदिक धर्मसत्तेने इस्लामी राजसत्तेशीही कसे जमवुन घेतले हा इतिहासही पाहिला पाहिजे. राजसत्तांना अशी मदत करत असतांना आपली धर्मसत्ता त्यांने टिकव्णे स्वाभाविक व अपरिहार्य होते. जगभर असे झालेले आहे. इस्लाममद्धे मुल्ला-मौलवींनी आपली सत्ता टिकवली तशीच ख्रिस्त्यांमद्धे चर्चमार्फत टिकवली गेली.
थोडक्यात धर्मसत्ता आणि राजसत्तेतील ही युती ही आदिम काळापासुन सुरु आहे. या युतीत अनेकदा संघर्षही उडालेले आहेत हेही तेवढेच खरे. पोपची सार्वभौम सत्ता नाकारण्यासाठी इंग्लंडने स्वत:चे चर्च जसे निर्माण केले तसेच रशियातही घडले आहे. इस्लाममद्धे शिया-सुन्नी हे भेद बनले ते राजकीय कारणांनी...धार्मिक नव्हेत.
त्यामुळे आजच्या सामाजिक अवनतींसाठी धर्मसत्तांनाच दोष देण्याकडे सर्वसामान्यांचा कल असतो, पण ते तसे नसुन राजसत्ता या अधिक जबाबदार होत्या असेच म्हणावे लागते. पुरोहित वा मुल्ला-मौलवी सांगतो म्हणुन हवे ते धर्मनियम निर्माण करु देत त्यांची अंमलबजवाणी करायला राजसत्ता मुर्ख नव्हत्या...त्या तशा असुही शकत नाहीत कारण सत्ता अनिर्बंधपणे कशा टिकतात याचे भान धर्मसत्तेपेक्षा राजसत्तांनाच अधिक असते.
वर्ण-जातीव्यवस्थेबाबत व तिच्या कठोर अंमलबजावणीबाबत आजवर आपण धर्मसत्तेलाच दोष देत आलेलो आहोत. पण या व्यवस्थेचा खरा व अंतिम फायदा होता कोणाला? समाजात जेवढी विषमता असेल, समाजाचे जेवढे विभक्तीकरण होईल कि ज्यायोगे लोकांनी व्यवस्थेच्या/सत्तेच्या विरोधात एकत्र येत बंडच करु नये असे कोनाला वाटेल? ब्राह्मणांचा त्यात काय फायदा होता? तसेही लोक पुरोहितावर धर्माच्या बाबतीत विश्वास ठेवतच असतात. आपल्याच पुरोहितांविरुद्ध त्याच धर्माच्या अनुयायांनी बंड केल्याचे उदाहरण नाही. बंडे होतात ती राजसत्तांविरुद्ध. समाज विभक्त व आपापल्या जातीय/वर्णीय कोषात बंदिस्त करण्याचा खरा फायदा राजसत्तांनाच होता व धर्माचा आधार घेत त्याची अंमलबजावणी राजसत्तेखेरीज कोण करु शकत होते? एका ब्राह्मनाने लिहिलेली मनुस्म्रुती फेटाळुन लावण्याचा अधिकार राजाला कधीही होता...पण त्यांनी ते तसे केले नाही कारण त्यात त्यांचा फायदाच होता. ब्राह्मनांनी प्राप्त परिस्थितीचा स्वार्थासाठी उपयोग करुन घेत स्वहिताची कलमे घुसवली असेच फारतर म्हनता येईल.
या सर्वाची अपरिहार्य परिणती म्हणजे समाज हा धर्मवेडा बनवणे ही राजसत्ता व धर्मसत्तेची अपरिहार्य गरज होती. ते त्यात हजारो वर्षांच्या प्रदिर्घ कालात नुसते यशस्वी ठरले असे नाही तर धर्माचे गारुड जनमानसावर असे बसले कि ते दूर होणे अशक्यप्राय व्हावे. या गारुडामुळे प्रचलित व्यवस्थांच्या विरोधात, धर्माच्या विरोधात बोलणे/क्रुती करणे अशक्यच झाले. युरोपात ब्रुनो नामक शास्त्रद्न्याला बायबलाच्या विरोधात जाणारे सिद्धांत मांडतो म्हणुन जीवंत जाळले गेले. ग्यलिलियोला आजीवन कारावासात रहावे लागले. असंख्यंचा पराकोटीचा छळ केला गेला.
पण युरोपच्या विचारवंतांनी ते जनतेनेही शेवटी धर्मसत्ता व राजसत्तेला हादरा दिला. मानवी स्वातंत्र्याचे, समतेचे व बंधुतेचे नवे पर्व फ्रांसमधुन सुरु झाले. विचार, विद्न्यान, कलादि अभिव्यक्ते मुक्त श्वास घेवु लागल्या. सरंजामदारशाहीला व त्यांच्या अनिर्बंध लालसेला लगाम बसला.
