Wednesday, July 11, 2012

नामदेवांचे विश्वव्यापी रुप उलगडणारा विशेषांक!

मराठीत मराठी मानस संपन्न करणारी दिवाळी अंकांची अवाढव्य अशी परंपरा आहे. काही प्रमाणात वासंतीक विशेषांकही प्रसिद्ध होत असतात. गेली सातशे वर्ष मराठीच नव्हे तर संपुर्ण देशवासियांसाठी  पंढरीच्या श्री विठ्ठलाला आराध्य मानत भक्तीमार्गातुन जाती-भेदातीत समतेकडे नेणारा महामार्ग संतांनी निर्माण केला...आषाढी एकादशी म्हणजे भक्तीला उधान येणारा दिवस. पण मराठीत आतापर्यंत आषाढीचे औचित्य साधत विशेषांक मात्र कधी निघाले नव्हते. ही उणीव संपादकद्वय श्री सचीन परब आणि श्रीरंग गायकवाड यांनी "रिंगण" हा पहिला, अत्यंत संग्रहणीय असा संत नामदेव विशेषांक काढुन दूर केली आहे.







नामदेव हे आद्य संत. राष्ट्रीय विचार करणारे, राष्ट्राच्या कानाकोप-यात "ज्ञानदीप लावू जगी" अशी प्रतिज्ञा सत्यात आणनारे महामानव. चोखोबा व त्याच्या कुटुंबियांना...एक अनाथ जनाईलाही संतत्वाकडे नेणारे संतोत्तम. नाथपंथिय ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांनाही त्यांनी भक्तीमार्गाकडे वळवले. जेथे गेले तेथील लोकांचे होत विविध भाषांत अजरामर रचना केल्या. त्यांच्यामुळेच कबीर, नानक, नरसी मेहता, मलूकदास अशा संतांची मांदियाळी देशभर उभी राहिली. विठ्ठलाची नाहीत एवढी मंदिरे एकट्या नामदेवांची आहेत...गुरुद्वारा आहेत. त्यामुळे पहिला विशेषांक संत नामदेवांवर निघणे हे औचित्यपुर्ण असेच होते. नामदेवांच्या कार्याचे सर्वांगिण मुल्यमापन करनारे तब्ब्ल २८ अत्यंत अभ्यासपुर्ण व माहितीपुर्ण लेख या विशेषांकात आहेत. त्यातुन नामदेवांचे अवाढव्य कार्य आपल्यासमोर उलगडत जाते...माहित नसलेले नामदेव समजायला मोलाची मदत होते.

"विश्वरुप दर्शन" या लेखात प्रशांत जाधव यांनी नामदेवांच्या नरसी नामदेव या हिंगोली जिल्ह्यातील जन्मगांवी जावून त्यांच्या घराला व तेथे बनत असलेल्या अवाढव्य गुरुद्वा-याला भेट दिल्याचा वृत्तांत भारावून टाकणारा. "नामदेवे रचिला (शीख धर्माचा) पाया हा नीलेश बने यांचा लेख पंजाबात घुमान व जेथे जेथे नामदेवांची मंदिरे आहेत त्या स्थळांना भेट देवून तेथे नामदेवांबाबत शीख समाजात केवढी पराकोटीची श्रद्धा आहे व म्हणुन महाराष्ट्रीयांबद्दल केवढी आत्मियता आहे याचे दर्शन घडवणारा लेख नामदेवांचे विश्वव्यापी रूप उलगडते. "नामदेवनो गुजरात" हा धवल पाटील यांचा लेख गुजरातचे आद्य संतकवी नरसी मेहतांवर नामदेवांचा केवढा प्रभाव आहे हे स्पष्ट करतो. डा. वीणा मनचंदा "भक्ति परंपरांचा त्रिवेणी संगम" हा लेख नामदेव, कबीर व नानक या समतेच्या प्रतीकांमधील भावबंध उलगडुन दाखवतो तर पराग पाटील यांनी "नामयाची पंढरी" या लेखातुन अठरापगड जातींच्या...अगदी अस्पृष्य चोखोबादि संतांनाही जी अमाप प्रतिष्ठा मिळवून दिली त्या रहस्याचा मनोवेधक वेध घेतला आहे. दानाराम छिपा "म्हारो नामदेव" या लेखात राजस्थानात एकट्या नामदेवांची साडेतिनशे मंदिरे आहेत हे सांगत राजस्थानी जनमानसावरील आजही नामदेवांचा प्रभाव कसा अमिट आहे हे आपल्याला समजावून सांगतात. या अंकात डा. अशोक कामत, डा. भरतकुमार राऊत, हर्षदा परब, भालचंद्र नेमाडे, प्रा. नि. ना. रेळेकर इत्यादिंचे अत्यंत अभ्यासपुर्ण लेखही आहेत...डा. सदानंद मोरेंची प्रदिर्घ मुलाखतही आहे. सर्वच लेखांचा परामर्श घेणे शक्य नसले तरी या विशेषांकाच्या रुपाने नामदेवांचे अत्यंत उपयुक्त असे विविधांगी डाक्युमेंटेशन झाले आहे हे मात्र निर्विवादपणे म्हणता येते.

सातशे वर्षापुर्वी फक्त आपला प्रदेश हेच आपले कार्यक्षेत्र न मानता अवघा देश ज्या संताने आपल्या विराट मिठीत कवळला तसा संत नामदेवांसारखा अन्य कोणी संत झाला नाही. नुसता भागवत नव्हे तर शीख धर्माचा पायाही त्यांनी घातला...जाती-पातीच्या भिंतीही वास्तवात तोडुन दाखवल्या याबद्दल अवघा देश त्यांचा चिरकाळ ऋणी राहील.

"रिंगण" हा सचीन परब आणि श्रीरंग गायकवाड यांच्या अथक प्रयत्नांतुन साकार झालेला विशेषांक. मराठीतील पहिलाच आषाढी विशेषांक. त्याला सांप्रदायिक बनु न देता सखोल माहितीपुर्ण बनवणे हे एक आव्हान. ते या उभयतांनी समर्थपणे पेलले आहे. सर्वांनी तो अवश्य वाचावा...संग्रही ठेवावा.

रिंगण
संपादन:
सचीन परब आणि श्रीरंग गायकवाड
वितरक: मनोविकास प्रकाशन (०२०-६५२६२९५०)
मूल्य: रु. ६०/- मात्र
पृष्ठसंख्या-१२०




1 comment:

  1. [FROM:FACEBOOK}You, Shailesh Rajput and Sunil Chawhan like this.

    Sunil Chawhan: nice
    21 hours ago · Like

    Hari Narke: अप्रतिम अंक आहे.सर्वांनी वाचावा,संग्रही ठेवावा असा.
    19 hours ago · Like

    Amol Shivaji Kochale उत्तम
    नामदेवे रचिला पाया तुका झालाशी कळस
    नामदेवांचे अभंग शिखांच्या धर्मग्रंथात आढळतात
    नामदेवांनी संत ञानेश्वर & भावंडांचा सांभाळ केला
    अश्या संत नामदेवांच्या नावे काढलेल्या या अंकाने त्यांचे कार्य लोकांना आणखी समजेल & पसरेल
    19 hours ago · Like{FROM:FACEBOOK}

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...