पण दुर्दैवाने भारतात त्याची लागण झाली नाही. इंग्रजांचे राज्य आले, ती गुलामीही विनातक्रार स्वीकारली गेली. १८५७चे बंड हे सरंजामदारांचे त्यांच्या व्यक्तिगत मागण्यांसाठीचे बंड होते...जनतेचे ते बंड कधीच नव्हते. ते अपयशी ठरणारच होते व तसे झालेही.
याचे कारण म्हणजे सत्ता कोनाचीही असली तरी जनतेला जनतेचे असे स्वातंत्र्य भारतात कधीच नव्हते. एकीकडे धर्म तर दुसरीकडे येईल ती राजसत्ता...यांच्या कचाट्यात ही जनता सापडलेली होती. आर्थिक अवनतीचा आलेख पराकोटीच्या रसातळाला जावुन पोहोचला होता. अशा स्थितीत धर्माचेच गारुड जगण्याचे निमित्त बनणे स्वाभाविक होते. पंढरीचा राया करेल ते खरे अशी पराभुत मनोव्रुत्ती निर्माण व्हायला आजवरचे धर्मनेते ते सत्ताधारी कारणीभुत होते. जनतेच्या व्यापक कल्याणाची भावना त्यांच्यात नव्हती. शिवाजी महाराजांचे अपवादात्मक एकमात्र नांव घेता येते पण दुर्दैवाने त्यांची सत्ता मर्यादित प्रदेशावरच होती. संतांच्या मांदियाळीने बंड केले असले तरी त्यांची मांडणी ही समाजाला श्रद्धेकडेच नेणारी होती. बहुतेक संत ओबीसींमद्धे व दलितांतच जन्माला का आले याचे कारण या समाजाची परिस्थितीमुळे निर्माण झालेली नियतीशरणता व त्या अगतिकतेपोटी सारा भार इश्वरावर सोपवण्याची व्रुत्ती.
परंतु हे सारे स्वातंत्र्यपुर्व काळातील सरंजामदार व नंतर इंग्रजांच्या गुलामीच्या कालातील परिस्थितीकडे पहात क्षम्य समजता येते. तेंव्हा लोकशाही नांवाची काही बाब असते हेही लोकांना नीटसे माहित नव्हते. प्रत्येकाला अभिव्यक्तीचेच नव्हे तर सत्तेत सामील होण्याचेही स्वातंत्र्य असु शकते याची त्यांनी हजारो वर्षांत कधी कल्पनाही केलेली नव्हती. गांवात मुळात कसली इज्जत नव्हती. पाटील, जमीनदार, भिक्षुक म्हणेल त्यावर मान डोलावणे आणि त्यांची जवळपास फुकट सेवा करणे एवढेच काय ते नशीबी होते. त्यात औद्योगिकरणाने जे व्यवसाय बुडाले त्यांच्यावर तर आभाळच कोसळले. परांगदा होत शहरांकडे जात हमाली ते फुटकळ चाक-या करत पोट जाळणे अनेकांच्या नशिबी आले. त्यामुळे स्वातंत्र्य आले हे खरे, पण ते म्हणजे काय असते रे भौ असा प्रश्न त्यांच्या मनात उठणे स्वाभाविक होते.
त्याची फळे अशी कि त्यांचे जीवनच विस्कळीत बनले. तशीच मानसिकताही बनली. राजकारणापासुन तो तसा दुरच राहिला. त्याची जाण त्याला आली नाही व करुन घेण्याची इछाही झाली नाही. अपवादात्मक नेत्रुत्वे आली, पण ती आपल्या जातीची वा पोटजातीची तर नाहीत ना...मग जावु द्या...अशी उदासिनता वाढत गेली. इतिहासाचे भान नव्हते व आकलनही नव्हते. दलित समाजाला जसे बाबासाहेबांसारखे प्रकांड विद्वत-नेत्रुत्व मिळाले त्याबाबतीत हा समाज मात्र करंटाच राहिला. बाबासाहेबांना समजावुन घेत त्यांच्या विचारांचे जरी आकलन करण्याचा प्रयत्न केला असता तरी काही साध्य झाले असते. पण धर्माच्या व जातीश्रेष्ठत्वाच्या (खालच्या उतरंडीवर असुनही) अहंकारात त्याने बाबासाहेबांना नाकारले हे मात्र सत्य आहे.
हिंदु धर्म का टिकुन राहिला या प्रश्नाचे उत्तर ब्राह्मण समाज नेहमीच हा धर्म श्रेष्ठ असल्याने टिकुन राहिला असे म्हनतात. पण ते सर्वस्वी खोटे आहे. हा धर्म टिकुन राहिला याचे मुख्य कारण (अन्य काही कारणासह) ओबीसींच्या धर्मनिष्ठेत आहे, देवभोळेपणात आहे. आजही बुवा-बापुंचे आश्रम/प्रवचनादि धंदे चालतात त्यांचा सर्वात मोठा ग्राहक हाच समाज आहे, ही एक दुर्दैवी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे धर्माचे गारुड जाता जात नाही.
धर्मनिष्ठा आणि धर्मभोळेपणा यातील सीमारेषाच पुसली गेली असल्याने असे घडते आहे हे खरे आहे. सत्ताधारी जातींच्या दडपनाखाली हजारो वर्ष जगत आल्याने त्यांच्याबद्दल नकळत एक भीति व न्युनगंडही या समाजाच्या मनात आहे. आजही गांवपातळीवर सरपंच ओबीसी जरी असला (आरक्षनामुळे नाईलाजाने द्यावी लागते) तरी अंतिम शब्द हा मराठा नेत्रुत्वाचाच असतो, हेही एक वास्तव आहे. याचे कारण म्हणजे सत्तेचे पदर असंख्य बनले आहेत. समजा गांवात एखाद्याला पतसंस्थेतुन कर्ज हवे असेल तर तो कदापि मराठ्यांना दुखवु शकत नाही...कारण बव्हंशी पतसंस्था त्यांच्याच ताब्यात. तीच बाब शिक्षणसंस्थांची. याबाबतचे विवेचन मी पुढे स्वतंत्रपणे करनारच असल्याने येथे एवढे पुरे.
थोडक्यात लोकशाही दुरच आहे. मतदार होण्यापुरतीच एकतर्फी लोकशाही आहे. लोकशाही प्रक्रियेत अपवादात्मक परिस्थिती असल्याखेरीज त्याला शिरकावच नाही. ही अपवादात्मक परिस्थिती काही संख्येने मोठ्या असलेल्या जातींपुरतीच मर्यादित आहे. ती संधी दिली जाते तीही त्या-त्या जातीची स्वतंत्र व्होट ब्यंक तयार करण्यासाठी. "ओबीसी चेहरा" फक्त नांवालाच राहतो...व तोही एवढा पुसटुन टाकला जातो कि जणु तो कधी नव्हताच!
म्हणजेच, पुर्वी जे सरंजामदार होते, सरदार होते, सत्तांचे चालक होते त्यांनी लोकशाहीचा अन्वयार्थ आपल्या पद्धतीने लावुन घेत लोकशाहीच्याच माध्यमातुन नवी सरंजामदारी आणली आहे व तिच्या बेड्या घट्ट करत आणल्या आहेत. आज धर्मसत्ता (तिचे गारुड असले तरी) दुर्बल झाली आहे. कोणताही नवा धर्मनियम काढत जनतेला ठकवण्याची शक्ती हरपुन बसली आहे. काही विद्वान आजही जनतेची दिशाभुल करणारी अनैतिहासिक वक्तव्ये/लेखने करत असले तरी त्यांना उत्तरे देवु शकण्याइतपत व त्यातील दंभ समजावुन घेण्याइतपत आजची पीढी शिक्षित व विचारी झालेली आहे. जातीयवादी पक्षांनी काहीकाळ धुमाकुळ घातला असला तरी त्या पक्षांना फारसे भविष्य उरलेले नाही. भविष्यात धर्माचे गारुड उतरेल अशी आशा वाटण्याइतपत वातावरण बनते आहे.
पण प्राचीन काळापासुन सत्ताधारी असलेल्या सत्ताधारी समाजाचे राजकीय व सामाजिक विषमता वाढवणारे हे नवसरंजामदारांचे वर्तुळ निर्भय होत कसे भेदायचे हेच अखिल समाजासमोरील मोठे आव्हान आहे!

1 comment:

  1. ' देर आये मगर दुरुस्त आये ...! '
    श्री. सोनवणी यांच्या ओबीसी वरील चिंतनात्मक लेखमालेबद्दल असेच म्हणता येईल. वास्तविक अशा प्रकारचे चिंतनात्मक, चिकित्सक लेखन स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या काळात व्हायला हवे होते. अर्थात, त्यावेळी अशा पद्धतीचे लेखन झाले कि नाही याची मला अजिबात माहिती नाही हे मी या ठिकाणी कबूल करतो. झाले असल्यास त्याचा व्हावा तसा फायदा झाला नाही हे सद्य परिस्थितीवरून दिसून येत आहे आणि अशा तऱ्हेचे लेखन झाले नसेल तर त्याचे दुष्परिणाम आज आपल्या अनुभवास येत आहेत असेचं म्हणावे लागत आहे.

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...